“मी कोणत्याही बंदिस्त चौकटीत राहून काम नाही करू शकत. मी एखाद्या मुक्त पक्ष्यासारखी आहे!” - नासिरा शर्मा
ग्रंथनामा - मुलाखत
प्रमोद मुजुमदार
  • नासिरा शर्मा
  • Fri , 10 November 2017
  • ग्रंथनामा Granthanama मुलाखत निद्रित निखारे Nidrit Nikhare नासिरा शर्मा Nasira Sharma Diamond Publications डायमंड पब्लिकेशन्स

पत्रकार, कथा-कादंबरीकार नासिरा शर्मा यांचा ‘निद्रित निखारे’ हा कथासंग्रह नुकताच डायमंड पब्लिकेशन्स, पुणे यांनी प्रकाशित केला आहे. या कथासंग्रहाचा अनुवाद प्रमोद मुजुमदार यांनी केला असून त्यांनी या संग्रहासाठी नासिरा यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा हा संपादित अंश.

नासिरा शर्मा हे समकालीन हिंदी साहित्यातलं एक महत्त्वाचं नाव, परंतु हिंदी साहित्यवर्तुळातल्या प्रस्थापितांच्या परिघाबाहेरचं. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांचा आणि वैचारिक लेखनाचा फार मोठा वाचकवर्ग आहे. विशेषतः त्यांनी हाताळलेले विषय फारच वेगळे आहेत. त्यांच्या कथांच्या विषयांची पार्श्वभूमी जशी भारतीय आहे, तशीच ती आशियातल्या आणि मध्यपूर्वेतल्या देशांमधल्या सामान्य माणसांच्या जीवनातीही आहेत. अलीकडच्या, किंबहुना स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय भाषांत क्वचितच आशियातल्या आणि मध्यपूर्वेतल्या सामान्य माणसांच्या जीवनाचं प्रतिबिंब असं साहित्यात उमटलं असेल.

केवळ एक सर्जनशील साहित्यिक म्हणूनच नाही, तर एक पत्रकार म्हणूनही त्यांची कामगिरी फार महत्त्वाची आहे. वर्तमानपत्रं, रेडिओ आणि इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमं अशा सर्वच क्षेत्रांत त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे यात शंका नाही.

अशा या बहुमुखी पत्रकार आणि साहित्यिक लेखिकेची ही मुलाखत २००५ साली घेतलेली आहे. त्यानंतरही नासिराजींचं महत्त्वपूर्ण साहित्य प्रसिद्ध झालं आहे. उत्तर भारतातल्या ग्रामीण भागावर पर्यावरण-ऱ्हासाचा होत असलेला घातक परिणाम आणि उद्ध्वस्त होणारं जीवन दर्शवणारी ‘कुइराँजान’ ही कादंबरी. तर अलीकडेच आलेली त्यांची ‘खुदाकी वापसी’ ही गाजलेली कादंबरी मुस्लीम महिलांच्या मेहरच्या प्रश्नावर आणि वैवाहिक जीवनातल्या प्रश्नांवर प्रकाश टाकते.

.............................................................................................................................................

प्रश्न - नासिराजी, तुमच्या कारकिर्दीवर नजर टाकली; तर असं दिसतं की, तुम्ही तुमच्या कारकिर्दीची सुरुवात जामिरा मिलिया इस्लामियात प्राध्यापक म्हणून केली, पण त्यानंतर पत्रकारितेकडे कशा वळलात? 

नासिरा शर्मा - माझं लेखन आधी सुरू झालं. ते कुठेकुठे छापूनही येत होतं. त्यानंतर मी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात प्राध्यापकी सुरू केली. मला पुढे या नोकरीचा राजीनामा द्यावा लागला, तोही माझ्या लेखनामुळेच! कारण जामियातल्या काही परंपरावादी मंडळींना माझं लेखन अडचणीचं वाटायला लागलं. खरं तर इराणविषयी माझं लिखाण खूप आधीपासूनच इंग्लिशमध्ये आणि हिंदीत प्रकाशित होत होतं, पण माझा याच विषयावरचा स्तंभ ‘कौमी आवाज’ या उर्दू दैनिकात छापला जायला लागला आणि गहजब झाला. मला विरोध सुरू झाला. मला पत्रं यायला लागली, ‘तुमचे लेख असलेले ‘कौमी आवाज’चे सारे अंक आम्ही जाळून टाकले. तुमचे विचार योग्य नाहीत.’ याच वैचारिक मानसिकतेच्या लोकांनी जामिया मिलियामध्येही मला विरोध करारला सुरुवात केली. लोकांना माझे विचार पटत नव्हते, कारण मी आधी इराणच्या शहाच्या राजवटीतल्या भ्रष्टाचारी व्यवस्थेवर टीका करणारे लेख लिहिले होते. नंतर इमाम खोमीनीच्या काळात इराणमधल्या आम जनतेवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल टीका करणारे लेख लिहिले. त्यामुळं लोक रागावले असावेत. मला नक्की काय पाहिजे हे त्यांना कळत नव्हतं. मला कुणाला विरोध करायचा असेल, तर मी ‘पार्टी सदस्य’ होऊनच विरोध केला पाहिजे, इतकीच त्यांच्या विचारांची धाव असावी. समाजाकडे बघण्याचा लेखकाचा काही स्वतंत्र दृष्टिकोन असू शकतो, तो तसा बाळगण्याचा त्याला अधिकार आहे वगैरे त्यांना मान्य नसावं.

पुढे असाच अनुभव मला जेएनयुतही आला. मला फारसीत पीएच.डी. करायची होती, पण मला परवानगी देण्यावरून मोठा वादंग उठला. विद्यापीठाचा फारसी विभागात आणि जेएनयुमधल्या विद्यार्थी संघटनेत तीव्र संघर्ष उभा राहिला. विद्यार्थी संघटना होती एसएफआर म्हणजे डाव्या पक्षाची. माझ्या पीएच.डी.च्या मुद्द्यावरून पुढे एसएफआरमध्येही दोन गट पडले असं मला समजलं. त्यामागे कारण काय होतं, तर माझा शहाविरोधी लेख आणि एका कवितासंग्रहाचा मकी केलेला अनुवाद. मी १९८७मध्ये ‘एकोज ऑफ इरानिअन रिव्हॉल्युशन - प्रोटेस्ट पोएट्री ऑफ इराण’ या नावानं हा अनुवादित काव्यसंग्रह प्रसिद्ध केला. तो विकास प्रकाशनानं प्रकाशित केला होता. जेएनयुमधल्या फारसी विभागाच्या प्राध्यापकांना इराणच्या शहानंच पोसलं होतं. इराण सरकारची फारसी विभागाला मदत मिळत असे. ही प्राध्यापक मंडळी नियमितपणे इराणला भेटी देत असत. त्यामुळं इराणच्या शहाला विरोध करण्याची कुणाची हिंमत नव्हती. मी इराणच्या शहाच्या विरोधी इंग्रजी वर्तमानपत्र ‘हिंदुस्तान टाइम्स’मध्ये एक पानभर लेख लिहिला होता. तो काळ माझ्या आयुष्यात अचानक येऊन धडकला. आता मागे वळून बघताना मला म्हणावंसं वाटतं की, दुनिया काय असते, संघर्ष कसा करावा लागतो आणि लेखकानं आपलं लेखन किती गांभीर्यानं घ्यायला हवं हे मी त्या काळात शिकले. माझ्या आयुष्यातलं ते एक सुवर्णवर्ष होतं. त्या काळात मी फक्त नोकरीच सोडली असं नाही; तर ‘एशिया वीक’ या इंग्लिश साप्ताहिकाची वार्ताहर होण्याची संधी नाकारली. एवढंच नाही, तर बीबीसीमध्ये काम करण्याची संधीही सोडली. तो काळ माझा खऱ्या अर्थानं लेखक होण्याचा काळ होता. त्या काळात अनेक घटना माझ्या आयुष्यात घडत होत्या. मी भरपूर प्रवास करत होते. नवनवे अनुभव घेत होते. शिवाय माझ्या असंख्य वाचकांकडून मला पाठिंब्याबरोबरच प्रोत्साहनही मिळत होतं. माझ्यासाठी त्या दिवसांत नोकरी आवश्यक होती आणि नव्हतीही. मी नोकरी टिकवायचा निर्णय घेतला असता, तर मला त्याची किंमत चुकवावी लागली असती. ती किंमत म्हणजे मला फारसी विभागातल्या सरकारी कामात अडकून पडावं लागलं असतं, म्हणजे मला लेखन करणं अशक्यच झालं असतं. प्रवास करता आला नसता. त्यामुळंच मला नोकरी सोडणंच श्रेयस्कर वाटलं. त्या दिवसांत माझी मुलंही लहान होती; म्हणजे घर, लेखन, नोकरी आणि शिवाय नोकरीच्या ठिकाणचं राजकारण अशा अनेक आघाड्यांवर मी अडकून पडत होते. त्याच दिवसांत मला प्रसिद्ध हिंदी साहित्यिक प्रेमचंद यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्रीपत राय यांनी मोठा मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले, ‘तू तुझी सारी प्रतिभा लेखनासाठी खर्च करणं आवश्यक आहे. नोकरी आणि नोकरीसाठी तिथली भांडणं आणि तिथलं राजकारण यांत तुझी सर्जनशक्ती तू वाया घालवू नयेस.’ मला त्यांचा सल्ला पटला. मी नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतरच मी प्रचंड प्रवास केला. अक्षरशः धोकादायक वाटतील असे अनेक प्रवास केले. माझ्या त्या अनुभवांना हिंदीच नाही, तर अन्य भाषक वाचकांनीही प्रचंड दाद दिली.

