प्रदीप राणे : अजातशत्रू, प्रयोगशील एकांकिकाकार
कला-संस्कृती - नाटकबिटक
प्रा. कमलाकर सोनटक्के
  • प्रदीप राणे आणि त्यांच्या एकांकिका महोत्सवाच्या रंगीत तालमीची काही दृश्यं
  • Sun , 01 October 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti नाटबिटक Play Drama प्रदीप राणे Pradeep Rane कमलाकर सोनटक्के Kamlakar Sontakke

प्रयोग या मालाड, मुंबईच्या नाट्यसंस्थेनं ‘लेखक एक, नाट्यछटा अनेक’ या नावानं प्रख्यात एकांकिकाकार प्रदीप राणे यांच्या ११ एकांकिकांचा महोत्सव आज आणि उद्या (१ व २ ऑक्टोबर) बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे लघुनाट्यगृहामध्ये आयोजित केला आहे. त्यानिमित्ताने या अजातशत्रू, प्रयोगशील नाटककाराविषयी त्यांच्या जवळच्या मित्रानं लिहिलेला हा विशेष लेख...

.............................................................................................................................................

प्रदीप राणे यांनी १९७०-८० या काळात वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या शैलीच्या अनेक एकांकिका लिहून सादर केल्या. राणेंनी बहुश: आपल्या एकांकिका स्वत:च दिग्दर्शित केल्या. प्रत्येक एकांकिका त्यांनी केवळ स्पर्धेसाठीच लिहिली असं नाही. त्यांच्या एकांकिका कुठल्या एका महाविद्यालयासाठी, संचासाठी किंवा कलाकार संचाला समोर ठेवून, रंगमंचीय ठोकताळे बांधून युक्त्या-प्रयुक्त्यांची जोडबांधणी करून लिहिल्या किंवा सादर केल्या गेल्या नाहीत. त्यांच्या बहुअायामी प्रतिभेनं प्रत्येक एकांकिकेला एक नवी झळाळी मिळवून दिली. एका नव्या ऐवजाला त्यांनी समोर आणलं.

राणेंच्या प्रत्येक एकांकिकेचा विषय, आशय, घटनाक्रम, भाषा, चरित्र-चित्रण आणि अंतिम उद्देश हा भिन्न असायचा. त्यात एक रसरशीत ताजेपणा असायचा. पाश्चात्य न-नाट्यांचा आणि ब्रेख्तपासून तो युगो बेट्टीच्या नाटकांचा आणि बेकेटपासून आयनेस्कोच्या नाटकाचा बडेजाव त्या काळी मिरवला जात असला, तरी राणेंच्या नाटकांवर त्या सहप्रवाहाचा जरासुद्धा प्रत्यक्ष परिणाम झालेला दिसत नाही. तरीही त्यांच्या एकांकिकामध्ये एक सळसळतं, आधुनिक, भविष्यवादी जीवनदर्शन घडायचं एवढं मात्र नक्की.

राणेंच्या बहुसंख्य एकांकिकांना वेगवेगळ्या स्पर्धामधून पुरस्कार मिळाले, त्या एकांकिकांचा थोडाफार गवगवा झाला, पण पुढे फारसं काही झालं नाही; किंबहुना त्याचं फार काही व्हावं अशी अपेक्षाही तेव्हा नसायची. मला वाटतं प्रयोग संपल्यानंतर सादर केलेल्या एकांकिकांच्या संपूर्ण संहिता स्वत: लेखकांकडे सुद्धा संग्रहित नसायच्या. त्या मिळवताना लेखक आणि प्रयोग मालाडच्या संस्थाचालकांना कितीतरी प्रयास पडले असतील.

एकांकिका - अहम् आवाम् वयम्

एकांकिका हे माध्यम खूप लवचीक आहे. प्रभावी संहिता, नटांची ऊर्जा, दिग्दर्शकाची कल्पकता, प्रेक्षकांवर अपेक्षित प्रभाव आणि दीर्घकालीन परिणाम साधणारं माध्यम आहे. एकांकिका करताना साधनांचा अभाव हीच करणाऱ्यांची प्रेरणा, परीक्षा आणि शक्ती ठरते. इथं कुठलेही लोकप्रियतेचे आडाखे\गणितं नसतात. व्यावसायिक नाटकासारखं व्यवहाराचं दडपणही नसतं. भीतीपोटी खूप काही भडक, देदीप्यमान करण्याचा मोह नसतो. सारं कसं प्रामाणिक, खुल्लमखुल्ला, थेट आणि म्हणून खऱ्या जाणिवांचा वसा घेऊन आलेलं असतं.

