साहिर असा होता, तसा होता… पण खरा ‘असा’ होता!
ग्रंथनामा - बुक ऑफ द वीक
जयंत राळेरासकर
  • ‘लोककवी साहिर लुधियानवी’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 16 June 2017
  • ग्रंथनामा Granthnama बुक ऑफ द वीक ‌Book of the Week लोककवी साहिर लुधियानवी Lokakavi Sahir Ludhiyanvi अक्षय मनवानी Akashay Manvani मिलिंद चंपानेरकर Milind Champanerkar

‘लोककवी साहिर लुधियानवी’ हे मिलिंद चंपानेरकर यांनी अनुवादित केलेले पुस्तक नुकतेच वाचले. मुळातील इंग्रजी पुस्तक अक्षय मनवानी यांचे आहे. मराठीशी असणारी साहजिक जवळीक आणि इतर काही गोष्टींमुळे चंपानेरकर यांनी केलेला अनुवाद खूपच भावला.

साहिर लुधियानवीसारखा कवी आणि गीतकार असा अनेक अंगानी पाहणे हा एक अनुभव होता. अगदी खरे सांगायचे तर, साहिरच्या आयुष्याचा असा एकत्र, एकसंध विचार करणे मनाला पटत नव्हते. त्याची चित्रपटगीते आणि काही अंशी त्याची कविता ही ओळखच पुरे असे वाटत होते. त्याच्या उर्दू मिश्रित गीतांमुळे आणि सचिन देव बर्मन यांनी लावलेल्या चालीमुळे ही प्रतिमा मनात आपसूक तयार झाली असावी. पुढे पुढे त्याच्या काही कविता (उदा- ताजमहल) आणि ‘प्यासा’सारखा चित्रपट नव्याने कळू लागल्यावर (जिन्हे नाज है हिंद पर...) साहिरची पुनर्भेट झाली. पुस्तकातील अनेक घटना, साहिरच्या कवितेतून दिसणारे त्याचे प्रतिबिंब हे सगळे पूर्वी तुकड्या-तुकड्याने वाचले नव्हते असे नाही. मात्र पुस्तकातून प्रवाही असणारा त्याच्या शायरीचा आणि आयुष्याचा संबंध हा एक वेगळा परिणाम आहे.

हे सगळे अनुभवतच साहिर लिहीत होता, व्यक्त होत होता. वडिलांच्या ऐय्याशीला आवाहन देत आईसाठीचा संघर्ष, महाविद्यालयीन आयुष्यातील प्रेम, पाकिस्तानमधील दिवस आणि मुंबईला आल्यावरचे आयुष्य हे सगळे मिळून हा ‘लोककवी’ तयार होतो. पुस्तकातील मोठा भाग हा प्रत्यक्ष मुलाखती, अन्य लेखांची अवतरणे यावर आधारित आहे. ही उदधृते वेगळ्या टाईपमध्ये जशीच्या तशी देणे ही कल्पनादेखील सुंदर...

महाविद्यालयीन आयुष्यातील भाग, साहिरची प्रेम-प्रकरणे साहिर यांचा मित्र हमीद याने नेमकी उभी केली आहेत. साहिरच्या मनात प्रेम होतेच, पण त्याच बरोबर साहिर बेफिकीरदेखील होता. ईशहार नावाची एक प्रेयसी (?) मुंबईला आल्याचे कळल्यावरदेखील साहिर म्हणतो – “उद्या जर मी प्रसिद्ध गीतकार झालो तर ती मला शोधत येईल.” मैफिलीत कविता सादर करताना साहिर गोंधळून जायचा आणि तयारी करून आलेलेदेखील विसरायचा, असे अली सरदार जाफरी यांनी म्हटले आहे. साहिरने त्याआधी कैफी आजमी यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. कैफी हे कवीच नव्हेत असे प्रतिपादन केले होते. जाफरी यांनी साहिरच्या ‘ताजमहल’वर टीका केली, तर साहिर उत्तरादाखल म्हणाला – “यातून साहिर कवी नाही हे सिद्ध होते, पण कैफी उत्तम कवी आहेत हे तरी कुठे सिद्ध होते...?” कुठेतरी एक अहंगंड त्यांच्या मनात कायम असे. इतरांच्या मताची पर्वा त्यांनी कधीच केली नाही. अगदी चित्रपट क्षेत्रात देखील. सचिन देव बर्मन-साहिर ही १९५१ पासूनची यशस्वी जोडी साहिरमुळेच संपुष्टात आली.

