भारतीय भाषा व साहित्याचे स्वरूप
ग्रंथनामा - झलक
डॉ. सुनीलकुमार लवटे
  • ‘भारतीय भाषा व साहित्य’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Sat , 30 September 2017
  • ग्रंथनामा Granthanama झलक भारतीय भाषा व साहित्य Bharatiy Bhasha va Sahitya सुनीलकुमार लवटे Sunilkumar Lawate साधना प्रकाशन Sadhana Prakashan

‘भारतीय भाषा व साहित्य’ हे डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे प्रमुख भारतीय भाषांची ओळख करून देणारे पुस्तक नुकतेच साधना प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. या पुस्तकातील सुरुवातीचे हे प्रकरण...

.............................................................................................................................................

भारत हे जगातील सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र आहे. या देशाचे आकारमान उपखंडसदृश आहे. अनेक भाषा, धर्म, जाती, रूढी, परंपरा, लिपी, संस्कृती, प्रांत यांमुळे हा देश बहुवंशीय-बहुसांस्कृतिक राहिला आहे. भारतवर्ष हे त्याचे प्राचीन नाव. स्वातंत्र्यपूर्व काळात तो ‘हिंदुस्थान’ नावाने ओळखला जायचा. विदेशात तो आज ‘इंडिया’ नावाने ओळखला जातो. स्वतंत्र भारताची संघराज्यीय राजभाषा हिंदी असून, तिची लिपी देवनागरी स्वीकारण्यात आली आहे. भारतीय राज्यघटनेनुसार इथे भाषावर प्रांतरचनेने अस्तित्वात असलेली २९ राज्ये असून, सात केंद्रशासित प्रदेश आहेत. घटनेच्या आठव्या परिशिष्टानुसार २२ भाषांना राजभाषेचा दर्जा देण्यात आला असून, दुय्यम वा प्रदेशमान्य प्रशासकीय भाषांचा विचार करता, ही संख्या ३१ च्या घरात जाते. आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, ओडिशा, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तमिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्‍चिम बंगाल अशी ती २९ राज्ये होत. केंद्रशासित प्रदेशात अंदमान व निकोबारद्वीप, चंडीगड, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, लक्षद्वीप, दिल्ली, पुद्दुचेरी यांचा समावेश होतो. आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, मैथिली, मल्ल्याळम्, मणिपुरी, मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी, संस्कृत, संथाली, सिंधी, तमिळ, तेलुगू, उर्दू या मान्य राजभाषा होत. या भाषांच्या लिप्याही घटनामान्य असून, आसामी, बंगाली, देवनागरी, गुजराती, कन्नड, परशिया, मल्ल्याळम्, उडिया, गुरुमुखी, तमिळ, तेलुगू या त्या ११ लिप्या होत.

साहित्य म्हणजे शब्द आणि अर्थाचा मेळ. तो रसात्मक वाक्यातून घातला गेल्याने साहित्य ललित बनते. साहित्य म्हणजे समाजाचे प्रतिबिंब. साहित्यकार ते आपल्या निरीक्षणातून उतरवतात. साहित्यलेखनाचे माध्यम म्हणून भाषा आणि लिपीस असाधारण महत्त्व असते. आपले पहिले साहित्य मौखिक होते म्हणून वाङ्मय नावाने ते ओळखले जायचे. लोकसाहित्य तसेच; पण नंतर लिखिताची परंपरा सुरू झाली. मग साहित्याचे अनेक प्रकार अस्तित्वात आले. आरंभी मनुष्य काव्य लिहायचा. विस्ताराच्या गरजेतून गद्यशैलीचा उदय झाला. आज गद्य आणि पद्य दोन्ही अनेक अंगांनी आणि प्रकारांनी सादर होतं. कविता, गीत, गझल, अभंग, गवळण, सुनीत, खंडकाव्य, महाकाव्य अशा अनेक प्रकारे काव्य लिहिले जाते. गद्य साहित्याचेसुद्धा अनेक प्रकार आहेत. कथा, कादंबरी, नाटक, निबंध, चरित्र, आत्मकथन, आठवणी, प्रवासवर्णन, पत्र, वृत्तांत, श्रुतिका इ.

