संसारातले ‘तृप्त साधक’ म्हणजे माझे वडील होते!
ग्रंथनामा - झलक
द. मा. मिरासदार
  • ‘बाप नावाचा वृटवृक्ष’ या पुस्तकातील आपला लेख चाळताना ज्येष्ठ विनोदी लेखक द. मा. मिरासदार
  • Sat , 04 August 2018
  • ग्रंथनामा झलक द. मा. मिरासदार Dattaram Maruti Mirasdar बाप नावाचा वृटवृक्ष Baap Navacha Vatvruksha चंद्रकांत वानखेडे Chandrakant Vankhede

‘बाप नावाचा वटवृक्ष’ हे कवी चंद्रकांत वानखेडे यांनी संपादित केलेले पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात ज्येष्ठ विनोदी लेखक द. मा. मिरासदार, कवी विठ्ठल वाघ, डॉ. रामचंद्र देखणे यांच्यासह एकंदर ३० मान्यवरांनी आपल्या वडिलांविषयी लिहिलेल्या लेखांचा समावेश आहे. त्यातील हा एक लेख अंशत: संपादित स्वरूपात.

.............................................................................................................................................

माझ्या वडिलांची एकच लख्ख आठवण माझ्या मनात लहानपणापासून आजपर्यंत उजळत आली आहे. वडील रामदास स्वामींचा एक श्लोक सतत पुटपुटत असत-

जळत हृदय माझे जन्म कोट्यानकोटी

मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी

त्यांचे काय हृदय जळत होते हे त्यांनी कधीच कुणाला सांगितले नाही. त्याची धग कुणाला लागू दिली नाही. आपली वेदना लपवून ठेवत ते सतत समाधानाने हसत राहिले. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत राहिले.

माझ्या वडिलांचे पूर्ण नाव मारुती मनोहर मिरासदार. पुणे जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरील अकलूज हे आमचे मूळ गाव. वडिलांचा जन्म १८९९ साली झाला. आपल्या आई-वडिलांचे ते एकुलते एक चिरंजीव होते. वडिलांच्या दहा-बारा भावंडांचा मृत्यू झाला होता. त्या काळात मूल जगावे यासाठी अनेक नवससायास केले जात. वेगवेगळ्या श्रद्धा जनमानसात आजही जोपासल्या जातात. सप्त चिरजीवांपैकी एक असलेल्या मारुतीचे नाव या मुलाला दिले तर तो जगेल आणि त्याला दीर्घायुष्य लाभेल ही श्रद्धा त्यामागे असावी.

अकलूजला मिरासदारांची दीड-दोनशे एकर शेती होती. त्या काळातील ब्राह्मण कुटुंबांचादेखील शेती हाच प्रधान व्यवसाय असे. फक्त फरक इतकाच, की त्यांची शेती ‘खंडाने’ लावलेली असे. म्हणजेच ती शेती कुळांना कसण्यासाठी दिली जाई. येणाऱ्या उत्पन्नाचे तीन वाटे केले जात. एक वाटा जमीनमालकाचा, दुसरा कुळाचा आणि तिसरा बैलाचा असा अलिखित नियम होता.

ब्राह्मणवर्ग शेतीमध्ये काम करण्यासाठी जात नसल्याने बाकी इतर वेळात कसला तरी व्यवसाय किंवा नोकरी केली जाई. माझ्या वडिलांचे वडील म्हणजे माझे आजोबा एका सरकारी दवाखान्यात कंपाउंडरचे काम करत असत. असे असताना माझे वडील आरोग्य खात्याकडे न जाता वकिली व्यवसायाकडे वळले. त्यामागची पार्श्वभूमी पाहता मला असे वाटते, की काकासाहेब अकलूजकरांचा त्यांच्यावर प्रभाव पडला असावा. अकलूजला आमच्या मिरासदारांच्या वाड्याजवळ काटकोनात काकासाहेब अकलूजकरांचा वाडा होता. आर्थिकदृष्ट्या काकासाहेबांची परिस्थिती मिरासदारांपेक्षा खूपच चांगली होती. काकासाहेब गावातील प्रतिष्ठित वकील होते. त्या काळात त्यांच्या हाताखाली कारकून असत. बहुधा काकासाहेबांची प्रसिद्धी-प्रतिष्ठा पाहून वडिलांनी वकील होण्याचे ठरवले असावे. कारणे काहीही असोत, पण वकिलीची परीक्षा पास होऊन सनद घेऊन वडिलांनी वकिली व्यवसाय सुरू केला. वडिलांची बुद्धिमत्ता, साधा, सरळ, निर्व्यसनी स्वभाव पाहून काकासाहेबांनी आपल्या मुलीचे लग्न वडिलांशी करून दिले. अकलूजकरांची मुलगी लग्न करून शेजारच्या मिरासदारांच्या वाड्यात नांदायला आली व काकासाहेब अकलूजकर वडिलांचे सासरे झाले.

हाताखाली कारकून ठेवणाऱ्या अकलूजकर वकिलांचा आदर्श समोर ठेवून वडिलांनी वकिली सुरू केली तरी उभ्या आयुष्यात स्वत:च्या हाताखाली कारकून ठेवणे त्यांना कधीच परवडले नाही. कारण वकिली व्यवसाय करण्यास लागणारी बुद्धिमत्ता त्यांच्याजवळ असली तरी त्या व्यवसायाला उपयुक्त असा बेरकीपणा, खोटेपणा त्यांच्या स्वभावात नव्हता. त्यामुळे माझ्या वडिलांना प्रसिद्धी-प्रतिष्ठा मिळाली, पण कधीच खूप पैसा मिळवता आला नाही. वकिली व्यवसायात राहूनही त्यांचा स्वभाव बदलला नाही. साध्या, सरळ, सज्जन वृत्तीचे गृहस्थ हीच त्यांची ओळख होती. स्वभाव बदलणे शक्य नसते कदाचित, पण प्रवृत्ती कधीच बदलत नाही. स्वभाव आणि प्रवृत्ती यातील सूक्ष्म सीमारेषा मी वडिलांमुळे ओळखायला शिकलो, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

अर्थात वडिलांच्या या वृत्तीमुळेच गावातल्या लोकांना त्यांच्याविषयी प्रचंड विश्वास वाटत असे. अनेकदा असे घडले आहे की, दोन गटांतील वादावादी, भांडणे असतील तर त्यातील एक पक्ष वडिलांकडे येऊन बसलेला असे, अन थोड्या वेळात दुसरा पक्ष दारात येत असे. मग गमतीशीर संवादाच्या फैरी झडत.

‘तुम्ही आधीच आला आहात का इथे? जाऊ द्या आता आम्हाला दुसरा वकील शोधावा लागणार…’ असे म्हणून दारातले पक्षकार निघून जात असत आणि मिरासदार वकिलांकडे आपण पहिल्यांदा येऊन बाजी मारली हा आनंद बसलेल्या पक्षकारांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असे.

नेहमी तृप्त, समाधानी, हसतमुख असलेल्या माझ्या वडिलांवर साऱ्या लोकांनी मनापासून प्रेम केले. एकदा घडलेली घटना अशी, की एक रामोशी वडिलांकडे आला. कनवटीला लावलेले चांदीचे दोन रुपये काढले आणि म्हणाला, ‘अवसेला चोरी करायलाच पाहिजे हा आमचा रिवाज आहे. कालच्या अवसेला चोरी केली तवा हे दोन रुपये घावले. त्यातला एक तुमी ठेवा. शकुनाचा आहे तो.’

स्वत:चोरी केलेला रुपया शकुनाचा म्हणून माझ्या वकील वडिलांपुढे धरणाऱ्या रामोश्याचे त्यांच्यावर प्रेम तर होतेच, पण तितकाच विश्वासदेखील होता.

वडिलांना कसलाही हव्यास नव्हता. ‘आपण खाऊनपिऊन सुखी आहोत हे खूप आहे…’ असे ते नेहमी म्हणत असत. पैसा, श्रीमंती, बडेजाव यांच्यामागे ते कधीही धावले नाहीत. अकलूजकरांच्या श्रीमंत घरातून आलेल्या माझ्या आईनेदेखील समाधानी वृत्तीने त्यांना साथ दिली. वडिलांच्या वृत्तीमुळे संसारात तिला अनेकदा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. पण तिने कधीही तक्रार केली नाही. मुळात त्या दोघांचा स्वभाव अतिशय काटकसरी आणि धार्मिक होता. आम्हा नऊ भावंडांवर त्यांच्या या स्वभावाचे नकळत संस्कार झाले.

