अन्यायकारक व्यवस्थेला सुरुंग लावणारी आणि नवीन राष्ट्राची क्रांतिकारक संकल्पना मांडणारी कविता
ग्रंथनामा - झलक
डॉ. अपर्णा लांजेवार-बोस
  • ‘वादळ उठणार आहे’ या कवितासंग्रहाचं मुखपृष्ठ
  • Fri , 22 June 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक वादळ उठणार आहे Vadal Uthanar Aahe ज्योती लांजेवार Jyoti Lanjevar

‘वादळ उठणार आहे’ हा डॉ. ज्योती लांजेवार यांचा कवितासंग्रह नुकताच लोकवाङ्मय गृहातर्फे प्रकाशित झाला आहे. या संग्रहातल्या कवितांचं संकलन-संपादन त्यांची मुलगी, अपर्णा लांजेवार-बोस यांनी केलं आहे. त्यांनी या संग्रहाला लिहिलेलं हे मनोगत...

.............................................................................................................................................

ती गेली तेव्हा माझ्यातलं खूप काही रिक्त झालं, कारण ती आई तर होतीच, पण त्या नात्यापलीकडे एक बौद्धिक बळ देणारी सखी, सर्जनशील सोबती, जिच्याकडे सारंच काही अमर्यादित होतं अशीही होती. अनुराग, अवसान, व्यथा, वेदना, शब्द, वात्सल्य, अंतर्ज्ञान आणि छिद्रान्वेषी बोध. चेहऱ्यावरील भाव ओळखून बदलांचा अंदाज घेणारी एक रम्य उपस्थिती होती ती. स्वत: एक वादळ होती आणि तरीही नाखूश होती, ते ‘अजून वादळ उठले नाही’ म्हणून, दिशाहीन प्रवाहांना, माणसांना एक ‘दिशा’ दाखवून पाहिली, बेइमान रक्तरंजित आभाळाला ‘शब्द निळे आभाळ’ करून पाहिले, तरीही त्या ‘एका झाडाचे आक्रंदन’ कितींनी पाहिले व ऐकले?

ती गेली तेव्हा दुखावलेल्या मनाला सावरले, हुंदके आवरले व तिच्याच शब्दांचा आसरा घेतला. सर्व आठवणींना लपेटून, तिला भरपूर सामावून घेत ठरवले की, त्या आठवणी आपल्यापर्यंतच न ठेवता ती ज्यांच्याकरता अभिव्यक्त झाली, लढली त्या समाजात त्या कायम उराव्यात. त्यातूनच ‘डॉ. ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठान’चा २०१४ साली जन्म झाला. तेव्हा भरभरून आशीर्वाद व साथ मिळाली, ती प्रा. पुष्पा भावे, डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. आशा सावदेकर, डॉ. वि. स. जोग, प्रा. महेश एलकुंचवार अशा अनेक नामवंत मान्यवरांची. प्रतिष्ठानच्या अनेक उद्दिष्टांमध्ये एक होतं, तिचं अप्रकाशित लेखन प्रकाशित करणं आणि ज्या आत्मनिष्ठ आकलनशक्तीनं तिच्या जाणिवा व सद्सद्विवेकबुद्धी सज्ज झाली होती, त्याचा बोध इतरांना करून देणं.

तिच्या साहित्यिक कारकिर्दीत काही कविता कुठे लिफाफ्यांवर, तर कुठे टाकलेल्या कव्हर किंवा कॅलेंडरवर खरडलेल्या, तर काहींची डायरीत सुबकपणे नोंद केलेली, काही तिने सावत्रपणे बाजूला ठेवलेल्या आणि काही प्रकृती खालावल्यानंतर तिच्या एखाद्या विद्यार्थ्यानं केलेल्या नोंदीमध्ये, असे विविध स्त्रोत मी जोडले व त्यांना एका संग्रहाचं स्वरूप दिलं. ही निष्पत्ती निश्चितच समाधानकारक ठरेल व या निमित्तानं तिच्यावर प्रेम करणाऱ्या देश-विदेशातल्या मंडळींना तिच्या हव्या असलेल्या अप्रकाशित कवितांचा हा साठा लाभेल.

