मी लिहितो ते समजून घेण्यासाठी
ग्रंथनामा - झलक
उत्पल वनिता बाबुराव
  • उत्पल वनिता बाबुराव आणि त्याच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Sun , 18 December 2016
  • ग्रंथनामा Booksnama झलक तीन त्रिक दहा Teen Trik Daha उत्पल वनिता बाबुराव Utpal Vanita Baburao

तरुण अभ्यासक उत्पल वनिता बाबुराव यांचा ‘तीन त्रिक दहा’ हा पहिलावहिला लेखसंग्रह नुकताच राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. या पुस्तकाला उत्पल यांनी लिहिलेलं हे मनोगत...

'आपण का लिहितो' किंवा 'आपण का लिहिलं' याची व्यक्तीगणिक वेगळी उत्तरं असू शकतील. काहीतरी सांगायची अनिवार ऊर्मी हे एक मुख्य कारण. ही जी अनिवार ऊर्मी जन्म घेते, तिच्या मुळाशी उघडपणे किंवा लपलेल्या स्थितीत लेखकाची 'प्रतिक्रिया' असते. लेखकाचं मानस जितकं गुंतागुंतीचं तितकी ही प्रतिक्रिया गुंतागुंतीची, बहुपेडी. लेखकाच्या अंतर्मनातील कलह जितके तीव्र, तितकी ही प्रतिक्रिया तीव्र आणि प्रभावी. लेखन आणि अंतर्मनात चांगले मुरलेले कलह या दोघांचा अन्योन्य संबंध आहे आणि चांगल्या लेखनाची ती पूर्वअट आहे.  

सप्टेंबर २०१४ मध्ये 'सायलेंट मोडमधल्या कविता' हा माझा कवितासंग्रह प्रकाशित झाला. आपलं दुसरं पुस्तक 'राजहंस'सारख्या नावाजलेल्या प्रकाशन संस्थेनं स्वीकारलं याचा आनंद तर झालाच, पण खरं सांगायचं तर मला पहिल्या पुस्तकाच्या वेळी आलं होतं तसं रिकामपणही जाणवलं. म्हणजे एक टप्पा ओलांडल्यानंतर, निर्मितीनंतर येतं तसं रिकामपण नव्हे, तर एक 'शुद्ध क्षण' अनुभवल्यानंतर येतं ते रिकामपण. 'राजहंस'च्या करुणा गोखले यांनी 'तुमचं पुस्तक स्वीकारत आहोत' असं फोनवर कळवलं तेव्हा समाधान वाटलं होतं. पण बहुधा तोच एक शुद्ध क्षण! हे काहीसं प्रेमासारखं आहे. प्रेमाची जाणीव होते तोच क्षण काय तो खरा. बाकी मग अनुनय, भेटीगाठी आणि पुढे लग्न वगैरे करणं हे झाले सोपस्कार.

कवितांचं पुस्तक प्रकाशित करायचं ठरवलं तेव्हा 'आपण हे काय करतोय? प्रकाशित करायच्या का कविता? आपलं काहीतरी चुकतंय बहुतेक' असं सारखं वाटत होतं. असे प्रश्न पडायचं एक कारण संकोच हेच होतं. दुसरं म्हणजे आपलं लेखन त्या योग्यतेचं आहे का हा प्रश्न. पण तिसरा एक मुख्य विचार म्हणजे - आपण जेव्हा लिहितो तेव्हा ती प्रक्रिया निर्मळ असते, पण जेव्हा आपण लेखन प्रकाशित करायचं ठरवतो, किंवा मला हे प्रकाशित करायचं आहे हा विचार मनात घेऊन लिहितो तेव्हा त्यात थोडं 'करप्शन' येतं. आता तुम्ही म्हणाल की हा काय तर्क आहे? तर त्याचं काही निश्चित असं उत्तर नाही माझ्याकडे. असं मला का वाटलं माहीत नाही. पण वाटलं खरं. त्यावेळेस मेघना पेठे यांच्याशी इ-मेलवरून याबाबत थोडं बोलणं झालं होतं. त्यांचं म्हणणं माझ्या लक्षात राहिलं. त्यांनी लिहिलं होतं - 'देअर इज नथिंग टँजिबल पॉसिबल विदाउट अ लिटल काँप्रमाइज. मुळात जे सुचतं, ते उमटतानाच म्हणजे जड स्वरूपात येतानाच करप्ट होऊन येतं. सुचतानाची प्युरिटी त्यात उरत नाही.' 'करप्शन'च्या मुद्द्यावरचं त्यांचं हे विश्लेषण मला पटलं होतं. माझा 'प्रकाशनाचा अपराधीभाव' थोडा कमी झाला!