भारतीय साहित्याचा प्रारंभ संस्कृतपासून होतो. ऋग्वेद प्राचीन ग्रंथ मानला जातो. ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद अशा रूपाने या साहित्याचा विकास होत गेला. मग वैदिक आणि लौकिक साहित्य अवतरले. त्यात मग रामायण, महाभारत, पुराणांचा अंतर्भाव झाला. पंचतंत्र, हितोपदेश हेदेखील प्राचीन साहित्यच. संस्कृत भाषेनंतर पाली, प्राकृत, अपभ्रंश भाषांमध्ये साहित्य रचले जाऊ लागले. उत्तरेतील भाषा आर्य मानल्या गेल्या, तर दक्षिणेतील द्रविड. आर्य भाषांतून सिंधी, पंजाबी, राजस्थानी, गुजराती, हिंदी, मराठी, उडिया, बंगाली इ. भाषा उदयाला आल्या. तमिळ, कन्नड, मल्ल्याळम्, तेलुगू द्रविडी भाषा होत. या सर्व भाषांच्या साहित्याचा इतिहास गेल्या १००० वर्षांत घडला. संस्कृतची परंपरा मात्र प्राचीन होय. या सर्वांचे समग्र स्थान म्हणजे भारतीय साहित्य होय. मॉरिस विंटरनित्स, अलब्रेख्तवेबर फेजर प्रभृती इंग्रज, फ्रेंच, जर्मन इतिहासकारांनी भारतीय भाषा नि साहित्याचा इतिहास लिहून ठेवला आहे. ‘इम्पीरिअल गॅझेटिअर ऑफ इंडिया’ (१९०८), ‘व्हर्नाक्युलर लिटरेचर’, ‘पॉप्युलर लिटरेचर ऑफ नॉदर्न इंडिया’सारख्या ग्रंथांतून आपणास भारतीय साहित्याची ओळख होते. पुढे भाषागणिक इतिहास लिहिले जाऊ लागले. मीनाक्षी सुंदर लिखित ‘तमिळ साहित्य इतिहास’, सीतापतीकृत ‘तेलुगू साहित्य इतिहास’, मुगळी लिखित ‘कन्नड साहित्य इतिहास’, परमेश्वरन नायरकृत ‘मल्ल्याळम् साहित्य इतिहास’, बाबूराम सक्सेनांचा ‘उर्दू साहित्य इतिहास’, तसेच मोहनसिंह लिखित ‘पंजाबी साहित्य इतिहास’ उल्लेखनीय होत. आज साहित्य अकादमीने सर्व भाषांच्या स्वतंत्र इतिहासाशिवाय समग्र भारतीय भाषा व साहित्याचा इतिहास आणि कोशही प्रसिद्ध केला आहे.

आज भारतीय साहित्य अनेक भाषांमधून लिहिले जात असले तरी तिचे स्वरूप मात्र एकात्म आहे, कारण त्या साहित्याचा पाया भारतीय संस्कृती आहे.

