समीक्षक आणि प्रेक्षक : निमित्त ‘बाहुबली-२’
कला-संस्कृती - चलत्-चित्र
महेंद्र तेरेदेसाई
  • चित्र - Robert Neubecker यांचं. सौजन्य - www.marketwatch.com
  • Sat , 08 July 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti चलत-चित्र बाहुबली शोले कोर्ट सैराट चित्रपट समीक्षक महेंद्र तेरेदेसाई Mahendra Teredesai

कुसुमाग्रजांची कविता आहे, ‘महापुरुष मरतात तेव्हा जागोजागचे संगमरवरी दगड जागे होतात...’ त्याच छंदात म्हणायचं तर ‘महासिनेमा प्रदर्शित होतो, तेव्हा जागोजागचे समीक्षक जागे होतात.’ यात फक्त छंद अभिप्रेत आहे, तुलना नव्हे.

‘बाहुबली-२’ रिलीज झाला आणि तमाम समीक्षकांनी त्यावर कोरडे ओढायला सुरुवात केली. वृत्तपत्रीय व चॅनलच्या समीक्षेला आता सोशल मीडियावरच्या समीक्षेची जोड मिळाली आहे, पण बाराशे कोटींच्या गल्ल्याने त्या तमाम समीक्षकांचं काम तमाम केलं. खान, कपूर आणि कुमारांचे दोनशे नि चारशे कोटीचे क्लब टपऱ्या वाटू लागल्या आहेत. पहिला भाग रिलिज झाला तेव्हाही हेच झालं होतं.

असं का होतं? प्रेक्षक आणि समीक्षक यांची मतं कधीच का जुळत नाहीत?

असं म्हणतात की, तुम्हाला तुमच्या लायकीचं सरकार मिळतं. ज्याला नंतर मात्र आपण नावं ठेवतो. समीक्षक आणि प्रेक्षक यांचं नातं काहीसं असंच आहे का? समीक्षकांनी वाईट म्हटलंय म्हणजे तो सिनेमा चांगला असणार आणि चांगला म्हटलंय म्हणजे तो बोअरिंग असणार, ही प्रेक्षकांची मतं सर्रास ऐकायला मिळतात. एखाद्या सिनेमाच्या जाहिरातीत जर "Critically Acclaimed' असं लिहिलं असेल तर खुशाल समजावं की, बॉक्स ऑफिसवर सिनेमाची अवस्था क्रिटिकल असणार. तुफान चाललेल्या चित्रपटाच्या जाहिरातीतही समीक्षणातील चमकदार ओळी दिसतात. पण त्या नीट वाचल्यात (आणि त्या चित्रपटाची समीक्षाही तुम्ही वाचली असेल) तर तुमच्या लक्षात येईल की, त्या चित्रपटावर लिहिलेली समीक्षणातील चांगली ओळच छापलेली असते. बाकी समीक्षणात त्या चित्रपटाला झोडपलेलं असतं. समीक्षकांचा जर प्रेक्षकांवर प्रभावच पडत नसेल, तर त्यांचं म्हणणं हे जाहिरातीत छापतातच का? इथं निर्माता आपला धंदा बघतो. त्याला त्याच्या जाहिरातीसाठी ही आयती कॉपी मिळालेली असते. त्यात हल्ली स्टार देण्याची पद्धत सुरू झाली आहे. काही परफेक्शनिस्ट समीक्षक डेसिमलमध्ये स्टार देतात. म्हणजे अडीच, पावणे-तीन वगैरे. (मग जाहिरातीत फक्त स्टार छापतात. म्हणजे नरो वा कुंजरोवा) जर प्रेक्षकांना पूर्ण समीक्षा वाचायला वेळ नसेल तर नुसते स्टार पाहून सिनेमाला जायचं की नाही, हे ठरवणं त्यांना सोयीचं जावं म्हणून समीक्षकांनी निर्माण केलेली ही स्टार सिस्टीम. पण प्रेक्षक आपली समीक्षा वाचून (किंवा स्टार बघून) सिनेमाला जातात, हा अनेक समीक्षकांचा गैरसमज असतो. (काही समीक्षक तर दुसऱ्यांची समीक्षा वाचून सिनेमा पाहायचा की नाही हे ठरवतात.) समीक्षकांमुळे एखादा सिनेमा चाललाय असं उदाहरण खचितच सापडेल. एकवेळ माऊथ-पब्लिसिटीनं सिनेमा हळूहळू गर्दी खेचू शकतो.

