पेरुमल मुरुगन यांचं पुनरागमन (उत्तरार्ध)
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
एलिझाबेथ कुरुविला
  • लेखातील सर्व छायाचित्रं - Priyanka Parashar/Mint
  • Fri , 17 November 2017
  • ग्रंथनामा Granthanama वाचणारा लिहितो पेरुमल मुरुगन Perumal Murugan

२०१५मध्ये तमिळ लेखक पेरुमल मुरुगन यांनी आपल्यातील लेखकाचा मृत्यू झाल्याचं आणि यापुढे आपण लेखन करणार नसल्याचं जाहीर केलं, तेव्हा भारतीय साहित्यविश्वात मोठीच खळबळ माजली होती. मात्र त्यानंतर न्यायालयानं त्यांच्या बाजूनं निकाल देऊन त्यांच्या लेखनाचा सन्मान केला. तेव्हापासून मुरुगन पुन्हा लिहू लागले आहेत. या वर्षी त्यांची चार पुस्तकं इंग्रजीमध्ये अनुवादित झाली आहेत. त्यानिमित्तानं त्यांना प्रत्यक्ष भेटून लिहिलेला हा प्रदीर्घ लेख. हा मूळ लेख ‘mint’ या इंग्रजी दैनिकाच्या ‘Lounge’ या शनिवारच्या पुरवणीमध्ये प्रकाशित झाला आहे. त्याचा पूर्वपरवानगीनं केलेला हा मराठी अनुवाद.

.............................................................................................................................................

या लेखाच्या पूर्वार्धासाठी क्लिक करा -

पेरुमल मुरुगन यांचं पुनरागमन (पूर्वार्ध)

............................................................................................................................................

मुरुगन म्हणतात की, लेखन ही त्यांच्या दृष्टीनं ‘मनाची अवस्था’ आहे. ‘साँग्ज ऑफ अ कॉवर्ड’ या संग्रहात त्यांनी लिहिलंय, “मला वाटलं होतं की लेखनाला कायमची तिलांजली देऊन मी माझ्या जीवनात परतू शकेन पण.. पण.. मला ते शक्य झालं नाही. सरतेशेवटी शब्द, विचार, कविता यांच्या रूपात माझं लेखन गर्जना करून उठलं आणि त्यानं मला पुन्हा एकदा पछाडलं...’’ परंतु स्वतःच्या मातीशी नाळ जुळलेल्या त्यांच्यासारख्या व्यक्तीसमोर केवळ तोच एक पर्याय नव्हता. २०१५ साली वाङ्मयासाठी त्यांच्या मनाची कवाडं बंद झाली, तेव्हा कुटुंबीयांनी त्यांना सुचवलं की, तुम्ही पशुपालनात मन गुंतवा. “मला गुराची निगा राखायला आवडत होतं. मी निवृत्त होईन तेव्हा नक्कीच काही बकऱ्या पाळायला आवडतील मला,’’ ते म्हणतात. साधारण आठ वर्षांपूर्वी, आई जिवंत असताना ते प्राध्यापकीसोबत शेतीही करत होते. परंतु आईच्या निधनानंतर त्यांना कळलं की, शेती हा अर्धवेळाचा व्यवसाय असू शकत नाही तेव्हा त्यांनी ती विकून टाकली.

१४ ऑक्टोबरला आम्ही भेटलो त्या दिवशी मुरुगन यांचा एक्कावन्नावा वाढदिवस होता. सांबार, स्थानिक मसाले घालून मस्तपैकी उकळलेलं रसम आणि घरचं घट्ट दही अशा तीन पदार्थांसोबत तुपाची धार सोडलेल्या भाताचा आस्वाद घेऊन आमची तगडी न्याहारी झाली होती. मग भर दुपारी वात्तुरहून आम्ही त्यांच्या नमक्कल येथल्या घरी पोचलो. त्यांच्या घराच्या पहिल्याच मजल्यावर भली मोठी गच्ची आहे. तिथून एका खडकाळ टेकडीचं दृश्य दिसतं. टेकडीवर सतराव्या शतकात बांधलेला शहरातला मध्यवर्ती किल्लाही आहे. स्थानिक दंतकथा त्या टेकडीचा संदर्भ रामायणाशी जोडतात. हिमालयातून संजीवनी घेऊन हनुमानानं प्रवास केला, तेव्हा तो वाटेत या टेकडीवर उतरला होता.

