अद्यापही आपल्या चर्चाविश्वात ‘मुस्लिम मानस’, ‘मुस्लिम दृष्टिकोन’ अशी (बायनरी) द्वैतवादी विभागणी होताना दिसते
ग्रंथनामा - आगामी
प्रा. फकरुद्दीन बेन्नूर
  • ‘मुस्लिम राजकीय विचारवंत आणि राष्ट्रवाद’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि त्याचे लेखक प्रा. फकरुद्दीन बेन्नूर
  • Sat , 18 August 2018
  • ग्रंथनामा Granthnama आगामी मुस्लिम राजकीय विचारवंत आणि राष्ट्रवाद Muslim Rajkiy Vicharvant aani Rashtravaad प्रा. फकरुद्दीन बेन्नूर Fakruddin Bennur

प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांच्या ‘मुस्लिम राजकीय विचारवंत आणि राष्ट्रवाद’ या पुस्तकाचं प्रकाशन २० ऑगस्ट रोजी सोलापुरात होत आहे. डायमंड पब्लिकेशन्सनं प्रकाशित केलेल्या या पुस्तकातल्या ‘मुस्लिम विचारवंतासमोरील प्रश्न’ या प्रकरणाचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

गेल्या ६०-७० वर्षांपासून भारतातील मुस्लिम विचारवंत आणि राजकारणी यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठरावीक साचेबंद पद्धतीचाच राहिला आहे. भारतातील मुस्लिम समाज, त्यांचे सामाजिक-राजकीय विचारवंत यांच्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात; भारताचा वसाहतवादी इतिहास आणि वसाहतवादी इतिहास-लेखनाचा प्रभाव फार मोठा आहे. इलियट आणि डाऊसन, जेम्स मिल् यांसारख्या इतिहासकारांच्या आणि ख्रिस्ती मिशनरी लेखकांच्या मतांच्या आधारे जशी मुस्लिम समाजासंबंधी समीकरणे प्रस्थापित झालेली आहेत, तसेच मुस्लिम विचारवंतांकडेही पाहण्याचे दृष्टिकोनही त्याच प्रकारे तयार झालेले आहेत.

सर सय्यदनंतरच्या ‘दुसऱ्या पिढीचा’ (सेकंड जनरेशन) विचार निरपेक्षपणे झालेला नाही. ही दुसरी पिढी, उदारमतवाद, धर्मनिरपेक्षवाद आणि प्रादेशिक राष्ट्रवाद यांचा पुरस्कार करणारी; धर्मवादाला, पॅन इस्लामच्या राजकियीकरणाला आणि द्विराष्ट्रवादाला विरोध करणारी होती. त्यामुळे सर सय्यद अहमद खान किंवा डॉ. महंमद इकबाल आणि बॅ. जिना यांच्यापेक्षा वेगळ्या ‘दुसऱ्या पिढी’चा निरपेक्षपणे विचार झालेला दिसत नाही. १९७० नंतरच्या भारतीय इतिहासाच्या अभ्यास पद्धतीत आणि इतिहासशास्त्राच्या दृष्टिकोनांतले अनेक नवे सिद्धान्त व दृष्टिकोन प्रस्थापित साचेबंद समीकरणांनी (स्टेरोटाईप्स) प्रभावित आहेत.