बहुश: यशस्वी ठरलेल्या, स्मरणात राहणाऱ्या बहुतेक एकांकिका करणाऱ्यांनी कधीही आडाखे बांधून लिहिल्या किंवा सादर केल्या असं वाटत नाही. त्यांची संवाद साधण्याची, लिहिण्याची, करण्याची अंतर्गत वेगळं काही सांगण्याची उर्मी होती, म्हणून ते करत गेले. त्यांनी प्रयोग संख्येची किंवा अगदी प्रेक्षकांचीही कधी फारशी तमा बाळगली नाही. त्यांच्या ध्यासापोटी ते करत गेले आणि एकांकिकांची सशक्त एक चळवळ उभी राहिली. कालांतरानं यातील काही लेखक संपूर्ण नाटकांकडे वळले. काही यशस्वी झाले, काही स्थिरावले, पण सारेच व्यावसायिक रंगभूमीवर स्थिरावले असं मात्र झालं नाही. ज्यांनी कसदार नाटकं दिली, त्यांचं समांतर रंगभूमीवर कौतुक झालं. ज्यांनी व्यावसायिक रंगभूमीचे आडाखे समजून घेऊन जी नाटकं बेतली ती यशस्वी झाली.

एकांकिका लेखन म्हणजे संपूर्ण नाटक लिहिण्याची पहिली पायरी असं मात्र सर्वेशाम म्हणता येणार नाही. कारण एकांकिका हा एक स्वतंत्र, स्वयंपूर्ण नाट्याविष्कार आहे, त्याचे काही निश्चित नियम आणि संकेत आहेत आणि ते कालपरत्वे बदलत गेले आहेत. याचं कारण समाज परिवर्तनशील असतो. प्रेक्षकांची अभिरूची ही काळाबरोबर आणि सभोवताला बरोबर, अन्य रंजनाच्या साधनांच्या तुलनेत सातत्यानं बदलत असते.

एकांकिका - माझं नाव गणपतराव

एकांकिका हा एक स्वतंत्र आणि परिपूर्ण कलाविष्कार आहे. त्यात भर घालून पूर्ण नाटक होऊ शकत नाही किंवा संपूर्ण नाटकाची संकोच करून एकांकिका होत नाही. विषय, आशय, ऐवज आणि सादरीकरण या साऱ्या घटकांसह एकांकिका अवतरते आणि सिद्ध होत असते.

प्रयोग मालाडतर्फे राणेंच्या एकांकिका महाराष्ट्रातील वेगवेगळ्या केंद्रांवरील संस्थांसाठी प्राथमिक फेरीत सादर केल्या जाणार आहेत. नाटक, एकांकिका, तरुण रंगकर्मी यांच्यावर भरभरून प्रेम करणारे, तरुण पिढीला वारंवार मार्गदर्शन करणारे आणि नाटक या माध्यमाचा ध्यास अहोरात्र जपणारे नाट्यधर्मी डॉ. अनिल बांदिवडेकर, सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी हे प्राथमिक फेरीच्या एकांकिकांचे प्रयोग बघून युवा कलावंतांशी संवाद साधणार आहेत. प्रयोग मालाडच्या कार्यकर्त्यांबरोबरच नाट्यरसिकांना ही प्राथमिक फेरी एक पर्वणी, कृतीशील कार्यशाळा ठरेल. कारण ही त्रयी प्रत्येक नाटकाच्या विषय आशयापासून तो नाटकाच्या व्याकरणातील सारे बारकावे आणि सारी सूत्रं, सिद्धान्त आणि प्रात्यक्षिकांच्या स्तरावर जगत आले आहेत. याबरोबरच या तिघांचाही प्रत्यक्ष दैनंदिन संबंध हा नाट्य अन्वय, दिग्दर्शनापासून तो दूरदर्शन आणि प्रसारमाध्यमांच्या विविध दालनांतून नेमकेपणानं, मोजकेपणानं प्रभावी आणि नाट्यमय पद्धतीनं प्रस्तुत करण्याची क्षमता आणि प्रगाढ अनुभव आहे. तरुण पिढीवर त्यांचं मनापासून प्रेम असलं तरी ते अतिशय काटेकोरपणे निरक्षीर न्यायानं प्रत्येक प्रयोगाचं तटस्थपणे मूल्यमापन करतील ही तमाम स्पर्धक संस्थांची श्रद्धा आहे.

आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे राणेंच्या नाट्यलेखनाबद्दल या साऱ्यांना अतीव आदर आहे. राणेंच्या नाट्यप्रतिभेचं आजच्या काळात पुनर्मूल्यांकन करून नवे अर्थ शोधण्याची यांची क्षमता आहे. दुसरी जमेची बाब म्हणजे प्रदीप राणेंच्या बऱ्याच एकांकिका या प्रश्न उभे करतात आणि त्यांची उत्तरं वाचक, सादरकर्ते प्रेक्षकांसाठी मुक्त सोडतात. प्राथमिक फेरीमधील हा कलासंवाद अनेकार्थानं उपकारक ठरण्याची शक्यता आहे.

एकांकिका - बाबीचो बाबू

राणेंच्या ‘वर्कशॉप’, ‘अ‍ॅश इज बर्निंग’, ‘चिऊताई चिऊताई दार उघड’, ‘इंद्रधनुष्य’, ‘युरेका युरेका’, ‘स्वगत स्वगते’ आदि एकांकिका नंतरच्या काळातल्या आहेत. त्यांनी मराठी रंगभूमीच्या तरुण पिढीला वेडावलं. अनेक स्पर्धांमधून, महाविद्यालयांतून, बँकांमधून त्यांच्या या एकांकिकांचे प्रयोग होत राहिले. त्यांच्या जवळपास साऱ्याच एकांकिकांना पहिले-दुसरे पुरस्कार मिळत राहिले. त्यापेक्षा मला एका वेगळ्या गोष्टीचं विशेष अप्रूप वाटतं की, त्यांच्या बऱ्याच एकांकिका हिंदी, गुजराती भाषेत अनुवादित झाल्या आणि त्यांचे मराठी एवढेच अर्थवाही प्रयोग या भाषांमध्येही झाले. याचं प्रमुख कारण राणे हे एखाद्या दृष्ट्या सर्जकाप्रमाणे आपला कथाविषय, पात्रं, ताण-तणाव, एका भाषिक पातळीवरून खूप वरच्या स्तरावर नेऊन समष्टीच्या स्वरूपात सादर करतात. साध्या-सध्या घटना, प्रसंग, संघर्ष त्यांच्या नाटिकांमधून सार्वत्रिक होतात. साऱ्यांचे होतात आणि त्याच वेळी ते व्यक्तिगत स्तरावरही अर्थपूर्ण राहतात.

एकांकिका स्पर्धा जिंकायच्या म्हणजे तरुण पिढी वेगवेगळ्या युक्त्या-क्लृप्त्या, आडाखे यांचा वापर करून, प्रयोगाद्वारे चक्रावून टाकण्याचा प्रयत्न करत असत. याचप्रमाणे त्या काळात भरपूर नट समूहांचा वापर, प्रकाशयोजना आणि नेपथ्यातून काही अघटित प्रभाव निर्माण करत. ते बऱ्याच वेळा यशस्वीही होत. राणेंना मात्र अशा बाह्य युक्त्या-क्लृप्त्यांचा फारसा वापर करण्याची गरज पडली नाही. याचं एक कारण मला जाणवतं की, त्यांच्या एकांकिकांमधून त्यांनी मांडलेले विषय एवढे विभिन्न, आगळेवेगळे होते की त्यांनी त्या-त्या विषयाचा केलेला विस्तारच पुरेसा नाट्यपूर्ण, विविधांगी असायचा. याचं कारण त्यांचे बहुतेक विषय हे त्यांच्या चौफेर वाचनातून, जग बघण्यातून, मानवी स्वभावाचा ठाव घेण्याच्या वृत्तीतून यायचे. भरभरून जग बघितल्यानं बऱ्या-वाईटाच्या पल्याड असलेल्या जगाचं दर्शन घडवत असतं. त्याचं हे दर्शन खूप समृद्ध असतं, दिशादर्शक असतं. प्रत्येकाला आपला मार्ग शोधायला प्रवृत्त करणारं आणि प्रेरणादायी असतं.

