‘ष’ हे अक्षर बाराखडीतून गायब होईल ह्या भीतीपोटी स्वत:च्या नावात त्याचा उपयोग करणारा दूरदर्शी सच्चा मराठी कलाकार!
ग्रंथनामा - झलक
विकास गायतोंडे
  • षांताराम पवार ( - ९ ऑगस्ट २०१८)
  • Fri , 10 August 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक षांताराम पवार Shantaram Pawar दीपस्तंभ Deepstambh विकास गायतोंडे Vikas Gaitonde दीपक घारे Deepak Ghare रंजन जोशी Rajan Joshi

साहित्य, कला, नाटक, लेखन, नेपथ्य, पेंटिंग, पुस्तकांची वेष्टनं आणि जाहिराती अशा विविध क्षेत्रांत मुशाफिरी करणाऱ्या षांताराम पवार या प्रतिभावान अवलिया चित्रकाराचं काल मुंबईत वयाच्या ८३ व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन झालं. २०११ साली त्यांच्या पंचाहत्तरीनिमित्त ‘दीपस्तंभ : षांताराम पवार’ हे पुस्तक दीपक घारे व रंजन जोशी यांनी संपादित केलं. ग्रंथालीनं प्रकाशित केलेल्या या पुस्तकातील हा एक लेख संपादित स्वरूपात...

.............................................................................................................................................

विक्षिप्त माणसांबद्दल मला फार कुतूहल आहे. तशी बरीच माणसं मी पाहिली आहेत. ही माणसं धड वेडीही नसतात की, धड शहाणीही नसतात. त्यांचा स्वभाव, त्यांचं विचित्र वागणं, बेफिकीर जगणं असे स्वभावातले पैलू जाणून घ्यायला मला फारच आवडतं. माझ्यासाठी हीच खरी माणसं असतात. आणि हीच माणसं खरं-खरं जीवनही जगत असतात.

षांताराम पवार एक रांगडं, विक्षिप्त, मराठमोळं असं विलक्षण व्यक्तिमत्त्व. अक्षरांवर प्रेम करणारा अक्षरप्रेमी. बाराखडीतलं पोटफोड्या ‘ष’ हे व्यवहारात क्वचितच वापरलं जाणारं अक्षर. कालांतरानं कदाचित हे अक्षर बाराखडीतून अचानक गायब होईल ह्या भीतीपोटी स्वत:च्या नावात त्या अक्षराचा उपयोग करणारा दूरदर्शी सच्चा मराठी कलाकार. साहित्य आणि कला यातला उत्तम जाणकार. हुशार आणि बुद्धिमान आणि आपण तसे आहोत याची पुरेपूर जाण असलेला माणूस. तानाजी मालुसऱ्यांनी यवनांचा तलवारीनं जेवडा रक्तपात केला नसेल, त्याहूनही जास्त लोकांचा शाब्दिक रक्तपात ह्या एकमेव मराठ्यानं केला. असं हे विलक्षण व्यक्तिमत्त्व!

साहित्य, कला, नाटक, लेखन, नेपथ्य, पेंटिंग, पुस्तकांची वेष्टनं, जाहिराती आणि स्वत:च निर्माण केलेली मराठी अक्षरलिपी, अशी विविध माध्यमं त्यांनी सहजपणे हाताळली. ह्या माणसानं आपल्या आयुष्यात बरंच काही केलं. तरीही अनेकांना प्रश्न पडतो की, त्यांनी नेमकं असं काय केलं? हा प्रश्न विचारण्याचं कारण असं की, त्यांनी केलेल्या उत्कृष्ट जाहिराती दुर्दैवानं प्रसिद्धच झाल्या नाहीत आणि जे काही प्रसिद्ध झालं ते मात्र पुष्कळ गाजलं. थोडक्यात, ह्या माणसानं स्वत:च्या मनाला भावेल ते सर्व काही केलं आणि त्याचबरोबर त्यांनी काहीही केलं नाही.