या पुस्तकात एकंदरीत १४ प्रकरणे आहेत. ती विविध प्रकारे साहिरच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावरचे प्रसंग आहेत. ‘लोकांचा सद्सद्विवेक व्यक्त करणारा कवी’ या प्रकरणात साहिरच्या प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वावरदेखील प्रकाश टाकला आहे. ‘Anthems of Resistance’ या पुस्तकात साहिरवर एक लेख आहे. त्यात साहिरला ‘An Exemplory Progressive’ असे म्हटले आहे, त्याचा उल्लेख येतो. ‘परछाई’चा उल्लेख तर आहेच, पण दोन महायुद्धाची रौद्रता अनुभवलेल्या साहिरचे विशेष कौतुक आहे. त्यातूनच त्याची वैचारिक दिशा स्पष्ट होते.

साहिरला सभोवतालच्या परिस्थितीचे आणि जन-मानसाच्या दु:खाचे मूळ शोधायचे होते. म्हणूनच, बंगालमधील दुष्काळ, स्वातंत्र्य-पूर्व संध्येचा विचार, लुमुम्बा यांची हत्या, अशा अनेक घटनांची पार्श्वभूमी साहिरच्या कवितांना आहे. गालिबच्या शंभराव्या स्मृती-दिनाच्या वेळीदेखील साहिर असाच व्यक्त होतो... इतरांपेक्षा वेगळा.

अक्षय मनवानी यांच्या पुस्तकाचा हा अनुवाद तर आहेच, मात्र मराठीत आणताना चंपानेरकर यांनी मराठी वाचकाचा कल लक्षात घेतला आहे. नेमक्या अर्थाशी जवळीक निर्माण झाल्याशिवाय कवीचे अंतरंग, वैचारिक बैठक समजणार नाही. अर्थात उर्दूतील अर्थ थेट झिरपला तर उत्तमच, पण साहिर आणि त्याची कविता एकाच वेळी उलगडत गेला तरीदेखील उत्तम. अनुवादाची ही मोठी जमेची बाजू आहे.

आपल्याला ओळखीचा असणारा गीतकार साहिर आणि कवी साहिर एकच आहेत. काही तडजोडी त्याने केल्या असतीलही. ‘प्यासा’ हे एक मोठे प्रकरण साहिरच्या प्रत्यक्ष आयुष्याशी जवळीक साधणारे. ‘प्यासा’मधील नायक विजयदेखील कवीच आहे. नाही म्हणायला गुलाबोसोबत तो अखेर जातो, परंतु त्याचा उद्रेक आपल्याला अधिक स्पर्श करणारा असतो. साहिरची अनेक प्रेम-प्रकरणे अर्धवट आहेत हे खरे, पण अर्धवट असली तरी अमृता प्रीतम कालखंड नक्कीच वेगळा होता. कवीची जी त्याला अभिप्रेत अशी उतरंड असते, त्यात साफल्याचे सत्य लटकत राहते आणि सहवासाची मात्र कविता होऊन जाते. साहिरने हा सहवास आणि सामंजस्य यांचा उत्सव केला, बाकी त्याला कशाची पर्वा नव्हती.

चोप्रा बंधू, त्यांची प्रॉडक्शन कंपनी आणि साहिर यांच्या संदर्भात या पुस्तकात एक प्रकरण आहे. संगीतकार रवी, चोप्रा आणि एन.दत्ता यांच्याशी असलेल्या साहिरच्या मैत्रीचा भागही खूप रंजक आहे. मुख्य म्हणजे बहुतेक वेळा त्यांच्याच शब्दात आहे. ‘गुमराह’मधील ‘चलो, इक बार फिरसे, अजनबी बन जाये हम दोनो’ हे गाणे साहिरवरच आधारित आहे. मात्र त्यातील एका शब्दात असलेला बदल कुणी केला याबद्दल पुस्तकात काही नाही. अर्थात तो साहीरनेच केला असणार.

