इनसायडर-आउटसायडर
दिवाळी २०१७ - लेख
इरावती कर्णिक, अनुवाद – शशिकांत सावंत
  • इला भाटे यांच्यासह इरावती कर्णिक ‘अलविदा’मध्ये
  • Fri , 28 October 2016
  • इरावती कर्णिक शशिकांत सावंत Iravati Karnik Shashikant Sawant

मला जेव्हा कोणी विचारतं की, 'तू काय करतेस?' तेव्हा मी सांगते की, 'मी मराठी नाटककार आहे.' तरीही जेव्हा मी मागच्या पाच वर्षांकडे पाहते, तेव्हा लक्षात येतं की, मी केवळ एकच मराठी नाटक लिहिलं आहे. उलट हिंदीत तीन नाटकं लिहिली आहेत आणि इंग्रजीत एक नाटक लिहिलं आहे. नंतर त्याचा जर्मन भाषेत अनुवाद झाला. अजून एक नाटक लिहिलं आहे, जे हिंदी आणि इंग्रजी दोन्हीही भाषांमध्ये आहे. आणखी एक इंग्रजी नाटक लिहिलं आहे. तरीही मी स्वतःला ‘मराठी नाटककार’ म्हणवते. जेव्हा मी लिहीत असते किंवा इतरांबरोबर थिएटर कोलॅब्रेशन करत असते, तेव्हा मला नेहमी एक प्रश्न पडतो. तो म्हणजे - एखादी भाषा एखाद्याची ओळख कशी काय तयार करते? ही ओळख आणि परंपरा यांमध्ये फरक कसा करायचा? या दोन्ही गोष्टी एकत्र येताना एकमेकांना वेधतात कधी? एकमेकांशी संघर्ष करतात कधी? या दोन्हींमधला फरक ठेवूनही दोन्हींचा वापर कसा करता येईल?

माझं भाषेशी असलेलं नातं जरा व्यामिश्र आहे. मी अशा मराठी कुटुंबात वाढले, ज्यात मराठी लेखक आणि त्यांचं लेखन यावर सतत चर्चा होत असे. कुटुंबात मुक्त विचारांचे पत्रकार, लेखक आणि डावीकडे झुकलेली मंडळी होती. तेव्हाची मराठी लेखनाबद्दल होणारी चर्चा पार्श्वसंगीतासारखी माझ्या कानात सतत वाजत असायची. मी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकले, पण त्या वेळी केवळ परीक्षेतली उत्तरं लिहिण्यापुरताच आम्ही इंग्रजीचा वापर करत होतो. इतर वेळी शिक्षक आणि विद्यार्थी नेहमीच मराठी किंवा हिंदीतून बोलायचे. मला हुशार विद्यार्थिनी समजलं जात होतं आणि माझा आत्मविश्वासही चांगला दृढ होता, तसंच मला अभ्यास करायाला आवडायचं. माझ्या दृष्टीनं इंग्रजी ही पाठ्यपुस्तकाची भाषा होती. म्हणजेच अर्थात ज्ञानाची भाषा होती. स्वतःच्या भावना, विचार, चर्चा करण्यासाठी मी मराठीचा वापर करत असले आणि माहितीच्या आदानप्रदानासाठी हिंदी वापरत असले, तरी ज्ञानाच्या देवाणघेवाणीची भाषा म्हणजे इंग्रजीच असल्याचं माझं मत होतं. इंग्रजी भाषेशी माझं पहिलं नातं असं होतं. 

वयाच्या बाराव्या वर्षी मी आंध्र प्रदेशातल्या चित्तोर जिल्ह्यातल्या ऋषी व्हॅली बोर्डिंग स्कूलमध्ये गेले. ही शाळा (जीडू) कृष्णमूर्ती फाउंडेशन चालवतं. स्वतःचे विचार व्यक्त करण्यासाठी तिथे मुलांना उद्युक्त केलं जायचं, त्यांनी प्रश्न विचारावेत, यासाठी प्रोत्साहन दिलं जायचं; पण तिथं इंग्रजी बोलणं अपेक्षित होतं. इंग्रजीतून व्यक्त होण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. त्यामुळे मी खूपच गडबडले; भांबावून गेले. माझ्या डोक्यात अनेक गोष्टी होत्या, पण त्या मला इंग्रजीत नेमकेपणाने मांडता येत नव्हत्या. त्यामुळे  मी सतत अनिश्चिततेच्या गर्तेत सापडलेली असायचे.

