रामचंद्र गुहा : एक जहाल पुरोगामी
दिवाळी २०१७ - व्यक्तिचित्रे
माधव गाडगीळ
  • छायाचित्रे - अतुळ मळेकर
  • Tue , 25 October 2016
  • रामचंद्र गुहा Ramchandra Guha माधव गाडगीळ Madhav Gadgil

एकोणवीसशे एक्याऐंशी साली डेहराडूनच्या वन संशोधन संस्थेत माझ्या कीटकशास्त्रज्ञ मित्रांनी, डॉ.सेनशर्मांनी हत्तींच्या समाजव्यवस्थेवर व्याख्यान द्यायला बोलावलं होतं. व्याख्यानानंतर माझ्याकडे ते तेवीस वर्षं वयाच्या रामचंद्र गुहाला घेऊन आले. म्हणाले, ‘माझे मित्र, रसायनशास्त्रज्ञ गुहांचा हा मुलगा. तुझ्याशी बोलायला उत्सुक आहे.’ म्हणालो, ‘अवश्य’. मग त्याच्याशी तास-दीड तास खुशीत गप्पा मारल्या. राम डेहराडूनला वाढला होता. तिथल्याच डून स्कूलमध्ये शिकून मग दिल्लीला सेंट स्टीफन महाविद्यालयातून अर्थशास्त्रात बी.ए. आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून एम्.ए. झाला होता. या शिक्षणसंस्था प्रतिष्ठित. तिथं राजीव गांधी, करण सिंग, ज्योतिरादित्य सिंदिया, मणि शंकर अय्यर अशा बड्या धेंडांनी शिक्षण घेतलेलं. मध्यंतरी मणि शंकर अय्यरच्या सामान्यांबद्दल तुच्छतेनं बोलण्यावरून वादही झाले होते, पण रामपाशी असा कुठलाच पोकळ गर्व नव्हता. तो म्हणाला, ‘मी हिमालयातल्या निसर्गाचा प्रेमी आहे. डेहराडूनलाच वाढलो. पक्षी निरीक्षणाचा छंद जोपासला. बाराव्या वर्षी इथल्या न्यू फॉरेस्टच्या पक्ष्यांवर ‘Newsletter for Bird Watchers’मध्ये एक लेखसुद्धा लिहिला होता. मग अर्थशास्त्र शिकलो, पण आता समाजशास्त्रात पदव्युत्तर संशोधन करण्याचा इरादा आहे. कोलकात्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये काम सुरू केलं आहे. विषय आहे चिपको आंदोलन.’

इंग्रजांच्या आमदानीपासून हिमालयाच्या निसर्गसंपत्तीची जोरात लूट चालली होती. स्वातंत्र्यानंतर त्याचा वेग आणखीच वाढला. स्थानिक जनतेवर त्याचा बोजा लादला जात होता. ते अनेक प्रकारे हाल-अपेष्टा पेलत होते. कोसळणार्‍या दरडी, वस्त्या वाहून नेणारे पूर, यामागं एक मोठं कारण होतं, वृक्षतोड. लाकूड नवनव्या उपयोगांसाठी कवडीमोलानं उद्योगधंद्यांना पुरवलं जात होतं. अशातलाच एक उद्योग होता, बॅडमिण्टनच्या रॅकेटी बनवणं. त्यासाठी आपल्या इच्छेविरुद्ध चाललेली तोड थांबवण्याच्या प्रयत्नांतून १९७३ साली चिपको आंदोलन जन्मलं. खूप गाजलं. त्याबद्दल अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या आंदोलनाला वर्षानुवर्षांची पार्श्वभूमी होती. दशकानुदशकं लोक नाना तर्‍हेनं निषेध नोंदवत आले होते. त्यांबद्दलही खूप कागदपत्रं उपलब्ध होती. दुसर्‍या महायुद्धानंतर इतिहासाचे अभ्यासक केवळ सत्ताधीशांवरचा रोख मोडून सामान्य लोकांवर लक्ष केंद्रित करून इतिहास लिहू लागले होते. तळागाळातले लोक आपल्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काय काय मार्गानं झटतात त्याचा अभ्यास सुरू झाला होता. या नावीन्यपूर्ण प्रणालीत चिपकोवर काम करावं असा रामचा इरादा होता.

