शिक्षणानं ‘ज्ञान’ मिळेल, त्याचं शहाणपणात’ आणि शहाणपणाचं ‘विशाल दृष्टीत’ रूपांतर यायला हवं
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
इंदुमती जोंधळे
  • अकरावे कुमार साहित्य संमेलन, बांदा
  • Fri , 19 January 2018
  • ग्रंथनामा Granthnama वाचणारा लिहितो अकरावे कुमार साहित्य संमेलन 11ve Kumar Sahitya Sanmelan बांदा Banda इंदुमती जोंधळे Indumati Jondhale

गोव्याच्या प्रवेशद्वारावरील महाराष्ट्रातील बांदा हे शेवटचं गाव. या गावी ३ जानेवारी २०१७ रोजी अकराव्या कुमार साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याच्या अध्यक्षा ज्येष्ठ साहित्यिका इंदुमती जोंधळे यांचं अध्यक्षीय भाषण...

.............................................................................................................................................

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो. आज आपण सगळेजण नव्या उत्साहानं, आनंदानं या छोट्या कुमार साहित्य संमेलनात सहभागी झालो आहोत. त्याबद्दल प्रथम तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आणि अभिनंदन. नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईच्या वतीनं अकरावे कुमार साहित्य संमेलन बांदा इथं होत आहे.

शालेय वार्षिक स्नेहसंमेलनाचा खर्च टाळून दरवर्षी अकरा ते बारा विद्यालयं व दोन कनिष्ठ महाविद्यालयातील कुमार वयातील मुलांना पुस्तकं वाचनाची गोडी लागावी, लेखक, कवींची भेट व्हावी. त्यांनी प्रश्न विचारावेत, त्यांच्या अंगी सभाधीटपणा यावा, त्यांना चांगली सुसूत्रपणे विषयाची मांडणी करता यावी, ही विधायक दृष्टी डोळ्यासमोर ठेवून बांद्यातील साहित्य प्रेमी हे संमेलन भरवतात. खरोखरच ही अत्यंत कौतुकाची,  स्पृहणीय आणि इतरांसाठी प्रेरणादायी बाब आहे.

आजच्या धावपळीच्या यंत्र युगात लघुत्तम कुटुंबातील मुलं आयपॅड व मोबाईलमध्ये गुरफटलेली आहेत. त्यांना त्यापासून दूर ठेवण्यासाठी खेळाची मैदानं, पुस्तकं, छान छान गोष्टी ऐकवणं फार गरजेचं झालं आहे. त्यांची निसर्गाशी ओळख व्हावी. चंद्र, सूर्य, तारे, आकाश, नद्या, समुद्र, डोंगर, पशुपक्षी पाहता यावेत म्हणून घरातील ज्येष्ठांनी व समाजभान असलेल्या कार्यकर्त्यांनी, आई-वडीलांनी त्यांना वेळ देणं गरजेचं आहे. यू-ट्यूब व व्हिडिओबाहेर फार मोठा जिवंत निसर्ग आहे. विश्व आहे. जीवनापलीकडे पाहण्याची विशाल दृष्टी त्यांना यावी म्हणून पालक, शिक्षकांनी वेळ द्यायला हवा. मुलांच्या या संस्कारक्षम वयात त्यांच्या संवेदनशील मनाचा, वाढत्या बदलत्या शरीरधर्माचा विचार व्हायला हवा. त्यांना हळूवारपणे समजून, उमजून घेणं याच वयात आवश्यक आहे.

साठोत्तरी काळात कुमारांसाठी ज्यांनी आवर्जून लिहिलं असे बालकवी ठोंबरे, ग.दि.माडगूळकर, आचार्य अत्रे, गोपीनाथ तळवळकर, वसंत बापट, विंदा करंदीकर, शांता शेळके, भा.रा.भागवत, राजा मंगळवेढेकर, ग.ह.पाटील, ह.शि.खरात, सरिता पदकी या मंडळीबरोबरच कुमारांसाठी सत्तरीनंतर महावीर जोंधळे, बाबा भांड, माधुरी पुरंदरे, भारत सासणे, दिलीप प्रभावळकर, ल.म.कडू, सूर्यकांत सराफ, सुभाष वसेकर, स्वाती राजे, लीला शिंदे, लीला शहा, माधुरी माटे, किशोर पाठक, संगीता बर्वे, ज्ञानदा नाईक, अनिल अवचट, अनंत भावे, राजीव तांबे, दासू वैद्य, ज्ञानदा असोलकर, सुरेश सावंत या लेखक-कवींचं लेखन कुमारवयातील मुलांच्या समोर जायला हवं.