मुशिरूल हसन यांनी म्हटल्याप्रमाणे अद्यापही आपल्या चर्चाविश्वात ‘मुस्लिम मानस’, ‘मुस्लिम दृष्टिकोन’ अशी (बायनरी) द्वैतवादी विभागणी होताना दिसते. मुस्लिम मानस किंवा दृष्टिकोन या मांडणीतच ‘अदरनेस’ म्हणजे मुस्लिम ‘दुसरे’ किंवा ‘वेगळे’ आहेत, हे सूचित होते. आपण धर्मनिरपेक्ष आणि संमिश्र राष्ट्रवादाचा पुरस्कार करणाऱ्या मुस्लिमांचा उल्लेख ‘राष्ट्रीय मुसलमान’ असा करतो. त्यातून बहुसंख्यांकवादी दृष्टिकोन (जो असे मानतो की, देशभक्ती किंवा राष्ट्रवादीवृत्ती ही बिगर-मुस्लिम घटकाकडेच नैसर्गिकपणे असते) सूचित होतो. किंबहुना ‘राष्ट्रीय मुसलमान’ म्हणून जेव्हा काहींचा उल्लेख केला जातो, तो अपवाद समजला जातो. बद्रुद्दीन तय्यबजी, हकीम अजमल खान, सैफुद्दीन किचलू, एम. ए. अन्सारी, मौ. आझाद ही अपवादात्मक उदाहरणे मानली जातात. जर यांना ‘राष्ट्रीय मुसलमान’ म्हणावयाचे असेल तर गांधी, नेहरू आणि पटेल यांचा उल्लेख ‘राष्ट्रीय हिंदू’ म्हणून करावा लागेल!

व्यक्तीची वर्गवारी जर धर्माच्या कसोटीवर होत असेल तर ‘शेतकरी’ किंवा ‘श्रमिक संघटनेच्या नेत्यांचं’ वर्णन कसे करायचे? तेव्हा अद्यापही साचेबंद समीकरणांच्या सहाय्यानेच मुस्लिमविषयक मांडणी मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. या मागणीच्या बाहेर येऊन अलीकडच्या काळात, मुस्लिमविषयक लेखन सुरू झाले आहे. त्यामध्ये भारतीय आणि अनेक पाश्चात्त्य अभ्यासक आहेत.

भारतातल्या ८५ टक्क्यांपेक्षा जास्त मुसलमानांची मातृभूमी ही हिंदुस्थानच होती. वांशिक, भाषिक, सांस्कृतिक, प्रादेशिकदृष्ट्या ते पूर्णपणे भारतीयच होते. कारण ते धर्मांतरित होते! तेव्हा इराण किंवा अफगाणिस्तानात जाणे त्यांना शक्य नव्हते. सय्यद अहमद बरेलवी सारख्या जहाल धर्मवादी वहाबी नेत्यांनी तसे केलेले प्रयत्न पूर्णपणे असफल झाले होते. अफगाणिस्तानने त्यांना हाकलले होते. त्यांच्या समोरील प्रश्न कठीण होते.

भारतातील ब्रिटिशांची सत्ता गेल्यानंतर मातृभूमीच्या निष्ठा, भारतीय प्रादेशिक राष्ट्रीयत्व, धर्म आणि धार्मिक श्रद्धा, यांची सांगड कशी घालावयाची? धर्म, इस्लामी जीवन-पद्धती आणि राष्ट्रीयत्व यांच्यांतील समन्वय कसा साधायचा, हे प्रश्न होते. विशेष म्हणजे, भारतातील मुस्लिम राजकीय विचारवंतांच्या आणि लढवय्या जमाती व उलेमा यांच्या, राजकीय विचारांचा आणि चळवळींचा प्रारंभ १८ व्या शतकाच्या उत्तरार्धापासूनच झालेला होता. (फकीर-सन्याशांचा लढा आणि वहाबींच्या बंडाळ्या १७६१-१८००) अशा जाणिवा तीव्रपणाने निर्माण होण्याचे कारण म्हणजे इजिप्तपासून ते तुर्कस्तान, अफगाणीस्तान, हिंदुस्तानापर्यंत १७व्या शतकापर्यंत मुस्लिम राजवटी होत्या.

ब्रिटिश साम्राज्यवादी सत्तेने आक्रमण करून त्यावर आपले वर्चस्व स्थापन केले होते. इजिप्तसारख्या मुस्लिमबहुल देशांत कळसूत्री असणारे सुलतान गादीवर बसवून आपले वर्चस्व लादले होते. हिंदुस्तानात तर स्वतःची राजवटच स्थापन केली होती. तिथे पाश्चात्य साम्राज्यवादी सत्ता आणि त्या त्या देशांतले सुलतान यांचे संयुक्त शोषण सुरू झाले होते. त्या विरुद्धच्या प्रतिक्रियेतून मुस्लिम राजकीय विचारांचा प्रारंभ झालेला होता. त्यांच्यासमोर पुढील प्रश्न होते.

१. पाश्चात्यांचे आक्रमण कसे नष्ट करावे? हा प्रश्न निर्माण होण्याचे कारण म्हणजे इजिप्त, सुदान वगैरे भागात आक्रणाविरुद्ध झालेले उठाव निर्घृणपणे मोडून काढण्यात आलेले होते. भारतातदेखील फकिरांचे बंड, प्रारंभीचे वहाबी उलेमांचे उठाव, फराजियां चळवळीसारख्या सशस्त्र चळवळी मोडून काढल्या गेल्या होत्या. मुस्लिम देशांत साम्राज्यवादी सत्तेने मुस्लिम राज्यकर्तेच ताब्यात घेतले होते.

२. सर्व मुस्लिम देशांची एकजूट करणेही शक्य नव्हते. कारण अरब प्रदेशांतील मुस्लिम देश व आफ्रिकेतील मुस्लिम देश यांच्यात वेगवेगळ्या प्रकारचे भेद होते. शिया-सुन्नी, वांशिक, पांथिक, सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक असे विविध भेद आणि स्तर होते. काही ठिकाणी सुलतानशाही, सरंजामी पद्धती, तर काही प्रदेशांत टोळीराज्ये (ट्रायबल स्टेट्स) होती. या प्रदेशांतील मुस्लिम जनता मागासलेली होती. राज्य, राष्ट्र, नागरिकत्व, व्यक्तींचे हक्क याबद्दलच्या त्यांच्या जाणीव नसल्यातच जमा होत्या.

हिंदुस्तानांतील उलेमा, राजकीय क्रांतीचा प्रयत्न करणाऱ्या क्रांतिकारकावर मध्यपूर्वेतील चळवळींचा आणि राजकीय विचारांचा प्रभाव पडलेला होता. कारण त्या काळात हज यात्रेच्या निमित्ताने मक्का-मदिनेत उलेमा आणि राजकीय व्यक्तींच्या भेटी-गाठी आणि विचारांचे आदान-प्रदान होत असे. मुस्लिम जगतातील घडामोडी आणि विचार त्यांना कळत असत.

त्यातल्या त्यात, हिंदुस्तानातील उलेमा आणि ब्रिटिशविरोधी ‘जिहाद’चा लढा सुरू करणाऱ्यावर, दोन प्रमुख विचारवंतांचा प्रभाव पडलेला होता. त्यापैकी ‘शाह वलीउल्लाह’ या जागतिक कीर्तीच्या धर्मपंडिताचा प्रभाव दिसून येतो. इमाम अल् गझालीनंतरचा सर्वांत मोठा जगन्मान्य पंडित म्हणून त्यांच्याकडे पाहिजे जाते. त्यांनी मांडलेले विचार हिंदुस्तानातील उलेमावर खोलवर रुजले आहेत. शाह वलीउल्लाहचा कालखंड औरंगजेबच्या मृत्युनंतरचा आहे. त्या काळात हिंदुस्तानातील मोगल सत्तेला ओहोटी लागलेली होती. पाश्चात्य साम्राज्यवादी आक्रमण सुरू झालेले नव्हते. शाह वलीउल्लाह समोर केवळ मुस्लिम राजवटींच्या अधःपतनाचा प्रश्न होता. मोगल बादशाहीवरील मराठ्यांचे वर्चस्व घालवण्यासाठी अब्दालीला त्यानेच पाचारण करून पानिपतचे तिसरे युद्ध घडवले होते.

मुस्लिम राजवटीच्या अधःपतनाची मीमांसा करताना त्याने म्हटले होते की, मूळ आणि खऱ्या कुरआनप्रणीत इस्लामचा विसर पडल्यामुळे मोगलांची सत्ता निष्प्रभ झाली. त्याने धार्मिक व्यवहारांचे शुद्धीकरण, सर्व बिगर-अरबी प्रथा आणि विचारांना विरोध आणि इस्लामी लोकांचे एकत्रीकरण यांबद्दलचे विचार मांडले होते. शाह वलीउल्लाह हे मूलतत्त्ववादी पोथिनिष्ठ उलेमा होते. त्यांना पुन्हा मोगल सत्ता आणावयाची होती. त्यांचा मुलगा शाह अब्दुल अजीज (१७६३-१८२३) यांनी हिंदू मुस्लिमांच्या एकत्रीकरणाचा विचार मांडून ब्रिटिश राजवटही दारूल हर्ब (युद्धभूमी) असल्याचा फतवा दिलेला होता. हिंदुस्तानांतील उलेमावर शाह वलीउल्लाह यांचाच प्रभाव जास्त होता.

शाह वलीउल्लाह यांचे तत्त्वज्ञान परंपरावादी आणि इस्लामी श्रेष्ठत्त्वाचा पुरस्कार करणारे आणि सर्व प्रकारच्या बिगर-अरबी प्रथा, गैर-इस्लामी संस्कृतीमधील प्रभाव यांना विरोध करणारे होते. त्यांच्या पोथिनिष्ठतेचे दूरगामी परिणाम मुस्लिम मानसिकतेवर झाले. त्यांत पुढे सौदी अरेबियांतील कर्मठ मूलतत्त्ववादी वहाबी पंथाने भर टाकली. हिंदुस्तानातील सय्यद अहमद बरेलवीसारख्या अनेक उलेमांवर त्यांचा प्रभाव होता. मुस्लिम लीगला पाठिंबा देणारे अनेक कडवे आणि मूलतत्त्ववादी उलेमा त्यांच्या पंथातील होते.

असे असले तरी ब्रिटिश साम्राज्यवाद विरोधी लढे, जे नंतरच्या म्हणजे १८५७ नंतरच्या काळात सुरू झाले. त्या लढ्यांना क्रांतिकारक दिशा देण्याचे कार्य, इराणमध्ये जन्मलेल्या आणि ज्यांचे शिक्षण इराण व हिंदुस्तानात झालेले होते, ज्यांनी इजिप्तमध्ये शिक्षकाचे कार्य केलेले होते आणि काही काळ जे इराणच्या शहाचे सल्लागार होते, ते सुप्रसिद्ध क्रांतिकारी विचारांचे धर्मपंडित म्हणजे उलेमा जमालुद्दीन अफगाणी (१८३८-९७) यांनी केले. ‘हज’ यात्रेच्या निमित्ताने परस्परांना भेटणाऱ्या उलेमांच्या एका गटाला पाश्चात्य साम्राज्यवादाचे स्वरूप थोडेबहुत कळायला लागले होते. केवळ जिहादचे आवाहन करून साम्राज्यवादी आक्रमण हटवता येणार नाही, हे त्यांच्या लक्षात येऊ लागले होते.

जमालुद्दीन अफगाणी हे त्या गटांतील अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व होते. अफगाणींचा जन्म इराणमध्ये झालेला होता. त्यांचे शिक्षण इराण, इराक आणि हिंदुस्तानात झालेले होते. अफगाणींचे वर्णन एका अभ्यासकाने भटकणारा ‘क्रांतिकारक’ आणि ‘धर्मसुधारक’ असे (रोव्हिंग रिफॉर्मर अँड रिव्होल्युशनरी) असे केले आहे. इराण, इराक, तुर्कस्तान, अफगाणीस्तान, हिंदुस्तान, फ्रान्स अशा अनेक देशांतून अफगाणींची भटकंती चालू राहिली. पारंपरिक धार्मिक शिक्षण, त्याचबरोबर युरोपांतील भाषांचा परिचय आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाची चांगली जाण, त्यांना होती. प्रख्यात फ्रेंच राज्यशास्त्रज्ञ अर्नेस्ट रेनन यांनी फ्रेंच नियतकालिकांतून ‘इस्लाम आणि सायन्स’ (२९ मार्च १८८३) हा टीकात्मक लेख लिहिला होता. त्याला त्याच नियतकालिकातून अफगाणींनी उत्तर देताना म्हटले होते की, ‘इस्लाम आणि सायन्स हे परस्परविरोधी नाहीत’. रेनन यांनी हे वाचून अफगाणींचा गौरवही केला होता.

