‘घाचर-घोचर’ आता फक्त पाच लोकांनाच माहीत आहे. आणि त्यात मी एक आहे...
ग्रंथनामा - झलक
विवेक शानभाग
  • ‘घाचर-घोचर’ या कादंबरीचं मुखपृष्ठ
  • Fri , 03 August 2018
  • ग्रंथनामा झलक घाचर घोचर Ghachar Ghochar विवेक शानभाग Vivek Shanbhag

कन्नड-इंग्रजी लेखक विवेक शानभाग यांची ‘घाचर घोचर’ ही बहुचर्चित कादंबरी. तिचा मराठी अनुवाद अपर्णा नायगांवकर यांनी केला असून तो नुकताच मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित झालाय. मुंग्यांचा बेसुमार त्रास असलेल्या घरातून मध्यमवर्गीय, सुरक्षित घरात जाण्याचं एका एकत्र कुटुंबाच स्वप्न साकार होतं, पण नवीन घरात गेल्यावर भावनिक समीकरणं बदलतात, असं कथानक असलेल्या या कादंबरीतील हा काही भाग...

.............................................................................................................................................

आता माझा विषय सुरू करतो. पण घरातल्या सगळ्यांना बाजूला सारून माझ्याविषयी बोलणं हे काम कठीणच आहे. कारण विषय कसाही, कुठूनही सुरू केला तरी आई, मालती आणि माझी पत्नी अनिता या तीन स्त्रिया त्यात डोकावणारच. कधी कधी क्षणार्धात त्या एकीपेक्षा एक भयंकर रूप धारण करतात, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. या तिघीही दिवसभर आपल्या जिभेला धार लावण्याचं काम करत असतात, अशी माझी समजूत आहे. एक छोटंसं उदाहरण देतो. त्यावरून तुम्हाला त्यांच्या ताकदीची कल्पना येईल. एकदा सकाळी आंघोळ वगैरे आटोपून न्याहारीसाठी येता येता, ‘आज नाश्त्याला काय केलंय?’ असा प्रश्न विचारला व इथूनच सुरुवात झाली. आई म्हणाली, ‘तुला आवडतात म्हणून वालाचे दाणे घालून उप्पिट बनवलंय.’

या सरळ उत्तरात एक बॉम्ब होता हे कोणाच्याही लक्षात येणं शक्य नाही. पण या घरात राहणाऱ्या मला माझ्या साध्या प्रश्नाला मिळालेल्या सरळ उत्तरातून केवढा मोठा गोंधळ निर्माण होणार आहे याची कल्पना होती. आईच्या त्या उत्तरानंतर घरातून जास्तीत जास्त लवकर बाहेर पडता यावं म्हणून पटापट तयार होऊ लागलो. भराभर कपडे चढवले, पण तेवढ्यात माझं नशीब कडमडलं.

‘बाजीराव, तुम्ही पायावर पाय ठेवून खात बसा. आम्ही सगळे उपास करणार आहोत,’ असं सगळ्यांना ऐकू जाईल अशा आवाजात अनिता म्हणाली. तिला वाल पाहिल्यावरच उलटी यायची. खाणं तर दूरची गोष्ट. मला वाल आवडायचे ही गोष्ट खरी होती, पण ते नसते तर काही बिघडलं नसतं. पण जेव्हापासून अनिताला ते आवडत नाहीत असं आईला कळलं, तेव्हापासून बाजारात वाल आले रे आले की ते आणून आई वापरायला सुरुवात करायची. कारण स्वयंपाकाची जबाबदारी तेव्हा आईकडे होती. घरात सून आली होती, मुलगी नवऱ्याचं घर सोडून परत आली होती व इथेच तळ ठोकून बसली होती. तरीही स्वयंपाकघर आईच्याच ताब्यात होतं. आणि यात वावगं असं काहीच नव्हतं. तिला दुसरं काही करायला जमत नसे. अनिताला स्वयंपाक करायला आवडतच नव्हता. येत नव्हता असं नाही. पण आवड नव्हती हे खरं.

ती सासरी नीट नांदली असती तर आपल्या घरातलं वातावरण वेगळंच राहिलं असतं, असं अनिता मालतीला उद्देशून म्हणायची, तेव्हा तिला वरवर विरोध दाखवला तरी मनातून मी सहमत असायचो.