मी जीवशास्त्रज्ञ होतो, परिसरशास्त्र हा माझा आवडीचा विषय. १९७१ सालापासून दहा वर्षं मी डोंगर-दर्‍यांत, रानावनांत हिंडत होतो. कागदगिरण्या कशी अद्वा-तद्वा तोड करत होत्या, प्लायवूड गिरण्यांची मागणी पुरवण्यासाठी लोकांनी शतकानुशतकं जतन केलेल्या देवराया कशा तोडल्या जात होत्या, या सगळ्यांबद्दल पद्धतशीर शास्त्रीय निरीक्षणं नोंदवत होतो. मलाही चिपको आंदोलनाबद्दल विशेष कुतूहल होतं. मी डेहराडूनहून पुढे लगेच गढवालातल्या बेमरू गावात चिपको आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या दशोली ग्राम स्वराज्य संघाच्या परिसर पुनरुज्जीवन शिबिरात दहा दिवस सहभागी होणार होतो. मी रामशी त्याच्या संशोधन पद्धतीची चर्चा केली. इतिहासाच्या संशोधकांप्रमाणे त्याचा भर कागदपत्रांवर राहणार होता. मी त्याला सुचवलं, ‘कागदोपत्री वास्तवाचं अपुरं, अनेकदा विपर्यस्त चित्रण असतं, असा माझा अनुभव आहे. तू कागदपत्रांचा अभ्यास करच, पण चिपको हे एक जिवंत आंदोलन आहे. त्याचा प्रत्यक्ष लोकांत मिळून-मिसळून अभ्यास कर.’ राम मोठा मनमिळाऊ जगन्मित्र होता. त्याला हे सहज जमलं. त्यातून त्यानं खूप चांगलं काम करून दाखवलं.

२.

पहिल्याच भेटीतल्या गप्पांतून माझ्या लक्षात आलं की, राम तल्लख बुद्धीचा, जिज्ञासू आहे. निसर्गाबद्दलचं प्रेम, लोकांबद्दलची कळकळ, समतावादी दृष्टिकोन, लोकशाहीवरचा गाढा विश्वास, यांमुळे आमचे सूर छान जुळत होते. त्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधल्या प्राध्यापिका बाईंनी मी रामच्या संशोधनाला मार्गदर्शन करणार्‍या समितीला मदत करावी अशी विनंती केली. मी आनंदानं होकार दिला. त्यावेळी इरावती कर्व्यांचा उजवा हात असलेला कैलाश मल्होत्रा कोलकात्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्टॅटिस्टिक्समध्ये मानवमापन व मानवी अनुवंशशास्त्र विभागात प्राध्यापक होता. त्याच्याबरोबर मी मानवी परिसरशास्त्रातल्या वेगवेगळ्या प्रकल्पांत मग्न होतो. अधूनमधून कोलकात्याला जायचो. रामशी चर्चा सुरू राहिल्या. त्यातून जाणवलं की, राम एक जातिवंत रसिक होता. निसर्ग, साहित्य, संगीत, कला, समाजकारण, अर्थकारण, राजकारण, इतिहास सगळे खूप रस घेऊन समजावून घेण्यात गढला होता. तो एक चांगला क्रिकेटपटूही होता. फिरकी गोलंदाजी ही त्याची खासीयत होती. दिल्लीच्या सेंट स्टीफन महाविद्यालयात तो कीर्ती आझाद व अरुण लाल यांच्या जोडीनं क्रिकेट संघातर्फे खेळला होता. शिवाय त्याच्या अफाट वाचनाचा फायदा घेऊन तेव्हा नव्यानंच लोकप्रिय होऊ लागलेल्या क्विझ स्पर्धांत जबरदस्त यश मिळवत होता. पुढे इन्फोसिस संस्थापक म्हणून गाजलेला नंदन नीलेकणी त्यावेळी मुंबईच्या आयआयटीत शिकत होता. स्पर्धांत रामची व त्याची टक्कर व्हायची. अर्थातच या जोडीची लवकरच मैत्री झाली. रामची अशा अनेक दिग्गजांशी चांगली जान-पहचान आहे, पण तो त्यांच्याशी आणि सामान्यांशी वागताना काही भेदभाव ठेवत नाही. सर्वांशी सारख्याच सज्जनतेनं वागतो. नंतर १९८९ साली गाजलेल्या सिद्धार्थ बासूच्या अखिल भारतीय क्विझ स्पर्धेत राम पार अंतिम फेरीत पोचून उपविजेता ठरला होता.

