विंदा - पुरस्कारांच्या पलिकडचे श्रेय मिळवणारा प्रतिभावंत
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
दीपाली दातार
  • विंदा करंदीकर यांची ग्रंथसंपदा
  • Fri , 18 August 2017
  • ग्रंथनामा Granthnama वाचणारा लिहितो विंदा करंदीकर Vinda Karandikar अष्टदर्शने Ashtadarshane

माध्यमांचा सुळसुळाट आणि ओव्हर एक्स्पोजर हे दुखणे बनत असलेल्या सध्याच्या काळात सुलभ लोकप्रियतेच्या आहारी जाणारे बरेच गुणी कलावंत आपण सभोवताली पाहतो. अशा वेळी यशाचे कुठलेही शॉर्टकट्स न अवलंबता किंबहुना यशापयशाच्या पलीकडे जाऊन ज्यांनी आपली सृजनशीलता जपली आणि विकसित केली अशा सर्व कलावंतांविषयी साहजिकच आदर वाटतो. इतरांना जे करता येते, ते इतर करत असतातच, पण आपल्या स्वतःला जे येते, तेच फक्त स्वतः करावे आणि इतर जे करतात, ते आपल्यालाही करता येईल का, या संमोहनात न पडता अखंडपणे आपल्याच धुंदीत वाट चालत, निरनिराळी आव्हाने घेत, आशा-निराशेची पर्वा न करता ‘श्रेया’च्या शोधात चालत राहणारे आणि आश्चर्य म्हणजे ते श्रेय चक्क मिळवणारे कविवर्य विंदा करंदीकर म्हणजेच गोविंद विनायक करंदीकर यांचे जन्मशताब्दी वर्ष २३ ऑगस्टपासून सुरू होत आहे.

२३ ऑगस्ट १९१८ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील धालवल या गावी हा असामान्य प्रतिभावंत आणि बहुपेडी लेखक जन्मला. तो कसा होता त्याचा हा शोध. 

इंग्रजीचे प्राध्यापक असलेल्या करंदीकरांचा पहिला काव्यसंग्रह ‘स्वेदगंगा’ १९४९ साली प्रकाशित झाला आणि शेवटचा ‘विरुपिका’ हा संग्रह १९८१ साली. दरम्यानच्या काळात 'मृदगंध', ‘ध्रुपद’ आणि ‘जातक’ हे तीन काव्यसंग्रह, सात बालगीतांचे संग्रह, ‘आकाशाचा अर्थ’ आणि ‘स्पर्शाची पालवी’ हे दोन लघुनिबंध. ‘परंपरा आणि नवता’ हे समीक्षात्मक लेखन, ‘फाऊस्ट’, ‘राजा लिअर’ आणि ‘अॅरिस्टॉटलचे काव्यशास्त्र’ ही भाषांतरे, स्वत:च्या कवितांची इंग्रजी भाषांतरे, इंग्रजी समीक्षा आणि ज्ञानेश्वरांच्या ‘अमृतानुभवाचे अर्वाचीनीकरण’ असे उदंड लेखन प्रकाशित झाले. हे सर्व लिखाण विविधांगी आणि चौफेर होते.

कोणत्याही प्रकारच्या तडजोडी करावयाच्या नसल्याने प्रकाशन तसे संथ गतीने चालले होते. शेवटच्या संग्रहाच्या ‘विरुपिका'च्या प्रास्ताविकात तर या कवीने चक्क ‘आपल्या हातून जे जे करण्याजोगे होते, करता येण्यासारखे होते आणि करावयाचे योजिले होते ते सर्व करून झाले आहे,’ अशी लेखन निवृत्तीची भावना व्यक्त केली. याविषयी विजया राजाध्यक्षांनी त्यांना एकदा विचारले की, तुम्ही हे इतक्या ठामपणे कसे सांगू शकता? तेव्हा करंदीकरांनी दिलेले उत्तर फार मार्मिक आहे. ते म्हणाले, “मला नवीन काही अधिक अर्थवाही, मूल्यगर्भ असलेले आणि जे मीच लिहिले पाहिजे असे यापुढे सुचले तर नको का आहे? पण माझा माझ्याविषयी जो अंदाज आहे तो हा असा. मी सिद्धहस्त कविता आजही करू शकतो. मासिकं त्या छापतीलही, वाचकांनाही त्यातल्या काही आवडतील, पण तसल्या कविता लिहिण्यात मला रस नाही. ती माझी आणि वाचकांची दुहेरी अशी फसवाफसवी होईल.” स्वतः विषयी इतके प्रामाणिक असणारे विंदा हे दशासहस्त्रेषू एक, अगदीच विरळा असावेत. एक खरा कलावंत म्हणून यामुळेच विंदा मला नेहमी जवळचे वाटतात.

पुढे २००३ मध्ये करंदीकरांचा ‘अष्टदर्शने’ हा संग्रह प्रकाशित झाला. देकार्त, स्पिनोझा, कान्ट, हेगेल, शोपेनहॉवर, नित्शे, बर्गसा हे सात पाश्चात्य आणि चार्वाक हे प्राचीन भारतीय दर्शन अशा आठ दर्शनांचे सार कथन करणारा हा पद्यात्मक संग्रह. ‘अष्टदर्शने’साठी त्यांना 'ज्ञानपीठ' मिळाले. पण त्याव्यतिरिक्त त्यांचा ठाम लेखनसंन्यास होता. आपल्याच एका कवितेते ‘कसा मी कळेना’ म्हणणारे करंदीकर आपल्याला इथे भेटतात, ते स्वतःला पूर्णपणे ओळखणारे.

काव्य, समीक्षा, अनुवाद, लघुनिबंध असे प्रकार हाताळणारे विंदा समाजात कवी म्हणूनच अधिक लोकप्रिय आहेत यात शंका नाही. याचे श्रेय खरे तर जेवढे त्यांच्या कवितेतील सामर्थ्याला द्यावे लागेल, तितकेच त्यांच्या काव्यवाचनाच्या मैफलीलाही द्यावे लागेल. विंदा, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट यांनी आपल्या कविता एकत्रितरीत्या मंचावरून ठिकठिकाणी दमदारपणे सादर केल्या. अवघ्या महाराष्ट्रभर अगदी खेड्यापाड्यात जाऊन रसिकांची कवितेची तहान त्यांनी भागविली. मानधन घेऊन अशा पद्धतीने कवितांचे दर्जेदार कार्यक्रम करून मराठी मनाला कवितेचे वेड लावणारे हे पहिले तीन कवी. काही कविता एकांतात वाचाव्यात, तर काही कवितांचा अधिक चांगला प्रत्यय वाचक, रसिकांना अशा मैफलीतून देता येतो. कविता लोकाभिमुख करण्याचे महत्त्वाचे काम असे कार्यक्रम करत असतात. कविता वाचणे, ऐकणे आणि भोगणे अशा तीन पातळ्यांवर समजून घेणे आवश्यक आहे, असे विंदांना मनापासून वाटे.       

विंदांच्या एकूण कवितेबद्दल बोलायचं तर ती बहुरूपिणी आहे. तिच्यात ‘माझ्या मना बन दगड’ किंवा ‘जिचा आत्मा एक ती जनता अमर आहे’ असं सांगण्याचं सामर्थ्य आहे. ‘परीचा पडला दगडावर पाय, दगड म्हणाला आय आय’ किंवा ‘माझे मला आठवले तुझे तुला आठवले, नकळत हातामध्ये हात गेले गाठवले, सावरला पुन्हा तोल जरी कळे दोघांनाही जुने पाणी किती खोल’ सारखी सुकोमलता आहे. ‘उपजत होती तुला कला ती’ किंवा ‘सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी हे चंद्र सूर्य तारे सारे तिच्याच पाठी, जेव्हा प्रदक्षिणा ती घाली मारुतीला तेव्हा पाहायची हो मूर्ती वळून पाठी’सारखा अवखळपणा आहे. ‘तेच ते’ किंवा ‘उपयोग काय त्याचा’ या कवितेत हसता हसता तत्त्वज्ञान सांगणारा मिश्किलपणा आहे. ‘असा मी तसा मी कसा मी कळेना स्वतः च्या घरी दूरचा पाहुणा मी’ किंवा ‘तसेच घुमते शुभ्र कबूतर’सारखी प्रगाढ वैचारिकता आहे. ‘देणार्‍याने देत जावे घेणार्‍याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणार्‍याचे हात घ्यावेत’सारखा सखोल संस्कार आहे. आशयाच्या आणि अनुभवाच्या अंगाने ती जाणीवसमृद्ध आणि भावसमृद्ध आहेच, पण तिच्या घाटांचा किंवा आकृतीबंधांचा विचार केला तर त्याही बाबतीत तिच्यात नैसर्गिक लवचिकता आणि विविधता आहे. म्हणजे असे की त्यांनी लयबद्ध आणि छंदवृत्तातल्या कविता जशा लिहिल्या, तशा स्वच्छंदी, तालबद्धा गद्य किंवा मुक्तसुनीते, मुक्तछंद, अभंग अशाही रचना केल्या. गझलेचा फॉर्मही त्यांनी समर्थपणे हाताळला.

विंदांच्या ‘फारा दिवसांनी आली मागारीण माहेरला’सारख्या कवितेत एखादी कथा दिसते. तर ‘मथू आत्ते’, ‘धोंड्या न्हावी’ या कवितेतून व्यक्तिचित्रे. ‘झपताल’, ‘दादरा’, ‘रूपक’ ही तालचित्रे, स्वरचित्रे हे तर अगदी नवे आणि वेगळे प्रयोग. संगीतप्रेमी आणि उत्तम तबला वाजवणार्‍या विंदांच्या प्रतिभेने हे सगळे केले नसते तरच नवल.

विंदांनी बालकविता लिहिल्या पण त्याही तितक्या सोप्या नव्हत्या. त्या जितक्या बालांच्या तितक्याच मोठ्यांच्याही. 'बाल्य' आणि 'वार्धक्य' ही दोन टोके सांधत कल्पना आणि वास्तव यांचं सुरेख मिश्रण करत विंदा बालकवितांतून जी अनुभूती देतात, त्याने मन थक्क होऊन जाते. त्यांची ‘सब घोडे बारा टक्के’सारखी त्या काळी लिहिलेली सामाजिक कविता आजच्या काळाचेच भाष्य करणारी वाटते. ‘स्वेदगंगा’, ‘माझ्या मना बन दगड’ या कवितात विंदा मार्क्सवादी किंवा समाजवादी विचारसरणीचे असावेत असे लक्षात येते. सुरुवातीच्या काळात विंदा सावरकरवादी विचारांचे होते, संघनिष्ठ होते, पुढे तासगावला शिक्षक म्हणून नोकरीत असताना ते गांधीवादी विचारसरणीकडे वळले आणि प्राध्यापक म्हणून मुंबईला आले, तेव्हा रसेल आणि मार्क्सिझमने प्रभावित झाले. पण कोणतीही चांगली कविता केवळ तत्त्वप्रणालीच्या आधाराने लिहिली जाणार नाही, तसे झाल्यास ती एक कारागिरी ठरेल, कलाकृती नाही. कवितेला जर कोणती तत्त्वप्रणाली आधारभूत ठरत असेल तर ती तिच्यातच सामावलेली असते. कोणत्याही कवितेची सुरुवात तत्त्वप्रणालीने नव्हे तर उत्कट भावस्थिती किंवा अनुभवस्थितीतून होते, असे विंदांचे प्रामाणिक मत होते.  

स्त्री जाणीवेची कविता हे त्यांच्या निर्मितीचे महत्त्वाचे केंद्र. ‘कर कर करा’ ही स्त्री जाणीवेची कविता स्त्रियांच्या न संपणार्‍या कष्टाविषयी थेट पण परखडपणे बोलणारी आहे तर ‘झपताल’ या कवितेत त्यांना दिसलेली नवर्‍याचा संसार नेटका करणारी स्त्री वाचली की वाटते एखाद्या स्त्रीला तरी तिचे दुःख इतक्या उत्कटपणे मांडता येईल का? काही वेळेला पुरुषांच्या नजरेतून बघितलेली स्त्री त्यांच्या कवितेत भेटते तर काही वेळेला स्त्रियांच्या अंतरंगात प्रवेश करून आलेली प्रेमकविता प्रकट होते. विंदा लिहीत होते त्यावेळी मर्ढेकर, इंदिराबाई, पु.शि.रेगे, मंगेश पाडगावकर, वसंत बापट, सदानंद रेगे अशी अनेक मंडळीसुद्धा कसदार काव्यलेखन करत होती, पण विंदांच्या कवितेचे वेगळेपण हे की एकाचवेळी तिच्यात परस्परविरोधी भाववृत्ती, वेगवेगळे वैचारिक दृष्टीकोन, मार्क्सिस्ट सामाजिकता आणि अनामिकाचा आध्यात्मिक ध्यास दिसून येतो. ती चित्रमयी आहे आणि कोड्यांच्या भाषेत बोलणारीही आहे. तिचा रोक, झोक, नोक सर्व काही तिचा आहे. तिच्यात एक प्रकारचे तेज आणि ओजही आहे. संस्कार स्वीकारण्याची आणि नाकारण्याची दुहेरी भूमिका आहे. स्वतंत्रपणे आणि मुक्तपणे अनुभव घेणारी विंदांची लेखणी वस्तुनिष्ठ आणि शब्दनिष्ठ कवितेपेक्षा जाणीवनिष्ठ कवितेचा ध्यास घेणारी आहे. लोकप्रियतेपेक्षा प्रयोगशीलतेची वाट धरणारी आहे.  

विंदांचे इंग्रजी वाचन अफाट आणि सर्वांगीण होते आणि ते इंग्रजी हा विषय शिकवत होते. अनेक वेळेला त्यांना इंग्रजी पुस्तकांनी मराठीहून अधिक प्रभावित केले आहे अपवाद म्हणजे तुकाराम, ज्ञानेश्वर आणि मर्ढेकर. तरीही त्यांनी मराठीतून काव्यनिर्मिती केली हे आश्चर्यच. कविवर्य माधव जूलियन यांच्यामुळे हे घडले असे विंदा मोठ्या भक्तिभावाने सांगतात.

या सार्‍या अफाट कामाबद्दल 'कबीर सन्मान', 'जनस्थान पुरस्कार', साहित्य अकादमीचा पुरस्कार, साहित्यातील सर्वोच्च असा 'ज्ञानपीठ' पुरस्कार आणि अजून अनेक पुरस्कार विंदांना मिळाले. पण पुरस्कारापोटी मिळालेली रक्कम विंदांनी अनेक सामाजिक संस्थांना वाटून दिली. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात विंदा भागानगरच्या सत्याग्रहात सहभागी झाले तेव्हा हैदराबादच्या तुरुंगात गेले. स्वातंत्र्य मिळाल्यावर तुरुंगवास भोगाव्या लागणार्‍या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना सरकारने निवृत्तीवेतन देऊ केले होते, परंतु स्वातंत्र्याच्या कामात थोडे कष्ट झाले आणि थोडा वेळ खर्ची पडला तर लगेचच त्याचा मोबदला घेण्याची काय गरज? शिवाय शिक्षण पूर्ण होऊन नोकरीही लागली असल्याने विंदांनी ते निवृत्तीवेतन नाकारले. आजच्या संधीसाधू आणि भ्रष्टाचाराच्या कोलाहलात विंदांचे हे मोठेपण नक्कीच आदरणीय आहे. तसे पाहता विंदांच्या वेगळेपणाचे आणखी अनेक किस्से सांगता येतील.

विंदा : विंदा करंदीकर यांची समग्र कविता
प्रस्तावना - वसंत पाटणकर
पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3304

.............................................................................................................................................

या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने विंदांची कविता रसिकांनी पुन:पुन्हा ऐकावी, वाचावी असे मनापासून वाटते, कारण ही कविता स्वतः चा आणि जीवनाचा शोध घेणारी आणि आपल्या जगण्याला बळ देणारी आहे.

चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे

वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे

असे म्हणणारी विंदांची लेखणी पुरस्कारांच्या पलिकडचे श्रेय मिळवणारी आहे. ती रसिकांच्या हृदयाचा ठाव घेणारी, त्याला कालातीत वास्तवाचे भान आणि जीवनमूल्याचे दान देणारी आहे.     

लेखिका कवितावाचनाचे कार्यक्रम करतात.

deepali.poem@gmail.com  

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......