माझ्या भोवताली अनेक मुलांचा गोतावळा होता. त्या सगळ्यांनी वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत किमान तीन देशांचा तरी प्रवास केला असावा. त्यांतली अनेक मुलं एनआयआर होती आणि काही तर अभारतीयही होती आणि मी टिपिकल मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली होते. वर्षातून दोनदा मला शिवलेले कपडे मिळायचे; तिसऱ्यांदा मिळाले, तर मला मोठंच घबाड गवसल्यासारखं वाटायचं. मला नायके किंवा मेस्कॉस अशा ब्रँड्सची नावंदेखील माहीत नव्हती. जे जे खाद्यपदार्थ आम्ही खायचो, ते घरी बनवलेले असायचे. त्यांच्यावर अरेबिक अक्षरात लिहिलेलं नसायचं. मी कधीही सांता बार्बरा किंवा एमटीव्हीसारखी चॅनेल्स पाहिलेली नव्हती. माझ्या भोवतालची मुलं इतरांचा थोडाफार विचार करणारी होती. मी त्यांना परग्रहावरून आल्यासारखी वाटत असावे. तरीही त्यांनी मला स्वीकारलं. मग मला खूप छान वाटू लागलं. मी त्यांच्याशी नातं जोडायला धडपडू लागले.  

 इरावती कर्णिक यांच्या ‘सॅटलाइट सिटी’ या नाटकातील एक दृश्य     

पहिल्या काही वर्षांत मी माझ्या कुठल्याही मित्र-मैत्रिणीला माझ्या छोट्याशा घरात बोलावलं नाही. मुंबईतल्या चुनाभट्टीत माझं घर होतं. कचऱ्यानं भरलेल्या गल्लीत एका टोकाला आम्ही राहत होतो. इंग्रजी येत नसल्यामुळे मी या मुलांमध्ये ‘आउटसायडर’ असल्याचं फिलिंग मला सतत येत असे; पण इंग्रजीशी हळूहळू माझं नातं तयार होत गेलं. खरं म्हणजे, या नात्यात मला घुसवण्यात आलं होतं किंवा ते माझ्यावर येऊन आदळलं होतं, असं मला वाटतं.  

घरातल्या शहाण्या, समजूतदार पालकांनी एकच सल्ला दिला, ‘भरपूर वाच. भाषेशी ओळख करून घेण्याचा तो एकमेव मार्ग आहे.’ मग मी झपाटून इंग्रजी वाचायला लागले. हाताशी येईल ते वाचत गेले; पण या सगळ्यात नाटकाचं वाचन सगळ्यात सोपं आणि छान असल्याचं माझ्या लक्षात आलं. शाळेतच आमचा नाटकाशी परिचय झाला होता. मुलांनी एक चिनी नाटक केलं होतं, एक इजिप्शियन नाटक केलं होतं आणि तिसरं ‘डेमन हेडमास्तर’ नावाचं एक नाटक केलं होतं. ग्यारी ब्याल्कॉम नावाचे एक हसरे, आनंदी गृहस्थ दर वर्षी येत असत आणि सातवीच्या मुलांना घेऊन नाटक बसवत असत. त्यांनी एकदा ‘ह्यूगो’ नावाचं एक नाटक बसवलं होतं. या नाटकात खूप गमतीजमती होत्या. एकदा ‘प्रायश्चित’ नावाच्या नाटकात मला एक भूमिका मिळाली. ते मुन्शी प्रेमचंदच्या कथेवर आधारित होतं. मी जेव्हा माझ्या ओळी पाठ करायला लागले, तेव्हा मला त्यात वेगळं असं काहीच जाणवलं नाही, पण जेव्हा मी त्या ओळी मोठ्यानं बोलू लागले, तेव्हा काहीतरी गवसल्यासारखं वाटू लागलं. खूप मोकळं आणि मुक्त झाल्यासारखं वाटू लागलं. ही भावना इतकी वेढून टाकणारी होती की, तिनं माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात कायमचं घर केलं. वास्तविक, मी जी भाषा बोलत होते, ती माझी मातृभाषा नव्हती, पण काहीतरी मूळ गवसल्याचा जो काही अनुभव येत होता, तो वेगळा असल्याचं त्या वेळी मला जाणवलं. हिंदी भाषेशी माझं भावनिक नातं असल्याचं त्या वेळी मला प्रकर्षाने जाणवलं.  

नंतर एकदा कॉलेजमध्ये असताना भाषेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर वर आला. मी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये होते. इथले माझे सवंगडी वेगळेच होते. ते प्रामुख्याने शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेल्या आणि कनिष्ठ मध्यमवर्गातून आले होते; काही तर खेड्यातून आले होते. ज्या पुस्तकांचे मी संदर्भ देत असे, ती पुस्तकं त्यांनी कधी वाचलेली नसत. ऋषी व्हॅलीमध्ये मी इंग्रजाळलेलं कल्चर अनुभवलं होतं. एकीकडे ते मला आपलंसं वाटतं असतानाच दुसरीकडे या मुलांबरोबरचं कॉलेजमधलं जगही मला आपलंसं वाटत होतं; इतकं ते कॉलेज सुंदर होतं. मग मी पुन्हा मराठी वाचू लागले आणि जितकं अधिक वाचू लागले, तितकं मला मूळ गवसल्याचा आनंद होत गेला. जणू काही माझ्यात असलेलं काहीतरी आता फुलून येत होतं. आजवर मी ते टाळलं होतं; पण तरीही मला ‘इनसायडर’ असल्यासारखं वाटत नव्हतं. तरीही कुठेतरी मी मराठी पुस्तकं माहीत असलेली इंग्रजाळलेली मुलगीच होते!  

इथंच माझी लेखक-दिग्दर्शक चेतन दातारशी ओळख झाली आणि मराठी प्रायोगिक रंगभूमीचं एक वेगळं जग माझ्यासाठी खुलं झालं. ‘परंपरा’ नावाचा, सतत डोक्यावर बसणारा, स्वतःचा वेग असलेला एक शब्द मला इथं कायम जाणवत असे, कारण मराठी नाटकाला स्वतःची अशी एक मोठी परंपरा आहे. १९७०पासून जी छबिलदास थिएटरची सुरुवात झाली - विशेषतः अविष्कार गटापासून - जिला ‘सत्यदेव दुबे स्कूल’ म्हटलं जातं, त्या परंपरेचा मी आता भाग झाले होते. हा अनुभव खूपच भारून टाकणारा, छान आणि समृद्ध करणारा होता. मी त्याला सामोरं जाऊ लागले. मराठी रंगभूमीच्या माध्यमातून व्यक्त होण्याच्या साऱ्या शक्यता पाहता, मला नैसर्गिक जगण्याचा तोच एक मार्ग असल्याचं वाटू लागलं. मराठीतून लिहिणं मला अगदी सहज-स्वाभाविकपणे जमायचं. असं वाटायचं, 'जणू ही आपली सहजप्रवृत्ती आहे. विचार करण्यामागची एक सेंद्रिय प्रक्रिया आहे.' मी इंग्रजीला आनंदानं सोडून दिलं.

इरावती कर्णिक यांच्या ‘गाशा’ या नाटकातील एक दृश्य

याच काळात 'आपण मराठी नाटककार आहोत' ही भावना माझ्या मनात दृढ होत गेली. आता मला ‘आउटसायडर’ असल्यासारखं वाटत नव्हतं. इंग्रजीमुळे जी विशिष्ट धारणा मनात निर्माण झाली होती, तिला आता मी शरण जात नव्हते. २ ऑगस्ट २००८ रोजी, म्हणजे चेतन दातारचं निधन होईपर्यंत माझा प्रवास एका विशिष्ट दिशेने व्यवस्थित चालू होता; पण तो गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की, माझी थिएटरची दिशा त्याच्या दृष्टिकोनातून आणि त्याच्या जगातून साकारलेली होती. आता मी स्वतःला विचारू लागले होते की, अशी दृष्टी आणि असं जग माझं स्वतःचं असू शकलं असतं का? होय, पण अर्थात त्यासाठीचं लेखन मला स्वतःलाच करायला लागणार होतं. तोपर्यंत माझी जी दृष्टी तयार झाली होती, ती परंपरानिष्ठ चौकटीला सामोरं गेल्यामुळे झालेली होती. मात्र आता तिलाच आव्हान देण्याची वेळ आली होती.  