गुहा एका मुलाखतीत पुस्तकातला काही भाग वाचताना

३.

याच सुमारास रामने लेखणीची आराधना सुरू केली होती. १९८२ सालापासून तो ‘फ्रन्टियर’ या डाव्या विचारसरणीच्या नियतकालिकात तर्‍हतर्‍हेच्या विषयांवर निर्भीडपणे लेख लिहायला लागला होता. जिड्डू कृष्णमूर्तींसारख्या अनेकांना पूजनीय वाटणार्‍या, अॅनी बेझंटने कृष्णाचा अवतार ठरवलेल्या व्यक्तींवरसुद्धा टीका करत होता. त्याचे क्रिकेटवरचे लेख छान वठत होते. खेळाची खोलवर समज, जोडीनं समाजशास्त्राचा, इतिहासाचा अभ्यास अशा निरनिराळ्या अंगांनी विवेचन करत तो लेख खुलवत होता. मलाही लेखनाची आवड होती, इतिहासात रस होता. मीही एकेकाळी महाराष्ट्र राज्य पातळीवर उंच उडीचा विजेता, उच्चांकधारक होतो. साहजिकच मला हे लिखाण खास आवडलं.

रामने मोठ्या अभ्यासपूर्वक ऐतिहासिक व तत्कालीन कागदपत्रं वाचत, प्रत्यक्ष लोकांशी संवाद साधत, रुळलेल्या चाकोरीच्या बाहेर जाऊन चिपकोवर प्रबंध लिहिला. मी तो अतिशय काळजीपूर्ण वाचला. त्याचवेळी म्हणजे १९८३ साली रामने ‘इकॉनॉमिक अँड पोलिटिकल विकली’मध्ये ब्रिटिशकालीन व स्वातंत्र्योत्तर वनव्यवस्थेवर एक उत्कृष्ट निबंध प्रकाशित करून विद्वत्तापूर्ण, परंतु सुबोध व वाचनीय लिखाणावरचं आपलं प्रभुत्व दाखवून दिलं. मग प्रबंधाच्या आधारावर ‘अशांत वनराजी’ (Unquiet Woods) हे त्याचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं.

मानवाच्या नैसर्गिक संसाधनांच्या व्यवस्थापनाबद्दल माझ्याकडेही पुष्कळ चांगल्या कल्पना होत्या. मीही भारताच्या इतिहासावर वेगवेगळ्या बाजूनं भरपूर वाचत विचारमंथन केलं होतं. आधुनिक वनव्यवस्थापनावर जमिनीवरून वास्तवाचा अभ्यास केला होता. हे सगळं पुस्तकरूपानं लिहावं असं माझ्या मनात होतं, पण जमत नव्हतं. रामकडेही याच संदर्भातील भरपूर समज, माहितीचं पूरक भांडार होतं. शिवाय तो उत्तम लेखक होता. आम्ही दोघे एकत्र आलो, तर झकास काम करता येईल असं मला वाटलं. रामला ही कल्पना खूप आवडली. प्रबंध पुरा झाल्यावर तो खुशीनं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये व्यवस्थापनशास्त्र विभागात असिस्टंट प्रोफेसर म्हणून रूजू झाला. तसा रामचा आणि संस्थेचा ऋणानुबंध जुना होता. त्याच्या रसायनशास्त्रज्ञ वडिलांनी इथंच एम.एस्सी., पीएच.डी. या पदव्या मिळवल्या होत्या. त्याच्या आत्याचे पती के. व्यंकटरामनही ख्यातनाम रसायनशास्त्रज्ञ होते. ते पुण्याच्या राष्ट्रीय रसायनशास्त्र प्रयोगशाळेचे पहिले भारतीय संचालक म्हणून अनेक वर्षं कार्यरत होते. त्यांना तैलबुद्धी राम खूप आवडायचा. ते त्याला म्हणायचे, ‘तुला, मी माझा शेवटचा पीएच.डी. विद्यार्थी बनवेन.’ पण शाळेत रामचं व विज्ञानाच्या प्रयोगशाळेचं काही जुळलं नाही. मग तेव्हा ते म्हणाले की, ‘आता तू माझ्या मुलीकडे, धर्माकडे, अर्थशास्त्रात पीएच.डी. कर.’ धर्मा कुमार अर्थशास्त्राच्या इतिहासाची भारतातील अग्रगण्य अभ्यासक होती, पण रामचं अर्थशास्त्राशीही जमलं नाही. तो समाजशास्त्रज्ञ बनला!

