“आकाश जसे दिसते तशी म्हणावी गाणी…”
सदर - चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
केशव परांजपे
  • पं. बिरजू महाराज आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर
  • Sat , 06 May 2017
  • शास्त्रीय संगीत Classical music राग Raag केशव परांजपे Keshav Paranjpe किशोरी आमोणकर Kishori Amonkar कुमार गंधर्व Kumar Gandharva एम.एफ. हुसैन M.F. Husain ‌भीमसेन जोशी Bhimsen joshi बिरजू महाराज Birju Maharaj

चांगलं आणि खूप वाचणाऱ्यांनी शास्त्रीय संगीत ऐकलं पाहिजे. (तुमच्यासारखे) चांगले वाचक आमच्यात यायला पाहिजेत. वाचनाचे ‘डोळे’ असणाऱ्याला ऐकण्याचा ‘कान’ असेल असं नाही, तरीही वाचक आमच्यात यायला हवे. ‘लेखकांतला अर्थशास्त्रज्ञ’ आणि ‘अर्थशास्त्रज्ञातला लेखक’ किंवा ‘खेळाडूतला अभिनेता’ आणि ‘अभिनेत्यातला खेळाडू’ हे शब्दप्रयोग सन्मानाचे नाहीत हे खरं असलं तरी ‘वाचकांतला श्रोता’ आणि ‘श्रोत्यांतला वाचक’ या बिरुदांमध्ये काही हेटाळणीचा वास येऊ नये. चांगला आणि समकालीन अभिरुचीचा वाचक-श्रोता रागसंगीतासमोर उभा ठाकला तर रागसंगीत समकालीन राहू शकेल.

समकालीन म्हणजे नेमकं काय आणि वाचक-श्रोता झाला तर संगीत समकालीन कसं काय होईल असे प्रश्न मला विचारू नका. मला या प्रश्नांची उत्तरं माहीत नाहीत. मुद्दाम उठून कोणी असा संगीतकलेला समकालीन करण्याचा कृत्रिम खटाटोप करावा असंही मी म्हणत नाही (आणि कुणीही म्हणणार नाही.) समकालीनता हे एक मूल्य आहे. प्रत्येक कलेत त्याचा आविष्कार त्या कलेच्या विश्वनियमांनुसारच होईल, व्हावा. पण हे मूल्य रुजावं एवढं नक्की.

पं. कुमार गंधर्वांच्या चाहत्यांत अनेक साहित्यिक होते. त्यातल्या अनेकांना संगीताच्या तंत्राचीसुद्धा तोंडओळख होती. कुमारांनी या साहित्यिक चाहत्यांशी मैत्री केली. अन्य महान संगीत कलाकारांनाही साहित्यिक, चित्रकार, रंगकर्मी, शिल्पकार अशा विविध कलाक्षेत्रांतले चाहते लाभले असणारच. पण त्यांच्यात मैत्री झाली की नाही, हे आपल्याला ठाऊक नाही. त्यांच्यात देव-घेव झाली का, झाली तर कोणत्या पातळीवर झाली, हे आपल्याला ठाऊक नाही.

पं. भीमसेन जोशी यांच्या गायनाबरोबर चित्रकार हुसेन यांनी चित्र काढायचं असे निदान दोन शो झाले असं ऐकिवात आहे. (एक झाला एवढं मला नक्की ठाऊक आहे.) या प्रयोगांविषयी खूप उलट-सुलट चर्चा झाली. उलट आणि सुलट बाजूचे मुद्दे कुणी संगतवार मांडले की नाही, कोण जाणे! भीमनसेनजींच्या गायनातून स्फूर्ती घेऊन पेंटिंग करणं ही बाब व्यवस्थित आकलन होण्यासारखी आहे. परंतु स्फूर्ती ते चित्रपूर्ती हा प्रवास गायनाबरोबर का व कसा जातो याविषयी प्रश्नचिन्हांची मालिका डोळ्यांसमोर उभी राहते. या प्रश्नांची काही उकल पुरेशा गांभीर्यानं केली गेली तर संगीत आणि चित्र या दोन्हींच्या आकलनात भर पडेल.