षांताराम पवारांना मी प्रथम पाहिलं ते जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये. तिथे मी विद्यार्थी होतो. तळमजल्यावर कोपऱ्यात एक खोली होती. त्या खोलीत ते स्वत:चं काम करत असत. त्या खोलीला लागूनच कॉलेजचं कॅण्टिन होतं. त्या कॅण्टिनमध्ये मी चहा पीत बसलो होतो. तेव्हा एक लक्षात राहणारी व्यक्ती एकसारखी त्या खोलीतून आत-बाहेर अशी ये-जा करत होती. ती व्यक्ती आतल्या खोलीत काहीतरी महत्त्वाचं काम करत होती. ती व्यक्ती चारमिनारच्या पाकिटातून सिगारेट काढत असे आणि आकाशाकडे पाहून त्याचे झुरके घेत असे आणि पुन्हा त्या खोलीत शिरत असे. असं बऱ्याच वेळा चाललं होतं. त्या व्यक्तीकडे कोणीही पाहत नव्हतं. तिला कोणी हटकतही नव्हतं. माझ्या बाजूला बाकांवर दोन मुलं माझ्यासारखी चहा पीत होती. अचानक त्यांचं लक्ष त्या व्यक्तीकडे गेलं आणि ते आपापसात कुजबुजले, ‘बाप रे! हा बघ राक्षस! षांताराम पवार.’ त्या दोघांनी एका घोटात चहा संपवला आणि तिथून पळ काढला. तेव्हाच मला त्यांचं संपूर्ण नाव कळलं, षांताराम पवार!

सहा फूट उंच. दोनशे पौंड वजन. विशाल देह. तेल चोपडून मागे वळवलेले चकचकीत काळेभोर केस. त्यात दडलेली विलक्षण तैलबुद्धी. कडक परिटघडीचा पांढराशुभ्र खादीचा, ओपन कॉलरचा बुशशर्ट, खाकी पॅण्ट, पायात कोल्हापुरी चप्पल, हातात सिगारेट. ते आर्टिस्ट आहेत यावर प्रथमदर्शनी माझा विश्वासच बसेना. त्यांच्या चालण्यावरून ते चुकून ह्या वास्तूत शिरल्यासारखे वाटत. त्यावेळी षांताराम पवार पस्तिशीच्या आसपास असावेत. पण त्यावेळीही ते थोडे प्रौढच दिसत. आज पंचाहत्तरी गाठली तरीही ते तसेच दिसतात. तेल चोपडलेले काळेभोर केस आणि त्यात दडलेली तैलबुद्धी अशा ह्या दोन्ही गोष्टी अजूनही तशाच आहेत.

जसजसे आम्ही भेटू लागलो तसतसा त्यांचा स्वभाव मला कळू लागला. षांताराम पवार मनातून अतिशय हळवा आणि दयाळू माणूस आहे. परंतु चेहऱ्यावर सतत रागीट दिसणारी मुद्रा. ही रागीट मुद्रा त्यांची खरीखुरी प्रतिमा नव्हे. अशी ही प्रतिमा त्यांनीच स्वत:हून तयार केलेली प्रतिमा आहे. विक्षिप्तपणा हा त्याच प्रतिमेचा एक भाग आहे. षांताराम पवारांनी पेंटिंग, लेखन, कविता, जाहिराती अशा विविध गोष्टी करताना जेवढं आयुष्य घालवलं, त्याहूनही अधिक आयुष्य त्यांनी ही प्रतिमा जोपासण्यात खर्च केलं. आम्ही जवळच्या मित्रांनीही त्यांची ही विक्षिप्त प्रतिमा आदरानं मान्य केली. हे विलक्षण व्यक्तिमत्त्व सदैव वादाच्या भोवऱ्यात सापडणारं एक चमत्कृतीपूर्ण असं काहीतरी आहे. त्यांना मित्र फारच कमी. परंतु त्यांचे मित्र हे त्यांचेच मित्र असतात आणि हितशत्रू त्यांना ठाऊक नसतात.

