‘मॅन टायगर’ : माणसातल्या हिंस्र श्वापदाची शोकात्म कहाणी
ग्रंथनामा - दखलपात्र\इंग्रजी पुस्तक
नितिन जरंडीकर
  • ‘मॅन टायगर’ कादंबरीचं मुखपृष्ठ आणि वाघ
  • Fri , 30 June 2017
  • ग्रंथनामा इंग्रजी पुस्तक मॅन टायगर Man Tiger येका कुर्नियावन Eka Kurniawan नितिन जरंडीकर Nitin Jarandikar

हिंसा आणि क्रौर्य या मानवी मनाच्या आदिम जाणीवा आहेत. सुसंस्कृतपणाच्या बुरख्याआडून या जाणीवा दमन करण्याचा मानवी मनाचा सातत्यानं प्रयत्न सुरू असतो. पण येनकेन प्रकारे त्याच्यातल्या या जाणीवा उफाळून येत राहतात. आणि समाजही वेळोवेळी श्रद्धा आणि कर्मकांडाचे खतपाणी घालून या जाणीवा धुगधुगत ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. या साऱ्या विचार प्रक्रियेचा अत्यंत सूक्ष्म आणि तरल पातळीवरील वेध येका कुर्नियावन या इंडोनेशियन लेखकाच्या ‘मॅन टायगर’ या कादंबरीत पाहायला मिळतो.

इंडोनेशियातील एका निनावी गावातील कोमर बिन सुएब आणि अन्वर सादत या दोन कुटुंबातील शोकांतिकेची सस्पेन्स-थ्रिलरच्या अंगानं जाणारी ही कादंबरी आहे. कोमरचा वीस वर्षांचा मुलगा मार्गीयो हा या कादंबरीचा नायक. कोमर आणि सादत हे अदमासे पन्नास वर्षांचे. अन्वर सादत हा एक अपयशी चित्रकार आणि मूर्तीकार. पण एका श्रीमंत मुलीशी लग्न झाल्यानं सुखासीन आणि छंदीफंदी आयुष्य व्यतित करणारा, तर कोमर हा व्यवसायानं नाभिक आणि कमालीचा दरिद्री. दोघंही आपल्या वेगवेगळ्या अवकाशात वावरणारे.

कादंबरीची सुरुवात होते तीच मुळी कोमरचा मुलगा मार्गीयो याने अन्वर सादतचा खून केला आहे, या धक्कादायक घटनेनं. निवेदकानं अशा प्रकारे कादंबरीच्या पहिल्याच वाक्यात घटना काय घडली आहे आणि कुणी घडवून आणली आहे याचा खुलासा केला आहे. आणि उरलेल्या सबंध कादंबरीभर मार्गीयोच्या या कृत्यामागचा हेतू शोधण्याचा प्रयत्न केला आहे. हळूहळू एक-एक तपशील उलगडत जातात. अन्वर सादतची बायको, त्याच्या तीन मुली आणि कोमरची बायको, त्याच्या दोन मुली आणि अर्थातच मार्गीयो या ठळक पात्रांबद्दल, त्यांच्या आयुष्यातील ताण- तणावाबद्दल निवेदक कथन करू लागतो.

अन्वर सादतचे आणि त्याच्या पत्नीचे काही फार जिव्हाळ्याचे संबंध नाहीत. अन्वर सादतच्या बाहेरख्यालीपणाबद्दल त्याच्या पत्नीला कल्पना आहे, पण त्याबाबत तिची काही तक्रार नाही. अन्वर सादतच्या तिन्ही मुलींनी चारित्र्याबाबत आपल्या वडलांचा वारसा चालवलेला आहे. पैकी तिसरी मुलगी जी शहरात शिकते आहे, ती मार्गीयोच्या प्रेमात पडली आहे. अन्वर सादतचा खून होण्याच्या आदल्या रात्री ती मार्गीयोसोबत सिनेमा पाहायला जाते आणि पहाटे अचानक तडकाफडकी पुन्हा शहराकडे निघून येते. त्याच दुपारी मार्गीयो अन्वर सादतचा खून करतो. त्यामुळे इथं वाचकाला शंका येऊ शकते की, अन्वर सादतचा या दोघांच्या विवाहाला विरोध असावा आणि त्यामुळे क्रुद्ध मार्गीयोने असं कृत्य केलं असावं. पण निवेदक इथं अन्वर सादतचा असा कोणताही विरोध नसल्याचं तत्काळ स्पष्ट करतो. आणि कादंबरीच्या अखेरच्या टप्प्यात मार्गीयोनेच तिचं प्रेम अव्हेरल्याचा खुलासाही येतो.