महेंद्र कपूर यांचा मुलगा रुहान यालादेखील लेखक भेटले आहेत. साहिरचे सगळे ‘वेगळेपण’ त्याच्या कवितेत आहे, ते त्याच्या गाण्यात प्रवाही झाले. सभोवताली असणारी सामाजिक परिस्थिती, राजकीय स्थित्यंतरे, यांचे पडसाद त्यांच्या चित्रपटगीतांत स्पष्टपणे दिसतात. १९६९ साली प्रदर्शित झालेल्या ‘आदमी और इन्सान’मधील एका गाण्यातून स्वतंत्र भारताबद्दल त्यांच्या आशा पल्लवित होतात. पण तरीही मूल्यांमध्ये होत असलेले बदल, पाहिलेल्या स्वप्नांची अवस्थादेखील धूसर होत आहे, हेदेखील साहिर लिहून जातो. आणि तरीही त्याला वाटते की, ‘जागेगा इन्सान जमाना देखेगा..!’ ‘जिन्हे नाज है हिंद पर, वो कहा है?’मध्ये पूर्ण भ्रमनिरास होता, मात्र इथे थोडा आशावाद प्रगत होतो.

साहिरच्या स्वभावात एक अंतर्विरोध होता. त्यावर एक स्वतंत्र प्रकरण आहे. त्यात त्याच्या व्यक्तिमत्त्वातील न उलगडलेले अनेक कंगोरे दिसतात. ते इतके सहज वाटतात की, एकीकडे साहिरच्या वर्तणुकीचे आश्चर्य वाटते, पण त्याच्याबद्दल मनात चीड निर्माण होत नाही. तर अनुकंपा निर्माण होते.

साहिरचे दिल्लीमधील स्नेही प्रकाश पंडित यांचे निरीक्षण चंपानेरकर स्वतंत्रपणे नोंदवतात. ते म्हणतात, “साहिरने त्याच्या अनिष्ट सवयी जोपासल्या हे खरे असले तरी त्या जाणीवपूर्वक विकसित केल्या नव्हत्या. एखाद्या झाडाभोवती जशी आपसूक रानटी झुडुपे उगवतात, तसे काहीसे झाले होते.” मला वाटते यात खूप काही सांगितले गेले आहे.

साहिर आणि शैलेंद्र हादेखील खूप महत्त्वाचा भाग आहे. शैलेंद्र गाणी लिहिणारा गीतकार होता तर, साहिरची गाणी कवितेसारखीच होती. शैलेंद्रच्या रचनांमधील सोपेपणा साहिरला कधीच जमणे शक्य नव्हते, तो त्याचा पिंडच नव्हता. दोघेही विचारसरणीने डावे, इप्टामधून पुढे आलेले, पण त्यांची प्रकृती अगदी भिन्न होती.

लहानपणी आणि कुमारवयात साहिरने अनुभवलेले प्रसंग, कॉलेजमधील त्याची प्रेम-प्रकरणे, फाळणीच्या वेदना, अमृता प्रितम, एकटेपणा, यशस्वी गीतकार, आयुष्यातील एका वळणावर निर्माण झालेली भीती, आईच्या मृत्युनंतर आलेला हताशपणा हे सर्व या पुस्तकात येते. आणि तेही त्याला संमांतर असलेली त्याची कविता शोधत.

साहिरबद्दल अनेक मत-मतांतरे आहेत. कुणी त्याला तापट म्हणतात, कुणी अहंमन्य. साहिरने आयुष्याचा वेध त्याच्या कवितेतून घेत माणसे आणि त्यांच्या वृत्ती-प्रवृत्ती यांचाच शोध घेतला. त्यामानाने निसर्ग कमी.

उपसंहारामध्ये साहिर आणि त्याचे सहप्रवासी यांना लुटण्याचा प्रयत्न झाल्याचा एक किस्सा आहे, पण त्याचे प्रयोजन समजत नाही. मूळ इंग्रजी पुस्तक आणि हा अनुवाद यात किती भेद आहेत हे तपासावे लागेल. एक नक्की की, साहिरच्या असण्याला उठाव देणारी त्याची शायरी इंग्रजी आवृत्तीत वाचली गेली नाही. कदाचित ‘स्क्रिप्ट’ हे त्याचे कारण असू शकेल. पण त्यामुळे अनुवादात साहिर अधिक उलगडतो हे मात्र खरे. पुस्तकाला जोडलेली तपशिलांची यादी (चित्रपट, कविता, गाणी..) खूपच उपयुक्त आहे.

……………………………………………………………………………………………

लोककवी साहिर लुधियानवी : जनाभिमुख काव्य, गीतं व जीवनाचा मागोवा
- अक्षय मनवानी, मराठी अनुवाद : मिलिंद चंपानेरकर
रोहन प्रकाशन, पुणे
पाने - ३५४, मू्ल्य - ३२० रुपये.

हे पुस्तक ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3498

……………………………………………………………………………………………

लेखक ध्वनिमुद्रिका संग्राहक आणि चित्रपट अभ्यासक आहेत.

jayantraleraskar@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......