प्रश्न - तुमच्या बालपणाविषयी काय सांगाल? तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय? तुमचं बालपण कुठे गेलं? तुमचं कुटुंब पुरोगामी विचारांचं होतं की पारंपरिक चौकटीतलं होतं?

नासिराजी - आमचं कुटुंब रायबरेली जिल्ह्यातल्या मुस्ताफाबाद या गावातलं, म्हणजे आमचं गाव अलाहाबाद आणि लखनऊ या दोन शहरांच्या मध्यावर येतं. माझे वडील उर्दूचे प्राध्यापक होते. त्यांचं महत्त्वाचं कार्य म्हणजे त्यांनी अलाहाबाद विद्यापीठात उर्दू विभागाची स्थापना केली. तसं बघितलं तर आमच्या घराण्यातच कविता करणाऱ्यांची मोठी परंपरा होती. शिक्षणाचं आणि लेखन-वाचनाचं वातावरण होतं. आमचं खानदान मोठं होतं. त्यामुळं विविध विचारधारा मानणारे लोक होते. कुणी कम्युनिस्ट विचारांचे, तर कुणी किसान आंदोलनाशी संबंधित. कुणी पत्रकारितेत होते, तर कुणी शेतीवाडीत रमलेले. थोडक्यात असं सांगता येईल की, आमच्या परिवारात साहित्यिक वातावरण होतं. आम्हांला लेखन-वाचन आणि कोणत्याही विषयावर चर्चा करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य होतं.

प्रश्न - तुम्ही कोणत्या माध्यमातून शालेय शिक्षण घेतलंत? इतक्या साऱ्या भाषा कधी शिकलात? तुम्ही पत्रकारितेविषयी आणि प्रसारमाध्यमांविषयी काही औपचारिक शिक्षण घेतलंत का?

नासिराजी - माझं शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालं. मी सेंट अ‍ॅन्थोनी हारस्कूलमध्ये शिकले. नंतर हिंदीचा प्रवास सुरू झाला. हमीदीया गर्ल्स कॉलेजमधून मी इंटर केलं. अलाहाबादला येऊन बी.ए. केलं. त्यापुढे जेएनयुमधून पाच वर्षांच्या अभ्यासक्रमात फारसी भाषेत एम.ए. केलं. जेएनयुमध्येच पुश्तु भाषेचाही अभ्यासक्रम मी पूर्ण केला. उर्दू तर माझी मातृभाषाच आहे.

बाकी प्रसारमाध्यमं किंवा पत्रकारिता म्हणाल, तर मी कसलंही औपचारिक शिक्षण घेतलेलं नाही. खुदानी मला दिलेल्या गुणकौशल्यावरच तरले. त्यालाच अंकुर आणि धुमारे फुटत गेले.

प्रश्न - तुमच्या सर्व लिखाणात - मग ते पत्रकारितेतलं लिखाण असो वा ललित लिखाण असो, मानवी वेदना आणि दुःखविषयक करुणा व्यक्त होते. किंबहुना तुमच्या सर्व सर्जनशील लेखनाची प्रेरणाच ही करुणा आहे असं वाटतं. सहसा असा मानवतावादी दृष्टिकोन करुणात्मकतेची जाणीव वैयक्तिक अनुभवांतून विकसित होते. तुमच्या सामाजिक, राजकीय दृष्टिकोनामुळे तुमचा मानवतावादी दृष्टिकोन तयार झाला?  

नासिराजी - मला वाटतं, वैयक्तिक अनुभव, राजकीय आणि सामाजिक जाणिवा आणि उपजत संवेदनाशीलता अशा चारही घटकांचा मला सर्जनशील लेखक बनवण्यात महत्त्वाचा सहभाग आहे. मानवी दुःख आणि वेदना मला नेहमीच भिडतात. मला विचार करायला लावतात बरं. मला माझे असे अनुभव नसते, तर मी लेखनक्षेत्रात इतका प्रदीर्घ प्रवास कसा करू शकले नसते, म्हणजे माझे वैयक्तिक अनुभवही तेवढेच महत्त्वाचे म्हणायला हवेत. माझे अनुभव म्हणजे मला वाट दाखवणारा प्रकाश आहे. माझ्यासाठी ‘टॉर्च’ आहे. माझ्या मनात आणि मेंदूत मला आलेले अनुभव घुमत राहतात. कुठल्यातरी कोपऱ्यात दडलेली त्या अनुभवातली मानवी वेदना एकदम दृग्गोचर होते. त्यामुळं मला चेतना मिळाल्यासारखं वाटतं. मला रस्ता सापडतो आणि मी ते सर्व कागदावर उतरवते. वाचकांच्या पुढे ठेवते. कोणत्याही वैचारिक प्रवाहाशी माझी बांधिलकी नाही, ना मी कोणत्या राजकीय पक्षाची सदस्य आहे. लेखकाची निष्ठा त्याच्या लेखणीशी हवी असा माझा ठाम विश्वास आहे.

प्रश्न - अधिक थेट विचारायचं, तर १९८०च्या दशकापर्यंत आंतरराष्ट्रीय पत्रकारितेच्या क्षेत्रात भारतीय स्त्रीपत्रकारांचा सक्रिय सहभाग क्वचितच आढळत असे. त्यातही तुमच्या मुस्लीम सामाजिक पार्श्वभूमीचा विचार करता, ते आणखीच आश्चर्यकारक म्हणायला हवं. हे तुम्हांला कसं काय जमलं? तुम्हांला तुमच्या घरातून किंवा जवळच्या माणसांकडून कधी विरोध नाही झाला? आणि झाला असल्यास तुम्ही त्यावर कशी मात केलीत?

नासिराजी - नाही, मला घरातून किंवा जवळच्या माणसांकडून कसलाच विरोध झाला नाही. माझ्या पतींनी मला दिलेली सर्वांत सुंदर भेट कोणती असेल, तर मला त्यांनी सर्व प्रकारचं स्वातंत्र्य दिलं, मोकळीक दिली, त्यांनी मला नवनवीन आव्हानं स्वीकारायला प्रोत्साहन दिलं. कितीही जोखीम असली, तरी त्यांनी मला अडवलं नाही; म्हणून तर मी अनेक संकटं ओढवून घेऊ शकले. लांबलांबचे धोकादायक प्रवास करू शकले. माझ्या लिखाणामुळे, माझ्या विचारांमुळे माझ्या कुटुंबातल्या लोकांना खूप त्रास सहन करावा लागला. विशेषतः परंपरावादी आणि प्रस्थापित राजकारणाची योग्य ती समज नसलेल्या लोकांच्या टीकेला तोंड द्यावं लागलं, पण तरीही आमच्या परिवारातल्या कुणीही मला कधीच सांगितलं नाही की, तू तुझं लेखन थांबव किंवा तू अमुक एक लिहू नको. मला वाटतं, आमचा एक खानदानी दबदबा होता आणि माझ्या लेखनाची ताकदही महत्त्वाची ठरली असावी. त्यामुळंच मी खंबीरपणे उभी राहू शकले. नाहीतर समाजातून खूप विरोध झाला आणि संकटंही बरीच आली.

अर्थात एक गोष्ट सांगायलाच हवी. मी नेहमी मला हवं तेच केलं आणि मला हवं तेच लिहिलं. अशा लेखनाला आणि लेखकाला हे गृहीतच धरावं लागतं की, तुम्हांला सहजासहजी मान्यता मिळणार नाही. सरकारी भूमिकेला पूरक असणाऱ्या आणि त्यांची ‘री’ ओढणाऱ्या ‘सेवाभावी’ लेखकांना बरंच काही आपोआप मिळतं, पण मला त्याची बिलकूल खंत नाही आणि माझी ती कधी अपेक्षाही नव्हती.

प्रश्न - एक पत्रकार म्हणून तुमच्या कामात अशियायी आणि मध्यपूर्वेतील देश आणि तिथल्या घडामोडी हे विषय विशेष प्रकर्षानं येतात. यामागची प्रेरणा काय, या देशांपैकी समजून घ्यायला सगळ्यांत अवघड आणि गुंतागुंतीचा देश कोणता?

नासिराजी - मी आशिया आणि मध्यपूर्वेतले देश आणि तिथल्या घडामोठी यांच्याविषयी अधिक लिखाण केलं, हा निवळ योगायोग आहे. असं म्हणू शकतो की, माझ्या भाग्यरेषेनं ते ठरवलं असावं. निवळ नशिबात होतं ते घडलं. कारण मला जायचं होतं आफ्रिका, चीन, इटली या देशांत; पण मी जाऊन पोहोचले इराण, अफगाणिस्तान, इराक, सीरिया या देशांत. असं का आणि कसं घडलं  मलाच कळलं नाही. माझा आवडता विषय होता भूगोल. मला भूगोलात एम.ए. करायचं होतं; पण केलं कशात, तर फारसीत. मी कधी नकाशातही इराण कुठे आहे ते शोधायचा प्रयत्न केला नव्हता. लग्नानंतर तीन वर्षं मी स्कॉटलंडमध्ये राहिले, पण स्कॉटलंडविषयी कसलंही ललित लिखाण मला करावंसं वाटलं नाही. मी इराणच्या भूमीवर पाऊल ठेवलं आणि जणू माझ्या सर्जनात्मक लिखाणाला पूर आला. मला वाटतं की, या घटितात ना माझ्या इच्छेचा काही भाग होता, ना माझा विशेष प्रयत्न होता, ना माझ्या परिवाराच्या प्रेरणेचा! मला वाटतं की, माझ्या आयुष्यात मला कुणीतरी हाताला धरून चालवतं. माझं जीवन जणू स्वेच्छेनं सरकत राहतं. माझी लेखणी माझ्याकडून लिखाण करवून घेते. माझ्या कथा-कादंबऱ्यांतली पात्रं आपापल्या भूमिका त्यांची ती पार पाडतात. मी काहीतरी पात्र योजलेलं असतं, पण प्रत्यक्ष अवतरताना ती पात्रं स्वतःच्याच मर्जीनं वावरतात. मी जो काही विचार केलेला असतो, त्यापेक्षा वेगळाच युक्तिवाद आणि तर्क मांडतात. त्यावर माझं कसलंच नियंत्रण राहत नाही. मला वाटत राहतं की, सर्जनाची अशी काहीतरी शक्ती आहे, ती माझ्याकडून लिहून घेत असते.