याच क्षणी माझ्या लक्षात आलं की, मी अशी व्यक्ती होते, जिनं अनेक प्रकारच्या सांस्कृतिक पार्श्वभूमींमधून आलेल्या मंडळीचं जग अनुभवलेलं होतं. अनेक भाषा आपल्यासमोर अनेक प्रकारची विश्वं खुली करू शकतात, हे मला जाणवलं आणि मी याच जगात उडी मारायचं ठरवलं! जे खूप वेगळं, परकं आहे आणि तरीही ज्या जगात मी वावरत आहे, त्यापेक्षा याच्या कक्षा कितीतरी मोठ्या आहेत. मी ज्या नाटकांचा वर उल्लेख केला, ती मराठीत नव्हतीच, पण त्यांच्यामध्ये आणखी एक काहीतरी गोष्ट होती. ही सारी नाटकं एकमेकांशी केलेल्या संवादातून, कृतीतून जन्मलेली आहेत. हातात पूर्ण संहिता घेऊन तयार असणाऱ्या दिग्दर्शकाप्रमाणे मी कधीही नाटकाला सामोरी गेलेले नाही. अनेक संशोधक, दिग्दर्शक तसंच इतर मंडळी, विशेषतः अभिनेते यांच्याशी संवाद साधत मी माझी संहिता साकार करत गेले. त्यातूनच या संहितांची वेगळी भाषा किंवा नवी संहिता निर्माण झाली.

वेगवेगळ्या प्रकारची माणसं, वेगवेगळ्या प्रकारचे विषय आणि वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती यांना सामोरं जाण्यासाठी मी थिएटरचा उपयोग करत होते. या सर्वांना व्यक्त करण्याजोगी एकच सर्वसाधारण भाषा शोधायची होती. उदा. –  मी ‘गाशा’ नावाचं एक नाटक केलं. ते काश्मिरी पंडितांच्या परागंदा होण्याबाबत आहे. त्यात आसामी नाटककार, पंजाबी स्टेनोग्राफर होता; हैद्राबादी मुस्लीम लाईट डिझायनर होता; तमिळयन वेशभूषाकार होता; एक बिहारी आणि एक काश्मिरी अभिनेता होता, एक बंगाली दिग्दर्शक होता आणि मी मराठी लेखिका होते. या इतक्या बहुविधतेमुळे कधीकधी खूपच मोठे प्रश्न निर्माण व्हायचे. हे नाटक मात्र हिंदीत होतं. या वैविध्यामुळे नाटकात नेमकं काय आलं, हे मी सांगू शकत नाही; पण मला काही लोक सांगतात की, ‘गाशा’ बघताना एक विभागीय अंतर, भौगोलिक संघर्षाचा एक छोटासा धागा नाटकातून वाहताना दिसतो. तेव्हा मला वाटतं की, हा काही योगायोग नाही. थिएटरमधली बहुभाषिकता असलेली रंगभूमी हीच या क्षणाला संधी आहे आणि जवळजवळ मोठी संधी आहे!  

दुसऱ्या भाषेतल्या लेखनात थोडा काळ लोटल्यानंतर माझ्या लक्षात आलं की, अशा प्रकारचं लिखाण ही काही इतकी सरळसोट गोष्ट नव्हती. त्याच्यात अनेक प्रकारच्या फटी होत्या आणि आव्हानं होती... मग हे लिखाण इंग्रजीत असो की हिंदीमध्ये असो. माझ्या लक्षात आलं की, प्रत्येक संस्कृतीची स्वतःची म्हणून काही विधानं असतात आणि जेव्हा वेगवेगळ्या संस्कृती एकत्र येतात, तेव्हा या एकत्रीकरणाच्या घुसळणीतून त्या-त्या संस्कृतींमधल्या अनेक प्रकारच्या विधानांचे प्रतिध्वनी उमटायला सुरुवात होते. कुठल्याही निश्चित अर्गुमेंटमागे नीतीमूल्यं आणि संदर्भ असतात. त्यामुळे हे काही गाडीचा गियर बदलण्याइतकं आणि चटकन प्रतिशब्द वापरण्याइतकं सोपं नव्हतं. त्यासाठी वेगवेगळ्या समुदायांमध्ये होणारे वेगवेगळ्या प्रकारचे वाद-संवाद, त्यांच्या पद्धती समजून घेणं आवश्यक होतं. जेव्हा एखाद्याला हे बारकावे किंवा विशिष्ट भाषिक परंपरेतून येणारे तपशील माहीत नसतात, तेव्हा काहीतरी करण्याची वृत्ती तयार होते.

इरावती कर्णिक यांच्या दोन भावमुद्रा

मी जरा याबद्दल साशंक झाले आणि मला भाषिक दुभंगलेपण आलेल्या व्यक्तिमत्त्वाचं जिणं जगत असल्यासारखं वाटू लागलं. त्यामुळे माझी भाषा हायब्रीड थिंकिंगकडे जातेय की काय आणि त्यामुळे माझं लेखन ज्याला किमान गोष्टींपुरतं वावरणारे होईल की काय असं वाटू लागलं. म्हणूनच वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिताना मला वेगवेगळं विश्व दिसत गेलं. त्याच्या अगोदर लिहिणारे लेखक डोळ्यासमोर येत गेले. ज्यातून एक मोठा प्रेक्षक दिसू लागला, जो आधी या परिघाबाहेर राहत होता. यातूनच 'मराठी नाटककार म्हणून आपली ओळख काय?', याकडे मला पुन्हा यावंसं वाटलं. आणि इथेच थोडासा गोंधळ आहे.  

माझ्या लक्षात आलं की, माझं विश्व थिएटरमधल्या पूर्वसुरींच्या तुलनेत अनेक प्रकारची वास्तवदर्शी चित्रं घेऊन वावरत होतं. त्यामुळेच अनेक प्रकारच्या परंपरा आणि अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या ओळखी मी विकसित केल्या. त्यातून आजचा काळ हा या प्रकारच्या गोंधळानं भरलेला  असल्याचं दिसू लागलं. त्यामुळे माझं काम जितकं वेगवेगळ्या ट्रॅक्सवर गेलं असतं, तितकी माझी ओळख एकासाचीपणापासून दूर गेली असती किंवा माझी विशिष्ट ओळख अधिक तरल आणि लवचीक बनली असती, असं मला वाटत होतं; पण तरीही जेव्हा कधी मी दुसऱ्या भाषेत लिहू पाहते, तेव्हा 'मी माझ्या मातृभाषेवर अन्याय तर करत नाही ना!', अशी भावना मनाला स्पर्शून जातेच. जागतिक संदर्भात बघायचं, तर प्रत्येक भाषा स्वतःची ताकद आणि प्रतिष्ठा यांमधून ज्ञान, व्यापार आणि व्यवसाय यांना पुष्टी देतच असते, आणि सर्व प्रकारच्या संवादाला पोषक ठरते.  

त्यामुळेच आपला मराठी बाणा जोरकसपणे ठसवावा, असं मला वाटायला लागलं की काय? पण यातून आपण आपल्या काळातल्या एका मोठ्या विसंगतीकडे येतो. ती म्हणजे, जितक्या वेगवेगळ्या ओळखी आपण विकसित करू, तितकाच आपल्याला आपल्या निश्चित ओळखीशी संघर्ष करावा लागतो. ज्यांना थिएटरचा काही इतिहास होता किंवा जे एका वाङ्मयीन चळवळीतून किंवा सामाजिक विकासाची एक पार्श्वभूमी घेऊन आले होते, अशा कितीतरी लोकांबरोबर काम करताना माझे त्यांच्याशी मतभेद / संघर्ष झाले. मात्र वेगळे संदर्भ असलेल्या मंडळींसोबत काम करताना मला अधिक घरी (स्वगृही माहेरी?) आल्यासारखं वाटतं; हे माहेर किंवा घर निश्चित संवादांना, निश्चित रंगांना, निश्चित आकाराला पुष्टी देतं. आता माझा सारा संघर्ष आहे, तो आपलं भाषिक उपरेपण आणि त्यातलं दृढीकरण कामात नीटपणे उतरवता कसं येईल याचा!

 

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख