प्रा. मोरेंवर पूर्णपणे विसंबून न राहता, स्वतंत्रपणेदेखील ‘इस्लाम’चा अभ्यास करावा आणि सत्य जाणून घ्यावे!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
दयानंद कनकदंडे
  • ‘शेषराव मोरेंकृत मुस्लिम मनाचा शोध : एक चिकित्सा’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 03 August 2018
  • ग्रंथनामा शिफारस शेषराव मोरेंकृत मुस्लिम मनाचा शोध : एक चिकित्सा बशारत अहमद Muslim Manacha Shodh मुस्लिम मनाचा शोध शेषराव मोरे by Sheshrao More

प्रा. शेषराव मोरे यांच्या ‘मुस्लीम मनाचा शोध’ या ग्रंथात कुराण, हदीस व पैगंबर चरित्र याआधारे मुस्लीम मनाचा शोध घेतला आहे. मुस्लीम मन हे फक्त कुराण, हदीस व पैगंबर चरित्र याआधारेच घडते का? देश, काळ व परिस्थिती यानुसार काही फरक पडतो की नाही, असे प्रश्न मोरे यांचा ग्रंथ वाचून उपस्थित होतात. जागतिक मुस्लीम प्रश्न असो की, भारतातील मुस्लीम प्रश्न, त्यास समजावून घ्यायचे तर एक मोठी गुंतागुंत आपल्याला समजून घ्यावी लागते. बदललेले अर्थ-राजकीय संदर्भ, गत काही वर्षांत ‘मुस्लीम’ शब्दाचे ‘दहशतवादी’ असे पर्यायवाची शब्द म्हणून प्रस्थापित व्हायला लागणे यामागे काय कारणे आहेत, हेही समजून घ्यावे लागते. दुसऱ्या महायुद्धानंतर धार्मिक आधारावर झालेल्या फाळण्या वगैरेचे संदर्भही लक्षात घ्यावे लागतात. प्रा. मोरे यांनी या सर्व गोष्टी बाजूला सारून कुराण, हदीस याआधारे मुस्लीम मन घडते अशी मांडणी करून कुराण, हदीस व पैगंबर चरित्र या गोष्टी राजकीय जिहाद, हिंसा या गोष्टीस प्रोत्साहित करतात असे मांडले आहे.

मोरे यांच्या या ग्रंथाची डॉ. बशारत अहमद यांनी केलेली चिकित्सा म्हणजे प्रस्तुत पुस्तक. यात डॉ. अहमद अर्थ-राजकीय परिस्थिती, देश काळ स्थिती यांचा मुस्लीम मन घडण्या-बिघडण्यावर काय परिणाम होतो, याची चर्चा करत नाहीत, मुस्लिमांच्या आर्थिक स्थितीचा, देशातील व जगातील राजकारणाचा फारसा आढावा घेत नाहीत. कारण अशा प्रश्नांचा आढावा त्यांनी त्यांच्या ‘इस्लाम समजून घेताना’ या पुस्तकात घेतला आहे. सदर पुस्तकाचा मुख्य भर हा प्रा. मोरेंच्या ग्रंथातील विसंगतीची चर्चा करणे हा आहे.

गेल्या काही वर्षांत ‘मुस्लीम’ या शब्दाचे काही नवीन पर्यायवाची शब्द तयार झाले आहेत. मुस्लीम म्हटले की, डोळ्यासमोर कडवे धर्माभिमानी, अतिरेकी, सामाजिकदृष्ट्या मागास, बुरखेवाल्या स्त्रिया, दहशतवादी कृत्ये अशी एक सर्वसामान्य प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते.. दहशतवादी असणे व मुस्लीम असणे हे जणू काही एकच आहे अशी प्रतिमा निर्मिती जोरात सुरू असण्याच्या काळात प्रा. मोरे यांचे ‘मुस्लिम मनाचा शोध’ हे पुस्तक आधीच पक्क्या केलेल्या गृहीतकास सिद्ध करण्याच्या प्रयत्नात कुराण, हदीस यातील आयत व पैगंबर चरित्रातील घटना यांचा चुकीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करते, अशी भूमिका डॉ. अहमद यांनी मांडली आहे. “प्रा. मोरे इस्लामच्या इतिहासातील कुठल्या घटनेवरून काय निष्कर्ष काढावयाचा आहे, हे आधीच ठरवितात. मग त्या पद्धतीने ती घटना, तो प्रसंग नमूद करतात. त्यासाठी ते त्या घटनांचा ऐतिहासिक कालक्रमसुद्धा बदलून सोयीस्करपणे मागे किंवा पुढे करतात,” असे नमूद करून अहमद यांनी  प्रा. मोरे यांनी केलेल्या गडबडीचा विस्ताराने परामर्श घेतला आहे.