बऱ्याच दिवसांनी षांताराम पवार माझ्या ऑफिसात आले होते. जहांगीर आर्ट गॅलरीसमोरच माझं ऑफिस होतं. गॅलरीत पेंटिंग बघून मगच ते माझ्या ऑफिसात येत. तसेच ते आजही आले होते. सहसा ते कोणाच्या ऑफिसात जात नाहीत. कोणालाही आपणहून कधीच भेटत नाहीत. इतरांना ते आपणहून कधीच फोन करत नाहीत. हाही त्यांच्या प्रतिमेचाच एक भाग असू शकतो. आज मात्र ते खुशीत दिसले. त्यांनी उभ्या-उभ्याच मला तीन सुखद धक्कादायक बातम्या सांगितल्या. त्यातली पहिली बातमी होती - ते स्वत:चा कवितासंग्रह प्रसिद्ध करणार आणि त्याला नाव देणार ‘कविथा’. दुसरी बातमी म्हणजे- ते लहान मुलांची अंकलिपी एका वेगळ्या तऱ्हेनं सादर करणार. लहान मुलांचं पहिलं गणिताचं पुस्तक ही अंकलिपी असते. तिचं डिझाइन खर्चिक होतं. पुस्तकं प्रसिद्ध करण्यास माझा आक्षेप नव्हता. परंतु सराईत प्रकाशक घेऊन पुस्तकं प्रसिद्ध करावीत असं माझं मत होतं. पवार हे जातिवंत आर्टिस्ट. त्यांना हा पुस्तकांच्या विक्रीचा व्याप कसा जमणार? त्यातून स्वत:ची पदरमोड होणार, हे मला अजिबात पटत नव्हतं. परंतु त्यांचा विचार मात्र पक्का होता. षांताराम पवार माझा एकही शब्द ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. हे दोन्ही विषय त्यांच्या जिव्हाळ्याचे आहेत हे माझ्या लक्षात आलं. तिसरी बातमी तर अधिकच धक्कादायक होती. ती म्हणजे – ‘कविथा’ ह्या पुस्तकाचं डिझाइन करताना प्रिंटिंगचे सर्व नियम तोडून ते नवीन आकारात, वेगवेगळ्या रंगांचा उपयोग करून पुस्तक तयार करणार होतं. त्या पुस्तकातलं प्रत्येक पान ते वेगळ्या आकारात कापून वेगळीच बाइंडिंगची पद्धत वापरणार होते. म्हणजे पुस्तकाची किंमत प्रचंड वाढणार होती. एक तर मराठी कवितेचं पुस्तक विक्रीस अतिशय कठीण. त्यातून अशा पद्धतीमुळे महागडं होणार. थोडक्यात, षांताराम पवार स्वत:च्या पायावर किंवा डोक्यावर भलामोठा धोंडा पाडून घेणार आहेत असं मला मनातल्या मनात वाटलं. पण मी त्यांना तसं बोललो मात्र नाही. कारण ते स्वत:च्याच धुंदीत होते.

‘कविथा’ हा कवितेचा संग्रह धूमधडाक्यात प्रकाशित झाला. अनेक साहित्यिकांनी हजेरी लावली. काहींनी खाजगीत स्तुती केली. काहींनी न आवडल्यामुळे नाक मुरडले. ‘एक कवि था’ अशी टिंगलही झाली. मराठी कवितासंग्रहाचा जेवढा साधारण खप होतो, तेवढाच झाला. परंतु पवारांच्या अपेक्षेएवढी दाद साहित्यिक वर्तुळात ह्या संग्रहाला मिळाली नाही, एवढं मात्र खरं!

