गोष्ट छोटी… पण, डोंगराएवढी!
ग्रंथनामा - झलक
मुकेश माचकर
  • ‘अक्कलझाड’ची मुखपृष्ठं
  • Sun , 06 November 2016
  • मुकेश माचकर अक्कलझाड Mukesh Machakar Akkalzad

‘अक्कलझाड’ हे मुकेश माचकर यांचं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. लौकिकार्थाने बोधकथा, नीतीकथा, प्रेरक कथा, आध्यात्मिक कथा, दृष्टांतकथा अशा लेबलांखाली बसण्यासारख्या कथा या पुस्तकात आहेत. पण, त्यांचं रंजक गोष्ट असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. या पुस्तकाला माचकरांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश....

 

या कथा प्रथम फेसबुकवर अवतरल्या, तेव्हापासून एक प्रश्न अधूनमधून सतत विचारला जातो. या कथा तुमच्या आहेत का?

या कथा माझ्या आहेतही आणि नाहीतही, हेच त्यावरचं योग्य उत्तर आहे. ते अनेकांना समजत नाही. काहींना पटत नाही. काही मूळ लेखकांच्या वतीने श्रेयाच्या लढाया सुरू करतात. आज कोणी इसापची गोष्ट इसापचं नाव न घेता सांगितली, तर ही इसापची गोष्ट असल्याचं लक्षात आणून दिलं जातं, पण, मुळात इसापच्या अनेक गोष्टींच्या कथाकल्पना त्याने लुकमानकडून उचलल्या होत्या, त्याचं काय? ते अनेकांना माहिती नसतं, इतकंच. खरंतर, या पुस्तकातल्या सगळ्याच कथा पारंपरिक आहेत. कुठे ऐतिहासिक व्यक्तींच्या आयुष्यातल्या घटनांमधून बोध घेताना त्यांना दंतकथांचं रूप आलंय तर कुठे त्या सरळसरळ काल्पनिक, रचित कहाण्या आहेत. यातल्या ९० टक्क्यांहून अधिक कथांचं मूळ ठामपणे सांगता येत नाही. कारण, त्या अनेक प्रांत, भाषा, संस्कृतींच्या प्रदेशांमधून वाहात वाहात इथवर आल्या आहेत…

कथकानुसार आणि देश-काल-स्थितीनुसार त्यांच्या तात्पर्यात आणि मांडणीत फरक झालेला आहे… प्रत्येक कथकाने त्यांचा सांगाडा कायम ठेवून त्यांना आपल्या कल्पनेच्या हाडामांसातून आकाराला आणलं आहे… त्यामुळेच या कथा इथूनही पुढे जाणार आहेत…

माझ्या या गोष्टींची सुरुवात झाली ओशोमुळे. त्याच्या व्याख्यानांनी (आपल्याकडे आजकाल कोणाही बुवाबापूमाँबाबा, डबलश्री आणि ट्रिपलवेडगळांच्या निरर्थक बरळण्यालाही प्रवचन म्हणतात, त्यामुळे तो कर्मकांडलिप्त शब्द ओशोच्या सुंदर व्याख्यानांना वापरवत नाही) रोजच्या मॉर्निंग वॉकला सोबत करायला सुरुवात केली आणि त्याच्या व्याख्यानात पेरलेल्या खुसखुशीत शैलीतल्या, सोप्या भाषेत गहन, बहुपेडी आशय व्यक्त करणाऱ्या गोष्टींनी मन वेधून घेतलं. माझ्यातला 'गोष्टवाला दादा' जागा केला. लहानपणी गल्लीतली पोरंटोरं गोळा करून त्यांच्या कोंडाळ्यात मध्यभागी बसून मी त्यांना तासनतास हुकमी गोष्टी सांगायचो. काही रचलेल्या, काही ऐकल्या-वाचलेल्या. पण, त्या सगळ्यांना माझा टच देऊनच सांगायचो.

एकदा सहज एक गोष्ट फेसबुकवर शेअर केली आणि कोंडाळं जमू लागलं. गोष्टी सांगण्याचा चस्का लागू लागला. लोक ठरल्या वेळेला गोष्टींची वाट पाहू लागले. काही वर्षांपूर्वी मी याच माध्यमात शेवटच्या ओळींत धक्का देणाऱ्या लघुतम कथांचा 'धक्कथा' (हे मी ठेवलेलं नाव) हा फॉर्म हाताळून झाला होता. मात्र, ती संपूर्णपणे माझी निर्मिती असायची. इथे मूळ गोष्टी कुठूनकुठून ऐकलेल्या, वाचलेल्या होत्या. ओशोबरोबरच इंटरनेट धुंडाळून काही गोष्टी शोधू लागलो. काही नव्या गोष्टीही सुचू लागल्या. गौतम बुद्ध, बोधिसत्त्व, बोधिधर्म, महावीर, नानक यांच्याबरोबर डायोजिनिज, लुकमान, मन्सूर, राबिया, मुल्ला नसरुद्दीन, हसन, बायजिद, होतेई, गुरजिएफ, रयोकान यांच्यासारख्या विविध धर्मपंथपरंपरांमधल्या विभूतींचा परिचय झाला. मुल्ला नसरुद्दीनच्या विचारप्रवृत्त करणाऱ्या हास्यकथांनी तर मलाच फेसबुकवर मुल्ला माचकरुद्दीन बनवून टाकलं.

या गोष्टी सांगू लागल्यावर फेसबुकवर राजकीय, वैचारिक, सामाजिक मतभेदांमुळे दूर, फटकून राहणारे लोकही नव्याने जोडले गेले. मित्रांचे मित्र शेअरिंगच्या माध्यमातून जोडले गेले. त्यांच्याशी संवाद साधताना लक्षात आलं की, आजचा समाज गोष्ट हरवलेला समाज आहे. कथा खूप आहेत, गोष्टी नाहीत, अशी स्थिती आहे. आजीच्या कुशीत गोष्ट ऐकायला उत्सुक नातवंडं आहेत, गोष्ट सांगायला आजीही तयार आहे, पण, तिच्यापाशीही गोष्टी नाहीत. या गोष्टी सुरू झाल्यापासून आमच्या मुलांना गोष्ट सांगण्याचा प्रॉब्लेम उरला नाही, रोज तुमचीच गोष्ट सांगतो, असं सांगणारे अनेक मित्र भेटले. अनेकांची इंग्रजी माध्यमांत जाणारी मुलं मराठीत फक्त या गोष्टीच ऐकतात आणि त्यांना त्या आवडतात, असं त्यांच्या पालकांनी कळवलं. संकेत कुलकर्णी हा औरंगाबादचा मित्र त्याच्या ९० वर्षांच्या आजोबांना या गोष्टी वाचून दाखवतो आणि तेही त्या गोष्टींची वाट पाहतात, हे कळाल्यावर सुखद आश्चर्याचा धक्काच बसला. या गोष्टींच्या ई-बुकचं प्रकाशन त्यांच्या हस्ते करवून घेतलं. काल्पनिक शेत आणि काल्पनिक म्हशींवरून भांडून एकमेकांचं डोकं फोडायला उद्युक्त होणाऱ्या दोन मित्रांची गोष्ट आपण आपल्या खरोखरच्या दोन मित्रांना वाचून दाखवली आणि त्यांच्यातलं वितुष्टापर्यंत ताणलं गेलेलं भांडण मिटवलं, अशीही प्रतिक्रिया एका वाचकाने कळवली. ती फारच मौलिक होती.

लौकिकार्थाने बोधकथा, नीतीकथा, प्रेरक कथा, आध्यात्मिक कथा, दृष्टांतकथा अशा लेबलांखाली बसण्यासारख्या कथा आहेत. पण, मला त्यांचं रंजक गोष्ट असणं सगळ्यात महत्त्वाचं वाटतं. वाचणाऱ्याला गोष्ट ही गोष्ट म्हणून आवडणं महत्त्वाचं, शिकवण मिळालीच, पोहोचलीच तर सोने पे सुहागा, इतक्या साध्या विचारातून या गोष्टी पुन्हा सांगतो आहे. आता हेच झेन आहे असं म्हणतात. असेलही.

आयुष्याच्या एका अवघड वळणावर या कथा भेटल्या नसत्या तर माझ्या आयुष्याची कथा वेगळी झाली असती. त्या अवघड काळात आप्तेष्टांसोबतच ओशोने आणि या कथांनीही मला सोबत केली. अल्लाद आयुष्याच्या पुढच्या टप्प्याला नेऊन सोडलं. त्यांचा मला नादच लागला. त्यांनी मला गुंतवून ठेवलं. रोज सकाळी वॉकवरून आल्यानंतर थेट कथा उतरवायला बसणं, ती फेसबुकवर पोस्ट करणं आणि नंतर तिचा प्रतिसाद तपासणं, हे माझंही व्यसन बनून बसलं. कथा डोक्यात घोळत असली की वास्तवातले सगळे व्यवहार धूसर व्हायचे. माझं हे तंद्रीगुंग गुंतलेपण माझी पत्नी, खरंतर सर्वार्थाने सहधर्मचारिणी असलेल्या अमिता दरेकर हिने नेहमीच्या सवयीने समजून घेतलं  आणि शुद्ध बेरोजगारीच्या काळातल्या या रिकामटेकड्या उद्योगातही मन:पूर्वक साथ दिली, हा तिचा मोठेपणा. आपण आणलेला गोड व्यत्ययही आपल्या बधिरावस्थेतल्या बाबाला या वेळेत डिस्टर्ब करू शकत नाही, हा घोर अपमान किमया आणि अनया या माझ्या अनुक्रमे शाळकरी आणि प्लेग्रूपकरी लेकींनी फारसा मनावर घेतला नाही, त्याबद्दल त्यांचेही आभार मानायलाच हवेत. सुबोध जावडेकर, अवधूत परळकर, मुग्धा कर्णिक, सुनील तांबे, कविता महाजन, गजू तायडे, विद्याधर दाते यांच्यासारख्या ज्येष्ठ मित्रांनी या उद्योगाचं कधी कौतुक केलं तर कधी कानपिचक्याही दिल्या. मृण्मयी रानडे या जिवलग मैत्रिणीने या गोष्टींवर शेवटची नजर टाकून दिली. प्रदीप म्हापसेकर, प्रमोद गणेशे आणि विनोद तिडके या मित्रांनी ई-बुकच्या उपक्रमात मोठं साह्य केलं. मुग्धा कोपर्डेकर आणि इंद्रायणी साहित्यच्या टीमने अत्यंत वेगाने आणि आपलेपणाने छापील पुस्तक आकाराला आणायला मदत केली. या सर्वांबरोबरच या गोष्टींची रोज आतुरतेने वाट पाहणाऱ्या आणि त्या पोस्ट होताच तात्काळ पोस्टमॉर्टेम करणाऱ्या, दिलखुलास तारीफ करणाऱ्या आणि अतिशय जिव्हाळ्याने त्यांचं पुस्तक आणाच, असा आग्रह धरणाऱ्या पहिल्या धारेच्या सर्व वाचकांचेही आभार.

ज्याने 'नावं ठेवल्या'वाचून माझा एकही उपक्रम पूर्ण झाला नसेल, त्या सन्मित्र प्रवीण टोकेकरने नेहमीप्रमाणे झटक्यात या पुस्तकाच्या शीर्षकाचं 'अक्कलझाड' लावून दिलं, त्याचे आभार.

सागर आणि मुग्धा कोपर्डेकर या दाम्पत्याने नेहमीच्या प्रकाशन-व्यवहारातील ठोकताळे बाजूला ठेवून हे पुस्तक प्रकाशात आणण्याचं धाडस केलं आहे. त्यांच्या धाडसाला यश लाभो आणि हे पुस्तक हातात घेणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या जगण्याच्या धामधुमीत विरंगुळ्याचे, निखळ मनोरंजनाचे आणि जमल्यास अंतर्मुख करणारे दोन क्षण मिळोत, आपला वाचनाचा वेळ सार्थकी लागला, असं समाधान मिळो, एवढीच अपेक्षा.

अक्कलझाड (भाग १ व २) – मुकेश माचकर, इंद्रायणी साहित्य, पुणे, पाने – १०४ (प्रत्येकी), मूल्य – ९० रुपये (प्रत्येकी)

‘अक्कलझाड’ हे पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.

https://goo.gl/V64Myp

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......