एनसीपीएमध्ये दहा-बारा वर्षांपूर्वी किशोरीताईंचं गायन आणि पं. बिरजू महाराजाचं नृत्य असा सहप्रस्तुतीचा प्रयोग सादर झाला होता. सुरुवातीला तासभर बिरूज महाराजांनी आपल्या वाद्यवृंदाच्या साथीनं नृ्त्याविष्कार केला. मग पहिला मध्यंतर झाला. त्यानंतर किशोरीताईंनी आपल्या साथीदारांसह शुद्ध नट गायल्या. मग दुसरा मध्यंतर झाला. त्यानंतर दोन मान्यवर कलाकार एकाच वेळी मंचावर आले. कार्यक्रमात एकदा घुंगरू सोडले की पुन्हा बांधायचे नाहीत असं आपलं ब्रीद असल्याचं सांगत बिरजू महाराजांनी घुंगरू न बांधताच नृत्य सादर करायचं असं ठरवलं. बिरजू महाराज उभ्याने मंचाच्या मध्यावर नृत्य सादर करणार, त्या नृत्याला संगत म्हणून एका बाजूला खाली बसून आपण गाणं योग्य ठरणार नाही असं ताईंनी ठरवलं आणि त्या उभ्यानं ऑर्गनच्या साथीनं ‘म्हारो प्रणाम बॉके बिहारी नी’ हे मीरा भजन गायल्या. ‘मोर मुकुट माथ्या तिलक...’ या चरणावर दोन्ही कलाकारांनी कल्पक रचनांची लयलूट केली.

बिरजू महाराज आणि किशोरी आमोणकर या महान कलाकारांच्या एकत्र येण्यातून एवढीच अपेक्षा होती का? अत्यंत उत्स्फूर्त भावभीना राग-खयाल हे किशोरीताईंचं बलस्थान, त्याचा कथकनृत्याशी काय मिलाफ झाला? त्या बॉके बिहारीचं जे बॉकपन ताईंना दिसलं, ज्या अमाप कौतुकानं त्यांनी ते पाहिलं, ते सगळं नृत्यातून उभं राहिलं का? मीरेची ती एक विशिष्ट भावस्थिती-चाल, गायन आणि नृत्य यातून एकजीव होऊन अवतरली का? (मी तो प्रयोग पाहिला पण मला नृत्यातलं काय कळतंय!) गाणं आपल्या वाटेनं जातं, नृत्य आपल्या वाटेनं जातं. कोणी कोणाच्या वाटेला कशाला जावं. वाटा वाकड्या केल्या तर सारंच कोलमडेल.

नृत्य आणि गायन या जुळ्या कलांची ही कहाणी तर इतर प्रयोगांचं काय?

आपापली वेगळी क्षेत्रं असणाऱ्या कलांची अशी मंचीय गळाभेट फार काही साधत नाही. मंचाच्या जागेत त्यांनी एकमेकींची स्पंदनं अनुभवावीत हेच बरं! कुमारजींनी ‘गांधी मल्हार’ या रागाची निर्मिती केली. कुमार, त्यांचं संगीत, त्यांचा कलाविचार न आवडणाऱ्या लोकांत या प्रयोगाची हेटाळणीही झाली. संगीताच्या परिघात राहून नव्याचा वेध घेण्याचा स्तुत्य (आणि माझ्या मते यशस्वीही) प्रयत्न म्हणून ‘गांधी मल्हार’ हा प्रयोग मला खूप महत्त्वाचा वाटतो. गांधी ही एक व्यक्ती आहे, एक गुणसमुच्चय आहे, एक अनुभव आहे. या अनुभवाचं संगीताच्या परिघात पाहिलेलं-दाखवलेलं प्रतिबिंब म्हणजे ‘गांधी मल्हार’! आपल्या गुरूंवर, वास्तव प्रिय जनांवर रचलेल्या असंख्य बंदिशी रागसंगीतात आहेत. गांधी मल्हाराकडे याच उर्मीचं विराट रूप म्हणून पाहता येईल. अस्तित्वात असलेल्या दोन विभिन्न रागांचा आजवर कुणी करून न दाखवलेला मिलाप (जोडराग) किंवा पारंपरिक रागात वर्ज्य असलेला सूर खुबीनं त्या रागात घेणं अशा प्रकारच्या प्रयोगांपेक्षा ‘गांधी मल्हार’ हा प्रयोग (सर्जन) मूलत: वेगळा आहे.

