मला कधीही गंज चढणार नाहीए
ग्रंथनामा - झलक
मंगेश कुलकर्णी
  • ‘बाई’ या पुस्तकावरील अक्षरांकन
  • Sun , 06 November 2016
  • विजया मेहता मंगेश कुलकर्णी अंबरीश मिश्र Viajaya Mehta Ambarish Mishra

प्रसिद्ध रंगकर्मी विजया मेहता यांच्यावर विविध मान्यवरांनी, त्यांच्या सहकाऱ्यांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह ‘बाई -एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास’ या नावाने कालच मुंबईत प्रकाशित झाला. त्यातील एक लेख...नाट्यकर्मी मंगेश कुलकर्णी यांचा...

 

सर जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट्समध्ये अ‍ॅडमिशन मिळावी, म्हणून देवळाली कँपचा एक मुलगा मुंबईत आला - चित्रकलेचं शिक्षण घेण्यासाठी. घर सोडून पहिल्यांदाच मुंबईसारख्या अगडबंब शहरात तो एकटा. कॉलेज संपलं की काय करायचं, त्याला कळेनासं व्हायचं.

रमाकांत देशपांडे त्याचे वर्गशिक्षक.

तर त्या मुलाचा वाभरेपणा देशपांडेसरांच्या लक्षात आला. तो नको नको म्हणत असता ते त्याला नाटकाच्या ऑडिशनसाठी बळे बळे घेऊन गेले. त्याला वाचायला लावलं.

“हे बघ, आपल्या जे. जे.चं आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत चांगलंच नाव आहे. पण या वर्षी आपण प्रथमच अख्खं (म्हणजे पूर्ण मापाचं) नाटक आपल्या गॅदरिंगसाठी बसवणार आहोत. छान वाचलंयस. तू नाटकात काम करच.’’ देशपांडेसर म्हणाले.

आणि त्या मुलाला कॉलेजच्या नाटकात घेण्यात आलं.

नाटक होतं, ‘ससा आणि कासव’.

नाटकात इतर मुलं-मुलीही होत्या. अन् एक वांड मुलगाही होता... नाना पाटेकर.

त्या वाभऱ्या मुलाचं अन् नानाचं अजिबात जमत नसायचं. पण ‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना’ या उक्तीप्रमाणे ते दोघे पुढे बरोबर असू अन् दिसू लागले. आजतागायत दोघे एकमेकांना ‘मित्र’ म्हणतात.

गॅदरिंगमध्ये ‘ससा आणि कासव’चा एकुलता एक प्रयोग झाला. उत्तम झाला, “अगदी व्यावसायिक नाटकासारखा झाला हो.’’ असं सगळे म्हणाले.

तो मुलगा पार्ल्याला राहायचा. नाटकाच्या तालमीनंतर तो देशपांडेसरांबरोबर घरी जायचा. पुढे तो सरांबरोबर लँडस्केपिंगसाठी जाऊ लागला.

थोडक्यात, सरांचा लाडका विद्यार्थी झाला.

एकदा देशपांडेसर त्याला म्हणाले, “उद्या कॉलेज संपल्यावर मी तुला वॉर्डन रोडला घेऊन जाणारेय. बाईंना भेटायला.’’

“कोण बाई?’’

“विजयाबाई.’’

“म्हणजे कोण?’’

“विजया मेहता.’’

“त्या काय असतात?’’

“ते कळेल तुला नंतर.’’

आणि दोघे वॉर्डन रोडवर असलेल्या ‘आकाशगंगा’ इमारतीत पोहोचले.

तिथं एका खुर्चीवर एक पाय वर दुमडून, प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची मालकीण, ‘राजमाता’टाईप दिसणारी एक आकर्षक बाई बसली होती. तिच्या बाजूच्या खुर्चीत एक गोरेगोमटे गृहस्थ मिटल्या डोळ्यांनी समाधी लावल्यागत बसले होते.

“विजया, हा तो मुलगा, मंगेश कुलकर्णी...’’ देशपांडेसर आत जाताच म्हणाले.

म्हणजे मी.

एखाद्या इटुकल्या, गोजिरवाण्या कुत्र्याच्या पिल्लाकडे कुतुहलानं पाहवं, तसं कौतुकानं माझ्याकडे हसऱ्या डोळ्यांनी पाहत विजयाबाई शेजारी तंद्री लावून बसलेल्या गृहस्थाला म्हणाल्या,

“माधव, अरे हा तर ‘लालू’.’’

मग माझ्याकडे पाहत प्रेमानं आज्ञा केल्यागत म्हणाल्या,

“जा, त्या खोलीत सगळे रिहर्सल करताहेत. त्यांना सांग, बाईंनी सांगितलंय की ‘मी लालू’.’’

असा मी ‘होळी’तला ‘लालू’ झालो.

‘रंगायन’चा झालो. ‘रंगायन’च्या विजयाबाईंचा ‘मंग्या’ झालो.

एकट्यानं मुंबईत आलेला, कॉलेज संपल्यावर काय करायचं; अशा विवंचना बाळगत संध्याकाळी गप्प-गप्प रितेपणानं वावरलेला तो वाभरा मुलगा. त्याला वावरण्यासाठी एक ठिकाण लाभलं. मुंबईत त्याच्या ‘असण्या’ला एक अर्थ मिळाल्यागत झालं.

‘रंगायन’मध्ये तो रमला. अगदी पूर्णत: विरघळला, मिसळला.

तिथल्या सगळ्यांत मी वयानं सर्वांत लहान होतो. आस्ते आस्ते सगळ्यांचा लाडका झालो, मी बाईंचा खास झालो.

‘रंगायन’ची सगळीच माणसं छान होती. माधव वाटवे, बाळ कर्वे, वृंदावन दंडवते, रत्नाकर सोहोनी शिवाय भक्ती बर्वे, मीना सुखटणकर, चित्रा मुर्डेश्वर.

सगळे मला आवडायचे अन् मी सगळ्यांना. सगळी अगदी घरातली माणसं वाटायची.

‘रंगायन’च्या प्रत्येक गोष्टीशी मी कुठल्या ना कुठल्या नात्यानं बांधलेला असायचो. आपण इथं काय करतो आहोत अन् कशासाठी, याची आम्हाला अजिबात कल्पना नसायची.

‘शिवाजी म्हणतो’ नावाचा एक खेळ असतो, त्याप्रमाणे आम्ही सगळी पोरसवदा मुलं ‘बाई म्हणतात’ असा खेळ खेळण्यात रमून गेलो.

खरं म्हणजे ‘रंगायन’ ही थोरामोठ्यांनी फार आधी सुरू केलेली प्रायोगिक चळवळ होती. मधल्या काळात विजयाबाई परदेशी गेल्या अन् तिथून नाट्यशिक्षण घेऊन परत आल्या. नवा, आधुनिक दृष्टिकोन घेऊन मायदेशी परतलेल्या बाईंना नव्याकोऱ्या, अबोध वयातल्या मुलामुलींना घेऊन ही प्रायोगिक चळवळ राबवली पाहिजे, असं वाटू लागलं. तसं केल्यास आपल्याला अभिप्रेत असलेली नाट्यदृष्टी, नाट्यविषयक आस्था वाढीस लागेल आणि योग्य तो बदल घडवून आणता येईल, असंही त्यांना वाटत होतं.

अन् मग बाईंनी आपल्या दीर्घ काळच्या सहकाऱ्यांच्या मदतीनं पोरंटोरं जमवायला सुरुवात केली. रमाकांत देशपांडेंच्यावतीनं मीदेखील नव्या ‘रंगायन’मध्ये नकळत सामील झालो. या पोराटोरांच्या गँगकडून बाई जे काही करवून घेत होत्या, त्याला ‘रंगायन वर्कशॉप’ असं म्हटलं जायचं. तिथं आम्ही सगळे वर्कर होतो – ‘शिवाजी म्हणतो’ या चालीवर. बाई जे जे म्हणतील, करायला सांगतील; ते ते उत्साहानं करायचो.

बाईंबद्दल माझी एक व्यक्तिगत बाजू होती. आम्हा भावंडांची आई आम्ही बऱ्यापैकी लहान असतानाच वारली. ती हयात असती, तर बाईंच्या वयाची असती. नसलेल्या आईच्या रिकाम्या चौकटीत कधीतरी विजयाबाई अलगद जाऊन बसल्या असतील. त्यामुळे असेल कदाचित... इतर मुलांपेक्षा मी बाईंबद्दल जास्त हळवा होतो.

भक्ती तर म्हणायची, “हा वांड प्राणी फक्त बाईंसमोर असला, की ‘टेम’ होतो.’’

बाईंना मी घाबरायचो तर अजिबात नाही. पण त्यांचा एक मायाळू, आदरयुक्त धाक वाटायचा. म्हणजे आपण केलेलं काहीही बाईंना आवडलं पाहिजे, असं सतत वाटायचं. ‘हे अमूक तू छान केलंस’ किंवा ‘तू केलेलं ते तमूक मला फार आवडलं’ असं बाई कधीही म्हणायच्या नाहीत.

बाई इमोशनल, हळव्याबिळव्या वगैरे अजिबात होत नाहीत, अशी त्यांच्या निकटच्यांपैकी अनेकांची धारणा आहे. परंतु रिहर्सल करताना एखादा भावनिक सीन कुणा नटानं केला, तर पदरानं डोळे पुसताना मी बाईंना कैक वेळा पाहिलंय. अन् पुढच्याच क्षणी त्याचं किंवा तिचं अजिबात कौतुकबिवतुक न करता, “अगं बाबी, चांगला सोन्यासारखा चेहरा आहे गं... का वेडावाकडा करतेस? नको करू. बरं नाही दिसत ते.’’ असं म्हणणाऱ्या बाईच लोकांना जास्त माहीत आहेत.

‘लाईफ-लाईन’ सिरियलच्या वेळची गोष्ट. माझा अन् तन्वीचा एक सीन मी (खरोखरंच) बरा केला. उपस्थित सगळ्यांनी मनापासून दाद दिली. तन्वीनं बाईंकडे पाहिलं. बाईंचा चेहरा निर्विकार. तन्वी वैतागून त्यांना म्हणाली, “आम्हा सगळ्यांना इमोशनल केलं मंगेशनं. बाई, जरासं तरी कौतुक करा की त्याचं.’’ त्यावर बाई कोरडेपणानं म्हणाल्या, “कौतुक काय करायचं त्यात? तो आहेच तसा.’’

जवळच्या माणसाचं कौतुक करणं बाईंना जमत नाही, त्याला त्यांनी गृहीत धरलेलं असतं; अशी सोयीस्कर (की भाबडी?) समजूत मी आजतागायत बाळगून आहे.

कामात असताना बाई एखाद्या करारी पुरुषासारख्या असतात. पण नाटकाच्या तालमीला किंवा शूटिंगच्या दरम्यान विश्रांतीचा मोकळा वेळ असताना बाई या केव्हा केव्हा आईप्रमाणे असतात - जिच्याजवळ हक्कानं, मोकळेपणानं काहीही बोलावं, सांगावं अशा.

महाराष्ट्र शासनाच्या नाट्यस्पर्धांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या मुला-मुलींसाठी नाट्यशिबिरं होत असत. काही वर्षं बाई ती घेत असत. आम्ही अर्थातच तिथं असायचो. मला चांगलं आठवतंय. महिनाभर चालणारं ते शिबीर संपण्याच्या दिवशी निरोपसमारंभानंतर शिबिरातली मुलं ढसाढसा रडायची. प्रत्येकाला बाईंचा लळा लागलेला. कुणाला बाईंत आई,  कुणाला वहिनी, तर कुणाला मोठी ताई असं काहीतरी जाणवलेलं असायचं.

एक गंमत आठवली, ती सांगतो.

बाईंना कुठलाही विनोद कधीही नीट सांगता येत नाही. आमच्या एखाद्या आचरट विनोदाला बाई कधी भरपूर हसल्या की, मग दिलीप कोल्हटकर मिष्कीलपणे हळूच म्हणायचा, “पण बाई, जोक कळलाय का नक्की?’’

‘स्मृतिचित्रे’च्या शूटिंगदरम्यान एकदा मधल्या मोकळ्या वेळात मी बाईंना एक सोपा, पोरकट विनोद सांगितला. बाईंना जोक फारच आवडला आणि मुख्य म्हणजे कळला (असं त्यांचं म्हणणं होतं.). अन् ते पटवून देण्यासाठी त्या तो जोक आमच्या महापाक्षी नावाच्या कॅमेरामनला सांगायला निघाल्या. महापाक्षी कन्नड होता. मध्ये कुणीही बोलायचं नाही, असं सगळ्यांना बजावून श्रीमती विजया मेहता महापाक्ष्याला जोक सांगू लागल्या. तो विनोद बोईंग विमानावरून रचला होता.

बाईंनी लहान मुलाच्या उत्साहानं सांगायला सुरुवात केली.

“बोईंग विमान पाहून स्वर्णसिंग टाळ्या वाजवत ‘बोईंग बोईंग’ असं म्हणत उड्या मारू लागले. मग इंदिरा गांधी स्वर्णसिंगला हळूच ‘कीप क्वाएट’ असं म्हणाल्या आणि मग...’’

आणि मग विजयाबाई गोंधळल्या. ब्लँक झाल्या. जोक पुराच होईना.

“पुढं काय रे, मंग्या? काहीतरी चुकलंय.’’

“बाई, इंदिरा गांधी स्वर्णसिंग याना ‘बी सायलेंट’ असं दटावतात. त्यावर स्वर्णसिंग म्हणतात, ‘ओह, थँक यू.’ मग ते पुन्हा टाळ्या वाजवत म्हणतात, ‘ओईंग ओईंग’. बाई, कीप क्वाएट म्हटल्यावर जोक पूर्ण कसा होणार?’’

“असा होता काय?’’ हिरमुसल्या चेहऱ्यानं बाई म्हणाल्या.

आणि आता एक हृद्य आठवण.

जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सची आमची परीक्षा सलग आठ-दहा दिवस चालायची. सब्सिडिअरी म्हणून ज्यानं ज्यानं जो जो विषय घेतलाय, त्या त्या विषयांचे दोन-दोन, तीन-तीन दिवसांचे पेपर मात्र नंतर पाच-आठ दिवस विराम घ्यायचे. फोटोग्राफी आणि इंटिरियर डेकोरेशन (डिझाईन) हे माझे सब्सिडिअरी विषय होते. सलग परीक्षा नीट पार पडल्या. पुढे काही दिवसांच्या विरामानंतर फोटोग्राफीची परीक्षादेखील छान झाली. इंटिरिअरच्या परीक्षेला मात्र माझ्याकडून घोळ झाला. मी माती खाल्ली. परीक्षेच्या दिवशी न जाता दुसऱ्या दिवशी, पहिला दिवस आहे; असं समजून कॉलेजला गेलो. पहिल्या दिवशी माझी अनुपस्थिती लागल्याचं मला सगळ्यांकडून समजलं. मग निराश झालो, चक्क खचून गेलो. काय करावं, काही कळेना. त्या वेळी आपलं माणूस म्हणून मला फक्त बाई आणि बाईच आठवल्या.

मी बाईंना फोन केला. काय घडलं, ते रडत रडत त्यांना फोनवर सांगितलं. बाईंनी मला धीर दिला. म्हणाल्या, “तू आधी तुझं रडणं थांबव. मी येते तिथं.’’ आणि काही वेळातच विजया मेहता चक्क माझ्याकरता माझ्या कॉलेजात आल्या. बाई आमच्या डीनना भेटल्या. जे. जे.मध्येच प्राध्यापक असलेले दामू केंकरे, रमाकांत देशपांडे असे सगळे अध्यापक तिथे होते. बाई त्या सगळ्यांना म्हणाल्या, “आमच्याच नाटकाच्या प्रयोगाच्या गडबडीत तो परीक्षेची नेमकी तारीख बहुधा विसरला. तसा तो धांदरटच आहे जरासा. पण लहान आहे हो. हवं तर कालचा पेपर त्याच्याकडून आज करून घ्या. बाकीची परीक्षा त्यानं नीट दिली आहे. हे असं सांगणं चूक आहे, ह्याची मला कल्पना आहे. परंतु विशेष सवलत म्हणून काही करता येणार नाही का?’’

बाई त्या वेळी ‘विजया मेहता’ नव्हत्या. माझ्यासाठी निकराचा प्रयत्न करणाऱ्या ‘माझ्या’ बाई होत्या. बाईंचा प्रयत्न निष्फळ ठरला. माझं कॉलेजचं एक वर्ष फुकट गेलं. पण आपली सगळी महत्त्वाची कामं बाजूला ठेवून, स्वत:च्या मुलासाठी करावं तसं... माझ्यासाठी धावून आलेल्या बाई कायमच्या लक्षात राहिल्या आहेत.

बाईंनी कधीही, कुठलीही गोष्ट शिक्षकाच्या भूमिकेत जाऊन आम्हाला शिकवली नाही. त्या तालमीत नट/नट्यांना जरूर ते स्वातंत्र्य द्यायच्या. मुलांशी खेळीमेळीनं संवाद साधायच्या. त्यांना मोकळं करायच्या. “भूमिकेबद्दल लेखकानं लिहिलेल्या ओळींमधला अर्थ शोधण्याचा प्रयत्न करून तुला काय वाटतं, ते तू करून दाखव. मग आपण बघून ठरवू.’’ असं म्हणायच्या. आपल्या अनुभवसिद्ध ज्ञानाचा आणि माहितीचा सहजसोप्या भाषेत वापर करायच्या. अन् असं करत करत विजयाबाई नाटकाला आणि आम्हा मातीच्या मडक्यांना आकार द्यायच्या.

पण गंमत म्हणजे आपण काहीतरी घनगंभीर, अत्यंत वरच्या दर्जाचं नाट्यविषयक ज्ञान संपादन करत आहोत, काहीतरी अमूल्य शिकत आहोत; याची आम्हा मुलांना कणभरदेखील जाणीव त्या पोरवयात नव्हती.

मात्र, तेव्हाचं एक गुपीत आता नक्कीच सांगितलं पाहिजे.

त्या पोरवयात बाई मला गोष्टीतल्या परी वाटायच्या. भक्ती बर्वेनं ‘मंग्या, तू नेहमी असा लहानच रहा. मोठा होऊच नकोस!’ असं म्हणत माझ्या ‘सेंटीपणा’ची भरपूर टर उडवल्याचं मला चांगलं आठवतंय.

वय वाढल्यावर आणि भोवतालचं सगळंच बरं-वाईट उमगल्यानंतर मागे वळून पाहताना ते जुनं सगळं आठवतं. अन् मग मन:पूर्वक जाणवतं की, विजयाबाईंनी आपल्याला, आपल्या पिढीला आयुष्यभर पुरेल इतकं दिलंय. किती नि केवढं!

नेहमीच्या बोलण्यात किंवा जाहीर भाषणातून बाई कैकदा नामांकित आणि जागतिक कीर्तीच्या नाट्यविषयक तज्ज्ञांची, विद्वानांची मतं, विचार सांगत असतात. त्या गोष्टींचा ओघाओघात उल्लेख करत असतात.

पण बाईंचं वैशिष्ट्य म्हणजे त्या त्या तज्ज्ञाचा नामोल्लेख त्या आवर्जून करतात. हे सगळे विचार आपलेच आहेत, ते आपल्यालाच सुचलेत; असा त्यांचा दावा नसतो. अर्ध्या हळकुंडानं पिवळ्या झालेल्या हल्लीच्या पढतविद्वानांमध्ये हा सद्गुण पाहायला मिळत नाही. जागतिक कीर्तीच्या विद्वानांचे रंगभूमीविषयक विचार आपल्या संस्कृतीत कसे बसवता येईल, याचा त्या विचार करत असतात.

विजयाबाईंच्या जवळजवळ प्रत्येक कामात, योजनांत मी त्यांच्यासोबत होतोच - बाईंचा पदर धरून, असं म्हणायला हरकत नाही. मुंबई दूरदर्शनचा पहिला मराठी चित्रपट, हिंदी दूरदर्शन मालिका, समांतर हिंदी चित्रपट अशा बाईंच्या प्रत्येक प्रकल्पात अभिनेता, लेखक, सह-दिग्दर्शक अशा विविध नात्यांनी त्यांच्या सहवासात राहण्याचं भाग्य मला लाभलं.

वाढत्या वयाच्या या वळणावर आयुष्यभर बाईंविषयी जे काही वाटत आलं, ते थोडंबहुत तरी कागदावर मांडण्याची चालून आलेली संधी या निमित्तानं मी साधली एवढंच. माझ्या लहानग्या वयात मला परी वाटणाऱ्या बाईंचा परीसस्पर्श माझ्यासारख्या पोलादाला झाला, हे बाकी खरं! अन् त्यामुळे माझ्या आयुष्याचं सोनं झालंय, अशी माझी मन:पूर्वक धारणा आहे.

मला कधीही गंज चढणार नाहीए.

बाई : एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास – संपादन अंबरीश मिश्र, राजहंस प्रकाशन, पुणे, पाने – २२०, मूल्य – २५० रुपये.

हे पुस्तक सवलतीत खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://goo.gl/40MZse

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......