पुस्तकांचं हे ऋण न फिटणारं आहे!
ग्रंथनामा - जागतिक पुस्तक दिन
शशिकांत भगत
  • शशिकांत भगत
  • Sat , 28 April 2018
  • ग्रंथनामा जागतिक पुस्तक दिन World Book Day २३ एप्रिल 23 April शशिकांत भगत Shashikant Bhagat

२३ एप्रिल हा जगभर ‘जागतिक ग्रंथ दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्तानं हा विशेष लेख.

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे माजी सहायक ग्रंथपाल शशिकांत भगत यांचं नाव महाराष्ट्रातल्या अनेक लेखक, पत्रकार, कवी, संशोधक यांचं चांगलंच परिचयाचं आहे. त्यांच्या या काही आठवणी.

.............................................................................................................................................

सार्वजनिक ग्रंथालयामध्ये मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय हे शतायु ग्रंथालय म्हणून परिचित आहे. त्याची स्थापना १८९८ साली झाली. त्याच्या मुख्य ग्रंथालय आणि मुंबईभर शाखा पसलेल्या आहेत. त्यात दादर (पूर्व) इथं संदर्भ विभाग आहे. या संदर्भ विभागाला प्रामुख्यानं मराठी साहित्य वाङमय आणि संस्कृती याचा विशेष ग्रंथालयाचा दर्जा प्राप्त झालाय. इतर मराठी सार्वजनिक ग्रंथालयापेक्षा याचं स्वरूप भिन्न आहे. हा संग्रहालयाचा मानबिंदू. महाराष्ट्रभर या विभागाचा लौकिक आहे. या विभागात येणारे वाचक, पत्रकार, लेखक, समीक्षक, संशोधक, प्राध्याक, पीएच.डी.-एम.फिल.चे संशोधक, बी.ए.-एम.ए.चे विद्यार्थी, यूपीएससी-एमपीएसीचे विद्यार्थी, ग्रंथालयशास्त्र (बी. लिब., एम.लिब., पीएच.डी., पदविका)चे विद्यार्थी, सर्वसाधारण वाचक असे विविध प्रकारचे आहेत. अशा या संदर्भ विभागात मी १९७० ते २०१० पर्यंत म्हणजे जवळपास ३५ वर्षं शिपाई ते सहाय्यक ग्रंथपाल या पदावर काम केलं. या विभागात काम करत असताना वाचकांसोबतचे विविध अनुभव मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

१९७२ साली ग्रंथालय प्रमाणपत्र कोर्सला बसलो. त्यात पास झालो. बढती मिळाली. शाखा सहाय्यक झालो. त्यावेळी संस्थाविपाल अच्युत तारी होते व प्रमुख कार्यवाह वासुदेव विष्णु भट. हे दोघे समजूतदार, समंजस आणि शांत होते. संस्थेचा पसारा वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. अशीच एक गोष्ट घडली. त्यात संस्थाधिपाल अच्युत तारी यांनी मला तडकाफडकी काढून टाकण्याचा निर्णय घेतला. पण भटसाहेबांनी शांतपणे सगळी माहिती काढून कोणतेही बालंट न येऊ देता नोकरीवरून न काढण्याचा निर्णय दिला. तारी माणूस म्हणून खूप चांगले होते. त्यांची साहित्यिकांत उठबस होती. ते स्वत: साहित्यिक असल्यामुळे त्यांच्या ओळखीही बऱ्यापैकी होत्या.

त्या काळी लघुअनियतकालिकांची चळवळ फोफावत होती. त्या काळात इमारतीच्या खाली कवींचा कट्टा म्हणून पायरीवर हे लिटिल मॅगझिनवाले बसत. त्यांच्या छोट्या-मोठ्या सभा होत. त्याच काळात माझी एका दाढीवाल्याशी, एम.ए. करत असलेल्या तुळशी परबशी मैत्री झाली. सुधारकर बोरकर, एकनाथ पाटील, मनोहर ओक, गुरुनाथ धुरी आणि इतर कवींचा अड्डा जमू लागला. या सर्वांत उठून दिसणाऱ्या गोऱ्या गोमट्या चंद्रकांत खोतचीही त्या काळात ओळख झाली. ती त्यावेळची पिढीच वेगळी होती. मला पण वाचनाची आवड निर्माण झाली. अक्षरक्ष: व्यसनच लागलं.

