“जिचा मुलगा हरवलाय अशा आईची व्याख्या काय? तीसुद्धा कायद्याने ‘अर्धी आई’ होणार?’’
ग्रंथनामा - आगामी
शहनाज बशीर
  • ‘हाफ मदर’चं मुखपृष्ठ
  • Sun , 14 May 2017
  • ग्रंथनामा Booksnama आगामी हाफ मदर The Half Mother शहनाज बशीर Shahnaz Bashir गीतांजली वैशंपायन मनोविकास प्रकाशन Mnovikas Prakashan

शहनाज बशीर यांच्या मूळ इंग्रजी कादंबरीचा ‘द हाफ् मदर : एका काश्मीरी मातेचा आक्रोश’ या नावाने गीतांजली वैशंपायन यांनी मराठी अनुवाद केला आहे. हे पुस्तक मनोविकास प्रकाशनातर्फे लवकरच प्रकाशित होत आहे. एका काश्मीरी मातेच्या व्यथेची ही कहाणी हेलावून टाकणारी आहे.

..................................................................................................................................................................

कोर्टाच्या विटनेस बॉक्समध्ये शकील उभा होता. ग्रे रंगाचा खास ड्रेस घातलेला; जेलमधल्या वास्तव्यात वाढलेली दाढी छातीपर्यंत रुळलेली; पायांत स्लीपर्स. त्याचा एक हात साखळीने बांधलेला होता. साखळीचं दुसरं टोक कॉन्स्टेबलच्या हातात. मोकळा हात विटनेस बॉक्सच्या गोल खुंटीवर ठेवून तो उभा होता.

“जनाब, आमच्या लपून बसण्याच्या जागेवर धाड पडली आणि आमचे काही सहकारी पकडले गेले. त्यात इमरान भटचा भाऊ शाहीन भटही होता. मी आणि इमरान पळून जाण्यात यशस्वी झालो. मेजर कुशवाहना चकवण्याचा आमचा प्रयत्न होता.

नातीपोरातल्या आपल्या सोडून गेलेल्या घरातलं सामान घेण्यासाठी एक ‘पंडित’ गेले तेव्हा त्यांना संरक्षण देण्यासाठी आर्मीचे काही लोक गेले होते. आम्ही त्यांच्यावर हल्ला केला. मग मेजर कुशवाह चांगलेच खवळले. त्यांचे लोक आमच्यावर चालून आले तेव्हा आमची पळापळ झाली. आम्ही ज्या बंगल्यात लपून बसलो होतो तिथे मी पोचलो खरा; पण उडी मारून आत जाताना मी चुकलो. बाहेरच्या बाजूला पडलो. मग काय सैनिकांच्या हाती आयता सापडलो. मला धरून नेलं ते थेट नातीपोरा आर्मी कँपमध्ये. समोर मेजर कुशवाह! काही बोलण्यापूर्वी ते विकट हसले; म्हणाले, एक माणूस म्हणजे एक मेडल! त्यांनी माझा दिवसरात्र छळ केला. ‘मरण येईल तर बरं, निदान सुटका तरी होईल’ असं वाटायचं. काही दिवसांनी छळाची तीव्रता कमी झाली; तोवर मी पूर्ण बदललो होतो. अल्लावरचा माझा विश्‍वास उडला; मी निर्दयी झालो. मेजर कुशवाहचा ससेमिरा चुकवण्यासाठी मी एक मार्ग शोधला. इमरान जू ला मी ओळखत होतो. तोच इमरान भट आहे असं सांगण्याचं मी ठरवलं. छळापासून सुटका करून घेण्याचा तोच एक मार्ग मला दिसला. मी इमरान भटचा पत्ता सांगतो या प्रस्तावावर मेजरनी बराच विचार केला. एका रात्री अचानक ते माझ्या सेलमध्ये आले; मला ओळखू येणार नाही असे पायघोळ कपडे घातले गेले. माझा चेहराही झाकला. आम्ही इमरान जू च्या घरावर धाड घातली; त्याला पकडलं. मग माझी रवानगी ‘पापा-२’ या छळछावणीत झाली. मी शेवटचं इमरान भटला पाहिलं ते बदामी बागेतल्या सेलमध्ये. तो खूप घाबरलेला होता पण ठीक वाटला.’’