सामान्य परिवारात वाढल्यानं माणसं खूप संकुचित होतात, जगाचा हेवा करायला लागतात, आपल्या प्रतिसादात अजाणता कटू होतात. मग ज्या क्षेत्रात तुम्ही कार्यरत असता त्या क्षेत्रात त्याचे पडसादही आपातत: पडतात. राणेंच्या समग्र लेखनाचा आवाका लक्षात घेता या माणसाच्या वैचारिक बैठकीचा ठाव घेणं खरंच कठीण वाटतं. सारे बाह्य आडाखे त्यांच्या बाबतीत अपुरे ठरतात. नारायण सुर्वे यांच्एयावढंच प्रेम त्यांचं विंदा करंदीकरांवर आणि तेवढंच तात्यासाहेब शिरवाडकरांच्या कवितांवरही आहे. हे सारं असलं तरी राणेंच्या लेखनावर ना डाव्या चळवळवादी विचारसरणीचा वा मांडणीचा ठसा उमटला, ना परात्परवादी अथवा जीवनवादी तत्त्वज्ञानाचा. राणेंचं लेखन हे वरील साऱ्यांचं सार पचवून केवळ त्यांच्या स्वत:च्याच शैलीशी प्रामाणिक राहिलं. जी शैली प्रत्येक एकांकिकेसोबत एक नवोन्मेषशशाली आविष्कार, नवी भाषा, नवा घाट आणि आकृतीबंध घेऊन आलेली वाटते. ‘अ‍ॅश इज बर्निंग’ असो किंवा ‘चिऊताई…’ असो. राणे त्या एकांकिकेतून केव्हाच बाहेर पडलेले बघायला मिळतात. ते यशानं कधी भारावून गेल्याचं ऐकिवात नाही. किंबहुना ते इतके अबोल, अंतर्मुख होते आणि आहेत की हा माणूस एवढ्या प्रचंड अनुभवविश्वाचा निर्माता, लेखक आहे… आपल्या प्रत्येक एकांकिकेनुरूप रंगभाषा बदलून ती एकांकिका रसरशीतपणे सादर करणारा दिग्दर्शक आहे, हे कुणाला सांगून पटणार नाही. मला वाटतं त्यांचा हा विनम्र, मनमिळावू अंतर्मुख स्वभाव, प्रामाणिकपणा हाच त्यांच्या नाट्यलेखनाला सतत ऊर्जा पुरवत असावा. समाजात मिसळूनही ते निर्लिप्त, तटस्थ असतात.

एकांकिका - बी.आय.टी. चाळ नं. १०\३२

राणेंचा राशीयोगही फार शुभ, सकारात्मक आणि प्रभावी असावा. त्यांच्या काळी मला ठाऊक असलेला मराठी, हिंदी, गुजराती रंगभूमीवरील बहुतेक कर्तबगार कलावंत, तंत्रज्ञ, निर्माता प्रदीप राणेंवर केवळ प्रेम आणि प्रेमच करताना दिसत असत. अजातशत्रूपेक्षा जगन्मित्र हीच संज्ञा त्यांना अधिक लागू पडते.

त्यांचा हा राशीयोग त्यांच्या दिग्दर्शनात दिसतो, तसाच त्यांच्या नाटकातील पात्र योजनेतही. त्यांच्या बऱ्याच एकांकिका या अधिकाधिक स्त्री भूमिकाप्रधान आहेत. या स्त्रियाही बहुअंगी, बहुढंगी. प्रचलित अर्थानं सोशिक खस्ता खाणारी आई, प्रेमाखातर सर्वस्व उधळून लावणारी प्रेयसी, अभ्यासू विद्यार्थिनी अशा ढोबळ प्रतिमांपलीकडे त्यांच्या नाटकातील स्त्रिया असत. त्यांचं वागणं, बोलणं, विचार करणं आणि प्रत्येक घटनाप्रसंगात प्रतिसाद देणं हे अतिशय विशिष्ट असतात. अगदी प्रतीकात्मक नसलं तरी बिंबात्मक, अर्करूपात असतं.