कोमर आणि त्याची पत्नी नुरानी यांच्यामधील संबंध तर कमालीचे तणावाचे आणि संघर्षाचे असतात. नुरानी १६ वर्षांची असताना ३० वर्षांच्या कोमरचा विवाह तिच्याशी ठरवण्यात येतो. नुरानी तिच्या आयुष्यातील या नव्या वळणानं मोहरून जाते. विवाहापूर्वी कामधंद्याच्या निमित्तानं कोमर बाहेरगावी जातो. वर्षभर नुरानी त्याच्या पत्राची, निरोपाची आतुरतेनं वाट पाहात राहते. पण कोमरकडून तिला कसलाच प्रतिसाद मिळत नाही. कोमर परततो ते तब्बल एक वर्षानं नुरानीशी लग्न करून तिला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी. कोमरचा असंवेदनशीलपणा आणि पुरुषी रासवटपणा याने नुरानीचं भावविश्व पुरतं कोलमडून पडतं. दोन मुलांच्या जन्मानंतरही कोमरकडून होणारी मारहाण आणि अवहेलना याने ती पुरती तुटून जाते. तिचं वागणं विक्षिप्त होत जातं. आपला स्टोव्ह आणि तवा यांना जवळ करून ती त्यांच्यासोबत तासन तास संवाद करत राहते.

मार्गीयो वीस वर्षांचा आणि मामेह (कोमर-नुरानीची मुलगी) अठरा वर्षांची असताना नुरानीला  पुन्हा एकदा दिवस जातात. आयुष्याच्या याही टप्प्यावर नव्या बाळाच्या चाहुलीनं ती सुखावून जाते. पण तिच्या अशा या अवस्थेतदेखील कोमर तिला अमानुष मारहाण करतो. परिणामी बाळाचा अवेळी जन्म होतो. अत्यंत कृश, खंगलेल्या बाळाकडे कोमर ढुंकूनही पाहत नाही. मार्गीयो स्वत:च बाळाचं नाव ठेवतो, पण काही दिवसातच बाळ जग सोडून निघून जातं. काही क्षणांसाठी फुलारून आलेली नुरानी पुन्हा एकदा अगतिक, असहाय बनून जाते.

आता या साऱ्या घटनाक्रमांमध्ये दोन गोष्टींचा संदर्भ सुटल्यासारखे वाटू शकतं- १) ‘मॅन टायगर’  या शीर्षकाचा आणि या कथानकाचा काय संबंध? २) मार्गीयोने अन्वर सादतचा खून करण्याचं नेमकं प्रयोजन काय?

गावातल्या लोकांना केवळ ही बातमी कळलेली असते की, मार्गीयोने अन्वर सादतचा खून केला आहे. त्यामुळे त्याच्या दफनविधीच्या तयारीसाठी म्हणून गावकरी अन्वरच्या घराकडे वळतात. घराच्या मागच्या बाजूला अन्वरचा मृतदेह पडलेला असतो. त्याच्यावर एक कापड झाकलेलं असतं, जे रक्तानं माखलेलं आहे. ज्या क्षणी गावकरी ते कापड बाजूला करतात, त्यावेळी ते भयचकित होतात. एखाद्या हिंस्त्र श्वापदानं नरडीचा घोट घ्यावा, त्या पद्धतीनं मार्गीयोने आपल्या दातांनी अन्वरच्या नरडीचे लचके तोडलेले असतात. लोकांना मार्गीयो स्वतः रक्तानं माखलेला आढळून येतो. पोलीस ज्या वेळी त्याच्या या क्रौर्याबद्दल त्याला जाब विचारतात, त्यावेळी तो उत्तर देतो, “It wasn’t me… There’s a tiger inside my body.”

प्रत्येक गावाचं रक्षण करण्यासाठी एक वाघ असतो अशी एक इंडोनेशियातील पारंपरिक श्रद्धा आहे. या मिथकाचा लेखकाने प्रस्तुत कादंबरीत चपखल वापर केला आहे. मार्गीयोच्या घराण्यामध्ये परंपरेनं चालत आलेला एक वाघ असतो, ज्याचा प्रत्येक पिढीमधल्या कर्त्या पुरुषाबरोबर विवाह संबंध प्रस्थापित होतो अशी एक धारणा असते. मार्गीयोने याबद्दल त्याच्या आजोबांच्याकडून ऐकलेलं असतं. मार्गीयोचे आजोबा एक शूर लढवय्ये असतात आणि घराण्यातील त्या वाघाचा त्यांच्यावर वरदहस्त असल्याची समस्त गावाची श्रद्धा असते. मार्गीयोला हा वाघ पाहण्याची जबरदस्त इच्छा असते, पण तो सहजासहजी नजरेला पडत नसल्याचं आजोबांचं म्हणणं असतं. आजोबा मार्गीयोला हेही सांगतात की, त्यांच्या पश्चात तो वाघ त्यांच्या मुलाशी लग्न करेल किंवा मार्गीयोशी किंवा मार्गीयोच्या मुलाशी. ज्याच्याकडे या धारणेवर प्रचंड श्रद्धा आहे, त्याच्याकडेच हा वाघ जाईल असंही त्यांनी मार्गीयोला सांगितलेलं असतं.

