स्त्री मुलगा तयार करण्याचं ‘मशीन’ नाही!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
डॉ. संध्या शेलार
  • ‘सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी’, ‘डिसअॅपिरिंग डॉटर्स’ आणि ‘स्त्री-पर्व’ या पुस्तकांची मुखपृष्ठं
  • Fri , 18 August 2017
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस Shifaras गीता अरवमुदन Gita Aravamudan डिसअॅपिरिंग डॉटर्स Disappearing Daughters सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी लक्ष्मीकांत देशमुख Laxmikant Deshmukh

या महिन्यात दोन चांगली पुस्तकं वाचण्यात आली. कुठल्याही संवेदनशील मनाला हात घालणारी ही पुस्तकं आहेत. गीता अरवमुदन यांचं ‘Disappearing Daughters’ आणि ‘सेव्ह द बेबी गर्ल’चे जनक आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांचं ‘सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी’. गीता अरवमुदन यांच्या पुस्तकाला ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची प्रस्तावना लाभली आहे. त्यात ते म्हणतात- देवानेच मानव आणि दानव निर्माण केले. मग आपण मानव व्हायचं असेल तर मनातील दानवी प्रवृतींचा नाश करायला आपलं जीवन आहे. आपल्याच अंशाचा बळी घेणं ही दानवी प्रवृत्तीच आहे!

गीताजींच्या अनेक वर्षांच्या अभ्यासाचं, अनुभवांचं फलित असणारं हे पुस्तक स्त्रीभ्रूणहत्या आणि कमी होणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण यांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी नक्कीच महत्त्वपूर्ण ठरेल. गीताजींनी प्रसंगी जीव धोक्यात घालून काही पुरावे शोधले आहेत. स्त्रीभ्रूणहत्या यावर कायदेशीर अंकुश बसवल्यावर ती संपूर्ण व्यवस्था भूमिगत झाली. पुरावे आणि खरे आकडे शोधणं आणखी कठीण झालं. तरी सर्व प्रकारे या व्यवस्थेला सामोरं जात गीताजींनी आपलं इप्सित पूर्णत्वास नेलं. एक अभ्यासपूर्ण आणि खऱ्या माहितीवर आधारित हे पुस्तक पेंग्विन बुक्सनं २००७ मध्ये प्रकाशित केलं आहे.

१९८५ मध्ये स्त्रीअर्भक हत्येबद्दल प्रथम एका तमिळ मासिकानं लेख लिहिला. तेव्हा उसिलामपट्टी हे गाव उजेडात आलं. त्याच वेळी अशा प्रकारे स्त्रीअर्भकाची हत्या ही महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश आणि उत्तर पश्चिम भारतात चालूच होती. ऐंशीच्या दशकात जरी तंत्रज्ञान विकसित झालं होतं, तरी ते अजून ग्रामीण भागातील लोकांना पोहचलं नव्हतं आणि आर्थिकदृष्ट्या पेलणारंही नव्हतं. स्वतःची मुलगी मारणारी आई जेव्हा लेखिका पाहतात आणि तिच्या परिस्थितीचा आढावा घेतात, तेव्हा त्या या निष्कर्षाप्रत येतात की, ही महिला गुन्हेगार नसून स्वतःच पीडित आहे. जेव्हा त्या अनेक महिलांसोबत अथक प्रयत्नानंतर चर्चा करतात, तेव्हा लक्षात येतं या स्त्रियांना आपली मुलगी या दुष्ट जगात आणून तिला शोषित बनवायचं नाही. ८५ साली जेव्हा हा प्रकार उजेडात आला, तेव्हा तामिळनाडूच्या त्यावेळच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी cradle babies ही स्कीम आणली. सुरुवातीला मिळणारा बरा प्रतिसाद नंतर कमी झाला. कारण या मुलींचे नंतर होणारे हाल त्यांच्या आयांना मान्य नव्हते. म्हणून त्यांचे जगणं नाकारणं त्यांना जास्त सोयीचं वाटे.

हत्या करणाऱ्या स्त्रीला पुराव्यासहित सादर करणं आणि तिला शिक्षा देणं अत्यंत अवघड गोष्ट होती. परंतु सामाजिक कार्यकर्ते आणि आरोग्यसेविकांच्या अथक प्रयत्नातून उसिलामपट्टी तालुक्यातील करुपायीला पहिल्यांदा शिक्षा करण्यात आली ती १९९४ ला. अर्भक हत्या होतात हे ८५ ला समजूनही एखादी पुराव्यासहित केस मिळण्यास नऊ वर्षं लागली. स्वतःच्या मुलीला मारणाऱ्या जानकी, करुपायी, लक्ष्मी जेव्हा आपण पाहतो, तेव्हा त्यांची घृणा वाटते. परंतु त्यांच्या खऱ्या विकलतेची जाणीव आत बाहेरून हादरून टाकते. स्वतःच्या मुलीला मारणाऱ्या आया जशा आहेत, तसे स्वतःच्या नातीला वाचवण्यासाठी धडपडणारी चीनथातायी प्रेरणादायी भासते. स्वतःच्या मुलीची हत्या करणाऱ्या लक्ष्मीला लेखिका जेव्हा ‘क्रूर’ संबोधतात, तेव्हा ती एक साधा प्रश्न विचारते, जन्म झाल्यानंतर मुलीला मारणं हत्या आहे, तर मुलगी आहे, हे जाणून तिला जन्म घेण्याआधी मारणं हत्या नाही का?

अनेक एनजीओ अथकपणे या महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहिल्या. त्यांनी या महिलांचं आर्थिक अवलंबत्व त्यांच्या शोषणास कारणीभूत आहे, हे कारण शोधून या महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी अनेक कार्यक्रम राबविले. त्यांनतर स्त्री अर्भक हत्येची आकडेवारी खाली आली. स्त्रिया स्वतःच्या मुलींना जगवू लागल्या. परंतु त्याच वेळी शहरातील सुशिक्षित आणि कमावत्या स्त्रिया स्वतःच्या मुली गर्भात संपवत होत्या. तंत्रज्ञानातील प्रगती त्यांना साहाय्यकारक ठरत होती.

दुसरं, ‘सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी’ हे लक्ष्मीकांत देशमुख यांचं पुस्तक त्यांच्या ‘सेव्ह द बेबी गर्ल’ या कार्यक्रमांतर्गत आलेल्या अनुभवांवर आधारित आहे. लेखक पुस्तकाबद्दल लिहिताना म्हणतात- हा थीम बेस्ड कथासंग्रह आहे. हे पुस्तक एकाच वेळी ललित आणि ललितेतर आहे. शेवटच्या तीन प्रकरणांत देशमुखांनी ‘सेव्ह द बेबी गर्ल, सेव्ह द नेशन’ या कार्यक्रमाबद्दल, त्यात आलेल्या अडचणी आणि त्याची यशस्वीता यांविषयी सविस्तर लिहिलं आहे.

१९७४ मध्ये गर्भजलपरीक्षण करून लिंग जाणून घेण्याचं तंत्र भारतात आलं आणि त्यानंतर सोनोग्राफीचं तंत्रज्ञान. त्याआधी १९७२मध्ये भारतात काही व्यंग असलेलं किंवा आईच्या मानसिक वा शारीरिक अडचणीमुळे ती बाळाला जन्म देण्यास असमर्थ असेल तर कायदेशीर गर्भपाताची परवानगी मिळाली. यामुळे अनेक स्त्रियांना  अनैच्छिक गर्भापासून मुक्त होण्याचा मार्ग मोकळा झाला. जसं गर्भलिंगनिदान तंत्र विकसित होत गेलं, तसा या कायद्याचा फायदा लिंगनिदान करून गर्भपात करणाऱ्या अनेक महिलांनी घेतला. युनिसेफच्या अहवालानुसार एकट्या मुंबईत १९८४ साली ८००० गर्भपात झाले आणि त्यातील ७९९९ गर्भपात हे लिंगनिदान करून झाले. कारण ते सारे गर्भ मुलींचे होते.

भारत सरकारनं १९९४ ला लिंगनिदान तंत्रावर निर्बंध लादले. तेव्हापासून लिंगनिदान करून गर्भपात करणं हा व्यवसाय भूमिगत झाला. त्यासाठी डॉक्टर हवं तसं शुल्क उकळू लागले. लिंगनिदान करून गर्भपात करण्यासाठी पॅकेज तयार केलं जाऊ लागलं. बऱ्याचदा पैशाच्या हव्यासापोटी डॉक्टर मुलाचा गर्भ असला तरी मुलीचा सांगून पैसे उकळू लागले. आपलं गुपित उघड होऊ नये यासाठी गर्भाची विल्हेवाट लावू लागले. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या गोष्टी फक्त पैशासाठी केल्या जात. (परळी बीड येथील डॉ. सुदाम मुंडेची केसही अशीच होती. उभा महाराष्ट्र त्या वेळी हादरला होता. हे महाराष्ट्रासाठी नवीन होतं, पण उत्तर आणि पश्चिम भारतात खूप आधीपासून हा प्रकार होत होता. या संदर्भात देशमुख यांनी ‘लंगडा बाळकृष्ण’ ही कथा घेतली आहे. त्यातील डॉक्टरांच्या क्रूर कर्मांचा पाढा वाचताना मन विषन्न होतं.

अमर्त्य सेन यांच्या ‘हरवलेल्या महिला’ या संकल्पनेचा उल्लेख दोन्ही पुस्तकांनी केला आहे. सेन यांनी जागतिक पातळीवर यासंदर्भात अभ्यास केलेला आहे. त्यांनी पुरुष आणि महिलांच्या आकडेवारीतील तफावत अभ्यासून जगातील हरवलेल्या महिलांचा आकडा काढला. यातील सर्वाधिक महिला या आशिया खंडातून गायब आहेत. जिथं मुलगा पाहिजे हा अट्टाहास आहे. सेन यांच्या १९८६ मधील अहवालानुसार भारतात तीन कोटी सत्तर लाख स्त्रिया हरवल्या होत्या. त्या वेळी जगाचा एकूण हरवलेल्या महिलांचा आकडा दहा कोटी होता. उत्तर व पश्चिम राज्यांमध्ये हरवलेल्या महिला सर्वाधिक होत्या. त्यांच्या अभ्यासानुसार स्त्रियांचा मृत्युदर हा पुरुषांच्या तुलनेत जास्त आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं लिंगनिदान करून गर्भपात करण्याला ते ‘हायटेक सेक्सिझम’ असं संबोधतात.

वरील दोन्ही पुस्तकांत १९७४ पासूनची विविध वयोगटांतील, राज्यांमधील आकडेवारी दिली आहे. देशमुख यांच्या पुस्तकात २०११ सालची आकडेवारी दिली आहे. ‘रुंदावणारी दरी’ या शीर्षकाखाली ही आकडेवारी दिली आहे. २०११ प्रमाणे भारताची लोकसंख्या १, २१ , ०१, ९३, ४२२ इतकी होती. त्यात ६२, ३७, २४, २४८ पुरुष होते आणि ५८, ६४, ६९, १७४ इतकी महिलांची संख्या होती. म्हणजे १ हजार पुरुषांमागे ९४० महिला असे प्रमाण होते. चंडीगडमध्ये हे प्रमाण १००० : ६९१ इतके होते, तर दीव-दमणमध्ये ५५० इतके अल्प होते. ०-६ वयोगटातील लिंगगुणोत्तरात २००१ च्या तुलनेत लक्षणीय घट झाली. जे प्रमाण २००१ ला १००० :९२७ होते, ते २०११ ला घटून ९१४ इतके कमी झाले.

याच वेळी महाराष्ट्रात १९९१ च्या गणनेनुसार १००० :९४६ हा लिंगदर ६ वर्षाखालील मुलींचा होता. तो २००१ ला आणखी घटून ९१३ इतका झाला आणि २०११ ला आणखी घटून ८८३ पर्यंत आला. ११७ मुलींची ही तफावत भरून काढणं खूपच अवघड आहे. तत्कालिन महिला आणि बालकल्याण मंत्री २००६ मध्ये याच अनुषंगाने बोलताना म्हणाल्या होत्या- भारतीय महिला वाघांपेक्षाही जास्त धोकादायकरीत्या कमी होत आहेत! वरील आकडेवारी पाहता नक्कीच ही अतिशोयोक्ती ठरत नाही!

केरळमधील लिंगगुणोत्तर मात्र लक्ष वेधून घेतं. तिथं १००० :१०८४ हे प्रमाण आहे. देशात इतर ठिकाणी असलेली चिंतेची बाब इथं का नाही, याबद्दल उहापोह करताना देशमुख कौतुक करतात ते स्त्रियांना मिळणाऱ्या वडिलोपार्जित संपत्तीच्या मालकी हक्काचे. म्हणूनच मातृसत्ताक पद्धतीनं चालणारं केरळ महिलांच्या संख्येत आघाडीवर असल्याचं ते नमूद करतात.

१९८८ मध्ये झालेल्या कायद्यानुसार लिंगनिदान तंत्रज्ञानावर पहिली गदा आणली ती महाराष्ट्रानं. मृणालताई गोरे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी आंदोलन करून कायदा संमत करून घेतला. तोच कायदा भारत सरकारला संमत करण्यास १९९४ साल उजाडलं. त्या कायद्यातूनही पळवाटा काढण्याचं काम चालूच होतं. त्यावर देशमुखांनी निर्बंध आणले ते कोल्हापूरमध्ये, कायद्याची अंमलबजावणी युद्धपातळीवर अमलात आणून. आधुनिक तंत्राचा योग्य तो वापर करून. सर्व सोनोग्राफी मशीन आंतरजालाच्या साहाय्यानं जोडली. ऑब्झर्वर बसवले गेले. हे तंत्रज्ञान राजस्थान सरकारनंही स्वीकारलं.   

सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी - लक्ष्मीकांत देशमुख
मनोविकास प्रकाशन, पुणे
या पु्स्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3935

.............................................................................................................................................

‘मनुस्मृती’चा जबरदस्त पगडा असलेली आणि स्त्रियांना हीन लेखणारी भारतीय समाजरचना स्त्रीभ्रूणहत्येच्या, स्त्रीअर्भक हत्येच्या या प्रश्नाला संवेदनशीलतेनं भिडत नाही. व्हायला हवा इतका या गोष्टींचा गवगवाही होत नाही. लिंगभेद जिथं घराघरात जन्मापासून शिकवला जातो, स्त्रीवरील हिंसाचाराला जिथं संस्कृतीरक्षकांचं संरक्षण लाभतं, तिथं या प्रश्नाबद्दल विचार होईल, असं मानणं भाबडेपणाचे ठरेल. मुलींच्या आहाराबद्दल, शिक्षणाबद्दल उदासीन असलेला समाज त्यांच्या मानवी हक्कांना लाथाडताना जराही विचलित होत नाही. ही समाजाची उदासीनता  मुली आणि स्त्रीगर्भाच्या हत्येपर्यंत घेऊन जाते. देवी म्हणून ज्या स्त्रीची पूजा केली जाते, तिथं वास्तव जगातील स्त्रीवर अगदी सहजपणे अत्याचार केले जातात.

स्त्रीला कुटुंबात नेहमीच दुय्यम स्थान राहिलं आहे. पुत्रप्राप्तीसाठी नेहमीच प्रयत्नशील असलेल्या आपल्या संस्कृतीत पुत्राप्राप्तीचे मंत्र सांगितले आहेत. मुलगी ही स्वर्गाच्या वाटेतील धोंड आहे, हे पूर्वीपासून माणसाच्या मनात रुजवलं आहे. आणि तिथून स्त्री तिरस्काराची सुरुवात होते. जेव्हा गर्भलिंग ओळखण्याचं तंत्रज्ञान अस्तित्वात नव्हतं, तेव्हा नवजात अर्भक असलेल्या मुलीचा अत्यंत क्रूरपणे शेवट केला जाई. कुणी त्यांना गळफास आवळून मारत असे, तर कुणी विषारी वनस्पतींचा रस पाजून मारत असे. कधी पाण्यात, दुधात बुडवून मारलं जाई, कधी जिवंत पुरून मारलं जाई. अशा क्रूर हत्या त्या मुलीच्या आईला करणं भाग असे. नाहीतर आधीच पीडित असलेली स्त्री सर्वांच्या रोषाचं साधन बने.

राम मनोहर लोहिया यांनी शतकापूर्वी सांगितलेली गोष्ट इथं नमूद करावीशी वाटते. ते म्हणत- ‘जोवर चारित्र्य ही संकल्पना एक इंचाच्या योनिपर्यंत मर्यादित राहील, तोवर स्त्रीचं जीवनमान कधीही चांगलं असू शकत नाही!’ मुलगा नसेल तर मुक्ती मिळत नाही, या भाकडकथा जोवर जनमानसाच्या मेंदूत घट्ट बसल्या आहेत, तोवर समाज मुलींचा तिरस्कार करणारच!

स्त्री-पर्व - मंगला सामंत
नेटवर्क प्रकाशन, मुंबई
या पु्स्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3937

.............................................................................................................................................

गीताजी पुस्तकाचा समारोप करताना म्हणतात- फक्त कायदेशीररीत्या हा प्रश्न सोडवणं कठीण आहे. स्त्रीला माणूस म्हणून स्वीकारावं लागेल. तिला कुटुंबाचा घटक मानलं जावं, यासाठी सामाजिक क्रांतीची आवश्यकता आहे. स्त्री मुलगा तयार करण्याचं मशीन नाही, हे आधी स्त्रीच्या मनावर बिंबवावं लागेल. तिच्या अस्मितांना जागृत केलं, तरच ही क्रांती होऊ शकते!

लेखिका मुक्ताई ग्रामीण महिला संघ (नागरगाव, शिरूर, जि. पुणे)च्या अध्यक्ष आहेत.

shelargeetanjali16@gmail.com    

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......