दुर्गाबाई हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक धन आहे; सदसद्विवेकबुद्धीचं प्रतीक आहे!
ग्रंथनामा - झलक
अंजली कीर्तने
  • ‘बहुरूपिणी दुर्गा भागवत’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील अक्षरचना
  • Fri , 27 July 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक बहुरूपिणी दुर्गा भागवत Bahurupini Durga Bhagwat अंजली कीर्तने Anjali Kirtane

‘बहुरूपिणी दुर्गा भागवत’ हे अंजली कीर्तने यांचं पुस्तक नुकतंच मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाला लेखिकेनं लिहिलेली प्रस्तावना.

.............................................................................................................................................

वाचनवेड्या माणसांच्या मनात काही लेखकांना जिवंत माणसांसारखं स्थान असतं. ते त्यांचे सगेसोयरे असतात; सांगाती असतात. त्या लेखकांच्या साहित्याची मोहिनी चिरतरुण असते. वयाच्या, आकलनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर माणूस परत परत त्यांच्याकडे वळतो. त्यांच्या साहित्याचं परिशीलन करतो; त्यात रमतो. माझ्या मनात असे जे लेखक आहेत, त्यांपैकी एक म्हणजे दुर्गा भागवत. ‘पुष्पमंडित भाद्रपद’ हा त्यांचा लेख सातवीच्या किंवा आठवीच्या पुस्तकात होता. आजही आठवतं की, तो वाचताना मी चकित झाले होते. दुर्गाबाईंचं बोट धरून त्या  भाद्रपदातून हिंडून आले होते; फुलं वेचली होती. त्यानंतर मी अर्थातच ‘ऋतुचक्र’ वाचलं, तेव्हा दुर्गाबाई मला खूप जवळच्या, अगदी घरातल्या वाटल्या. याला कारण होतं. ज्या परिसरात मी राहात होते, तो परिसरही पुष्पमंडित होता. मुंबईतल्या पूर्व माटुंग्याचा विभाग; किंग्ज सर्कल या नावानं ओळखला जाणारा. घरासमोर खालसा कॉलेजचं मोठं थोरलं मैदान. घराजवळून जाणारा शांत वृक्षाच्छादित रस्ता पार पार्शी कॉलनीतल्या पाचबागांपर्यंत जाणारा. दिवसादेखील तिथे झाकोळ असे.

दुर्गाबाईंची पुस्तकं वाचण्यापूर्वीच बहावा, रेन ट्री, मुचकुंद, पोपटी शिरीष, अशोक, लॅबर्नम, कामिनी, कॅशिया, सुबाभूळ, तुती यांसारखी दुर्गाबाईंच्या साहित्यातील झाडं माझ्या भावजीवनाचा अविभाज्य भाग बनलेली होती. गॅलरीत बसून मी ज्येष्ठातलं मेघमंडळ आणि सुरूच्या उंच झिपऱ्या झाडामागून उगवणारं पौर्णिमेचं सोनकांती चंद्रबिंब पाहिलं होतं. घरासमोरच्या मैदानात हैदोस घालणारा घनघोर आषाढी पाऊस, उन्हात रंगलेला श्रावणी पाऊस आणि पावसाळी पाण्यामुळे फूटपाथवर वाहणारे मैदानातल्या तांबड्या मातीचे पाट मी नवलाईनं पाहिले होते. वाऱ्यावर डोलणाऱ्या गवताच्या हिरव्या, पोपटी, किरमिजी, सोनेरी अशा रंगच्छटांची धावरी चित्रलिपी वाचली होती. पाऊस खूपच पडला, तर हिरव्यागर्द मैदानाचं रूपांतर तळ्यात व्हायचं; त्यात पाखरं डुंबायची. निसर्गाचं हे नाट्य माझ्या बाळडोळ्यांत तुडुंबलेलं होतं. याच निसर्गाविषयी सुंदर मराठीत लिहिणाऱ्या दुर्गाबाई मला माझ्याच परिसराची गोष्ट सांगत होत्या, म्हणूनच त्या मला खूप जवळच्या वाटल्या. पर्ल बक या अमेरिकी लेखिकेचा अपवाद वगळता, अन्य कोणत्याही लेखकाशी जुळलं नसेल असं भावोत्कट नातं दुर्गाबाईंशी गुंफलं गेलं.

आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर दुर्गाबाई पुन:पुन्हा भेटत राहिल्या. दुर्गाबाई म्हणजे केवळ ‘ऋतुचक्र’ नाही. दुर्गाबाई म्हणजे आणखी खूप काही आहे, हे कॉलेजमध्ये जाईस्तोवर मला उमगलं. या नात्यातील एक गंमत म्हणजे, माझ्या मनानं किशोरवयात गुंफलेलं ते एकतर्फी प्रेमाचं नातं होतं. ते नातं इतकं नाजूक आणि कोवळं होतं की, ते उमलत असताना मला वास्तवातल्या दुर्गाबाईंशी परिचय वाढवण्याची गरजच कधी वाटली नाही. त्यांच्या-माझ्या भेटी झाल्या खऱ्या आणि त्याचे सुंदर ठसेही मनावर उमटले; मन आनंदानं मोहरलंही, पण त्या भेटी  स्वयंप्रेरणेनं नव्हे, तर कोणाच्या तरी बरोबर, काही तरी निमित्तानं झाल्या. तिथे मी समूहातली एक होते. माझ्या मनात जे काही उमलत होतं, त्यासाठी पुस्तकांतल्या दुर्गाबाई मला पुरेशा होत्या. तिथं त्या माझ्या एकटीशी बोलायच्या. त्यांच्या मनीचं गूज मला एकटीला सांगायच्या. त्यात दुसरा कोणी वाटेकरी नव्हता.

मी त्यांना अत्यंत आतुरतेनं भेटायला गेले, ते त्यांच्यावर लघुपट करायचं ठरवलं तेव्हा. मध्ये केवढा तरी काळ गेला होता. त्यांच्या-माझ्या या भेटींविषयी ‘स्मृतिकोशातील दुर्गा भागवत’ या लेखात विस्तारानं लिहिलं आहे. दुर्गाबाईंवर  लघुपट करायचं स्वप्न मी कित्येक वर्षं मनात जोपासलं होतं. दुर्गाबाई हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक धन आहे; सदसद्विवेकबुद्धीचं प्रतीक आहे. ते जपायला हवं, असं माझ्या आतून कोणीतरी तरी मला सतत सांगत होतं. त्या आतल्या आवाजाकडे दुर्लक्ष करणं मला अशक्य होतं. मात्र लघुपटनिर्मितीला आवश्यक असलेल्या पैशाच्या अभावी ते स्वप्न मनात निजून होतं. त्या स्वप्नाला जेव्हा चालना मिळाली तेव्हा दुर्गाबाईंच्या आयुष्याची भैरवी सुरू झाली होती. आणखी थोडा जरी उशीर झाला असता, तरी दुर्गाबाई माझ्या हातांतून निसटून गेल्या असत्या.

मात्र तसं झालं नाही. त्यांच्या-माझ्या प्रेमकथेचं हे दुसरं पर्व होतं. आता मी लहान मुलगी नव्हते. त्यांच्याच लेखनप्रांताची रहिवासी होते; शोधयात्री होते. लेखणी माझी सखी झाली होती. पहिल्या भारतीय स्त्री-डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचं चरित्र लिहीत असतानाच मला कॅमेऱ्याचा डोळा हवासा वाटला. आनंदीबाईंची कहाणी चित्रांच्या स्वप्नफितीवर नोंदवावीशी वाटली आणि मी लघुपटनिर्मितीच्या क्षेत्रात उतरले. माझ्या आयुष्यात कॅमेरा आला म्हणून लेखणी नाऊमेद झाली नाही. या तरल मनाच्या मित्रानं तिच्यावर जादूचं पाणी शिंपडलं आणि तिला चित्रवाणी गवसली. मी कॅमेऱ्याच्या डोळ्याशी माझा मन:चक्षू भिडवून जगावं आणि लेखणीनं नोंदवावा प्रवास माझा, असा झाला होता अलिखित करार आमचा. आनंदीबाई जोशी यांच्यावरील लघुपटाच्या यशानंतर मला दुर्गाबाईंवर लघुपट करावासा वाटला खरा; मात्र पहिल्या अनुभवानंतर माझ्या लक्षात आलं की, लघुपटनिर्मिती हा एक अत्यंत महागडा छंद आहे. त्यामुळे दोन लघुपटांच्या मध्ये बराच काळ गेला.

लघुपट करायचा निर्णय एकदा घेतल्यावर, हातात दोन-दोन माध्यमं असलेली मी दुर्गाबाईंना अगदी उत्साहानं भेटले. आता वास्तवातल्या दुर्गाबाईंना भेटणं नितांत गरजेचं होतं, कारण स्वप्नातल्या दुर्गाबाईंना मी लघुपटाच्या माध्यमातून वास्तवात साकार करू इच्छित होते. या निमित्तानं मी परत एकदा दुर्गाबाईंची पुस्तकं वाचली. पूर्वी वाचलेली ही पुस्तकं आता नव्या डोळ्यांनी, लघुपटनिर्मितीच्या प्रयोजनानं आणि दिग्दर्शकाच्या वेगळ्या भूमिकेतून वाचली. डोळ्यांचा कॅमेरा केल्यावर आजवर अंधूक असलेल्या काही प्रतिमा रेखीव आणि सुस्पष्ट झाल्या. विचारांचे असे काही तरंग निर्माण झाले, जे कॅमेराच टिपू शकत होता. जीवनप्रीतीनं रसरसलेल्या या शब्दकळावंतीची शतरंगी रूपं पाहून मी मोहरून गेले. ही रूपं मी लघुपटातून टिपली.

त्या लघुपटात माझा जीव ओतला. लघुपट पूर्ण झाला, तरीही अजून दुर्गाबाईंबद्दल मला खूप काही सांगायचं शिल्लक होतं. सव्वा तासांचा लघुपट म्हणजे त्यांच्या जीवनकार्याची आणि मनोज्ञ रूपांची झलक होती. त्यांच्या साहित्याचं व चरित्राचं संशोधन करत असताना अशा किती तरी गोष्टी प्रत्ययाला आल्या, ज्यांचं प्रकटीकरण करण्यासाठी शब्दमाध्यम आवश्यक होतं. रानात बिनभांड्यांचा स्वयंपाक करणाऱ्या रांधणप्रेमी दुर्गाबाई; संशोधनात रमलेल्या दुर्गाबाई; शब्दकळावंती दुर्गाबाई; सौंदर्यासक्त दुर्गाबाई… माझ्या लघुपटांतील अशा एकेका प्रतिमेत मला एकेक लेख लपलेला दिसू लागला. त्यांच्या बहुरूपांचं चिंतन-मनन करणं; विवेचन-विश्लेषण करणं; त्यांच्या साहित्याचा, जीवनाचा आणि नातेसंबंधांचा अन्वय लावणं; त्यांच्या संदर्भात मनात उद्भवलेल्या अनुत्तरित प्रश्नांचा माग काढणं हे सारं करण्याची ओढ लघुपट करताकरताच माझ्या मनात निर्माण झाली. या टप्प्यावर त्यांच्या माझ्या नात्यानं कात टाकली. मला दुर्गाबाईंचा माणूस म्हणून विचार करायचा होता. त्यांच्या गुणदोषांसकट त्यांना समजून घ्यायचं होतं. हा नवा प्रवास काही वर्षांचा असेल, याची मला जाणीव होती.

दुर्गाबाईंचं मला सर्वांत जास्त लोभवणारं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा ध्यासवेडेपणा; त्यांच्यातलं चैतन्य. भोंडल्याच्या गाण्यातली कमळाच्या पाठीमागे लागली राणी ही ओळ वाचताना मला दुर्गाबाईंची आठवण होते. कमळाची भुरळ पडलेल्या राणीसारख्याच त्या कोणत्या ना कोणत्या ध्यासानं, छंदानं, कल्पनेनं अथवा एखाद्या शब्दानंसुद्धा भारल्या जात. दुर्गाबाई हे एक झपाटलेलं झाड होतं.

जानेवारी २००२च्या ‘ललित’ मासिकात पुण्याच्या डॉ. आसावरी गोखले यांनी दुर्गाबाईंवर ‘वेड्या दुर्गाबाई’ नावाचा लेख लिहिला होता. त्यांची आठवण इथं सांगण्यासारखी आहे. त्या एकदा खास दुर्गाबाईंना भेटण्यासाठी पुण्याहून मुंबईला आल्या. दुर्गाबाईंचं वय बरंच असल्यानं अंथरुणावर झोपलेली वृद्ध मूर्ती पाहण्याच्या तयारीत त्या होत्या, पण त्यांना सामोऱ्या आल्या, त्या छडीसारख्या सडसडीत आणि  ताठ दुर्गाबाई. चष्म्याआडच्या डोळ्यांत अजूनही तेज होतं. त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा झाल्या; मन प्रसन्न झालं. गोखलेबाईनी वही पुढे करून स्वाक्षरी मागितली. दोघींच्यात मोठा मजेदार संवाद झाला. दुर्गाबाई त्यांना म्हणाल्या, ‘‘आता हात चालत नाहीत. हवं तर अंगठा देते’’. त्यावर गोखलेबाईंनी विनंती केली, ‘‘पेननं तुम्ही स्वाक्षरी म्हणून काहीही करा. रेघोट्या ओढल्यात तरी चालेल’’. पण तरीही दुर्गाबाईंनी त्यांना सही दिली आणि त्याखाली लिहिलं, ‘वेडी’. गोखलेबाईंना नवल वाटलं. तेव्हा दुर्गाबाई त्यांना म्हणाल्या, ‘‘कशाचं तरी वेड-ध्यास घेतल्याखेरीज माणसाच्या हातून कार्य घडत नाही. कसलं ना कसलं वेड हवंच माणसाला. तरच आयुष्यात काही तरी मिळतं’’.

दुर्गाबाईंचा रूपशोध घेताना मला जाणवलं की, त्यांच्या सर्वच रूपांमागे या ‘ध्यासमग्न दुर्गाबाई’ अथवा ‘वेड्या दुर्गाबाई’ उभ्या असतात. किंबहुना असंही म्हणता येईल की, ही बहुरूपं म्हणजे कमळानं वेडावलेल्या राणीचेच नानारंगी आविष्कार आहेत. दुर्गाबाईंशी सुखसंवाद साधताना त्यांच्या मनाचे रंग आपल्या मनावरही चढतात. त्यांच्या लेखनात, चरित्रात जेवढं बुडावं, तेवढा बुडत्याचा पाय खोलात जातो. उत्खनन करता करता गुणरत्नांची खाण सापडते, तसाच धगधगता ज्वालामुखीही सापडतो आणि परत या ज्वालामुखीच्या आगेमागे  नीरव, आरस्पानी, चिंतनमग्न सरोवर असतं. त्या सरोवराच्या तळाशी मोत्यांचे शिंपले मुकाट बसलेले असतात. पाणबुड्यासारखा पाण्याचा तळ गाठून ते शिंपले उघडून बघण्याचं काम अजून बाकी राहिलेलं असतं.

पुस्तकाच्या शेवटी ग्रंथसूचींच्या जोडीला मी आणखी दोन सूची जोडल्या आहेत. त्यांपैकी एका सूचीत मुलाखतींचे संदर्भ आहेत. माझ्या लघुपटाच्या निमित्त व पुस्तकाच्या निमित्त मी अनेकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांपैकी ज्यांचा उपयोग या पुस्तकासाठी केला आहे, त्यांची यादी दिली आहे. दुसरी सूची आहे, ती दुर्गाबाईंवर मी वेळोवेळी लिहिलेल्या निवडक लेखांची.

दुर्गाबाईंवर लघुपट करत असताना या लेखनाला सुरुवात झाली. लघुपटाची निर्मितिकथा उलगडून दाखविणारं ‘पाऊलखुणा लघुपटाच्या’ हे आत्मकथनही पुस्तकरूपानं प्रसिद्ध झालं. त्यानंतर मी ग्वाल्हेर घराण्याचे सुस्वरकंठी गायक पं. दत्तात्रय विष्णू पलुस्कर यांवर लघुपट करायचं व ग्रंथ लिहायचं काम हाती घेतलं. ते काम सात वर्षं पुरवलं. साहजिकच दुर्गाबाईंवरील सुरुवातीचे काही लेख २००२ व २००३ सालातील आहेत. त्यानंतर लेखनात बराच खंड पडला. नंतरचं लेखन २०११मध्ये सुरू झालं. चित्रकार एखादं मोठं पेंटिंग करण्यापूर्वी लहान रेखाचित्रं काढतो, त्या धर्तीचे हे लेख  आहेत. असे लेख म्हणजे अभ्यासाचा प्रारंभ असतो. विशिष्ट विषयावर लिहिण्याचा रियाज असतो. पुस्तक लिहीत असताना त्यांचा अर्थातच पुनर्विचार होतो. तोवर अभ्यास वाढलेला असतो. नवं काही सापडलेलं, सुचलेलं असतं. त्याचा समावेश करावा लागतो. कठोर व चिकित्सक दृष्टीनं परीक्षण करून, छाननी करून लेखांना अंतिम रूप द्यावं लागतं. अगदी पुस्तक शेवटच्य टप्पात असतानाही नवं काही हाती लागू शकतं. म्हणूनच संशोधकाला सदैव दक्ष राहून, बदलांची दखल घेऊन, आपल्या लेखनाचा वारंवार पुनर्विचार करावा लागतो. संशोधनातील ही प्रक्रिया मला फार प्रिय आहे. ते  एका अर्थी स्वत:लाच घडवणं असतं.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4462

.............................................................................................................................................

हे पुस्तक आता पूर्ण झालं आहे. तरीही दुर्गाबाईंचा अभ्यास अजून संपलेला नाही. दुर्गाबाई मला पुरून उरणार आहेत. आता त्यांच्या माझ्या प्रेमकथेचं तिसरं पर्व सुरू झालं आहे. १९७५च्या आणीबाणीत कार्यरत झालेल्या तेजस्वी दुर्गाबाई, कऱ्हाड साहित्य संमेलनातल्या दुर्गाबाई, त्या काळात त्यांच्यात झालेलं परिवर्तन आणि एकंदरच ललितरम्य दुर्गाबाईंच्या मागे उभं असलेलं त्यांचं गंभीर व्यक्तिमत्त्व मला खुणावतं आहे. परत एकदा शोधाला  प्रारंभ झाला आहे. त्यातून आणखी एक ग्रंथ सिद्ध होणार आहे. मी आनंदात आहे.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......