विंदा आणि ग.ह. पाटील यांच्या कवितेनं कुमारांना लळा लावला. त्यांनी या मुलांना स्वतःभोवती गिरक्या घ्यायला लावल्या. स्वतःत गुंगवून टाकलं. त्यांच्या मनात कुतूहल, जिज्ञासा जागी केली. नव्या नव्या विचाराला चालना दिली. निसर्गातील चमत्कारानं डोळे उघडून पाहण्याची दृष्टी दिली म्हणून निसर्गनिर्मित चमत्कृतीपूर्ण असे आकाशरंग, पक्षांचे गुंजन यात ते रंगून गेले. जसं-

देवा तुझे किती सुंदर आकाश

सुंदर प्रकाश सूर्य देतो

सुंदर ती झाडे, सुंदर पाखरे

किती गोड बरे गाणी गाती

सुंदर वेलींची सुंदर ही फुले

तशी आम्ही मुले देवा तुझी

या ग.ह.पाटलांच्या काव्यात आकाश, सूर्य, झाडं, फुलं, फळं; त्यातील नाद, सूर-लय ताल केवळ मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही आनंद देऊन जातो. 

वृक्षाची मी धरून डहाळी

गातो झोके घेत सकाळी

कवितेतील हे चित्रण करण्यासाठी आपल्या पूर्वसुरींनी प्रतिमा आणि प्रतिभा यांचा पुरेपूर वापर केला. नाट्यघटकांचा विचार करून मानसशास्त्र विचारात घ्यावं लागतं. त्याची नाळ पर्यावरणाशी जोडावी लागते. त्यांना नितळ स्वच्छ झऱ्यात, ओढ्यात डुंबायला आवडतं; तसं चिखल, दलदलीत उतरून त्यातील बेडूक, खेकड्यांशी खेळायला व शेवाळावरून घसरून पडायलाही आवडतं. बालकवी ठोंबरे यांच्या ‘ती फुलराणी’, ‘आनंदी आनंद गडे’ हे काव्य लहानांबरोबर मोठ्यांनाही सहजपणे गुणगुणायला लावतं.

खेळ आणि मुलं यांचं एक अतूट नातं असतं. ‘राघोबा आला’, ‘घोडा घोडा’ या कवितांमधून कल्पकतेशी जवळचं नातं सांगितलं आहे. ती जशी सहज, सुलभ आणि हसता, हसता रडवणारी आहे, तशीच ती कमी शब्दात संपूर्ण आशयचित्र साकारणारी आहे. मुलांचं भावविश्व समर्थपणे त्यांच्या काव्यातून व्यक्त झालं आहे.

ममत्वाचं माहेरघर आणि संस्कृतीचं आगर म्हणजे साने गुरुजी. बाल आणि कुमारांसाठी श्रेष्ठ मूल्याधारित साहित्याचा प्रदेश त्यांनी समृद्ध केला. सहज-सरळ- साध्या सोप्या भाषेत जीवनमूल्यांची चौकट न मोडू देता लिहिलेल्या ‘शामची आई’, ‘सुंदर पत्रे’, ‘बेबी सरोजा’, ‘गोड गोड गोष्टी’, ‘मिरी’ आणि कितीतरी लोककथांना बगल देऊन माणुसकी व संस्कृती यांची घातलेली सांगड ही त्यांची वाङमय निर्मितीतील मनोधर्म वाढवणारी आणि स्वप्नात न रमता झगझगीत वास्तवातील वास्तवाच्या गोड गोष्टी तेही अत्यंत संवेदनशील मनानं जीवनमूल्यांची जपणूक करतात. नीतीमूल्यं, माया, ममता, जिव्हाळा यातून मानवी नातेसंबंध कसे असावेत? ते कसे निर्माण व्हावेत, या विषयीचं दर्शन ‘धडपडणारी मुले’ या पुस्तकात होतं. इथं व्यक्तीचित्रणापेक्षा आशय संपन्नता अग्रभागी मांडल्यामुळे ते लेखन काळीज कोरत जातं.

‘बीज अंकुरे अंकुरे’ या काव्य पंक्तीशी नकळतपणे त्यांची लेखणी जोडली गेल्यामुळे सर्वस्पर्शी बाल/कुमार मानसशास्त्र त्यांच्या साहित्यातून सहजपणे उकलत जातं.

हे राष्ट्र त्यातील प्रत्येक माणूस जात-धर्म, पंथ विसरून माणुसकीच्या प्रेमातून एकत्र यावा, यासाठी त्यांच्यातील शिक्षक सतत जागरूक राहून कार्यरत होता. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या ‘त्री’ सूत्रीवर माणसानं एकत्र यावं, उभं रहावं ही त्यांची प्रबळ ओढ त्यांच्या गीतांमधून आपल्यापर्यंत पोहचतं.

‘खरा तो एकचि धर्म

जगाला प्रेम अर्पावे’

किंवा

‘बलसागर भारत होवो

विश्वात शोभूनी राहो’

करुणा, शौर्य, वीरता, राष्ट्रभक्तीवर लेखन करताना ते निरुपणाची भूमिका घेत नाहीत आणि जागर घालणाऱ्या शाहिराचा धर्म ते सोडत नाहीत. सत्य-असत्यातील दरी समजावून सांगताना ते ज्या पद्धतीने समर्पक शब्दांची पेरणी करतात, तेव्हा त्यात त्यांचं निर्मळ मनच दिसतं. मनातील भाव-भावना, श्रद्धा, त्यांच्या पात्रांच्या हालचालीतून, बोलीभाषेतून व्यक्त होतात. नवतेचा ध्यास आणि नव-निर्माणाची ओढ होती, म्हणूनच कदाचित आदर्श समाजाची त्यांची कल्पना खोलवर रुजलेल्या वृक्षाच्या मुळांसारखी आहे. बालकांचं/कुमारांचं मनोविश्व लक्षात घेऊन त्याला योग्य वेळी खत-पाणी घातलंच पाहिजे, हा मूलभूत विचार त्यांच्या कलाकृतींमधून अभ्यासता येतो. त्यावरून मूल्य-व्यवस्थेची व्याप्ती कळून येते.

मुलांचं भावविश्व समजून-उमजून घेऊन त्यांना कळेल, रुचेल, समजेल अशा भाषेत लिहिणं फार अवघड आहे, पण हे काम गुरुजींनी अत्यंत सरळ, साध्या, सोप्या पद्धतीनं केलं. सुखाला सामोरं कसं जावं? दुःखाशी हसत-हसत कसा सामना करावा...? हे आईच्या मायेनं उलगडून सांगितलं म्हणूनच ते मातृहृदयी ठरले. त्यांच्या साहित्य वाचनानं एक चारित्र्य संपन्न पिढी निर्माण झाली.  

राष्ट्रभक्तीचे संस्कार बाल/कुमार मनावर करण्याचा प्रयोग गुरूजीनंतर ग.दि.माडगूळकरांनी केला. छंदोमयी बालगीताची परंपरा अधिक सकसतेनं घरोघरी पोहचवली. ‘गोरी गोरी पान, फुलासारखी छान’, ‘नाच रे मोरा’, ‘चांदोबा चांदोबा भागलास का?’, ‘मैनाराणी... चतुरशहाणी’, ‘दादा आणि वहिनी यातून कोण आवडे अधिक तुला..?’ किंवा ‘बिन भिंतीची शाळा’ या गीतांमधून बालमनाला व त्यांच्या आई-बाबांनाही नादमय वर्तुळात पिंगा घालायला लावला. स्फूर्ती आणि संस्कार त्याचबरोबर कौटुंबिक नातं संबंधाचा उत्तम गोफ गुंफणारे, मुलांच्या भाव-विश्वाला ते जवळचे होते. गेय कवितेतून एखादी कथा सांगण्याचा तालबद्ध परिपाठ वाचकांसमोर त्यांनी ठेवला. जसं ‘एका तळ्यात होती’, ‘एक कोल्हा.. बहु भुकेला फार होता कावला’, ‘चिमणीची गोष्ट’, ‘ रविवारी दुपारी’ ही संवादाच्या अंगानं विकसित केलेली बाल जाणीव. ‘बाल-शिवाजी’मधून शिवाजीचं शौर्य, धैर्याची महती सांगणारी कवितादेखील एक नवप्रयोगच ठरली.

वाचन संस्कृतीनं मुलांचं विश्व जोडायचं असेल तर कुमार रंगभूमी सशक्त व्हायला हवी. सुधा करमरकर, सुलभा देशपांडे, रत्नाकर मतकरी, प्रभाकर पुराणिक, राजेंद्र चव्हाण, सूर्यकांत सराफ, कांचन सोनटक्के यांनी दिलेल्या योगदानाविषयी समोरच्या पिढीला सांगितलं जावं.

आचार्य अत्रे, पु.ल.देशपांडे यांनी कुमारांसाठी सशक्त मेढ रोवली. त्याच सावलीत आपण वाढलो. पण पुढे काय...? प्रकाश पारखी, प्रा.त्रिभूवन, सुशील सुर्वे, कुमार देशमुख, आलोक चौधरी, कविता निरखी यांनी कुमार रंगभूमीसाठी केलेल्या प्रयोगाची घ्यावी तितकी दखल कोणी घेतली नाही.

मुलांसाठी किती चित्रपट आपल्याकडे आहेत, याचं उत्तर नकारात्मक मिळतं. याकडे कुणाचंही लक्ष नाही. संवेदनशील मन व बुद्धीला चालना देणारा संस्कारक्षम विषय वा आपलं घर, समाज, राष्ट्राप्रती प्रेम, कर्तव्य भावना जागृत करणारा चित्रपट व मालिकांबद्दल तसंच म्हणावं लागेल.

संवेदना आणि सहवेदना या गुणांची जपणूक ‘गोट्या’, ‘मुक्या’, ‘फास्टर फेणे’, ‘आनंदमेळा’, ‘शिवाची वाडी’ या कादंबऱ्यांनी केलं आहे. त्यात कालानुरूप बदल करून त्या साहित्यकृती पुनः नव्याने प्रसिद्ध केल्या जाव्यात.

विद्यार्थी मित्रांनो, आजचा काळ प्रचंड स्पर्धेचा आहे. प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे. त्या स्पर्धेत उतरण्यासाठी धडपड आहे. त्यामुळे आयुष्य इतकं गतिमान झालं आहे की, पोटापाण्यासाठी प्रत्येकाला झगडावच लागतं. शिक्षण तर घेतलच पाहिजे मग त्यासाठी आपल्याला कष्टाची तयारी हवी. प्रामाणिकपणे यश संपादन करणं, त्यासाठी जिद्द चिकाटीनंच पुढे जाता येईल. शिक्षणानं ‘ज्ञान’ मिळेल, पण त्या ज्ञानाचं रूपांतर ‘शहाणपणात’ करता यायला हवं. आणि शहाणपणाचं ‘विशाल दृष्टीत’. ही विशाल दृष्टी ‘मी’ च्या पलीकडे जायला हवी. मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय दिलं, हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण समाजातूनच माझ्या सर्व गरजा पूर्ण होतात. म्हणून त्याच्याप्रती सदैव ‘कृतज्ञ’ रहायला हवं. जीवन आनंदानं, उत्साहानं जगायला शिकलं पाहिजे. संगीत, नाट्य, साहित्य, खेळ, चित्रे, निसर्ग यांच्याशी मैत्री करायला हवी. निदान यापैकी एखाद्या जरी कलेची छंद म्हणून जोपासना केली तर ती कला आपल्याला कशासाठी जगायचं? का जगायचं? कसं जगायचं हे शिकवेल.

समाजकारण, राजकारण, साहित्य, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रातील दिग्गज वक्त्यांची आपण भाषण ऐकली पाहिजेत. संगीत मैफिलीही ऐकल्या पाहिजेत. त्यासाठी कान आणि मन तयार झाले की, मिळणारा आनंद अवर्णनीय असतो. जे जे म्हणून चांगलं, मंगल, पवित्र आणि विधायक व मनःस्पर्शी आहे. त्यावर साधकबाधक चर्चा झाली पाहिजे. विचारविनिमय झडले पाहिजेत. त्यातूनच माणूस घडत जातो. बहुश्रूत होतो. संवेदनशील बनतो. ही संवेदनशीलता दिवसेंदिवस हरवत चालल्याचं सर्वत्र दिसत आहे. आणि हेच फार भयानक आणि विघातक आहे. याचे दुष्परिणाम आज आपण सर्वजण पाहतच आहोत.

आजच्या नव्या तंत्रज्ञानाशी त्यातील गतिमानतेशी जुळवून घेताना आपल्या सर्वांची दमछाक होते आहे. त्यामुळे आपण आत्ममग्न, आत्मकेंद्री बनत चाललो आहोत. नात्या-नात्यातील तुटलेपणाचं प्रतिबिंब माणसाच्या रोजच्या जगण्यात उमटताना दिसतं. असं विस्कळीत आयुष्य माणसाला सुख-समाधान तर देतच नाही, पण अस्वस्थ, असमाधानी, अतृप्तच ठेवतं. म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, आताच या वयातच आजपासून आपण मनाशी संकल्प करू या ‘मी स्वावलंबी होईन’. घरातील छोट्या छोट्या गोष्टी करण्यातून जो आनंद मिळतो, तो आपल्याला एक प्रकारचं समाधान देऊन जातो. अंगी शिस्त बाणवतो. अशा स्वावलंबनातूनच पुढे चालून तुम्ही आत्मनिर्भर बनाल. या आत्मनिर्भरतेतून आत्मविश्वास मिळाला की, माणसाला कितीही कष्ट पडले तरीही तो डगमगत नाही. मुलांनो कष्टाला पर्याय नाही. आणि कष्टाशिवाय चांगलं फळ मिळत नाही. प्रामाणिक कष्टातून मिळवलेला पैसा आयुष्याच्या अखेरपर्यंत आपल्याला समाधान देऊन जातो. म्हणून माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगला किंवा किती मोठा झाला, यापेक्षा कसा मोठा झाला याला फार महत्त्व आहे.

महात्मा गांधींनी सर्व भारतवासीयांना सांगितलं की, आपल्या गरजा मर्यादित ठेवा. नको त्या गोष्टींची हाव धरू नका. सरळ साधं पण आचरणात अवघड असलेलं जीवनाचं सूत्र त्यांनी सांगितले ते असे, की तुम्ही सात महापातकापासून दूर रहा म्हणजे तुम्ही एक चांगला माणूस म्हणून जगण्यास पात्र ठराल.

१) Politics without principle (तत्त्वाशिवाय राजकारण)

२) Commarce without morality (नीतीशिवाय व्यापार)

३) Wealth without work (श्रमाशिवाय पैसा(श्रीमंती))

४) Science without huminity (माणुसकीशिवाय विज्ञान)

५) Pleasure without consents (विवेकाशिवाय विलास)

६) Education without character (चारित्र्याशिवाय शिक्षण)

७) workship without sacrifice (त्यागाशिवाय भक्ती)

या वरील महापातकांपासून आपण सारेजनच दूर राहूया. कमीत कमी गरजा, जास्तीत जास्त कष्ट केले, अवांतर साहित्याचं वाचन वाढवलं, समाजातील दीन-दलित–दुबळे- अनाथांना आपल्या परीनं मदत केली, एक संवेदना-सहवेदना जागृत ठेऊन मदतीचा हात दिलात, तर आपल्याला कधीही-काहीही कमी तर पडणारच नाही. मिळालेला जन्म अधिक सुंदर मंगलमय करू शकतो. कितीही दुःख संकटं आली तरी त्याचा संधी म्हणून आनंदाने सामना करू शकतो. मनात सतत सकारात्मक विचाराने ठरवलेले ध्येय किंवा इप्सित साध्य करता येईल. ते साध्य करण्यासाठी आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा.

या अकराव्या कुमार साहित्य संमेलनाचे आयोजक बांदा शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई यांनी मला आवर्जून अध्यक्षपद बहाल केलं, त्याबद्दल त्यांची व आपल्या सर्वांची मी सदैव ऋणी राहीन.

.............................................................................................................................................

इंदुमती जोंधळे यांच्या ‘पापणीआड पाणी’ या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4293

.............................................................................................................................................

लेखिका इंदुमती जोंधळे बालसाहित्यिका व ‘बिनपटाची चौकट’ या गाजलेल्या पुस्तकाच्या लेखिका आहेत.

indumati.jondhale@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......