कोर्टाने अब्दुस सलाम ह्या न्हाव्यालाही साक्षीसाठी बोलावलं.

अखेर हलीमाने ठरवलं- आर्मीविरुद्ध केस दाखल करायची! इजहारनेच तिची अ‍ॅड. फारूक अहमद यांच्याशी ओळख करून दिली. इमरानच्या केसची पहिली सुनावणी त्यानंतर तब्बल एक महिन्याने झाली. त्यादरम्यान हलीमा वारंवार कोर्टात जायची. तिच्यासारखे अनेक जण तिथे होते. त्यांचे जिवलग हरवले होते; त्या जिवलगांच्या काळजीने त्यांचे चेहरे उदासवाणे दिसायचे. केसेस सुरू होत्या; निकाल काय लागेल याची खात्री नव्हती. बिच्चारी माणसं! आपला नंबर येईल म्हणून तासनतास ताटकळत बसायची. आपल्यासारख्या इतरांची सुनावणी कशी सुरू आहे इकडे सगळ्यांचे डोळे लागलेले असायचे. कुणाचा नवरा हरवला होता; कुणाचा मुलगा, तर कुणाचा भाऊ! सगळ्यांची व्यथा एकच आहे हे हलीमाच्या लक्षात आलं.

आईबरोबर लहान मुलंही आलेली असायची. त्यांची खेळणी, लॉलीपॉप सगळा लवाजमा घेऊन बायका यायच्या. मुलं तिथल्या कामकाजाला कंटाळली की, आरडाओरडा करायची. फेकाफेक करायची. बाहेर नेण्यासाठी हट्ट करायची. ज्यांचा जन्म होण्यापूर्वी ज्यांचे वडील नाहीसे झाले; अशीही काही लहान मुलं त्यात होती. त्यांना केवळ फोटोतून वडिलांची ओळख होती- आईने बरोबर आणलेल्या! काही मुलं तर कोर्टात चक्क गाढ झोपायची.

हळूहळू हलीमा त्या सगळ्यात मिसळली. आता ते सगळे एकत्र खायचे, मागच्या बागेत बसायचे, गप्पा मारायचे. आपल्या ‘प्रिय व्यक्तीचं भवितव्य काय’ हा काळीज पोखरणारा प्रश्‍न प्रत्येकाला भेडसावत होता. पुढे काय हालचाल करायची यावर ते चर्चा करायचे. हलीमा त्यांचं बोलणं ऐकून घ्यायची. कोणी विचारलं तर आपलीही कर्मकथा समोरच्या व्यक्तीला सांगायची.

मोठ्या संख्येने जेव्हा अशी माणसं नाहीशी होऊ लागली तेव्हा कोर्टातली गर्दी फारच वाढली. अशी प्रकरणं निकाली काढण्याची कोर्टाची असमर्थता लोकांच्या लक्षात आली. मग लोकांनी एकजूट करण्याचं ठरवलं.

एक दिवस हलीमाने पुढाकार घेतला आणि अशा सगळ्या लोकांना बागेत एकत्र केलं. तिथल्या एका सिमेंटच्या कठड्याला टेकून ती उभी राहिली. तिच्या शेजारच्या बाईच्या कडेवर लहान मूल होतं. ते सारखं आपल्या आईचा बुरखा बाजूला करत होतं. वेफर, चॉकोलेट खाऊन त्याचं तोंड चिकट झालं होतं. गालावरही चॉकोलेटचे ओघळ होते. समोर एक आजोबा उभे होते. गुडघे दुखत असावेत त्यांचे. फिरन घातलेली आत. पायांना हात लावून बसले होते. हलीमाचं बोलणं ते लक्षपूर्वक ऐकत होते. तिने आपल्या फिरनमध्ये हात घालून बेल्ट बाहेर काढला. त्याबरोबर जवळ बसलेल्या लोकांच्या नजरा वळल्या. “माझा कंबरेचा पट्टा.’’ ती ओशाळवाणं हसत म्हणाली.

तो सिमेंटचा कठडा थंडीमुळे गार पडला. तो गारवा हलीमाला सोसेना. मग ती एका लार्चच्या फांदीला टेकून उभी राहिली. हल्ली तिची पाठ सारखी दुखायची.