रामने विद्यापीठातल्या विद्वानांच्या पठडीत एक अव्वल दर्जाचा पीएच.डी. प्रबंध लिहिला खरा, पण विद्यापीठांच्या ठराविक चाकोरीत काम करण्याची त्याची वृत्ती नव्हती, त्याच्या बुद्धीचा संचार चौफेर चालत होता. मुख्य म्हणजे तो एक सिद्धहस्त, प्रतिभाशाली लेखक होता. नवनव्या विषयांवर अभ्यासपूर्ण, पण तितकेच सुबोध व वाचनीय लेख लिहिण्याची त्याच्याकडे हातोटी होती. त्यामुळे चिपकोवरच्या प्रबंधापासून सुरुवात करून त्याने एकाहून एक उदबोधक, पण लोकप्रिय पुस्तकं लिहिली आहेत. आजमितीस त्याच्या नावावर १२ स्वतंत्र आणि ११ संपादित पुस्तकं आहेत. यातल्या ‘India after Gandhi’ या पुस्तकानं भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासावरच्या पुस्तकांमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. बारांतल्या दोनच पुस्तकांत त्याच्यासोबत कोणीतरी सहलेखक होता आणि तो मान मला मिळालेला आहे. ती पुस्तकं आहेत, ‘This Fissured Land’ व ‘Ecology and Equity’. भारतीय पर्यावरणाच्या इतिहासावरचं पंचवीस वर्षांपूर्वी आम्ही लिहिलेलं ‘This Fissured Land’ आजही भरपूर खपतं, अनेक अभ्यासक्रमांत पाठ्यपुस्तक म्हणून वापरलं जातं.

सुरुवातीला दोन वर्षं बेंगलूरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये, मग काही वर्षं दिल्ली विद्यापीठात आणि नेहरू स्मारक संग्रहालय व ग्रंथालयात रामने पूर्ण वेळ नोकरी केली. नंतर पूर्ण वेळ लेखनाला वाहून घेतलं. राम बेंगलुरुमध्ये राहतो. त्याची पत्नी सुजाताचा ‘रे आणि केशवन’ नावाचा पुस्तकं व इतर डिझाइनचा व्यवसाय आहे. त्यात सुजाता मग्न असताना रामने त्यांची दोन्ही मुले- केशव व इरावती यांना वाढवण्याचा भार उचलला होता.

४.

रामचं क्रिकेटच्या इतिहासावरचं मोठं रंजक, त्याच्या खास धाटणीप्रमाणे अभ्यासपूर्ण आणि या विषयावर वेगळाच प्रकाश टाकणारं पुस्तक आहे – ‘A Corner of a Foreign Field’. इंग्रजांचा हा खेळ भारतात रुजून जेव्हा भारतीय क्रीडापटू पुढे यायला लागले, तेव्हा त्यात अग्रगण्य होते नवानगरचा राजा रणजितसिंह आणि एका गरीब, दलित कुटुंबात जन्मलेला बाळू पालवणकर. पुण्याच्या युरोपीय जिमखान्याच्या मैदानात तीन रुपये महिना पगारावर साफ-सफाईवाल्याची नोकरी करता करता बाळू उत्कृष्ट फिरकी गोलंदाज बनला. मग त्या इंग्रज चमूच्या कप्तानाने प्रत्येक वेळी बाळूने त्याला बाद केले की, आठ आणे असा भत्ता देऊन स्वतःच्या सरावासाठी गोलंदाजी करण्याचं काम दिलं. बाळूची कीर्ती पसरल्यावर त्याला हिंदू जिमखान्याच्या चमूत खेळायला बोलावलं. त्याच्या कर्तबगारीवर सामने जिंकले जात असतानाही बाकीचे खेळाडू त्याला आपल्या पंक्तीत जेवू द्यायचे नाहीत, तेव्हा न्या. रानड्यांनी त्यांची निर्भर्त्सना केली आणि लोकमान्य टिळकांनी सनातन्यांच्या विरोधाला न जुमानता बाळूचा सत्कार केला. विजय मर्चंटसारख्या मुरब्बी क्रिकेटपटूने म्हटलं आहे, ‘भारतीयांना क्रिकेटच्या क्षेत्रात मान्यता मिळवून दिली, ती फलंदाज रणजी व गोलंदाज बाळूने.’ आज रणजी करंडक स्पर्धांच्या आणि इतर अनेक संदर्भात आपण रणजींची आठवण जागी ठेवली आहे, पण बाळू पालवणकरांना सपशेल विसरलो आहोत.

जात-धर्म-रंग-रूप-श्रीमंत-गरीब असे कोणतेही भेदभाव न मानणार्‍या, वंचितांबद्दल विशेष आपुलकी बाळगणाऱ्या रामने आपल्या पुस्तकात या कर्तबगार खेळाडूचा मनापासून गौरव केला आहे. त्यासाठी माहिती गोळा करायला, त्या वेळचा समाज, त्याची रचना, त्याच्या परंपरा समजावून घेण्यासाठी त्याने कितीतरी कष्ट घेतले. बाळूविषयीच्या केसरीत प्रसिद्ध झालेल्या झाडून सार्‍या बातम्यांचा त्याने मुद्दाम अनुवाद करून घेतल्या. नंतर त्याच्या परिवारातील कोणी ठाणे, डोंबिवली भागात राहतात, म्हणून शोध काढत काढत तो त्यांच्या घरी पोहोचला, त्यांच्याशी बोलला. मग एक दिवस मामा वरेरकरांनी बाळूच्या आयुष्यापासून स्फूर्ती घेऊन लिहिलेल्या ‘तुरुंगाच्या दारात’ नाटकाची प्रयत्नपूर्वक पैदा केलेली प्रत घेऊन माझ्या घरी उगवला. सवर्ण समाजानं जातिभेदाला बळी पडून स्वत:ला एका तुरुंगात डांबून घेतलं आणि भारतीय समाजाचं मोठं नुकसान केलं, असा त्या नाटकाचा आशय होता. राम म्हणाला, ‘अथपासून इतिपर्यंत वाच आणि मला या नाटकात काय आहे आणि तत्कालीन परिस्थिती काय होती ते नीट समजावून सांग.’

५.

समाजात पदोपदी चाललेल्या अन्यायांची, अत्याचारांची रामला जशी आहे, तशीच जाणीव असलेला व्हेरिएर एल्विन हा इंग्रज मानवशास्त्रज्ञ होता. त्याने एका गोंड महिलेशी विवाह केला होता. पंडित नेहरू त्याला मान देत. स्वातंत्र्यानंतर आदिवासींबाबतचं धोरण ठरण्यात त्याची भूमिका मोठी महत्त्वाची होती. या एल्विनचं रामने ‘Savaging the Civilized’ नावाचं, त्याच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे अनेक नवे पैलू पुढे आणणारे चरित्र लिहिलं. ते इतकं गाजलं की, त्यानंतर रामकडे अटल बिहारी वाजपेयी व सी.एन.आर.राव या दोन भारतरत्नांच्या चाहत्यांनी त्यांची चरित्रं लिहावी अशी आग्रहपूर्वक विनंती केली. ही तर अशा प्रभावी व्यक्तींचा निकटवर्ती बनण्याची सुवर्णसंधी होती, पण राम त्या मोहात पडला नाही. त्याने भारतरत्नांच्या पुढे जाऊन राष्ट्रपित्याला आपला पुढचा चरित्रनायक म्हणून निवडलं. महात्मा गांधींवर अफाट लेखन आहे, पण रामने महात्मा गांधी ज्या शाळेत शिकले, नंतर दक्षिण आफ्रिकेत जिथं जिथं राहिले, तिथं जातीनं जाऊन, नवी-नवी माहिती मिळवली आणि त्यांच्या चरित्रातले अनेक नवे पैलू पुढे आणले. ‘Gandhi before India’ म्हणून त्याचा पहिला खंड प्रसिद्ध झाला आहे. गांधींचं हे दोन खंडांतलं चरित्र स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाला अव्वल योगदान म्हणून प्रस्थापित होण्याच्या मार्गावर आहे.

गुहा यांच्या काही पुस्तकांची मुखपृष्ठं

पुस्तकांखेरीज राम अतिशय लोकप्रिय वृत्तपत्रीय स्तंभलेखक आहे. ‘हिंदू’, ‘हिंदुस्थान टाईम्स’, ‘स्टेट्‍समन’ अशा अनेक वृत्तपत्रांत त्याचे इंग्रजी लेख नेमानं छापले जातात. त्यांचे सर्व भारतीय भाषांत अनुवाद होतात. मराठीत ‘लोकमत’ दैनिकात व ‘साधना’ साप्ताहिकात ते नेहमी प्रकाशित होतात. आजच्या वैषम्यपूर्ण भारतीय समाजात सुशिक्षित, आर्थिक सुस्थितीत असलेल्या मध्यमवर्गातली आणि अजूनही दारिद्रयाने पीडित बहुजन समाजातली दरी आणखी- आणखीच रुंदावत आहे. त्यामुळे सामान्यतः सुशिक्षितांपर्यंत पोचणार्‍या लेखांत आज अधिकाधिक बळकट होत चाललेल्या विकृत विकासवादाबद्दलचं वास्तव अनुल्लेखानं मारलं जातं. याला रामचे लेख अपवाद असतात. गेले अनेक महिने गोव्यात जुलूम-जबरदस्तीचा थयथयाट चालू आहे. त्यात माझे तीन मित्र बळी पडले आहेत. बिस्मार्क डियासचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. हनुमंत परब खुनी हल्ल्यातून कसाबसा वाचला आहे आणि रवींद्र वेळिपला तर चक्क पोलीस कोठडीत डांबून ठार मारण्याचा प्रयत्न झाला आहे. हे ऐकल्यावर राम स्वखर्चानं गोव्याला गेला, मग त्यानं ‘हिंदुस्थान टाइम्स’मध्ये खास लेख लिहून या वास्तवाला निर्भीडपणे वाचा फोडली. त्या लेखाचं शेवटचं वाक्य आहे – ‘देशी-विदेशी पर्यटकांना माहीत असो वा नसो, कदर असो वा नसो; पण प्रत्यक्ष अनुभवणार्‍या गोवेकरांना पक्कं ठाऊक आहे की, आज गोव्यात एक किळसवाणी झोटिंगशाही मातली आहे.’

६.

