मुलांना का वाचून दाखवावे?
ग्रंथनामा - झलक
जिम ट्रिलीज
  • ‘मुलांना वाचून दाखवा आणि त्यांचे आयुष्य घडवा’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sun , 26 March 2017
  • ग्रंथनामा Granthnama झलक मुलांना वाचून दाखवा आणि त्यांचे आयुष्य घडवा जिम ट्रिलीज Jim Trelease राजेंद्र कुंभार Rajendra Kumbhar डायमंड पब्लिकेशन्स Diamond Publications

‘मुलांना वाचून दाखवा आणि त्यांचे आयुष्य घडवा’ हा अमेरिकी लेखक जिम ट्रिलीज यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉ. राजेंद्र कुंभार यांनी केला असून तो नुकताच डायमंड पब्लिकेशन्स, पुणे यांनी प्रकाशित केला आहे. त्यातील पहिल्या प्रकरणाचा हा संपादित अंश.

.............................................................................................................................................

बादली पाण्याने भरण्याप्रमाणे मुलांच्या डोक्यामध्ये ज्ञान ओतण्याला शिक्षण म्हणत नाहीत. तर मुलांमध्ये शिकण्याची तीव्र इच्छा निर्माण करण्याला शिक्षण म्हणतात. - विल्यम बटलर यीटस्

न्यू जर्सी  राज्यातील यूनियन या गावातील कनेक्टिकट फार्मस एलेमेंटरी स्कूल या शाळेत माझे प्राथमिक शिक्षण झाले. बालवाडीच्या ज्या वर्गात मी शिकलो होतो, त्या वर्गाला खूप वर्षांनंतर म्हणजे १९८० मध्ये मी भेट देत होतो. वर्गामध्ये साधारणपणे पंधरा विद्यार्थी होते. व ते सर्व जण माझ्याकडे कसल्यातरी अपेक्षेने पाहत होते. मी त्यांना विचारले, ‘‘तुमच्यापैकी किती विद्यार्थ्यांना या वर्षी वाचायला शिकायचे आहे?’’ क्षणाचाही विलंब न लावता वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याने हात वर केला. अनेकांनी तर अत्यंत ऐटीत सांगितले की, ‘‘कसे वाचायचे हे मला माहीत आहे!’’ बालवाडीच्या विद्यार्थ्यांना शिकवणार्‍या अनेक शिक्षकांनी मला सांगितले होते, की शालेय शिक्षणाची सुरुवात करत असताना प्रत्येक लहान मुलाची वाचायला शिकण्याची इच्छा असते. मी भेट देत असलेल्या वर्गातील मुलांचा उत्साह हा बालवाडीच्या शिक्षकांनी मला सांगितलेल्या वरील अनुभवाचीच साक्ष देत होता. दुसर्‍या शब्दांत असे म्हणता येईल, की मुलांचे शालेय शिक्षण सुरू होते, तेव्हा त्यांची वाचायला शिकण्याची १०० टक्के इच्छा असते. आणि या वयात वाचायला शिकण्याचा त्यांचा उत्साहही दांडगा असतो.

१९८० नंतर काही वर्षांनी नॅशनल रीडिंग रिपोर्ट कार्ड या संशोधन प्रकल्पाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या वाचन सवयींचे सर्वेक्षण केले गेले. तेव्हा मात्र वर सांगितलेल्यापेक्षा वेगळे चित्र आढळले. मुले जसे-जशी मोठी होतात, तस-तसा त्यांच्या वाचनविषयक दृष्टिकोनात आणि वर्तनात खूप फरक पडतो असे या सर्वेक्षणात आढळले. या सर्वेक्षणातील काही ठळक निष्कर्ष पुढीलप्रमाणे होते:

चवथ्या इयत्तेतील ५४ टक्के विद्यार्थी आनंद मिळवण्यासाठी दररोज काहीतरी वाचतात.

आठव्या इयत्तेतील केवळ ३० टक्के विद्यार्थी आनंद मिळवण्यासाठी दररोज वाचतात.

बाराव्या इयत्तेतील केवळ १९ टक्के विद्यार्थी आनंद मिळवण्यासाठी दररोज काहीही वाचतात.

द कैसर फॅमिली फाउंडेशनने २०१० मध्ये आठ ते १८ वर्षे वयाच्या मुलांचे वाचनविषयक दीर्घकालीन संशोधन केले. या संशोधनात फाउंडेशनला आढळले की, ५३ टक्के मुले एकही पुस्तक वाचत नाहीत, ६५ टक्के मुले एकही मॅगझीन वाचत नाहीत आणि ७७ टक्के मुले वर्तमानपत्र वाचत नाहीत.

ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्स या संस्थेने २०१० मध्ये १५ ते १९ या वयोगटातील युवकांच्या वाचन सवयींचे सर्वेक्षण केले होते. सदर सर्वेक्षणानुसार १५ ते १९ या वयोगटातील मुले दररोज केवळ १२ मिनिटे वाचन करत होते. याउलट टीव्ही पाहण्यामध्येमात्र ते दररोजचे २ तास २३ मिनिटे खर्च करत होते.

विचार करा : बालवाडीत शिकणार्‍या सर्वच्या सर्व मुलांना वाचनाची इच्छा असते, आवड असते. खरे तर त्यांची ही आवड जन्मभर टिकायला हवी. प्रत्यक्षात मात्र १८ वर्षांचे होईपर्यंत या संभाव्य आजन्म वाचकांमधील तीन चतुर्थांश वाचक आपण गमावतो. कोणताही व्यवसाय एवढ्या मोठ्या संख्येने त्याचे ग्राहक गमावत असेल, तर तो व्यवसाय लवकरच बंद पडणार यात काही शंका नाही. बालपण ते युवावस्था हा काळ सामाजिक आणि भावनिक जडणघडणीच्या दृष्टिकोनातून मानवी जीवनातील सर्वांत व्यग्र काळ असतो. म्हणून या वयातील वाचकांच्या संख्येमध्ये नैसर्गिकरीत्या काही घट होणार हे मान्य करू या. परंतु मुलांना वाचनाची लहानपणी जी गोडी लागली होती, ती गोडी त्यांना परत कधी लागलीच नाही तर काय करायचे? आजन्म वाचत राहणारे वाचक तयार करणे; तसेच पदवीधर झाल्यावरसुद्धा पुढे वाचत राहून स्वयंशिक्षण घेणारे विद्यार्थी तयार करणे हा शालेय शिक्षणाचा उद्देश असतो. परंतु हा उद्देश आजच्या शिक्षण व्यवस्थेला साध्य करता आलेला नाही. हाच तर आजच्या शिक्षण व्यवस्थेवरील प्रमुख आरोप आहे.

मुलांचे बालपणातील वाचनाचे प्रमाण त्यांच्या प्रौढपणात कसे बदलते ते पाहू या. तेरा ते सतरा या वयोगटातील मुलांच्या आनंददायक वाचनसवयीचे नुकतेच सर्वेक्षण केले गेले. योगायोगाने या दोन्ही सर्वेक्षणांच्या निष्कर्षांमध्ये कमालीची समानता आहे. नॅशनल एंडोमेंट फॉर आर्टस् या संस्थेच्या सर्वेक्षणात आढळले की, १९८२ च्या तुलनेत सध्याच्या प्रौढांचे ललितसाहित्य वाचनाचे प्रमाण २२ टक्क्यांनी घटले आहे. विशेष म्हणजे सर्व वंशाच्या लोकांमधील, सर्व शैक्षणिक स्तरातील महिला तसेच पुरुष वर्गातील वाचनाचे प्रमाण घटलेले आढळले. या संस्थेच्या २००२ च्या सर्वेक्षणातून आढळले की, आधीच्या वर्षात केवळ ४६.७ टक्के प्रौढांनी एखादी कादंबरी वाचली होती. प्रौढांनी वाचलेल्या साहित्यामध्ये वर्तमानपत्रे, नियतकालिके किंवा इतर प्रकारच्या पुस्तकांसह केलेल्या विस्तारित सर्वेक्षणात प्रौढांच्या वाचनाची टक्केवारी ५० टक्क्यापर्यंत वाढलेली आढळली. थोडक्यात याचा अर्थ असा आहे की, ५० टक्के अमेरिकन नागरिकांना वाचनाची आवड नाही.

या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये सांगितल्याप्रमाणे १९७१ ते २००८ या दरम्यान सतरा वर्षे वयाच्या वाचकांच्या वाचनकौशल्यात केवळ एका टक्क्याची, आणि तेरा वर्षे वयाच्या वाचकांच्या वाचनकौशल्यात केवळ पाच टक्क्यांची वाढ झालेली आढळली होती. याचा अर्थ एकूण ३७ वर्षांमध्ये मुलांच्या वाचनकौशल्यामध्ये अगदीच किरकोळ वाढ झाली आहे. विशेष म्हणजे या ३७ वर्षांपैकी निम्मी वर्षे राष्ट्रीय आणि राज्य सरकारे अभ्यासक्रम सुधारणा उपक्रम राबवत आहेत. एका बाजूला मुलांच्या वाचनसवयींबाबतची ही अशी दयनीय अवस्था दाखवणारी आकडेवारी आहे, तर दुसर्‍या बाजूला आठ ते अठरा वयोगटातील विद्यार्थी मोबाईल आणि मल्टिमीडियाचा दररोज साडेसात तास वापर करत आहेत अशी आकडेवारी आहे. या दोन्ही आकडेवारींचा एकत्रित विचार केल्यावर लक्षात येते, की मुलांच्या वाचनामध्ये अडथळे आणणारे आणि मुलांचे वाचन कमी करणारे एक भयंकर वादळ आपल्या अगदी जवळ आले आहे.

लहान मुले जेव्हा फेसबुक, ट्विटस् वापरतात किंवा जेव्हा ऑनलाईन असतात, तेव्हा ते वाचत नाहीत का?

वरील तत्त्वाबाबत आशावाद बाळगणारा विचारवंतांचा एक गट आहे. मी मात्र या विचाराशी सहमत नाही. फेसबुक, टि्वटस् इत्यादींवरील मजकूर हा रेफ्रिजरेटरवर मॅग्नेटद्वारे चिकटवलेल्या जाहिरातवजा मजकुरासारखाच असतो. उलट रिफ्रिजरेटरवरील मजकूर हा फेसबुक, टि्वटस् इत्यादींवरील मजकुरापेक्षा चांगला लिहिलेला असतो आणि यातील वाक्येही मोठी असतात. अलीकडील एका आकडेवारीनुसार अमेरिकन युवक प्रत्येक महिन्याला ३३३९ टेक्स्ट मेसेजेस लिहीत आहेत. विशेष म्हणजे ही संख्या सतत वाढत आहे. किंवा झोपेचे तास सोडून राहिलेल्या प्रत्येक तासाला अमेरिकन युवक सरासरी सहा टेक्स्ट मेसेजेस लिहीत आहेत. मुले जेव्हा टेक्स्ट मेसेजिंग करत असतात, तेव्हा एका वेळेस केवळ १३० ते १६० अक्षरांशीच त्यांचा संपर्क येतो. एवढ्या लहान मजकुराच्या वाचनातून मुलांचे वाचन किंवा विचारकौशल्ये विकसित होण्याची शक्यता फारच कमी आहे. बहुतांशकरून या मजकुरांचे विषय गप्पाटप्पा, कपडे, संगीत, मनोरंजन असेच असतात. त्यामुळे हे मजकूर लिहीत असताना कोणत्याही प्रकारचा सखोल, गंभीर विचार केला जात नाही. विशेषत: जर अशा मेसेजेसला तुम्ही त्वरित म्हणजेच इन्स्टंट प्रतिसाद देत असाल, तर सखोल विचार करण्याची शक्यता आणखी कमी होते. ऑनलाईन वाचनाबाबतचे संशोधन असे सांगते, की भेट दिलेल्या वेबपेजवरील केवळ १८ टक्केच मजकूर उपभोक्ते वाचतात. आणि एक वेबपेज ते सरासरी दहा सेकंद किंवा त्याहीपेक्षा कमी वेळ पाहतात. याबाबत अधिक माहिती प्रकरण सातमध्ये दिलेली आहे.