त्यामुळे आजोबांच्या पश्चात हा पारंपरिक वाघ आपल्या वडलांबरोबर बंधनात अडकेल या भीतीनं मार्गीयो धास्तावून जातो. आजोबांच्या मृत्युनंतर घडोघडी तो वडलांवर नजर ठेवू लागतो. पण वाघाच्या अस्तित्वाच्या कोणत्याच खुणा त्याला वडलांमध्ये आढळत नाहीत. त्यामुळे हा वाघ आपल्याकडेच येणार या जाणीवेनं त्याचा वाघाबद्दलचा शोध सुरू होतो. मरताना आजोबा या वाघाचं वर्णन मार्गीयोला सांगतात- “The tiger is white as a swan”. आजोबांच्या पश्चात हा असा पांढरशुभ्र वाघ एकदा मार्गीयोला खरंच दिसल्यासारखा वाटतो. त्यामुळे त्याच्या शोधापायी तो बेभान होतो. त्याचा शोध घेत घेत तो एका सर्कशीतही जाऊन पोहोचतो. पण मार्गीयोच्या पदरी काही पडत नाही. हताश झालेला मार्गीयो त्वेषानं आपली नखं एका झाडाच्या बुंध्यावर ओरबाडतो आणि बुंध्यावरचे आपल्याच नखांचे खोलवर उठलेले व्रण पाहून तो चकित होतो. आणि वंश परंपरेनं चालत आलेला वाघ आपल्या आतच दडून बसला आहे, याचा त्याला साक्षात्कार होतो.

मार्गीयोच्या आत लपलेल्या या वाघाची कल्पना त्याच्या बहिणीला असते. तिने मार्गीयोच्या डोळ्यांचा बदलणारा रंग पाहिलेला असतो. त्याच्या आवाजातील गुरगुर ऐकलेली असते. आपल्या आईला मारहाण करणाऱ्या पित्याबद्दल- कोमरबद्दल मार्गीयोच्या मनात कमालीचा तिरस्कार असतो. किंबहुना आपली बहीण आणि आपल्या मित्रांसमोर त्याने आपण वडलांचा खून करणार असल्याचं जाहीर केलेलं असतं. परिणामी भयकंपित झालेल्या बहिणीने घरातील चाकू आणि इतर धारधार वस्तू लपवून ठेवल्या असतात. पण नियतीच्या योजना काही निराळ्याच असतात. वयात आलेल्या मुलाच्या डोळ्यातील विखार पाहून कोमरला आपला जमाना संपल्याची जाणीव होते. मार्गीयो वाघाच्या शोधात घर सोडून निघून जातो, तर इकडे हाय खाल्लेला आणि बाळाच्या मृत्यूने पश्चातापदग्ध झालेला कोमर विकल अवस्थेत जगाचा निरोप घेतो.

एकमेकात गुंतलेल्या या सर्व घटना गुंफत गुंफत कादंबरी एका परमोच्च बिंदूला येऊन पोहोचते, जिथं सगळा घटनाक्रम एकाच बिंदूत विलीन पावतो आणि कादंबरीच्या अखेरच्या पानावर मार्गीयो सादत अन्वरच्या मुलीचं प्रेम का नाकारतो आणि अन्वरचा निर्दयीपणे खून का करतो याचा उलगडा होतो.

पृष्ठसंख्येचा विचार करता खरं तर ही एक छोटेखानी कादंबरी आहे. पण अत्यंत बंदिस्त कथानक, विविध तपशिलांची एकमेकांत केलेली गुंफण, वेधक निवेदन तंत्र, शेवटपर्यंत ताणलेली उत्कंठा आणि विलोभनीय भाषाशैली, यामुळे कादंबरी वाचनीय झाली आहे. प्रत्येक वेळी निवेदक पहिल्यांदा घटना नमूद करतो आणि मग त्याबाबतचे तपशील कथन करतो. कथन तंत्रामध्ये लेखकाने कमीत कमी संवादाचा वापर केला आहे. पारंपरिक मौखिक कथन शैलीप्रमाणे निवेदकच कथन करत राहतो. कादंबरीत जसे आपण स्थळ-काळाबाबत अनभिज्ञ राहतो, तसेच या निवेदकाबद्दलही.