अंकलिपीला प्रकाशक मिळाला. ‘अक्षरी’ असं नामकरण झालं. पुस्तक छपाईसाठी तयार झालं. लहान मुलांना ‘शून्य’ हा अंक प्रथम शिकवावा असा षांताराम पवारांचा आग्रह होता. गणिततज्ज्ञांनी ‘शून्य’ हा अंक सर्व अंकांनंतर शेवटी शिकवावा असं मतं मांडलं. बरेच महिने असा ‘शून्य’ वाद चालू राहिला. शेवटी ‘अक्षरी’ पवारांच्या म्हणण्याप्रमाणेच प्रकाशित झाली. एका संस्थेनं संपूर्ण आवृत्ती विकत घेतली आणि एका लहान खेडेगावात लहान मुलांना वाटून टाकली. त्यानंतर दुसरी आवृत्ती छापलीच नाही. यापुढे कोणी छापतील असंही वाटत नाही. अशा दोन्ही जिव्हाळ्याच्या गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे घडल्या नाहीत ही खंत मात्र त्यांना आहे.

अनेक महिन्यांनी षांताराम पवार माझ्या ऑफिसात आले होते. संध्याकाळची वेळ असूनही त्यांनी चहा घेतला. पुन्हा दोन धक्कादायक बातम्या सांगितल्या. पहिली बातमी होती ती म्हणजे ते हिंदुस्थान थॉम्सन ह्या जाहिरात कंपनीत नोकरीला लागले आणि दुसरी धक्कादायक बातमी म्हणजे अखेर त्यांनी स्कूल ऑफ आर्ट अचानक सोडलं. हिंदुस्थान थॉम्सन कंपनीत त्यांनी उत्कृष्ट काम केलं. भरपूर जाहिरातींची कॅम्पेन्स केली. आमच्या जाहिरातक्षेत्रात एक अलिखित नियम आहे. तो असा की आम्ही जाहिरात प्रसिद्ध होण्यापूर्वी कोणतीही चर्चा करत नाही. त्यांनी उत्कृष्ट काम केलं हे मला त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्यांकडून कळलं. पण त्यांनी नेमकं कोणतं कॅम्पेन केलं हे मात्र कधीच पाहायला मिळालं नाही. ह्याचं कारण त्यांनी ज्या जाहिराती केल्या त्या प्रसिद्धच झाल्या नाहीत. त्यांनी ज्या प्रॉडक्टसाठी जाहिराती केल्या ते प्रॉडक्टच बाजारात आलं नाही. त्यामुळेच त्यांच्या जाहिराती बघता आल्या नाहीत. दुर्दैवानं असं सातत्यानं घडत गेलं आणि त्यांनी हिंदुस्थान थॉम्सन सोडली.

षांताराम पवारांनी अनेक जाहिरात कंपनीत उच्च पदावर काम केलं. अनेक जाहिराती बनवल्या. थोड्याफार प्रसिद्धही झाल्या. परंतु अशा असंख्य उत्कृष्ट जाहिराती बऱ्याच कारणांनी प्रसिद्ध होऊ शकल्या नाहीत. हा कोणाचा दोष हे मला ठाऊक नाही. परंतु जाहिरातक्षेत्रात गाजायला पाहिजे होते तेवढे ते गाजले नाहीत, एवढं मात्र खरं!

त्यांनी नोकरी सोडल्याचं समजलं, तेव्हा मी ‘त्रिकाया-ग्रे’ ह्या जाहिरात कंपनीत होतो. आम्हाला त्यांच्यासारखा एक क्रिएटिव्ह कन्सल्टंट हवा होता. मी धावपळ करून त्यांची आणि माझ्या साहेबांची भेट घडवून आणली. दोघांची भेट उत्तम झाली. महिन्याभरात षांताराम पवार ‘त्रिकाया-ग्रे’ जॉईन करणार हे पक्कं झालं.

दोन आठवडे निघून गेले. अचानक षांताराम पवारांचा मला फोन आला. आम्ही दादर टीटीला इराण्याच्या हॉटेलात भेटलो. आज त्या जागी आलिशान चपलांची दुकानं आहेत. आम्ही त्या हॉटेलात मधूनमधून भेटत असू. आजही आम्ही तसेच भेटलो. षांताराम पवार मला भेटताक्षणी म्हणाले की, ‘माझा एक विद्यार्थी ‘ए.सी.आय.एल.’ कंपनीत नोकरीस होता. अचानक ती कंपनी बंद पडली आणि ह्या विद्यार्थ्याची नोकरी गेली. तो नोकरीच्या शोधात आहे. त्याला तू त्रिकायात सामावून घे. माझ्याऐवजी तू त्यालाच त्रिकायात नोकरी द्यावीस अशी माझी इच्छा आहे.’ मी म्हटलं, ‘तुम्ही दोघंही या. त्याच्या नोकरीसाठी तुम्ही ही ऑफर नाकारणं योग्य होणार नाही.’ पण ते ठाम ठरवून आले होते. दोघांनी एकत्र काम करणं त्यांना पसंत नव्हतं. त्यांना स्वत:ला नोकरीची गरज असतानाही आपल्या विद्यार्थ्याला नोकरी मिळावी म्हणून त्यांनी मला बरीच कारणं सांगितली. नेहमी त्या हॉटेलात बिअरच्या बाटल्या संपवणारे षांताराम पवार आज फक्त पाणी पिऊन निघून गेले. त्यांच्या विद्यार्थ्याला ‘त्रिकाया-ग्रे’मध्ये नोकरी मिळाली.

अलीकडे मी ऐकलं की, या वर्षीच्या कॅगतर्फे दिल्या जाणाऱ्या ‘हॉल ऑफ फेम’ या बहुमानासाठी त्यांचं नाव जाहीर झालं आहे. मला फार आनंद झाला. उशीरा का होईना पण त्यांची आठवण तर झाली! जवळजवळ पन्नास वर्ष ह्या माणसानं सातत्यानं जाहिरातक्षेत्राताला मदतच केली आहे. अनेक विद्यार्थ्यांना अनेक विषयांचं ज्ञान दिलं आहे. अशा त्यांच्याच विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना त्यांची बऱ्याच वर्षांनी ह्या पुरस्कारासाठी आठवण झाली ह्याचाच मला फार आनंद झाला. षांताराम पवारांना अभिनंदनाचा फोन करण्यापूर्वी या बातमीची खात्री करून घ्यावी म्हणून माझ्या मित्राला फोन केला. त्याच्याजवळ नेहमीच अशा गोष्टीची माहिती असते. त्यानं माहिती दिली ती अशी : ह्या वर्षीचा ‘हॉल ऑफ फेम’ षांताराम पवार आणि त्यांचेच समकालीन दोघं अशा तिघांत वाटून दिलेला आहे. (माझ्या मित्रास इतर दोघांची नावं त्यावेळी ठाऊक नव्हती.) ‘हॉल ऑफ फेम’ हा एवढा मोठा मानाचा पुरस्कार. असा पुरस्कार एकाच वर्षी तिघा महान कलाकारांत वाटला जाणार ह्याचं मला आश्चर्य वाटलं आणि खेदही वाटला. असे सन्मान जरूर द्यावेत, पण ते तीर्थप्रसादासारखे वाटून देऊ नयेत. अन्यथा अशा सन्माननीय पुरस्कारांचीच मानहानी होईल.

मी षांताराम पवारांना अभिनंदनाचा फोन केला नाही. काही दिवसांनी मला कळलं की, षांताराम पवारांनी हा पुरस्कार स्पष्टपणे नाकारला. एकाच व्यक्तीला हा पुरस्कार प्रदान करावा असं पवारांचंही मत असणार असा माझा कयास आहे.

आज वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षीही ते तेवढेच कणखर आहेत. आपणच निर्माण केलेली स्वत:चीच विक्षिप्त प्रतिमा अजूनही खंबीरपणे त्यांनी तशीच जोपासली आहे. असं असूनही त्यांच्या खऱ्याखुऱ्या प्रतिमेतला खराखुरा माणूस मात्र आज एकाकी आहे.

हा विक्षिप्त माणून ना पेंटर ठरला, ना साहित्यिक ठरला, ना कवी ठरला!

.............................................................................................................................................

‘कळावे’ या षांताराम पवार यांच्या कवितासंग्रहाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘दीपस्तंभ : षांताराम पवार’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......