सगळं वातावरण सर्द झालं.

“...हे बघा, हे सगळं दिवसेंदिवस लांबत चाललंय. पण प्रत्येकाने एकट्याने लढायचं ठरवलं तर हे आणखी अवघड होत जाईल.’’ बोलत असताना तिने हाताची घडी घातली होती, “...मात्र आपण सगळ्यांनी मिळून लढायचं तर आधी तसं एकत्र व्हायला पाहिजे. आपण आपली संघटना केली तर...? तुम्हाला ही कल्पना कशी वाटते?’’ भाषण संपवून ती थांबली.

काही जणांनी मन हलवली. त्यात एक महिलाही होती. तिचा नवरा कोठडीत असताना नाहीसा झाला होता. ज्या तुकडीने त्याला नेलं होतं ते नरभक्षक असावेत; त्यांनी तिच्या नवर्‍याला खाऊन टाकलंय...असा तिचा आरोप होता. दु:खाच्या भरात तिने डोकं आपटून घेतल्याच्या खुणा दिसत होत्या. तिने स्कार्फ मानेच्या मागे बांधला होता.

“मी आपल्या वकिलांशी चर्चा केली आहे. आपण संघटना केली आणि लढा दिला तर न्याय मिळण्याची शक्यता आहे असं ते म्हणाले. आपण काय करायचं?’’ हलीमाने सगळ्यांना विचारलं.

“चालेल... चालेल.’’ सगळे एकसुरात ओरडले. एका वयस्कर गृहस्थांनी हात वर केला. त्यांच्या सगळ्या अंगावर सुरकुत्या होत्या. वाकलेले, थकलेले. अंगातला कोटही मळलेला. त्यांनी कानाला मशीन लावलं असावं. ते अगदी कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करत होते.

“चला तर मग. वकीलसाहेबांनी आपल्या संघटनेसाठी एक नाव पक्कं केलंय. मी तुम्हाला वाचून दाखवते...’’ बोलता बोलता तिने पुन्हा आपला बेल्ट नीट केला.

सगळे उत्सुकतेने हलीमाकडे बघत होते. त्या चॉकलेट खाणार्‍या बाळाच्या आईने आपल्या फिरनच्या एका टोकाने त्याचं नाक पुसलं.

“‘हरवलेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांची संघटना’ असं नाव त्यांनी सुचवलं आहे; तुम्हाला ते मान्य आहे का?’’ ते नाव उच्चारताना ती जरा गोंधळली. खरं तर तिने आधी सराव केला होता.

“हो, आम्हाला हे मान्य आहे.’’ सगळे एकमुखाने ओरडले.

“आता आपल्याला संघटनेचे अध्यक्ष निवडायचे आहेत. ठरवा बघू काय ते.’’ असं म्हणून ती सगळ्यांमध्ये जाऊन बसली.

सगळीकडे कुजबूज सुरू झाली. शेवटी त्या वयस्कर आजोबांनी बोलायला सुरुवात केली, “हलीमाच हे काम चांगलं करू शकेल असं मला वाटतं. आपण पडलो अडाणी! ती या बाबतीत आपल्यापेक्षा अनुभवी आहे. तिनेच सगळ्यांना एकत्र आणलं. तेव्हा...’’

सगळ्यांना हा प्रस्ताव मान्य झाला. हलीमा बुचकळ्यात पडली. काय करावं तिला सुचेना. तिला थोडी भीतीही वाटली. पण आता आपण माघार घेणं योग्य नव्हे; असं समजून तिने ते मान्य केलं.

“नाव तर ठरलं; आता आपल्याला संघटनेची नोंदणी करायची.’’ विचार करून तिने पुन्हा बोलायला सुरुवात केली, “प्रत्येकाने आपलं नाव आणि इतर तपशील लिहायचे. ती यादी तयार करून आपण वकिलांना देऊ यात.’’

“हो लगेचच!’’ ते सगळे वकिलाकडे जायला निघाले. कोर्टाच्या लायब्ररीत अ‍ॅड. फारूक अहमद जाडजूड पुस्तक घेऊन वाचत होते. ते हलले की त्यांचा सिल्कचा काळा कोटही मागच्या बाजूने हलायचा. हातात एक पुस्तक घेऊन ते एका गोल टेबलजवळ बसले.