जागतिक पातळीवर जर्मन कवी गटेने विश्वसाहित्याची संकल्पना व्यक्त केली होती. भारताच्या संदर्भात रवींद्रनाथ टागोर यांनी ‘विश्वभारती’, तर महाराष्ट्रात साने गुरुजींनी ‘आंतरभारती’ संकल्पना ‘साधना’ साप्ताहिकातून स्पष्ट केली होती. भारतीय साहित्यात प्राचीन काळापासून मिथक, चिंतन, मूल्य अशा त्रिविध अंगांनी समान परंतु समांतर अभिव्यक्ती होत आली आहे. त्यातूनच राष्ट्रीयतेचा विचार पुढे आला आहे. भारताचे प्राचीन साहित्य जैन, बौद्ध, नाथ, सिद्ध, वैष्णव इ. धर्म नि संप्रदायांमुळे निर्माण झाले. यातून सर्व भारतीय प्रांतांत आणि भाषांमध्ये समान काळात समान प्रवृत्तीचे परंतु त्या-त्या भाषा, प्रांतांचे साहित्य निर्माण झाले. प्रथम दरबारी कवींनी राजांच्या शौर्यकथा लिहिल्या. हे काव्यचारण, भाट, आश्रित दरबारी कवींचे असल्याने त्यात अतिशयोक्ती होती; पण वीर, शृंगाररसांची महाकाव्ये, चरित्रकाव्ये अनेक भाषांमधील आदिकालातील काव्ये म्हणून सर्वश्रुत आहेत. त्यात कालभान आहे, तसेच तत्कालीन स्थितीचे (युद्ध, तह, आक्रमण, दरबारी परंपरा इ.) ते वास्तव चित्र म्हणून ऐतिहासिक ठरते. नंतरच्या समाजजीवनात राजांची जागा देवांनी घेतली. समाज दैववादी बनण्याला विदेशी आक्रमकांची आक्रमणे, अन्याय-अत्याचार कारणीभूत होते, तसेच स्वदेशी धर्ममार्तंडांचे अन्याय, कर्मकांडांचा अतिरेक, स्पृशास्पृश्य व्यवहारही कारणीभूत होता. त्या प्रतिक्रियेतून भक्ती आंदोलन उदयाला आले. त्यातून समतेचा विचार सुरू झाला. सर्वधर्म समानतेची, समभाव व सहिष्णुतेची वृत्ती विकसित झाली. मूर्तिमय भक्तीची जागा भावभक्तीने घेतली. सदाचार, नामस्मरण, पुण्यकर्म, भूतदया, माणुसकीची मूल्ये संत काव्यांनी भारतीय समाजात रुजविण्याचे मोठे कार्य केले. कबीर, जायसी, तुलसीदास, सूरदास, नरसिंह मेहता, नामदेव, नानक, कुमार आशान आदींपासून ते प्रादेशिक संतांपर्यंत सर्वांनी भक्ती आंदोलनाला लोकचळवळीचे रूप दिले. वारी, जत्रा, अनुष्ठान, पारायणे यांतून ही चळवळ उदयाला आली. तिच्यामुळे पुरोहितशाहीला शह मिळाला.

नंतरचा काळ पंडित कवींचा म्हणून उदयाला आला. संस्कृत रीती ग्रंथांचे प्रादेशिक अनुवाद झाले. त्यातून काव्य, छंद, रस, अलंकारांचा सार्वत्रिक प्रचारप्रसार झाला. या काव्याने सौंदर्य, शृंगाराचे जीवनातील महत्त्व अधोरेखित करताना काव्य, नाटक, नृत्य यांना समाज व धर्म या दोन्ही स्तरांवर प्रतिष्ठा मिळवून दिली. नाट्यशास्त्र, काव्यशास्त्र, साहित्यशास्त्र, नृत्यशास्त्र, शिल्पकला, चित्रकला, गायन, संगीत आदींना बहर आला. मध्यकाल जसजसा ओसरत गेला, तसे समाजजीवन आणि संस्कृती या दोन्हींकडे राजा, परमेश्वर, दैव, धर्म यांची जागा मानवमूल्ये, माणूसजीवन, जीवनसंघर्ष यांनी घेतली. म्हणून मग नंतरचे साहित्य आधुनिक मानले गेले. साहित्यात गद्याच्या विकासाने विस्तारास वाव मिळाला. इंग्रजांचे आगमन, पाश्चात्त्य साहित्यसंपर्क, समाजसुधारणा, यंत्र-आगमन, दळणवळण साधनांचे जाळे (पोस्ट, तार, टेलिफोन, रेल्वे, मोटार, कारखाने इ.) यांतून नागरी जीवन उदयाला आले. त्यामुळे कुटुंबव्यवस्था, विवाहपद्धती, जातिभेदाला विरोध, पुरोगामी धारणांचा प्रचार करणारे साहित्य सर्व भाषांमध्ये आले. त्याचे एक कारण इंग्रजी साहित्याची मोठ्या प्रमाणात झालेली भाषांतरे होत. समाजसुधारणांइतकेच परिवर्तनाचे कार्य भाषांतरित साहित्याने केले. सरंजामी, जमीनदारी, पुरोहितशाही विरुद्ध सर्वसामान्य केंद्री व सर्वसामान्यांचे प्रबोधन करणारे साहित्य निर्माण झाल्याने परंपरेच्या जोखडातून भारत मुक्त झाला. यातूनच देशस्वातंत्र्याचे स्वप्न उदयाला आले. अन्याय, अत्याचार, अस्पृश्यता, अंधश्रद्धांची जाणीव या साहित्याने करून दिली आणि सारा भारत देश परंपरेच्या दीर्घ निद्रेतून जागा झाला. या जागृतीने त्याला संघर्ष, सत्याग्रह, समानता, स्वाभिमान, स्वावलंबन, स्वातंत्र्य ही जीवनमूल्ये व मार्ग दाखवले. त्यातून भारतीय समाज प्रबुद्ध झाला. हे चित्र नि चित्रण कमी-अधिक प्रमाणात तत्कालीन सर्वभाषी साहित्यात दिसून येते. या समान परंतु समांतर एकात्मतेतूनच भारतात वेळोवेळी विविधतेतून एकता निर्माण होत गेली. त्यातून राष्ट्रीय एकात्मतेच्या विचारास बळकटी मिळाली.

आज जागतिकीकरणानंतर आणि माहिती तंत्रज्ञान साधनांच्या विकासयुगात जग जवळ आले; तसाच भारत विविध प्रांत, भाषा, साहित्य, संवाद, संपर्क आदींच्या माध्यमांमधून जवळ आला. शिवाय तो पूर्वीच्या तुलनेने अधिक एकात्म झाला.

अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील जनलोकपाल विधेयक आंदोलन असो वा निर्भया बलात्कार प्रकरण असो- देश राजकीय आणि सामाजिकप्रश्नी स्वयंस्फूर्तपणे एकसंध असल्याचेच ही आंदोलने वा प्रतिक्रिया प्रतीक होती. एक सकारात्मक, आश्वासक प्रतिसाद म्हणूनच त्या सर्व घटनांकडे पाहता येते. निवडणुकांमधील विचारपूर्वक मतदानातूनही ते अलीकडे लक्षात येऊ लागले आहे. आज संगणकीय संसाधनांमुळे अनुवाद, संपादन, लिप्यंतरण (अक्षरांतरण) एका टिचकीत नि कटाक्षात शक्य झाल्याने भाषिक आणि लिपीचा अडसर दूर झाला आहे. परभाषेतील मजकूर मध्यस्थाशिवाय मिळणे सोपे व सहज झाले आहे. पूर्वी जे काम साहित्य अकादमीसारखी संस्था करायची, तेच काम महाजालीय व्यवस्थेच्या आभासी दुनियेवर उपलब्ध तरल संसाधने माणसांच्या किती तरी गरजा लीलया सोडविताना दिसतात. काळ-काम-वेगाचे गणित इतिहासजमा करायच्या अगतिक, आभासी काळात भाषा-साहित्य वैश्‍विक होणे, आंतरभारतीय होणे अनायासे शक्य झाले आहे.