कादंबरीमध्ये बऱ्याचदा इंडोनेशियन संस्कृतीसंदर्भातील शब्दसंपदा येत राहते. पण लेखकाने स्थळ-काळाचा तपशील टाळलेला असल्याने एका बाजूने कौटुंबिक हिंसाचारातून येणारी स्त्रीची अगतिकता आणि दुसऱ्या बाजूने ग्रीक शोकांतिकेप्रमाणे अदृश्यपणे वावरणारा नियतीचा खेळ याद्वारे कादंबरीचं वैश्विक आवाहन अधोरेखित होतं. कादंबरीतील मार्गीयोने केलेल्या खुनाचं वर्णन आणि कोमर व त्याच्या लहान बाळाचा मृत्यू या प्रसंगांची वर्णनं लेखकाच्या भाषेची हुकमत दाखवणारी आहेत.

कोमरचा मृत्यू भल्या पहाटे होतो, पण दुपार टळेपर्यंत नुरानी आणि तिची मुलगी त्याची वाच्यताही करायला धजावत नाहीत. जणू काही मृत कोमरची दहशत अदृश्य रूपानं वावरते आहे. हताश झालेली, काहीसं मानसिक संतुलन हरवलेली नुरानी स्टोव्ह आणि तव्याशी बोलत राहते. तर मुलगी बाहेर जाऊन वडलांच्या निधनाची बातमी सांगायला टाळाटाळ करते, कारण तिला भीती वाटते की, वडलांच्या निधनाचा ‘आनंद’ आपल्या आवाजात उतरेल. कोमर-नुरानी-मार्गीयो-मामेह यांच्यातील विलक्षण गुंतागुंतीची ही कादंबरी निश्चितच मुळातून वाचण्यासारखी आहे. आणि अन्वर सादतच्या खुनामागचा मार्गीयोचा हेतू जाणून घ्यायचा असेल तर मूळ कादंबरीच वाचावी लागेल.

कादंबरीचा बाज जरी सस्पेन्स-थ्रिलरचा असला तरी वाघासारख्या हिंस्त्र श्वापदाची प्रतिमा ही कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. कादंबरीतील विविध प्रतिमांतून, दृश्यांतून वाचकाला मानवी क्रौर्याचं आणि हिंसेचं दर्शन घडत राहतं. त्यामुळे मानवाच्या आदिम जाणिवांची लेखक सामाजिक आणि कौटुंबिक अंगानं चिकित्सा करू पाहतोय हे सुस्पष्ट आहे. अशी ही काहीशी जादुई वास्तववादी, आभास आणि वास्तव यांच्या सीमेवर रेंगाळणारी कादंबरी.

मॅन टायगर -  येका कुर्नियावन, इंग्रजी अनुवाद – लॅबोडॅलिया सेम्बिरिंग, 

व्हर्सो पब्लिकेशन, लंडन

पाने - १९२, मूल्य – १६० रुपये (किंडल ई-बुक आवृत्ती)

.............................................................................................................................................

येका कुर्नियावन (जन्म : १९७५) या इंडोनेशियन लेखकाची इंग्रजीतून अनुवादित झालेली ही दुसरी कादंबरी. आजपावेतो येका कुर्नियावन यांच्या एकूण तीन कादंबऱ्या इंग्रजीसह अन्य २४ भाषांमध्ये अनुवादित झालेल्या आहेत. ‘ब्युटी ईज अ वुन्ड’ आणि ‘व्हेन्जंस इज माईन’ या त्यांच्या आणखी दोन कादंबऱ्या इंग्रजीत उपलब्ध आहेत. ‘मॅन टायगर’ ही कादंबरी २०१६ च्या मॅन बुकर पुरस्कारासाठी लाँगलिस्ट झाली होती. प्रस्तुत कादंबरीला ‘इमॅजिन्ड कम्युनिटीज’ या ख्यातनाम ग्रंथाचे लेखक बेनेडिक्ट अँडरसन यांची प्रस्तावना आहे, ज्यामध्ये त्यांनी येका कुर्नियावन म्हणजे समकालीन साहित्यक्षेत्रातील आग्नेय आशियाचा तगडा आवाज असल्याचा निर्वाळा दिला आहे. 

लेखक इंग्रजी विषयाचे अध्यापन करतात.

nitin.jarandikar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......