याच काळात तुळशी बरोबर मैत्री वाढली. त्यानं मला अमूक पुस्तक वाच, तुमक वाच. जास्त करून मराठी अनुवादित झालेली जगप्रसिद्ध पुस्तकांची नावं सांगितली. उदा. सात्रर्, कामू, डोस्टोव्हस्की, टॉलस्टॉय, चेखाव इ. ते वाचू लागलो. समजत नव्हतं तरी वाचत होतो. त्या वाङमयाची नंतर गोडी निर्माण झाली. अज्ञानाची कबुली देणं हा काही गुन्हा नाही, पण अज्ञान नष्ट करण्याचा प्रयत्न न करणं हा मात्र फार मोठा गुन्हा आहे. ग्रंथ हा असाच एक मित्र आहे. तो तुम्हाला जपतो. तुमच्या मनावर पुंकर घालतो, फुलोरा देतो. खाद्य पुरवतो. तुमचं आयुष्य सत्कारणी लावतो. मोकळ्या मनाला वाचण्यासारखा मित्र नाही. असे एकापेक्षा वाचकमित्र भेटत गेले.

माझे सहकारी मित्र मनोहर पारायणे यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी शिकता आल्या. ते आता या जगात नाहीत. २००९ साली एका छोट्याशा आजारानं त्यांना देवाज्ञा झाली. ते नेहमी म्हणत, ‘आमच्याकडे बँक बॅलन्स जरी शून्य असला तरी टॅक्स बॅलन्स भरपूर आहे.’

असेच एक, ‘कालनिर्णय’कार ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्याशी ओळख झाली. त्यांचं कार्यालय ग्रंथसंग्रहालयाच्या इमारतीमध्येच तळमजल्याला असल्यामुळे त्यांची रोज भेट होऊ लागली. त्यांना हवे असलेले संदर्भ त्यांना देऊ लागलो. त्यांचा धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान यांचा दांडगा अभ्यास होता. त्यांच्याकडे या विषयावरची शेकडो पुस्तकं होती. तेव्हा त्यांची दै. ‘लोकसत्ता’मध्ये ‘देवाचिये द्वारी’ ही लोकप्रिय लेखमालिका (१९९५) येत होती. त्यांना हवे असलेले संदर्भ पुरवत होतो. फार ज्ञानी माणूस होता. ते संदर्भ विभागात काम करणाऱ्या सर्व माणसांना मदत करण्यात तत्पर असत. पावसाळ्यात गरम गरम भजी मागवत. त्यांच्या बागेतील आंबे ते सर्व सेवकांना देत. इतरही मदत करत असत. निवृत्तीनंतर सहा महिने मला त्यांनी मदत केली होती. त्यांचा मुलगा जयराज साळगावकर यालाही वाङमयाची गोडी आहे. त्यालासुद्धा हवे ते संदर्भ पुरवत असे. ते दिवाळी अंक, वार्षिक कॅलेंडर सर्व संदर्भ सेवकाला भेट देत असत. त्यांचीही मला मदत होत होती.

अशीच एक घटना. संदर्भ विभाग सकाळी आठ वाजता उघडत असे. बरोबर आठच्या ठोक्याला एक बारीकशी उंच व्यक्ती येत असे. मी त्यांना १९७०पासून पाहत होतो. ती व्यक्ती म्हणजे प्रख्यात पोलिस चातुर्यकथा लेखक श्रीकांत सिनकर. त्यांच्या नावावर ७५-८० पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. त्यांच्याशी माझी घनिष्ट मैत्री झाली. सकाळी आठ ते दहापर्यंत त्यांचं लेखन चालायचं. ड्युटी संपल्यानंतर मी त्यांच्या घरी जात असे. रात्रीपर्यंत त्यांच्याबरोबर असे. कधी पोलीस स्टेशनमध्ये, कधी पार्टीला असा कार्यक्रम चालू असायचा. पुस्तक येत असल्यामुळे पैसाही येत होता. एका कथेचे दोन वेळा पैसे मिळत. नियतकालिकात सुरुवातीला छापून येई. नंतर तीच कथा पुस्तकात येत असे. नंतर अलाहाबादचे हिंदी मासिक ‘सत्यकथा’ आणि ‘मनोहर कहानियाँ’मध्येही त्यांच्या कथा येऊ लागल्या. या मासिकाकडून एका कथेचे हजाराच्या वर रुपये मिळत असत. पण तो काही फार दिवस राहत नसे. मित्रांना घेऊन पार्टी करणं, इतर काही करणं यात पैसा संपत असे.

मध्येच अलाहाबदला ट्रिप होई. त्यातच त्यांनी १९८४ साली लग्न केलं. ते तीन-चार वर्षंच टिकलं. नंतर नंतर फार वाईट दिवस आले. त्याबद्दल काही लिहिणं फारसं इष्ट ठरणार नाही.

परळ गावातून एक नवोदित धडपड्या कलावंत नुकताच ग्रंथालयात येऊ लागला होता. नाट्यकलावंत, चित्रपटकलाकार, दूरदर्शन कलाकार यामध्ये त्याचं पर्दापण झालं होतं. तो म्हणजे विकास कदम. त्यानं ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या टीव्ही सिरीअलमध्ये काम केलं आहे. त्याला स्क्रिप्टवर काम करायचं होतं. त्यासाठी त्याला विविध कथानकं, जागतिक कथानकं यांची माहिती हवी होती. ती मी माझ्याकडून दिली. सध्या तो हिंदी चित्रपट अभिनेता अजय देवगणकडे सहाय्यक म्हणून काम करत आहे.

२००७ साली ऑगस्ट महिन्यात एके दिवशी एक बारीक डोळ्याची ३०-३५ वयाची सुंदरशी जॅपनीज युवती ग्रंथालयात दाखल झाली. ती पीएच.डी.साठी जपानवरून आली होती. तिचा विषय होता – ‘एकोणिसाव्या शतकातील पश्चिम भारतातील अर्थशास्त्रीय विचाराचा विकास’. तिचं नाव आसुका नागाओ. तिला आमच्या ग्रंथालयातील काही दुर्मीळ पुस्तकं पाहायची होती. ती एक महिना मुंबईत होती. तिला आमचे झेरॉक्सचे नियम सांगितले. त्याप्रमाणे तिनं संदर्भ कार्यवाह यांची परवानगी काढली. तिला हवे असलेले संदर्भ दिले. त्या व्यतिरिक्तही इतर काही संदर्भग्रंथ पुरवले. तिच्याकडे वेळ कमी असल्यामुळे आम्ही तिला झेरॉक्स करून दिल्या. तिला मराठी-इंग्रजी व जॅपनीज भाषा येत होत्या. मराठी फारच कमी येत होती.

१९८०च्या आसपास अरविंद सोनावले एम.ए.साठी ग्रंथालयात येऊ लागले. त्यांच्या लाघवी स्वभावामुळे माझी मैत्री झाली. ते रिझर्व्ह बँकेत कामाला होते. एम.ए. झाल्यानंतर त्यांना कादंबरी लिहायची होती. त्यांचा विषय ग्रामीण असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या ग्रामीण कादंबऱ्या वाचावयास दिल्या. हे सर्व उद्योग ते नोकरी सांभाळून करत होते. १९८५ साली त्यांची ‘तलाठी’ ही कादंबरी प्रकाशित झाली. नंतर ते मला वारंवार भेटू लागले. आंबेडकर वाङमय वाचू लागले. त्यांना त्या विषयाचे विविध संदर्भ मी पुरवले.

२००२ साली एकदा ते म्हणाला, डॉ. नरेंद्र जाधव यांना तुम्हाला भेटायचंय. ते रिझर्व्ह बँकेच्या नवीन इमारतीत १२व्या मजल्यावर तज्ज्ञ सल्लागार म्हणून काम करत होते. सोनावले यांच्याबरोबर मी रिझर्व्ह बँकेत गेलो. तिथे सर्व सोपस्कार पूर्ण करून त्यांना भेटलो. एवढा मोठा माणूस असूनसुद्धा ते अगदी दिलखुलास बोलले. त्यांना त्यांचे दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये आलेले काही लेख हवे होते. २००० साली ‘शतकाचे शिल्पकार’ व २००१ साली ‘विश्व संकल्पनांचे’ ही दोन सदरे त्यांनी लिहिली होती. ती त्यांना हवी होती. ती मी त्यांना झेरॉक्स करून दिली.

श्रीकांत सिनकरमुळे डॉ. रवी बापट यांच्याशी १९८४ साली परिचय झाला. तो अजूनही आहे. त्यांनाही मी हवे असलेले संदर्भ पुरवतो.

आय स्पेशालिस्ट डॉ. त्रिविक्रम उर्सेकर यांची ओळख त्यांच्या पत्नी लता उर्सेकर यांच्यामुळे झाली. त्यांना मी विविध पुस्तकं देत असे. स्त्रीविषयक एका संस्थेच्या त्या अध्यक्षा होत्या. एका कार्यक्रमासाठी त्यांना लोकप्रिय कथाकार व. पु. काळे यांना कथाकथनासाठी बोलावायचं होतं. ते काम त्यांनी मला सांगितलं. सर्व काही ठरवून कार्यक्रम ठरला. त्यावेळी काळे वांद्रे इथं राहत होते. त्यांनी टॅक्सीनं घेऊन येणं आणि कार्यक्रमानंतर घरी पोचवणं ही जबाबदारी माझ्यावर होती. प्रवासात काळे यांनी मला बरेच अनुभव सांगितले. तो कार्यक्रम ग्रँट रोडला गावदेवी इथं होता. मी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात काम करतो म्हटल्यावर त्यांनी मला एक काम सांगितलं. त्यांच्या काही कथा वेगवेगळ्या नियतकालिकात छापलेल्या होत्या. नियतकालिकांची नावं त्यांना माहीत होती. पण वर्ष, महिना आठवत नव्हते. कथेची शीर्षकंही आठवत नव्हती. ती त्यांनी मला एका कागदावर लिहून दिली. त्या मी यथावकाश शोधून त्यांच्या झेरॉक्स प्रती दिल्या. निरोप घेताना ते म्हणाले, ‘मला एक नवीन मित्र मिळाला आज.’

२७ जून २०११ रोजी व. पु. काळे यांचं निधन झाल. त्यानंतर दोन वर्षांनी माझी भेट आयडिअल बुक डेपोच्या मंदार नेरुरकरांशी झाली. त्यांना मी सांगितलं की, व. पु. काळे यांच्या कुठल्याही पुस्तकात न आलेल्या काही कथा माझ्याकडे आहेत. त्यांनी मला पुण्याच्या मेहता पब्लिशिंग हाऊसशी संपर्क करून दिला. मंदारला त्या वर्षीच्या दिवाळी अंकांच्या संचासोबत भेटरूपात देण्यासाठी हे पुस्तक हवं होतं. त्या नवीन पुस्तकाचं नाव – ‘गोष्ट हातातील होती’. २००४च्या दिवाळी दरम्यान हा १४ कथांचा संग्रह प्रकाशित झाला. नंतर मंदारनं काळे यांची मुलगी, स्वाती चांदोरकर यांची भेट घडवली. त्यांनी माझा सत्कार करून मला एक भेटवस्तू दिली.

ग्रंथालीच्या सुदेश हिंगलासपूरकरांनी एका डॉक्टरशी परिचय करून दिला. ते म्हणजे पाठीच्या कण्याबाबतचे स्पेशालिस्ट डॉ. प्रेमानंद रामाणी. त्यांना आपल्या आईच्या नावानं गोव्यात फोंडा इथं ग्रंथालय सुरू करायचं होतं. ते आम्ही तिथं जाऊन त्यांना सुरू करून दिलं. ‘अहिल्याबाई रामाणी ग्रंथसंग्रहालय’ असं त्याचं नाव.

‘मराठी संशोधन मंडळा’चे वसंत दावतर संचालक असताना त्यांनी मी संपादित केलेली ‘ज्ञानेश्वर व्यक्ती काव्यलेखनविषय सूचि’ (१९६८ ते १९९०) सप्टेंबर १९९१साली प्रकाशित केली. ९६ पानांची ही सूची मराठी संशोधन मंडळानं प्रकाशित केली.

सुनील कर्णिक व प्रदीप कर्णिक यांना खूप मदत केली. इतर बऱ्याच लोकांची नावं जागेअभावी राहून गेली आहे.

या दहा-वीस वर्षांत ग्रंथालयात अनेक बदल झाले. वाचकवर्गही बदलला. ग्रंथालयात संगणक आले. ग्रंथालयाचा डाटा संगणकावर गेला. त्यामुळे जुनी कार्डे बाजूला पडली. पुस्तकाचे क्रमांक त्वरित मिळू लागले. इंटरनेट सुविधा आली. सीडीज आल्या. इतर उपकरणं आली. मायक्रोफिल्मिंगची सुविधा आली, ईमेल आला. ई-बुक सुरू झाली. अशा अनेक गोष्टींमुळे वाचकवर्ग बदलला असला तरी ग्रंथालयात येताना त्याला जुन्या पद्धतीला सामोरं जावं लागतं. जुन्याच पद्धती या ग्रंथालयात आहेत. सर्वच वाचन साहित्य नवीन तंत्रज्ञानानुसार उपलब्ध नाही. वर्तमानपत्रं नेटवर उपलब्ध असली तरी इथला वाचक मुद्रित वर्तमानपत्रासाठीच येतो. जुन्या\दुर्मीळ साहित्याचा साठा इथंच असल्यानं त्यासाठी त्याच्या वाचकाला इथंच यावं लागतं.

१६व्या शतकातील इंग्लिश तत्त्वज्ञ फ्रान्सिस बेकन म्हणतो, ‘काही पुस्तकाची नुसती चव घ्यायची असते, काही गिळायची असतात आणि काही मोजकी पुस्तके चाळून खाऊन पचवायची असतात. तपशीलात जाऊन आत्मसात करायची असतात.’

पुस्तकांचं हे ऋण न फिटणारं आहे. पुस्तकांमुळे माणसं घडवली जातात. संस्कृतीची जडणघडण होते आणि राष्ट्र मोठं होतं.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......