कुणाची लाज नाही! कसला पश्चाताप नाही!
ग्रंथनामा - झलक
ओमप्रकाश वाल्मिकी
  • ‘उष्टं’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 29 December 2017
  • ग्रंथनामा Granthanama झलक जूठन Joothan ओमप्रकाश वाल्मिकी Omprakash Valmiki उष्टं Ushta लोकवाङ्मय गृह Lokvangmaya Griha

प्रसिद्ध हिंदी लेखक ओमप्रकाश वाल्मिकी यांच्या ‘झूठन’ या बहुचर्चित आत्मचरित्राचा  ‘उष्टं’ या नावानं मराठी अनुवाद प्रा. मंगेश बनसोड यांनी केला आहे. नुकताच तो लोवाङ्मय गृहाने पुस्तकरूपाने प्रकाशित केला आहे. या आत्मचरित्राचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

आमचं घर चंद्रभान तगाच्या गोठ्याला लागूनच होतं. त्यानंतर काही कुटुंबं मुसलमान विणकरांची होती. चंद्रभान तगाच्या गोठ्याच्या अगदी समोर एक लहानसा नाला होता, ज्यानं भंग्यांच्या घरांमध्ये अन् गावामध्ये एक अंतर निर्माण केलं होतं. नाल्याचं नाव डब्बोवाली होतं. आता डब्बोवाली नाव कसं पडलं, हे सांगणं कठीण आहे. हां, एवढं मात्र खरं की, या डब्बोवाली नाल्याचं रूप एका मोठ्या खड्ड्यासारखं होतं; जिच्या एका बाजूला तगांच्या पक्क्या घरांच्या उंच भिंती होत्या. त्याच्या समकोनात कोळ्यांच्या दोन-तीन कुटुंबांच्या कच्च्या घरांच्या भिंती होत्या. अन् त्यानंतर पुन्हा तगांची घरे होती.

नाल्याच्या किनाऱ्यावर भंग्यांची घरं होती, ज्याच्या मागे गावभरच्या बायका, तरुण मुली, म्हातारे-कोतारेच नाही तर नवविवाहित नवऱ्यासुद्धा याच नाल्याच्या किनाऱ्यावरील मोकळ्या जागेत परसाकडे (शौचास) बसत असत. रात्रीच्या अंधारातच नाही तर दिवसा उजेडातही पडद्यात असणाऱ्या त्यागींच्या बायका, पदर घेत, शाली पांघरून या सार्वजनिक खुल्या शौचालयात मोकळ्या होत असत. सर्व लाज-शरम सोडून त्या डब्बोवालीच्या किनाऱ्यावर आपले खाजगी भाग उघडे करून बसत असत. याच जागी गावातील भांडण-तंटे गोलमेज परिषदेसारखे चर्चिले जात होते. चहूबाजूला घाणीचं साम्राज्य होतं, दुर्गंधी एवढी की, एका मिनिटात श्वास घुसमट होत असे. छोट्या गल्ल्यांत फिरणारी डुकरं, उघडी-नागडी मुलं, कुत्री, रोजची भांडणं, बस हेच होतं ते वातावरण ज्यांत बालपण गेलं होतं. वर्णव्यवस्थेला आदर्श व्यवस्था म्हणणाऱ्याला जर या वातावरणात दोन-चार दिवस राहावं लागलं तर त्यांचंही मत बदलून जाईल.