याचं सगळ्यात गाजलेलं उदाहरण आहे, आज अभिजात (यावर अजूनही अनेकांचे आक्षेप आहेत म्हणा) आणि मैलाचा दगड म्हणून मानला गेलेला १९७५ साली प्रदर्शित झालेला ‘शोले’! ‘शोले’ लागला तेव्हा बऱ्याच समीक्षकांनी त्याला मोडीत काढला होता. ‘इंडिरा टुडे’त म्हटलं होतं की, ‘शोले’ हा एक फसलेला प्रयत्न आहे. पुढे त्याचा उल्लेख त्यांनी ‘शोले’ नव्हे हा तर ‘विझलेला निखारा’ असाही केला होता. ‘फिल्मफेअर’ने म्हटलं होतं की, ‘फ्युजनच्या नादात ना धड तो वेस्टर्नपट झाला, ना भारतीय.’ काहींनी तर त्याची तुलना ७१ साली आलेल्या ‘मेरा गाव मेरा देश’ या चित्रपटाशी करत म्हटलं की, त्या डाकूपटाची शोले ही भ्रष्ट नक्कल आहे. ‘शोले’चा पहिला आठवडा तिकिटबारीवर एकदम थंडा गेला. आणि जसजसे त्याचे संवाद बाहेर ऐकू येऊ लागले, तशी गर्दी वाढत गेली. ही त्याची माउथ-पब्लिसिटी होती. पुढे त्यानं इतिहास रचला. तोच ‘शोले’ आज अनेक ठिकाणच्या सिनेमा अ‍ॅकेडमीमध्ये शिकवला जातोय. हेच काहीसं गुरुदत्तच्या ‘कागज के फूल’, राज कपूरच्या ‘मेरा नाम जोकर’चं झालं. हे सिनेमे काळाच्या पुढे होते म्हणे, पण त्या काळातल्या समीक्षकांच्याही ते पुढे होते का, हा शोध रंजक ठरेल.

सत्यजित रे, चिदानंद दासगुप्ता, विक्रम सिंग ही भारतातील सिने-समीक्षणातली काही उत्तम नावं. दुर्दैवानं या तोडीचं मराठी नाव नाही. ‘लिस्ट ऑफ इंडियन क्रिटिक’ या विकिपीडियाच्या पानावर अशोक राणे हे एकमेव मराठी नाव दिसलं. (अर्थात विकिपीडिया किंवा गुगल हे काही अचूक माहितीचे मापदंड नाहीत, पण त्यांचं महत्त्व नाकारताही येत नाही.) आज तर इतर भाषेतही (मी वाचतो ती हिंदी वा इंग्रजी) समीक्षेत या तोडीची नावं नाहीत. (अनुपमा चोप्रा, राजीव मसंद हीदेखील सेलिब्रिटी समीक्षक म्हणूनच पाहिली जावीत अशीच आहेत.) आपण सध्या मराठीपुरताच विचार करूया. (अर्थात नावं न घेता कारण एखाद्याचं नाव घ्यायचं राहिलं तर त्याचे गोड गैरसमज व्हायचे.)

तर मराठी सिने-समीक्षणाची ही दुर्दशा का व्हावी? याला बऱ्याच प्रमाणात त्या-त्यावेळचे वृतपत्र संपादक जबाबदार आहेत. चित्रपट या माध्यमालाच हीन लेखायचं. वस्तुतः याच संपादकांच्या विचार-विश्वात जग, समाज आणि त्यावर प्रभाव गाजवणाऱ्या गोष्टींना प्राधान्यक्रम असतो, पण पहिल्या वा दुसऱ्या महायुद्धात किंवा अगदी अलीकडच्या व्हिएतनाम युद्धात सिनेमा या माध्यमाने बजावलेली कामगिरी आणि त्यामुळे या माध्यमाचं महत्त्व त्यांच्या लक्षात कसं नाही आलं कोण जाणे? की येत असेलही पण त्याचा इथल्या व्यावसायिक वा इतर सिनेमांशी काय संबंध, असं त्यांना वाटत असावं का? युद्ध काळात सरकारनियंत्रित सिनेमाचा वापर जनतेमध्ये राष्ट्रप्रेम जागवण्यासाठी केला जायचा, हे वास्तव या माध्यमाची ताकद अधोरेखित करणारं आहे. सिनेमाच्या समाजमनावर असलेल्या प्रभावाची इतर अनेक उदाहरणं देता येतील. तरीही आपल्याकडे मात्र उच्चभ्रू समाजात सिनेमाकडे गौणतेनेच पाहिलं जायचं आणि आजही परिस्थिती फार बदललेली नाही. संगीत, चित्रकला, शास्त्रीय नृत्य वा गायन या कलांकडे ज्या सन्मानानं बघितलं जातं, तसं सिनेमा वा सिने-संगीताकडे अजूनही फार सिरिअसली पाहिलं जात नाही. खरं तर सिनेमा ही कला या सगळ्याचा विज्ञानाच्या साह्याने केलेला मिलाफ आहे.

वृत्तपत्रात सिने-समीक्षण कोण करणार, हा प्रश्न चुटकीसरशी सोडवायचा तर ज्या वार्ताहराला सिनेमा पाहायला आवडतो, त्याच्यावर सिने-समीक्षणाची जबाबदारी टाकली जायची (किंवा अजूनही टाकली जाते. परदेशी सिनेमासाठी मात्र समीक्षक अनेकदा ‘आयात’ करतात). आणि तो वार्ताहरही आपल्याला फुकट सिनेमा पाहायला मिळतोय म्हणून हे काम आनंदानं स्वीकारतो. आणि त्याला जेवढा आणि जसा सिनेमा कळला असेल, तशी तो त्याची समीक्षा(?) करतो. मग त्यात, ही अशी काही वाक्यं वाचायला मिळतात… ‘कॅमेरामनने कॅमेरा छान फिरवलाय’, ‘एडिटरने कात्री चांगली चालवली आहे.’ इत्यादी. आज सिनेमा डिजिटल झाला तरी समीक्षणातल्या एडिटरची कात्री मात्र तशीच राहिली आहे.

मराठी सिनेमा हा अशा समीक्षकांचा सॉफ्ट टार्गेट असतो. एक तर तो कळायला सोप्पा असतो आणि हल्ली जसं जनमानस त्याविषयी जरा बरं आहे तसं ते पूर्वी नव्हतं. जसं गेलेल्या माणसाबद्दल चांगलं बोलणं सोप्प असतं, तसं वाईट सिनेमाबद्दलही वाईट लिहिणं सोप्प असतं, पण सिनेमा जर चांगला असेल तर तो कसा चांगला आहे, हे सांगताना समीक्षकांचा खरा कस लागतो. तिथं या माध्यमाची ताकद काय? सौंदर्य काय? हे सगळं माहीत असणं गरजेचं असतं, ज्याला आपण रसग्रहण म्हणतो.

मराठीतल्या किती समीक्षकांनी फिल्म अ‍ॅप्रिसिएशनचा (चित्रपट रसग्रहण) कोर्स केला आहे? किती जणांना वर्ल्ड सिनेमा माहीत आहे. बरं माहीत जरी असला तरी त्याचं मर्म कितींना आकळतं? किती समीक्षक फिल्म सोसायटीचे सदस्य आहेत? त्यातले किती आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला हजेरी लावतात. यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (YIFF), मामी, एशियन हे मुंबईतले मोठे चित्रपट महोत्सव. इथे यांची हजेरी नगण्य असते. मराठी चित्रपट कलावंतही इथं येताना व चित्रपट पाहताना दिसत नाहीत. जर त्यांचा चित्रपट या महोत्सवात दाखवला जाणार असेल तरच आणि फक्त त्या चित्रपटापुरतंच त्यांचं दर्शन होतं. (आश्चर्य म्हणजे यात सिनेमालेखक आणि दिग्दर्शकही आले). या माध्यमात आपण जे करतो ते आणि तेवढच महत्त्वाचं असतं, असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतो. अज्ञानात असलेल्या सुखी माणसाचा सदरा (किंवा जॅकेट) घालूनच हे वावरत असतात. अशांना मग वर्ल्ड सिनेमाची नुसती तोंडओळख असलेला एखादा समीक्षक भापवतो व त्यांच्या पुढच्या चित्रपटाच्या पटकथेचं वा संवाद लिहिण्याचं कंत्राट पदरात पाडून घेतो. ते निर्मातेही मीडियाचा एक माणूस आयता हाताशी मिळतोय म्हणून त्याला जवळ करतात. नाहीतरी अशा निर्मात्या-दिग्दर्शकांना पटकथा व संवादाचं महत्त्व फार माहीतच नसतं. (‘मसान’ या चित्रपटाचा लेखक वरुण ग्रोव्हर म्हणतो की, अशांच्या लेखी पटकथा आणि संवादाचं महत्त्व सँडविचवरील शेवेइतकच असतं. म्हणजे ती शेव असो वा नसो सँडविचला त्याचा काही फरक पडत नाही.) तर, अशी कामं मिळवणारे समीक्षक चाणाक्ष असतात.

साधारणतः तीन प्रकारचे समीक्षक असतात- १. चांगले (जे मराठीत तुरळक आहेत), २. प्रवाहपतित (यांचा स्तर सामान्य प्रेक्षकांच्या थोडा वर आणि सुजाण प्रेक्षकांच्या खूप खाली असतो.) आणि ३. चाणाक्ष (ज्यांची संख्या वाढती आहे).

चांगला समीक्षक तो असतो जो चांगला सिनेमा का? आणि कसा चांगला आहे, हे नेमकं सांगू शकतो. ज्याला शब्द मर्यादेचा अडसर होत नाही. उलट तो आपली समीक्षा गोळीबाज आणि धारदार करतो. सगळी गोष्ट सांगण्याच्या फंदात तो पडत नाही. माध्यमाची भाषा, ताकद आणि त्याचं सौंदर्य त्या सिनेमातलं उदाहरण देऊन तो पटवू शकतो. चांगल्या सिनेमाची समीक्षा ही एखाद्या चांगल्या प्रोमोसारखी असावी. जी वाचून तो चित्रपट पाहायला रसिकाला उद्युक्त करेल. ‘कोर्ट’ आणि ‘सैराट’ या दोन उत्तम सिनेमांची चांगली समीक्षा मराठीत कुठेच वाचनात नाही आली. ‘कोर्ट’ चालला नाही (अनेकांनी त्याची खिल्लीच उडवली) तर ‘सैराट’ला चांगल्या समीक्षेची गरजच भासली नाही. त्यासाठी एक ‘झिंगाट’च पुरलं. ‘सैराट’वरही एका तिकिटात दोन सिनेमे अशी टीका केली गेली. जी काही अंशी खरीही आहे. ‘सैराट’ला सर्वोकृष्ट पटकथा लाभलीय असं कोणीच म्हणणार नाही. पण त्याच्या पहिल्या भागातील सौंदर्य आणि संदिग्धता, नेमकी पकडलेली प्रेमातली निरागसता आणि दुसऱ्या भागातलं जगण्यातलं वास्तव आणि चटका लावणारा तो मेलोड्रामॅटिक शेवट, याबद्दल सविस्तर कोणी लिहिलेलं वाचनात नाही आलं. (कळवल्यास वाचायला आवडेल.)

दुसरा प्रकार प्रवाह-पतित समीक्षक. तो बिच्चारा सकाळी उठून कांदिवली/डोंबिवलीवरून निघून आपल्या ऑफिसला पोहोचतो. डेस्कची काही कामं पाहतो. आपल्या वार्ताहर मित्रांसमोर आदल्या रात्री पाहिलेल्या टुकार सिनेमाची आणि त्याच्या दिग्दर्शकाची खिल्ली उडवतो. सोबत आणलेल्या पब्लिसिटी मटेरिअलमधून सिनेमाची गोष्ट लिहून काढतो व मग त्यावर आधी उल्लेख केलेल्या नेहमीच्या वाक्यांचा तडका मारतो. (म्हणजे ‘कॅमेरा फिरवलाय.... कात्री चालवलीय...’ वगैरे) पण जर सिनेमात भावे, कुलकर्णी, कुंडलकर, सुखठणकर अशी नावं असतील तर तो जरा बिचकूनच लिहायला बसतो. ‘वेगळा’, ‘संयमित’, ‘वास्तविक’, ‘खोलवर’ अशा शब्दांची पेरणी आपल्या समीक्षणात करून ती सजवण्याचा प्रयत्न करतो. ही समीक्षा उरकली की, संध्याकाळी पुन्हा प्रेस-शोला जायला निघतो.

तिसरा आणि सगळ्यात धोकादायक प्रकार म्हणजे ‘चाणाक्ष समीक्षक’. हे ओळखायला तुम्हीही चाणाक्ष असावे लागता, नाही तर ते तुम्हाला चांगलेच वाटतात. हे शक्यतोवर वृत्तपत्रात लिहीत नाहीत (त्यांच्या मते रतीब टाकत नाहीत.). ते वेब मॅग्झिन, ब्लॉग, फिल्मी साईटवर लिहितात. वृत्तपत्रात लिहिलंच तर एकंदर सिनेमा या माध्यमावर किंवा ऑस्कर, कान्स, त्यातले सिनेमे, मराठी सिनेमाची सद्यस्थिती वगैरे असल्या विषयांवर एक सिने-अभ्यासक म्हणून लिहितात. ही मंडळी फिल्म सोसायटी, चित्रपट महोत्सवात आवर्जून व हिरिरीनं भाग घेताना दिसतात. वर्ल्ड सिनेमातली नावं यांना तोंड-पाठ असतात. सिनेमाचा इतिहास, त्यातले प्रवाह त्यांना माहीत असतात. यांच्या घरच्या दर्शनी भिंती पुस्तकांच्या असतात. ते बघायला तुम्ही त्यांच्या घरी जायची गरज नसते. त्याचे पिक्स सोशल-मीडियावर तुम्हाला हुशारीने दाखवले जातात. आता इतकं सगळं चांगलं असल्यावर तो समीक्षक चांगलाच असणार अशी तुमची खात्री पटणार ना? पण मग जर तुम्ही त्यांची समीक्षा वाचाल तर तुमच्या लक्षात येईल की, हे सर्व केकवरचं ड्रेसिंग आहे. आत केक हाफ-रोस्टेडच आहे. खोटं वाटत असेल तर वर लक्षणं दिलीत त्याला योग्य अशा समीक्षकांची समीक्षा त्यांच्या ब्लॉगवर जाऊन वाचा. सलग चार-पाच एकदम वाचा मग तुमच्या लक्षात येईल की, बरेचदा ग्रेव्ही तीच असते, फक्त भाज्या बदलतात. म्हणजे तीच विशेषणं वेगवेगळ्या रूपात तुमच्या समोर येतात. त्यात तुम्ही न पाहिलेल्या एखाद्या वर्ल्ड सिनेमातलं उदाहरण असलंच पाहिजे. जगातल्या नेमक्या कुठल्या प्रवाहातला हा सिनेमा आहे हे ते सांगतात. म्हणजे Neo realism, film Noir, classical, Cinema Novo वगैरे वगैरे... आता हे प्रकार तुम्हाला ठाऊक असतील तर तुम्ही यांची समीक्षा वाचण्याचा फंदात का पडाल? आणि माहीत नसतील तर तो सिनेमा कळून घ्यायला तुम्हाला याचा काय उपयोग? यातील बऱ्याच समीक्षकांचा कल सृजन-लेखक होण्याकडे असतो. असं का? असं विचाराल तर ते उदाहरणादाखल ‘फ्रेंच न्यू व्हेव’ आणि ‘Cahiers du cinema’चा इतिहास सांगतील. ‘क्रिटिक्स टर्न्ड क्रिएटिव्ह’ ही थिअरी सांगतील. मग हीच मंडळी मराठीतील मोठ्या निर्मात्यांच्या चित्रपटांवर टीका करण्याची वेळ आली तर बेमालूमपणे आपला हात आखडता घेऊन त्यांच्या गुड-बुक्समध्ये राहण्याचा प्रयत्न करतात. न जाणो यांनी आपल्याला एखादी फिल्म ऑफर केली तर? आणि हे सगळं ते चाणाक्षपणे करतात.

‘बाहुबली-२’ प्रदर्शित झाला आणि जागोजागचे हे तिन्ही प्रकार जागे झाले. अभिजित देशपांडे यांनी त्याच्या कथानकावर फोकस ठेवून ‘अक्षरनामा’मध्ये लिहिलेल्या छोटेखानी समीक्षेत सिनेमाचा बाज, त्याचे प्रयोजन आणि त्याचा आविष्कार याविषयी खूप छान लिहिलं आहे. ती समीक्षा वाचून तुम्हाला तो चित्रपट पाहावा की, न पाहावा हे निश्चित ठरवता येतं. त्यात ते तंत्राच्या (VFX) वगैरे भानगडीत पडलेले नाहीत. पहिला भाग पाहिल्यावर तंत्राचा एक किमान दर्जा अपेक्षितच होता. त्यामुळे त्यावर लिहून जागा फुकट घालवण्यात काहीच पॉइंट नव्हता. मर्यादित शब्दांत केलेली ती एक उत्तम समीक्षा होती, असं माझं मत आहे. बाकीच्यांनी त्याच्या ‘घिशापिट्या’ गोष्टीवर, दाक्षिणात्य मेलो-ड्रामावर टीका करून आपल्या समीक्षा उरकल्या. काहींनी हॉलीवुडपटाशी त्याची तुलना केली (हॅरी पॉटर, लायन-किंग... वगैरे) पण अनेकांच्या तावडीत एक गोष्ट सापडली, ती म्हणजे बाहुबलीचं तंत्र (VFX). ते फारच बालिश आणि अतिरंजित आहे अशी टीका अनेकांनी केली, पण म्हणजे नेमकं काय? आणि चित्रपटच जर बालबुद्धीच्या प्रेक्षकासाठी बनवला असेल तर असं होणं अभिप्रेतच होतं, पण हे करताना त्याची गरज, कल्पनाशक्ती, सौंदर्य, नाट्य आणि त्याची सत्यता पटणे (Make-believe) यावर खरं तर त्याचा दर्जा ठरतो. म्हणून चांगलं VFX म्हणजे काय हे माहीत नसताना केलेली ती टीका वाटली. जसा निव्वळ भारतीयांनी (माकुता इफेक्ट्स, हैदराबाद) केला म्हणून त्याच्या VFX चा दर्जा कमी होत नाही, तसंच हॉलीवुडला (सोनी स्कोर स्टेज) रेकॉर्ड केली म्हणून ‘सैराट’ची सिंफनी थोर ठरत नाही. ज्यावर आपण टीका करतो त्याचे खोलवर ज्ञान असणं गरजेचं असतं ही माफक जाण अशा समीक्षकांत दिसत नाही.