या पुस्तकाच्यावेळी असं झालं का? हो. आनंद झाला असला तरी वरचा तर्कदेखील डोकं वर काढतच होता. यातला दुसरा विरोधाभास हा की, उद्या पुस्तक वाचून कुणी पसंतीची पावती दिली तर ती मला नको आहे का? तर तसंही नाही. कुठल्याही कलाकारासारखा लेखकही आपल्या कलाकृतीची प्रशंसा ऐकून सुखावतोच. त्यामुळे आत्ताची मनोवस्था रिकामपणा आणि उत्सुकता दोन्ही घटकांनी तयार झाली आहे. 

साधारण २००८ पासून आजवर लिहिलेल्या निवडक लेखांचा हा संग्रह आहे. ललित-विनोदी आणि ललित-वैचारिक अशा संमिश्र स्वरूपाचे हे लेख आहेत. २०१० पासून २०१४ पर्यंत मी 'मिळून साऱ्याजणी' या मासिकात काम केलं. मासिक सोडलं तेव्हा मी सहसंपादक होतो. थोडंफार लिखाणही सुरू होतं. याच दरम्यान 'आंदोलन' मासिकाशीही जोडला गेलो. डिप्लोमा इंजीनियरिंग, बीए समाजशास्त्र, एमबीए मार्केटिंग असं विसंगत शिक्षण, मग इंडस्ट्रियल सेल्स, जाहिरात क्षेत्र, मासिक संपादन अशा अनेक नोकऱ्या हे सगळं करत असताना 'आपल्या आत घट्ट, एका जागी स्थिर असं काही आहे का?' या प्रश्नाचं उत्तर साहित्य, चित्रपट आणि सामाजिकता या तीन ठिकाणी सापडलं. सामाजिक चळवळीत पूर्णपणे झोकून देऊन काम करणं झालं नाही, पण निरीक्षण झालं. चळवळीशी जोडलेपण राहिलं. अनेक वेळा आपण 'निरुपद्रवी, शक्तीहीन, शहरी मध्यमवर्गीय' आहोत हे जाणवलं. सर्जन आणि सामाजिकता या कात्रीत सापडणं तर बऱ्याचदा झालं. एकीकडे प्रत्यक्ष कृतीचं महत्त्व तर दुसरीकडे ‘बर्डमॅन’, ‘शिप  ऑफ थीसियस’, ‘हजारों ख्वाहिशें ऐसी’, ‘आंखो देखी’ अशासारखा एखादा सिनेमा करता यायला हवा हे स्वप्नरंजन. सिनेमाची आणि साहित्याची मोहिनी एकीकडे तर दुसरीकडे वास्तवाची काहिली. मला एक नक्की कळलं की आपल्या बाकी बोलक्या बाजू बंद करून एकाच बोलत्या बाजूवर लक्ष देता आलं, त्या क्षेत्रात अंतर्बाह्य 'राहता' आलं तरच तुम्ही चांगलं नाव कमवू शकता! पण हे आपल्याला जमलेलं नाही हे मला जाणवत राहिलेलं आहे.  

