उपेक्षित जातींची उपेक्षित खाद्यसंस्कृती
ग्रंथनामा - झलक
शाहू पाटोळे
  • नव्या आणि जुन्या आवृत्तींची मुखपृष्ठं
  • Sun , 20 November 2016
  • ग्रंथनामा Granthnama झलक अन्न हे अपूर्णब्रह्म शाहू पाटोळे Shahu Patole

‘अन्न हे अपूर्णब्रह्म’ या शाहू पाटोळे यांच्या पुस्तकाची १० फेब्रुवारी २०१५ रोजी पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. त्यानंतरची त्याची नवी ‘पुनर्लिखित’ आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे. मुळावृत्तीतील ‘संतसाहित्यामधील’ घेतलेला मागोवा तसाच ठेवून, बाकी संपूर्ण भागांचं लेखन पुनश्च केलंय. मुळावृत्तीतील आशयाला किंचितही धक्का न लावता, फेरमांडणी करताना त्यात वाचनसलगता आणि विस्तृतपणा आल्याचे वाचकांना जाणवेल; अशी अपेक्षा आहे. या पुस्तकाच्या लेखकाच्या मनोगताचा संपादित अंश…

 

 ‘शाकाहार श्रेष्ठ की मांसाहार श्रेष्ठ’ हा वर्षानुवर्षे चर्चिला जाणारा विषय आहे. अशी चर्चा घडवून आणणारे शाकाहारीच असतात. तसंच ‘शाकाहार हाच मानवी आहार’ असल्याचं तावातावाने मांडणारे या वादात एकटेच जिंकतात. कारण मांसाहाराचं समर्थन करणारे किंवा प्रचारक असे कुठं दिसतंच नाहीत. तरीही मांसाहारी लोकांची संख्या वाढताना दिसते. शाकाहाराचा प्रचार करणारे त्याबद्दल सातत्याने लिहीत असतात. धर्म आणि तत्संबंधींच्या कार्यक्रमांचे प्रसारण करणाऱ्या असंख्य वाहिन्या, वर्तमानपत्रं, प्रचारकी साहित्य, सत्संग यातून शाकाहाराचं गुणगाण चाललेलं असतं. शाकाहार इतका श्रेष्ठ असेल; तर मांसाहाराचा कुठलाही प्रचार, प्रसार, चर्चा, सार्वजनिक ठिकाणी वाद-विवाद  न करताही; सदासर्वकाळ मांसाहार करणारांचं प्रमाण शाकाहाऱ्यांपेक्षा कितीतरी पटींनी अधिक का राहिलं आहे? शाकाहाराचं समर्थन करणाऱ्या एवंविशिष्ट वर्णातील, जातीतील लोक मोठ्या प्रमाणावर मांसाहाराकडे का वळताहेत? शाकाहारी चळवळीच्या प्रचारकांना मांसाहाऱ्यांच्या आरोग्याची इतकी काळजी कशासाठी? मुळात कुणी काय खावं, आपल्या स्वयंपाकघरात काय रांधावं, हे सांगण्याचा अधिकार कुटुंबाबाहेरच्यांना कुणी बहाल केलाय? हा दुसऱ्यांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणण्याचा प्रकार कुणालाही वाटू नये? मांसाहाऱ्यांनी कधी शाकाहाऱ्यांना कौटुंबिक मांसाहार करण्याची जबरदस्ती केल्याचं उदाहरण नाही.

शाकाहाराच्या प्रचारकांसमोर मांसाहारी स्वत:ला मानसिक पातळीवर अपराधी समजतात. याची कारणं इथल्या धार्मिक वर्णव्यवस्थेत दडलेली आहेत. वर्णीयदृष्ट्या जे सामाजिक गट शाकाहारी आहेत; ते आजही स्वत:ला इतरांपेक्षा श्रेष्ठ मानतात. त्यांच्या वर्णश्रेष्ठत्वाचा अहंकार, दर्प त्यांच्या सामाजिक वागणुकीतून, प्रचारातून सातत्याने जाणीवपूर्वक दिसतो. शाकाहार इतका उच्च दर्जाचा असेल; तर अतिशुद्ध शाकाहाऱ्यांना हृदयरोग का जडावेत? शाकाहार इतका श्रेष्ठ असेल तर विज्ञानात, अंतराळक्षेत्रात मांसाहाऱ्यांनी इतकी प्रगती कशी केली? त्यांच्या तंत्रज्ञानावर आधारलेल्या मोटारी, भ्रमणध्वनी संच आणि संगणक कशाला वापरावेत? टॅब काय शाकाहारी संस्कृतीतील लोकांनी तयार केलेत? ज्या काळात या देशात अनुष्ठानं आणि सात्त्विक आहाराचं अत्युच्च टोक गाठलेलं होतं, तेव्हा मांसाहाऱ्यांच्या देशात गॅलिलीओसारख्यांना छळलं जात होतं आणि ऑक्सफर्डसारखी विद्यापीठं स्थापन होत होती, त्याचं काय? आजचं आधुनिक तंत्रज्ञान हे जर मांसाहारी संस्कृतीच्या देशांनी तयार केलेलं असेल, तर त्या देशांच्या अर्थव्यवस्थेला शाकाहारी मंडळी हातभार लावत नाहीत? गाड्या, संगणक, टॅब यासारख्या असंख्य परदेशी वस्तूंचा व्यापार करून उपजीविका करणारा कोणता वर्ग आहे? या देशावर मांसाहारी संस्कृतीतील लोकांनी आठ-नऊशे वर्षे राज्य केलं, ते कुणाच्या जीवावर? शाकाहाराचा बागुलबुवा उभा करून आपापल्या वेगळ्या वस्त्या उभे करणारे कोणत्या वर्गातील आणि कोणत्या वर्णाचे असतात?

शाकाहाराचे पुरस्कर्ते नेहमी उदाहरणं देतात की, शाकाहारी असलेल्या प्राण्यांची पिल्लं जन्मल्याबरोबर लगेच उभी राहून चालायला, पळायला लागतात. (उदा. हरीण किंवा इतर तृणभक्षी प्राणी) मांसाहारी प्राण्यांच्या पिलांचे डोळे लगेच उघडत नाहीत. ते आपल्या जन्मदात्यांवर बराच काळ अवलंबून असतात. (उदा. मार्जार कुळातील प्राणी, श्वानवर्गीय वगैरे) हे झालं प्राण्यांचं. पण माणूस हा सुद्धा ‘प्राणी’च आहे हे सोयीस्कररित्या विसरलं जातं. माणूस हा शाकाहारी असो की, मांसाहारी; तो तर आपल्या पिलांची वर्षानुवर्षं काळजी घेतो. इतकंच नव्हे तर मनुष्यप्राणी आपल्या पिलांच्या पिलांची आणि भविष्यात जन्माला येणाऱ्या वांशिक पिलांची जगण्याची तरतूद, बेगमी करण्यासाठी आयुष्य घालवतो. का? त्याची पिलं त्याच्यावर निम्म्यापेक्षा अधिक आयुष्य अवलंबून का राहतात? आपलंच पिलू सर्वश्रेष्ठ असावं, त्यानं आपल्या घराण्याचं नाव मोठ्ठं करावं, त्यानं आपल्या ऐकण्यात असावं, आपण सांगेल तोच आयुष्याचा जोडीदार निवडावा असं जंगलातल्या शाकाहारी- मांसाहारी प्राण्यांना वाटत असल्याचं कुठं आढळत नाही. का?

सात्त्विक आणि शाकाहारी आहाराचा प्रचार करणाऱ्या वर्गातील किती लोक शेतात घाम गाळतात? कितीजणांचे जीवनमान थेट शेतीवर अवलंबून आहे? ते ‘अडते’ असतील. म्हणे, अन्न शिजवणाऱ्यांच्या भावना अन्नात उतरतात आणि खाणाऱ्या माणसाचे मानसिक भाव तसे होतात. शेतात अन्न पिकवणाऱ्यांचे, त्यांची जोपासना करून उस्तवार करणाऱ्या श्रमिकांचे भाव त्या धान्यात उतरत नसतील? धान्य पिकवणारा माणूस शाकाहारी आहे की मांसाहारी हे ते बघतात का? अन्नधान्याचा एखादा ‘कोल’ कुणा शाकाहाराच्या कट्टर पुरस्कर्त्याने बनवल्याचं ऐकिवात नाही. जसा आहार घेतला जातो, तशी त्या माणसाची वृत्ती बनत असेल तर जो धान्य पिकवतो, काबाडकष्ट करतो, त्याची वृत्ती त्या पिकात उतरत नाही; हे कुठल्या प्रयोगशाळेत सिद्ध करायचं?

मुळात कुणी काय खावं ही ज्याची त्याची वैयक्तिक, खाजगी बाब आहे. सात्त्विक खाण्यामुळे माणूस ‘सत्शील’ बनत असता तर एतद्देशीय संस्कृतीत जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्था कशाला टिकली असती? धर्माच्या नावावर शोषण आणि परावलंबित्व जोपासलं गेलं नसतं. माणूस काय खातो, यापेक्षा तो इतरांशी आणि समाजात कसा वागतो हे बघायला हवं. कोणत्याही आहाराचा गंड किंवा श्रेष्ठत्त्व बाळगण्यापेक्षा इतरांच्या जगण्यावर अजानतेपणीही मर्यादा येणार नाही, व्यक्तिस्वातंत्र्यावर कुरघोडी होणार नाही याची दक्षता बाळगणं; हीच खरी संस्कृती आणि तोच खरा ‘सात्त्विक’!

या लेखनामागचा उद्देश शाकाहाराची हेटाळणी करणं किंवा प्रतिवाद करणं हा नाही. अथवा मांसाहाराचा पुरस्कार, प्रचार करणं हा नाही. संस्कृतीच्या विकासात आहार, विहार, आचार आणि खाद्यसंस्कृती यांचाही निरंतर विकास होत असतो. एतद्देशीय संस्कृतीत सर्वसमावेशक खाद्यसंस्कृतीचा विकास होण्याऐवजी ती वर्ण आणि जातीव्यवस्थेत बद्ध केल्याचं आढळलं. सात्त्विक, राजस आणि तामस असे तीन आहारवर्ग ठरवून त्यांना वर्णबद्ध करण्यात आलं. ज्या प्रकारचा आहार जो वर्णीक घेतो, तशीच त्याची वृत्ती आणि मानसिकता असते हा निर्णय, निष्कर्ष धर्मग्रंथांनी आणि त्यांच्या फॉलोअर्सनी घेऊन टाकला होता. त्याला विरोध करण्याची किंवा विरोध दर्शवण्याची कुणाचीही बिशाद नव्हती. जिथं देवसुद्धा आहारांमध्ये बद्ध करून ठेवले होते, तिथं सामान्य माणसाची काय बिशाद? जसा आहार तसा वर्ण तसेच देव आणि जसे देव तसाच त्या वर्णातील व्यक्तींचा आहार. जसा आहार तशीच त्यांच्या देवाची आणि व्यक्तींची वृत्तीही.

त्यातही जे इतरांच्या श्रमाच्या आधारे जगत, शारीरिक श्रम करत नसत ते सात्त्विक आहार घेत, चातुर्मास पाळत. इतर वर्णीयांना आपापल्या परीने आहार सेवन करण्याची मुभा होती.

एतद्देशीय संस्कृतीत खाद्यसंस्कृती, वर्ण आणि जात वेगळी करता येत नाही. जन्मत:च जात जशी चिकटते, तसाच आहारही चिकटायचा. एतद्देशीय संस्कृतीतील (घाटावरील) याच संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेल्या दोन जाती म्हणजे पूर्वाश्रमीचे महार आणि मांग. या जाती जशा उपेक्षित तशीच त्यांची खाद्यसंस्कृतीही. या जातींतील प्रमुख आहार आणि काही पदार्थांना शब्दबद्ध करण्याचा आणि सामाजिक, धार्मिक श्रेणीचा मागोवा घेण्याचा हा लेखनप्रयत्न. या जातीत ज्यांनी जन्म घेतला त्यांना त्यात नावीन्य, थ्रील वाटणार नाही. याच जातीत जन्मलेल्या १९७२ च्या दुष्काळानंतरच्या शहरी पिढीला हे नवीन वाटण्याची शक्यता आहे. आहाराचा विषय निघाल्यावर चारचौघात कानकोंडं होण्याची कित्येक उदाहरणं घडलेली आहेत. माझ्या सख्ख्या भावंडांनासुद्धा मी हे लिहीत असताना आवडलं नव्हतं. या लेखनात खूप त्रुटी आहेत. कारण मी विचारवंत, सामाजिक संशोधक, संत साहित्याचा ‘गाढा’ अभ्यासक किंवा धर्म, संस्कृती यावर भाष्य करणारा अधिकारी, विदुषी नाही. इतर जातींच्या वाचकांना किंवा याच जातींच्या इतर प्रदेशातील जनांना वाटेल की, त्यात आमच्या ‘खाद्यसंस्कृती’बद्दल काहीच नाही. त्यासाठी लिहिण्यास ते प्रवृत्त झाले तर आनंदच वाटेल. कुणाला हे मांडल्याबद्दल रागही येईल; पण वास्तव कसं नाकारणार?

कोणतंही तंत्रज्ञान एकटं येत नसतं. ते आपली संस्कृती सोबत घेऊन येतं आणि नवी संस्कृती तयारही करत असतं. तेच आज गल्लोगल्ली, मॉलामॉलात मिळणाऱ्या तयार खाद्यपदार्थांच्या आणि पोळीभाजी केंद्रांच्या संस्कृतीसमोर स्थानिक, वर्णीय, वर्गीय खाद्यसंस्कृती हळूहळू फॅशन आणि युनिकच्या पातळीवर येईल. कोणतीही संस्कृती मग ती खाद्यसंस्कृतीही का असेना, सेंद्रीय पद्धतीने लुप्त झाल्यास समर्थनीय ठरले असते. पण तसं होईल अशी सुचिन्हं नाहीत. म्हणून आपापल्या खाद्यसंस्कृतीच्या ठेव्यांचे निदान डॉक्युमेंटेशन करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे.

वीस वर्षांपूर्वी एका तत्कालीन प्रथितयश मराठी दैनिकात खाद्यजीवनासंबंधींचं सदर लोकप्रिय होतं. मी उत्साहाने मला माहीत असलेल्या खाद्यपदार्थांविषयीचा आढावा घेणारा लेख त्या दैनिकाकडे पाठवला; पण तो छापला नाही. आणखी दोन ठिकाणी पाठवला. छापला नाही. मित्रांमध्ये खाद्यसंस्कृतीबद्दलची माझी टोकाची मतं ठावूक आहेत. दीडेक वर्षांपूर्वी मी त्यावर एक लेख लिहिला होता. तर जयदेव डोळे म्हणाला की, “तू हे सर्व सविस्तर लिही.’’ हे सविस्तर होऊन त्याचं पुस्तक होईल याची मला तेव्हा खात्री काय, विश्वासही नव्हता. कदाचित तो श्रीकांत उमरीकरला असावाच. ‘स्व’चा शोध घेण्यासाठी मराठी जनसामान्याना माहीत असलेल्या ठांथांपुरते मर्यादित वर्तुळ आखून घेतलं. त्यातही लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी व ज्ञानेश्वरांचे अभंग आणि तुकाराम गाथा इतकंच वाचायचं ठरवलं होतं. हळूहळू ‘स्व’ चा खाद्यशोध घेता-घेता जातींच्या स्थाननिश्चितीचा शोध घेण्याची इतकी चटक लागली की, नामदेव गाथा, एकनाथी भागवताचे (एकादश स्कंधाचे) दोन खंड, गाथासप्तशती वाचले. ही चटक लावली, पुरवली श्रीकांतनेच. गेले दीड वर्ष मी ग्रंथमय झालो होतो. अगदी जवळचे धनंजय चिंचोलीकरसारखे मित्राप्त भेटले की, मी धार्मिक ग्रंथ आणि त्यातील ‘वैचारिक कॉपी कट पेस्ट’ करून त्यांचा कंटाळा येईस्तोवर सत्संग घ्यायचो. हे धार्मिक ग्रंथ मी त्यांचा पूर्ण आदर राखूनच वाचले; पण त्यातील ‘तत्त्वज्ञानापासून’ मात्र मी ‘निर्लिप्त’ राहिलो. कारण त्यांत ‘स्व’ ला कुठेच मान, सन्मान किंवा स्वतंत्र अस्तित्व नसल्याचं जाणवत होतं. त्याचा कधी राग आला नाही, पण खंत कायम राहील. कारण व्यवस्थेसमोर सगळेच वातकुकुट होत गेलेलं. या लेखनात पुनरुक्त्या आहेत. त्या टाळल्या असत्या तर मतामतांतील रिपीटेशन्स लक्षात आली नसती. संत एकनाथ म्हणतात त्या प्रकारात मी बसतो. कारण ते म्हणतात त्याप्रमाणे मीही असावा :

विवाद वादे हें तो अधम लक्षण ।

भक्तीचें कारण न साधे येणे ॥                                                     

अन्न हे अपूर्णब्रह्म - शाहू पाटोळे, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद, पृष्ठे - २७२, मूल्य - ३०० रुपये.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......