भारतीय भाषा, लिपी व साहित्यापुढील आजचे प्रश्‍न एकात्मतेच्या संदर्भात साधनांचे न राहता ते मानसिक, भावनिक व अस्मितेचे राहिले आहेत. प्रांतापेक्षा राष्ट्र मोठे, हा विचार देशबांधवांत रुजवणे आता महत्त्वाचे आहे. शिवाय भारतीय असण्याची काही समान मूल्ये, प्रवृत्ती, संस्कृती निर्माण करण्याची गरज आहे. एक भाषा, एक लिपी असलेली राष्ट्रे उपजत एकच असतात. तशीच भिन्न भाषीयदेखील; भारतातील आर्य आणि द्रविड कुळातील भाषांना भिन्न न मानता त्यातील समान दुवे, चरित्र, विचार, मिथक सार्वत्रिक करण्यातून भारतीय साहित्याची सार्वत्रिक व समान ओळख निर्माण होऊ शकेल. ते आव्हान नव्या पिढीने प्रगल्भपणे पेलायला हवे. अस्मिता व अस्तित्वाच्या अभिनिवेशी क्रिया-प्रतिक्रियांपेक्षा राष्ट्रीय आचारधर्माचा विचारपूर्वक संयत परंतु प्रगल्भ विचार, व्यवस्थाच या देशाला एकात्म बनवू शकते. वर्तमान राजकारणापासून त्याची फारकत करायची असेल, तर त्याचे साधन केवळ साहित्यच होऊ शकते. बर्लिनची भिंत पाडून जर्मन पुन्हा एकात्म झाला, तो एका चित्रकाराच्या चित्रांमुळे; असे जे सांगितले जाते, ते कला व साहित्य यांचे सामर्थ्य सूचित करणारे आहे. तीच गोष्ट भारतीय एकात्मतेचीसुद्धा आहे.

जेव्हा आपण ‘भारतीयता’ भावनेपलीकडे जाऊन व्यवहाराच्या पातळीवर प्रतिबद्धपणे स्वीकारू, तेव्हाच ‘आंतरभारती’चे स्वप्न प्रत्ययास येईल- प्रत्यक्षात उतरेल. त्यासाठी प्रांतवादी संकीर्णतेतून आपण मुक्त होऊन राष्ट्रीय भावनेच्या पातळीवर सर्व प्रश्न व समस्यांचा विचार करायला शिकले पाहिजे. आपली सांस्कृतिक ओळख एक व्हायला हवी. समान जीवनमूल्ये आणि जीवनशैली आपण अंगीकारायला हवी. जात, धर्म, ईश्वर या व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या गोष्टी असून; स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, समाजवाद, विज्ञाननिष्ठांसारख्या सांविधानिक तत्त्वांवरच आपला सार्वजनिक व सार्वत्रिक व्यवहार बेतलेला हवा. श्रद्धा आणि अंधश्रद्धांमधील दरी अरुंद करून विवेकवादी समाज सद्भाव आपण रुजवू शकतो का, ते पाहायला हवे. नवसाहित्यिकांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून नवा भारत घडवण्याचे शिवधनुष्य उचलायला हवे. वर्तमान समाजाचे गहन प्रश्न व समस्या लक्षात घेता अंधश्रद्धानिर्मूलन, विवेकवाद, लिंग समभाव, स्त्री-पुरुष समानता, राजकारणाच्या जागी समाजकारण, जात-धर्मनिरपेक्षता, व्यक्तिगत स्वातंत्र्य, नैतिकता, भ्रष्टाचारमुक्त परिपाठ, राष्ट्रीय हित प्रथम अशी मांडणी साहित्य, शिक्षण, संस्कार, प्रबोधन इत्यादी माध्यमांतून करण्याचे सजग सायासच या देशाचे चित्र बदलून नवभारत घडवतील, यावर माझा विश्वास आहे. भाषा, साहित्य, कला, दृक्-श्राव्य माध्यमे देशघडणीची साधने झाली, तरच हे शक्य आहे. भारतीय भाषा, साहित्याची नव्या शतकातील ओळख यासंदर्भात महत्त्वाची आहे. नवा वाचक प्रगल्भ करण्याची आणि त्यातून जबाबदार, कर्तव्यपरायण, कार्यसंस्कृत नागरिक घडवणे हे नव्या भारतीय साहित्याचे ध्येय असायला हवे.

‘भारतीय भाषा व साहित्य’ - डॉ. सुनीलकुमार लवटे

साधना प्रकाशन, पुणे 

पाने - १९०, मूल्य - २०० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4080

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......