विशाल भारद्वाज : सिनेमाचा पूर्णपुरुष (भाग १)
दिवाळी २०१७ - व्यक्तिचित्रे
चंचला पिसाळ
  • विशाल भारद्वाज यांची एक भावमुद्रा
  • Sat , 29 October 2016
  • विशाल भारद्वाज चंचला पिसाळ

- गोंडस चेहऱ्याचा प्रेमिक ही सैफ अली खानची पडद्यावरची इमेज. तोही ती कसोशीनं, प्रेमानं जपायचा, पण ‘ओमकारा’मधली लंगडा त्यागीची भूमिका त्याच्याकडे आली आणि त्याची सगळी कारकीर्द झळाळून गेली! तेवढी एकच भूमिका त्याने केली असती आणि दुसरा कुठलाच सिनेमा केला नसता, तरीही उत्तम अभिनेता ही त्याची ओळख कुणालाही पुसता आली नसती.

- शाहीद कपूर तर सिनेमापेक्षा सिनेमाबाह्य गोष्टींसाठीच गाजलेला! त्याचं व्यक्तिमत्त्वच असं होतं की, चॉकलेट बॉयशिवाय दुसर्‍या कुठल्याही भूमिका त्याच्याकडे येत नव्हत्या. बरं कुणी त्याला सिरिअसलीही घेत नव्हतं, पण त्यानं ‘कमिने’मधल्या जुळ्या भावांची भूमिका केली आणि ‘मातीच्या गोळ्यातून सुबक मूर्ती बाहेर यावी’ असं काहीतरी झालं. शाहीदला स्वतःला आणि प्रेक्षकांनाही त्याच्यामधल्या अभिनेत्याचा शोध लागला. ‘कमिने’साठी घेतलेल्या कष्टांच्या जोरावर त्याच्या हातात ‘हैदर’ पडला आणि त्यानेही तो तितक्याच सहजपणे खिशात टाकला!

आणखी अशी कितीतरी उदाहरणं आहेत... ज्यांना विशाल भारद्वाज या नावाचा परीसस्पर्श झाला आणि त्यांची कारकीर्द एकदम उजळूनच गेली! ‘भारतीय सिनेमांचा शेक्सपीअर’, ‘भारतीय सिनेमांचा टोरँटिनो’ तसंच ‘मीरतचा ख्रिस्तोफ किझलोव्हस्की’ अशा विशेषणांनी नावाजला जाणारा हा माणूस म्हणजे एक ‘कम्प्लीट पॅकेज’च आहे. ‘सिनेमाचा पूर्णपुरुष’ असं शीर्षकात जे म्हटलंय, ते तंतोतत सार्थ ठरवणारा! त्याच्या सिनेमांनी कदाचित बॉक्स ऑफिसला कोट्यवधींची सलामी दिली नसेल, पण विशालच्या पुढच्या सिनेमाच्या हालचाली सुरू असल्याचं कळलं की, भल्याभल्यांचे कान टवकारले जातात. त्याच्या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखा जवळ यायला लागल्या की, समीक्षक, जाणते रसिक सरसावून बसतात. विशालने गाठलेली नवी उंची मोजण्यासाठीची फूटपट्टी या लोकांच्या हातात असतेच, शिवाय या नव्या सिनेमातून सिनेमाच्या त्यांच्या स्वतःच्या आकलनक्षमतेचे जे काही लाड होणार असतात, त्याचीही त्यांना असोशी असते. साहजिकच या सगळ्यांना आता प्रतीक्षा आहे, २४ फेब्रुवारी २०१७ला म्हणजे अवघ्या चार महिन्यांनी येऊ घातलेल्या ‘रंगून’ची! दुसर्‍या महायुद्धाच्या पार्श्वभूमीचं कथानक असलेल्या ‘रंगून’मध्ये शाहीद कपूर, सैफ अली खान, कंगना राणावत ही स्टारकास्ट घेऊन भारद्वाज काय दाखवणार आहे, याचबरोबर संगीत, गाणी याबद्दलचं जबरदस्त कुतूहल आहे.

