‘नाटकी नाटकं’ हे पुस्तक अतिशय रंजक आहे. समीक्षाग्रंथ असूनही त्यात अभिनिवेश नाही.
ग्रंथनामा - झलक
रत्नाकर मतकरी
  • ‘नाटकी नाटकं’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 29 June 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक नाटकी नाटकं Natki Nataka कमलाकर नाडकर्णी Kamlakar Nadkarni मनोविकास प्रकाशन Manovikas Prakashan

‘नाटकी नाटकं : चाकोरीतली आणि बिनचाकोरीतली’ हे ज्येष्ठ नाट्यसमीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचं नवं पुस्तक नुकतंच मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ नाटककार, रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेली विवेचक प्रस्तावना...

.............................................................................................................................................

कमलाकर नाडकर्णी हे एक नाटकवेडे गृहस्थ आहेत.

मी त्यांना त्यांच्या कॉलेजच्या दिवसांपासून पाहात आलोय. पण त्यांचे नाटकवेड कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. नाटक या माध्यमाला सर्व बाजूंनी न्याहाळून पाहाण्यात त्यांची हयात गेली, असे म्हटले तरी चालेल. प्रथम त्यांनी महाविद्यालयीन स्पर्धेत अभिनय केला (त्यांचा हा  पारितोषिक विजेता ‘दिगू’ मी  प्रत्यक्ष पाहिलेला आहे). पुढे, त्या काळातील नाटकवेड्या तरुणांप्रमाणे ‘प्रायोगिक’ नाटकांच्या प्रेमात पडून त्यांनी सगळ्या नादिष्ट मित्रांना एकत्र करून ‘बहुरूपी’ ही नाट्यसंस्था उभी केली. या संस्थेत लेखक, नट, दिग्दर्शक अशा अनेक भूमिकांमधून धिंगाणा घालत असतानाच त्यांनी नाट्यसमीक्षा (ही तोवर शिल्लक उरलेली नाट्यप्रेमाची एक बाजू) करायलाही सुरुवात केली. ती प्रमुख वृत्तपत्रांमधून छापून आल्यामुळे त्यांच्यावर ‘समीक्षक’ हा शिक्का बसला. आठवड्याच्या आठवड्याला ताज्या नाटकांची आवश्यक ती समीक्षा करत असतानाही ते आतून (काहीजण छुपे कम्युनिस्ट असत, तद्वत)  छुपे ‘प्रायोगिक’वाले राहिले. मात्र काही वर्षांनी प्रायोगिक चळवळ आटू लागल्यानंतर रंगऱ्हास असह्य झालेल्या नाडकर्णींनी मुख्य धारेतील व्यावसायिक नाटकांमधूनही रंगमूल्ये शोधायला सुरुवात केली. आणि हळूहळू त्यात रमून गेले. मात्र इतक्यावर भागले, तर माणूस नाटकवेडा कसला? जिथे म्हणून नाटक असेल, तिथे मग ती नाट्यस्पर्धा असो, परभाषिक नाटक असो की परदेशी नाटक असो, लोकरंगभूमी असो की वंचितांचा रंगमंच असो, एखाद्या नाट्यअभ्यासकाच्या गांभीर्याने आणि त्याच वेळी नवे काही समजून घेण्याच्या बालसुलभ कुतूहलाने नाडकर्णी हजर राहू लागले. परिणामी या जवळजवळ साठ वर्षांच्या नाट्यजागरणामुळे रंगभूमी त्यांच्यामध्ये आचरणापलीकडे भिनून गेली.