असो. ‘बाजीरावासारखे पायावर पाय टाकून बसा’ हे उद्गार माझ्यासाठी नसून आईला उद्देशून होते. माझ्याजवळ तुच्छतेनं वागलं, बोललं, माझ्या आळशीपणाचा, वेळकाढूपणाचा उद्धार केला की आईची चिडचीड होते, हे अनिताला माहीत होतं. त्यातच माझी मिळकत शून्य आहे, हे मी तिला लग्नाचा वेळी नीटपणे सांगितलं नव्हतं, हा तिचा आक्षेप होता. या तिघीत एकीच्या बोलण्यावर दुसरी बोलू लागणं हा पहिला टप्पा असायचा. हे म्हणजे हवेत गोळीबार करून युद्धाला आव्हान देण्यासारखं असायचं. समोरच्या पार्टीची भांडणाची कितपत तयारी आहे याचा अंदाज घेऊन भांडायचा उत्साह आहे की नाही, हे चाचपलं जायचं. समोरच्याला भांडायची खाज असेल तर पलीकडून स्वगत बोलल्यासारखं उत्तर यायचं.

‘एकेकाच्या आवडीचा पदार्थ करून हातात द्यायला घरात इतकी माणसं कामाला आहेत, असं वाटतंय सगळ्यांना,’ इति आईचं स्वगत.

आता अनिता काय स्वस्थ बसणार; तिने नणंदेला भांडणात खेचलं. ‘घर म्हणजे धर्मशाळा झाली आहे नुसती. आल्या गेल्याला घरात ठेवून घेतलं तर असंच होणार. प्रत्येकाने आपापल्या घरी असावं हे उत्तम,’ हे सासर सोडून आलेल्या मालतीला उद्देशूनच होतं. आता आई आपल्या बाजूने बोलते आहे की नाही, याचा अंदाज घेत मालती थोडा वेळ गप्प होती. अर्थात आई तिच्या मदतीला आली नसती तरी मालतीच्या जिभेमध्ये स्वसंरक्षणासाठी पुरेपूर ताकद होती. ‘धर्मशाळा कसली? घर म्हणजे कोठी झाली आहे. लगाम घालणारा नवरा घरात नसेल तर बायका अशाच खिडकीत उभ्या राहतात.’

मालतीनं मारलेला हा बाण मला व अनिताला एकदमच लागला. समोरच्या घरात राहणाऱ्या चंद्रशेखर नावाच्या गृहस्थाबरोबर अनिताची मैत्री होती. त्याला उद्देशूनच मालतीचं हे वक्तव्य होतं. दोघे कॉलेजमध्ये एकत्र होते. तो अनिताच्या माहेरकडचा माणूस होता. त्यांच्यामध्ये तसं काही नव्हतं हे मला माहीत होतं. माझ्या मनात त्यांच्याविषयी काहीच संशय नव्हता, पण हीच गोष्ट अनिताला आणि मालतीला वेगवेगळ्या कारणांनी असह्य होत असे. आता अनितानं आप्पांनाही भांडणात ओढलं.

‘हू, विनोद करायलाही प्रतिभा असावी लागते. तोंडाला येईल ते बोलत सुटलं तर कोणाला हसू येईल का? ते रक्तातच असावं लागतं,’ इति अनिता.

हे साधं सरळ वाक्य होतं असं समजू नका. या वाक्बाणाच्या टोकावर दिसणारा सरळ अर्थ येथे अभिप्रेत नाही. तो मनाला टोचल्यासारखा आठवत राहतो. आमच्या आप्पांच्या व्यक्तिमत्त्वात असलेली उणीव अनिताच्या बोलण्याचा रोख होती. ते बोलता बोलता जोक करायचा प्रयत्न करत, पण ते हास्यास्पद ठरत असे. अलीकडे तर त्यांनी केलेल्या विनोदावर कोणीच हसत नसे. इतकंच काय पण त्यांच्या विनोदावर ते स्वत:ही हसत नसत. हसण्याची शक्तीच ते गमावून बसले होते. आपल्याकडे कोणाचंही लक्ष नाहीये, हे त्यांना कळायचं. आता ते कसंबसं क्षीण असं हसत. हल्ली डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना मानसोपचार सुरू होते. अनिताचं बोलणं त्या अनुषंगानं होतं. अनिताच्या बोलण्यातील हा सगळा अर्थ बाहेरून कोणाच्याही लक्षात येणारा नव्हता. पण जिथं पोचायला हवा, तिथं ते पोचत होता. आप्पांच्या कानावर हे पडू नये म्हणून आमची चाललेली धडपड पाहून अनिताला आतल्या आत उकळ्या फुटायच्या. माझ्या भविष्यासाठी आप्पांनी काहीच केलं नाही, म्हणून मी आज अशा अधांतरी अवस्थेत आहे, हे तिला माहीत नव्हतं थोडंच? स्वनाशाचा प्रयत्न ती स्वतःच करत होती, त्याला मी काय करणार?

या अशा बोलण्यानं रणधुमाळीला सुरुवात झाल्यावर मग काय? मी उप्पिट खाल्याशिवायच घाईघाईनं बाहेर पडायचो आणि त्या कॉफी हाउसमध्ये येऊन बसायचो. कटलेट आणि कॉफी घेऊन आलेल्या विन्सेंटला ‘काय विन्सेंट, काय बातमी?’ असं विचारल्यावर ‘सगळ्याच घरातल्या डोशांना छिद्रं असतात सर,’ असं तो म्हणायचा. त्या दिवशीचा घरात घडलेला प्रसंग माहीत नसताना तो असं बोलायचा यावर मी कसा विश्वासा ठेवावा? त्यानं दिलेली कॉफी पिता पिता, मी घरातून बाहेर पडल्यानंतर तिथं काय काय घडलं असेल याचा विचार करू लागायचो.

दिवसाउजेडी घरात काय काय घडू शकतं याची मी फक्त कल्पना करू शकत होतो. कारण सकाळी कॉफी हाउसमध्ये येऊन माझा दिवस सुरू व्हायचा तो काळोख पडल्यावर परत जाईपर्यंत. ऑफिसला जाणाऱ्या लोकांप्रमाणे दिवसभर घराबाहेर राहून वेळ काढण्याचं काम मी श्रद्धेनं करत असे. आधी मी असा नव्हतो. मी शिकत असताना चिक्कप्पा एकदा म्हणाला होता, ‘तुझं शिक्षण पूर्ण झाल्यावर आमच्या बरोबर कामाला ये. व्यापार वाढवण्याविषयी काही योजना तयार कर. एखाद्या बावळटाच्या हाताखाली कामाला जाऊ नकोस.’ माझं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यावर, सोना मसालाच्या ऑफिसमध्ये मला एक पद देऊन एक केबिनही दिली होती. पण मी सोना मसालामध्ये काम केलं नाही आणि एखाद्या बावळटाच्या हाताखालीही काम केलं नाही. खरं सांगायचं तर मी काही कामच करत नव्हतो. अशा प्रकारच्या जीवनशैलीत मी कधी व कसा अडकलो गेलो, याचं मागे वळून पाहता मलाच आश्चर्य वाटतं. पहिल्यापहिल्यांदा, चांगलं शिकून चांगली नोकरी मिळवण्याकरिता, घरातून दिवसातून एकदा तरी उपदेश ऐकावा लागत होता. एकदोन वर्षांत ते कमी झालं. मी शिकूनही कुटुंबाच्या अपेक्षांचा भंग केला होता. मी सोना मसालामध्ये चिक्कप्पाला मदत करेन, असं कोणीही न सांगताच घरातल्या सगळ्यांना वाटत होतं. पण मला मात्र तिथं काही करणं जमलं नाही. कारण मी तिथं कंटाळून जायचो. खरं तर माझी तिथं गरजच नव्हती. सगळं काम, सगळा व्यवहार चिक्कप्पाच पाहात होता. पहिल्या दिवसापासूनच माझ्या हे स्पष्टपणे लक्षात आलं होतं. तिथं जातच होतो म्हणून काही छोटी-मोठी कामं मला तो द्यायचा. कधी कधी माझ्या अज्ञानामुळे नको तिथं नाक खुपसून माझे हात पोळून घेत होतो. शेवटी काय तर कोणताही निर्णय हा त्याला विचारल्याशिवाय होत नसे. यामुळे मी तिथं सहा महिन्यांपेक्षा जास्त काम करू शकलो नाही. हळूहळू मी तिथल्या कामातून काढता पाय घेतला.

तरीही माझं स्वाभिमान सांभाळण्याचं काम माझ्या कुटुंबियांचंच नव्हतं का? लग्न झाल्यानंतर बायको समोर असताना वडिलांकडे पैशांसाठी हात पसरणं हे अपमानास्पद नाही का? तशी दर महिन्याला माझ्या खात्यात ठरावीक रक्कम जमा केली जायची. हे आजही चालू आहे. असे आयते पैसे मिळाल्यावर कोण काम करायला जाईल? पण या तत्त्वाला चिक्कप्पा अपवाद होता. सतत काम करत राहणं हा त्याच्या जीवनाचा मंत्र होता.

माझी दिनचर्या अशी होती. सकाळी आंघोळ, न्याहारी आटोपून, अगदी वेळेवर तयार होऊन बाहेर पडायचं आणि थेट कॉफी हाउस गाठायचं. तिथून कारखान्यात जायचं. तिथले तीन ताजे पेपर संपूर्ण वाचून काढायचे. नंतर तिथंच जेवण करून, माझ्या खोलीतल्या सोफ्यावर छोटीशी डुलकी काढायची. उठल्यावर चहा घ्यायचा आणि उन्हं उतरू लागली की, पुन्हा कॉफी हाउस. तिथं काही वेळ काढल्यावर मनाला येईल तेव्हा घर गाठायचं. कारखान्यात माझ्या खोलीत कोणी येत नसे. मी पोचण्यापूर्वी खोली स्वच्छ करून ठेवलेली असे. माझ्याजवळ कोणाचं काही काम नसायचं. माझ्या खोलीत कोणी येत नसे व मी खोलीबाहेर पाय ठेवत नसे. माझं व्हिजिटिंग कार्ड मात्र दर वर्षी नव्यानं छापलं जायचं. चिक्कप्पा बोट ठेवेल तिथं सही करायची एवढंच माझं काम होतं. अशा प्रकारचा त्या संस्थेचा डायरेक्टर होतो मी.

माझ्या लग्नाचं पाहायला लागले तेव्हा मी काही नको म्हटलं नाही. कारण एक-दोन प्रेमप्रकरणं चालू होती, पण कुठेच पाऊल पुढे पडलेलं नव्हतं. त्यातल्या त्यात जवळीक होती ती चित्राजवळ. मालतीचं लग्न असं परिस्थिती कठीण होऊन संपुष्टात आल्यापासून आई माझ्याविषयी जरा जास्त जागरूक झाली होती. श्रीमंतांजवळ संबंध नको, अशा निर्णयापर्यंत आली होती. अखेर हैदराबादेत राहणारी कॉलेज लेक्चररची मुलगी अनिता हिचा प्रस्ताव स्वीकारण्यायोग्य वाटला. हा प्रस्ताव श्रीपतीनं आणलेला होता. मला चांगलं आठवतं, त्या दिवशी गुरुवार होता. सकाळी दहाच्या सुमारास मी बाहेर पडणार इतक्यात तो आला.

‘थांब, जाऊ नको. तुझ्याजवळ थोडं बोलायचंय,’ असं म्हणून नंतर आईकडे जाऊन बोलू लागला. ‘राघवेंद्र स्वामींच्या मठात गेलो होतो, तिथं बातमी कळली.’ अशा गप्पा मारता मारता आरामात डोसे खाऊन झाल्यावर, शेवटी त्यानं लग्नाचा प्रस्ताव पुढे ठेवला.

‘बघा, मुलगी सोन्यासारखी आहे. बीए झालेली आहे. तिचे वडील युनिवर्सिटीत नामवंत लेक्चरर आहेत. हैदराबादमध्ये राहतात. मुलगी माझ्या वहिनीच्या भावासाठी म्हणून बघितली होती, पण तो अमेरिकेतून आलाच नाही. त्यानंतर भलतीच बातमी कळली. त्यानं तिकडेच लग्न केलंय, असं काही तरी. खरं काय ते तो आल्यावरच कळेल. तुमचा होकार असेल तर मुलीच्या वडिलांजवळ बोलतो. ते हो म्हणतीलच अशी काही मी गॅरंटी देत नाही. आताचा काळ वेगळा आहे. पहिल्यासारखं राहिलेलं नाही.’

फोटो पाहिल्यानंतर मला माहीत असलेल्या सगळ्या मुलींपेक्षा ती चांगली वाटली. आता सगळं बाणाच्या वेगानं सुरू झालं. तिचं दुसऱ्या कुठेही जमण्याअगोदर तिला गटवली पाहिजे, असा विचार मनात येऊ लागला. जाऊन मुलगी तर पाहून येऊया, अशी बोलणी सुरू झाल्यावर चित्राची आठवण येऊन, मुलगी व मुलगा दोघांनीही एकमेकांना पाहिलं पाहिजे, असं श्रीपतीला दुरुस्त केलं.

‘हो हो, कळलं. आजच्या काळात फक्त मुलाला विचारून लग्न ठरवणं शक्य आहे का? तुमची जोडी छान जमेल. तिच्या वडिलांनाही तसंच वाटतंय,’ इति श्रीपती.

रविवारी आम्ही सगळे गाडी करून हैदराबादला जायला निघालो. आमच्याबरोबर श्रीपती होताच. एका हॉटेलमध्ये तिच्या घरच्यांबरोबर ती येणार होती आणि त्या भेटीनंतर त्याच दिवशी लग्नाचं नक्की होणार होतं. अनिताला घेऊन मी होटेलच्या रेस्तराँमध्ये गेलो. तिथं कॉफी प्यायलो. एवढाच आम्हाला मिळालेला एकांत. परत येताना आम्ही लग्नाची तारीख नक्की करूनच आलो. सगळं स्वप्नात घडावं असंच घडत होतं. परत येताना सगळेच गाडीत गप्पा मारत होतो. अनिताचे वडील कसे आदर्शवादी आहेत, याचं श्रीपति वर्णन करत होता. आम्ही दोघं कॉफी प्यायला गेलो, तेव्हा त्यांचं झालेलं बोलणं आईला लागलं होतं. बोलता बोलता त्यांनी ‘तुम्ही वरदक्षिणा मागणार असाल तर आम्ही मुलगी देणार नाही,’ असं सांगून टाकलं. त्यावर ‘आम्ही वरदक्षिणा घेणारच नाही,’ असं सांगून त्यांच्या मोठेपणावर मात करताना आईला थोडं अपमानास्पद वाटलं होतं.