खरं तर विशाल हा माणूसच एक ‘कुतूहल’ आहे! गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये त्याने दिग्दर्शक म्हणून काढलेले एकूण सिनेमे किती, तर आठ किंवा नऊ; पण तरीही त्याची गणना भारतातल्या आघाडीच्या, महत्त्वाच्या दिग्दर्शकांमध्ये होते. ‘मार्केटिंग’ हाच फंडा असलेल्या आजच्या जमान्यात बोलणार्‍याची मातीही खपते आणि न बोलणार्‍याचं सोनंही खपत नाही, पण असं असलं, तरी एकदा सिनेमा काढून झाला की, हा माणूस आजच्या प्रसिद्धीतंत्राची कुठलीही दारं ठोठावायला जात नाही. ‘सिनेमा काढणं हे माझं काम. ते मी केलं. आता तो बघायचा की नाही, हे प्रेक्षकांनी ठरवावं’, असं म्हणत तो सहजपणे बाजूला होतो आणि स्वतःच्या लाडक्या टेनिस कोर्टवर रोज दोन-दोन, तीन-तीन तास घाम गाळायला लागतो. सिनेमा काढण्यातून आलेल्या आनंददायी थकव्याचं कॅथर्सिस असं टेनिस कोर्टवर होतं!

सिनेमा काढणं हे विशालसाठी फार आनंदाचं काम आहे. स्वतःच्या हातून सिनेमा तयार होतो यापेक्षाही त्याला त्या सिनेमाला संगीत देता येतं म्हणून. संगीत हेच त्याचं पहिलं प्रेम, पॅशन आहे. आजवर अनेक मुलाखतींमधून त्याने तसं स्पष्टपणे सांगितलं आहे. तो म्हणतो, ‘‘मला संगीतकार म्हणून काम मिळावं, म्हणून मी सिनेमा काढतो, पण सिनेमा काढायचा असेल, तर मला दुसऱ्याच्या स्क्रिप्टवर काम करता येत नाही. तेव्हा कथा माझीच पाहिजे. दुसर्‍याने लिहिलेले संवाद दिग्दर्शित करणं माझ्यासाठी कठीण होऊन बसतं. त्यामुळे संवाद आणि दिग्दर्शनही माझंच पाहिजे. म्हणजे संगीतकार व्हायचं म्हणून सिनेमा काढायचा, तो दिग्दर्शित करणं शक्य व्हावं यासाठी पटकथा लिहायची, संवाद लिहायचे; आणि ही सगळी प्रक्रिया स्वतःच्या हातात हवी म्हणून निर्माताही स्वतःच बनायचं.’’

अर्थात इथपर्यंत पोहोचणं हे एक अधिक एक बरोबर दोन म्हणावं इतकं सोपं कधीच नव्हतं. त्यामागे मोठा संघर्ष आहे, मोठी प्रतीक्षा आहे. ‘यश मिळवायचंच’ ही जिद्द आहे आणि ‘यश मिळणारच’ हा विश्वासही आहे. भारताच्या कुठल्यातरी गावातून उठून नशीब काढायला मुंबईत येणारे कितीतरी जण असतात. त्यांच्याकडे टॅलेंटही असतं, पण त्यांना यश मिळतंच असं नाही; पण मीरतहून दिल्लीमार्गे मुंबईत आलेल्या भारद्वाज या माणसाच्या बाबतीत तसं होणार नव्हतं.

विशाल भारद्वाजचा जन्म पश्चिम उत्तर प्रदेशच्या बिजनोर जिल्ह्यात चंदपूर नावाच्या खेड्यात झाला. त्याचे वडील साखर उत्पादनांशी संबंधित उत्पादनाचं इन्स्पेक्न करणारे सरकारी अधिकारी होते. ते कायम फिरतीवर असायचे. त्यामुळे उर्वरित कुटुंब नजीबाबादमध्ये राहत होतं. विशालच तिथंच पाचवीपर्यंत शिकला. नजीबाबाद फक्त दोनच गोष्टींसाठी फेमस होतं - एक म्हणजे ऑल इंडिया रेडिओ स्टेशन आणि दुसरं म्हणजे अगरवाल फॅमिलीचा थम्सअप बॉटलींगचा व्यवसाय. बाकी तिथं फारसं काही नव्हतं. तेवढ्यात त्याच्या वडलांची बदली मीरतला झाली. त्यामुळे त्याचं बारावीपर्यंतचं शिक्षण उत्तर प्रदेशात मीरतमध्येच झालं. विशालच्या वडलांना गीतरचनेचा, संगीताचा छंद होता. तो त्यांनी त्या काळातल्या बॉलिवूडपर्यंत नेऊन भिडवला होता. त्यांनी काही हिंदी सिनेमांसाठी गीतं लिहिली होती. मीरतमध्ये राहूनही ते कल्याणजी-आनंदजी, आशा भोसले, उषा खन्ना यांच्याशी जोडलेले होते. त्यासाठी त्यांची मुंबईत सतत जा-ये असायची. वडलांचं बोट धरून विशालही यायचा. टॅक्सी ड्रायव्हरसारख्या त्या काळातल्या मोठ्या सिनेमांचे प्रीव्ह्यू विशाल भारद्वाजने त्या काळात बघितले. त्या सगळ्या वातावरणाचा त्याच्यावर अप्रत्यक्ष परिणाम होतच होता. त्याने वयाच्या १७व्या वर्षी संगीतरचना केली. ती त्याच्या वडलांना आवडली. त्यांनी ती उषा खन्ना यांना ऐकवली. त्यांनी ती ‘यार कसम’ या सिनेमासाठी वापरली. त्यानंतर वयाच्या १९व्या वर्षी विशालने आशा भोसले यांना संगीत दिलं; पण ते तेवढंच. एका दुदैर्वी घटनेमुळे हे सगळं पुढे गेलं नाही.