आम्ही सहा भाऊ आणि तीन बहिणी यांचे शिक्षण, लग्न या साऱ्या जबाबदाऱ्या आई-वडिलांनी व्यवस्थित आणि एकमताने पार पाडल्या. त्यामुळे आई-वडिलांमध्ये मतभेद, वादावादी या गोष्टी आम्हाला कधीच दिसल्या नाहीत.

कुठल्याही अडचणींचा सामना हसतमुखाने करत राहायचे आणि प्रत्येक घटनेतील विसंगती शोधून ती विनोदी शैलीत सांगत राहायचे, हा वडिलांचा स्वभाव होता. त्यांच्या वकिलीच्या सुरुवातीच्या काळातील एक किस्सा ते नेहमी रंगवून सांगत असत. एकदा एक अशील त्यांच्याकडे केस घेऊन आला. त्या काळात केस पूर्ण होऊन तिचा निकाला लागला की, वकिलाची फी द्यायची अशी पद्धत होती. वडिलांनी त्या केससाठी खूप अभ्यास केला आणि वडील जिंकले.

‘खूप अभ्यास करून मी केस जिंकलोय तर ठरलेल्या रकमेपेक्षा जरा जास्त काही द्या की…बघा जरा…’

तो अशील निर्विकार चेहऱ्याने म्हणाला, ‘पण तुम्ही कशाला एवढा अभ्यास केला? मी साहेबाला काय द्यायचे ते दिले होते. साहेबच म्हणाले, नावाला एखादा वकील उभा कर. त्याला चार शब्द बोलू दे. मग पुढे काय करायचे ते मी बघतो…’

खरे तर वडिलांच्या बुद्धीवर, मेहनतीवर प्रश्न उभा करेल असा हा किस्सा, पण अहं दुखावू न देता वडील मिस्किल हसत, विनोदी शैलीत हा किस्सा सांगत असत. उत्तम विनोद तोच असतो, जेव्हा व्यक्ती स्वत:मधल्या वैगुण्यावर, विसंगतीवर विनोद करतो अन निर्मळ मनाने तो स्वीकारून त्यावर हसत असतो. वडिलांकडे हा सर्वांत मोठा गुण होता.

गुण-अवगुणांमधील सीमारेषा ओळखून ते आनंदात जगत राहिले. संसारात अनेक आपदा सोसूनही त्यांनी आपला तोल कधी ढळू दिला नाही. प्रत्येक वळणावर आलेले मोह बाजूला सारत आले. मन स्वच्छ ठेवत समाधानी वृत्तीने स्वत: हसत आणि दुसऱ्याला हसवत जगत राहिले.

चौऱ्यांऐंशी वर्षांपर्यंत दीर्घायुष्य त्यांना लाभले. शेवटी शेवटी एकच इच्छा ते सतत बोलून दाखवत असत- ‘सारं आयुष्य समाधानानं जगलो. आता मृत्यूदेखील तसाच यावा.’

एके दिवशी त्यांना अस्वस्थ वाटू लागले. मी आणि धाकटा भाऊ त्यांना घेऊन दवाखान्यात निघालो. आई दारापर्यंत निरोप द्यायला आली होती. वडील तिला म्हणाले, ‘जातो, सांभाळून रहा…’

दवाखान्यात तृप्त चेहऱ्याने, मनाने त्यांचे निधन झाले. त्यांची इच्छा पूर्ण झाली. वडिलांविषयी दोन शब्दांत सांगायचे तर इतकेच सांगता येईल, संसारातले ‘तृप्त साधक’ म्हणजे माझे वडील होते.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

Post Comment

Ram Jagtap

Sun , 05 August 2018

@ Kamal Unaware - आमच्याकडूनच टायपिंग मिस्टेक झाली होती. दुरुस्त केली. लक्षात आणून दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. - राम जगताप, संपादक, अक्षरनामा


Kamal Unawane

Sun , 05 August 2018

द.मा.मिरासदार सरांनी त्यांच्या वडिलांची जन्मतारीख चुकीची लिहिली आहे .कृपया नोंद घ्यावी.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......