आशियातले आणि मध्यपूर्वेतले देश राजकीयदृष्ट्या उद्ध्वस्त झालेले देश आहेत, पण त्यांच्या प्राचीन संस्कृतीची मोठी परंपरा आहे. फार मोठा सांस्कृतिक वारसा या देशांना लाभलेला आहे. आज ज्या तऱ्हेचं शोषण हे देश सोसत आहेत, त्याचा अंदाज मला फार पूर्वीच आला होता. मी पूर्वी त्या देशांना भेटी दिल्या होत्या, तेव्हाच मला चिन्हं दिसत होती. पूर्वीपासून त्या देशांबरोबर आमच्या देशाचे घनिष्ट संबंध आहेत, पण आजच्या आधुनिकतेच्या काळात आम्ही आमच्या या शेजारी देशांपासून फार दूर चाललो आहोत. मला खात्री आहे की, या मध्यपूर्व देशांतल्या आम आणि खास अशा दोन्ही नागरिकांना भारताबद्दल आणि भारतीयांबद्दल विशेष प्रेम आणि आपुलकी वाटते. ते लोक भारतीयांवर प्रेम करतात, पण आपण या देशांना मुस्लीम देश किंवा आखाती प्रदेश म्हणून ओळखतो. आपण त्यांना मागास आणि जंगली समजतो. याच प्रदेशावर म्हणजे इराणवर राहुल सांकृत्यायन यांनी पन्नास वर्षांपूर्वी प्रचंड मोठं संशोधनात्मक काम आणि लिखाण केलं आहे. लेखनाची प्रेरणा लेखकाला कसं वळण घ्यायला लावेल याचा अंदाज लेखकालाही नसतो. लेखकाला जसं जाणवत जातं, तसं तो लिहीत जातो. लेखकाला सीमा नसतात. उलट लेखक सीमेच्या पार बघू शकतो.

मला वाटतं की, मध्यपूर्वेतले देश समजून घ्यायचे असतील, तर त्यांच्याच नजरेनं आपण ते समजून घ्यायला हवेत. आपला दृष्टिकोन त्यांच्यावर लादता कामा नये. मध्यपूर्वेतील सामान्य माणसं गरीब आहेत, पण गरिबी वगळता ते अतिशर संवेदनशील आहेत. माणुसकीनं आणि सर्जनशीलतेनं ओतप्रोत भरलेले ते लोक आहेत. गरिबीमुळे लादल्या गेलेल्या अडचणींशी ते आज टक्कर देत आहेत. आपण आणि आपला देश गरिबीमुळे लादल्या जाणाऱ्या अडचणींतून बाहेर पडलो आहोत, पण याच मध्यपूर्वेतील देशांना लोकसाहित्याचा मोठा वारसा लाभला आहे हे आपण विसरता कामा नये. युरोपिअन लोकांनी त्यांच्या लोकसाहित्यावर मोठं काम केलेलं आहे. भलेही युरोपिअन शासनकर्त्यांनी या देशांचं प्रचंड शोषण केलेलं असलं, तरी युरोपमधले माझ्यासारखे लाखो कलाकार, साहित्यिक, चित्रपटकार, नाटककार, वास्तुविशारद अशा सर्वांनी या देशांतल्या साहित्याचं आणि प्राचीन वास्तूंचं संशोधनही केलं. इतकंच नाही तर अनेक युरोपिअन कलाकारांनी त्यापासून प्रेरणा घेतली. शेक्सपिअरच्या सर्व नाटकांची बीजं त्यानी अरब साहित्यातून घेतल्याचं सांगितलं जातं. या विषयांवर काम करणारे माझ्यासारखे लोक भारतात फार कमी आहेत हे खरं आहे; पण तुम्ही पॅरिसमध्ये बघाल, तर इराणवर आणि अफगाणिस्तानावर किमान हजारावर साहित्यिकांनी आणि कलाकारांनी अत्यंत सर्जनशील चित्रपट बनवलेत, कादंबऱ्या लिहिल्यात, कथा लिहिल्यात; पत्रकारांनी लिखाण केलंय. या विषयांवरचे दोन चित्रपट तर विशेष उल्लेखनीय आहेत. पैकी एक म्हणजे ‘नॅाट विदाउट माय डॉटर’ हा चित्रपट या विषराची एक बाजू मांडतो, तर दुसरा चित्रपट ‘हाउस ऑफ फॉग अँड ड्रिम’. हा चित्रपट दुसरी बाजू पुढे आणतो. हे दोन्ही चित्रपट तुम्हांला हेलावून टाकतात. या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना या चित्रपटांसाठी ऑस्कर मिळालं. मात्र या चित्रपटांचे दिग्दर्शक ज्या देशांचे होते, त्याच देशांच्या सरकारांनी अफगाणिस्तान उद्ध्वस्त केलं होतं.

मला हे देश समजून घ्यायला कधीच अडचण आली नाही, येतही नाही; पण मला काही आणखी सवलती मिळाल्या असत्या, पाठिंबा मिळाला असता; तर आणखी काम करणं शक्य झालं असतं. या देशांना भेटी देण्यासाठी मी स्वतःच्या खर्चानं जात होते. मी सर्वच राजकीय पक्षांपासून कटाक्षानं दूर राहिले आहे. त्या देशात जाऊन तिथली परिस्थिती समजून घेऊन तिथल्या सामान्य माणसांशी संवाद साधणं आणि त्यांच्या भावभावना समजून घेणं हे अतिशय कठीण काम. मी ते बऱ्याच अंशी यशस्वीपणे केलं असं मला वाटतं. कधीकधी वाटतं की, पॅरिस आणि फ्रान्स इथल्यासारखं वातावरण भारतात असतं, तर आम्ही अनेक लेखक एकत्र येऊन आणखी बरंच काम करू शकलो असतो. माझ्याजवळ अजूनही तिथल्या लोकांच्या मुलाखतींच्या टेप्स पडल्यात, पण त्या साऱ्या मुलाखती फारसी भाषेत आहेत; म्हणजे त्यावर मलाच काम करायला हवं. हिंदी भाषेच्या बाबतीतला हिंदी साहित्यिकांचा तोरा तर विचारू नका. त्यांची नजर कुठवर पोहोचते; तर भारत इतिहासात ज्यांचा गुलाम राहिला, त्या ब्रिटिशांच्या इंग्रजी भाषेपर्यंत आणि साहित्यापर्यंत. त्याही पुढे गेलेच तर रशियन साहित्यापर्यंत. हे लेखक आशियातल्या देशांकडे ढुंकूनही बघत नाहीत. उलट आमचा देश या शेजारी देशांचं शोषण करण्यात आघाडीवर आहे, म्हणजे या शेजारी देशांबरोबर एकजूट करून जगातल्या महाशक्तींना आव्हान देण्याची मनीषा नाही आम्ही बाळगत! मी काय म्हणते ते समजून घ्या. उदाहरणच द्यायचं, तर इराकवरच्या हल्ल्याचं देता येईल. अमेरिकेच्या इराकवरच्या हल्ल्यांना युरोपमधून जेवढा प्रखर विरोध झाला, त्याच्या काही अंशानं तरी भारतात झाला का? इथल्या कुणा लेखकाला असं वाटलं का, की आपण याविषयी काहीतरी केलं पाहिजे? माझ्या लेखनातून मी या विषयावर उभे केलेले प्रश्न किती जणांनी आपल्या लेखनातून विचारले? पण हीच मंडळी या देशांना सरकारी खर्चानं भेटी द्यायला मात्र सर्वांत पुढे असतात. ही कुठली वृत्ती म्हणायची?

प्रश्न - तुमच्या अनेक लघुकथांत सामान्य कष्टकरी वर्गातल्या माणसाचं जीवन, त्याचं दुःख चित्रित केलेलं आढळतं. तुम्ही कधी त्यांच्यासाठी प्रत्यक्ष काम केलंय का?

नासिराजी - मी माझ्या सभोवतालच्या सामान्य कष्टकरी माणसांशी मनानं जोडले गेलीय. मी या सामान्य माणसांचा त्यांच्या रोजच्या जगण्याचा विचार करत असते. मी कष्टकरी समाजातल्या लोकांमध्ये व्यक्तिगत पातळीवर कामही केलंय, पण मी कधीच कोणत्या पक्षाबरोबर, संघटनेबरोबर किंवा संस्थेबरोबर काम केलेलं नाही. खरं सांगायचं, तर मी कोणत्याही बंदिस्त चौकटीत राहून काम नाही करू शकत. मी एखाद्या मुक्त पक्ष्यासारखी आहे. मी माझ्याच पद्धतीनं आणि मला वाटेल तेच करणार. मग भले कितीही धोके असतील, तरी मी ते स्वीकारेन, पण मला मुक्त विहार करायलाच आवडतं.

प्रश्न - तुमचं आंतरराष्ट्रीय पत्रकारितेतलं आणि हिंदी साहित्यातलं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. असं असूनही त्याची म्हणावी तशी दखल घेतली गेल्याचं दिसत नाही. असं का घडलं असावं?

नासिराजी - काय सांगू? मला वाटतं की, हिंदी साहित्य क्षेत्रातल्या लोकांमध्ये एक अढ्यता आहे. सहसा इतरांच्या कामाला मान्यता दिली जात नाही. तर ‘पुरस्कार’ देणाऱ्या मंडळींच्या दृष्टीनं माझं काम फारसं मोठं नसावं. मला खात्री आहे की, इतकं मोठं काम इंग्रजीत झालं असतं, तर हे हिंदीवाले माझ्याकडे धावत आले असते. माझं लेखन तेवढं वाचलंही गेलं असतं. समजूनही घेतलं गेलं असतं. या बाबतीत ओरिएन्टॉलिस्ट एडवर्ड सईदचं उदाहरण सांगता येईल. त्यानं पॅलेस्टाइनवर मोठं काम करून ठेवलंय. त्याचं सर्व काम इंग्रजीत आहे. त्याला व्यापक मान्यता मिळाली.

माझ्या कामाला तेवढी मान्यता न मिळण्याचं आणखी एक कारण मला दिसतं. ते म्हणजे आमच्या देशातल्या बुद्धिवादी लोकांना आशियातल्या आणि मध्यपूर्वेतल्या देशांविषयी फारशी माहितीच नाही. शिवाय माझ्यात एक त्रुटीही आहे. मी कधीच कुठल्या साहित्यिक गटात नव्हते. ना माझा कोणता गट आहे, ना मला गटबाजी करणं जमतं. आता याचे काही फायदेही आहेत आणि काही तोटेही आहेत, पण याचा अर्थ मला कुणीच ओळखत नाही असाही नाही. मला देशातल्या अनेक विचारी आणि बुद्धिवादी वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. माझ्यासाठी आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे मी १९७९पासून लिखाण करत आहे आणि २००५मध्ये माझ्या कथा मराठीत अनुवादित झाल्यात. मला वाटतं, कदाचित इथून पुढे माझ्या साहित्याला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळायला लागेल.

प्रश्न - तुमच्या कलाकृतींपैकी तुमची सर्वोत्तम कलाकृती कोणती वाटते? का अजूनही सर्वोत्तम लिखाण व्हायचं आहे?

नासिराजी - या प्रश्नाचं उत्तर मी आत्ता देणार नाही. मला अजून खूप लिहायचं आहे. मी लिहिते आहे.

निद्रित निखारे - नासिरा शर्मा, अनुवाद - प्रमोद मुजुमदार 

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4283

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......