१९ वर्षांचा भारद्वाज एकदा क्रिकेट खेळून घरी आला, तर सगळं घर रस्त्यावर आलेलं होतं. त्या घराचे घरमालक न्यायाधीश होते. त्यांचा मुलगा वकील होता. त्यांच्याबरोबर विशालच्या कुटुंबाचा प्रॉपर्टीचा वाद होता. एक दिवस सकाळी प्रॉपर्टी सील करण्याची ऑर्डर आली आणि सामान घराबाहेर काढण्यात आलं. त्या धक्क्यानेच वयाच्या अवघ्या ४९व्या वर्षी विशाल भारद्वाजच्या वडलांचा मृत्यू झाला (विशालचा सिनेनिर्माता भाऊही नंतर असाच अकाली गेला). वडील गेल्यावर विशालचं मीरतही सुटलं.

क्रिकेटसाठी विशाल मीरतहून दिल्लीला आला. त्याला हिंदू कॉलेजला स्पोर्ट्स कोट्यातून प्रवेश मिळाला होता. क्रिकेट होतं, भरपूर मित्रमंडळी होती. अलीकडेच एका मैत्रीपूर्ण मॅचमध्ये दिलीप वेंगसरकर असं म्हणाले, ‘‘विशाल भारद्वाज यांनी संगीतकार होण्यातून संगीताचा फायदा झाला असेल, पण भारतीय क्रिकेटचा मात्र मोठा तोटा झाला आहे.’’ यावरून त्याच्या क्रिकेटमधल्या क्षमतेची कल्पना येते. पण कॉलेजच्या दुसर्‍या वर्षाला असताना एका सामन्याच्या आदल्या दिवशीच विशालचा हाताचा अंगठा मोडला. वर्षभर त्याला क्रिकेट खेळता आलं नाही आणि मग  क्रिकेटच सोडून द्यावं लागलं. मग या काळात संगीतानं त्याचं सगळं आयुष्य व्यापून टाकलं. कारण याच काळात मैत्रीण, प्रेयसीच्या रूपात रेखा यांचा त्याच्या आयुष्यात प्रवेश झाला होता. दूरदर्शनला काही कार्यक्रमांचं काम त्याला मिळतं होतं. गझल गाणाऱ्या मित्रांना हार्मोनियमची साथ करण्यासाठी ते जायचे. अशीच काही वर्षं गेली. दरम्यानच्या काळात त्याचं रेखा यांच्याशी लग्न झालं होतं. मग टीव्हीवर राहून छंद आणि काही प्रमाणात अर्थार्जन अशा दोन्हा पातळीवर संगीत साधना सुरू असताना अगदी योगायोगानं त्याची भेट झाली गुलज़ारांशी.

दिल्लीतल्या एका स्टुडिओत विशाल जिंगल रेकॉर्ड करत होता. तेव्हा त्या दिवशी रात्री आठ वाजता स्टुडिओत गुलज़ार येणार असल्याचं त्याला समजलं. त्या वेळी गुलज़ार अमजद अलींवर एक डॉक्युमेंट्री करत होते. ते रात्री येणार कळल्यावर विशाल स्टुडिओत थांबूनच राहिला; तोही स्टुडिओच्या रिसेप्शनला. थंडीचे दिवस होते. रात्री बरोबर आठ वाजता फोन वाजला – ‘मी गुलज़ार बोलतोय. मी अमुकतमुक मिठाईच्या दुकानाच्या जवळ आहे. मला तुमचा हा स्टुडिओ सापडत नाहीये.’ तो फोन विशालनेच घेतला. त्याने गुलज़ारना सांगितलं, ‘तुम्ही आहात तिथेच थांबा. मी तुम्हाला घ्यायला येतो.’ गुलज़ार यांना घेऊन येताना वाटेत त्यांच्याशी गप्पा झाल्या. आपणही संगीत देत असल्याचं तरुण वयाच्या उत्साहाच्या भरात विशालने गुलज़ारना सांगितलं. त्या मुलाची ऊर्जा बघून गुलज़ार त्याला म्हणाले, ‘‘मुंबईला येऊन भेट.’’ काही काळाने जेव्हा विशाल खरोखरच मुंबईला आला, तेव्हा त्याने गुलज़ारना भेटायचा प्रयत्न केला. पण त्यांची भेट लगेच होणं मुश्कीलच होतं. मग विशालला दूरदर्शनच्या कार्यक्रमांना संगीत द्यायचं काम मिळालं. नंतर एका म्युझिक कंपनीत काम मिळालं. या कंपनीला ‘जंगल बुक’ ही मालिका मिळाली होती. तिला विशालच संगीत देणार होता, पण ‘टायटल साँग कोण देणार?’ हा प्रश्न होता. विशालने सांगितलं, ‘‘मी गुलज़ार यांचं गीत मिळवून देतो.’’ कंपनीत ते कुणालाच खरं वाटेना. मग त्याने सुरेश वाडकरांना मध्ये घालून खरोखरच गुलज़ारांचं गीत मिळवलं. गुलज़ारांबरोबर पुढे त्याने आणखीही काही कामं केली. मग गुलज़ारांनी विशालला ‘माचिस’ सिनेमाचा ब्रेक दिला.

खरं तर पंजाबच्या पाश्वर्भूमीवरची कथा असलेल्या गुलज़ार यांच्या ‘माचिस’ (१९९६) पासूनच ‘विशाल भारद्वाज’ हे नाव सगळ्यांच्या कानावर पडलं. ‘चप्पा चप्पा चरखा चले’ हे गाणं त्या वेळी अगदी गल्लीगल्लीतही वाजायला लागलं. गुलज़ारांचा सिनेमा, त्यामुळे गीतंही त्यांचीच; पण ‘गल्लोगल्ली वाजणारा हा कोण बुवा नवीन संगीतकार?’ असं लोकांनी बघेपर्यंत या सिनेमासाठी त्याला फिल्मफेअर आर. डी. बर्मन अॅवार्ड फॉर न्यू टॅलेंटही मिळालं होतं. त्यानंतर ‘सत्या’ आला आणि त्याच्या गाण्यांनी तर कमालच केली! त्यातल्या ताज्यातवान्या संगीतानं धुमाकूळ घातला. ‘सपने में मिलती है’, ‘गोली मार भेजे मे’ ही गाणी त्या वेळी अक्षरशः हीट होती. त्यानंतर तीनच वर्षांनी त्याला ‘गॉडमदर’साठी फिल्मफेअर मिळालं. अशी हिट गाणी वगैरे देऊनही त्याचं करिअर म्हणावं तसं बहरत नव्हतं. त्याला यशाची तहान लागली होती, पण म्हणावं तसं ते हाताला लागत नव्हतं. ‘‘खरं तर मीच त्याला कारणीभूत होतो’’, विशाल भारद्वाज सांगतो, ‘‘तरुणपणाचा उत्साह होता, त्यामुळे मला काम दिलेल्या दिग्दर्शकाशी मी वाद घालत बसायचो. मग हळूहळू ‘हा उर्मट आहे’, असं पसरत जाऊन मला कामं मिळेनाशी झाली. त्या वेळी सगळं अंधकारमय वाटायचं.’’