राणेंच्या प्रत्येक एकांकिकेसाठी ज्या मुली निवडल्या जायच्या, त्या फार मोठा पूर्वानुभव असलेल्या असत असं नाही. पण राणेंच्या एकांकिकेतील काम म्हणजे हमखास अभिनयाचा पुरस्कार आणि पुढे अभिनयाच्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवण्याची कायम सनद, असं जणू विधिलिखित असावं साधना सोहनी, मीनल परमार, मुनिरा विराणी, उज्ज्वला टकले, दीपशिखा, विभा देशपांडे ही मला ठाऊक असलेली काही नावं.

एकांकिका - झपूर्झा

राणे हे बाह्यार्थानं कधीच ठोकताळ्यानं दिग्दर्शन करत नसायचे हा त्यांचा लौकिक. नाटकाचा पट, पात्रांचे ताणेबाणे, वीण,  ताणतणाव यांचा संहितेच्या आधारानं प्रत्येकाला शोध घ्यायला ते लावायचे. त्यांना नाट्य परिणामांची कधीच तमा नसायची. पण या मंथन प्रक्रियेत कलावंत सक्रिय झाल्यावर जे फलित मिळायचं ते अस्सल, बावनकशी असायचं. ते त्या त्या कलावंताचं स्वत:चं असायचं. आभासापलीकडच्या सत्याचा शोध घेणारं असायचं, खरंखुरं असायचं.

पहिल्याच वाचनाला कर्टन कॉल आखून आणलेल्या दिग्दर्शकांना त्या नाटकापुरतं यश ठोकून ठोकून मिळत असेल, पण राणेंकडे बरंच काही उत्स्फूर्ततेवर, सांघिक मंथनावर अवलंबून असतं; म्हणून त्यांच्या नाटकात कलावंताच्या प्रत्येक दिवसाच्या आत्मशोधातून आणि सांघिक शोधातून एका चैतन्यमयी निर्मितीचा बोध होत जातो. तो सर्वानुभूतीचा असून स्वयंसिद्ध असतो. यात दिग्दर्शकाची नाट्य-दृष्टी खूप समृद्ध, परिपक्व आणि प्रतिभा सर्वस्पर्शी असावी लागते. ती लेखक-दिग्दर्शक राणेंकडे आहे अशी माझी धारणा आहे.

प्रयोग मालाड या संस्थेनं राणेंच्या एकांकिका महोत्सवाचं आयोजन करून युवा पिढीला त्यांच्या एकांकिकांचा नजराना पेश केला आहे. राणे या अजातशत्रू रंगधर्मीला या उपक्रमातून कदाचित नवी ऊर्मी मिळेल, नवी प्रेरणा मिळेल. आम्ही प्रदीप राणेंवर प्रेम करणारे, त्याला या प्रसंगी त्याच्या व्यक्तिगत आणि कलागत वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो.

प्रयोग मालाडचं पुन्हा एकवार अभिनंदन करताना एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. महाराष्ट्र शासन अनेक नव्या योजना आखत आहे. महाराष्ट्र कला अकादमीची स्थापना होऊन अनेक वर्षं लोटलीत. पण एकांकिका, संपूर्ण नाटक, संगीत नाटक, बालरंगभूमी यांचा समृद्ध वारसा साहित्य, संहिता प्रत्यक्ष प्रयोग, त्यावरील संशोधन, अर्थघटन, दृकचित्र माध्यम यांच्या द्वारे जतन करून ठेवण्यास शासनानं पुढं यायला हवं. प्रयोग मालाडसारख्या संस्थांच्या यासारख्या रचनात्म उपक्रमांच्या पाठी उभं राहायला हवं असं प्रकर्षानं वाटतं.

लेखक प्रा. कमलाकर सोनटक्के ज्येष्ठ रंगकर्मी आहेत.

sontakkem@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......