लालकृष्ण अडवाणी : A MAN OF NO WORDS AND NO ACTION!
पडघम - देशकारण
रवीश कुमार
  • लालकृष्ण अडवाणी
  • Tue , 27 June 2017
  • पडघम देशकारण लालकृष्ण अडवाणी Lal Krishna Advani भाजप ‌BJP संघ RSS काँग्रेस Congress

लालकृष्ण अडवाणींचा एकांत हा भारतीय राजकारणाचा एकांत आहे. हिंदू वर्णव्यवस्थेतील वडिलधाऱ्यांचा एकांत असाच असतो. जो आयुष्यभर इमारत बनवतो, पण ती तयार झाल्यावर तिच्यातून बाहेर होतो. तो अंगणात राहत नाही, घराच्या दरवाजात राहतो. संपूर्ण दिवस आणि कितीतरी वर्षं या प्रतीक्षेत घालवतो की, कुणीतरी आतून आवाज देईल. मुलगा नाही तर सून आवाज देईल, ती नाही तर नातू आवाज देईल. जेव्हा कुणीच आवाज देत नाही तेव्हा स्वत:च आवाज द्यायला लागतो. गळा खाकरायला लागतो. घराच्या आत जातोही, पण कुणीच नाही हे पाहून त्याच दरवाजात परत येतो. मध्ये मध्ये संन्यास घेण्याची आणि हरिद्वारला निघून जाण्याची धमकीही देतो, पण पुन्हा तिथेच बस्थान जमवून राहतो.

गेल्या तीन वर्षांत जेव्हा जेव्हा अडवाणींना पाहिलं, तेव्हा तेव्हा ते एका गुन्हेगारासारखे वाटले. बोलू इच्छितात पण कुठल्यातरी अनामिक भीतीने गप्प होतात. जेव्हा जेव्हा वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्यासमोर आले, बोलण्यापासून डोळे फिरवत असत. जणू काही कुणीतरी त्यांना काचेच्या पेटीत बंद केले आहे. त्यात हळूहळू पाणी चढत चाललेय आणि वाचवण्याचा धावाही करू शकत नाहीयेत. त्यांची आरोळी बाहेर येत नाहीये. त्यांच्यासमोरून कॅमेरा निघून जातो. अडवाणी असूनही नसल्यासारखे असतात.

अडवाणींचा एकांत त्या जुन्या सदऱ्यासारखा आहे, जो खूप दिवसांपासून दोरीवर वाळत घातला आहे, पण कुणी त्याला तिथून उतरवणारा नाही. तो कधी पावसात भिजतो, तर कधी थंडीमध्ये काकडून जातो. हळूहळू सदरा मळायला लागतो. मग दोरीवरून खाली कुठेतरी पडलेला दिसतो. जिथे थोडीशी धूळ आणि पाणी साचलेले असते. सदऱ्याला माहीत आहे धुणाऱ्याकडे अजून सदरे आहेत, नवे सदरे आहेत.

अडवाणी एकांतात रडत असतील? स्फुंदत असतील किंवा खोलीत बसल्या बसल्या ओरडत असतील? कुणाला हाक मारत असतील? मध्ये मध्ये उठून खोलीत चालत असतील? वा कसल्या तरी भीतीची चाहूल लागून परत खुर्चीवर येऊन बसत असतील? मुलीशिवाय आजोबाला कोण विचारत असेल? एखादा मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री वा एखादा सामान्य नेता त्यांना भेटायला येत असेल? आजकाल प्रत्येक मंत्री आंघोळीपासून खाण्यापर्यंत प्रत्येक छायाचित्र ट्विट करत असतो. दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांची छायाचित्रंही ट्विट करतो. त्या नेत्यांच्या टाइमलाइनवर सगळे असतील, पण अडवाणी दिसणार नाहीत. सर्वांना माहीत आहे – आता अडवाणींना भेटण्याचा अर्थ ‘अडवाणी होणे’ हा आहे.

रोज सकाळी उठल्यावर ते एकांतात कुणीची छबी बघत असतील, वर्तमानाची की इतिहासाची? ते दिवसभर वर्तमानपत्रे वाचत असतील की वृत्तवाहिन्या पाहत असतील? टेलिफोन वाजण्याची वाट पाहत असतील? त्यांना कोण भेटायला येत असेल? ते ना ‘मोदी मोदी’ करतात, ना कुणी ‘अडवाणी अडवाणी’ करतात. पण ते ‘मोदी मोदी’ का करत नाहीत? तेच जर प्रासंगिक असेल तर त्यात अडचण काय आहे? त्यांची काही वैयक्तिक कारणे आहेत, तर ती ते व्यक्त का करत नाहीत?

लोकसभा निवडणुकीच्या आधी अडवाणींनी एक ब्लॉग बनवला होता. जगात काय काय घडतेय. त्यावर तर ते लिहूच शकतात. इतके लोक कुठे कुठे जाऊन व्याख्याने देतात, तिथे अडवाणीही जाऊ शकतात. नेतृत्व आणि संघटन यांवर कितीतरी बोलू शकतात. काहीच नाही तर त्यांच्या सरकारी निवासस्थानात फुले असतील, रोपे असतील, झाडे असतील, त्यांच्याशीच त्यांचे नाते तयार झाले असेल. त्यावरही लिहू शकतात ते. चित्रपटांची समीक्षा लिहू शकतात.  ते अडवाणीशिवायही अडवाणी होऊ शकतात. ते असूनही का नाहीत?

अडवाणींनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषदांसाठी एक हॉल बनवला होता. तेव्हा ते आपल्या प्रासंगिकतेविषयी किती आश्वस्त झाले असतील. त्या हॉलमध्ये किती कार्यक्रम झाले आहेत. असे तर नाहीना, ते त्या हॉलमध्ये दिवसातून एकदा जात असतील? कॅमेरे आणि प्रश्नांचा गलबला ऐकत असतील? ऐकलेय की, काही आवाज भिंतीवर आपले घर बनवतात. जिथे ते वर्षानुवर्ष नांदतात. तो हॉल अजूनही तिथे असेल?

अडवाणी आपल्या एकांतात असे वाटतात, जसा त्यांचा काही इतिहासच नाही. भाजप आज आपल्या वर्तमानात कदाचित एक नवा इतिहास पाहत आहे. अडवाणी त्या इतिहासाच्या वर्तमानात नाहीत. जसे ते इतिहासातही नव्हते. ते दिल्लीत नाही, अंदमानात असल्यासारखे वाटतात. जिथे समुद्राच्या लाटांची निष्ठुरता सेल्युअर कारागृहाच्या भिंतीवर धडका देते. दूरदूरवर किनारा दिसत नाही. ते दैनंदिनी तर लिहीत नसतील? दिल्लीच्या अंदमानची दैनंदिनी?

सत्ताच्युत झाली काँग्रेस पण नाव पुसले गेले ते अडवाणींचे. सोनिया गांधींना आजही लोक अधूनमधून भेटायला येतात. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचे नाव निश्चित झाल्यावर पंतप्रधान - ज्यांच्या पक्षाला भारतमुक्त करू इच्छितात त्या - सोनिया गांधींना फोन करतात. त्यांनी अडवाणींनाही फोन केला असेल? आजचा भाजप ‘अडवाणीमुक्त भाजप’ आहे. या भाजपमध्ये काँग्रेस आहे, समाजवादी पार्टी आहे, बसपा आहे, सर्व काही आहे. फक्त संस्थापक अडवाणी नाहीत. कुणी असे ट्विट पाहिले आहे का की, पंतप्रधानांनी अडवाणींनाही राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत सांगितले आहे? रामनाथ कोविंद सल्लागार मंडळाला भेटायला जातील? सल्लागार मंडळ, ज्याचा ना कुणी दर्शक आहे, ना कुठला मार्ग.

भारतीय जनता पक्षाचा हा संस्थापक विस्थापिताचे आयुष्य जगतो आहे. ते आता ना संस्कृतीमध्ये आहेत, ना राष्ट्रवादाच्या आख्यानात. मला अडवाणींवर दया दाखवणारे आवडत नाहीत आणि त्यांची चेष्टा करणारेही. अडवाणी आपल्या सर्वांची नियती आहे. आपल्या सर्वांना आयुष्यात एक दिवस ‘अडवाणी’च व्हावे लागणार आहे… सत्तेपासून, संस्थानापासून आणि समाजापासूनही. मी त्यांच्या मौनाला आपल्या आतही वाचण्याचा प्रयत्न करतो. भारतीय राजकारणात संन्यासी असल्याचा दावा करणारे समकालीन होत आहेत आणि संन्यासापासून लांब असलेले अडवाणी अप्रासंगिक होत आहेत. अडवाणी एखाद्या घटनेसारखे घडत आहेत. तिच्याकडे अपघातासारखे पाहू नये.

ज्या लोकांनी असे म्हटलेय की, विरोधी पक्षांनी अडवाणींना आपला उमेदवार बनवावा, ते अडवाणींच्या मार्गदर्शक जीवनाचा अपमान करत आहेत. त्यांना हे माहीत नाही की, विरोधी पक्षांची हालतही अडवाणींसारखीच आहे. अडवाणींविषयी सहानुभूती असणारेही त्यांच्याशी क्रूरपणे वागत आहेत आणि जे त्यांच्यासोबत आहेत ते तर वागतच आहेत. अडवाणींचा एक दोष आहे, त्यांनी जिवंत असण्याच्या एका अटीचे पालन केलेले नाही. ती अट आहे, बोलणे. राजकारणात असून ते बोलत नसतील तर तेही राजकारणाशी दगाबाजी करत आहेत. आणि तेही राजकारण त्यांच्याशी जेव्हा दगाफटका करत आहे अशावेळी. त्यांनी जोरात ओरडायला हवे. रडायला हवे, जेणेकरून आवाज बाहेरपर्यंत जाईल. जर फितुरी नसेल तर तेही सांगायला हवे. म्हणायला हवे की, मी खूश आहे. मी घाबरत नाही. हे मौन माझी निवड आहे, ते कुणाच्या भीतीपोटी नाही.