असं असलं, तरी या काळात त्यांच्या पाठीवर हात होता, थेट गुलज़ार यांचा! त्यांच्याबरोबर विशालने या काळात उत्तमोत्तम फिल्म फेस्टिव्हल्स पाहिले. टोरँटिनो, ख्रिस्तोफ किझलोव्हस्की यांच्या सिनेमांनी त्याच्यावर अक्षरशः गारूड केलं. हिंसासुद्धा मनोरंजन करू शकते, हे त्याला हे सिनेमे बघूनच जाणवलं. या काळात गुलज़ारांनींच त्याला सांगितलं, ‘‘तू दिग्दर्शनाचा विचार कर. तू चांगला दिग्दर्शक होऊ शकतोस.’’ विशाल सांगतो, ‘‘गोष्ट सांगण्यात किती ताकद असते, ते मला तोवर समजायला लागलं होतं.’’ गुलज़ार यांचा सल्ला आणि या सिनेमांचा प्रभाव यांच्यातून त्याला दिग्दर्शक होण्याचे वेध लागले. त्यातूनच तो ‘मकडी’चं स्क्रिप्ट घेऊन शबाना आझमींकडे पोहोचला. अमेरिकेतले ट्वीन टॉवर्स कोसळून काही दिवसच झाले होते. शबाना आझमी यांनी विचारलं, ‘‘तू का करतोस हा सिनेमा? तो पडला, तर संगीत दिग्दशर्क म्हणून असलेलं तुझं करिअरही संपून जाईल.’’ त्याने शबानाला ट्वीन टॉवर कोसळला, त्या दिवशी पन्नासाव्या मजल्यावरून खाली कोसळणार्‍या माणसाचा विचार करायला सांगितलं आणि म्हणाला, ‘‘आपल्याला जे करायचं आहे, ते आजच केलं नाही, तर उद्याचं काही सांगता येत नाही.’’ शबाना आझमींनी ‘मकडी’ साईन केला. हा सिनेमा चिल्ड्रन्स सोसायटीसाठी तयार केला गेला होता, पण तो तयार झाल्यावर मात्र चिल्ड्रन्स सोसायटीने नाकारला. मग मित्राकडून २४ लाख रुपयांचं कर्ज घेऊन विशालने तो स्वत:च विकत घेतला. या सिनेमाचं सगळीकडे कौतुक झालं, त्याला पुरस्कारही मिळाले. या सिनेमाच्या बाबतीतल लेखक, दिग्दर्शक, निर्माते, गीतकार, कथा, पटकथा, संवाद, संगीत सबकुछ विशाल भारद्वाज असंच होतं!

‘मकडी’नंतर ‘मकबूल’ आला. त्यानंतर ‘ओमकारा’, ‘द बल्यू अमरेला’, ‘कमिने’, ‘सात खून माफ’, ‘मटरू की बिजली का मंडोला’, ‘हैदर’ आणि आता प्रतिक्षित ‘रंगून’!

यातले ‘मकबूल’, ‘ओमकारा’, ‘हैदर’ हे तीन सिनेमे म्हणजे शेक्सपीअरच्या ‘मॅकबेथ’, ‘आथेल्लो’ आणि ‘हॅम्लेट’ या तीन कलाकृतींचं भारतीय मातीतलं रूप! ‘मकबूल’, ‘ओमकारा’ निखळ सादरीकरणामुळे गाजले, तर ‘हैदर’ विषयामुळे. ‘कमिने’ची हाताळणी ही त्याची जमेची बाजू ठरली. ‘सुहानाज सेव्हन हजबंड्स’ या कादंबरीवरचा ‘सात खून माफ’ हा विशालचा आवडता सिनेमा! पण तो फारसा कुणाला आवडला नाही. डाव्या विचारसरणीशी जवळीक सांगणारा ‘मटरू की बिजली का मंडोलाचं’ही तसंच. ‘द ब्ल्यू अमरेला’ तर थेट रस्किन बॉण्ड यांच्याच कथेवरचा सिनेमा, पण त्याचा जीव अगदीच छोटा; पण लहान मुलांसाठी त्याची दखल घ्यायलाच हवी असा.

या प्रत्येक सिनेमावर प्रचंड लिहिलं-बोललं गेलं आहे. त्यामुळे पुन्हा त्याबदद्ल सांगण्यापेक्षाही त्यापलीकडचा विशाल भारद्वाज हा माणूस समजून घ्यायला हवा - संगीत, दिग्दर्शन, पटकथा, संवाद या सगळ्यावर प्रचंड हुकुमत असलेला; संगीत, सिनेमा हेच जगणारा!

 editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख