एकूण सर्व गांधींविचार ‘हिंद स्वराज्य’मधील तीस हजार शब्दांत सामावलेले आहेत!
ग्रंथनामा - झलक
डॉ. सूर्यनारायण रणसुभे
  • ‘हिंद स्वराज्य : एक अन्वयार्थ’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 03 August 2018
  • ग्रंथनामा झलक हिंद स्वराज्य : एक अन्वयार्थ Hind Swarajya - Ek Anvayartha महात्मा गांधी Mahatma Gandhi फकरूद्दीन बेन्नूर Fakruddin Bennur

‘हिंद स्वराज्य : एक अन्वयार्थ’ हे प्रा. फकरूद्दीन बेन्नूर यांचं पुस्तक नुकतंच लोकवाङ्मय गृहातर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ समीक्षक  डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांनी लिहिलेल्या दीर्घ प्रस्तावनेचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

२००९ साली ‘हिंद स्वराज्य’ या छोटेखानी पुस्तकाचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे झाले. केवळ भारतातच नव्हे तर जगातील अनेक विद्यापीठांतून या पुस्तकासंबंधी परिसंवाद, चर्चा आयोजित केल्या गेल्या. भारतात हिंदी व इंग्रजीतून यावर भरपूर लेखन प्रकाशित झाले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या ‘गांधी अभ्यास केंद्रा’ने शताब्दी वर्षाच्या निमित्ताने ‘हिंद स्वराज्य’ पुस्तकाचा विविधांगी अभ्यास करण्यासाठी काही अभ्यासकांना निमंत्रित केले. त्याचाच एक भाग म्हणून राज्यशास्त्राचे जेष्ठ अभ्यासक प्रा. फकरूद्दीन बेन्नूर यांनी ‘हिंद स्वराज्य’च्या माध्यमातून गांधींचे इतिहासशास्त्र अभ्यासण्याचा प्रयत्न केला आहे. अध्यासन केंद्राने ज्येष्ठ अभ्यासक प्रा. बेन्नूर यांना अभ्यासवृती देऊन त्यांच्याकडून विशेष संशोधन करवून घेतले होते. त्या संशोधन साहित्यातून उपरोक्त पुस्तक प्रकाशित करण्यात आलेले आहे. या पुस्तकाच्या केंद्रस्थानी अर्थात ‘हिंद स्वराज्य’ आहे. एकूण दहा प्रकरणात विभागले गेलेले हे पुस्तक इतिहासशास्त्राच्या अंगाने ‘हिंद स्वराज्य’मध्ये व्यक्त झालेल्या विचारांचा शोध घेते.

‘हिंदी स्वराज्य आणि गांधी विचारांचे पुनरुत्थापन’ या पहिल्या प्रकरणात प्रा. फकरूद्दीन बेन्नूर हे स्पष्ट करतात की, १९४७ ते १९८० पर्यंतच्या काळात या देशात गांधींविचारांची प्रचंड अशी पिछेहाट आणि अवहेलना झालेली आहे. गांधींविषयी प्रसारमाध्यमांनी अशी भूमिका घेतली की, ‘गांधी म्हणजे गॉड दॅट फेल्ड’. १९८० नंतर मात्र जागतिक परिस्थिती बदलू लागली. विज्ञान आणि तंत्रज्ञान यावर आधारित पाश्चात्य औद्योगिक संस्कृती आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचा उदय झाला आणि सर्व स्तरावरील मानवी जीवनापुढे अस्तित्वाचे प्रश्न निर्माण होत गेले. त्यावेळी गांधी विचारांचा मागोवा सुरू झाला आणि आश्चर्यकारकरित्या जागतिक विचारक्षेत्रात गांधी विचारांचे आणि तत्त्वज्ञानाचे पुनरुत्थान सुरू झाल्याचे दिसून येते. हिंदी स्वराज्य ही गांधी विचारांच्या केंद्रस्थानी असलेली पुस्तिका आहे. यात आधुनिक भारताचा विकास कसा झाला पाहिजे, याची रूपरेखा सादर करण्यात आलेली आहे.

