के. ए. अब्बास : सिनेमाला समृद्ध करणारा कलावंत
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
धनंजय कुलकर्णी
  • के. ए. अब्बास आणि त्यांच्या काही चित्रपटांची पोस्टर्स
  • Tue , 30 May 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा के. ए. अब्बास राज कपूर अमिताभ बच्चन

भारतीय सिनेमातील ख्यातनाम दिग्दर्शक आणि राज कपूरच्या आर. के. फिल्म्सचे लेखक कथा-पटकथाकार पद्मश्री ख्वाजा अहमद अब्बास तथा के. ए. अब्बास यांची आठवण आजकाल कुणाला होताना दिसत नाही. परवा, १ जून रोजी त्यांचा ३०वा स्मृतिदिन आहे. अब्बास पत्रकार होते. हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. ‘धरती के लाल’, ‘शहर और सपना’, ‘दो बूंद पानी’ असे एकाहून एक क्लासिक्स त्यांनी बनवले.

……………………………………………………………………………………………

भारतीय सिनेमातील ख्यातनाम दिग्दर्शक आणि राज कपूरच्या आर. के. फिल्म्सचे लेखक कथा-पटकथाकार पद्मश्री ख्वाजा अहमद अब्बास तथा के. ए. अब्बास यांची आठवण आजकाल कुणाला होताना दिसत नाही. अब्बास पत्रकार होते. भारतीय वृत्तपत्रसृष्टीत त्यांनी सर्वाधिक काळ चालणारा स्तंभ लिहिला. १९४१ ते १९८७ असा तब्बल ४६ वर्षे त्यांनी ‘लास्ट पेज’ हा स्तंभ सुरुवातीला ‘बॉम्बे क्रॉनिकल’ व नंतर ‘ब्लिटज’मध्ये लिहिला. हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. विचारसरणीने ते डावे होते. इप्टाचे ते संस्थापक सदस्य होते. नववास्तववादी सिनेमाचे पुरस्कर्ते होते. ‘धरती के लाल’, ‘शहर और सपना’, ‘दो बूंद पानी’ असे एकाहून एक क्लासिक्स त्यांनी बनवले. या चित्रपटांना भलेही व्यावसायिक यश मिळालं नसलं तरी त्यांच्या सिनेमांनी एक वेगळा विचार मांडणारे आणि समाजातील विषमतेला अधोरेखित करणारी स्वतंत्र शैली निर्माण केली. स्वत:च्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विचारांना ते सिनेमाच्या माध्यमातून मांडत. राज कपूरचं कलाजीवन घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. राज कपूरसारख्या तद्दन व्यावसायिक चित्रनिर्मात्यासमवेत अब्बास यांची प्रदीर्घ काळ जोडी कशी जमली, असा बर्‍याच जणांना प्रश्न पडतो. ही त्यांची तडजोड होती की अपरिहार्यता? याचं उत्तर शोधायचं तर त्यांच्या संपूर्ण कलाजीवनाचा धांडोळा घ्यावा लागेल.

चाळीसच्या दशकात त्यांनी राष्ट्रपिता म.गांधी यांना एक पत्र लिहून गांधींनी सिनेमाबाबत केलेल्या चुकीच्या मुद्यांचं समर्पक शब्दात खंडन करत या माध्यमाची ताकद समजावून घ्या अशी आग्रही मागणी केली होती. म. गांधी यांचं सिनेमाबाबत फार काही चांगलं मत नव्हतं. त्यांनी एकदा या माध्यमाबाबत आपली प्रतिक्रिया देताना ‘सिनेमा हा सट्टा, अश्वशर्यतीसारखा जुगारी वाईट प्रकार आहे’ असं म्हटलं. त्यांची ही प्रतिक्रिया भारतीय सिनेमाच्या रौप्यमहोत्सवी वर्षांत (१९३९) आली होती. यावेळी अब्बास देखील पंचविशीतच होते. सिनेमा या माध्यमाची ताकद त्यांनी या वयातच ऒळखली होती. गांधींच्या प्रतिक्रियेनं ते अस्वस्थ झाले आणि त्यांनी थेट पत्राद्वारे त्यांच्याशी संपर्क केला. या पत्रात ते लिहितात- "सिनेमाविषयक तुमच्या या प्रतिकूल मतामुळे या माध्यमाविषयीचा चुकीचा संदेश समाजापुढे जाऊ शकतो. ही प्रतिक्रिया माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीने केली असती तर ती दुर्लक्षिता आलीही असती, पण तुमच्या समाजातील प्रतिमेला, तुमच्या मताला इथं फार मोठी किंमत आहे. सिनेमा आता नव्याने विकसित होणारं माध्यम असून त्यात सुधारणांना भरपूर जागा आहे." त्यांनी या पत्रासोबत उत्कृष्ट पाश्चात्य चित्रपटांची यादी पाठवून दिली आणि या कलाकृती अवश्य पाहण्याची विनंती केली. म.गांधीनी पुढे आयुष्यात केवळ एकच सिनेमा बघितला तो विजय भट्ट यांचा ‘रामराज्य’ (१९४३). परंतु त्यांनी पुढे कधी सिनेमावर टीका केल्याचं ऐकीवात नाही! वयाच्या पंचविशीत म. गांधींच्या मतांचा सडेतोड प्रतिवाद करणार्‍या अब्बास यांची चित्रदृष्टी किती सजग होती ते यावरून लक्षात येतं. सिनेमाचा ध्यास त्यांनी आयुष्यभर जपला. राज कपूर सारख्या ‘शोमन’ सोबत राहून त्यांनी त्यांच्या सिनेमातूनही आपला साम्यवादाचा विचार पेरला.

राज कपूरच्या ट्रॅम्पला यशस्वी करणार्‍यांच्या टीममध्ये अब्बास यांचं मोठं योगदान आहे. राजने कायम आम आदमीला केंद्रस्थानी ठेवून त्याच्या भावभावनांना रूपेरी रंग दिला. याचं पहिलं प्रत्यंतर आलं १९५१ साली ‘आवारा’ च्या वेळी! या सिनेमाची पटकथा आणि संवाद अब्बास यांचे होते. वंचिताच्या वेदना आणि वर्ग संघर्ष या लालभाईंच्या आवडत्या संकल्पनांना मनोरंजनाची फोडणी देत राजने मायानगरीत बस्तान बसवलं. अब्बास यांनी हाच विचार पुढे ‘श्री ४२०’,  ‘जागते रहो ’ या सिनेमातून मांडला. गरीब विरुद्ध श्रीमंतीचा लढा, वाढत्या शहरीकरणाने ढासळलेली मूल्यव्यवस्था, यांत्रिकीकरणात हरवत चाललेले माणूसपण, भांडवलशाहीच्या तडाख्यात गुदमरलेलं कलासक्त मन, तरी देखील जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती या अब्बास यांच्या राजकीय विचारांचं प्रतिबिंब राजच्या सुरुवातीच्या सिनेमात पडत होतं.

तो काळ स्वातंत्र्यानंतरच्या ‘रोमॅंटिसिझम’चा होता. गमतीची गोष्ट म्हणजे अब्बास पं.नेहरूंच्या प्रगतीशील कर्तृत्वाने भारावलेले होते. त्यांची नेहरूंसमवेत चांगली मैत्री होती. आर.के.च्या सिनेमातून मिळालेल्या पैशातून अब्बास आपल्या मनाला आवडेल अशी चित्रनिर्मिती करत असे. १९६४ साली त्यांनी ‘शहर और सपना’ या चित्रपटातून फूटपाथवरील माणसाचं जीणं दाखवलं होतं. ‘One Thousand Nights on a Bed of Stones’ या त्यांच्याच कथेवर आधारित चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांचा मूळचा पिंडच हा कार्यकर्त्याचा होता.

बॉम्बे टॉकीजच्या ‘नया संसार’ (१९४१) या त्यांनी लिहिलेल्या कथेवरील पहिल्याच सिनेमात ही झलक दिसून आली होती. १९४६ साली त्यांनी विख्यात रशियन साहित्यिक मॅक्झिम गॉर्की यांच्या ‘लोअर डेप्थ ’ या कथानकावर बेतलेल्या ‘नीचानगर’ या  (दिग्द.-चेतन आनंद) चित्रपटाने तर कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पारितोषिक पटकावलं होतं. याच वर्षी आलेला शांतारामबापू यांचा अप्रतिम सिनेमा ‘डॉ. कोटनीस की अमर कहाणी’ अब्बास यांच्या ‘And One Did Not Come Back’ या कथानकावर बेतला होता.

१९५१ साली त्यांनी इप्टाच्या बॅनरखाली ‘धरती के लाल’ हा सिनेमा दिग्दर्शित केला. १९४३ साली बंगालमध्ये पडलेल्या भीषण दुष्काळात एका कुटुंबाची होणारी ससेहोलपट दाखवताना या निसर्गनिर्मित संकटासोबतच त्या काळात चालू असलेल्या मानवनिर्मित दुसऱ्या महायुद्धाने सत्तेच्या हव्यासात मानवतेच्या र्‍हासाच्या पाऊलखुणादेखील स्पष्ट दाखवल्या होत्या. या सिनेमाच्या परीक्षणात ‘न्यूयार्क टाईम्स’ने म्हटले होते- ‘...a gritty realistic drama!’

भारत आणि रशिया यांची संयुक्त निर्मिती असलेला ‘परदेसी’ (१९५७) हा सिनेमा अब्बास यांनीच दिग्दर्शित केला होता. एक रशियन तरुण व एक भारतीय तरुणी यांच्यातील प्रेमसंबंधांवरील हा चित्रपट मूळ रशियन कादंबरी ‘A Journey Beyond the Three Seas’वर आधारित होता. हा सिनेमादेखील कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवला गेला. अनिलदांचं संगीत असलेल्या या सिनेमातील ‘रिमझिम बरसे पानी आज मोरे अंगना’ आणि ‘रसिया रे मन बसिया रे’ ही मीना कपूरच्या आवाजातील गाणी रसिकांच्या लक्षात असतील. पहिला गीतविरहीत सिनेमा (मुन्ना-१९५४) बनवण्याचं श्रेयही त्यांच्याकडेच जातं.

के. ए. अब्बास साठच्या दशकात अनेक शॉर्ट फिल्म्स आणि डॉक्युमेंट्रीज बनवू लागले. आर.के.च्या ‘जोकर’च्या वेळी राजला पुन्हा आपल्या जुन्या दोस्ताची आठवण झाली. ‘जोकर’ची कथा-पटकथा अब्बास साहेबांची होती. पण त्याच वेळी त्यांच्या मनात त्यांची स्वनिर्मिती असलेल्या ‘दो बूंद पानी’ या सिनेमाचा विचारही होता. राजस्थानच्या मरूस्थल भूमीत असलेल्या पाण्याच्या भीषण वास्तवाचं चित्रण यात होतं. या सिनेमालादेखील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.

या सिनेमाच्या तीन वर्षे आधी आलेल्या ‘सात हिंदुस्तानी’ चा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. कारण हा आजचा महानायक अमिताभचा पहिला चित्रपट होता. ‘जोकर’च्या अपयशानंतर आर्थिक विवंचनेत सापडलेल्या राजला पुन्हा यशाच्या मार्गावर आणणार्‍या सत्तरच्या दशकातील सुपर हिट ‘बॉबी’ची कथा-पटकथा त्यांचीच होती.

१९८० साली आलेल्या ‘द नक्सलाईटस’ या सिनेमातून त्यांनी नक्षलवाद्यांच्या मानसिकतेचा शोध घेतला. यात मिथुन चक्रवर्ती ची भूमिका होती. त्यांच्यातील लेखक हा सदैव जागा असायचाच. त्यांनी तीनही भाषांमधून विपुल लिखाण केलं. पत्रकारितेत, साहित्यक्षेत्रात त्यांचा मोठा दबदबा होता. १९६९ साली त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. जवळपास शंभरच्या वर पुस्तकांचं त्यांनी लेखन केलं. असंख्य पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं. आर. के. कॅम्पसमध्ये त्यांच्या जोडीला वसंत साठेदेखील असायचे. त्यांचंही कर्तृत्व नजरेआड करता येणार नाही. आजच्या तरुण पिढीला सांगायचं तर अभिनेता शाहिद कपूरचे ते पणजोबा होते. सिनेमाचा ध्यास घेतलेल्या या कॉम्रेड कलावंताने १ जून १९८७ रोजी अखेरचा श्वास घेतला.

लेखक सिनेमाचे अभ्यासक आहेत.

dskul21@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......