एक साधा प्रश्न माझा, लाख येती उत्तरे...
सदर - न-क्लासिक
चिंतामणी भिडे
  • ‘क्यू अँड ए’चं पोस्टर
  • Sat , 03 June 2017
  • इंग्रजी सिनेमा न-क्लासिक क्यू अँड ए Q&A सिडनी ल्युमेट Sidney Lumet माइक ब्रेनन Michael Brennan

एक साधा प्रश्न माझा, लाख येती उत्तरे

हे खरे की ते खरे की ते खरे की ते खरे?

सुरेश भटांनी हा प्रश्न विचारला त्या वेळी त्यांच्यासमोर व्यवस्था नावाने ओळखली जाणारी, परस्परांचे हितसंबंध जिवापाड, प्रसंगी नरबळी देऊन जपणारी अजस्त्र राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा नसेलही कदाचित! पण हा प्रश्न जगातल्या कुठल्याही देशातल्या कुठल्याही व्यवस्थेला लागू होणारा आहे. व्यवस्था बदलण्याचे प्रयत्न अनेकदा झाले. अनेक धाडसी वीर जिवावर उदार होऊन या व्यवस्थानामक चक्रव्यूहात घुसले आणि त्यांनी हा चक्रव्यूह भेदायचा प्रयत्न केला, पण या चक्रव्यूहाने या वीरांचा अभिमन्यू करून त्यांचं कलेवरच बाहेर येईल, अशी ‘व्यवस्था’ केली. कारण ‘जगा आणि जगू द्या’ हा कुठल्याही व्यवस्थेचा मूलमंत्र होय. जोवर हा मंत्र पाळला जातो, तोवर सगळं सुरळीत चाललेलं असतं. म्हणजे किमान तसं दिसत असतं. आतून सगळं कितीही सडलेलं असलं तरी वरवर सगळं छान असतं. पत्त्याचा बंगला कसा असतो? दिसतो मोठा छान, पण एखादा पत्ता जरी हलवला तरी संपूर्ण बंगला कोसळायला वेळ लागत नाही. व्यवस्थेचंही तसंच असतं. व्यवस्थेला येता-जाता नावं ठेवणारे सर्वसामान्यही निर्णायक क्षणी या व्यवस्थेचाच भाग होतात. हितसंबंधांचे घट्ट पाश तिला अधिकाधिक मजबूत करतात. हितसंबंध, मग ते कुठल्याही स्वरूपाचे असोत... कधी भ्रष्टाचाराचे, कधी भाषेचे, तर कधी जाती-धर्माचे. कोणीतरी यावं आणि या व्यवस्थेला आव्हान द्यावं, तिला संपवावं, असं प्रत्येकाला मनोमन वाटत असतं. पण हे करणार कोण? शिवाजी जन्मावा, पण तो दुसऱ्याच्या घरात...

असाच एक शिवाजी पोलिस नामक एका कमालीच्या भ्रष्ट यंत्रणेशी दोन हात करू पाहतो, पण त्याला त्याच्यासारखा चांगुलपणा शिल्लक असलेली माणसं अभावानेच भेटतात. सुरुवातीला साथ देऊ बघणारे पण एका टप्प्यावर व्यवस्थेचा अपरिहार्यपणा स्वीकारून त्या व्यवस्थेचा भाग बनणारे असहाय सहकारी बघून

भोवताली हिंडती ही माणसे प्रेतांपरी;

काय ह्या गावात सुद्धा एकदा होती घरे?

असा प्रश्न त्याला पडतो. या आधुनिक शिवाजीची ही गोष्ट.

चित्रपटाचं नाव ‘क्यू अँड ए’. दिग्दर्शक सिडनी ल्युमेट. कथेच्या पातळीवर थ्रिलर असलेला हा सिनेमा ल्युमेटमुळे निव्वळ थ्रिलर राहत नाही. वर्चस्ववाद, वर्णश्रेष्ठत्व, वंशभेद, अहंकार यांचा जीवघेणा आविष्कार त्यातून बघायला मिळतो. वर्णश्रेष्ठत्वातून माणसाचं माणूसपणच नाकारणाऱ्या आणि समाजाचा ठेका जणू आपल्याचकडे आहे आणि समाजातली ‘ही घाण’ साफ करणं हे आपलंच निसर्गदत्त कर्तव्य आहे, अशा थाटात वावरणाऱ्या, ही ‘व्यवस्था’ टिकवून ठेवण्यासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या वर्चस्ववादी माणसांचं भेसूर चित्र ल्युमेट आपल्यासमोर मांडतो.