याच भागात आमचं कुटुंब राहत होतं. पाच भाऊ, एक बहीण, दोन काका, मोठ्या काकांचं कुटुंब. काका आणि मोठे काका वेगवेगळे राहत होते. घरात सर्वच जण काही ना काही काम करत असत, पण त्यात दोन वेळचं जेवणही सुटत नव्हतं. तगांच्या घरात साफसफाईसहित शेतीवाडी, मेहनत-मजुरीची कामं सतत चालायची. रात्री-बेरात्रीही कामं करावी लागायची, पण या बेगारीच्या कामात कुणालाही धान्य किंवा पैसे मिळत नसत. अन् या कामाला नाही म्हणण्याची कोणाची हिम्मत नसे. शिवीगाळ-अपमान वेगळाच! नाव घेऊन हाक मारण्याची कुणालाच सवय नव्हती. वयानं मोठा असलेल्यांना ‘भंग्या’, अन् बरोबरीचा किंवा वयानं लहान असला तर ‘अबे भंग्याच्या’ असंच बोलवायची पद्धत होती.

अस्पृश्यतेचं वातावरण एवढं वाईट होतं की, कुत्री-मांजरी, गाई-म्हशींना स्पर्श केलेला चालायचा, पण जर भंग्याचा स्पर्श झाला तर पाप लागत असे. सामाजिक स्तरावर मानवतेचा दर्जाच नव्हता. भंगी फक्त गरजेची वस्तू होते. काम पूर्ण झालं की गरजही संपली. वापरा आणि फेकून द्या.

आमच्या मोहल्ल्यात एक ख्रिश्चन येत असे. त्यांचं नाव होतं सेवकराम मसीही. भंग्यांच्या मुलांना घेऊन बसायचे. लिहा-वाचायला शिकवायचे. सरकारी शाळेत तर कोणी या मुलांना शिरू देत नव्हते. सेवकराम मसीहीकडे फक्त मलाच पाठवले गेलं होतं. भावंडं कामं करायची. बहिणीला शाळेत पाठवण्याचा प्रश्नच नव्हता.

सेवकराम मसीही मास्तरांच्या मोकळ्या, खोल्या नसलेल्या, गाद्या-चटया नसलेल्या शाळेत अक्षरज्ञान सुरू केलं होतं. एक दिवस सेवकराम मसीही आणि माझ्या वडिलांच्यात काहीतरी भांडण झालं अन् वडील मला घेऊन सरळ बेसिक प्रायमरी विद्यालयात गेले, जे पाचव्या इयत्तेपर्यंत होते. तिथे हरफूलसिंह नावाचे शिक्षक होते. त्यांच्यासमोर माझ्या वडिलांनी केविलवाणं होऊन म्हटलं, “मास्तर, तुमची मेहरबानी झाली तर माह्या या पोरालेबी दोन अक्छर शिकवजो.’’

हरफूलसिंह मास्तरानं दुसऱ्या दिवशी यायला सांगितलं. वडील दुसऱ्या दिवशी पुन्हा शाळेत गेले. कितीतरी दिवस ते असेच शाळेत चकरा मारत राहिले. शेवटी एक दिवस शाळेत प्रवेश मिळाला. त्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळून आठ वर्षं उलटली होती. गांधींजींच्या अस्पृश्योद्धाराचे प्रतिध्वनी ऐकायला येत होते. सरकारी शाळांची दारं अस्पृश्यांसाठी खुली झाली होती, परंतु सर्वसामान्यांच्या मानसिकतेत काही विशेष फरक पडला नव्हता. शाळेत इतरांपासून दूर बसावं लागत असे, तेही जमिनीवर. आपल्या बसायच्या जागेपर्यंत येता येता चटई लहान होऊन जायची. कधी कधी तर एकदम मागे दरवाजाजवळ बसावं लागे. जिथून फळ्यावर लिहिलेली अक्षरं अगदी धूसर दिसायची.

त्यागी मुले ‘भंग्याचा’ म्हणून चिडवायची. कधीकधी विनाकारण मारायची.

एक अतिशय विचित्र व यातनापूर्ण आयुष्य होतं, ज्यानं मला अंतर्मुख, चिडचिडा अन् वारंवार मूड बदलणारा बनवलं होतं. शाळेत तहान लागली तर हॅण्डपंप जवळ उभं राहून कुणाच्या तरी येण्याची वाट पाहावी लागायची. हॅण्डपंपला स्पर्श केल्यावर आकांडतांडव व्हायचा. मुलं तर मारायचीच, पण मास्तर लोक तर हॅण्डपंपला स्पर्श केल्यामुळे सजा द्यायचे. मी शाळा सोडून पळून जावं म्हणून अनेकानेक प्रकारच्या युक्त्या वापरल्या जात होत्या. ज्या कामासाठी माझा जन्म झाला होता, तेच काम मी करावं म्हणून त्यांच्या मते माझं शाळेत येणं चुकीचे होतं.

माझ्याच वर्गात रामसिंह आणि सुक्खनसिंहही होते. रामसिंह जातीनं चांभार होता आणि सुक्खनसिंह कोळी. रामसिंहचे आईवडील शेतात मजुरी करायचे. सुक्खनसिंहचे वडील इंटर कॉलेजमध्ये चपरासी होते. आम्ही तिघांनी सोबतच शिक्षण घेतलं, मोठे झालो, लहानपणातील कटू-गोड अनुभव आम्ही एकत्रच घेतले. शिक्षणात आम्ही नेहमीच पुढे जात राहिलो. मात्र लहान जातीचं असणं, ही गोष्ट पावलापावलावर छळत राहिली.

बरला गावात काही मुसलमान त्यागीही होते. त्यागींनाच तगा म्हटलं जायचं. मुसलमान तगांचं वागणं हिंदूंसारखंच होतं. कधी कोणी चांगले स्वच्छ कपडे घालून आला तर त्याची चेष्टा केली जायची. ही चेष्टा मग जहरी बाणासारखी आत खोलवर उतरत असे अन् असं नेहमीच व्हायचं. छान-स्वच्छ कपडे घालून वर्गात जावं तर सोबतची मुलं म्हणायची, “अबे भंग्याच्या, नवीन कपडे घालून आला.’’, “अरे हा भंग्याचा, नवीन कपडे घालून आलाय.’’ जुने-मळके कपडे घालून शाळेत गेलो, तर म्हणायचे, “अबे भंग्याच्या, दूर हो, वास येतोय.’’

विचित्र स्थिती होती आमची. दोनही स्थितीत अपमान सहन करावा लागायचा. चौथीला होतो. हेडमास्तर बिशम्बर सिंह यांच्या जागी कलीराम आले होते. त्यांच्यासोबत आणखीही एक मास्तर आले होते. त्यांच्या येण्यानं आम्हा तिघांचे मात्र ‘कली’ दिवस सुरू झाले होते. प्रत्येक गोष्टीत मारझोड केली जायची. रामसिंह कधीकधी चुकायचा, मात्र सुक्खनसिंह आणि माझी मारझोड ही तर नेहमीची बाब होती. मी तेव्हा अगदीच अशक्त आणि बारीक होतो.

सुक्खनच्या पोटाच्या वर फासळ्यांजवळ एक मोठा फोड आला होता. त्यातून सारखा पू वाहत असे. वर्गात तो आपला सदरा वरच्या बाजूला अशा तऱ्हेनं गुंडाळायचा, जेणेकरून जखम उघडी राहील. एक तर सदऱ्याला पू लागण्याची भीती होती, दुसरं म्हणजे मास्तरांच्या माराच्या वेळी जखम वाचवता यायची.

एक दिवस मास्तरांनी सुक्खनसिंहला मारताना त्या जखमेवरच एक गुद्दा हाणला. सुक्खन वेदनेनं भयानक किंचाळला. फोड फुटला होता. त्याला वेदनेनं तडफडताना पाहून मलाही रडू फुटलं. अन् आम्हाला रडताना बघून मास्तरांच्या मात्र तोंडाचा पट्टा सुटला होता. त्यांच्या त्या घाणेरड्या शिव्या ज्या इथं शब्दबद्ध केल्या तर भाषेच्या अभिजाततेला धक्का लागला असता. माझ्या एका ‘बैल की खाल’ नामक कथेतील एका पात्राच्या तोंडी मी शिव्या दिल्यावर हिंदीतील अनेक मोठ्या लेखकांनी आपली नापसंती दर्शवली होती. योगायोगानं शिव्या देणारं पात्र ब्राह्मण होतं. ब्राह्मण म्हणजे ब्रह्माचा ज्ञाता आणि शिव्या...!

शिक्षकांचं आदर्श रूप जे मी त्या वेळी पाहिलं होतं ते अजूनपर्यंतही माझ्या स्मृतीत कायम आहे. जेव्हा कुणी आदर्श शिक्षकाविषयी बोलतो, तेव्हा मला माझे ते सर्वच शिक्षक आठवतात जे आई-बहिणीवरून शिव्या द्यायचे. सुंदर मुलांना बोलावून, त्यांच्या गालांना कुरवाळून, त्यांना आपल्या घरी बोलावून त्यांच्याशी वाईट चाळे करायचे.

एक दिवस हेडमास्तर कलीरामनं मला आपल्या खोलीत बोलावून विचारलं, “काय नाव आहे बे तुझं?’’

’’ओमप्रकाश’’, मी घाबरत-घाबरत हळू आवाजात स्वत:चं नाव सांगितलं. खरं तर हेडमास्तरला पाहूनच मुलं घाबरायची. संपूर्ण शाळेत त्यांची दहशत होती.

“भंग्याचा आहेस?’’ हेडमास्तरचा दुसरा प्रश्न उसळला.

’’जी!’’

“ठीक आहे... ते जे समोर शिसमचं झाड आहे, त्यावर चढ आणि फांद्या तोडून झाडू तयार कर. पानांचा झाडू बनव. आणि पूर्ण शाळेला आरशासारखे चकचकीत कर. तुझं तर हे खानदानी कामच आहे. जा... फटाफट कामाला लाग.’’

हेडमास्तरांच्या आदेशाबरहुकूम मी शाळेच्या सर्व खोल्या, वऱ्हांडे स्वच्छ केले. तेव्हा ते स्वत: चालत आले आणि म्हणाले, “यानंतर मैदान पण स्वच्छ कर.’’

प्रशस्त मैदान माझ्या एवढ्याशा जीवापेक्षा कितीतरी पटीनं मोठं होतं. मैदानाची स्वच्छता केल्यानं माझी कंबर दुखू लागली होती. धुळीनं चेहरा, डोकं भरलं होतं. तोंडातही धूळ गेली होती. माझ्या वर्गात इतर मुलं शिकत होती आणि मी झाडू मारत होतो. हेडमास्तर आपल्या खोलीत बसले होते, पण त्यांची नजर माझ्यावर होती. पाणी पिण्याचीही परवानगी त्यांनी मला दिली नव्हती. पूर्ण दिवसभर मी झाडू मारत होतो. घरात भावंडांचा मी लाडका असल्यानं असं काम मी आतापर्यंत कधीच केलं नव्हतं.

दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो. जाताच हेडमास्तरनं पुन्हा झाडू मारायच्या कामाला जुंपलं. पूर्ण दिवस झाडू मारत राहिलो. मनात एकच समाधान होतं की, उद्यापासून वर्गात बसायला मिळेल. तिसऱ्या दिवशी मी वर्गात गुपचूप जाऊन बसलो. थोड्या वेळानंतर त्यांची डरकाळी ऐकू आली, “अबे, ओ भंग्याच्या, मादरचोद कुठं घुसलास? तुझ्या...’’

त्यांची डरकाळी ऐकून मी थरथर कापू लागलो होतो. एका तगाच्या मुलानं ओरडून सांगितलं, “गुरुजी, तो बसला हाय तिकडं कोनाड्यात.’’

हेडमास्तरानी झडप घालून माझी मान आवळली. त्यांच्या बोटांचा दाब माझ्या मानेवर वाढत होता. जसा एखादा लांडगा बकरीच्या पिल्लाला दाबून उचलून नेतो, तसा त्यांनी मला वर्गाच्या बाहेर काढून व्हरांड्यात आणून आपटलं आणि ओरडून म्हणाले, “जा पूर्ण मैदानात झाडू मार... नाहीतर गांडीत मिरची पावडर घालून शाळेच्या बाहेर हाकलवीन.’’

घाबरून मी तीन दिवस जुनी तीच शिसमची झाडू उचलली. माझ्यासारखीच त्या झाडूचीही पानं सुकून झडू लागली होती. फक्त बारीक बारीक काटक्या वाचल्या होत्या. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. रडत-रडत मी मैदानात झाडू मारू लागलो. शाळेच्या खिडक्या-दरवाज्यांतून मास्तर आणि मुलांचे डोळे लपून तमाशा बघत होते. अन् मी मात्र यातनांच्या खोल गर्तेत उतरत होतो.

त्याच वेळी माझे वडील अचानक शाळेच्या जवळून जात होते. मला शाळेच्या मैदानात झाडू मारताना पाहून चालता चालता ते अचानक थांबले. बाहेरूनच आवाज देत म्हणाले, “मुंशीजी, हे काय करून राह्यला?’’ ते प्रेमानं मला मुंशीजी म्हणायचे. त्यांना पाहून मला भरून आलं. मी जोरानं रडू लागलो. ते शाळेच्या मैदानात शिरले व माझ्याजवळ येऊन मला रडताना पाहून म्हणाले, “मुंशीजी... का रडता? नीट सांगा, काय झालं?’’

मी हुंदके देऊन रडत होतो. हुंदके देतच मी वडिलांना पूर्ण हकीकत सांगितली. “तीन दिवसांपासून मला झाडू मारायचं काम करावं लागतंय. मला वर्गात बसू देत नाहीत.’’

माझ्या हातून झाडू ओढून घेत वडिलांनी तो दूर फेकला. रागानं त्यांच्या डोळ्यातून जणू ठिणग्या उडत होत्या. नेहमी इतरांसमोर धनुष्याकृतीत असणाऱ्या वडिलांच्या लांब-लांब गडद मिशा रागानं थरथरू लागल्या होत्या. ते ओरडू लागले, “कोन्ता मास्तर व्हय तो द्रोणाचार्याची अवलाद, जो माह्या पोराकून झाडू मारून घेतो...’’

वडिलांचा दणकट आवाज पूर्ण शाळेत घुमला अन् तो ऐकून हेडमास्तरांसहित सर्वच शिक्षक शाळेच्या बाहेर आले होते. त्या दिवशी कलीराम हेडमास्तरनं शिव्या देऊन माझ्या वडिलांना धमकावण्याचा प्रयत्न केला. वडिलांवर धमकीचा काहीएक परिणाम झाला नाही. त्या दिवशी ज्या धैर्यानं आणि ताकदीनं वडिलांनी हेडमास्तरांचा सामना केला, ती गोष्ट मी कधीच विसरलो नाही. माझ्या वडिलांमध्ये दुर्गुण होते, मात्र माझ्या भविष्याला त्यांनी जी कलाटणी दिली, त्याचा प्रभाव माझ्या व्यक्तित्वावर पडला आहे.

हेडमास्तरनं मोठ्या आवाजात सांगितलं, “घेऊन जा याला इथून... भंगी असून शिकायला निघालाय? जा निघून जा... नाहीतर हात-पाय तोडून टाकीन!’’

वडिलांनी माझा हात धरला आणि ते घराकडे निघाले. जाता-जाता त्यांनी हेडमास्तराला सुनावलं, “मास्तर हैस... म्हणून चाललो... पन् लक्षात ठेव मास्तर... हा भंग्याचा इथंच शिकंल... ह्याच शाळेत... आणि हाच नाही तर याच्याबाद बाकीचे बी येतीन शिकायले.’’

वडिलांना खात्री होती की, गावचा त्यागी मास्तर कलीरामच्या या कृतीवर त्याला आडवा-तिडवा रागावेल, झालं मात्र उलटं. ज्याचा दरवाजा वाजवला गेला त्यानं हेच उत्तर दिलं, “काय करशील शाळेत पाठवून’’ किंवा “कावळा कधी हंस बनतो का?’’, “तुम्हा अडाणी मूर्ख लोकांना काय माहीत, विद्या अशी सरळपणे मिळत नसते.’’, “अरे! भंग्याच्या मुलाला झाडू मारायला सांगितलं तर कोणता गुन्हा झाला,’’ किंवा “झाडूच तर मारायला सांगितलं, द्रोणाचार्यांसारखा गुरुदक्षिणेत अंगठा तर मागितला नाही’’ इत्यादी... इत्यादी...!

वडील थकून-भागून निराश होऊन परतले. न खाता-पिता रात्रभर बसून राहिले. कुठली तरी खोल बोच त्यांना टोचत होती. सकाळ होताच त्यांनी मला सोबत घेतलं व प्रधान सगवा सिंह त्यागीच्या बैठकीत पोहोचले.

वडिलांना बघताच प्रधान म्हणाले, “अबे, छोटन... काय झालं? सकाळी सकाळीच आलास?’’

“चौधरी सायेब, तुमी तं सांगत व्हते का सरकारनं भंग्या-चांभाराच्या पोरायसाठी शाळेचे दरवाजे उघडले म्हून... आनि इथं ये हेडमास्तर माझ्या ह्या पोराले शिकवाचं सोडून वर्गाच्या भायेर आनून दिवसभर झाडू माराले लावते. जर हा दिवसभर शाळेत झाडू मारंल तर आता तुमीच सांग शिकल कवा?’’ वडील प्रधानासमोर गयावया करत होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. मी त्यांच्याजवळ उभा राहून फक्त त्यांना पाहत होतो.

प्रधानानं मला आपल्या जवळ बोलावून विचारलं, “कोणत्या वर्गात शिकतो?’’

“जी चौथीत.’’

“माझ्या महेन्द्रच्या वर्गात हायेस?’’

“जी.’’

प्रधानजी वडिलांना म्हणाले, “फिकर नको करू, उद्या याला शाळेत पाठवून दे!’’

दुसऱ्या दिवशी घाबरत-घाबरत मी शाळेत पोहोचलो. घाबरत-घाबरत वर्गात बसून राहिलो. प्रत्येक क्षणी वाटत होतं की, ‘आता आला हेडमास्तर... आता आला!’ जराशा आवाजानंही मी घाबरत होतो. पण त्यानंतर परिस्थिती बदलली. मात्र कलीराम हेडमास्तरला पाहून माझा जीव थरथरत होता. वाटत होतं की, समोरून हेडमास्तर नाही तर एखादं जंगली डुक्कर समोरून तोंड वासून धावत येतंय.

.............................................................................................................................................

गव्हाच्या पीक कापणीच्या वेळी मोहल्ल्यातले सर्वजण तगांच्या शेतात गहू कापणीला जायचे. तापलेल्या दुपारी गहू कापणी फारच कष्टाची आणि कठीण असायची. डोक्यावर तळपतं ऊन. खाली तापलेली जमीन, अनवाणी पायात कापलेल्या गव्हांचे बुडखे काट्यासारखे टोचायचे.

पण त्याहीपेक्षा जास्त त्रास व्हायचा, राई व हरभऱ्याच्या बुडख्यांचा. हरभरा कापणीच्या वेळी जरा जास्तच त्रास व्हायचा. हरभऱ्याच्या पानांवर एक आंबटपणा असतो, जो कापणीच्या वेळी अंगावरही चढतो. हा आंबटपणा आंघोळ केली तरी संपत नाही. कापणी करणारे एक तर भंगी किंवा चांभार असायचा. ज्यांच्या शरीरावर जेमतेम कपडे असायचे. त्यामुळे पायात वहाणा असणं शक्यच नव्हतं. अनवाणी पायानं कापणी करताना पायाची अगदी चाळण व्हायची.

पीक कापणीवरून शेतात सतत भांडणं व्हायची. मजुरी द्यायला बहुतेक तगे कंजुषी करायचे. कापणी करणाऱ्यांची मजबुरी होती. जे थोडं-बहुत मिळायचं, हो-नाही करत घरी घेऊन यायचं. घरी येऊन कुढत राहायचं, नाहीतर तग्यांना शिव्याशाप द्यायचे. मात्र भुकेसमोर विरोध चालायचा नाही. प्रत्येक वर्षी पीक-कापणीविषयी वस्तीत बैठका होत. सोळा गाठोड्यांवर एक गाठोडं मजुरी घेण्याच्या शपथा घेतल्या जात. मात्र कापणी सुरू होताच बैठकीतील सर्व निर्णय, शपथा हवेत विरायच्या. एकवीस गाठोड्यांवर एक गाठोडं मजुरी मिळायची. एका गाठोड्यात एक किलोपेक्षाही कमी गहू निघायचे. सगळ्यात वजनदार गाठोड्यातही एक किलो गहू निघत नसत. म्हणजे दिवसभराची मजुरी एक किलो गव्हापेक्षाही कमी. कापणीनंतर बैलगाडी किंवा छोट्या बग्गीत (म्हशींची बग्गी) गहू लादणं, उतरवणं वेगळं. त्याचे पैसे किंवा धान्य मिळायचं नाही. भल्या पहाटे शेतात बैल चारण्यासारखी फुकटची कामं सर्वांनाच करावी लागायची. त्या दिवसात गहू

साफ करायचं ‘थ्रेशर’ नसायचं. बैलांना घाण्यावर गोल गोल फिरवून गव्हाच्या लोंब्यांचा भुसा केला जायचा. मग तो भुसा सुपानं हवेत उडवून वेगळा केला जायचा. हे अतिशय वेळखाऊ आणि थकवणारं काम होतं, जे बहुतेककरून चांभार किंवा भंगीच करायचे.

या कष्ट आणि मोलमजुरी सोबतच माझी आई आठ-दहा तग्यांच्या (हिंदू, मुस्लिम) घरी, तसंच घेर (माणसांची बैठक, तसंच जनावरांना बांधण्याची जागा) साफसफाईची कामं करत असे. या कामात माझी बहीण, मोठी वहिनी तसंच जसबीर आणि जनेसर (दोन भाऊ) देखील आईला मदत करायचे. मोठा भाऊ सुखबीर तग्यांकडे सालदारासारखं काम करायचा.

प्रत्येक तग्याच्या घरी दहा ते पंधरा जनावरं (गाय, म्हशी आणि बैल) असायचीच. त्यांचं शेण उचलून गावाच्या बाहेर उकिरड्यावर किंवा गोवऱ्या बनवण्याच्या जागी टाकावं लागायचं. प्रत्येक गोठ्यातून रोज पाच-सहा टोपल्या भरून शेण निघायचं. थंडीच्या दिवसांत हे काम फारच कष्टप्रद असायचं. गाई, म्हशी आणि बैलांना थंडी-वाऱ्यापासून वाचवण्यासाठी मोठ्या व्हरांड्यात बांधलं जायचं. या व्हरांड्यात उसाची सुकलेली पात किंवा गवत पसरवलेलं असायचं. रात्रभर जनावरांचं शेण आणि मूत्र संपूर्ण व्हरांड्यात पसरायचं. दहा-पंधरा दिवसांत एकदा पात बदलली जायची किंवा त्यावर सुकलेली पाती टाकली जायची. इतक्या दिवसांत व्हरांड्यात पसरलेल्या दुर्गंधीतून शेण शोधून काढायचं काम खूपच त्रासदायक असायचं, दुर्गंधानं डोकं भणाणून जायचं.

या कामाच्या बदल्यात पिकाच्या वेळी दोन जनावरांच्या मागे पाच शेर म्हणजे जवळ जवळ अडीच किलो धान्य मिळायचं. अर्थात दहा जनावरं असलेल्या घरातून वर्षभरात २५ शेरच (जवळपास १२-१३ किलो) धान्य मिळत असे. दुपारी प्रत्येक घरातून शिल्लक राहिलेली एक भाकर, जी खास भंग्यांना देण्यासाठी पिठात कोंडा मिसळून बनवली जायची. कधी कधी तर भंग्यांच्या टोपलीत ‘उष्टं’ही टाकलं जायचं.

.............................................................................................................................................

लग्न-समारंभाच्या वेळी, जेव्हा पाहुणे किंवा वऱ्हाडी जेवण करत असायचे, तेव्हा भंगी दरवाजाच्या बाहेर मोठ-मोठ्या टोपल्या घेऊन बसून राहायचे. वऱ्हाड्यांच्या जेवणानंतर उष्ट्या पत्रावळी त्या टोपल्यात टाकल्या जायच्या. घरी घेऊन जाऊन ते उष्टं हे लोक एकत्र करायचे. पुऱ्यांचे राहिलेले तुकडे, एखादा मिठाईचा तुकडा किंवा पत्रावळीवर उरलेल्या भाजीनं सर्वजण खूश व्हायचे. उष्टं चवीनं खाल्लं जायचं. ज्या वऱ्हाड्यांच्या पत्रावळीवरून कमी उष्टं मिळायचं, त्यांना ‘भुक्खड’ (भुकेलेले), ‘उपाशी लोक’ म्हटलं जायचं. अशा वेळी म्हातारे-कोतारे अशा वरातींबाबत खूपच रोमांचित पद्धतीनं ऐकवायचे. ‘अमूक वरातीतून एवढं उष्टं मिळालं होतं की, आम्ही ते महिनोंमहिने खात होतो.’ अशा त्यांच्या कहाण्या चालत राहायच्या.

पत्रावळीवरून जमा केलेल्या पुऱ्यांचे तुकडे उन्हात वाळवले जायचे. खाटेवर एखादा कपडा टाकून त्यावर ते तुकडे पसरवले जायचे. बहुदा मलाच पहाऱ्यावर बसवलं जायचं. कारण वाळणाऱ्या पुऱ्यांवर कावळे, कोंबड्या, कुत्री तुटून पडायचे. जराशी नजर चुकली की पुऱ्या साफ, त्यासाठी काठी घेऊन खाटेजवळ बसूनच राहावं लागायचं.

या सुक्या पुऱ्या पावसाळ्यातील अतिशय अडचणीच्या दिवसांत खूप कामी यायच्या. त्यांना पाण्यात भिजवून उकळून घेतलं जायचं. या अशा तऱ्हेनं उकळलेल्या पुऱ्यांवर बारीक मिरची पावडर आणि मीठ टाकून खाण्याची मजा काही औरच असायची. कधी कधी गुळ टाकून लाडवासारखा लगदा बनवला जायचा, जे सर्वजण खूप चवीनं खायचे.

आज जेव्हा मी या सगळ्या गोष्टींबाबत विचार करतो, तेव्हा मनाच्या आंत काटे उगवतात. ते काय जगणं होतं? दिवस-रात्र मेहनत करून आमच्या घामाची किंमत फक्त उष्टं! तरीही कुणाची त्याबद्दल काहीच तक्रार नाही! कुणाची लाज नाही! कसला पश्चाताप नाही!

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा - 

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4337

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......