प्रेषितांनी मक्केत उघड प्रचार सुरू केला तो प्रसंग व मूर्तीपूजकांनी पैगंबरांना धर्मप्रसारापासून रोखण्यासाठी दिलेला त्रास, यांच्या मोरे यांनी केलेल्या नोंदी दोषपूर्ण असल्याचे सांगत डॉ. अहमद उल्लेखित प्रसंगाचे पैगंबर चरित्रातील मूळ दाखले देत सिद्ध करतात. सोबतच प्रेषितांची मदिनेकडे हिजरतची घटना अपूर्ण दिल्याचे नमूद करून उर्वरीत घटना सांगतात. तसेच “प्रेषितांचे अनुयायी सुरुवातीपासून कडवे व प्रेषितांची टिंगल-टवाळी सहन न करणारे व विरोधकावर आक्रमण करणारे होते. (अतिरेकी, कट्टरवादी, असहनशील होते)” हे सिद्ध करण्यासाठी “प्रेषितांचे चुलते हजरत हमजा (रजि.) ज्या घटनेमुळे चिडून मुसलमान झाले, ती घटना ‘मुसलमान’ झाल्यानंतरची” म्हणून नमूद केली आहे, असे डॉ. अहमद यांनी म्हटले आहे. (पान १३ ते २२)

‘मुस्लिम मनाचा शोध’ हा ग्रंथ प्रकाशित करण्यापूर्वी प्रा. मोरे यांनी त्याची अभिप्राय आवृती काढून ती तपासण्यासाठी ‘जमाते इस्लामी’च्या पंच महापंडिताना दिली होती. त्यावरील पंच महापंडितांनी दिलेला अभिप्राय हा सदोष असून मोरे यांनी दिलेले संदर्भ योग्य रीतीने तपासून दिला नसल्याचे डॉ. अहमद यांनी म्हटले आहे.

जिहादचे स्वरूप आणि व्याप्ती

आपल्याकडे जिहाद या शब्दाची वारंवार चर्चा होत असते. प्रा. मोरे यांनी जिहादचे तीन प्रकार सांगितले आहेत - १. दृश्य (मानवी) शत्रू विरुद्ध, २. सैतानाविरुद्ध आणि ३. स्वतः विरुद्ध असा आहे. डॉ. अहमद हा क्रम मोरे यांनी उलटा लावल्याचेच प्रतिपादन करून स्वतःविरुद्ध अर्थात स्वतःच्या अंतरात्म्याविरुद्ध करावयाचा जिहाद हा जिहाद-ए-अकबर म्हणजेच परमोच्च जिहाद असल्याचे म्हटले आहे. सशस्त्र युद्ध वा लढाई याकरिता ‘कुराण’ व ‘हदीस’मध्ये वेगळाच शब्द ‘किताल’ वापरण्यात आला असून तो ‘जिहाद’चा एक छोटा भाग असल्याचे म्हटले आहे.

प्रा. मोरे यांच्या मुस्लीम मनाचा शोध या ग्रंथात ‘अल्लाच्या कार्यासाठी संघर्ष’ असे जवळपास ९० पानांचे प्रकरण आहे व ‘१८५७ चा जिहाद’ असे एक पूर्ण पुस्तक आहे. जिहाद-ए-अकबरचा विचार करण्याची गरज नाही असे मोरे यांनी म्हटले आहे. या जिहादचा इतर माणसांवर काहीच वाईट परिणाम होत नसतो. त्यामुळे सामाजिक किंवा राष्ट्रीय प्रश्न म्हणून या प्रकारच्या जिहादचा विचार करण्याची गरज नसते, असे मोरे म्हणतात. इतर माणसांवर वाईट परिणाम न करणाऱ्या जिहादची चर्चा टाळून - ज्यास ‘किताल’ असे म्हटले आहे. त्याची महत्त्वाचा जिहाद म्हणून - चर्चा करण्याच्या मोरे यांच्या प्रयत्नाची चिकित्सा डॉ. अहमद यांनी केली आहे.

हे करत असताना ‘मुस्लीम मनाचा शोध’ व ‘१८५७ चा जिहाद’ याबाबतीत मोरे यांनी केलेल्या त्यांच्याच विश्लेषणातील विरोधाभास डॉ. अहमद यांनी दाखवून दिला आहे. १८५७ चा उठाव हा इस्लामी सत्ता प्रस्थापित करण्यासाठी मुसलमानांनी छेडलेला जिहाद होता, हे सिद्ध करण्यासाठी हे पुस्तक प्रा. मोरे यांनी लिहिले आहे. ‘मुस्लीम मनाचा शोध’ या ग्रंथामध्ये “लढाईला जाताना त्यात श्रद्धाहिनांचा समावेश केला जात नसे” असे म्हटले आहे. या उठावात नानासाहेब पेशवे, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे हे उठावाचे नेतृत्व करत होते आणि या सगळ्यांनीच बहादूरशाह जफर यांना बादशाह म्हणून लढाईदरम्यान स्थापित केले होते. इंग्रजाविरोधात विविध जातीवर्गाने केलेला उठाव ज्यास वि.दा. सावरकर, महात्मा फुले व अन्य लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे परिभाषित केले आहे, त्यास जिहाद ठरवण्याचे काम मोरे यांनी केले आहे. संन्याशी फकिराच्या ब्रिटिशाविरोधातील उठावाला बंकिमचंद्र चटर्जी यांनी मुस्लिमविरोधी संघर्षाच्या रूपात चित्रित करून वेगळेच चर्चाविश्व स्थापित करण्याचा प्रयत्न केला होता असे कॉम्रेड विलास सोनवणे यांनी ‘मुस्लीम प्रश्नाची गुंतागुंत’ या पुस्तकात म्हटले आहे. त्याच प्रकारचा प्रयत्न शेषराव मोरे जिहादचा अर्थ लावून करू पाहताहेत असे दिसते आहे, असे डॉ. अहमद नमूद करतात.

‘१८५७ चा जिहाद’ हा ग्रंथ लिहिताना प्रा. मोरे यांना इस्लाममध्ये ‘जिहाद’ कशाला म्हणतात, ‘जिहाद’ ची व्याख्या काय आहे हे माहीत असताना व त्या व्याखेच्या आधारे सन १८५७ च्या उठावाला ‘इस्लामी जिहाद’ जिहाद ठरवणे आवश्यक आहे ते जाणत होते. तरीदेखील त्यांनी सर्व आटापिटा करून त्या उठावाला ‘जिहाद’ ठरवण्याचा प्रयत्न केला” असे बशारत अहमद यांनी म्हटले आहे. हे सर्व मुसलमानांचे राक्षसीकरण करण्याच्या हेतूने केले गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

अहमदिया पंथाच्या जिहादविषयक भूमिकेची मांडणी मिर्झा गुलाम अहमद यांच्या ‘गव्हर्नमेंट अंग्रेजी और जिहाद’ या ग्रंथाच्या आधारे करून डॉ. अहमद यांनी मुस्लिम जगतात सुरू असलेल्या जिहादविषयक चर्चाविश्वाची ओळख करून दिली आहे. जमाते इस्लामी या स्कूल व्यतिरिक्त अन्य जे इस्लामी स्कूल आहेत, त्यांची व अन्य इस्लामी विचारवंत मांडत असलेल्या जिहादविषयक विचारांची व्यापक दखल न घेता मौलाना मौदुदिप्रणीत चर्चाविश्वाचीच दखल घेण्याच्या मोरे यांच्या प्रयत्नास त्यांनी पक्षपाती संबोधले आहे.

पंचमहापंडितांपैकी म्हणून ज्यांचा उल्लेख झाला ते मुहम्मद मुस्तफा यांचा ‘मुस्लिम मनाचा शोध’ या ग्रंथावरील तो प्रकाशित झाल्यानंतर लिहिलेला अभिप्राय या पुस्तकात परिशिष्ट म्हणून समाविष्ट करण्यात आलेला आहे.  मुस्लीम मन बिघडवण्यासाठी इस्लामची शिकवणच सर्वस्वी कारणीभूत आहे, हेच मोरे सिद्ध करू पाहताहेत. या गोष्टीस डॉ. अहमद यांनी प्रश्नांकित केले आहे आणि इस्लामची शिकवण काय आहे याची चर्चा कुराण, हदीस व पैगंबर चरित्र यातील मूळ संदर्भ देत करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

वास्तविक पाहता ‘मुस्लीम मन’ अतिरेकी, असहनशील, उग्रवादी आणि हिंसाप्रिय होण्यामागे, मुस्लीम जगतावर होत असलेला सततचा अन्याय आणि अत्याचार कारणीभूत आहे याची दखल घेण्याची गरज त्यांनी समारोप करताना व्यक्त केली आहे. सोबतच मोरे यांचे ग्रंथ वाचकांनी वाचून, प्रा.मोरे यांच्यावर पूर्णपणे विसंबून न राहत, पूर्ण विश्वास न ठेवता, स्वतंत्रपणेदेखील इस्लामचा अभ्यास करावा आणि सत्य जाणून घ्यावे असा सल्ला त्यांनी दिला आहे.

.............................................................................................................................................

‘शेषराव मोरेंकृत मुस्लिम मनाचा शोध : एक चिकित्सा’ - बशारत अहमद, हरिती पब्लिकेशन्स, पुणे. पाने - ९६, मूल्य - १०० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

दयानंद कनकदंडे

dayanandk77@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......