खरं तर ‘बाहुबली’च्या यशात सगळ्यात मोठा वाटा त्याच्या जाहिरातीपेक्षा त्याच्या मार्केटिंग आणि वितरणाचा आहे. हा चित्रपट (बाहुबली-२) हिट होणार हे तो लागण्याच्या आधीच ठरलेलं होतं. फक्त किती कोटी तेवढं ठरायचं बाकी होतं. हे कशामुळे? त्याचं कारण ‘डिकोड’ करण्याचा कोणी प्रयत्न नाही केला. पहिल्या भागानंतर ‘कटप्पाने बाहुबलीको क्यों मारा?’ या एका कुतूहलानं तमाम सिने-प्रेक्षकांना त्यांनी जागृत तर ठेवलंच, पण त्याच वेळेस वितरणात त्यांनी वेगळी क्लृप्ती वापरली. जी याआधी कुठल्याही खान वा कपुरांना (कदाचित अतिलोभापारी) सुचली नव्हती. या सगळ्या हिंदी चित्रपटांना प्रत्येकी फक्त एकच वितरक होता, तर ‘बाहुबली’चे मात्र पाच वितरक होते. (दक्षिणेत दोन, उत्तरेत दोन व मुंबईसह महाराष्ट्रमध्ये एक) या पाच वेगवेगळ्या वितरकांना त्यांच्या इथलं धंद्याचं गणित व्यवस्थित ठाऊक होतं. त्यामुळे त्या प्रत्येकाला जास्तीत जास्त नफा मिळवता आला. इथं नफा सगळ्यांनी वाटून खावा हा विचार होता. त्यात प्रत्येकाचा टक्का कमी झाला असेल, पण रक्कम मात्र दुपटीनं वाढली. चांगल्या समीक्षकाला अशा गणिताचा अंदाज असणं गरजेचं असतं, कारण ‘सिनेमा’ कुठला आणि ‘प्रॉडक्ट’ कुठलं याचं भान त्याला येईल व मग त्याची समीक्षाही तो त्या प्रकारे करेल. सिनेमा आणि प्रॉडक्ट याचं उत्तम मिश्रण ‘सैराट’मध्ये होतं. मंजुळे यांनी तो ‘सिनेमा’ म्हणून केला, ‘झी’ने त्याचं प्रॉडक्ट करून ते चलाखीनं विकलं. कसं? तो स्वतंत्र आणि वेगळ्या लेखाचा विषय होऊ शकतो.

इंग्रजीत रिव्ह्यू आणि क्रिटिक अशा दोन वेगळ्या संकल्पना आहेत. मराठीतली चित्रपट समीक्षा ही रिव्ह्यू या संकल्पनेच्या जवळ जाते. कुठल्याही सिनेमाचं वर वर वर्णन करणं आणि स्टार देऊन मोकळं होणं. त्यातून हल्ली ‘पेड प्रीव्हियू’सारखे ‘पेड रिव्ह्यू’ आल्यामुळे ज्या वाचकांना सिनेमाची बातमी आणि समीक्षेतला फरक कळत नाही, ते आणखी गोंधळतात.

अनेकदा या समीक्षकांपेक्षा सामान्य (सुजाण) प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आणि पृथक्करण (Comment and Analysis) मला जास्त खोल आणि अभ्यासू वाटतं. हे का व्हावं? याचा विचार करता, सिनेमा समजून घेताना त्या सुजाण प्रेक्षकांचं असलेलं जगण्याचं भान हे त्यांच्या माध्यमाबद्दलच्या ज्ञान वा अज्ञानाआड येत नाही आणि त्या भानासकट ते त्या कलाकृतीला थेटपणे भिडू शकतात. काही वेळेला माध्यमातील अतिज्ञानामुळे बरेच अतिरेकही होत असतात. ज्याला इंग्रजीत ‘Reading too much between the lines’ असं म्हणतात. त्यामुळे काही सिने-पंडित चित्रपट रसग्रहणाच्या ऐवजी त्याचं पोस्टमार्टम करताहेत असं वाटतं.

एखाद्या कलाकृतीतील गुण-दोष, सौंदर्य-सौष्ठव रसिकांसाठी डिकोड करणे हे एखाद्या चांगल्या समीक्षकाचं काम असतं. ज्योयोगे तो रसिक नंतर इतर अनेक कलाकृती स्वतःच डिकोड करू शकेल.

कलकत्यातील एका नामवंत कलाकाराने म्हटलं होतं, “तुम्ही तुमचे पु. ल. देशपांडे आम्हाला द्या, आम्ही आमचे अनेक कुमार गंधर्व आणि वसंतराव देशपांडे तुम्हाला देऊ.” ही मागणी समीक्षकाचं महत्त्व अधोरेखित करणारी आहे, पण पुलं निव्वळ साहित्यिक, नाटककार आणि नकलाकार म्हणूनच महाराष्ट्राचे लाडके व्हावेत?

(‘शब्द रूची’ या मासिकाच्या जून २०१७च्या अंकातून लेखकाच्या पूर्वपरवानगीने पुनर्मुद्रित)

लेखक चित्रपट व नाट्यदिग्दर्शक आणि लेखक आहेत.

mahendrateredesai@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......