‘पुनश्च’ ही माझी खुमखुमी आहे, आणि मराठीत तर खुमखुमीची मोठी परंपरा आहे
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
किरण भिडे
  • ‘पुनश्च’ या डिजिटल मराठी नियतकालिकाचं बोधचिन्ह
  • Fri , 06 April 2018
  • ग्रंथनामा Granthnama वाचणारा लिहितो किरण भिडे Kiran ‌‌Bhide पुनश्च Punashcha डिजिटल मराठी नियतकालिक Digital Marathi Magzine

https://punashcha.com या जुने, दुर्मीळ पण कालसुसंगत लेख (विनामूल्य आणि सशुल्क या दोन्ही पद्धतीनं) उपलब्ध करून देणाऱ्या आगळ्यावेगळ्या डिजिटल मराठी नियतकालिकाला कालच्या ३१ मार्चला सहा महिने पूर्ण झाले. त्यानिमित्तानं या नियतकालिकाविषयीचा हा लेख...

.............................................................................................................................................

‘पुनश्च’ हे नाव आता काही हजार लोकांपर्यत पोचलं आहे. 'पुनश्च'चा माझ्या कल्पनेत जन्म झाला, तेव्हा ‘मी’ होतो, आता ‘आम्ही’ झालो आहोत. काही प्रश्न पडले होते. सोशल मीडियावर एवढं सगळं विनाशुल्क वाचायला मिळत असताना नाममात्र का होईना, पैसे देऊन कोणी लेख वाचतील का? मला जे महत्त्वाचं वाटतं ते लोकांनाही वाचायला आवडेल का? ‘पुनश्च’च्या काही महिन्यांच्या प्रवासात उजेड नक्कीच दिसला आहे, मात्र तो अद्याप बोगद्याच्या दुसऱ्या टोकाला आहे. त्या टोकाला पोचण्यासाठी आव्हानांचा बोगदा पार करून जायचं आहे. परंतु दिसलेल्या उजेडानं आमच्या पावलांना बळ दिलं आहे. ‘पुनश्च’ लोकांना हवं आहे. ‘पुनश्च’ ही जाणत्या वाचकांची गरज आहे याची झालेली जाणीव, हे गेल्या काही महिन्यांतील अनुभवाचं संचित आहे. ‘पुनश्च’ या डिजिटल नियतकालिकाची काय आहे जन्मकथा?

मी जेव्हा मराठी नियतकालिक सुरू करायचा निर्णय घेतला, तेव्हा अपेक्षेप्रमाणे ‘पैसे कमावण्याचे उद्योग सोडून हे घालवण्याचे उद्योग तुला का सुचतायत?’ या प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या. प्रकाशक, साहित्यिकांनीही ‘बरं चाललंय की रे तुझं… का हे?’ असंच विचारलं. त्यांचं तसं बरोबरही होतं. माधवबाग कार्डियाक क्लिनिक्स आणि मेतकुट हॉटेल यांच्या यशस्वी उभारणीनंतर आता त्यांच्या सावलीत बसून कष्टांची फळं खायचं सोडून ही उठाठेव कशाला, हा प्रश्न रास्त होता. पण मग खुमखुमी कशाला म्हणावं? खुमखुमीची मराठीत मोठी परंपरा मोठी आहे. १८३२ साली बाळशास्त्री जांभेकर यांनी वयाच्या विसाव्या वर्षी सुरू केलेलं ‘दर्पण’ साप्ताहिक ते विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून ते अगदी अलीकडच्या २३ व्या वर्षी ‘अक्षरमैफल’ सुरू करणाऱ्या मुकूल रणभोरपर्यंत ही दीर्घ परंपरा आहे.

ही खुमखुमी म्हणजे काहीतरी सांगण्याची, व्यक्त होण्याची उर्मी. समाजातला हरवत चाललेला विवेक, मूलभूत मूल्यांवरचा उडत चाललेला विश्वास आणि सांस्कृतिक बकालपण मला अस्वस्थ करत होतं. आणि म्हणूनच मराठी नियतकालिक सुरू करण्याचं मी ठरवलं. विचार पोचवण्याची, तो समजून घेण्याची आणि समाजात तो रुजण्याची प्रक्रिया, ही कमालीच्या संथ गतीनं होत असते. तो दीर्घ दमसास नियतकालिकातच असतो.

नियतकालिक सुरू करायचं ठरवलं. पण त्याच्यासाठी लागणाऱ्या अजस्त्र यंत्रणेमुळे, प्रचंड आर्थिक पाठबळामुळे दैनिक वा साप्ताहिकाची कल्पना बाद झाली. मासिक त्यातल्या त्यात आवाक्यात वाटत होतं. पण मासिकात साहित्य कोणतं घ्यावं याबद्दल काही निश्चय होत नव्हता. एक दिवस जुने दिवाळी अंक, न वाचलेले ‘रुची’,‘अंतर्नाद’चे वाचत असताना काही अप्रतिम लेख वाचायला मिळाले. शक्य असतं तर 'शेअर'चं बटन दाबून ते लेख मी माझ्या समविचारी मित्रमंडळीत पोचवले असते, असं मनात आलं. मग असंही वाटलं की, असे कितीतरी चांगले लेख आपले वाचायचे राहून गेलेले आहेत. आपल्यासारखेच खूप जणांचे राहून गेले असतील. असे निवडक लेख आपण आपल्या मासिकात दिले तर? असा विचार मनात आला आणि माझा कोणतं साहित्य घ्यावं हा तिढा सुटला.

एकेकाळी मोठी सांस्कृतिक जबाबदारी पेललेल्या ‘विविध ज्ञानविस्तार’, ‘चित्रमय जगत’पासून ‘सत्यकथा’, ‘माणूस’, ‘अभिरुची’, ‘हंस’, ‘वसंत’, ‘किर्लोस्कर’ यासारख्या शेकडो नियतकालिकांतील उत्तमोत्तम लेख निवडून ते वाचकांपर्यंत पोचवायचे हा विचार पक्का झाला. मासिक काढायचं ठरलं. पण ते कोणत्या स्वरूपात काढावं? प्रिंट की डिजिटल? माधवबागसाठी ‘आरोग्यसंस्कार’ मासिक चालवण्याचा आठ-नऊ वर्षांचा अनुभव होता. शिवाय भानू काळेंच्या परिचयामुळे ‘अंतर्नाद’ मासिकाशी गेली पाच वर्ष संबंध होता. पण या दोन मासिकांच्या पोस्टेजचा अनुभव चांगला नव्हता. पोस्टाचे दर स्वस्त वाटले तरी सभासदांपर्यंत ते अंक पोचवताना खूप त्रास होतो. मग अचानक मनात आलं की, डिजिटल मासिकच काढावं. प्रिंट, कागद, पोस्टेज वगैरेची भानगडच नाही. एक कळ दाबली की, अंक सभासदाच्या मोबाईलवर किंवा कॉम्प्युटर स्क्रीनवर. शिवाय किती प्रती काढायच्या वगैरे गोष्टीही निकालात निघाल्या.

मग लक्षात आलं की, अंक डिजिटल असेल तर तो ‘मासिक’ स्वरूपात देण्याची सक्ती नाही. दहा-बारा लेख देण्याचीही गरज नाही. आपण दर दोन-तीन दिवसांनी एकेक लेख पण देऊ शकतो. लेखाच्या शब्दसंख्येलासुद्धा मर्यादा घालणं गरजेचं नाही. पाहिजे तितकी चित्रं, फोटो टाकू शकतो. मधेच वाटलं तर एखादी लिंक, एखादा व्हिडिओ… ज्यामुळे लेखाला अधिक उठाव मिळेल. मराठीतील कठीण शब्दांचे अर्थही देऊ शकतो. जेणेकरून नव्या पिढीलादेखील वाचताना सोपं जावं. एकेक गोष्टी सुचत होत्या. तंत्रज्ञानामुळे हे साहित्य आता मोबाईलवर कॉम्प्युटरवर पोचणं सहज शक्य झालं आहे. या कल्पनेनं मी झपाटून गेलो.

अंकाचं नाव काय ठेवावं हा प्रश्न आला. मी निवडणार असलेलं साहित्य जरी जुन्या अंकातलं होतं, तरी ते आशयाच्या अर्थानं जुनं असणार नव्हतं. कालसुसंगत असेच लेख निवडायचे हे ठरलं होतं. वाचकांची अशी गैरसमजूत होऊ द्यायची नव्हती की, ‘यांनी पुराणातील वांगी पुन्हा काढली’. ‘oncemore’, ‘निवडक’, ‘संपादित’ अशा विविध नावांचा विचार करता करता मला ‘पुनश्च’ हे नाव चपखल नाव सापडलं. त्याचा शब्दशः अर्थ ‘आणि पुन्हा’ असा आहे; मात्र या शब्दात एक गर्भित आशावादही आहे. प्रबोधनाचे प्रयत्न, प्रक्रिया निरंतर आहे, हे या शब्दातून सूचित होतं असं वाटलं.

या डिजिटल नियतकालिकाचं नाव नक्की झालं, पण ते एका डोक्याचं आणि दोन हातांचं काम नव्हतं. मग शोध सुरू झाला. सुधन्वा, सचिन भेटले. मग पद्धतशीर विचार सुरू झाला. ललित साहित्याचे २१ प्रकार केले. अनुभवकथन, चिंतन, पुस्तक, काव्य, चित्रपट, कला रसास्वाद, अर्थकारण, समाजकारण, व्यक्ती/संस्था परिचय, विनोद, उपरोध, माहिती, विज्ञान, शिक्षण, पालकत्व, स्व-मदत इत्यादी.

लोकांच्या माहितीत भर पडली पाहिजे, त्यांना नवा विचार कळला पाहिजे किंवा त्यांचे निखळ मनोरंजन व्हायला हवं, असे लेखांच्या निवडीचे काही निकष ठेवले.

एवढे जुने आणि वैविध्य असलेले अंक कुठे एकत्र मिळतील? अशी चौकशी करत असताना कुमार केतकरांनी बदलापूरच्या 'ग्रंथसखा'चं नाव सुचवलं. त्यानुसार श्याम जोशी सरांना भेटलो आणि अक्षरशः अवाक् झालो. ठाण्यातले मराठी ग्रंथ संग्रहालय पण उपयोगी ठरलं. तिथंही भरपूर जुने अंक उपलब्ध आहेत. महाराष्ट्रात अशी शेकडो ग्रंथालयं आहेत, कितीतरी खासगी संग्राहक आहेत. त्यांच्याकडे असा कितीतरी खजिना पडलेला आहे. त्याला जर डिजिटल प्रकाश आपण दाखवू शकलो, पुनश्च वाचकांसमोर आणू शकलो तर ते मोठंच काम होईल याची खात्री पटली. मार्ग योग्य असल्याची खात्री ही त्या रस्त्यानं जाण्याचा उत्साह वाढवणारी असते.

निःशुल्क ऑनलाइन साहित्याच्या भाऊगर्दीत ‘पुनश्च’ हरवून जाऊ नये, कमी वाचकांपर्यंत पोचलं तरी चालेल पण चोखंदळ, पैसे देऊन वाचायची तयारी असलेले वाचक लाभावेत म्हणून हा उपक्रम नाममात्र सशुल्क करण्याचा निर्णय आम्ही घेतला. कारण वार्षिक १०० रुपये म्हणजे टोकन शुल्कच म्हणावं लागेल. ‘पुनश्च’ची तयारी सुरू असताना दै. ‘लोकसत्ता’चे गिरीश कुबेर भेटले. त्यांना ही कल्पना सांगताच त्यांनी ताबडतोब त्यावर लेख लिहायला सांगून तो ‘लोकरंग’ या रविवार पुरवणीत प्रसिद्ध केला. त्यामुळे ‘पुनश्च’ एका झटक्यात दर्दी वाचकांपर्यंत पोचलं. पाठोपाठ ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘सकाळ’, ‘दिव्य मराठी’, ‘लोकमत’ अशा सगळ्याच वृत्तपत्रांनी प्रसिद्धी दिली. त्यामुळे ‘पुनश्च’ला लगेचच ओळख मिळाली. वाचक मिळाले.

गेल्या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावरहा प्रवास सुरू झाला. त्याला जसा जसा प्रतिसाद मिळतो आहे, तशा जबाबदारी वाढते आहे आणि त्यातली आव्हानंही पुढे येत आहेत.

मोठं आव्हान आहे- ते उत्तमातले उत्तम लेख शोधण्याचं, ते निवडण्याचं. दुसरं आव्हान आहे- तेवाचकांना तंत्रज्ञानाभिमुख करण्याचं. कारण पुस्तका-मासिकांच्या पानांकडून लोकांना मोबाइल-लॅपटॉपच्या स्क्रीनकडे घेऊन जायचं आहे. आजही अनेकांचा लिखित शब्दावर जास्त विश्वास आहे, मुद्रित माध्यम त्यांना जास्त जवळचं वाटतं. समोर भौतिक स्वरूपात जे दिसेल ते सत्य, बाकी ऑनलाईन वगैरे मिथ्या असं मानणाऱ्यांचा मोठा गट आहे. डिजिटल माध्यमाकडे टाईमपास म्हणून पाहणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. टीपॉयवर पडलेलं मासिक जितक्या सहजतेनं उचललं जातं, हाताळलं जातं, तेवढं हे माध्यम दृश्य नाही. म्हणजे मोबाईल किंवा कॉम्प्युटर सुरू केल्याशिवाय याचं अस्तित्व शून्य असतं.

मात्र काही फायदेही आहेत. प्रिंट स्वरूपातील मासिक वाचकाच्या घरी पोचल्यावर ते कोणी वाचतंय की, नाही हे कळण्याचा मार्ग नव्हता. डिजिटल माध्यमात प्रत्येक लेख किती जणांनी वाचलाय ते सहज कळतं. काय वाचलं जातं, काय नाही, कशावर अधिक प्रतिक्रिया येत आहेत हेही कळतं. जुनी मासिकं ज्यांनी जतन केली आहेत, त्यांच्याकडून ती मिळवणं हे तसं कठीण काम आहे. मासिकं कमालीच्या नाजूकपणे हाताळावी लागतात, नाहीतर त्यांची पानं लगेच फाटतात. बाइंड केलेल्या अवस्थेत अंक असतील तर पानांचे फोटो काढणं अवघड होतं. वाळवी आणि धूळ हेही या जुन्या मासिकांचे शत्रू आहेत. त्यापासून त्यांना वाचवणं हे एक स्वतंत्र कार्य आहे. लेख मिळाल्यावर त्या लेखाच्या लेखकाला ( किंवा वारसाला ) शोधणं आणि त्याच्या कॉपीराईटचे पैसे देणं, हे तर मोठंच दिव्य आहे.

सरकारनं कितीही गवगवा केला तरीही आपला भारत ‘डिजिटल इंडिया’ होण्यापासून अद्याप कोसो दूर आहे, हेच वास्तव आहे. ‘पुनश्च’चं शुल्क ऑनलाइन भरा सांगितल्यावर जे अनुभव येतात त्यावरून हे कळतं. एका विशिष्ट वयातील लोकांना ऑनलाईन ही कटकट नकोशी वाटते. ‘पुनश्च’ला जसा तरुण वाचकांचा प्रतिसाद वाढत जाईल, तशी या प्रश्नांची तीव्रता कमी होत जाईल आणि ती कमी होत आहे, हे आताच दिसतंही आहे. उत्तम साहित्याचा प्रसार करण्याबाबत ‘पुनश्च’कडे बऱ्याच योजना आहेत. प्रारंभिक प्रतिसादानंतरचा टप्पा कसा जातो, यावर पुढील प्रवास अवलंबून असणार आहे.

.............................................................................................................................................

लेखक किरण भिडे ‘पुनश्च’ या डिजिटल मराठी नियतकालिकाचे संस्थापक संपादक आहेत.

kiranvbhide@gmail.com

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

vishal pawar

Tue , 10 April 2018

पुढील वाटचालीस शुभेच्छा.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......