आर्थिक साम्राज्यवादाला शह द्यायचा असेल तर छोट्या उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन देऊन खेड्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे गरजेचे आहे. कमीत-कमी शोषण व्हावे आणि माणसा-माणसांतील संबंध अधिक विवेकपूर्ण, मानवीय करायचे असतील तर चंगळवाद आणि तंत्र-यंत्राचा विरोध करून मानवी श्रमाची प्रतिष्ठा करणे अगत्याचे कसे आहे, हे गांधीजी पटवून देतात. आर्थिक-साम्राज्यवादामुळे मानवी जीवन कसे विस्कळीत होत चाललेले आहे. माणूस हा अविवेकी आणि संवेदनशून्य कसा होत चालला आहे याची जाणीव जगातील संवेदनशील मंडळीना अलीकडे अधिक तीव्रतेने होऊ लागलेली आहे. त्यामुळेच ‘हिंद स्वराज्य’मध्ये व्यक्त झालेल्या विचारांवर पुन्हा एकदा नव्याने विचार सुरू झालेला आहे.

मुस्लिमांविषयीचे धोरण

‘हिंद स्वराज्य’मधील व्यक्त विचारांचा मागोवा घेणे, त्याचे विवेचन-विश्लेषण करण्यासाठी प्रा. बेन्नूर आधी एका सिद्धान्ताची मांडणी करतात आणि त्या अनुषंगाने ते ‘हिंद स्वराज्य’ची चिकित्सा करतात. हा सिद्धान्त म्हणजे गांधीप्रणित इतिहासशास्त्र. प्रकरण तीनचा संबंध या इतिहासशास्त्राशी आहे. इंग्रजांनी भारतीय इतिहासाची जी मांडणी केली, त्यास गांधीजी नाकारतात. कारण इंग्रजांनी अत्यंत धूर्तपणे भारतीय इतिहासाची मांडणी या प्रकारे केली होती की, जेणेकरून या देशातील हिंदू सुशिक्षितांत मुसलमानाबद्दल चीड निर्माण व्हावी व सुशिक्षित मुसलमानाच्या मनात हिंदूंबद्दल संशय निर्माण व्हावा. हाच इतिहास त्यावेळी हायस्कूलपासून कॉलेजपर्यंत शिकवण्यात येत होता. त्यासोबत काही जर्मन व इंग्रज इतिहासकारांनी प्राचीन भारतीय इतिहासाचे गौरवीकरण केलेल होते. (मॅक्स मुल्लर वगैरेनी) त्यास देखील गांधी नाकारतात. म्हणून मानवी इतिहासाकडे पाहताना गांधी क्रूर व रानटी आदिम भटक्या जमाती आणि हिंसा यापासून क्रमश: मुक्त होत मानवी इतिहास सहकार्य, परस्परपूरकता आणि अहिंसा यावर आधारित ग्रामीण कृषिप्रधान जीवनापर्यंत कसा प्रगत होत गेला हे सांगतात. मानवी प्रगतीचा हा प्रवास हिंसेपासून अहिंसेकडे झालेला आहे.

गांधीजींच्या दृष्टीने इतिहास म्हणजे केवळ राज्यकर्त्यांचा सत्ता संघर्ष, माणसांचे स्वार्थ आणि चुका याचे वर्णन नसते, तर मानवी इतिहासातून विवेक, आत्मज्ञान, शांती, प्रेम, सहकार्य हे कसे उत्क्रांत होत गेले याचे ज्ञान अवगत होत असते. गांधीजींच्या दृष्टीने इतिहास हा दोन धर्मातील अनुयायांचा नसतो, तसा तो राज्यकर्त्यांचाही नसतो, तर इतिहास हा मानवी जीवनाचा असतो. त्याचमुळे गांधी भारताच्या सुवर्णयुगाची कल्पना नाकारतात. प्राचीन भारतीय सुवर्णयुग होते आणि तेव्हा सर्व काही पूर्णत्वास पोहोचले होते (हिंदुत्ववादी हेच तर म्हणतात) असे म्हणणे म्हणजे प्राचीन काळापासून माणूस पूर्णत्वास पोहोचलेला होता, त्यामुळे त्याची बुद्धी आणि विवेक विकसित करण्याचा प्रश्नच नव्हता असे म्हणण्यासारखे होते. आणि म्हणून ते सुवर्णयुगाची कल्पना नाकारतात आणि माणसाच्या अपूर्णत्वाकडे आपले लक्ष वेधतात.

महात्मा गांधी श्रीरामाकडे ऐतिहासिक पुरुष म्हणजे दशरथी राम या दृष्टिकोनातून पाहत नाहीत. भूतमात्रात रमण करतो तो राम, असे त्याचे वर्णन ते करतात. प्रा. बेन्नूर या दृष्टिकोनाची व्याख्या करताना लिहितात की, ‘महात्मा गांधी येथे अल्लाह श्रेष्ठ, हिंदूचा परमेश्वर श्रेष्ठ किंवा श्रीराम श्रेष्ठ; हे ऐतिहासिक धर्मातील संघर्षाचे मूळ कारणच बाद करतात आणि धर्माच्या नावाने केली गेलेली युद्धे, क्रुसेडर्स, लढाया यांचा संबंध खऱ्या धर्माशी नाही हे स्पष्ट करतात. इंग्रज इतिहासकारांनी मांडलेल्या हिंदू-मुसलमानांच्या शत्रुत्वाचा इतिहास हा धार्मिक स्वरूपाचा नसून राज्यकर्त्यांच्या सत्तापिपासूचा आहे हे अप्रत्यक्षपणे सांगतात.’ गांधींना त्या काळी प्रचलित असलेल्या एकाही धर्माची प्रस्थापित संरचना मान्य नव्हती. ते धर्माकडे सत्य, अहिंसा, विवेक यांच्या सृजनाची शक्ती म्हणूनच पाहत होते. गांधीजींनी त्याकाळी सर्वच धर्ममार्तंडावर हल्ला चढवलेला होता.

प्रकरण चारमध्ये महात्मा गांधीप्रणित ब्रिटिशांच्या भारतावरील आक्रमणाची कारणमीमांसा विश्लेषित करण्यात आलेली आहे. गांधींच्या मते भारतात इंग्रजांनी घेतला नाही तर आपण त्यांना तो दिला. ईस्ट इंडिया कंपनीला आपणच आपल्या स्वार्थासाठी कंपनी बहादूर केले. ब्रिटिश राजवटीचे ध्येय कसे आहे, यावर ‘हिंद स्वराज्य’मधून चर्चा करण्यात आलेली आहे. परिवहनाची आधुनिक साधने ही शोषणाची साधने आहेत अधिक चांगली घरे, उत्तमोत्तम कपडे ही चंगळवादाची साधने तथाकथित विकासाच्या माध्यमातून साम्राज्यशाही रुजवत आहे. त्यामुळे भारताचे दारिद्र्य आणखीन वाढत आहे हे गांधीजींनी १९०९ मध्ये लिहिले होते. आर्थिक उदारीकरणानंतर देखील असेच घडत आहे. ‘हिंद स्वराज्य’मध्ये आधुनिक सभ्यतेवर जी टीका करण्यात आलेली आहे, त्याच्या मुळात साम्राज्यवादाच्या शोषणाचे स्वरूप स्पष्ट करणे आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे. हिंद स्वराज्यमधून गांधीजींनी वेगवेगळ्या प्रकारे सूचित केले आहे की ‘आक्रमकांना भारत बळकाविणे सुलभ झाले कारण भारतीय लोकांत भित्रेपणा बोकाळलेला होता. त्यांना भीतीने पछाडलेले होते आणि ते दैववादी बनलेले होते.’ १९०९ मध्ये लिहिली गेलेली ही वाक्ये वाचताना जाणवते की, १९८० नंतर भारतीय समाज आणखीनच भित्रा व दैववादी होत चालला आहे काय?

क्रांतिकारकांची चुकीची भूमिका

‘हिंद स्वराज्य : एक अन्वयार्थ’ या पुस्तकात क्रांतिकारकाची भूमिका किती चुकीची आहे, हे गांधीजी स्पष्ट करतात. क्रांतिकारक हे भारतीय स्वातंत्र्याच्या प्रश्नाकडे भाबडेपणाने व एकांगी दृष्टीने पाहतात, अशी त्यांची तक्रार आहे. गांधीजींच्या दृष्टीने केवळ ब्रिटिशांची सत्ता गेली तरी साम्राज्यवादी आक्रमण संपुष्टात येणार नाही. कारण ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवल्यानंतर ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या नव्या व्यवस्थेमुळे भारतामध्ये जे आर्थिक शोषण होत होते, ते नष्ट करणे आवश्यक होते. तसेच ब्रिटिश सभ्यतेने जे वैचारिक आणि सांस्कृतिक वर्चस्व आणलेले होते, त्याचा ही मुकाबला करणे गरजेचे होते. ब्रिटिशांची सत्ता केवळ लष्कराच्या आधारे उभी राहिलेली नव्हती तर त्यांच्या राजकीय सत्तेचा आधार आर्थिक होता. या सर्व घटकांचा विचार क्रांतिकारक करीत नव्हते. (शहीद भगतसिंह हे एकमेव क्रांतिकारक यास अपवाद होते) वसाहतवादाचे व्यामिश्र स्वरूप आणि त्याची चौफेर पसरलेली मुळे यांचा सर्वांगीण विचार न करता केवळ ब्रिटिशांना हाकलून देण्याचा विचार क्रांतिकारक करीत होते. गांधीजींची तक्रार ही होती की हिंसेच्या मार्गाने जाऊन स्वातंत्र्य मिळणार नाही आणि जरी ते मिळाले तरी त्याचा फायदा बहुजनांना होणार नाही.

प्रकरण चार हे या पुस्तकातील सर्वांत मोठे प्रकरण आहे. या प्रकरणात तत्कालीन अनेक प्रश्नांवर गांधीजींची भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे. विशेषत: ‘हिंद स्वराज्य’वर एक आरोप असा होता की ही पुस्तिका क्रांतिकारकांच्या भूमिकेचा विचार करण्यासाठी म्हणून गांधीजींनी लिहिलेली आहे. हा आरोप कसा बिनबुडाचा आहे, हे प्रा. बेन्नूर विस्ताराने अनेक पुरावे देऊन स्पष्ट करतात व गांधीजी स्वातंत्र्याकडे लोककल्याणाचे एक साधन म्हणून कसे पाहत होते हे स्पष्ट करतात.

प्रकरण पाचमध्ये ‘राष्ट्रवादाच्या विचारप्रणालीचे महात्मा गांधीप्रणित इतिहासशास्त्रीय विश्लेषण’ करण्यात आलेले आहे. गांधी राष्ट्रवादासंबंधी नेमकी कोणती भूमिका घेत होते हे येथे स्पष्ट करण्यात आलेले आहे. ‘हिंद स्वराज्य’ लिहीत असताना गांधींसमोर भारताचा इतिहास आणि तत्कालीन परिस्थितीचा आलेख होता. क्रांतिकारकांच्या राष्ट्रवादाच्या सिद्धान्तामुळे हिंदू-मुसलमानांत पडणारी फूट त्यांना दिसत होती. म्हणून गांधींनी भारतातील समाज-वास्तव, भारतात विविध जाती-जमातीचे शेकडो वर्षापासून असणारे सहिष्णू आणि समन्वयवादी व्यावहारिक संबंध आणि लोक संस्कृती यांच्या सहाय्याने आपली राष्ट्रवादाची विचारप्रणाली विकसित करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

सहावे प्रकरण महात्मा गांधींनी भारतीय राष्ट्रीयत्वासंदर्भात मांडलेल्या विचारांशी संबंधित आहे. बहुतेक सर्व क्रांतिकारकांच्या आणि हिंदुत्ववाद्यांच्या डोळ्यांत युरोपच्या राष्ट्रवादाच्या कल्पना ठासून भरलेल्या होत्या. आजही ते त्याच पद्धतीने विचार मांडतात. धर्माला राष्ट्रवादापासून गांधी बाजूला काढतात. धर्माचे राजकीयीकरण नाकारतात आणि नैतिक व सामाजिक शक्ती म्हणून धर्माला उभे करतात.

सातव्या प्रकरणात धर्म, वर्ण, जाती आणि अस्पृश्यता या वरील गांधीजींच्या इतिहासशास्त्रीय चिकित्सेचा अभ्यास सादर करण्यात आलेला आहे. जात आणि अस्पृश्यतेसंबंधी गांधीजींचे विचार हे त्यांचे निरीक्षण, अभ्यास आणि चिंतनातून विकसित होत गेलेले आहेत. त्यामुळे ते खूपच वादग्रस्त राहिलेले आहेत. सुरुवातीला त्यांनी वर्णव्यवस्थेचे समर्थन केलेले आहे. पण जातिव्यवस्थेचा विरोध केलेला आहे. ईश्वरासंबंधीचे त्यांचे विचारदेखील असेच विकसित होत गेलेले आहेत. काही ठिकाणी ते स्फोटक भूमिका घेतात. एके ठिकाणी ते लिहितात की, ‘देवळे, मस्जिदी व चर्च यांना मी धर्माचा व्यभिचार समजतो. सुरुवातीला त्यांनी वर्णव्यवस्था म्हणजे उपजीविकेसाठी केली गेलेली व्यवस्था असे म्हटले. तर १९४० नंतर व्यवसायाचे वाडवडीलांशी असलेले संबंध ते नाकारतात. चळवळीच्या पातळीवर गांधींनी अस्पृश्यतेचा प्रश्न द. आफ्रिकेत असल्यापासून आपल्या हाती घेतलेला होता. आरंभी वर्ण म्हणजे श्रमविभागणीची व्यवस्था असे म्हटले होते आणि धर्मापासून वर्णाला अलग करण्याचा प्रयत्न केलेला होता. पुढे १९३३ मध्ये अस्पृश्यता निर्मूलनासाठी वर्णव्यवस्था नाकारण्याच्या अवस्थेपर्यंत गांधीजी येतात. या प्रकरणात प्रा. बेन्नूर यांनी अस्पृश्यतेसंबंधी गांधीजींच्या विचारांचा विकास टप्प्या-टप्प्याने कसा होत गेला हे सविस्तरपणे मांडलेले आहे. ते मुळातून वाचण्याची गरज आहे. विशेषत: दलितांनी या संदर्भात गांधीजींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून त्यांना आंबेडकरांच्या विरोधात उभे करण्याचा जो प्रयत्न केला आहे, तो कसा चुकीचा आहे याची कल्पना येते.

गांधीजी भारतीय मुसलमानासंबंधी आणि इस्लामसंबंधी जी भूमिका घेतात. त्याचे विवेचन आठव्या प्रकरणात करण्यात आलेले आहे. १९४०-४५ पासून या देशातील हिंदुत्ववाद्यांनी गांधीजींवर हा आरोप केला की ते मुस्लिमधार्जिणे आहेत. गंमत म्हणजे याच काळात बॅ. जिना गांधीजींवर आरोप करीत होते की, गांधी हे हिंदुत्वधर्जिणे आहेत. एकाच व्यक्तीवर परस्परविरोधी हल्ले होत होते. म्हणजे गांधींची भूमिका नेमकी कोणती होती? वस्तुस्थिती ही आहे की गांधीजी हे केवळ मनुष्यधार्जिणे होते आणि धर्माचे जे राजकारण करीत होते त्यांच्या विरोधात ते उभे होते. हिंद स्वराज्यमध्ये गांधी या अशा धर्ममार्तंडावर टीका करतात. ‘गांधीजींची मुस्लिम प्रश्नाबाबत एक महत्त्वाची भूमिका होती ती म्हणजे, भारतातील बहुसंख्य मुसलमान हे धर्मांतरित असल्याने ते इतर भारतीयांपासून वांशिक, प्रादेशिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या वेगळे नाहीत. हिंदूंचे आणि मुसलमानांचे वाडवडील एकच होते. आपल्यात रक्त एकच आहे.’  या प्रकरणाच्या शेवटी प्रा. बेन्नूर लिहितात ‘एकविसाव्या शतकातील हिंदू-मुसलमानांचे सुरू झालेले मूलतत्त्ववादी राजकारण व संघर्ष आणि मुसलमानातील वहाबी धर्ममार्तंडाचे दहशतवादी राजकारण यांना शह द्यावयाचा असेल तर गांधींनी स्वीकारलेला दृष्टिकोन आणि इस्लाम व मुसलमानांसंबंधी केलेली मांडणी चळवळीच्या माध्यमांने प्रचारित करावी लागेल.’

आधुनिक सभ्यतेसंबंधी विचार

प्रकरण नऊ मध्ये गांधीजींनी ‘हिंद स्वराज्य’मध्ये आधुनिक सभ्यतेसंबंधी जे भाष्य केलेले आहे, त्याचा अन्वयार्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे. हिंद स्वराज्य ही पुस्तिका त्याकाळी खूपच वादग्रस्त ठरली होती. कारण यात आधुनिक दळणवळणाच्या साधनांचा (रेल्वे) पाश्चिमात्त्य वैद्यकीय शाखेचा, वकीली व्यवसायाचा विरोध करण्यात आलेला आहे. पहिल्यांदा वाचल्यावर वाचकास हेच जाणवते. १९०९ मध्ये गांधीजी असे का लिहित होते हे समजून घ्यायला फार मोठा काळ जावा लागला. ही वस्तुस्थिती आज मान्य करावीच लागेल. महात्मा गांधी ‘आधुनिक सभ्यता’ हा शब्दप्रयोग ‘औद्योगिक क्रांतीमुळे निर्माण झालेली जीवन पद्धती’ या अर्थाने वापरतात. या पुस्तकात गांधी आपणास यंत्राबद्दल काय सांगतात? गांधी सांगतात की यंत्रामुळे युरोप उजाड होत चाललेला आहे. त्याचे वारे भारतातही वाहू लागलेले आहे. त्यांच्या मते आधुनिक सभ्यता सैतानासारखी आहे. ती सर्वसामान्य माणसांना बेकार करते आणि आर्थिकदृष्ट्या सबळ समाजघटकांना त्यांच्या गरजा वाढवून त्यांना चंगळवाद व चैनीची सवय लावते. म्हणून ते म्हणतात की पूर्वी माणसांना मारून-ठोकून गुलाम करत आज माणसांना पैशांनी आणि चैनीची लालूच दाखवून गुलाम बनवितात.

खरोखरच गांधीजी पूर्णपणे यंत्राच्या विरोधी होते काय? यंत्राच्या संबंधी ते म्हणतात, ‘लक्षावधी लोकांच्या घरात ठेवता येतील इतकी प्राथमिक स्वरूपाची म्हणजे छोटी यंत्र सामुग्री असली पाहिजे. दुसरी गोष्ट त्यांच्या पद्धतीत चलनी नाणे ‘श्रम’ आहे, धातु नव्हे.’ त्यांचा यंत्रांना विरोध नव्हता तर यंत्रानाच मानवी प्रगतीचे अंतिम साध्य मानण्याला विरोध होता. यंत्र ही स्वायत्त यंत्रणा नसते. ती माणसाच्या हातातील साधन आहे. यंत्र साधन असताना, माणसालाच त्या साधनाचा गुलाम करणे हे भांडवलशाही व्यवस्थेचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे गांधी अजस्त्र यंत्रे आणि अवाढव्य कारखाने याना विरोध करीत होते. आत्ताच्या परिभाषेत कॉर्पोरेट उद्योग-समूह आणि व्यापारी कंपन्या यांना त्यांचा विरोध होता. येथे हेही लक्षात घेतले पाहिजे की गांधीजींनी फक्त यंत्र संस्कृतीच्या अनियंत्रित आक्रमणावर टीका केलेली आहे, विज्ञानावर नव्हे! विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा मूळ हेतू ‘मानवी कल्याण’ आहे आणि तो हेतू समोर ठेवून विज्ञान-तंत्रज्ञानाची पर्यायी मांडणी त्यांनी केलेली आहे. गांधी कधीही आणि कोठेही भारतीय समाजाच्या पुनरूज्जीवनाचे विचार मांडत नाहीत तर ते पुनर्रचनेचे विचार मांडतात. देशी आहे म्हणून ते आदर्श आहे असे ते कधीच म्हणत नाहीत. जे जुने ते सोने, असेही म्हणत नाहीत. ‘तर छोटे आणि विकेंद्रीत हे योग्य आणि सुंदर’ असे म्हणतात. त्याला विज्ञान आणि नीतिमूल्याची जोड देतात.

प्रकरण दहा अंतर्गत संपूर्ण विवेचनाचा उपसंहार करण्यात आलेला आहे. १९०९ पासून ‘हिंद स्वराज्य’ची प्रशंसा आणि टीका सुरू आहे. १९३८ मध्ये मिल्टन मुरे यांनी ‘अध्यात्मावरील अभिजात ग्रंथ’ म्हणून याचा गौरव केला. यात त्यांना आध्यात्म कोठे आढळले तेच जाणो. कदाचित त्यांचा अध्यात्माचा आशय वेगळा असावा. तर लॉर्ड लोथियन यांनी ‘एकूण सर्व गांधींविचार’ हिंद स्वराज्यमधील तीस हजार शब्दांत सामावलेले आहेत, असे म्हटले आहे. हा निकष किती योग्य आहे, हे प्रा. बेन्नूर आपल्या विवेचनाद्वारे या पुस्तकातून सिद्ध करून दाखवतात.

प्रा. फकरूद्दीन बेन्नूरांचे हे पुस्तक वाचण्यापूर्वी गांधीजींची मूळ पुस्तिका ‘हिंद स्वराज्य’ वाचणे आवश्यक आहे. हिंद स्वराज्यवर इंग्रजी व मराठीतून जेवढी काही महत्त्वाची पुस्तके आहेत, त्यांचा प्रा. बेन्नूर यांनी बारकाईने अभ्यास केल्याचे सदर पुस्तक वाचताना पुन्हा पुन्हा जाणवते. या पुस्तकातील वसंत पळशीकरांची प्रस्तावना खूपच महत्त्वाची आहे. त्याचा वापर प्रा. बेन्नूर यांनी अनेक ठिकाणी केलेला आहे. हिंदी-इंग्रजीच्या तुलनेत मराठीतून हिंद स्वराज्यवर खूप कमी चर्चा झाल्याचे जाणवते. विशेषत: २००९ च्या सुरुवातीच्या महिन्यापासून या देशातील प्रमुख इंग्रजी व हिंदीतील मासिकांनी, द्वैमासिकांनी व त्रैमासिकांनी या विषयाच्या अभ्यासकाकडून ‘हिंद स्वराज्य’वर पुन्हा एकदा चर्चा घडवून आणलेली होती. महाराष्ट्रात केवळ शिवाजी विद्यापीठाने ‘हिंद स्वराज्य’वर एक वेगळा अभ्यास प्रा. बेन्नूर सरांकडून करवून घेतला. यासाठी त्यांना शिष्यवृत्ती दिली. सर्व साधने मिळवून दिली. आणि प्रा. बेन्नूर सरांनी अत्यंत निष्ठेने पण तेवढ्याच तटस्थतेने ‘हिंद स्वराज्य’मध्ये बीजरूपाने उपस्थित असलेल्या विचारांचा विस्तार करून दाखवलेला आहे. जगातल्या अनेक भाषेत हिंद स्वराज्यचा अनुवाद झालेला आहे. तेथील अभ्यासकदेखील यावर भरभरून लिहिताहेत. विशेषत: तरुण पिढीपर्यंत हे विचार पोहोचले पाहिजेत. प्रा. बेन्नूर यांचे हे पुस्तक म्हणजे या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. या लेखनाबद्दल त्यांचे अभिनंदन!

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......