‘घर’ (कुडू ) अशा नावानं सुरू केलेल्या अनेक साहित्यसभा या गच्चीनं अनुभवल्या. सुरुवातीला फक्त पंधराच माणसं त्या सभांना असायची. ती संख्या वाढून आता ५०-६० लोकांपर्यंत गेली आहे. त्यात विद्यार्थी, स्थानिक वाङ्मयप्रेमी आणि आमंत्रित वक्ते असतात. सभेच्या पन्नासाव्या वाढदिवसाला या गटानं ठरवलं की, आपण एक पुस्तक प्रकाशित करायचं. ‘ब्लॅक कॉफी इन अ कोकोनट शेल’ (‘जातीबद्दलचे जितेजागते अनुभव’) या नावानं प्रसिद्ध झालेल्या त्या पुस्तकात ‘जातवास्तवा’विषयीच्या वैयक्तिक अनुभवांवर लेख होते आणि त्यांचं संपादन मुरुगननी केलं होतं. हल्लीच या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद तामीळ लेखिका डॉ. सी. एस. लक्ष्मी (अंबई या टोपणनावानं त्या वाचकांना परिचित आहेत.) यांनी योडा प्रेस-सेज या प्रकाशनासाठी केला आहे. मुरुगन यांची कन्या इलमपिराई हिनं पहिल्या मजल्यावर एक होमिओपथी दवाखाना सुरू केला आहे. त्या दवाखान्यात बसून आम्ही बोलू लागतो. बाजूच्याच दालनात मुरुगन यांची पुस्तकांच्या शेल्फनी व्यापलेली अभ्यासिका आहे. त्यांचा मुलगा इलमपरिधी हा चेन्नईतील एका आयटी कंपनीत काम करतो. दिवाळीसाठी तो घरी आला आहे. मुरुगन यांची पत्नी आम्हाला चॉकलेट केक देते. आदल्याच रात्री बारा वाजता मुरुगन यांचा वाढदिवस घरात साजरा झालेला असतो.

त्यांची पत्नी एझिलारसी या कवयित्री आहेत. त्यांचे वडील ‘द्रविड कळघम’ या जातव्यवस्था निर्मूलनावर काम करणाऱ्या चळवळीत होते. त्यांनीही ‘ब्लॅक कॉफी’त लेख लिहिला आहे. पित्याच्या निधनसमयी आपल्या तोंडून अनवधानानं जातीय भाष्य निघालं त्याबद्दल त्यांनी लिहिलं आहे. जातव्यवस्थेच्या गुंतागुंतीतून मोकळं होणं मुळीच सोपं नसतं. जेव्हा त्यांचं कुटुंब या परिसरात राहायला आलं, तेव्हा त्यांच्या नाकातील चमकीमुळे शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या मनात त्यांच्या जातीबद्दल संशय जागृत झाला होता. कारण गोंडर स्त्रिया नाक टोचत नाहीत.

‘‘मला ते आनंदी असायला हवे आहेत,’’ चहाचे कप देता देता एझिलारसी आम्हाला म्हणतात. लेखक म्हणून पुनरागमन होऊन आता वर्षाहून अधिक काळ लोटला आहे, पण अजूनही मुरुगन पूर्णपणे कोषातून बाहेर आलेले नाहीत. या वर्षी त्यांच्या पुस्तकांना केंद्रस्थानी धरून बरेच कार्यक्रम आखले गेले. परंतु ते म्हणतात की, “आजही माझ्या मनातील ‘सेन्सॉर’वर मात करणं मला जमलेलं नाहीये. इतक्या लवकर ती भावना माझा पिच्छा सोडेल असं वाटत नाही. पण मी प्रत्यक्ष लिहू लागेन, तेव्हाच मला खरं ते कळेल. ज्या गोष्टींबद्दल लिहायचं माझ्या डोक्यात होतं त्या लिहिण्यात आता मला रस उरलेला नाही. त्याऐवजी मी जे लिहिलं ते लिहिण्याबद्दल मी ठरवलं काहीच नव्हतं,’’ ते म्हणतात.

त्यांच्या लिखाणामुळे उठलेलं वादळ दुर्दैवी असलं तरी त्यामुळे त्यांच्या लेखनाकडे लोकांचं लक्ष पूर्वीपेक्षा अधिक वेधलं गेलं आहे. त्यांचं लेखन इंग्रजी, मल्याळम, तेलुगू आणि कन्नड या भाषांत अनुवादितही झालं आहे. (त्यांच्या पुस्तकांचा कन्नडमधील अनुवाद योगायोगानं गौरी लंकेश यांनी प्रकाशित केला होता. होय, त्याच त्या गौरी लंकेश ज्यांची हत्या या वर्षी सप्टेंबरमध्ये बंगलोर येथील त्यांच्या राहत्या घरासमोर झाली.) त्याशिवाय ‘मधोरूभागन’चा अनुवाद जर्मन आणि हिंदीतही झाला आहे.

मला शांतपणे लिहू द्या, अशी विनंती करणाऱ्या मुरुगनना अनेक साहित्य संमेलनांना बोलावणी येतात. हल्लीच सप्टेंबरमध्ये त्यांनी बर्लिन येथे साहित्यसभेला हजेरी लावली होती. ते म्हणतात, “आयुष्यात मी एवढा बिझी कधीच नव्हतो. पण त्याला इलाज नाही. कठीण काळात जे लोक माझ्या पाठीशी उभे राहिले होते, त्यांना मी नकार कसा देऊ शकतो?”

त्यांचं लेखनाकडे परतणं मंदगतीनं होत आहे. ऑगस्टमध्ये त्यांनी ‘बायपास’ नामक एक लघुकथा लिहिली. आपल्या प्रत्येक नव्या पुस्तकासोबत आपण एक वेगळेच लेखक म्हणून घडतो असं त्यांना पूर्वी वाटायचं. पण आता ही जाणीव अधिक तीव्र झाली आहे. त्यांच्या अंतर्मनातील वादळ जाणून घेण्यासाठी ‘साँग्ज ऑफ अ कॉवर्ड’ हा त्यांचा कवितासंग्रह महत्त्वाचा आहे. ‘ब्लॅक कॉफी इन अ कोकोनट शेल’ हे पुस्तक तमीळमध्ये २०१३ साली प्रथम प्रकाशित झालं होतं. ‘ते काय लिहितात आणि त्यांना कशाकशातून जावं लागलं?’ या दोन्हींचा संदर्भ  आपल्याला त्यातून लागतो.

परंतु आता मुरुगन आपल्या पूर्वीच्या लेखनाकडे नव्या नजरेनं बघत आहेत. त्यांचे तमीळ प्रकाशक आणि कट्टर समर्थक कन्नन सुंदरम यांनी सामाजिक बहिष्काराच्या काळात त्यांची बाजू मांडण्याचं काम केलं होतं. या वर्षाच्या सुरुवातीस त्यांनी त्यांच्या ८१ कथांचा एकत्रित संग्रह काढला. पूर्वी याच कथा चार पुस्तकांत विभागून प्रकाशित झाल्या होत्या. ‘गोट थीफ’ हा त्यातील दहा कथांचा संग्रह आहे. या दहा कथांमुळे आपल्याला लेखक म्हणून खूप समाधान मिळालं, असं मुरुगन म्हणतात. त्यातील बहुतेक कथांची सुरुवात जरी त्यांच्या लक्ष वेधून घेणाऱ्या वास्तववादी शैलीत झाली असली तरी सरतेशेवटी त्या आध्यात्मिकतेकडे वळलेल्या दिसतात.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4265

.............................................................................................................................................

पुस्तकाच्या प्रस्तावनेत मुरुगननी लघुकथेच्या स्वरूपाबद्दल आणि स्वतःच्या हातून घडलेल्या लेखनाबद्दल चिंतन केलं आहे. “मला जाणीव झाली की, शेवटी सर्व कथा या दोन श्रेणींपैकी एका श्रेणीत मोडतात. पहिल्या श्रेणीतील कथा समाजाच्या नियमांनुसार जगण्यातील समस्यांवर आपलं लक्ष केंद्रित करतात, तर दुसऱ्या श्रेणीतील कथा या नियमांतील अपवादांवर लक्ष केंद्रित करतात. लेखक समाजनियमांबद्दल बोलताना सौम्य दुःखाची तार छेडून कथेत चैतन्य आणू शकतो. काय असतं हे दुःख? हे दुःख असतं आपल्या हातून कुठल्याही नियमाचा भंग तर होत नाही ना या भीतीनं टाकलेल्या प्रत्येक पावलातील दुर्दैवाचं. ‘द गोट थीफ’मधील कहाण्या या ‘उपहास, अपशब्द आणि अनास्था’ यांना बळी पडलेल्या अपवादांच्या कहाण्या आहेतच, परंतु त्या जुने नियम तोडून आपल्याला नव्या अस्तित्वाकडे नेणाऱ्या पात्रांच्याही कहाण्या आहेत.’’ त्यानंतर मुरुगन स्वतःबद्दल विधान करतात की, “हे नियम जाणून घेणं, पाळणं आणि त्यांच्या आधिपत्याखाली जीवन जगणं ही माझी स्वतःची निवड असली तरी जाणीवपूर्वक प्रतिकाराची पहिली पायरी म्हणूनच या अवस्थेकडे पाहतो.’’

***************

मुरुगननी स्वतः काहीही म्हटलं तरी त्यांचं जीवन अपवादात्मकच आहे. त्यांनी ते जाणीवपूर्वकच तसं केलं आहे. ते लहान होते तेव्हा शेतकऱ्यांनी आपली मुलं शिकायला पाठवावीत म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री के. कामराज यांनी विद्यार्थ्यांसाठी शाळेत मध्यान्ह-भोजन-योजना सुरू केली होती. अर्थात् तरीही शिक्षणाला फारसं महत्त्व नव्हतं. प्राथमिक शिक्षण संपलं की, मुलींना शाळेतून काढूनच घेत होते, तर मुलगे नापास होईपर्यंत शिकत होते. मुरुगन यांच्या मोठ्या भावाच्या नशिबी नववीपर्यंतचं शिक्षण होतं. परंतु मुरुगन मात्र चांगलं शिकले. ते दहावीत असताना त्यांच्या वडिलांनी ठरवलं की काहीही झालं तरी आपण मुलाला शिक्षक करायचं. वडिलांचं दुकान ज्या थिएटरमध्ये होतं, त्याच थिएटरमध्ये एक शिक्षक अर्धवेळ तिकिट-विक्रेत्याचं काम करत असत. त्या शिक्षकांवरून मुरुगन यांच्या वडिलांना ही प्रेरणा मिळाली.

मुरुगन यांच्या स्वभावात एक स्वतंत्र, सर्जनशील छटा नेहमीच होती. ते म्हणतात, “मला एकट्याला राहायला आवडायचं. त्यामुळे माझं निरीक्षण तीव्र होतं. वयाच्या आठव्या वर्षापासूनच मला लिहावंसं वाटू लागलं होतं. जातीजातीत फरक का आहे असे प्रश्न मला नेहमीच पडायचे. वडिलांच्या दुकानात काम करणाऱ्या मुलांशी तिथली गिऱ्हाईकं कशी वागायची, ते मी दुकानात बसून न्याहाळत असे. आमच्या शेतावर काम करणाऱ्यांशी आमचं नातं कसं होतं हे मला जाणवायचं. त्यांच्यावर असलेली बंधनं, मर्यादा मला जाणवायच्या.’’ त्यातूनच त्यांनी ‘करंट शो’ हे पुस्तक लिहिलं. कुटापल्लीचा भाग नंतरच्या काळात गृहनिर्माण प्रकल्पांनी गिळंकृत केला, त्याविषयीचं वर्णन त्यांच्या ‘इरू वेय्यिल’ (‘वाढती उष्णता’) या पहिल्या कादंबरीत आलं आहे. “तेथील निसर्गचित्राशी माझं जिव्हाळ्याचं नातं होतं. ते नातं आता हरपलं आहे असं मला वाटतं. तरीही त्या निसर्गाची ओढ मला नेहमीच राहणार आहे,’’ ते म्हणतात.

मुरुगन यांनी तमीळ साहित्यात पदवी घेतली. शिक्षणाचा भाग म्हणून त्यांनी भाषाशास्त्र आणि लोकसाहित्याचा अभ्यास केला. त्या दोन्हींनी त्यांच्यातील लेखकाला घडवलं. त्यांनी कोंगू बोलीतील वैशिष्ट्यपूर्ण शब्दांचं संकलन करायला सुरुवात केली आणि त्यानंतर वीस वर्षांनी एक शब्दकोश तयार केला. तो आता त्यांच्या अनुवादकांना फारच सोयीचा पडत आहे. अंबई म्हणतात की, शब्दकोश- रचनाशास्त्रात त्यांना असलेल्या रूचीमुळे ते अपशब्दांचाही अभ्यास करू लागले. याच अपशब्दांमुळे भाषा सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचत होती, केवळ शास्त्रीय तामीळ शिकणाऱ्या पुस्तकी विद्वानांपर्यंत मर्यादित राहत नव्हती.

मग त्यांनी स्थानिक लोकसाहित्यावर संशोधन करायला सुरुवात केली. लोकसाहित्यानं त्यांच्या ‘मधोरुभागन’सारख्या कादंबरीत शिरकाव केला. त्याबद्दल मुरुगन म्हणतात, “मला भूतकाळ शोधण्याची, माझे पूर्वज कसे जीवन जगत होते ते समजून घेण्याची सवय आहे. माझ्या कुटुंबाकडे त्यांचा मौखिक किंवा लेखी कसलाच इतिहास नव्हता. मला तर माझ्या खापरपणजोबांचं नावही माहिती नव्हतं. मला वर्तमानकाळात जगायला आवडत असलं तरी भूतकाळात प्रवास करायलाही आवडतं. कथांमध्ये दोन्हींचं चित्रण करावंसं वाटतं.’’

वात्तुरमध्ये त्यांच्या पुतणीचे सासरे आमच्याकडे पूजेचं ताट घेऊन येतात. त्यांच्याकडे सकाळी एक अपत्यहीन जोडपं आलं होतं. शेळ्यांना बांधून घालायच्या ठिकाणाजवळ बिल्ववृक्षाखाली शंकराचं देऊळ आहे. बेलाची गोल फळं असलेलं ते झाड शंकराच्या खास आवडीचं असतं, शिवमंदिराच्या आसपास बऱ्याचदा आढळतं. झाडामागं लाल, पिवळ्या रंगात रंगवलेल्या मातीच्या गायी आहेत. त्यांच्यावर लाल रंगाची नक्षी काढली आहे. त्याशिवाय एक माणसाची प्रतिमाही तिथं आहे. गुरं किंवा माणसं आजारी पडली तर या प्रतिमा देवाला वाहतात.

आमचे यजमान वैदू आहेत, त्यांना स्थानिक मुळ्या माहिती आहेत. मुरुगन सांगतात, “त्यांना बरेच मंत्रतंत्रही येतात.’’ बोलताना मुरुगन यांचा चेहरा निर्विकार असतो. त्यांच्या कथांतही असे उल्लेख बरेच येतात. संघटित, पोथीनिष्ठ धर्म आणि स्थानिक श्रद्धा यांनी मिळून बनलेला दृष्टिकोन त्यात दिसतो. ‘सीझन्स ऑफ द पाम’ या कथेतील लंगड्याला मंत्रांनी आजार बरे करता येतात. सामाजिक उतरंडीत त्याच्यापेक्षा वरती असलेल्या लोकांचा त्याच्या दैवी गुणांवर विश्वास असतो, परंतु तरीही त्या दलित मुलाला कुठलाही मानसन्मान मिळत नाही. तो शेवटी अस्पृश्यच राहतो.

आईच्या निधनानंतर लिहिलेल्या लेखात ते स्वतःचं चित्रण ‘एक नर्व्हस, अंतर्मुख मुलगा, ज्याच्या मनातील अगणित शंका आणि भीती दूर करण्यासाठी खास प्रयत्न करावे लागतात’, असं करतात. गीता म्हणतात, “त्यांच्या प्रखर सामाजिक जाणिवा ही जशी त्यांची ताकद आहे, तशीच वर्चस्ववादी जात-अस्तित्वाच्या मर्यादांबद्दल दया-माया न वाटणं हीही ताकदच आहे.’’

वैदूंच्या कुटुंबातल्या मुरुगनला ‘कविते’नं आपलं अस्तित्व नव्यानं शोधायला मदत केली, त्यांची कोरी पानं पुन्हा शब्दांनी सजवली. त्यांना ज्या प्रसंगातून जावं लागलं त्याबद्दलची यथार्थ दृष्टी दिली. त्याबद्दल मुरुगन म्हणतात, “मी माझ्या शब्दांनी परतवार केला. मी केलेल्या परतवारालाच भेकडपणा म्हणत असतील तर मग भेकडपणालाही आपल्या जीवनात काही स्थान हवं की नको? तुम्ही मला विचारलंत की तू धाडसी आहेस की भेकड आहेस? तर मी म्हणेन, या दोन्ही श्रेणींत मला बसवता येणार नाही.’’

(अर्चना पी. एन. यांनी या मुलाखतीसाठी दुभाषी म्हणून काम केलं आहे.)

२०१७ : पेरुमल मुरुगन यांनी गाजवलेलं वर्ष

१) द गोट थीफ - पेरुमल मुरुगन. इंग्रजी अनुवाद - एन. कल्याण रामन, जगरनॉट बुक्स, पाने - २३२, मूल्य – ३९९ रुपये.

मागील वर्षभरात मुरुगन यांनी आपल्या लेखनाचं सिंहावलोकन केलं आणि ‘कथा’ या वाङ्मयप्रकाराला न्याय देणाऱ्या दहा कथा त्यातून निवडल्या. या कथांतील पात्रं स्वतःच्या मनातील भावनांना, असुरक्षिततेला आणि हळव्या कोपऱ्यांना प्रतिसाद देतात. रामन म्हणतात, “त्यातील बहुतेक जण हरणारी लढाईसुद्धा त्वेषानं लढतात, त्यासाठी आपली उरलीसुरली नाजूक प्रतिष्ठाही पणाला लावतात.’’

२) साँग्ज ऑफ अ कॉवर्ड : पोएम्स ऑफ एक्साईल – पेरुमल मुरुगन, इंग्रजी अनुवाद –अनिरुद्धन् वासुदेवन्, पेंग्विन रॅंडम हाऊस, पाने - २९१ , मूल्य - २९९ रुपये.

मुरुगन लेखक म्हणून जगापासून दूर गेले होते, अशा कालखंडात या कविता लिहिल्या गेल्या. कविता खूपच वैयक्तिक आहेत, कादंबऱ्यांतून त्यांनी स्वतःला तसं कधीच व्यक्त होऊ दिलं नव्हतं. आपल्याला मिळालेली प्रतिभेची देणगीच शापासारखी वाटू लागलेल्या एका सर्जनशील आत्म्याचा भावनिक आक्रोश त्यातून व्यक्त होतो. त्यांच्या वैयक्तिक विचारविश्वात प्रवेश करताना वाचकांना अवघडल्यासारखं होतं.

३) ब्लॅक कॉफी इन अ कोकोनट शेल : कास्ट अॅज लिव्हड एक्स्पिरिअन्स – संपादन : पेरुमल मुरुगन- इंग्रजी अनुवाद - डॉ. सी. एस. लक्ष्मी, योडा प्रेस- सेज, पाने - २२९, मूल्य - ५९५ रुपये.

नमक्कल येथील त्यांच्या घरी साहित्यिक बैठकी होत असत. त्या बैठकीची फलश्रुती या पुस्तकाच्या रूपात झाली. त्यात जातवास्तवाविषयीचे व्यक्तिगत अनुभव सांगणारे ३२ निबंध आहेत. अनुवादिका डॉ. लक्ष्मी म्हणतात, “हे केवळ दमनाविषयीचंच लेखन नाही तर जातीचा कधीही न पुसला जाणारा शिक्का कपाळी घेऊन जगण्याची, प्रेम करण्याची आणि मरण्याची गाथा आहे.’’

४) आगामी - ‘पुनाचि अल्लाधू ओरू वेल्लात्तीन कथाई’- पेरुमल मुरुगन, इंग्रजी अनुवाद - एन. कल्याणरामन, अॅमेझॉन वेस्टलॅंड

२०१६ साली मुरुगन यांनी लिहिलेली ही लघुकादंबरी इंग्रजीत अनुवादित होत आहे. अॅमेझॉन वेस्टलॅंडच्या प्रकाशिका कार्तिका व्ही. के. या पुस्तकाचं वर्णन करताना सांगतात, “आपला समाज कुठल्या दिशेनं जात आहे हे पाहणं आनंदाचे असतं. त्यासाठी सूक्ष्मदृष्टी लागते. हे आजच्या काळातील दंतकथात्मक आणि मर्मग्राहक लेखन आहे.’’ लेखक मुरुगन ज्या विवादाच्या भोवऱ्यात सापडले, त्या विवादाला दिलेला हा थेट प्रतिसादच आहे.

............................................................................................................................................

मराठी अनुवाद- सविता दामले

savitadamle@rediffmail.com

.............................................................................................................................................

हा मूळ लेख ‘mint’ या इंग्रजी दैनिकाच्या ‘Lounge’ या शनिवारच्या पुरवणीची ४ नोव्हेंबर २०१७ची मुखपृष्ठकथा म्हणून प्रकाशित झाला आहे. मूळ लेख पाहण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......