कॉफी पिऊन बाहेर पडताना अनितानं पुढच्या आठवड्यात बेंगलोरला येणार आहे असं सांगितलं. पण आम्ही तेथून निघल्यानंतर दोन दिवसांतच तिच्या आप्पांना हृदयविकाराचा झटका आल्यानं तिला तिथंच थांबणं भाग पडलं. त्यामुळे कॉफी पिताना तिच्याबरोबर वेळ घालवला तेवढाच. त्यानंतर परत आम्ही भेटलो एकदम लग्नाच्या दिवशी. मध्येमध्ये आम्ही फोनवर बोलायचो. ‘तू केव्हा येणार?’ असं तिला रोमँटिकली विचारल्यावर ‘लगेच’ असं उत्तर अपेक्षित असताना ‘लग्नाच्या आदल्या दिवशी’ या तिच्या उत्तरानं मी नाराज झालो होतो. तरीही ‘लगेच ये’ असं तिला म्हणालो. ‘आता कशी येणार’? असं म्हणताना तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. पण असं घडल्यामुळे तिला लग्नाबद्दल ओढ, उत्कंठा आहे हे माझ्या लक्षात आलं.

लग्नाचा दिवस माझ्यासाठी अगदी अनमोल असा होता. आज माझ्या आयुष्यात एका स्त्रीचा प्रवेश होणार होता. आजपर्यंत मी तिचा हातसुद्धा धरला नव्हता. आज लग्नाच्या दिवशी, अशा लग्नात असणाऱ्या विधींमुळे रोमांचक व उत्कट असे क्षण अनुभवता आले. लग्नविधी म्हणजे एक शास्त्र अशा दृष्टीनं पाहणाऱ्यांना ते कळणार नाही. हे असं सगळं मी सांगायला लागलो तर ते हसतील आणि कोल्ह्याला द्राक्षं आंबट अशी स्थिती होईल. असो, हे सगळं माझी इच्छा म्हणून घडलेलं नव्हतं. पण मला घेता आलेले हे खास असे अनुभव तुम्हाला सांगावेसे वाटले म्हणून त्या दिवसाचं वर्णन करताना तपशिलात जातोय. तसेही लग्नाच्या दिवशीचे सगळे बारीकसारीक विधी नष्ट होत चालले आहेतच. लग्न ठरल्यापासून तो प्रत्यक्ष लग्नाचा दिवस या मधल्या काळात मी सतत तिचा फोटो पाहत असायचो. असं पाहता पाहता अधीर होऊन तिला फोन करायचो. माझ्याकडे तिचे दोन फोटो होते. हे दोन्ही फोटो त्या दिवशी श्रीपतीनं दिले होते. एका फोटोत ती गुलाबी साडी नेसून उभी होती. थोडे कुरळे केस, दाट भुवया, रुंद खांदे. ती कॅमेऱ्याकडे रोखून पाहत असावी, असं वाटत होतं. दुसरा सलवार कमीज घातलेला. खिडकीतून बाहेर पाहत उभी आहे असा. तिनं एका हातानं खिडकीचा गज पकडला होता. खिडकीतून येणाऱ्या सूर्यकिरणांमुळे तिचा चेहरा उजळून उठला होता. एका बाजूनं फोटो काढलेला असल्यानं, नाकाला शेंड्याजवळ असलेला थोडा बाक लक्षात येत होता. हाच फोटो मला जास्त आवडला होता. खांद्यावरील ओढणीच्या आत लपलेल्या तिच्या उभार यौवनाची कल्पना करता येत होती. तो फोटो पाहिल्यापासूनच माझ्या मनात वेड्यासारख्या भलभलत्या कल्पना येऊ लागल्या होत्या. तिच्या नाकाचा शेंडा किती सेक्सी आहे असं वाटत होतं. चित्रा म्हणायची तेच खरं होतं. पुरुषाचं लक्ष स्त्रीच्या फक्त शरीराकडे असतं. दुसरं काही त्याला दिसतच नाही. चित्राला पुरुषाचं मन चांगलं कळत असे. लग्नाच्या दिवशी पाहिलं तर अनिता माझ्या कल्पनेपेक्षाही खूप सुंदर दिसत होती. तिचं व्यक्तिमत्त्व वेधक होतं. तिचे दाट केस कमरेपर्यंत लांब होते. तिनं हलक्या गुलाबी रंगाची लिपस्टिक लावली होती. पहिली संधी मिळाली तेव्हा तिनं नेसलेल्या गडद निळ्या रंगाच्या साडीच्या पदराकडे मी चोरून पाहिलं होतं. लग्नात एक-दोनदाच बोलणं शक्य झालं होतं. तेही, ‘धूर खूप झाला आहे नं? तो रागावलेला कोण आहे? तुझे वर्गमित्र का?’ अशी छोटी छोटी वाक्यं. पण त्यातही काहीसं आकर्षण होतं. लग्नविधी चालू असताना, तिचा हात धरताना स्पर्शातून रोमांच उभे राहत होते. मंगळसूत्र घालताना तिच्या गळ्याभोवती हात टाकले, तेव्हा तिच्या खूपच निकट असल्यानं तिच्या शरीराचा गंध तीव्रतेनं जाणवला. तिनं माळलेल्या गजऱ्यांच्या दाट अशा सुगंधात मिसळलेला ‘तो’ गंध व तिचं सान्निध्य. मी अर्धा क्षण स्वतःलाच विसरून गेलो. ती मात्र खाली मान घालून उभी होती. तिच्या गालावर हळदीचं तेज दिसत होतं. मंगळसूत्राचा फासा लावताना तिच्या मानेच्या मागील भागाला माझ्या बोटांचा स्पर्श झाला होता.

जेवणाच्या वेळीही असंच झालं. तिला गोडाचा घास भरवला, तेव्हा माझ्या बोटाला झालेल्या तिच्या खालच्या ओठाच्या स्पर्शानं उत्तेजित झालेलं माझं मन काबूत आणायला, मला बराच वेळ लागला होता. मी त्या उत्तेजित अवस्थेत असतानाच ती मला जिलबीचा घास भरवू लागली. त्यावेळी मी तिचा हात धरून, बोटं चावण्याचा अभिनय केला, तेव्हा तिथं जमलेल्या तरुण मुलींनी, माझे रोमँटिक हावभाव पाहून ‘सो स्वीट’ असं म्हणून मला आणखी प्रोत्साहन दिलं. मी केलेल्या मूर्खपणानं मला चांगलंच संकटात टाकलं होतं. हे क्षण कॅमेऱ्यात पकडण्यासाठी उत्सुक असलेल्या फोटोग्राफरनं परत एकदा घास द्या, असा आग्रह धरला. जेवायला बसल्यावर त्यांच्याकडच्या लोकांचा मोठा घोळका तिथं आला आणि अनितानं ओळीनं सगळ्यांचा परिचय करून दिला. नंतर सगळ्या वडीलधाऱ्यांना बोलावून, प्रत्येकाला खुर्चीवर बसवून, आम्ही त्यांच्या पाया पडलो. या सगळ्या गोष्टी रीतीनुसार पार पडल्यावर संध्याकाळी आम्ही घरी आलो, तेव्हा पार थकून गेलो होतो. अति उत्साह दाखवत प्रत्येक गोष्टीत नाक खुपसणारे पाहुणे घरी आले नव्हते हे भाग्यच होतं. म्हणून तर आरामात रात्रीचं जेवण करता आलं. नंतर माडीवरच्या माझ्या खोलीत मी प्रवेश केला.

मी ‘त्या’ रात्रीसाठी घेतलेला कॉटनचा झब्बा घातला. खोलीत आल्यापासून पुढील साध्य करावयाच्या गोष्टींचा विचार मनात घुसला. तिच्या चेहऱ्याकडे थेट पाहायला मला थोडा संकोच वाटत होता. अगदी सहजच, असं दाखवून मी दार लावून घेतलं. हळूच कडी घातली. असं करताना घरातले काय म्हणतील असं मनात आलं. दाराच्या बाजूला भिंतीवर असलेलं दिव्याचं बटन दाबून मी दिवा घालवून टाकला. पण खिडकीतून रस्त्यावरच्या दिव्यांचा प्रकाश खोलीत येत होता. त्यामुळे खोलीत दाट असा अंधार नव्हता. या हलक्या अंधारात हळूहळू अस्पष्ट असं दिसायला लागलं. ती पलंगाजवळ उभी होती. मी तिच्या अगदी समीप जाऊन उभा राहिलो. तिच्या अंगाचा गंध मला आकर्षित करत होता. एक क्षण पुढे काय करावं हे मला सुचत नव्हतं. शेवटी माझा उजवा हात तिच्या डाव्या खांद्यावर ठेवला. लग्न झालं होतं म्हणूनच तिला स्पर्श करण्याचं धैर्य माझ्यात आलं होतं. नंतर हात खाली घेत मी तिचा दांड पकडला व तिला माझ्याकडे वळवलं. तिनेही आढेवेढे घेतले नाहीत. आता आम्हा दोघांमध्ये काहीसा मोकळेपणा आला होता. तिचा स्पर्श, तिच्या अंगाचा गंध, तिनं माळलेल्या गजऱ्यांचा घमघमाट आणि ती माझ्या मिठीत असल्याचा भास. माझ्या मानेला पुन्हा पुन्हा स्पर्श करणारे तिचे ओठ मी माझ्याकडे वळवले.

अजूनपर्यंत अगदी अपरिचित असलेली एक स्त्री स्वइच्छेनं, काया वाचा मने करून तुमच्यावर इतकं प्रेम करते यातील सुख कितीही सांगितलं तरी संपणारं नाही. कुठून आलेली, अनोळखी मुलगी माझी आहे ही भावना निर्माण झाली, त्या क्षणाचं वर्णन करणं मला तरी शक्य नाही. बहुधा पारंपरिक लग्न पद्धतीतच या क्षणांचा उगम असावा. एक अनोळखी स्त्री आपल्या अधिन होते व सर्वस्व अर्पण करते आणि आपल्यालाही असंच तिच्या अधिन व्हावंसं वाटतं, असा रोमांचकारी अनुभव दुसरा नाही. त्या अनुभवाचं वर्णन कसं करावं? तिनंही माझ्यावर हक्क दाखवून माझ्या प्रेमाचा स्वीकार करावा असं वाटणं, ही भावना भाषेत मांडणं मला शक्य नाही. खरं तर यासाठी भाषेची गरजच नाही. कोणत्याही भाषेशिवायच जाणावयाची गोष्ट आहे ती. तरीही ते अनुभवलेले क्षण भाषेत व्यक्त करता येत नाहीत म्हणून माझा कोंडमारा होतोय. अशाच प्रकारच्या उत्कट भावना तिच्या मनातही निर्माण झाल्या असाव्यात. माझ्या छातीवर आपलं डोकं ठेवून, दोन्ही हातांनी मला बिलगून, तिनं पुढे जाण्यासाठी मला संकेत दिले. तिचा चुडा माझ्या पाठीला टोचत होता. अशी ही सुखंयिनी, अपरिचित स्त्री हळूहळू ओळखीची वाटू लागावी यासारखं अन्य सुख कोणतं? यानंतर मी पुन्हा त्या क्षणासाठी संधी शोधत होतो, पण ती मिळाली नाही. बहुधा जीवनात एकदाच मिळणारं असं हे सुख होतं. बुजरेपणा, समर्पणाची भावना, अवलंबित्व, करुणा, हक्काचं प्रेम अशा हजार भावनांच्या मिश्रणातून निर्माण झालेला तो क्षण, पुन्हा अनुभवण्यासाठी पुनर्जन्मच घ्यायला हवा.

मी विचारही केला नव्हता इतकी ती माझ्या जवळ आली होती. माझ्या छातीवर विसावलेला तिचा चेहरा वर उचलून मी तिचं चुंबन घेत असताना, मला तिच्या ओठांमधून, तिच्यात उद्भवलेली नवीन भावना, नवी ओढ जाणवली.

लग्नानंतर तीन दिवसांनी आम्ही हनिमूनसाठी उटीला गेलो. उटीला जायला आम्हाला थोडा त्रास होणार होता. खरं तर हनिमूनसाठी कुठे हवं तिथं जाण्याइतके पैसे माझ्याकडे होते! पण कॉलेजच्या दिवसांपासून ते तरुणपणीच्या रोमँटिक स्वप्नांचा व उटीचा अगदी जवळचा संबंध होता. तो मोडीत काढणं मला शक्य झालं नाही. त्यामुळे आम्ही उटीला आलो. अनिता त्याबद्दल नाराज नव्हतीच. उटी काय किवा म्हैसूर काय, तिला सारखंच होतं.

उटीमध्ये आम्ही ‘ग्रीन व्हॅली’ हॉटेलात उतरलो होतो. आमची बस रस्त्यात बिघडली व पहाटेच्या ऐवजी आम्ही दुपारी बाराच्या सुमारास उटीला पोहोचलो. हॉटेलच्या रूममध्ये जाऊन दरवाजा लावून घेतल्यावर, घरापासून दूर असल्यानं, पहिल्यांदाच आम्हाला खरा एकांत मिळाला. मिळालेली संधी फुकट न घालवता मी अनिताला जवळ घेतलं. तिनंही कांगावा न करता, मिळालेला एकांत अधिक रोचक बनवला.

स्नान, जेवण आटोपून आम्ही डोंगरावर फिरायला गेलो. दिवस उतरणीला लागल्यावर हवेत गारवा आला व वातावरण खूपच आल्हाददायक बनलं. चालताना कधी मी तिचा हात धरत होतो, तर कधी तिच्या कमरेभोवती हात टाकत होतो. त्यामुळे उत्तेजित होऊन तिला हॉटेलवर घेऊन जाण्याकरिता अधीर होऊ लागलो होतो. परंतु व्हॅनमध्ये आणखी चार जोडपी होती. त्यांना सोडून परत जाता येणार नव्हतं. आम्हाला हॉटेलवर यायला अंधार झाला. आल्या आल्या मी भुकेलेल्या वाघाप्रमाणे अनितावर तुटून पडलो. क्षणार्धात तिला उचलून पलंगावर ठेवली. परंतु एक घोटाळा झाला. तिच्या सलवारीच्या नाडीची गाठ सुटतच नव्हती. ती खूप प्रयत्न करत होती, पण गाठ घट्टच बसली होती. अचानक, ‘छे, ही नाडी म्हणजे घाचर-घोचर होऊन राहिली आहे. थोडं थांबा,’ असं म्हणाली. त्यावेळी काही ऐकण्याचं व्यवधान माझ्याकडे नव्हतं. ती उठून बसली व हुशारीनं तिनं नाडीची गाठ सोडवली.

नंतर दोघंही थकून बसलो तेव्हा, ‘मगाशी सलवारीच्या नाडीचं काय झालं आहे असं म्हणालीस?’ मी विचारलं.

‘घाचर-घोचर,’ ती म्हणाली.

‘ते काय असतं?’ मी हा शब्द अजूनपर्यंत ऐकलेला नव्हता.

‘घाचर घोचर,’ असं परत म्हणून ती हसली.

‘अगं, पण म्हणजे काय?’ मी.

‘ते म्हणजे तसंच असतं. तुम्हाला नाही कळणार.’ ती पुन्हा पुन्हा हसत होती. ते अगदी निरर्थक असं हसू होतं. विवस्त्र अवस्थेत असलेल्या तिला बोटानं गुदगुल्या करत ‘सांग ना, सांग ना,’ असं म्हणत छळू लागलो. थोडं वेळ थांबून ती म्हणाली, ‘याचा अर्थ माहीत असलेली फक्त चार माणसं या भूतलावर आहेत. मी, आप्पा, आई आणि माझा धाकटा भाऊ.’

तो तिच्या माहेरी तयार झालेला शब्द होता. ती नि तिचा भाऊ दोघांनी मिळून बनवलेला नवीन शब्द. लहान असताना ती व तिचा भाऊ एका संध्याकाळी गच्चीत पतंग उडवत होते. हिच्या हातात पतंगाच्या मांज्याचे गुंडे होते व ती ते फिरवत खेळत होती. आई-आप्पाही मुलांचा खेळ पाहत तिथंच बसले होते. इतक्यात गुंड्यातले दोरे एकमेकात मिसळून गुंतून बसले. ते सोडवणं मोठं कठीण काम होऊन बसलं. एका टोकाकडून सोडवायला गेलं तर दुसरं टोक हाताला लागतच नव्हतं. दोन्ही मुलं त्या गुंत्यात अडकून बसली होती. तो गुंता सुटत नसल्यानं तिचा भाऊ, रागारागानं व निराशेनं म्हणाला, ‘इथे तर सगळं घाचर घोचर झालंय’.

‘काय रे, कुठची भाषा बोलतो आहेस?’ असं म्हणून ती हसल्यावर वातावरण थोडं हलकं झालं. तेव्हापासून हा शब्द त्यांच्या कौटुंबिक शब्दकोशात रुजू झाला. पहिल्या पहिल्यांदा फक्त ती नि तिचा धाकटा भाऊच हा शब्द वापरत आणि हा प्रसंग आठवून हसत. नंतर त्या शब्दाची सवयच झाली आणि त्यांच्या आई-आप्पांच्या बोलण्यातही हा शब्द येऊ लागला. हे सगळं सांगता सांगता, अपघातात एक पाय गमावलेल्या तिच्या धाकट्या भावाची आठवण येऊन अनिता म्हणाली, ‘कोणाच्या तरी दोस्तीमुळे सगळं घाचर घोचर होऊन गेलं. तसं नसतं तर वेगानं बाइक चालवण्याचा प्रश्नच आला नसता आणि तो अपघातही झाला नसता.’

दुसऱ्या दिवशी आमच्या विस्कटलेल्या पांघरुणात तिचा व माझा पाय गुरफटला असताना मी म्हटलं, ‘पाहा, घाचर घोचर झालं आहे.’ आणि असं म्हणून हसण्याचा प्रयत्न केला. पण ती हसली नाही, मी तिची चेष्टा करतोय असं तिला वाटलं. हे शब्द तयार झाले, त्या क्षणांची आठवण काढून ती हसते, तसं मला हसता येत नाही. तिच्याप्रमाणे तो शब्द माझ्या सवयीचा होणंही शक्य नाही. माझ्या तोंडी तो कृत्रिमच वाटतो. पण तिनं या शब्दाचं गुपित माझ्याजवळ शेअर केलं आहे. कोणत्याही भाषेत नसलेली ही शब्दांची दुक्कल आता फक्त पाच लोकांनाच माहीत आहे. आणि अर्थातच त्या पाच जणांत मी एक आहे.

.............................................................................................................................................

‘घाचर घोचर’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......