“अखेर काय ठरवलंय तुम्ही?’’ त्यांनी हलीमाला विचारलं. पुस्तकात खुपसलेलं डोकं वरही न करता ते बोलत होते. हलीमा आणि तिच्यासोबत असलेला घोळका आत शिरताना त्यांनी पाहिलं होतं.

“आम्हाला प्रस्ताव मान्य आहे.’’ त्या सगळ्यांनी उत्साहात सांगितलं. त्या सगळ्यात हलीमाचा आवाज ओळखू आला.

“ठीक आहे. आता आपण कामाची कागदपत्रं तयार केली पाहिजेत. सुरुवात यादी करण्यापासून!’’

“हो, जनाब.’’

पुस्तकांच्या ढिगाजवळ एक फोल्डर होतं. त्यातून त्यांनी कोर्टाच्या कामासाठी लागणारे खास कागद काढले. एक कागद समोर ठेवून एका पुस्तकाने त्यावर समास आखला. नंतर त्यांनी तीन उभ्या रेघा आखून एकूण चार रकाने केले. समास धरून एकूण पाच.

‘हरवलेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांची संघटना’ त्यांनी कागदाच्या मध्यभागी नाव लिहिलं. मग एकेक रकाना भरायला सुरुवात केली.

अनु.     नातेवाइकाचे नाव             पत्ता                   हरवलेल्या व्यक्तीशी नाते    व्यक्तीचे नाव

1.         राजा बेगम                    राजवार, कुपवाडा        अर्धी विधवा                 अल्ताफ

2.         मुहम्मद याकुब रंगार       स्टॉप, खानयार          वडील                         मुश्ताक

3.        सकीना अख्तर             झिरो ब्रीज, श्रीनगर       अर्धी विधवा                   मंझूर

4.        मोहम्मद इस्माईल           तंगमार्ग                  मुलगा                        जी. नबी

यादी वाढत राहिली...

हलीमाचं नाव पुकारलं गेलं. ती पुढे आली. तिने त्या कागदावर काय लिहिलंय ते वाकून पाहिलं.

“तुमचे जे नातेवाईक हरवले आहेत ते जिवंत आहेत की नाहीत हे आपल्याला नक्की माहीत नाही. त्यामुळे जिचा नवरा हरवला आहे तिला आपण ‘अर्धी विधवा’ असं म्हणणार. इतर नात्यांसाठीसुद्धा अशीच व्याख्या केली जाईल. ही कायद्याची भाषा आहे. कायदेशीर लढाईसाठी तीच वापरावी लागते.’’ अ‍ॅड. फारूक अहमद यांनी सगळ्यांना समजावून सांगितलं.

‘अर्धी विधवा!’ हलीमा तो शब्द ऐकून शोकसंतप्त झाली. कोणीतरी चिमटा काढला असं तिला वाटून गेलं.

“मग जिचा मुलगा हरवलाय अशा आईची व्याख्या काय, अ‍ॅड. फारूक अहमद?’’ तिने फटकन विचारलं, “तीसुद्धा कायद्याने ‘अर्धी आई’ होणार का?’’

अ‍ॅड. फारूक अहमद तिच्याकडे वळले. वातावरणात विलक्षण शांतता पसरली. अ‍ॅड. फारूक अहमदनी लिहिणं थांबवलं. मूल गेलेलं असो; हरवलं असो अथवा जिवंत असो; एकदा जन्म दिला की आई ही आईच असते. तिला काय उत्तर द्यायचं हे त्यांना सुचेना. हलीमाने मोठाच पेच टाकला होता. तिची कायदेशीर व्याख्या नेमकी कोणती लिहायची हे त्यांना कळेना.

“मला सांगा ना, आता मीसुद्धा ‘अर्धी आई’ आहे का?’’ हलीमाचा प्रश्‍न सगळ्यांचं काळीज चिरत गेला.

..................................................................................................................................................................

‘द हाफ् मदर : एका काश्मीरी मातेचा आक्रोश’  या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3476

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......