भिजायचं कसं हे ज्याला कळतं, रुजायचं कसं हे त्यालाच कळतं!
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
राम जगताप
  • कवी-चित्रकार श्रीकृष्ण बेडेकर यांनी मंगेश पाडगावकरांचं केलेलं पेंटिंग
  • Sun , 01 January 2017
  • मंगेश पाडगावकर Mangesh Padgaonkar पाऊसगाणी Pausgani ग्रेट भेट Great Bhet निखिल वागळे Nikhil Wagle आयबीएन लोकमत Ibn Lokmat

परवाच कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा पहिला स्मृतिदिन साजरा झाला. त्यानिमित्ताने त्यांचा मुलगा, अजित पाडगावकर यांनी संपादित केलेला ‘पाऊसगाणी’ हा संग्रह प्रकाशित झाला. १९५० ते २०१५ या या पासष्ट वर्षांत पाडगावकरांनी पावसाविषयी लिहिलेल्या कवितांचा हा संग्रह आहे. या संग्रहात पावसाची वेगवेगळी रूपं टिपणाऱ्या तब्बल ८५ कविता आहेत. या संग्रहाला ज्येष्ठ ललितलेखक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांनी छोटीशी पण मार्मिक प्रस्तावना लिहिली आहे. त्यात त्यांनी पाडगावकरांना ‘पावसाचा कवी’ म्हटलं आहे.

त्यानिमित्ताने पाडगावकरांसोबतची एक पावसातली आठवण. आणि गेल्या वर्षी त्यांच्यावर लिहिलेला मृत्यूलेख...

१.

माझी आयबीएन लोकमतमधील कारकीर्द तशी छोटीच. ११ ऑक्टोबर २००७ रोजी मी जॉइन झालो. सुरुवातीला सहा-सात महिने आमचं ट्रेनिंग होतं. त्यात टीव्हीवरच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या संहितालेखनापासून ते कॅमेरासंदर्भातल्या तांत्रिक गोष्टींपर्यंत अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याच दरम्यान चॅनेलचं स्वरूप बर्‍यापैकी निश्‍चित करण्यात आलं. त्यात ‘ग्रेट-भेट’ हा दिग्गजांच्या मुलाखतींचा कार्यक्रम ठरला होता. या मुलाखती वृत्तवाहिनीचे संपादक निखिल वागळे स्वत: घेणार होते. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, साहित्य, चित्रपट, कला, नाटक, उद्योग-व्यवसाय असा विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांच्या मुलाखती या कार्यक्रमात घेतल्या जाणार होत्या. तासाभराच्या या मुलाखतीमध्ये संबंधित व्यक्तीला त्याच्या क्षेत्राबद्दल, कामाबद्दल बोलतं करणं, तसंच त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या काही अप्रकाशित पैलूंवर प्रकाश टाकणं हा त्यामागचा हेतू होता.

या मुलाखतींसाठी रिसर्च करणारी आणि इतर को-ऑर्डिनेशन करणारी टीम वेगळी होती. चॅनेल सुरू झाल्यावर पहिलीच ग्रेट-भेट झाली ती प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची. तोवर मराठी वृत्तवाहिन्यांवर तासाभराची मुलाखत घेतली जात नव्हती. इंग्रजी वृत्तवाहिन्यांवर अशा मुलाखती होत, पण मराठी वृत्तवाहिन्या याबाबतीत मागे होत्या. आयबीएन लोकमतच्या पहिल्याच मुलाखतीला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एवढंच नव्हे, तर पुढच्या चार-पाच वर्षांमध्ये ग्रेट-भेट हा मुलाखतीचा कार्यक्रम सर्वाधिक लोकप्रिय झाला.