अफगाणींनी अनेक देशांत वास्तव्य केले. अफगाणीस्तान, इस्तंबूल, इजिप्त, इराण, हिंदुस्तानातील हैद्राबाद असे ते फिरत राहिले होते. ब्रिटिशविरोधी कारवायामुळे हाकलले गेल्यानंतर ते हिंदुस्तानातच हैद्राबादेत (दक्षिण भारत) येऊन काही काळ राहिले. हैद्राबादेत त्यांनी इस्लामच्या आधुनिकीकरणासंबंधी मूलभूत महत्त्वाचे केलेले लेखन इजिप्तमधील प्रख्यात विचारवंत महमद अब्दुह यांच्या नियतकालिकांत प्रसिद्ध झाले. त्यात त्यांनी इस्लामचे आधुनिकीकरण आणि ब्रिटिश साम्राज्याला विरोध करण्यासाठी ‘पॅन इस्लाम’चा म्हणजे सर्व देशांतील मुस्लिम लोकांनी एकत्र येण्याचा विचार मांडलेला होता.

अफगाणी हे राजकीय चळवळीला प्रेरणा देण्यासाठी इस्लामचा वापर करणारे एक प्रमुख विचारवंत होऊन गेले. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते एकाच वेळी आधुनिकतावादी, व्यवहारवादी आणि साम्राज्यवाद विरोधी आणि इस्लामची कालसापेक्ष मांडणी करणारे विचारवंत आणि क्रांतिकारक होते. पाश्चात्य साम्राज्यवादी आक्रमणाचा प्रतिकार करणे, हे एकेकट्या देशांतील मुस्लिम बंडखोरांना करणे शक्य नसल्याने, इस्लाममधील बंधुत्वाच्या सिद्धान्ताच्या आधारे सर्वांनी मिळून एकत्रित लढा उभा करावा, अशी त्यांची पॅन इस्लामची मांडणी होती. जगातल्या सर्व मुस्लिमांना एकत्रित करून जागतिक इस्लामी राज्याची स्थापना करण्याची संकल्पना अफगाणीने अजिबात मांडली नव्हती आणि नाही. त्यांच्या ‘पॅन इस्लाम’च्या विचारांचे निरनिराळ्या लोकांनी निरनिराळे अर्थ लावले. इस्पोसिटो सारख्यांचा अपवाद सोडल्यास, पाश्चात्य अभ्यासकांनी अफगाणींच्या मांडणीचे उलटसुलट अर्थ लावलेले दिसून येतात.

जमालुद्दीन अफगाणीबद्दल एवढे सविस्तर विवेचन करण्याचे कारण म्हणजे जमालुद्दीन अफगाणींचा, सर सय्यद अहमदप्रणीत राजकारणाला आणि त्यांच्या अलीगढ चळवळीला कडवा विरोध होता. मौ. आझाद, डॉ. अन्सारी, सैफुद्दीन किचलू, मौ. हुसेन महमद मदनी, मौ. ओबेदुल्ला सिंधी या सारख्या अनेक भारतीय अलेमा आणि क्रांतिकारक यांच्या विचारांवर जमालुद्दीन अफगाणीप्रणीत आधुनिकतावाद आणि क्रांतिकारकता यांचा मोठा प्रभाव होता. राष्ट्रवाद आणि इस्लाम आणि विशेष म्हणजे, संमिश्र राष्ट्रवाद (कांपोजिट नॅशनॅलिझम)चे विचार अफगाणींनीच प्रथम मांडलेले होते. पाश्चात्य, ओरिएंटॅलिस्ट इतिहासकारांनी आणि मौ. महंमद अलीसारख्या धर्मवादी पंडितांनी, इकबालसारख्या कान्ट, हेगेलच्या प्रभावाखाली असणाऱ्या मूलतत्त्ववाद्यांनी, अफगाणींच्या विचारांचे जे अर्थ लावले, त्यामुळे जमालुद्दीन अफगाणींच्या क्रांतिकारक विचारांची अपेक्षा झाली आणि गैरसमज निर्माण झाले.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......