मी वर म्हटलं तसं या पुस्तकातील लेख संमिश्र स्वरूपाचे आहेत. आणि बहुतांश लेख म्हणजे माझ्या अंतर्गत कलहांचं प्रकटन आहे. आसपासच्या परिस्थितीतील विसंगती आणि काही मुद्द्यांबाबत दिसलेला मार्ग सांगण्याचा प्रयत्न काही लेख करतात. काही लेख विनोदी बाजाचे आहेत. विनोदी लेखन ही खरं तर माझी 'मर्मबंधातली ठेव.' कवितेसारखीच. आणि विनोदी लेखनाकडे गांभीर्यानं बघत आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे याची मला कल्पना आहे.    

मी या पुस्तकाकडे एक सुरुवात म्हणून बघतो आहे. व्यावसायिक क्षेत्रात चांगल्यापैकी फिरणं झाल्यावर, माणसांचे बरे-वाईट अनुभव घेतल्यावर शांतपणे एका जागी बसून आपलं म्हणणं मांडावं असं जे वाटतंय, त्याची हे पुस्तक म्हणजे सुरुवात आहे असं मी समजतो. मला जाणवलेलं माझ्याबाबतीतील एक सत्य असं की, मी पूर्णपणे 'कन्व्हिन्स' होऊन ठामपणे काही मांडू शकत नाही. म्हणजे ज्या मानवी मूल्यांबाबत मला आस्था आहे त्या न्याय, स्वातंत्र्य आणि समतेच्या मूल्यांबाबत दुमत संभवतच नाही. पण माणसाचं जगणं इतक्या विविधतेनं आणि विसंगतीनं भरलेलं आहे आणि जगण्याचा प्रवाह इतक्या भिन्न मार्गांवरून, वळणांवरून वाहत आलेला आहे की, माझ्यासारख्या एखाद्या जीवाने मला काहीएक 'दर्शन' झालं, मला अमुक एक विचारधाराच श्रेष्ठ वाटते, अमुक एका ग्रंथात मला सगळी उत्तरं सापडली, मला काहीतरी 'समजलं' आहे असं काही म्हणणं फार गमतीशीर आहे. 'बाजू घ्यावी लागणं' हे ठीकच. पण कायम, कोणत्याही परिस्थितीत एकाच बाजूला असणं माझ्यापुढे प्रश्न उभे करतं. 'मला अनेक शक्यता दिसतात, निश्चित भाष्य करणं शक्य नाही' किंवा सरळ 'मी गोंधळलेलो आहे' अशी माझी स्थिती बरेचदा होते आणि त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. व्यावहारिक जगात जगत असताना अनेक लहान-मोठे निर्णय घ्यावेच लागतात, तिथे सतत द्विधा मनःस्थिती असणं उपयोगाचं नसतं. पण या दैनंदिन जगण्याच्या पलीकडचं जे जगणं आहे, जे विचारविश्व आहे त्यात मला प्रश्नांच्या भोवऱ्यात असणं हेच 'असणं' वाटतं. आपण संकल्पनात्मक विचार करू शकतो आणि त्याबाबत आग्रही राहू शकतो. पण मुळात आपलं जगणं कायम 'द्वंद्वात्मक'च असतं! त्यामुळे स्वतःशी सतत वाद-संवाद याला पर्याय नाही. मला तेच 'जगणं' वाटतं आलेलं आहे.

या पुस्तकातील काही लेखांमध्ये हा विचार प्रतिबिंबित झालेला दिसेल. मला वाटतं की मानवी प्रश्नांना निश्चित उत्तरांपेक्षा 'कार्य साधणारी' (वर्केबल) उत्तरं असतात, औचित्यपूर्ण, परिस्थितीजन्य उत्तरं अस्तित्वात असतात. त्यामुळे लिहिताना नवनिर्मिती करण्यापेक्षा आपण काहीतरी शोधतो आहोत असंच वाटत राहतं. हारुकी मुराकामी या प्रख्यात जपानी लेखकाचा 'आय राईट टू कॉम्प्रिहेंड' (मी लिहितो ते समजून घेण्यासाठी) हा विचार मला म्हणूनच जवळचा वाटतो.

या पुस्तकातील लेखांवर संपादकीय संस्कार करण्याचं काम 'राजहंस'च्या करुणा गोखले यांनी आत्मीयतेनं केलं. विशेषतः पुलंवरील 'एका लेखकाने' हा लेख त्यांच्या सूचनेमुळे विस्तृत स्वरूपात येऊ शकला. मूळ लेख लहान होता. तो वाचून त्यांनी मला अजून खोलात उतरायला सांगितलं आणि तसं करताना मला खरोखरच फार समाधान मिळालं. करुणा गोखले यांचे मनापासून आभार. राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर, सदानंद बोरसे आणि राजहंसची कार्यालयीन टीम यांचेही विशेष आभार! मुद्रितशोधन करणारा माझा मित्र प्रणव सखदेव, अंतर्गत रचना करणारे प्रतिमा ऑफसेटचे सहकारी यांचेही आभार. 

पुस्तकाचं मुखपृष्ठ, आतील सजावट याबद्दल चंद्रमोहन कुलकर्णी यांचा मी ऋणी आहे. या पुस्तकातील भिन्न प्रकृतीच्या लेखांना एका चित्रमय सूत्रात गोवणं हे खरंच थोडंसं आव्हानात्मक होतं. पण चंद्रमोहननी ते अतिशय आत्मीयतेनं केलं. चंद्रमोहनची चित्रं हा माझ्या वाढत्या वयात माझ्यावर चित्रकलेचा जो संस्कार झाला त्यातला महत्त्वाचा भाग आहे.  माझ्या पहिल्या लेखसंग्रहाला त्यांच्या चित्रांचा स्पर्श व्हावा ही माझ्यासाठी विशेष आनंदाची गोष्ट आहे. 

संग्रहातील लेख ज्या मासिकांमधून प्रकाशित झाले आहेत त्या सर्व मासिकांच्या संपादकांचे आभार. या संग्रहातील काही लेख ‘साहित्यसंस्कृती’ या संकेतस्थळावर इ-बुक स्वरूपात प्रकाशित झाले होते. या संस्थळाची निर्माती, माझी इंटरनेट मैत्रीण, सोनाली जोशी हिने मला लिहिण्यासाठी कायम प्रोत्साहन दिलं आहे. ती आणि श्रावण मोडक या दोघा मित्रांनी माझ्यातल्या विनोदी लेखकाला जागं ठेवायचा प्रयत्न केला आहे. श्रावण आज हयात नाहीत. पण त्यांची आठवण मात्र येते आहे. या दोघांचे आभार. 

गेल्या अनेक वर्षांपासूनचा माझा मित्र महेश देशपांडे याच्याबरोबर रंगलेल्या अनेक चर्चांमधून या पुस्तकातील ‘उलट-सुलट’ या मालिकेतील काही लेख आकारास आले आहेत. महेशने मला पुष्कळ वैचारिक खाद्य पुरवलं आहे. साहित्यविश्वाच्या बाहेर असलेल्या, पण चिकित्सेचं उत्तम अंग असलेल्या, 'अंतू बर्व्या'ची समज असलेल्या या मित्राचे विशेष आभार!

बायकोचे आभार मानायची पद्धत आहे म्हणून नव्हे, तर लग्न करूनही 'बायको' न होण्याची किमया साधल्याबद्दल तनुजाचे मनापासून आभार!

हा लेखसंग्रह वाचकांना आवडेल अशी मला आशा आहे. लेख २०११ ते २०१६ या काळातील आहेत. त्यामुळे जुने लेख वाचताना त्या काळाच्या संदर्भाने वाचावेत ही विनंती.

utpalvb@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......