वृत्तवाहिनी सुरू झाल्यावर काही दिवसांनी स्वतंत्र फीचर्स विभाग सुरू झाला आणि सगळेच फीचर्स शो त्या विभागाकडे गेले. माझाही रवानगीही त्याच विभागात झाल्याने ग्रेट-भेट, टॉक टाइम अशा विविध कार्यक्रमांसाठी रिसर्च आणि इतर नियोजन करणे हाच माझ्या दैनंदिन कामाचा भाग झाला. या काळात ‘ग्रेट भेट’च्या पंधरा-वीस मुलाखतींचा रिसर्च आणि इतर को-ऑर्डिनेशन करण्याची संधी मला मिळाली. त्यातली कविवर्य मंगेश पाडगावकरांची ग्रेट अविस्मरणीय म्हणावी अशी होती.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

एके दिवशी पाडगावकरांची मुलाखत घ्यायची आहे, तू त्यांच्याशी बोलून दिवस आणि वेळ ठरवून घे, असं मला वागळेंनी सांगितल्यावर मी पाडगावकरांशी आधी फोनवर बोललो. तेव्हा पाडगावकरांनी तुम्ही मुलाखतीचं मानधन देणार का?, असा मला प्रश्‍न केला. तोवर मुलाखत देण्यासाठी मानधन घेण्याबाबत कुणी बोललं नसल्यामुळे मी एकदम गडबडून गेलो. तरी संपादकांशी बोलून सांगतो, असे म्हणून मी फोन ठेवला आणि वागळेंना जाऊन सांगितलं. वागळे म्हणाले, काही हरकत नाही, आपण त्यांना पाच हजार रुपये देऊ. मी अकाउंट विभागाशी बोलतो. ते तुला त्यांच्या नावाचा चेक देतील, तू तो त्यांना उद्याच नेऊन दे. त्यानुसार दुसर्‍या दिवशी मी त्यांच्या सायनच्या घरी चेक घेऊन गेलो. खरं तर तोवर मी कामाच्या निमित्तानं पाडगावकरांच्या घरी दोन वेळा गेलो होतो. त्यामुळे माझी पाडगावकरांशी थोडीफार ओळख झाली होती.

पाडगावकरांना थोडं कमी ऐकू येत असे. त्यामुळे मुलाखत निखिल वागळे घेणार असल्याचं त्यांना पुन्हा पुन्हा सांगितलं. मुलाखत तासाची असेल, त्यात तुमच्या एकंदर साहित्यप्रवासाबद्दल तुम्हाला विचारलं जाईल. कुठलेही वादग्रस्त प्रश्‍न विचारले जाणार नाहीत, ग्रेट-भेट हा कार्यक्रम उखाळ्यापाखाळ्या करणारा नसून तो व्यक्तिमत्त्व दर्शन घडवणारा कार्यक्रम आहे. हेही मी पाडगावकरांना सांगितलं. त्यांनीही होकार दिला. या मुलाखतीसाठी प्रॉडक्शन टीमनं ठाण्याच्या घोडबंदर रोडवरचं एक रिसॉर्ट निवडलं होतं. त्याचा मालक पाडगावकरांचा चाहता असल्याने त्याने मोठ्या आनंदाने आम्हाला शूट करण्याची परवानगी दिली. मधोमध छोटंसं तळ आणि त्याच्या सभोवताली उतरत्या छपरांखाली बसण्याची सोय अशी या रिसॉर्टची रचना होती. उजव्या बाजूला रस्ता तर डाव्या बाजूला हिरवागार डोंगर होता. आभाळ सकाळपासूनच ढगाळलेलं होतं, पण पाऊस येईल असं वाटत नव्हतं.

मी ठरलेल्या वेळी पाडगावकरांना घेऊन रिसॉर्टवर पोहोचलो. वागळेही आले. कॅमेरा टीमने नेहमीप्रमाणे उत्तम कॉम्पोझिशन केलं होतं. मेकअप आर्टिस्टला पाडगावकरांना मेकअप करायला सांगून त्यांना तयार केलं. मुलाखतीच्या जागी त्यांना खुर्चीत नेऊन बसवलं. समोरच्या खुर्चीत वागळे येऊन बसले, तोच पाडगावकर आश्‍चर्यचकित झाल्यासारखे म्हणाले, ‘वागळे, मी तुम्हाला घाबरतो. तुम्ही माझी मुलाखत घेणार असाल, तर मला मुलाखत द्यायची नाही. मला वाटलं, हा राम जगतापच माझी मुलाखत घेणार आहे म्हणून मी होकार दिला होता.’ असं म्हणून ते थेट खुर्चीतून उठले. या प्रसंगामुळे आम्ही सगळेच अवाक झालो. मी त्यांना कसंबसं खुर्चीत बसवलं. त्यांना पुन्हा आठवण करून दिली की, ‘मी नाही, वागळेच मुलाखत घेणार होते. या मुलाखतीचं स्वरूप व्यक्तिदर्शन असेल. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका.’ पाडगावकरांचा स्वभाव तसा भिडस्त असल्याने ते नाइलाज म्हणून बसले; पण आमच्यावर एकदम ताण आला. आता ही मुलाखत कशी होते देव जाणे! असं वाटायला लागलं. वागळेंनी शांतपणे प्रश्‍न विचारायला सुरुवात केली. पाडगावकर सावधपणे उत्तरं देत होते. त्यांची साशंकता अजून कमी झाली नव्हती. दरम्यान मुलाखतीच्या नादात आमचं आभाळाकडे लक्षच नव्हतं. एकाएकी टपटप पाऊस पडायला सुरुवात झाली. तसा वागळेंनी पाऊस, त्यावरच्या पाडगावकरांच्या कविता यांचा विषय काढला. तसे पाडगावकर खुलले. त्या उतरत्या छपरावरून दोन्ही बाजूंनी पाऊस निथळत होता आणि त्याखाली पाडगावकर पाऊस, प्रेमकविता यांच्याविषयी त्याही वयात दिलखुलासपणे बोलत होते.

मुलाखत संपेपर्यंत पाऊस थांबला नाही. कॅमेरा टीमने निवडलेल्या मुलाखतीच्या फ्रेममध्येही पावसाने शेवटपर्यंत हजेरी लावली. त्यामुळे ही मुलाखत खूप चांगल्या प्रकारे शूट झाली. पाडगावकर छान बोलले आणि वागळेंनीही त्यांना बोलू दिले. त्यामुळे या मुलाखतीमध्ये पाडगावकरांच्या कवितांसारखाच रसरशीतपणा उतरला. नंतर रिसॉर्टच्या मालकांनी पाडगावकर आणि त्यांच्यामुळे आमचंही चांगलं आदरातिथ्य केलं. मग पाडगावकर आणखीनच खूश झाले. नंतर मी त्यांना गाडीनं त्यांच्या घरी सोडून आलो. आमच्या फिचर्स एडिटर ज्ञानदा यांनी पाडगावकरांच्या दोन कवितासंग्रहांवर त्यांच्या स्वाक्षर्‍या घेण्यासाठी त्यांच्या प्रती माझ्याकडे दिल्या होत्या. एरवी मला कधी लेखक-कलावंतांसोबत छायाचित्रं काढून घ्यायचं सुचत नाही की, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांवर स्वाक्षरी घेण्याचंही लक्षात राहत नाही, पण ज्ञानदानं तिचे संग्रह दिल्यामुळे मीही माझ्याकडचे दोन संग्रह सोबत घेऊन गेलो होतो. मुलाखतीमुळे पाडगावकर इतके खूश झाले होते आणि इतके भरभरून बोलत होते, कविता ऐकवत होते की बस्स! लहान मुलासारखा निरागस उत्साह त्यांच्यात संचारला होता. त्यांना थांबवावंसं वाटत नव्हतं, कारण त्यांच्या तोंडून त्यांच्याच कविता ऐकणं हा अविस्मरणीय अनुभव होता. मी कशाबशा त्यांच्या हातात ‘जिप्सी’, ‘बोलगाणी’, ‘भटके पक्षी’ आणि ‘सलाम’ या चार कवितासंग्रहाच्या प्रती स्वाक्षरीसाठी ठेवल्या. त्यांनी ‘बोलगाणी’च्या प्रतीवर स्वाक्षरी करून तारीख लिहिली. मला वाटलं, पाडगावकर पुढच्या प्रतींवरही फक्त स्वाक्षरीच करतील, म्हणून मी त्यातल्या माझ्या प्रती कोणत्या आणि ज्ञानदाच्या कोणत्या हे त्यांना सांगितलं नाही, पण नंतरच्या तिन्ही प्रतींवर ‘प्रिय राम जगताप, आशीर्वाद’ असं लिहून त्यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे ‘जिप्सी’ आणि भटके पक्षी हे दोन्ही ज्ञानदाचे कवितासंग्रह माझ्याच मालकीचे झाले!