प्रत्येक शाळेमध्ये काही विद्यार्थी असे असतात, की ज्यांनी संपूर्ण क्रमिक पुस्तक एकदाही वाचलेले नसते आणि तरीही ही मुले उत्तीर्ण होतात. हे खरे आहे. विशेष म्हणजे हे पूर्वी घडत होते आणि आताही घडते. क्रमिक पुस्तक पूर्णपणे न वाचता उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांची शाळा आणि महाविद्यालयातील संख्या वाढते आहे. याबाबत शिक्षक चिंतेत आहेत. विद्यार्थ्यांच्या वाचनसवयींबाबत शिक्षकांकडून एक तक्रार मी नेहमी ऐकतो : माझ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी केवळ २५ ते ३० टक्के विद्यार्थ्यांनाच वाचायला खूप आवडते; गेल्या वर्षी अगदी थोड्या विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने वाचन केलेले असते; त्यांना त्यांचा आवडता लेखक सांगता येत नाही किंवा बालपणातील त्यांचे आवडते पुस्तकही सांगता येत नाही.

वाचनाच्या बाबतीत काही विद्यार्थी कशी हुशारी करतात हे सांगताना एका नामांकित शाळेचे शिक्षक म्हणतात : असे विद्यार्थी क्रमिक पुस्तकातील केवळ महत्त्वाचा भाग वाचतात किंवा महत्त्वाची तेवढी माहिती इंटरनेटवर शोधतात किंवा जी मुले वाचन करतात त्यांना विचारतात किंवा शिक्षक वर्गात वाचत असताना ऐकतात व आपली वाचनाची गरज भागवतात. वाचनाची अजिबातच आवड नसल्यामुळे असे विद्यार्थी प्रचलित यंत्रणेचा मजाक उडवत वर्गामध्ये चक्क झोप काढतात. या मुलांना वाचन का आवडत नाही? कारण एकतर त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याचा कधी कोणी प्रयत्न केलेला नसतो. किंवा गृहपाठाच्या आणि अभ्यासाच्या तणावामुळे वाचन आनंददायी असते, हे त्यांना कधीच अनुभवायला मिळालेले नसते. थोडक्यात, वाचन आणि आनंद यांच्यातील सहसंबंध त्यांना कधीही जाणवलेला नसतो.

वरील सर्व चर्चेचा अर्थ अमेरिका हे एक निरक्षर राष्ट्र आहे असा नाही. नाही,  आपण नक्कीच निरक्षर नाही. कारण सर्वसाधारण अमेरिकन विद्यार्थ्यांना वाचता येते. आणि म्हणूनच तर आपल्या देशातील ६० टक्के तरुण आता उच्च शिक्षण घेत आहेत. १९४० मध्ये हे प्रमाण केवळ २० टक्के होते.

लहानपणी तसेच शालेय शिक्षणादरम्यान फारसे वाचन न केलेले विद्यार्थी जेव्हा महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतात, तेव्हा त्यांच्यातील वाचनाची कमतरता उघडकीस येते. आणि या कमतरतेचे परिणाम लवकरच दिसायला लागतात. जसे की, महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ७४ टक्के विद्यार्थी कधीच त्यांचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करत नाहीत. त्याचप्रमाणे महाविद्यालयात प्रवेश घेतलेले ४३ टक्के विद्यार्थी कधीच पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करत नाहीत. प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक ऍलन वुडी यांच्या मतानुसार कोणत्याही गोष्टीची सुरुवात करणे म्हणजे ८० टक्के यश मिळवण्यासारखे आहे. परंतु महाविद्यालयीन शिक्षणाला हा सुविचार लागू पडत नाही. महाविद्यालयात केवळ प्रवेश घेतला म्हणजे पदवी मिळत नाही. पदवी मिळवण्यासाठी अभ्यास करावाच लागतो.

पदविका अभ्यासक्रमात विद्यार्थी का नापास होतात? न्यू यॉर्क स्टेट कम्युनिटी कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या तीन चतुर्थांश नवीन विद्यार्थ्यांना वाचन, लेखन, आणि गणित या विषयांसाठी उपचारात्मक शिकवणी आवश्यक असते. अशा उपचारात्मक शिकवणीचा राज्याच्या तिजोरीवर तीन कोटी तीस लाख डॉलर्सचा बोजा पडतो. उपचारात्मक शिकवणीची गरज भासणारे बहुसंख्य विद्यार्थी हायस्कूलमधून पदवी घेऊन आलेले असतात. असे विद्यार्थी होमस्कूलिंगमधून आलेले नसतात. ही कामगाराची मुले असतात. तसेच ती मुले गरीब कुटुंबातील असतात. बर्‍याच वेळा कॉलेजच्या शिक्षणापर्यंत पोहोचणारे त्यांच्या कुंटुंबातील ते पहिलेच सदस्य असतात. विचारात घेण्यासारखी विशेष महत्त्वाची बाब ही आहे की, ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या कोणत्याही स्तरावर फारसे यश मिळत नाही, त्या विद्यार्थ्यांच्या घरी ग्रंथ, नियतकालिके, वर्तमानपत्रे इत्यादी वाचनसाहित्याचा खूप अभाव असतो. दुसर्‍या शब्दात सांगायचे, तर  हे विद्यार्थी वाचनसाहित्याचा अभाव असलेल्या घरातील आणि शाळेतील असतात. वाचनसाहित्य उपलब्ध नसेल, तर या मुलांना खूप वाचणे शक्य होत नाही आणि त्यांना चांगले वाचनसाहित्य वाचायला मिळत नाही. या विषयाबाबात अधिक चर्चा प्रकरण चारमध्ये केलेली आहे.

तर मग विद्यार्थ्यांच्या वाचनाची ही समस्या कशी सोडवायची?

१९८० च्या दशकात अमेरिकन शालेय विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती अत्यंत चिंतनीय होती. त्यावर उपाय शोधण्यासाठी अमेरिकन शिक्षण विभागाने १९८३ मध्ये कमिशन ऑन रीडिंग नावाचा आयोग नेमला. विद्यार्थ्यांचे सर्वांगीण शैक्षणिक यश हे वाचनक्षमतेवर अवलंबून आहे म्हणून वाचन हेच शैक्षणिक समस्येच्या किंवा उपायांच्या केंद्रस्थानी असले पाहिजे याबाबत आयोगाच्या सदस्यांमध्ये एकमत होते.

मुलांचे वाचन आणि तत्संबंधित विषयावर गेल्या २५ वर्षांत केल्या गेलेल्या हजारो संशोधनांचा सदर आयोगाने दोन वर्षे काळजीपूर्वक अभ्यास केला. व त्यावर आधारित ‘बिकमिंग ए नेशन ऑफ रीडिंग’ नावाचा अहवाल शासनाला सादर केला. या आयोगाचे दोन महत्त्वाचे निष्कर्ष खालीलप्रमाणे होते:

‘‘मुलांना लहानपणापासून वाचून दाखवणे हाच वाचनातील परिपूर्ण यश मिळवण्यासाठीचा एकमेव मार्ग आहे.’’

‘‘सर्व इयत्तांमधील मुलांना वाचून दाखवले पाहिजे.’’ केवळ घरीच नाही तर शाळेमध्येही मुलांना वाचून दाखवणे उपयुक्त ठरते या विचाराचे समर्थन करणारे भक्कम पुरावे आयोगाला आढळले होते.

‘‘वाचून दाखवणे हाच एकमेव मार्ग आहे’’ असे नमूद करताना आयोगातील तज्ज्ञांना सांगायचे होते, की कार्यपुस्तिका, गृहपाठ, ग्रंथपरीक्षण, फ्लॅशकार्ड या सर्वांपेक्षा वाचून दाखवणे अधिक महत्त्वाचे आहे. परिणामकारक शिक्षणाचा एक सर्वांत सुलभ, स्वस्त आणि जुना मार्ग म्हणून वाचून दाखवण्याला प्रोत्साहन द्यावे असे या अहवालामध्ये सुचवण्यात आले होते. वाचून दाखवण्याचा उपक्रम घरी तसेच शाळेतही राबवता येतो. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला कोणत्याही पदविकेची आवश्यकता नसते.

एखादी व्यक्ती वाचनामध्ये कशी निष्णात होते? ती व्यक्ती चांगले वाचन कधी करू लागते? यासाठीची दोन सुलभ सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत :

तुम्ही जेवढे जास्त वाचन करता, तेवढे तुमचे वाचन अधिक चांगले होते; तुमचे वाचन जेवढे चांगले होते, तेवढे तुम्हाला वाचन जास्त आवडायला लागते; आणि जेव्हा वाचन तुम्हाला जास्त आवडायला लागते, तेव्हा तुम्ही जास्त वाचन करता.

तुमचे वाचन जेवढे जास्त, तेवढे तुमचे ज्ञान जास्त; आणि तुमचे ज्ञान जेवढे जास्त असते, तेवढे तुम्ही अधिक बुद्धिमान होता.

बहुसंख्य विद्यार्थी चौथ्या इयत्तेत येईपर्यंत वाचायला शिकलेले असतात. परंतु हे विद्यार्थी जेव्हा आठवीमध्ये पोहोचतात, तेव्हा त्यातील २४ टक्के विद्यार्थ्यांच्या वाचनाची कौशल्यपातळी सर्वसामान्य पातळीपेक्षाही कमी झालेली असते. बेचाळीस टक्के विद्यार्थ्यांच्या वाचनाची कौशल्यपातळी सर्वसामान्य दर्जाची असते; पंचवीस टक्के विद्यार्थ्यांच्या वाचनाची कौशल्यपातळी निष्णात दर्जाची असते आणि केवळ तीन टक्के विद्यार्थ्यांच्या वाचनाची कौशल्यपातळी प्रगत दर्जाची असते. वाचनकौशल्यामध्ये सर्वसामान्य पातळीपासून निष्णात पातळीपर्यंत आणि तेथून प्रगत पातळीपर्यंत सुधारणा करण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचनाचा सराव करणे अत्यंत आवश्यक असते. वाचायला शिकणे हे सायकल चालवायला शिकण्यासारखेच आहे. तुम्ही सायकल जेवढी जास्त चालवता, सायकल शिकत असताना जेवढ्या जास्त वेळा तुम्ही सायकलीवरून पडता, पुन्हा सायकलीवर बसून ती चालवता, तेव्हा तुम्हाला सायकल अधिक चांगली चालवता येते. सायकल वळवताना कोणत्या बाजूला झुकणे आवश्यक असते, सायकल थांबवत असताना पाय जमिनीवर कधी टेकवावा, यासारख्या गोष्टी तुम्हाला सरावानंतरच माहीत होतील. म्हणून मार्गारेट मीक यांनी सरावाला ‘‘व्यक्तिगत धडे’’ असे म्हटले आहे.

तिसर्‍या इयत्तेपर्यंत विद्यार्थ्याने काही वाचनकौशल्ये शिकलेली असतात. चौथ्या इयत्तेत आल्यावर त्याने मागील तीन वर्षांमध्ये शिकलेल्या व्यक्तिगत वाचनकौशल्यांचे उपयोजन करून पुस्तकातील संपूर्ण परिच्छेद आणि पान वाचणे अपेक्षित असते. थोडक्यात त्याच्या वाचनकौशल्यांचा त्याने अवलंब करावा आणि अधिक वाचत राहावे अशी अपेक्षा असते. परंतु नेमक्या याच म्हणजे चौथ्या इयत्तेपासूनच विद्यार्थ्यांचा वाचनाबद्दल नकारात्मक दृष्टिकोन तयार होण्यास सुरुवात होते. म्हणून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील हा काळ ‘चौथ्या इयत्तेतील आपटी’ या वाक्प्रचाराने संबोधला जातो. कै. जीन छाल यांच्या संशोधनातून हा वाक्प्रचार अस्तित्वात आला आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनातील हाच काळ आहे, की जेव्हा वाचन क्षमतेच्या वैशिष्ट्यांआधारे विद्यार्थ्यांचे आपल्याला दोन गट दिसायला लागतात. एक म्हणजे वाचनकौशल्ये असणारा गट आणि दुसरा म्हणजे वाचनकौशल्यांसाठी संघर्ष करणारा गट. या दुसर्‍या गटाला उपचारात्मक उपायांची गरज असते.

परंतु मुलांनी जर मूलभूत वाचनकौशल्ये कंटाळवाण्या आणि वेदनादायक पद्धतीने शिकली असतील किंवा त्यांना वाचन तशा पद्धतीने शिकवले गेले असेल, तर मात्र ते वाचनाचा तिरस्कारच करणार. परिणामी ते शाळेबाहेर कधीच वाचन करणार नाहीत. विद्यार्थी त्यांच्या एकूण वेळेपैकी मोठा वेळ शाळेबाहेर असतात. म्हणून हा वेळ विद्यार्थी कसा वापरतात यावरून ते निष्णात वाचक होणार की वाचनात मागे पडणार हे ठरत असते. विद्यार्थ्यांचे शाळेबाहेरील वाचन आणि त्याला परीक्षेत मिळणारे गुण यांचा सहसंबंध आहेच. म्हणून सांगावे वाटते, की जर शाळेबाहेर केले नाही भरपूर वाचन, तर शाळेत मिळणार नक्कीच खूप कमी गुण.

कमिशन ऑन रीडिंग त्यांच्या अहवालाद्वारे राष्ट्राला उद्देशून अवाहन करत होते, की मुलांना शक्यतो बालपणापासून वाचून दाखवा. आणि मुले थोडी मोठी झाल्यावर तर नक्कीच, शाळेत आणि शाळेबाहेर वाचून दाखवा. वाचन इच्छेचे मुलांमध्ये बीजारोपण करा. केवळ याच उपायांनी विद्यार्थ्यांची वाचनसमस्या सोडवली जाऊ शकते अशी या आयोगाची खातरी होती.

मुलांना वाचून दाखवण्यासारखी अगदी साधी बाब एवढी परिणामकारक कशी ठरू शकते?

ज्याप्रमाणे लाकूड हा इमारत निर्मितीसाठीचा एक अत्यावश्यक घटक आहे, त्याचप्रमाणे शब्द हा शिकण्याच्या प्रक्रियेचा एक अत्यावश्यक घटक आहे. आणि शब्द मेंदूपर्यंत पोहोचण्याचे केवळ दोनच प्रभावी मार्ग आहेत : एक म्हणजे शब्द पाहणे आणि दुसरे म्हणजे शब्द ऐकणे. बाल्यावस्थेपासून ते साधारणपणे पाच-सहा वर्षाचे होईपर्यंत मुले वाचू शकत नाहीत. म्हणजेच या वयातील मुले शब्द मेंदूपर्यंत पाठवण्यासाठी डोळ्यांचा वापर करू शकत नाही. म्हणून बालकाचे कान हेच त्याच्या शब्दसंग्रहणाचे उत्तम साधन ठरतात. केवळ कानच शब्दांना बालकाच्या मेंदूपर्यंत पोहोचवू शकतात. आपण जे शब्द बालकाच्या कानाद्वारे त्याच्या मेंदूकडे पाठवतो, तेच त्याच्या ‘‘मेंदू घराचे’’ आधार होतात. पुढे जेव्हा मूल स्वत: वाचायला शिकत असते, तेव्हा त्याच्या कानातील अर्थपूर्ण आवाज ते वाचत असलेल्या शब्दांचे योग्य अर्थ लावण्यास त्याला मदत करतात.

आपण आपल्या मुलांबरोबर अनेक उद्देशांनी संवाद साधतो. यामध्ये त्यांना आत्मविश्‍वास मिळवून देणे, त्यांचे मनोरंजन करणे, त्यांच्या आणि आपल्यामधील नाते दृढ करणे, त्यांना विविध विषयाची माहिती देणे किंवा स्पष्टीकरण देणे, त्यांच्यामध्ये कुतूहल जागवणे, उत्सुकता निर्माण करणे, त्यांना प्रेरणा देणे इत्यादी उद्देशांचा समावेश होतो. ज्याप्रमाणे मुलांबरोबर संवाद साधल्याने हे उद्देश साध्य होतात, त्याचप्रमाणे मुलांना वाचून दाखवल्यानेही हे उद्देश साध्य होतात. याशिवाय वाचून दाखवल्याने पुढील अधिकचे फायदे मिळतात.

मुलांच्या शब्दसंग्रहामध्ये वाढ होते.

वाचन आणि आनंद यांचा सहसंबंध जोडण्याची मुलांच्या मेंदूला सवय लागते.

मुलांना पार्श्वभूमित्वक ज्ञान मिळते.

मुलांना आदर्श वाचकाचा नमुना पहायला मिळतो.

मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होते.

.............................................................................................................................................

मुलांना वाचून दाखवा आणि त्यांचे आयुष्य घडवा - जिम ट्रिलीज, मराठी अनुवाद - डॉ. राजेंद्र कुंभार,

डायमंड पब्लिकेशन्स, पुणे, पाने - ३००, मूल्य - ३९५ रुपये.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/324

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

?????????? ??????

Fri , 26 May 2017

खूपच सुंदर


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......