हा ग्रंथसागरू येव्हडा
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
टीम अक्षरनामा
  • ‘हा ग्रंथसागरू येव्हडा’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 13 April 2018
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो हा ग्रंथसागरू येव्हडा विवेक गोविलकर

‘युनायटेड आयर्न अँड स्टील’ ही पुरस्कारप्राप्त कादंबरी आणि ‘पाऊल वाजे’ हा कॉर्पोरेट जगातल्या कथांचा संग्रह, यानंतर विवेक गोविलकर यांचं ‘हा ग्रंथसागरू येव्हडा’ हे नवीन पुस्तक उद्या प्रकाशित होत आहे. लेखकानं गेल्या पाच वर्षांमध्ये ‘महाराष्ट्र टाईम्स’, ‘लोकसत्ता’, ‘सामना’, ‘साधना’, ‘मायमावशी’, ‘लोकमुद्रा’, ‘अंतर्नाद’, ‘ललित’ या नियतकालिकांमधून लिहिलेल्या इंग्रजी पुस्तक परिचय-परीक्षण, अशा स्वरूपाच्या लेखांपैकी काही निवडक लेखांचा समावेश या पुस्तकात आहे.

वाचनासाठी पुस्तकं निवडताना लेखकानं स्वतःवर विषयांचं बंधन घातलेलं नाही. ‘द न्यू यॉर्क टाईम्स’ किंवा ‘द गार्डियन’ यांसारख्या भारदस्त वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केलेल्या ‘बेस्ट सेलर्स’ किंवा वर्षभरातील सर्वोत्कृष्ट पुस्तकांच्या यादीतून, महत्त्वाची पुस्तकं निवडताना नोबेल, पुलित्झर, बुकर, डीएससी असे पुरस्कार मिळवणाऱ्या किंवा त्यांच्या अंतिम यादीत पोहचणाऱ्या पुस्तकांचा इथं विचार झालेला दिसतो. त्याचबरोबर, काही कारणांमुळे बातम्यांमध्ये किंवा प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत येणाऱ्या पुस्तकांच्या विषयांची सध्याच्या काळातली प्रस्तुतता किंवा बातमी-मूल्य, अशा गोष्टींनाही लेखकानं महत्त्व दिलेलं दिसतं. मुख्य म्हणजे, या संग्रहासाठी निवडलेली सर्व पुस्तकं नवीन आहेत. सर्व लेखांची वर्गवारी सहा भागांत केली आहे.

व्यवस्थापन आणि अर्थशास्त्र – या विभागात चार लेख आहेत. देवदत्त पटनाईक यांच्या ‘बिझनेस सूत्र’ या पुस्तकात, कर्मचारी आणि मालक यांची श्रद्धा आणि त्यातून निर्माण होणारा व्यवस्थापनाचा अस्सल देशी मार्ग, यावर विवेचन आहे.

२१व्या शतकातील अर्थशास्त्रावरील सर्वांत महत्त्वाच्या पुस्तकांपैकी मानल्या गेलेल्या ‘कॅपिटल इन द ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी’ या थॉमस पिकेटी यांच्या पुस्तकात, असमानतेची कारणं आणि उपाय यांच्यावर चर्चा आहे. ‘सुपर फ्रीकनॉमिक्स’ या पुस्तकात अर्थतज्ज्ञ लेविट आणि पत्रकार डबनर यांनी अर्थशास्त्रासारखा विषय खोडकरपणे आणि मनोरंजकरीत्या मांडलेला आहे. ‘द ग्रेट एस्केप’ या अर्थशास्त्रासाठी नोबेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे मानकरी अँगस डीटन यांनी गेल्या काही शतकांमधल्या मानवाच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला आहे.

इतिहास आणि आत्मचरित्रे – या विभागात नोबेल शांतता पुरस्काराची मानकरी मलाला युसुफझाई, पुलित्झर विजेती झुंपा लाहिरी, थरारकथांचे लेखक आणि खऱ्या आयुष्यातले गुप्तहेर फ्रेडरिक फोर्साइद आणि प्रखर बुद्धिनिष्ठ वैज्ञानिक रिचर्ड डॉकिन्स यांची आत्मचरित्रं आहेत. त्याच्या जोडीला रोमिला थापर यांचं इतिहास या विषयावर काही सखोल चिंतन आहे. शिवाय अफगाणिस्तानातील युद्ध, इतिहासातला जीझस आणि भारतीयांना अभिमानास्पद वाटणाऱ्या काही ऐतिहासिक घटना यावर काही प्रकाश टाकणारी पुस्तकं आहेत.

राजकीय आणि कायदेविषयक – ‘पॅट्रिअट्स् अँड पार्टिझॅन्स्’ या पुस्तकात सुप्रसिद्ध लेखक, इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी केलेली लोकशाहीवरची वादचर्चा आहे. अमेरिकन लेखक टिमथी स्नायडर यांनी अमेरिकेच्या सध्याच्या अध्यक्षांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून, हुकूमशाहीचा धोका कसा निर्माण होऊ शकतो, याबाबत दिलेला इशारा आहे. कायदेतज्ज्ञ झिया मोदी यांनी भारतीयांच्या समाजजीवनावर मोठा परिणाम करणाऱ्या, सर्वोच्च न्यायालयाच्या दहा निकालांची ओळख सर्वसामान्य वाचकांना सोप्या भाषेत  करून दिलेली आहे. ‘द गुड इमिग्रंट’ या निकेश शुक्ला यांनी संपादित केलेल्या पुस्तकात, इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या, विविध देशांच्या आणि वर्णाच्या स्थलांतरितांच्या अनुभवांवर आधारित लेखांचा समावेश आहे.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406

.............................................................................................................................................

विज्ञान, तंत्रज्ञान आणि वैद्यकशास्त्र – या विभागात मूळ भारतीय वंशाच्या डॉ. अतुल गवांदे यांचं वार्धक्य आणि अटळ मृत्यू, यावरचं सखोल चिंतन आहे. हिग्स बोसॉन या सूक्ष्मकणाच्या शोधासाठी अनेक राष्ट्रांनी एकत्रितपणे उभारलेल्या, ‘लार्ज हॅड्रॉन कोलायडर’ या महाकाय उपकरणाची आणि त्या प्रयोगाची माहिती आहे. इंटरनेट हे जनसामान्यांचं व्यासपीठ कसं होऊ शकेल यावर सखोल चर्चा आहे. हॉलिवुडच्या ‘इंटरस्टेलर’ या भन्नाट विज्ञान-चित्रपटात वापरलेल्या वैज्ञानिक संकल्पना, भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवणारे किप थॉर्न यांनी सुगम पद्धतीनं मांडलेल्या आहेत. नेयोमी क्लाईन यांनी वातावरणातील बदलांच्या संदर्भात सत्य परिस्थिती मांडून सर्वांना दिलेला इशारा आहे. ‘वॉट इफ?’ या पुस्तकात रँडॉल मुन्रो यांनी स्वतःच्या बेबसाईटवर लोकांनी पाठवलेल्या ‘मूर्खपणाच्या, हास्यास्पद, काल्पनिक किंवा बिनबुडाच्या’ प्रश्नांना, गंभीरपणे आणि विज्ञानाच्या आधारे उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

कादंबरी – या विभागात भारतीय आणि आंतरराष्ट्रीय लेखकांच्या सहा गाजलेल्या कादंबऱ्यांवरचे लेख आहेत. त्यात पेरूमल मुरुगन यांची वादग्रस्त ‘मादोरुबागन’ ही कादंबरी आहे. ‘अ थाऊजंड स्प्लेन्डीड सन्स’ ही अफगानिस्तानातल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या शोकांतिकेची कथा आहे. तिआनमेन स्क्वेअर या चौकात झालेल्या निरपराध आंदोलनकर्त्यांच्या झालेल्या शिराकाणाची कथा ‘डू नॉट से वी हॅव्ह नथिंग’ या कादंबरीत सांगितलेली आहे. ‘टू किल अ मॉकिंगबर्ड’ या गाजलेल्या कादंबरीचा पुढचा भाग ‘गो सेट अ वॉचमन’ या नावानं आलेला आहे. हॅरी पॉटरच्या यशानंतर जे. के. रोलिंग यांनी प्रौढांसाठी लिहिलेली पहिलीच कादंबरी, ‘द कॅज्युअल व्हेकन्सी’ आहे. ‘द सेलाउट’ या बुकर विजेत्या कादंबरीत, वंशद्वेषासारखा अजूनही धगधगणारा विषय हाताळला आहे. 

संकीर्ण – या विभागात ‘चेर्नोबिल प्रेअर’ या पुस्तकातून चेर्नोबिल अणुभट्टीच्या अपघाताचे सामाजिक परिणाम स्वेतलाना अलेक्सिविच या लेखिकेनं जगाला सांगितले आहेत. ‘वी शुड ऑल बी फेमिनिस्ट्स’ या पुस्तकातून, चिमामांडा अंगोझी अदीची या नायजेरिअन लेखिकेनं स्त्रीवादाचा व्यावहारिक अर्थ कुठल्याही प्रकारे आक्रस्ताळेपणा न करता, लोकांना पटवून दिला आहे. संपूर्णपणे वेगळ्या पद्धतीनं विचार करून आपले प्रश्न स्वतःच सोडवायला वाचकांना उद्युक्त करणाऱ्या पुस्तकातून लेविट आणि डबनर यांनी ‘फ्रिकनॉमिक्स’ची परंपरा ‘थिंक लाईक अ फ्रीक’ या पुस्तकातून पुढे नेली आहे. शेवटी लक्षावधी अनुयायांच्या प्रेमाचा आणि आदराचा विषय असलेले दलाई लामा, डेझमंड टूटू या दोन धर्मगुरूंमधल्या आनंदाच्या स्रोतांच्या शोधाबद्दलचा संवाद ‘द बुक ऑफ जॉय’ या पुस्तकात आहे.

या पुस्तकांत आलेल्या विषयांचं वैविध्य आणि त्यांचा आवाका फार मोठा आहे. वाचकांना त्यांची ओळख लेखकानं सोप्या भाषेत करून दिली आहे. हे लेख वाचून मूळ पुस्तक वाचण्याची उत्कंठा निर्माण होते आणि तेच या लेखांचं प्रयोजन आहे. नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेले लेख, वृत्तपत्रीय शब्दमर्यादेतच यावे लागतात. या संग्रहात सर्व लेख विस्तृत स्वरूपात आले आहेत. त्यामुळे या पुस्तकांची वाचकांना होणारी ओळख केवळ वरवरची राहत नाही. या पुस्तकाचं नाव ज्ञानेश्वरीमधल्या एका ओवीमधून घेतलं आहे. लेखकानं प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे, ‘इंग्रजी भाषेतला हा ग्रंथसागरु येव्हडा – त्याच्या तळाशी असणारं रत्नभांडार कितीही लुटलं तरी न संपणारं आहे!’

.............................................................................................................................................

हा ग्रंथसागरू येव्हडा - विवेक गोविलकर, अनघा प्रकाशन, ठाणे; पाने – २१२, मूल्य – ३०० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4407

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......