२.

मंगेश पाडगावकर यांच्या निधनाने महाराष्ट्रातील नवथर तरुणांच्या, मध्यमवर्गीय प्रौढांच्या, एकेकाळी त्यांच्या कविता वाचून प्रेमात पडलेल्यांच्या वा प्रेमात पडल्यावर त्यांच्या कविता वाचलेल्या वयोवृद्धांच्या आणि प्रेम हाच जगण्याचा एकमात्र विषय मानणाऱ्यांच्या काळजाचा एकतरी ठोका चुकला असेल. महाराष्ट्रातल्या तीन-चार पिढ्यांना आनंद देण्याचे, त्यांच्या प्रेमाची लज्जत वाढवण्याचे काम पाडगावकरांनी केले. जगण्यावर निस्सीम भक्ती करत आणि जगण्याचेच बोलगाणे गात पाडगावकर आयुष्यभर जगले, वागले आणि तशाच त्यांनी कविताही लिहिल्या. ते मराठीतले खरेखुरे आणि बहुधा एकमेव आनंदयात्री कवी होते. साधारणपणे पावणेसहा फुट उंची, गोरा वर्ण, नीटनेटकी वेशभूषा, जाड भिंगांचा चश्मा आणि अखंड गप्पा ही कवी आणि माणूस पाडगावकरांची प्रमुख वैशिष्ट्ये होती. आणि त्यांची बुल्गानीन दाढीही. पन्नासच्या दशकात बुल्गानीन म्हणून रशियाचे एक पंतप्रधान होते. त्यांची वैशिष्ट्यपूर्ण दाढी पाडगावकरांनी स्वीकारली. ती त्यांना इतकी फिट झाली की, पुढे ती ‘पाडगावकरांची दाढी’ म्हणूनच प्रसिद्ध झाली. उलट बुल्गानीन यांच्या दाढीविषयी बोलताना ‘बुल्गानीन अशी पाडगावकरांसारखी दाढी ठेवायचे!’ असे गमतीने सांगितले जाऊ लागले.

वयाच्या ऐंशीनंतर अतिशय तरळ प्रेमकविता सुचणाऱ्या या कवीला प्रतिभावंतच म्हणायला हवे. पाडगावकर हा माणूस जगण्यावर नितांत प्रेम करणारा होता. जगण्याचा उत्सव सतत साजरा करत राहणे, हेच त्यांनी आपल्या आयुष्याचे ध्येय मानले होते. पाडगावकरांनी आपल्या आयुष्यात  दाहक अनुभवही घेतले. पण ती दाहकता, कटुता त्यांच्या बोलण्या-वागण्यात कधीही येत नसे. इतरांना फक्त आनंद द्यायचा, एवढेच एक ब्रीद त्यांनी आयुष्यभर जपले. ते माणसांचे गाणे गात राहिले. आणि तेच त्यांच्या लोकप्रियतेचे गमक आहे. पाडगावकर शालेय वयातच कविता लिहायला लागले. ‘धारानृत्य’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह १९५० साली प्रकाशित झाला, तर ‘अखेरची वही’ हा शेवटचा कवितासंग्रह २०१३ साली प्रकाशित झाला. म्हणजे जवळपास ६३ वर्षे पाडगावकरांनी सातत्याने कविता लिहिली. कारण त्यांना माणूस समजून घेण्यात अनिवार कुतूहल होते, पण इतकी वर्षे सातत्याने माणसांविषयी कविता लिहून मला माणूस कळला आहे, असे पाडगावकर कधी म्हणाले नाहीत. मोठ्यांसाठी २८ कवितासंग्रह (त्यात मीरा, कबीर, सूरदास यांच्या रचनांचे मराठी अनुवादही आहेत.) आणि मुलांसाठी १० बालकवितासंग्रह असे एकंदर ३८ कवितासंग्रह पाडगावकरांनी लिहिले. ‘सलाम’, ‘बोलगाणी’, ‘जिप्सी’, ‘गझल’, ‘तुझे गीत गाण्यासाठी’ हे त्यांचे कवितासंग्रह प्रचंड लोकप्रिय ठरले. पाडगावकरांनी बहुतांश प्रेमकविता लिहिली असली तरी ‘सलाम’मध्ये उपरोध व उपहास, ‘उदासबोध’मध्ये विडंबन आणि ‘बोलगाणी’मधील लयबद्धता हे त्यांनी जाणीवपूर्वक केलेले प्रयोग आहेत.

पाडगावकरांना शालेय वयात सक्तीने ‘बायबल’ शिकावे लागले. तारुण्याच्या उंबरठ्यावर त्यांच्यावर ओशोंचा प्रभाव पडला, पण पाडगावकर कुणाच्या झेंड्याखाली गेले नाहीत. त्यांनी त्यांची बोलगाणी लिहिणारा कवी ही ओळख संपू दिली नाही. कुठल्याही राजकीय विचारधारेशी बांधीलकी न मानताही आनंदाने, जगण्याचा उत्सव साजरा करत जगता येते, त्यातही आनंद असतो, हे पाडगावकर यांनी त्यांच्या जगण्यातून आणि कवितेतून दाखवून दिले. पाडगावकरांनी कवितेशिवाय इतर लेखन मोजकेच केले. शेक्सपिअरच्या ‘द टेम्पेस्ट’, ‘ज्युलिअस सीझर’ आणि ‘रोमिओ अँड ज्युलिअेट’ या तीन नाटकांचे मुळाबरहुकूम भाषांतर केले. बायबलच्या नव्या कराराचे आणि कमला सुब्रमण्यम यांच्या दोन खंडी महाभारताचेही मराठी भाषांतर केले.

याशिवाय त्यांची गद्यलेखनाची ‘निंबोणीच्या झाडामागे’, ‘चिंतन’, ‘स्नेहगाथा’, ‘शोध कवितेचा’, ‘आले मेघ भरून’, ‘असे होते गांधीजी’ अशी सहा पुस्तके प्रकाशित झाली, पण पाडगावकरांची खरी ओळख ही कवी म्हणूनच राहिली, यापुढेही राहील. असा आणि इतका समरस झालेला दुसरा कविमाणूस महाराष्ट्रात दाखवता येणार नाही. अशा प्रकारच्या जगण्याविषयी फारसे बरे बोलण्याचे दिवस आता राहिले नाहीत आणि तशा जगण्याची सोयही राहिली नाही. त्यामुळे आजच्या-उद्याच्या पिढ्यांना पाडगावकरांची थोरवी अनुभवता येणार नाही, पण त्यांच्या कविता मात्र त्यांना भावतील, आवडतील. नवथर प्रेमिकांचे पाडगावकर अजून कैक वर्षे आवडते कवी राहतील. ते कवी म्हणून प्रसिद्ध पावू लागले होते, तेव्हा ‘शीळ’वाल्या ना. घ. देशपांडे यांनी त्यांना एक महत्त्वाचा कानमंत्र दिला होता - ‘कविता जर अनेक अंगांनी फुलायची असेल, तर कवितेशिवायच्या इतर सर्व वाटा बंद केल्या पाहिजेत.’ पाडगावकरांनी नाघंचा हा सल्ला जवळपास आयुष्यभर प्रमाण मानला. त्यामुळेच ते इतकी वर्षे सातत्याने कविता लिहू शकले.

पाडगावकरांनी स्वत:चा शिष्यसंप्रदाय निर्माण केला नाही. पण त्यांना द्रोणाचार्य आणि स्वत:ला एकलव्य मानणाऱ्यांचा महाराष्ट्रात नंतर बराच सुकाळ झाला. या लोकांनी पाडगावकरांचेच शब्द उलटेपालटे फिरून त्यांची स्वत:च्या कविता म्हणून नव्याने नाणी पाडली. ‘लिज्जत’ पापडसाठी पाडगावकरांनी अनेक वर्षे पावसावर कविता लिहिली. पावसाळा सुरू झाला की, वर्तमानपत्रात लिज्जड पापडची पाडगावकरांच्या नव्या कोऱ्या कवितेसह जाहिरात हा एकेकाळी अनेकांच्या औत्सुक्याचा विषय झाला होता. नंतर तो चेष्टेचाही होत गेला.

विंदा करंदीकर, वसंत बापट आणि मंगेश पाडगावकर या त्रिकुटाने महाराष्ट्रभर कवितावाचनाचे कार्यक्रम करून कवितेला लोकाश्रय मिळवून दिला. गद्यकविता लयीत म्हटल्या तर त्या लोकांना आवडतात, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले, पण दिलीप चित्रे यांच्यासारख्या लघुनियतकालिकांच्या परंपरेतील कवीने ‘करंदीकार-बापट-पाडगावकर यांनी कवितेचे बघे निर्माण केले... कवितेची प्रतिमा न उंचावता फक्त कवीचीच प्रतिमा उंचावली,’ अशी टीका त्यावर केली. साठीच्या दशकानंतर लोकप्रिय ते सर्व त्याज्य ही विचारसरणी बळावत गेल्याने अशी टीका होणे क्रमप्राप्त होते. ती काही प्रमाणात रास्तही आहे, पण लोकप्रिय कवीचीही समाजाला अभिजात कवींइतकीच गरज असते, हे नाकारून चालणार नाही. पाडगावकरांना अभिजात होण्याची महत्त्वाकांक्षा नव्हती आणि बाजारू होण्याचा सोसही नव्हता. समाजातल्या एका मोठा समूहाच्या भावभावनांना हात घालणाऱ्या कविता लिहिणे, एवढेच पाडगावकर करू शकत होते आणि तेच त्यांनी केले.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

बा. भ. बोरकर, कुसुमाग्रज आणि ना. घ. देशपांडे यांची बहुतांश कविता पाडगावकरांना वयाच्या ८०व्या वर्षापर्यंत तोंडपाठ होती. आपल्या आधीच्या पिढीतल्या कवींच्या कविता अशा मुखोद्गत असलेले आणि आपल्या समकालीन कवींविषयी सजग असलेले पाडगावकर हे कवी म्हणून निदान लोकप्रियतेच्या बाबतीत तरी मोठेच होते. त्यांच्या कवितासंग्रहाच्या किमान दोन ते कमाल पंचवीस आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. अशी आणि इतकी वाचकप्रियता लाभलेला कवी महाराष्ट्रात निदान नजीकच्या काळात तरी निर्माण होण्याची शक्यता कमीच आहे. तोवर जगण्याचे बोलगाणे गाण्यासाठी, प्रेमाच्या आणा-भाका घेण्यासाठी आणि भवतालाकडे निर्मळ दृष्टीने पाहण्यासाठी पाडगावकरांशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही.

.................................................................................................................................................................

लेखक राम जगताप ‘अक्षरनामा’चे संपादक आहेत.

editor@aksharnama.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......