एका तिय्यम दर्जाच्या क्लबसमोर मध्यरात्रीच्या सुमारास न्यूयॉर्क पोलिस दलातला लेफ्टनंट माइक ब्रेनन एका कुख्यात गुंडाला फसवून ठार मारतो आणि ही घटना प्रत्यक्ष बघणाऱ्यांना त्याने स्वसंरक्षणार्थ या गुंडाला मारल्याची जबानी देण्यास भाग पाडतो. पोलिस प्रमुख केविन क्वीन अॅलॉयसिस फ्रान्सिस रेली ऊर्फ अॅल या तरुण सहायक सरकारी वकिलाला पाचारण करतो. ब्रेनन पोलिस दलाची शान आहे, शहराचा उकिरडा करू बघणाऱ्या गुन्हेगारांचा खात्मा करून हे शहर सुरक्षित ठेवण्यात ब्रेननसारख्याच अधिकाऱ्यांचा मोठा वाटा आहे, ब्रेननसारखे फारच थोडे अधिकारी आता पोलिस दलात शिल्लक आहेत, असं सांगून अॅलची मनोभूमिका आधीच तयार करण्याचा प्रयत्न करतो. तुझे वडीलही पोलिस दलाची शान होते, या शब्दांत तो अॅलला तो ही या ‘व्यवस्थेचाच’ एक भाग आहे, हे सूचित करू पाहतो. आणि ही ओपन अँड शट केस आहे (त्याच्याच भाषेत सांगायचं तर ‘कट अँड ड्राइड’), असं सांगून केस तयार करायला सांगतो. अॅल ब्रेननचा जबाब घेतो. त्या वेळी जी प्रश्नोत्तरं होतात तेच ‘क्यू अँड ए’.

या ‘क्यू अँड ए’वरच अॅलची सगळी केस तयार होणार. या ‘क्यू अँड ए’मधल्या नोंदीच ज्यूरीसमोर जाणार. त्यामुळे हा ‘क्यू अँड ए’ सर्वांत महत्त्वाचा. हा भाग व्यवस्थित पार पडतो. पण अॅल जसजसा तपास करू लागतो, तसतसं हे प्रकरण दिसतं तितकं साधं नाही, असा संशय त्याला येतो. ब्रेननने ज्याला मारलेलं असतं तो मूळ प्युर्टो रिकन गुंड. अॅलला या प्रकरणाचा तपास प्युर्टो रिकन माफिया बॉस बॉबी टेक्सपर्यंत घेऊन जातो आणि या प्रकरणाचे धागेदोरे केवळ ब्रेनन आणि बॉबी यांच्यापुरतेच नाहीत, तर क्वीनपर्यंतही जातात, हे त्याच्या लक्षात येतं. याखेरीज ज्यू, स्पॅनिश, लॅटिन अमेरिकन, इटालियन अशा विविध वंशांच्या, राष्ट्रीयत्वाच्या व्यक्तिरेखा यात आहेत. काही गुन्हेगार, काही पोलिस, काही कायद्याच्या दृष्टीने गुन्हेगार, काही कायद्याचं रक्षण करणाऱ्या, तर काही कायद्याच्या आडून आपली वंशद्वेषाची भूक भागवणाऱ्या.

बॉबी टेक्स विरुद्ध ब्रेनन यांच्यातल्या या संघर्षाला अनेक कंगोरे आहेत. पण या सगळ्यात ठळक आणि कथेचा मुख्य भाग जो आहे तो आहे वंशद्वेष आणि व्यवस्था टिकवण्याची धडपड. ब्रेनन आणि क्वीन हे अमेरिकन व्हाइट सुप्रीमसीचे प्रतिनिधी आहेत. अमेरिकन समाजात वावरणारे निग्रो, ज्यू, लॅटिन अमेरिकन, हिस्पॅनिक, इटालियन वंशाचे गुन्हेगार आणि खालच्या दर्जाचे लोक म्हणजे अमेरिकन समाजाला लागलेली कीड असून ती साफ करणं हे आपलं परमकर्तव्य आहे, या विचारांवर त्यांची ठाम निष्ठा आहे. आपण आहोत म्हणून सगळं नीट चाललंय, या माणसांना त्यांची जागा दाखवून दिलीच पाहिजे, त्यांना चेचलंच पाहिजे, या भावनेने ब्रेननला पछाडलंय. अॅल ज्यावेळी ब्रेननने केलेलं तथाकथित एन्काउंटर हा रचलेला बनाव होता, हे सिद्ध करायच्या मागे लागतो, त्या वेळी ब्रेनन त्यालाही धमकावतो. तुझा बाप काही वेगळा नव्हता, तो आमच्यासारखाच होता. तोही या व्यवस्थेचाच भाग होता, न्यूयॉर्क पोलिस दलाला त्याचा अभिमान होता. आज जर तो असता आणि त्याने तुला असं काही करताना बघितलं असतं तर त्याने पहिली गोळी तुलाच घातली असती, असं सांगून तो अॅलवर दबाव आणतो, पण अॅल बधत नाही. तो भूतकाळाचा हा दबाव झुगारून, आपल्या आदर्शवादाशी प्रामाणिक राहत ब्रेनन आणि क्वीनचा पर्दाफाश करण्याचा निर्धार करतो. तो आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो देखील, पण ऐनवेळी व्यवस्था वरचढ ठरते आणि अॅलच्या आदर्शवादाचा घास घेते.

वंशभेद आणि वर्णवर्चस्वाचे सुरुवातीला पुसट असणारे संदर्भ हळूहळू प्रखर होत जातात. आदर्शवादी अॅलदेखील या वंशभेदाच्या मानसिकतेतून सुटलेला नाही. बॉबी टेक्सची तथाकथित प्रेयसी कम पत्नी नॅन्सी बॉश अॅलची पूर्वाश्रमीची प्रेयसी... सुमारे दोन वर्षं दोघांचं प्रेमप्रकरण सुरू होतं, पण ज्या क्षणी अॅलला नॅन्सीचे वडील काळे, म्हणजे निग्रो आहेत, हे कळतं तेव्हा त्याला धक्का बसतो. त्याच्या चेहऱ्यावर त्याक्षणी जे भाव उमटतात, ते बघून नॅन्सी अॅलपासून फारकत घेते, ती थेट आता बॉबीची प्रेयसी कम पत्नी म्हणून त्याच्यासमोर येते. अॅल तिला पुन्हा जुन्या प्रेमाची आठवण करून देतो, पण ती त्याचं प्रेम अव्हेरते. ‘बॉबी इज कलरब्लाइंड’, ती त्याला स्पष्ट शब्दांत सुनावते.

ब्रेननचा बळी ज्या गोळीने जातो, ती गोळी झाडणारा इन्स्पेक्टर आहे ज्यू. पोलिस दलात तो व्हर्जिन म्हणून प्रसिद्ध असतो, कारण १८ वर्षांच्या सर्व्हिसमध्ये त्याने एकही गोळी चालवलेली नाही. आणि याच्या हातून मरण यावं? ‘Jesus Christ. Taken out by a virgin Hebe.’ तो मरताना पुटपुटतो. ज्यूंच्या हिब्रू भाषेवरून त्यांना अमेरिकेत हिब म्हणून हिणवतात. मृत्यूदेखील ब्रेननच्या नसानसात भरलेला वंशद्वेष संपवत नाही. तपासादरम्यान एक महत्त्वाचा आय विटनेस हाती लागलाच तर त्याला अॅलच्या समोर उभं करण्याआधी माझी भेट घडव, असा दबाव ब्रेनन चॅपमन या अॅलच्या निग्रो सहकाऱ्यावर आणतो, त्याही वेळी तो त्याला म्हणतो, ‘आपण मित्र आहोत, यू आर द व्हाइटेस्ट ब्लॅक मॅन आय हॅव एव्हर नोन.’

ज्यू, इटालियन, हिस्पॅनिक, लॅटिन अमेरिकन, समलिंगी.. ही सर्व घाण साफ करण्याचं काम मी करतोय, या अहंकारात ब्रेनन वावरतोय. प्रत्यक्षात तो व्यवस्था जपण्यासाठी धडपडतोय. ब्रेनन आणि क्वीन यांचा पर्दाफाश केला तर ही व्यवस्थाच कोलमडेल, हे ज्या क्षणी अॅलला मदत करणाऱ्या त्याच्या वरिष्ठांच्या लक्षात येतं, त्याक्षणी ते देखील त्याला झालं गेलं विसरून जायचा सल्ला देतात. अॅल हताश होतो. कशासाठी केली ही उठाठेव? सर्वस्व गमावून बसलो तरी कोणाला काय देणंघेणं आहे?

शहरांच्या आणि त्या शहरात राहाणाऱ्या माणसांच्या गोष्टी सांगणं हे ल्युमेटला विशेष भावतं. ‘डॉग डे आफ्टरनून’, ‘सर्पिको’, ‘नेटवर्क’, ‘प्रिन्स ऑफ द सिटी’, ‘द व्हर्डिक्ट’ अशी अनेक नावं सांगता येतील. प्रत्येकाचा संदर्भ वेगळा आहे. इथे त्याने मोठ्या शहरांच्या चकचकीत आवरणाखाली दडलेल्या रेसिझमची गोष्ट मांडली आहे. आपल्याकडे जातीयवाद आहे, अमेरिकेत वंशद्वेष अथवा रेसिझम आहे. गोऱ्या पोलिसाने काळ्या व्यक्तीवर केलेल्या अत्याचाराच्या बातम्या आजही अधूनमधून वाचायला मिळत असतात. ‘मिसिसिपी बर्निंग’सारख्या चित्रपटाने हा वंशद्वेष प्रखरपणे मांडलाय. ‘क्यू अँड ए’मध्ये तो कधी उघड, तर कधी अप्रत्यक्ष आहे. व्हाइट सुप्रीमसिस्ट्सच्या अरेरावी आणि अतिरेकीपणावर थेट बोट ठेवण्याचं धाडस ल्युमेट दाखवतो; पण दुर्दैवाने क्राइम थ्रिलरसारख्या सवंग ज्यॉनरच्या आवरणाखाली ल्युमेटचा हा मास्टरपीस दुर्लक्षित राहतो.

लेखक मुक्त पत्रकार आहेत.

chintamani.bhide@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......