मी रामचा जवळचा मित्र आहे. मला वाटतं की त्याचं व्यक्तिचित्र त्याला नव्यानं भेटलेल्या, पण त्याला जवळून पाहिलेल्या कोणी तरी रेखाटावं. स्वत:ला सामाजिक कामात वाहून घेतलेला सुबोध कुलकर्णी गोव्याच्या सफरीत रामबरोबर पूर्ण वेळ फिरला होता. माझ्या विनंतीवरून त्याने लिहिलं आहे – ‘एप्रिल २०१६ मध्ये गोव्यात दोन दिवस राम गुहा यांच्या सहवासात होतो. आम्ही जिथं जिथं भेटी दिल्या (मग ते फादर बिस्मार्कचं घर असो वा रवींद्र वेळिपचं कावरे गाव), तिथं तिथं प्रत्येक क्षणी ते अत्यंत जागरूकपणे बारीक निरीक्षण करत जास्तीत जास्त नेमकी माहिती घेत होते. अवांतर बोलणं टाळत होते. मोबाईलचा वापर नाही, फोटो काढणं नाही, वहीत काही टिपणं नाहीत. या गोष्टी वेगळ्या वाटल्या. सद्यःपरिस्थितीचं आकलन सर्व काळांचे संदर्भ लावून ते करतात. चौफेर वाचन व जगभरातील प्रवासाचे अनुभव जोडून घेत संवाद साधतात. प्रत्यक्ष माणसांशी बोलणं व नीट ऐकणं ही त्यांची पद्धत मला महत्त्वाची वाटली. कोणत्याही व्यक्ती, पक्ष किंवा संस्था यावर शेरेबाजी/आरोप न करता त्या सर्व घटनेमागील कारणमीमांसा समजून घेणं व प्रवृत्तींचा शोध घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. दिवंगत बिस्मार्कचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व त्यांनी घरातील सदस्यांना बोलतं करून हळुवारपणे उलगडलं. खरं तर अत्यंत दु:खद वातावरण तिथं होतं. तरीही त्याचं बालपण, तारुण्य, फादर होणं, संगीताचं अंग, पर्यावरणाचे प्रेम, संघर्ष हे सर्व टप्पे आई, बहीण व भाऊ यांच्यासोबत आम्ही थोड्या वेळेत अनुभवले. शोध घेण्याच्या प्रामाणिक भावनेनं संवाद झाल्यानं सर्व लोक सहजपणे व्यक्त झाले. रवींद्र व त्याच्या सर्व साथीदारांशी खूप आत्मीयतेनं ते बोलले. त्यामुळे त्या सर्वांना कठीण प्रसंगात मानसिक बळ मिळालं. लढ्याबद्दल त्यांनी अतिशय आदर व कौतुक व्यक्त केलं. सर्वांत अधिक भावते, ती त्यांच्या मनाची निर्मळता व त्यांचा साधेपणा.’

गुहा आणि गाडगीळ यांनी संयुक्तपणे लिहिलेली पुस्तकं

अगदी तरुण वयापासून रामने स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर प्रचंड मान-मान्यता कमावली आहे. आज लाखो वाचक त्याचं वृत्तपत्रीय लिखाण उत्सुकतेनं नियमितपणे वाचतात. राम उत्कृष्ट वक्ता म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्याच्या भाषणांना प्रचंड गर्दी लोटते. त्याच्या विद्वत्तापूर्ण, पण वाचनीय पुस्तकांना खूप मागणी आहे. ‘न्यू यॅार्क टाइम्स’ त्याचं भारतातील ललितेतर लेखन करणार्‍यांचा अग्रणी म्हणून कौतुक करतं, येलसारखं जगन्मान्य विद्यापीठ त्याला सन्मान्य पदव्या देतं, आपले राष्ट्राध्यक्ष पद्मभूषण किताब देतात. माझ्या सुदैवानं माझा अनेक कर्तबगार व्यक्तींशी चांगला परिचय आहे. त्यांत नोबेल पारितोषिक विजेते, पद्मविभूषण, भारतरत्नही आहेत, पण राम या सगळ्यांहून वेगळा आहे. मला तेवीस वर्षांचा असताना भेटला होता, तसाच आजही निरागस आहे. “मन शुद्ध तुझं, गोष्ट हाये, पृथिवी मोलाची, पृथिवी मोलाची, पृथिवी मोलाची| तू चाल पुढं तुजला गड्या भीति कशाची, परवा बि कुणाची!” या वृत्तीनं त्याची वाटचाल चालू आहे. आणि म्हणूनच तो इतकं अर्थपूर्ण, इतकं प्रभावी लेखन करतो आहे.

  

दोन जिवलग मित्र - गाडगीळ आणि गुहा

लेखक ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ आहेत.

madhav.gadgil@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख