रामचंद्र गुहा – विसाव्या शतकाचा श्रेष्ठ भारतीय इतिहासकार
ग्रंथनामा - रामचंद्र गुहा @ 60
संपादक अक्षरनामा
  • रामचंद्र गुहा
  • Sun , 29 April 2018
  • रामचंद्र गुहा @ 60 रामचंद्र गुहा इंडिया आफ्टर गांधी गांधी बिफोर इंडिया गांधींनंतरचा भारत आधुनिक भारताचे विचारस्तंभ

‘मी विसाव्या शतकाचा इतिहासकार आहे’, असं सार्थ अभिमानानं सांगणाऱ्या रामचंद्र गुहा यांचा आज ६०वा वाढदिवस. त्यानिमित्तानं भारतातील या आजच्या आघाडीच्या इतिहासकाराविषयी...

.............................................................................................................................................

एकंदर भारतीय समाज इतिहासाविषयी इतका हळवा आणि भावनाशील असतो की, आपल्याकडे सर्वांत जास्त वाद हे इतिहासाच्या बाबतीत होत असावेत. समतोल पद्धतीनं, नीरक्षीरविवेकानं आणि सत्यच सांगायचं, पण सभ्य शब्दांत, अशा पद्धतीनं इतिहास लिहिणारा कुणी हल्ली फार लोकप्रिय होऊ शकेल का, याविषयी जरा शंकाच वाटते. पण अलीकडच्या काळात याला एक भारतीय नाव सणसणीत अपवाद आहे. ते म्हणजे रामचंद्र गुहा. ‘आय अ‍ॅम अ हिस्टोरियन हू युजेस द पास्ट टू इल्युमिनेट द प्रेझेंट. आय डोंट गिव्ह सोल्यूशन्स..दॅट्स नॉट माय जॉब' असं स्पष्टपणे सांगणाऱ्या गुहा यांची 'इतिहासकार' म्हणून असलेली लोकप्रियता केवळ भारतातच नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आहे.

गुहा हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विचारवंत आणि इतिहासकार आहेत. चरित्रकार, पर्यावरणवादी, क्रिकेटचे अभ्यासक, स्तंभलेखक, शास्त्रीय संगीताचे जाणकार रसिक अशी त्यांची बहुविध ओळख आहे. पण त्यांना स्वत:ला ‘इतिहासकार’ म्हणून घ्यायला जास्त आवडतं.

गुहा यांचा जन्म डेहराडून इथं झाला. त्यांचं शिक्षण शिक्षण दिल्ली आणि कोलकाता या ठिकाणी झालं. गुहांनी आतापर्यंत ओस्लो, स्टॅन्फर्ड,, येल आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स इथं प्राध्यापक म्हणून काम केलं आहे. तसंच युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया आमि बिझेनशाफ्स्कोलेग झू (बर्लिन) इथं काही काळ ते फेलोही होते.

‘अ कॉर्नर ऑफ अ फॉरेन फिल्ड : द इंडियन हिस्ट्री ऑफ अ ब्रिटिश स्पोर्ट’ हे त्यांचं भारतीय क्रिकेटचा इतिहास सामाजिक अंगानं सांगणारं पुस्तक बरंच लोकप्रिय झालं आहे. त्याशिवाय ‘एन्व्हायरमेन्टलिझम : ग्लोबल हिस्ट्री’, ‘सॅव्हेजिंग द सिव्हिलाइज्ड’, ‘द यूज अँड अब्यूज ऑफ नेचर’, ‘मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया’ अशी त्यांची काही पुस्तकं प्रसिद्ध आहेत. ‘इंडिया आफ्टर गांधी’ हे गुहांचं स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास तपशीलवार सांगणारं इंग्रजी पुस्तक २००७ साली प्रकाशित झालं, तेव्हा त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. ‘द इकॉनॉमिस्ट’, ‘वॉल स्ट्रिट जर्नल’, ‘वॉशिंग्टन पोस्ट’, ‘सॅनफ्रॅन्सिको क्रॉनिकल’, ‘टाइम आउट’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकांनी ‘बुक ऑफ ऑफ द इअर’ म्हणून निवड केली होती. तर लंडनच्या ‘टाइम्स लिटररी सप्लिमेंट’नं ‘An insightful, spirited and elegantly crafted account of India since 1947' असा त्याचा गौरव केला होता.

‘इंडिया आफ्टर गांधी’मध्ये गुहा यांनी लोकशाही भारताच्या १९४७ ते २००७ या साठ वर्षांचा इतिहास लिहिला आहे. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही भारताची ही वाटचाल गुहांनी काहीशा स्थुलपणे पण वस्तुनिष्ठ इतिहासलेखनाशी प्रामाणिक राहून मांडली आहे. गुहा उदारमतवादी असल्यानं त्यांच्या लेखनात कुठलाही पूवग्रह नाही, ही या पुस्तकाची सर्वांत मोठी आणि जमेची बाजू आहे. किंबहुना त्यामुळे हे पुस्तक आपले अनेक गैरसमज दूर करण्यास मदत करतं. (या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘गांधींनंतरचा भारत’ या नावानं शारदा साठे यांनी केला असून तो मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसनं प्रकाशित केला आहे.)

गुहांनी पुस्तकामागची भूमिका स्पष्ट करताना लिहिलं आहे, ‘‘सामाजिक संघर्षाची प्रयोगशाळा म्हणून एखाद्या इतिहासकाराच्या दृष्टिकोनातून विसाव्या शतकातील भारत हा एकोणिसाव्या शतकातील युरोपइतकाच रोमहर्षक आहे… निश्चित दृष्टिकोनापेक्षा माझ्यामधील कुतूहलाची भावना अधिक बळकट आहे. न्यायनिवाडात्मक निष्कर्ष काढण्यापेक्षा मला समजून घेण्यात अधिक रस आहे… पण या कथाकथनाची मी जी पद्धत अवलंबिली आहे ती निश्चित करण्यामागे दोन मूलभूत मनसुबे होते. एक म्हणजे भारताच्या सामाजिक आणि राजकीय वैविध्याचा आदर राखणे आणि दुसरे म्हणजे आतापर्यंत सर्व भारतीय व परदेशी अभ्यासक व नागरिकांना सदैव जे कोडे पडत आले आहे त्याचा उलगडा करणे. हे कोडे कोणते, तर भारत खरोखरच का अस्तित्वात आहे?’’

 भारत नुसता टिकला नाही तर आता महासत्ता होण्याच्या दिशेनं वाटचाल करतो आहे. शिवाय भारत आजघडीला जगातील सर्वांत मोठं लोकशाही राष्ट्र आहे. भारताचा हा प्रवास कसा झाला याचा आलेख गुहा यांनी या पुस्तकात सविस्तरपणे मांडला आहे. नुकतीच या पुस्तकाची दहावी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. असो.

मे २००८मध्ये ‘प्रॉस्पेक्ट’ आणि ‘फॉरेन पॉलिसी’ या नियतकालिकांनी गुहा यांची जगभरातील शंभर बुद्धिमान व्यक्तींमध्ये निवड केली, तर २००९मध्ये गुहांना त्यांच्या साहित्य आणि शिक्षणक्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मभूषण या केंद्र सरकारच्या नागरी सन्मानानं गौरवण्यात आलं. याशिवाय त्यांना युनायटेड किंग्डम क्रिकेट सोसायटीज लिटररी अॅवॉर्ड, अमेरिकन सोसायटी ऑफ एन्व्हायरमेन्ट हिस्ट्री या संस्थेचं लिओपोल्ड-हायडी यांसारखे आंतरराष्टरीय पुरस्कारही मिळाले आहेत.

पूर्णवेळ लेखनाला वाहून घेण्याचा निर्णय झाल्यानंतर गुहा बंगलोरला स्थायिक झाले. आजवर त्यांच्या पुस्तकांचे आणि निबंधांचे वीसहून अधिक भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. ‘आउटलुक’ आणि ‘द हिंदू’मधील त्यांची सदरं आणि लेख यांना मोठी वाचकप्रियता लाभली आहे. ‘द हिंदू’मधील त्यांचा सलग सात वर्षं चाललेला ‘पास्ट अँड प्रझेंट’ हा कॉलम तर सरदलेखनाचा उत्कृष्ट नमुना होता. अवघ्या ७००-८०० शब्दांत चांगला लेख कसा लिहिता येऊ सकतो, याचं ते उत्तम उदाहरण होतं. अलीकडच्या काळात ते ‘हिंदुस्थान टाइम्स’ आणि ‘इंडियन एक्सप्रेस’ या दोन वर्तमानपत्रांत अधूनमधून लेख लिहितात.

कोलकात्याहून प्रकाशित होणाऱ्या ‘द टेलिग्राफ’ या दैनिकात त्यांचा ‘पॉलिटिक्स अँड प्ले’ हा पाक्षिक स्तंभ गेल्या पाच-सात वर्षांपासून प्रसिद्ध होतो आहे. तो ‘हिंदुस्थान’ (हिंदी), ‘प्रजावाणी’ (कन्नड), ‘आंध्र ज्योती’ (तेलुगु), दै. ‘जन्मभूमी’ (आसामी), ‘माध्यमा’ (मल्याळम) आणि ‘साप्ताहिक साधना’ (मराठी) या सहा नियतकालिकांमधून प्रसिद्ध होतो. (‘साधना’तून प्रकाशित होणाऱ्या सदरातील निवडक लेखांचं ‘काल-परवा’ हे पुस्तकही प्रकाशित झालं आहे.) या सदराच्या नावाप्रमाणे सद्यकालीन राजकारण आणि त्याभोवतीची समीकरणं यांवर या लेखातून गुहा भाष्य करतात. ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये नुकताच सामाजिक कार्यकर्ते हर्ष मंडेर आणि गुहा यांचा मुस्लिम प्रश्नाविषयीचा वाद गाजला. त्यात गुहा यांना माघार घ्यावी लागली. त्याचप्रमाणे राहुल गांधी यांनी राजकारणसंन्यास घ्यावा, हे त्यांनी अलीकडे व्यक्त केलेलं मतही काहीसं अनाठायी होतं. काँग्रेसच्या घराणेशाहीचे गुहा ठाम विरोधक आहेत. आणि तसं असायलाही हवं. पण त्या नादात अनाठायी आणि अप्रस्तुत विधानं करण्याचा मोह कटाक्षानं टाळायला हवा. गुहा तसा तो एरवी टाळतातही. पण बहुधा त्यांच्याकडून हे विधान अनवधानानं व्यक्त झालं असावं. भाजप-संघाच्या हिंदुत्ववादी घातक अजेंड्याची गुहा जी वेळोवेळी चिरफाड करत आले आहेत, ती मात्र गरजेची आणि नितांत निकडीची गोष्ट आहे. असो.

‘इंडिया आप्टर गांधी’नंतर गुहा यांनी ‘मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया’ या पुस्तकाचं लेखन व संपादन केलं. २०१२ प्रकाशित झालेलं हे पुस्तकही गाजलं. त्याचा मराठी अनुवाद ‘आधुनिक भारताचे विचारस्तंभ’ या नावानं शारदा साठे यांनी केला असून तो रोहन प्रकाशनानं प्रकाशित केला आहे.

त्यानंतर गुहांनी ‘गांधी बिफोर इंडिया’ या नावानं द. आफ्रिकेतील गांधींचं चरित्र दोन खंडांमध्ये लिहायला घेतलं. त्यातील पहिला खंड ऑक्टोबर २०१३मध्ये प्रकाशित झाला आहे, तर दुसरा खंड या वर्षी प्रकाशित होईल.

गुहा स्वत:ला ‘नेहरूवादी’ म्हणून घेतात. ‘नेहरूवादी’ माणूस उदारमतवादी आणि सर्वसमावेशक विचार करणारा असतोच. पण गुहा यांच्या म्हणण्यानुसार ते सध्याच्या घडीला भारतातील सर्वांत कमी वयाचे ‘नेहरूवादी’ आहेत. सध्याची नेहरूंविषयीची एकंदर नकारात्मक भावना पाहता गुहा मुद्दाम आणि पुन्हा पुन्हा या गोष्टीचा उल्लेख करत असतात. नेहरू, पटेल आणि आंबेडकर यांनी भारताची स्वतंत्र राष्ट्र म्हणून पायाभरणी केली, असे ते सांगतात. आणि त्यामुळे गांधींसोबत आपण या तिघांचेही प्रशंसक आहोत, याचाही पुनरुच्चार करतात. ‘इंडिया आफ्टर गांधी’ आणि ‘मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया’ या त्यांच्या बहुचर्चित पुस्तकांमध्ये याचं प्रत्यंतर येत राहतं.

गुहा यांची भाषणं अतिशय ओघवती असतात. तसेच त्यांचे लेखही ओघवते असतात. त्यांच्या बोलण्याकडे आणि लिहिण्याकडे भारतातील आणि भारताबाहेरील मान्यवरांचं लक्ष असतं. ‘मी विसाव्या शतकाचा इतिहासकार आहे’, असं सार्थ अभिमानानं सांगणाऱ्या गुहा यांना साठाव्या वाढदिवसाच्या ‘अक्षरनामा’ परिवाराच्या वतीनं मन:पूर्वक शुभेच्छा!

.............................................................................................................................................

‘गांधींनंतरचा भारत’ या रामचंद्र गुहा यांच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3683

.............................................................................................................................................

‘आधुनिक भारताचे विचारस्तंभ’ या रामचंद्र गुहा यांच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4372

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com 

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 03 May 2018

'.... भारत खरोखरच का अस्तित्वात आहे?' हे खरोखरंच एक कोडं आहे. विवेकानंदांच्या मते सृष्टीच्या अंतापर्यंत भारत अस्तित्वात राहील. कारण की भारत एक अध्यात्मिक राष्ट्र आहे. श्री.रामचंद्र गुहा यांचं अध्यात्माविषयी मत माहित नाही. बहुधा ते नास्तिक असावेत. त्यांना हे स्पष्टीकरण बहुधा पटणारं नाही. पण अनेकांना पटेल. गोळवलकर गुरुजींनी भारतीय राष्ट्राची मीमांसा त्यांच्या वुई ओर अवर नेशनहूड डीफाईंड या ग्रंथात केली आहे. गुहांनी वाचलं असेलंच म्हणा. नसेल तर वाचावं म्हणून सुचवेन. -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......