समकालीन दलित वाङ्मय आणि एकंदरीतच मराठी साहित्य प्रवाहामध्ये, कवितेतले आणि समीक्षेतले एक महत्त्वाचे नाव डॉ. ज्योती लांजेवार आज आपल्यात नाही, पण ते जिवंत ठेवण्याचा एक प्रयत्न म्हणजे हा संग्रह.

भारतीय साहित्य परंपरेला आपल्या लेखणीनं समृद्ध व बळकट करणाऱ्या त्या एक लक्षणीय व्यक्तित्वाचा ठेवा असलेल्या समाजनिष्ठ, तत्त्वनिष्ठ लेखिका आहेत. एक असामान्य स्त्री, आई, लेखिका, कवयित्री अशा अनेक अंगांनी या स्त्रीकडे बघता येईल. त्या केवळ स्वत:चं प्रतिनिधित्व करत नसून एका समूहाचं, वैचारिक प्रवाहाचं प्रतीक आहेत. मानव कल्याणासाठी, मानवमुक्तीसाठी झटत त्यांच्या कवितेचा मूळ गाभा हा बुद्ध-फुले-आंबेडकर-मार्क्स व अशा अनेक क्रांतिकारी तत्त्वांवर आधारित असला तरीही तो एका विशिष्ट समूहाकरता मर्यादित नाही. कारण त्याला समग्रतेचं भान आहे. शोषित, पीडित स्त्री, कामकरी, कष्टकरी, भूमिहीन, निर्वासित, दंगलग्रस्त, युद्धग्रस्त आणि कित्येक काठावरच्या लोकांना हे लेखन प्रेरक आहे. विचारप्रणालीमध्ये आगळे-वेगळेपणा तर आहेच, पण समग्रतेचा आवाजही आहे. जात, वर्ग, वर्ण, लिंग, प्रांत यांच्या पलीकडे जाऊन एक सार्वत्रिकता आहे आणि त्यांची काव्यात्मक दृष्टी समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेच्या वैचारिक प्रवाहांचा विस्तार-संगोपन करणारी आहे. त्यांच्याशी सुसंवाद करणारी आहे. एका निश्चित दिशेकडे नेणारी लेखणी, माणसाला माणूसपण नाकारणाऱ्यांना टोच लावणारी तर आहेच, पण त्या लेखणीची नाळ जुळली आहे ती संघर्षाशी, क्रांतिकारी परिवर्तनवादी मूल्यांशी आणि म्हणून अशा समग्र अभिभावानं त्यांच्या कवितेकडे पाहणं आवश्यक आहे.

आज जगात विसंगतीची नवी नवी रूपं पाहायला मिळतात. बोथट जाणिवा व संवेदनशून्य विकृतीकरणाकडे लोक खेचले जात आहेत. इतिहासाची द्वेषमूलक पुनरावृती व पुनर्रचना विनाशासाठी होताना दिसते. जर्मन लेखक फ्रान्झ काफ्का (Franz Kafka) यांच्या गाजलेल्या ‘द ट्रायल’ या कादंबरीतील अवस्था आज सर्वत्र पाहायला मिळते आहे. हुकूमशाहीचा अभिशाप नव्यानं समोर येतो तो केवळ अपमानास्पद द्वेषाच्या विषारी भाषेत किंवा हटवादी विचारातच नव्हे तर युद्धाच्या आणि हिंसेच्या रूपातही. त्याचे पडसाद सर्वसामान्यांच्या व समाजाच्या प्रत्येक वर्तनावर उमटत आहेत. जिथं हिंसा आणि राजकारण एकजीव होतात, तिथं फक्त रक्तपात, वेदना, व्यथा आणि मृत्यू यांच्या मारक द्रव्याची निर्मिती होत असते. तेव्हा हिंसक अराजकता आणि क्रूर बाजार संघटित संस्कृती यांची राजकीय व आर्थिक दोरी विशिष्ट सत्ताधारी, कुलीन समजणाऱ्या वर्गाच्या हातात असेल, तिथं न्याय्य व्यवस्था ही काल्पनिकच बाब होऊन राहते.

डॉ. ज्योती लांजेवारांची कविता अशा सगळ्या अन्यायकारक व्यवस्थेला सुरुंग लावणारी व नवीन राष्ट्राची क्रांतिकारक संकल्पना मांडणारी आहे.

फ्रेंच लेखक अल्बर्ट कामू म्हणतो, माणसांमध्ये तिरस्कारापेक्षा प्रशंसा करण्यासारख्या अधिक गोष्टी आहेत. पण आज किरकोळ गोष्टींच्या आधारावर साहित्य विश्व विभागलं गेलं आहे. कुठे जात, संप्रदाय, तर कुठे पुरस्कार आणि व्यक्तिगत स्वार्थ, जो तो आपल्या विषयपत्रिकांप्रमाणे कार्यरत दिसतो. निदान साहित्य रसिकांची तरी वर्गवारी होऊ नये असं मला वाटतं. मानवतावादी महानायक असो अथवा मानवतावादी प्रवाह यांच्यातलं साम्य शोधणं (विसंगती नव्हे) ही खरं तर काळाची आज गरज आहे. या शिवाय पर्याय नाही. दुसरं असं की, परिवर्तनवादी विचारधारेवर एखाद्या विशिष्ट समुदायाची मक्तेदारी किंवा विशेषाधिकार राहूच शकत नाही. जे असं मानतात ते अपरिपक्व आहेत, असं मी मानते.

आज गरज आहे ती एका टीकाकुशल, बुद्धिनिष्ठ, तर्कसंगत जाणिवेच्या सक्षम वैचारिक पिढीची. डॉ. ज्योती लांजेवारांनी आपला मूळ वैचारिक गाभा सांभाळून कुठल्याही वर्गीकरणाच्या संकुचितपणामध्ये न अडकता, समानतावादी विचार बाळगणारे प्रवाह आणि माणसं यांना आपलंसं केलं व स्वत:ची अविस्मरणीय अशी छाप प्रत्येक मनावर सोडली.

शब्दांना फार किंमत आणि महत्त्व असतं हे पुरस्कार वापसी प्रकारानं सिद्ध केलं. लेखक व त्याची शब्दशक्ती यांचं माहात्म्य कमी लेखता कामा नये. कारण लेखक समाजालाच प्रतिबिंबित करतो. त्याचं प्रतिनिधित्व करतो. डॉ. ज्योती लांजेवार माझ्या आई या व्यक्तिगत नात्यापलीकडे, एक सामाजिक भान असलेल्या ज्येष्ठ कवयित्री, लेखिका म्हणून आणि माझ्यासारख्या अनेकांसाठी एक विश्वासार्ह प्रशिक्षण केंद्र म्हणून कायम आहेत. त्यांच्या निवडक कवितांचा इंग्रजीत अनुवाद करताना हीच बाब लक्षात आली होती. त्यांच्या पश्चात त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला, त्यांच्या वैचारिक, सामाजिक, सैद्धांतिक मानवतावादीदृष्टीला हा संग्रह अर्पित आहे.

माझ्या या प्रयत्नांना ज्यांच्या मार्गदर्शनाचे बळ मिळाले ते डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी आणि माझ्या सादेला उत्स्फूर्त प्रतिसाद देणारे लोकवाङ्मय गृह, डॉ. भालचंद्र कानगो आणि राजन बावडेकर या साऱ्यांचे मन:पूर्वक आभार.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4431

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Fri , 22 June 2018

डॉक्टर अपर्णा, लेखातलं हे विधान लई म्हंजे लईच्च ड्येंजरबाज आहे : >> डॉ. ज्योती लांजेवारांची कविता अशा सगळ्या अन्यायकारक व्यवस्थेला सुरुंग लावणारी व नवीन राष्ट्राची क्रांतिकारक संकल्पना मांडणारी आहे. >> त्याचं काये की सुरुंग लावणं वेगळं आणि नवनिर्मिती करणं वेगळं. दोन्ही एकाच कवितेत कसं बरं जमवलं ? की वेगवेगळ्या कविता केल्या दोघांसाठी ? आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......