राजसत्ता आणि धर्मसत्ता यांची अभद्र, भ्रष्ट युती होते, तेव्हा...
ग्रंथनामा - दखलपात्र\इंग्रजी पुस्तक
निनाद खारकर
  • डेविड केर्तझर आणि ‘The Pope and Mussolini’चं मुखपृष्ठ
  • Fri , 24 November 2017
  • ग्रंथनामा Granthanama डेविड केर्तझर David Kertzer द पोप अँड मुसोलिनी The Pope and Mussolini हिटलर Hitler पोप पायस ११ Pope Pius X

नुकतंच माझं ‘The Pope and Mussolini : The Secret History of Pius XI and the Rise of Fascism in Europe’ हे डेविड केर्तझर याचं ऑडियो बुक ऐकून झालं. मला रोजच्या प्रवासात बराच कालावधी लागतो म्हणून रिकामा वेळ बराच असतो. मी जास्त वेळ गाणी ऐकू शकत नाही, चित्रपट बघायचा म्हटलं, तर खिडकीच्या बाहेर बघता येत नाही. अशा वेळी ऑडिओ बुक्स हा चांगला पर्याय वाटतो.

दुसरं महायुद्ध हे आपण हिटलरच्या किंवा ब्रिटिश-अमेरिकींच्या दृष्टिकोनातून बघत आलोय. बाजारात येणाऱ्या बहुतेक कलाकृतीही याच कथनामध्ये असतात. या पार्श्वभूमीवर हे पुस्तक महत्त्वाचं वाटलं. पोप पायस ११ आणि मुसोलिनी यांच्यात एक समान धागा होता. तो म्हणजे, साम्यवादाचा तिरस्कार आणि लोकशाहीविषयी साशंकता. मुसोलिनीची फॅसिस्ट राजवट आणि हिटलरची नाझीवादी राजवट यांच्यातला मूलभूत फरक म्हणजे, मुसोलिनीची राजवट ख्रिस्ती पुनरुत्थान, व्हॅटिकनच्या धर्मसत्तेचं लांगुलचालन आणि नैतिक प्रशासन यांच्या आधारावर उभी राहिलेली होती.

उलट हिटलरचं नाझी साम्राज्य छद्म विज्ञान, वंशवाद आणि सैनिकी बळाचा अहंकार यांच्यावर स्थापन झालं होतं. या संपूर्ण काळात मुसोलिनी ही भावनिक आणि अति-महत्त्वाकांक्षी व्यक्ती वाटते आणि हिटलर अहंकारी सत्ताधीश वाटतो. या कथानकात पोपचा एक वेगळा, विशाल कोन आहे.

इटलीमध्येच असलेल्या व्हॅटिकनचं विशेष सार्वभौमत्व टिकावं म्हणून, ख्रिस्ती धर्माचं जागतिक वर्चस्व राहावं म्हणून पोप पायस ११ यांनी केलेले प्रयत्न हे कोणत्याही राज्यकर्त्याप्रमाणेच स्खलनशील वाटतात. ज्यू लोकांना दुय्यम नागरिकाची वागणूक देण्याबद्दल चर्चची काही तक्रार नव्हती, पण त्यात चर्चच्या ‘मानुष’ चेहर्‍याला डाग लागू नये, अशी त्यांची इच्छा होती. आपल्या संमतीनं मुसोलिनीनं ज्यूंना त्यांची जागा दाखवून देणारे कायदे करावेत, इटलीच्या व्यवस्थेनं ते पास करावेत आणि पोलिसांनी लोकांकडून ते कायदे राबवून घ्यावेत अशी त्यांची धारणा होती. नंतर मुसोलिनीनं हिटलरच्या नादाला लागून टोकाची पावलं उचलायला सुरुवात केली आणि लोकांच्या मनातली आपली प्रतिमा खराब होऊ नये म्हणून चर्चमधल्या काही अधिकाऱ्यांनी थोडेफार मामुली प्रयत्न केले. चर्च आणि फासीवादी सम्राटाचे हे उपदव्याप या पुस्तकाच्या लेखकाने मोठ्या मेहनतीने लिहिलेत. पुस्तकाचा आवाका लक्षात घेऊन या पुस्तकाला २०१५चा पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे.

जगभर सध्या उजव्या विचारांची चलती आहे. म्हणून या पुस्तकाचं वाचन उपयुक्त ठरतं.

नेता योग्य नसला की, प्रजेचा कसा विनाश होतो, याचं उत्तम उदाहरण या पुस्तकात आहे. मुसोलिनी जेव्हा सत्ता काबीज करण्यासाठी संघटनेला हाताशी धरून चाल करून गेला, तेव्हा इटलीचा राजा त्याला रोखू शकला असता, पण तसं करण्याचा धोका राजानं घेतला नाही, कारण मुसोलिनीला केलेला विरोध अयशस्वी झाला असता, तर राजाची मऊ-लुसलुशीत आणि बिनकामाची गादी गेली असती.

मुसोलिनीनंदेखील इटलीच्या साम्राज्याचा आक्रमक विस्तार करून इथिओपियासारखे देश ताब्यात घेतले. या युद्धात होणार्‍या अपरिमित हानीला मुसोलिनीनं राष्ट्रवाद, पुरुषार्थ वगैरे उपमा दिल्या आहेत. या युद्धात मुसोलिनीचा वैयक्तिक स्वार्थ अजिबात नव्हता. इटलीचा राजा देत असलेली ‘प्रिन्स’ ही पदवीपण मुसोलिनीनं नाकारली आणि प्रजेच्या मनात आपलं स्थान अजून घट्ट केलं. इटलीची लोकं मुसोलिनीसाठी अक्षरशः वेडी होती. त्याच्या भाषणांना लोकं तुफान गर्दी करायचे. मुसोलिनीदेखील रंगात येऊन, हातवारे करून, हावभाव करून लोकांशी थेट संवाद साधायचा. या प्रचंड उन्मादाचा शेवट अखेरीस मुसोलिनीचा आलेख खोल कृष्णविवरात नेण्यात झाला. आयुष्याच्या शेवटी नाझी सैनिकांच्या साहाय्यानं मुसोलिनी ट्रकमध्ये लपून पळून जात असताना त्याला इटलीच्याच लोकांनी गोळ्या घालून संपवलं. एका इटालियन बाईची पाच मुलं मुसोलीनिसाठी युद्धात मरण पावली होती. त्या बाईनं मुसोलिनीच्या पार्थिवावर धडधड पाच गोळ्या मारून आपला राग व्यक्त केला. काही इतिहासकारांच्या मते मुसोलिनीचा दुर्दैवी अंत हा हिटलरला आत्महत्या करण्यासाठी ट्रिगर ठरला.

पोप पायस ११ यांच्या अनेक भूमिका मुसोलिनीला बळकट करण्यासाठी कशा उपयुक्त ठरत होत्या, याची सविस्तर वर्णनं या पुस्तकात अनेकदा येतात. मुसोलिनीनं शाळांमध्ये ख्रिस्ती प्रतिमा परत आणल्या, धर्मसंस्थांना वारंवार भरघोस अनुदानं दिली. लोकांनी कायदा मोडू नये म्हणून कायदा हातात घेणारी ‘Black Shirts’ नावाची संघटना उभी केली. या संघटनेनं चर्चच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणारे अनेक उद्योग केले, पण चर्चमधल्या भ्रष्ट लोकांचे अनेक हितसंबंध आडवे आल्याने त्यावर चर्चनं अधिकृत भूमिका घेतली नाही. अशी अनेक प्रकरणं पोप पायस ११ आपल्या सहायकाच्या मार्फत मुसोलिनीच्या कानावर घालत राहिले. अगदीच नाईलाज झाला तेव्हा अल्टीमेटम देत राहिले. यामुळे फासीवाद नावाच्या रोगावर उपचार होण्यापेक्षा सूज येत राहिली. सत्तेचा आकार वाढत राहिल्यामुळे त्या सुजेला बाळसं समजण्याचा प्रकार आंतरराष्ट्रीय पातळीवर झाला.

हिटलर आणि पोप पायस १२ ( पोप पायस ११च्या नंतरचे) यांच्या हितसंबंधांवर जॉन कॉर्न्वेल यांनी पुस्तक लिहिलं आहे. त्यात मुसोलिनीच्या नंतरच्या काळातलं आणि हिटलरनं ब्लिट्झक्रीग उर्फ विद्युत वेगानं केलेल्या जोरदार लष्करी आक्रमणाचं वर्णन आहे. यात पोप पायस १२ यांच्या बोटचेप्या भूमिकेवर सविस्तर मांडणी आहे. वास्तविक पोप पायस १२ हे गृहस्थ पायास ११चे सहायक होते. त्यांनी मुसोलिनी आणि त्याच्या साम्राज्याचा र्‍हास होताना आणि नरसंहार होताना बघितला होता. असं असूनसुद्धा त्यांच्या प्रशासनात मानवतेला कोणतंही स्थान दिसून आलं नाही. मुसोलिनी म्हणायचा, ‘‘मी लोकांना हिंसा शिकवली नाही. ती लोकांच्या मनात होती. मी फक्त त्या हिंसेला वाट मोकळी करून दिली.”

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4287

.............................................................................................................................................

चर्चसारखी समांतर सत्ता हातात असताना पोप मानवी संहार आणि द्वेषभावना थांबवू शकले असते, पण वैचारिक खुजेपण आणि स्वार्थ या गोष्टी त्यांच्या आड आल्या. या पुस्तकासाठी लागणारं साहित्य डेविड केर्तझर यांनी मोठ्या मेहनतीनं जमवलं आहे. मोठ्या संस्था, लोक हेदेखील चुकू शकतात आणि त्यांचे पायदेखील मातीचे असू शकतात, हा संदेश हे पुस्तक सहजरीत्या देतं. ठराविक काळानंतर, समाजमूल्य बदलल्यानंतर आपले पूर्वज चुकले याची समज यायला लागते. ती काल सुसंगत यावी म्हणून अशी पुस्तकं उपयोगी पडतात.

.............................................................................................................................................

लेखक निनाद खारकर जाहिरात क्षेत्रात कार्यरत आहेत.

k.ninad11@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......