आडवाणींचे मौन आपल्या काळातली सर्वांत शानदार पटकथा आहे. तिला क्लायमॅक्सची प्रतीक्षा आहे. धुक्याने घेरलेल्या दिल्लीच्या राजपथावर एक साधा म्हातारा छाती पुढे काढून चालत आहे. काठीची ठकठक ऐकू येते आहे. तो जवळ येतो आहे. त्याच्या जवळून रणगाड्यांचा ताफा जोरात जात आहे. त्यांनी सांस्कृतिक राष्ट्रवादावर दिलेली जुनी भाषणे घुमत आहेत. रणगाड्यांनी राष्ट्रवादाला जवळ केलेय आणि संस्कृतीने गायीला. पितृपुरुष अडवाणी रणगाड्यांच्या घेऱ्यात खिळून उभे आहेत. हळूहळू बोलू लागले आहेत. जोरजोरात बोलू लागले आहेत. रडायला लागले आहेत. पण त्यांचा आवाज रणगाड्यांच्या गलबलाटात हरवून जात आहे. ताफा एवढा लांब आहे की, मग ते गप्प होतात.

चित्रपटाचा कॅमेरा रणगाड्यावरून फिरून त्या म्हाताऱ्याला नीट न्याहाळू लागतो. क्लोज अपमध्ये अडवाणी दिसतात. भाजपचे संस्थापक अडवाणी. गुरुदत्तची शाल अंगावर ओढून राजपथावर काय करत आहेत? ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है… ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है… बाहू पसरून रायसीना हिल्सच्या दिशेने पाहत आहेत. राष्ट्रपतींचा ताफा संसदेकडे जातो आहे. लाल रंगाच्या वर्दीमध्ये शिपाई घोड्यांवर बसले आहेत.

हळूहळू फ्रेममध्ये एक इसम प्रवेश करतो. दीपक चोप्रा. अडवाणींच्या रथाचा सारथी. अडवाणींच्या एकांतवासाचा सोबती. दीपक चोप्रा अडवाणींकडे पाहत आहेत. त्यांच्याजवळ दैनंदिनी आहे. त्यात अडवाणींना भेटण्यासाठी वेळ मागणाऱ्यांची नावे आहेत. आज तीच नावे इतर कुणाला तरी भेटत आहेत. रायसीना हिल्सवरून एक वार्ताहर पळत जवळ येतो. विचारतो, ‘दीपकजी, आप अडवानी जी के साथ क्यों है? आप उन सबके साथ क्यों नहीं है जो इस वक्त संसद मैं है?’

कॅमेरा दीपक चोप्राच्या चेहऱ्यावर आहे. त्यांचे ओठ अर्धे उघडतात. डोळ्यात खोल गडदपणा आहे. तिच्या खोलात सत्तेची एक खुर्ची मोडून पडली आहे. काही जुन्या फ्रेम आहेत, त्यात अडवाणी कुणाकुणाला भेटत आहेत. हात जोडलेले आहेत, डोळे बंद आहेत आणि गालातल्या गालात हसत आहेत. प्रत्येक फ्रेममध्ये दीपक चोप्रा आहे.

वार्ताहराला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळते. तो आता दुसरा प्रश्न विचारतो – ‘क्या अडवाणी जी अब भी बोलेंगे? क्या वे अकेले है? क्या वे रोते है? क्या वे दिन भर चुप रहे है? क्या उनसे कोई मिलने आता है? संस्थापक विस्थापन क्यों झेल रहा है? क्या ये सब कांग्रेस की साजिश है?’

दीपक चोप्रा गप्प आहेत.

या दृश्यावर दिग्दर्शक ‘कट’ म्हणतो, पण पॅक-अप करत नाही. आपल्या टीमला म्हणतो – ‘वाट पहा. हा म्हातारा राजपथावरून कुठे वळतो ते पहा. वळतो की शेवटपर्यंत इथेच उभा राहतो?’ सहाय्यक दिग्दर्शक म्हणतो – ‘सर, शांतता चित्रित करायची की आवाज?’ दिग्दर्शक म्हणतो – ‘आवाज चित्रित करायचा असता तर मी संसदेत असतो, जिथं नव्या राष्ट्रपतींचं स्वागत होत आहे, जिथं नवनव्या घोषणा दिल्या जात आहेत. मी शांतता चित्रित करायला आलो आहे. जी भीती आता अडवाणींच्या चेहऱ्यावर आहे, ती चित्रित करायला आलो आहे. ती भीतीच त्यांचं मौन आहे.’

कॅमेऱ्याच्या क्लोज-अपमध्ये अडवाणींच्या ब्लॉगचे एक पान येते. त्यावर लिहिलेले असते – ‘A MAN OF WORDS AND ACTION.’

‘सर, हेच चित्रपटाचं नाव असणार आहे का?’

‘नाही, चित्रपटाचं नाव असेल, ‘A MAN OF NO WORDS AND NO ACTION!”

मराठी अनुवाद - टीम अक्षरनामा

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

हा मूळ हिंदी लेख रविशकुमार यांच्या ब्लॉगवर २० जून २०१७ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -

 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......