आता अशा या माणसाने नाटकाचा इतिहास लिहिणे हे कधी ना कधीतरी अपरिहार्य ठरणारच. वेळोवेळी, नाना निमित्तांनी (तसे फारसे निमित्त लागत नसतानाही) नाडकर्णींनी, आपण पाहिलेल्या (आणि न पाहिलेल्याही) अनेक (शेकडो म्हणावे का?) नाटकांविषयी लिहून ठेवले. कधी तरी हे सारे लिखाण एकत्र करावे, असे त्यांच्या मनात आले. जरी त्यांनी पूर्वीची नाटके आणि अलीकडची काही नाटके यावर यापूर्वीच दोन महत्त्वाची पुस्तके लिहिलेली असली, तरीही. हे, वृत्तपत्रीय तरीही सर्वकालीन महत्त्वाचे लिखाण फक्त त्या त्या वेळी वाचले जाऊन बाजूला पाहणे इष्ट ठरले नसते. म्हणून, त्याचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून ‘मनोविकास प्रकाशन’ने लेखसंग्रहाच्या रूपाने ते एकत्रित केले, हे महत्त्वाचे काम झाले. नाटकाचे अभ्यासक, आजची पिढी आणि पुढच्या पिढ्या यांना रंगभूमीची माहिती हवी असल्यास, आणि वाचनाची ‘अ‍ॅलर्जी’ नसल्यास, हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरू शकेल.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

बहुरंगी, बहुढंगी अशा, अत्यंत श्रीमंत मराठी रंगभूमीची बहुविध उपांगे या पुस्तकात मांडलेली आहेत. जुन्या म्हणजे अगदी विष्णुदास भावे यांच्या नाटकापासून ते ‘संशयकल्लोळ’पर्यंतची जुनी रंगभूमी आणि राज्य नाट्यस्पर्धांमधील नाटके हे या पुस्तकाचे दोन प्रमुख भाग. असे असले तरी काही लेखांद्वारे का होईना, पण महाविद्यालयीन रंगभूमी, बालरंगभूमी, कामगार रंगभूमी आणि थोडी ‘एनसीपीए’ टाइप रंगभूमी यांची ओळख करून द्यायलाही नाडकर्णी विसरलेले नाहीत. जुन्या रंगभूमीवरील नाटके संधी मिळताच पाहून टाकली असली, तरी सगळी नाटके पाहणे त्यांना अशक्यच असणार! अशाही परिस्थितीत ठिकठिकाणांहून माहिती मिळवून अभ्यास करून नाडकर्णींनी हे लेख परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.

किर्लोस्कर हे कसे प्रायोगिक नाटककार होते, आणि त्यांनी नाट्यलेखनापासून ते प्रयोग लावण्यापर्यंत अनेक गोष्टींमध्ये कसे सातत्याने प्रयोग केले, हे नाडकर्णींनी सप्रमाण सिद्ध केले आहे.  देवलांच्या ‘संशयकल्लोळ’चा जसा त्यांनी अभ्यास केला आहे, तसेच गडकरी, कोल्हटकर, खाडिलकर, (उर्वरित) देवल यांच्या नाटकांविषयीही त्यांनी अभ्यासपूर्ण लेखन करावे ही विनंती. मराठी रंगभूमीच्या सुवर्णकाळाविषयी नाडकर्णींकडून एक पुस्तक नक्कीच अपेक्षित आहे. या पुस्तकाच्या उत्तरार्धात मो. ग. रांगणेकर आणि अत्रे या जोडीने रंगभूमी वाचवण्याचे केलेले प्रयत्न, कंत्राटदारी नाटके आणि पुन्हा अत्रे-रांगणेकर जोडीने केलेली नव्या व्यावसायिक नाटकाची संस्थापना (‘तो मी नव्हेच!’) असे विषय घेऊ शकतील.

असो. थोडे विषयांतर झाले. परत ‘नाटकी नाटकं’कडे येऊ. जुन्या नाटकांनंतर नव्या नाटकांकडे वळण्यापूर्वी नाडकर्णींचा ‘भारतीय विद्या भवन नाट्यस्पर्धे’विषयीचा लेख येतो. तो केवळ बहुमोल आहे. कारण त्यात आज ज्या आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धा दिसतात, त्यांचे मूळ कोठे आहे, हे अत्यंत सविस्तरपणे, अनेक तपशिलांसह नाडकर्णी सांगतात. एवढंच नव्हे, तर पुढे  नव्या रंगभूमीचर कार्यरत झालेल्या विजया-दामू-रावते-अरविंद इत्यादी मंडळींनाही भारतीय विद्या भवननेच रंगमंच कसा उपलब्ध करून दिला, ही देखील माहिती नाडकर्णी पुरवतात. अनेक करणांसाठी हा लेख महत्त्वाचा आहे.

त्यानंतर काहीशा अपेक्षित पण स्वागतार्ह पद्धतीने कामगार रंगभूमीची माहिती येते. हीदेखील बहुतेक वाचकांना अपरिचित असलेली रंगभूमी. रंगभूमीवर रात्रपाळी करून गिरण्यांमधून दिवसपाळी करणाऱ्या या कामगारांनी केवळ रंगभूमीच्या ध्यासामधून असा एक रंगमंच उभा केला, की ज्यावरून मास्टर दत्तारामांसारखे नट मुख्य धारेतील रंगभूमीवर पोहोचले. हे सर्व नाडकर्णींनी अशा प्रकारे सांगितले आहे, की आपल्याला ही माहिती नव्हती, याचे नाट्यअभ्यासकाला वैषम्य वाटावे. कामगार रंगभूमीवरच्या नाटकांच्या विषयानुरूप चित्रविचित्र नेपथ्याची कल्पना येण्यासाठी, एका नेपथ्याचे चित्र पुस्तकात दिलेले आहे हे विशेष.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

बालरंगभूमीविषयीच्या लेखामध्ये, कमलाकार नाडकर्णींचे परिप्रेक्ष्य (परर्स्पेक्टिव्ह) थोडे बदलते, कारण सुधा करमरकर यांच्या ‘लिट्ल थिएटर - बाल रंगभूमी’ या संस्थेत ते स्वतः नट, नंतर लेखक (‘राजा शिवाजी’ या नाटकाने) आणि निर्मिती व प्रयोग या प्रक्रियांमधले साक्षीदार - भागीदार - कार्यकर्ते, अशा विविध नात्यांनी वावरले. एवढंच नाही, तर त्या तरुण वयात त्यांना सोनाळकर, गोंधळेकर, सावरकर, तळाशिलकर इत्यादी समवयस्क मित्रांचा जो गट मिळाला, त्यामुळे ते त्यात रमून गेले. या पार्श्वभूमीमुळे इतर लेखांना जो त्रयस्थ दृष्टिकोन लाभला आहे, तो इथे नाही. पूर्णपणे व्यक्तिनिष्ठ अशा या लेखाचा ‘फोकस’ बाल रंगभूमी हा राहिला नसून तो ‘लिट्ल थिएटर - बाल रंगभूमी’ ही संस्था, तिने निर्मिलेली नाटके, त्यात केलेल्या भूमिका आणि सुधा करमरकर ही व्यक्ती यांच्यावरच राहिला आहे. इतर तीन - चार बालनाट्यसंस्थांचा परिचय त्या पुढील लेखांमध्ये आहेच, परंतु त्यांच्या कामांचे गंभीर विश्लेषण व ‘लिट्ल थिएटर’ पेक्षा वेगळे असे त्यांनी बालरंगभूमीला दिलेले योगदान यांचा वृत्तांत वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून पुरेशा प्रमाणात येत नसल्यामुळे अभ्यासकाची दिशाभूल होण्याचा संभव आहे. सुधा करमरकरांच्या व्यक्तिमत्त्वाने लेखक पुरता भारून गेलेला आहे. मात्र दोन वेगळ्या ठिकाणी मिळून त्यांनी सुधा करमरकरांविषयी जे लिहिले आहे, ते न्याय्य आहे आणि व्यक्तिचित्र म्हणून अत्यंत विलोभनीय आहे.

अशीच व्यक्तिनिष्ठ भूमिका त्यांच्या स्वतःच्या अनुभवातल्या, स्वतःच्या चाळीतल्या नाटकाच्या वर्णनांत आहे. मात्र तिथे ते वर्णन एकंदर चाळकरी नाटकाचे प्रतिनिधित्व करते. पैशाची चणचण, जागेसाठी (तालमीच्या व प्रयोगाच्या) वणवण, जुन्या आणि जाणत्या लोकांची अधिकारशाही, आयत्या वेळी होणारे गोंधळ आणि तरीही एकंदरित येणारा एक अविस्मरणीय - खरोखरच आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव, आणि अशा अस्ताव्यस्त अनुभवातूनच काही जणांना रंगभूमीवरची स्वतःची वाट सापडणे, हे केवळ ‘गंगाधर निवास’मध्येच त्यावेळी होत असे, असे नाही; तर इतर अनेक ठिकाणी हे असेच अजाणतेपणे हौसेखातर, पण मेहनतपूर्वक घडत असे. त्यामुळे हे वरवर विनोदी वाटणारे लेखनही तत्कालीन रंगभूमीविषयी महत्त्वाची माहिती देते.

त्या काळात रंगभूमीवर जे - जे काही घडत असते, त्याविषयी वाचक अप्रबुद्ध राहू नये, या विचारातून, नाडकर्णी ‘फार्स’ या नाट्यप्रकाराचीही ओळख करून देतात. ‘फार्स’ या नामाभिधानामुळे त्यांना दोन प्रकारच्या नाट्यविशेषांची माहिती देणे भाग पडते. पहिला पूर्वीच्या रंगभूमीवर संपूर्ण नाटकाच्या आधी कधी गंभीर, कधी विनोदी, कधी थोडाफार धक्कादायक, असा जो नाटिकावजा प्रकार करून दाखवला जात असे आणि ज्याला ‘फार्स’ म्हणत तो; आणि दुसरा, पन्नासच्या दशकाच्या उत्तरार्धात आत्माराम भेंडे आणि बबन प्रभू यांनी जो विनोदी नाटकाचा काहीसा अतिशयोक्त पण विलक्षण रंजक असा बाज (बहुश: परदेशी नाटकांच्या रूपांतरांच्या साहाय्याने) मराठी प्रेक्षकांना दाखवला तो. भेंडे - प्रभू जोडीने (बबन प्रभूंच्या लेखणीतून उतरलेले) ‘दिनूच्या सासुबाई राधाबाई’, ‘माकड आणि पाचर’, ‘पळा पळा कोण पुढे पळे तो’ असे अनेक फार्स नंतर सादर केले आणि प्रेक्षकांनीही ते उचलून धरले, तरी त्यांच्या पहिल्याच ‘झोपी गेलेला जागा झाला’ (१९५८) या फार्सची सर दुसऱ्या कुठल्याच फार्सला आली नाही, याचे कारण ‘झोपी...’मध्ये कळत-नकळत पडलेले मानवी आशाआकांक्षांचे प्रतिबिंब, हे नाडकर्णी नमूद करतात. भेंडे-प्रभू यांनी या पहिल्याच्या फार्समधून आशयाशी सुसंगत अशी जी चटपटीत आणि काहीशी अतिशयोक्त अशी अभिनयशैली तयार केली तिचे ‘अतिशयोक्तीपूर्ण अनुकरण’ आजपर्यंत होत राहिलं, किंबहुना या शैलीचा वापर केला, म्हणजे कोणतंही साधारण नाटक तुफान हास्यकारक होऊ शकतं, असा गैरसमज पुढील काळात झाल्यामुळे रंगभूमीचे नुकसानच झालं, याचाही ते निर्देश करतात.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

या पुस्तकाचे मराठी रंगभूमीला विशेष योगदान ठरावे, ते त्यामधील ‘राज्यनाट्यस्पर्धेची रंगभूमी’ या विभागामुळे. हा लेखविभाग सर्वात दीर्घ आणि भरगच्च आहे. त्यातील तपशील दस्तावेज म्हणून इतक्या महत्त्वाचा आहे, की तसा तो खुद्द शासनाच्या दप्तरीही नसेल. (तरी, स्पर्धेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त शासनाने प्रकाशित केलेल्या स्मरणिकेत काही प्रमाणात तो होता.) याचे कारण, नाडकर्णी केवळ तपशील देऊन थांबत नाहीत, तर राज्यनाट्यस्पर्धेचा एकूण माहोल वाचकाला जाणवून देण्याचा प्रयत्न करतात. स्पर्धक म्हणून, निर्माते म्हणून लेखक म्हणून, दिग्दर्शक म्हणून आणि या सगळ्यांपलिकडे जाऊन अत्यंत रसिक प्रेक्षक म्हणून नाडकर्णी स्पर्धेतील नाटकांविषयी भरभरून बोलतात. सातत्याने चाळीसेक वर्षे स्पर्धेचा मनापासून आनंद घेत एकेका नाटकाचे उत्साहाने स्वागत करणारा, प्रतिवर्षी नवीन काय येते याबद्दल सप्रेम कुतूहल असणारा असा दुसरा समीक्षक स्पर्धेला लाभला नसेल. आणि ही नाटके तरी अशी जबरदस्त! आता विचार केला, तर रंगभूमीवर हे असे अद्भुत पर्व कसे होऊन गेले याचे आश्चर्य वाटते. राज्यनाट्यस्पर्धेतील जवळजवळ सर्व महत्त्वाची नाटके मी पाहिली आहेत. तरी या  पुस्तकात त्यांच्याविषयी एकत्रितपणे वाचताना, एका मोठ्या कलाखंडात गावोगावचे लोक इरेला पेटून नवनवे विषय (यात ‘ऑथेल्लो’पासून ‘धग’पर्यंतच्या साहित्यकृतीही आल्या) हाताळून अनेक आव्हाने पत्करून, वेगवेगळे प्रयोग करून (यात सूचक नेपथ्यापासून ते रंगमंचावर मोठमोठी वास्तववादी नेपथ्य उभारणेही आले), चाळीस -पन्नास नटांच्या सामुदायिक हालचालींपासून ते एकांड्या अभिनयश्रेष्ठाच्या स्वगतापर्यंत सारे काही आपल्या कवेत घेऊन अनेक अनवट शैलीची नाटके (वेगवेगळ्या बोलीभाषा, अपारंपरिक वातावरण) सादर करू शकले आणि तेही एवढ्या मोठ्या संख्येने - या रंगभूमीवरील अघटिताने मी थक्क होऊन गेलो.

स्पर्धेच्या उपक्रमाच्या या अचाट सामर्थ्याचा प्रत्यय नाडकर्णींच्या लेखमालेतून उत्तमप्रकारे येतो. स्पर्धेतील सर्वच महत्त्वाच्या नाटकांचा (१९७५ पासूनच्या) परामर्ष त्यांनी इथे घेतला आहे; तरीही, निरनिराळ्या कारणांसाठी महत्त्वाची-वेगळा प्रयोग करू पाहणारी आणि स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पहिला क्रमांक मिळवणारी ‘निखारे’ (१९६७), ‘प्रेमकहाणी’ (१९७२), ‘सप्तपुत्तुलिका’ (१९७५) अशी  काही नाटके राहून गेली आहेत. कदाचित ती पाहण्याची संधी नाडकर्णींना मिळाली नसावी.

राज्य नाट्यस्पर्धेतील नाटकांविषयी असे एकत्रितपणे वाचताना एक विचार मनात आला. ही सगळी नाटके घडवणारे लेखक, दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्मितीसंस्था यांचे पुढील काळत झाले काय? यातील काही जण निश्चित नावारूपास आले. मधुकर तोरडमल, पुरुषोत्तम दारव्हेकर, गणेश सोळंकी, श्रीराम लागू, शरद भुताडिया, विवेक आपटे, हेमू अधिकारी, दिलीप प्रभावळकर, रवी पटवर्धन, वसंत सोमण, स्वतः कमलाकर नाडकर्णी हे आणि आणखीही काही रंगकर्मी रंगभूमीच्या निरनिराळ्या क्षेत्रात पुढे दीर्घकाळापर्यंत टिकून राहिले. परंतु याशिवाय इतर अनेक ताकदीचे रंगकर्मी - विशेषतः बाहेरगावचे स्पर्धेनंतर कुठे दिसलेच नाहीत. स्त्रीकलावंत तर प्रकाशात मुळीच राहिले नाहीत. रंगभूमीचे हे केवढे मोठे नुकसान! सगळेच जण मुंबई - पुण्यासारख्या नाट्यकेंद्रस्थळी येऊन स्थायिक होऊ शकले नाहीत, असे काही झाले का? काहीही असले तरी मराठी रंगभूमीवर ही अनेकांच्या कष्टांनी उभारली गेलेली इमारत टिकून राहायला हवी होती. तरी तशी राहावी यासाठी शासनाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रयत्न कमी पडले का? मराठी नाट्य परिषदेसारख्या संघटनांनी पुरेशी आस्था दाखवली नाही, असे झाले का? काहीही असो. पण आज या नाटकांचे अस्तित्व नाडकर्णींच्या पुस्तकासारख्या प्रयत्नांमुळेच काही प्रमाणात तरी टिकून आहे. योग्य खतपाणी मिळाले असते तर आजच्या आपल्या मुख्य धारतेल्या रंगभूमीवरच्या जोडीने कधी कधी वरचढ अशा स्वरूपात, ही रंगभूमी अस्तित्वात राहिली असती; जशी अमेरिकन ब्रॉडवेच्या जोडीला, तिला पोषक अशी ‘ऑफ ब्रॉडवे’ रंगभूमी आहे!

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

राज्य नाट्यस्पर्धेत चमकणाऱ्या जवळपास सर्वच संस्थांविषयी नाडकर्णींनी  पुरेशा आपुलकीने लिहिले आहे. मात्र स्वाभाविकपणेच, त्यांनी स्वतःच्या ‘बहुरूपी’ या संस्थेविषयी अधिक माहिती दिलेली आहे. ते रास्तही आहे, कारण ‘बहुरूपी’ने जितकी नाटके सादर केली, तितक्या प्रमाणात तिची प्रसिद्धी झालेली नाही.

या संस्थेने व्यावसायिक म्हणून शोभतील अशा नाटकांपासून ते पूर्णपणे प्रायोगिक अशा नाटकांपर्यंत सर्व प्रकारची नाटके, स्पर्धेतील यशापयशाची पर्वा न करता धडाडीने, परिश्रमपूर्वक आणि दिमाखदार रीतीने सादर केली. नवे नट, लेखक, दिग्दर्शक यांना वाव दिला. त्यांनी निर्मिलेले पीटर शेफर्सचे ‘ब्लॅक कॉमेडी’ (‘क...काळोखातला’ - रूपांतर कमलाकर नाडकर्णी, दिग्दर्शन हेमू अधिकारी) कधीही व्यावसायिक रंगभूमीवर येऊ शकेल, तर ‘हे समय उत्ताल समय’चे प्रयोग आजच्या ‘यादवी’च्या काळात समांतर रंगमंचावर झाल्यास ते समयोचित ठरेल. बादल सरकार यांच्या नाटकाच्या ‘जुलुस’ या रूपांतराच्या (दिग्दर्शक अमोल पालेकर) निमित्ताने प्रथमच या संस्थेला एका वेगळ्या प्रकारच्या नाटकाचा अनुभव आला. या पहिल्या प्रेमाच्या नशेत नाडकर्णी इतके कायम मश्गुल राहिले की, तशा तऱ्हेची (सामाजिक आशय, नेपथ्याचा अभाव, समूहाचा वापर, नटाच्या कायिक अभिनयाचा जास्तीत जास्त उपयोग करणे - इत्यादी प्रकारची) जी तीन-चार महत्त्वाची नाटके आली, त्यांच्या लेखक - दिग्दर्शकांना बादलदांची नाटके न पाहताही, स्वतंत्रपणे या रंगनिर्णयापर्यंत यावेसे वाटले असेल, हे लक्षात न घेता, ती सारी ‘जुलूस’नेच प्रेरित झाली, असे नाडकर्णींना दीर्घकाळ वाटत राहिले.

काही अपवाद (उदा. विद्याधर गोखल्यांविषयीचे ‘लोकसत्ता’ साहचर्यामुळे प्रेम व दारव्हेकरांविषयीचा पूर्वग्रह) सोडल्यास नाडकर्णींचे एकूण लिखाण निःपक्षपाती आहे. नाटकावरच्या प्रेमामुळे त्यात आपसूकच एक निर्मळपणा आलेला आहे. रंगभूमीवरचा इतिहास म्हणावा, अशा या पुस्तकांमध्ये अलीकडच्या मुख्यधारेतील नाटकांविषयी मात्र काहीही नाही. त्यासाठी त्यांचे वेगळे ‘महानगरी नाटकं’ हे पुस्तक असले, तरीही ‘नाटकी नाटकं’च्या पद्धतीचा मुख्य धारेचा इतिहासही त्यांनी लिहायला हवा, असे वाटत राहाते.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

हे लिखण संपवण्यापूर्वी दोन गोष्टींचा मुद्दाम उल्लेख करावसा वाटतो. एक म्हणजे ‘नाटकी नाटकं’ हे पुस्तक अतिशय रंजक झालेले आहे. समीक्षाग्रंथ असूनही त्यात कसला अभिनिवेश नाही. कुठे उगाच परिभाषेचा वापर नाही की, कुठे जडजंबाल शब्दयोजना नाही. हसतखेळत, आठवणीतल्या गमतीजमती सांगत, आख्यायिका सांगत, विनोदाची पखरण करत ही समीक्षा पुढे जाते. कुठेही आत्मगौरव नाही. स्वतःच्या अभिनयाविषयी सांगतानादेखील भूमिका केवळ माहिती देण्याची आहे. बऱ्याच वेळा तर स्वतःची खिल्ली उडवलेली आहे.

हे सारे, शिवाय भरपूर, तपशीलवार माहिती देणे, कसे काय जमले असावे? तर त्यामागे असलेले रंगभूमीवरचे प्रेम. हे मला सर्वाधिक महत्त्वाचे वाटते. बरेच समीक्षक रंगभूमीवरचे प्रेम दाखवताना स्वतःचा मोठेपणा विसरत नाहीत. इथे नाडकर्णींना स्वतःपेक्षा रंगभूमी मोठी वाटते. तिच्याविषयी किती बोलू आणि काय बोलू, असे त्यांना होऊन जाते. त्यातूनच त्यांची आपर माहिती, आठवणी इत्यादींनी भरलेली समीक्षा जन्माला येते. त्यामुळेच, या समीक्षाग्रंथाचे स्वरूप, एका नाटकवेड्याचे आत्मकथन, असे झालेले आहे. तरुण वयापासून उतारवयापर्यंत रंगभूमीचे जे जे दर्शन आपल्याला घडले, ते ते एका असोशीने ते वाचकांना घडवतात. तिच्यात त्यांचे रागलोभ, ग्रह-पूर्वग्रह, नाटक पाहाण्याची आणि कधी ते स्वतः उभारण्याची धडपड, असे सारे काही दिसून येते. शिवाय या सर्वांना व्यापून उरते ती त्यांची रंगभूमीविषयीची कमालीची आसक्ती. त्या आसक्तीमुळेच हा इतिहास-अधिक-आत्मकथन वाचकाविषयी आस्था दाखवते, त्यांच्याशी मैत्री करते आणि एकदा वाचायला सुरुवात केली की, शेवटापर्यंत त्याला धरून ठेवते.

.............................................................................................................................................

‘नाटकी नाटकं : चाकोरीतली आणि बिनचाकोरीतली’ - कमलाकर नाडकर्णी 

मनोविकास प्रकाशन, पुणे | पाने - ३२३, मूल्य - ४०० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4433

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......