पं. सत्यशील देशपांडे यांनी अनेक ठिकाणी कुमारजींच्या बिहागमधील बंदिशीची जन्मकहाणी सांगितली आहे. ती बंदिशही गाऊन दाखवली आहे. ये मोरा रे मन हरो रे हरो… कौन हो कैसन यहो करम कर राख्यो…आख्यों में भराय रमाय. केलास लेणं पाहून मनाची जी अचंबित अवस्था झाली ती या बंदिशीच्या शब्दांतून बिहाग रागातून कुमारांनी अभिव्यक्त केली. एकट्या कुमारांनीच अशी निर्मिती केली असा दावा नाही, पण कुमार आपल्या निर्मितीचा उगम सांगू शकतात ही गोष्ट खूप उपयोगाची! त्यातून संगीतनिर्मितीकडे पाहण्याची एक वाट सापडते.

किशोरीताईंनी रागाची व्याख्या केली (होती)- ‘राग म्हणजे भाव’. प्रत्येक रागाचा एक विवक्षित भाव आहे, असं त्यांचं अनुभवांती ठाम मत होतं. मग एकाच रागात विविध भाव दर्शवणाऱ्या बंदिशी कशा या प्रश्नावर उत्तर देणं गरजेचं होतं. त्यांनी धैर्य दाखवून उत्तरही दिलं – “अशा बंदिशी रागभावाशी विसंगत आहेत. त्या पारंपरिक असल्या तरी त्या रागभावाशी विरोध करतात, म्हणून मी त्या गात नाही आणि कोणीच त्या गाऊ नयेत.” किशोरीताईंनी सतत नातं सांगितलं ते प्राचीन भारतीय परंपरेशी. बंदिशी या तशा अलीकडच्या, तेव्हा त्या चुकीच्या असू शकतात, असाही त्यांचा युक्तिवाद होता. पण गेल्या पंधरा-वीस वर्षांत किशोरीताईंनीही आपली रागाची व्याख्या अधिक नेमकी करत नेली. राग म्हणजे भाव हे त्या व्याख्येचं सर्वसाधारण धोरण होतं. त्या नंतर म्हणू लागल्या (म्हणजे आधीही म्हणतच होत्या, पण रागाच्या व्याख्येच्या संदर्भात सांगू लागल्या) की, “राग हे चैतन्य आहे, त्याचं एक रूप आहे, त्याचं एक वातावरण आहे.” ग्रंथांमध्ये रागाचं स्वरूप नेमकेपणाने चिमटीत धरता यावं म्हणून रागाची दश लक्षणं सांगितलं आहेत – वादी, विवादी, अनुवादी, अल्पत्व, बहुत्व, न्यास, विन्यास इ. या दहा (अकरा की बारा) लक्षणांनी एका विकसनशील स्वरसमुच्चयाची सुनिश्चिती होते. ताईंचं म्हणणं होतं की, या तंत्रनिष्ठ बाह्य लक्षणांचा अगदी ढोबळमानानेच राग परिचयासाठी उपयोग होतो. राग या चैतन्याचा, त्याच्या भावात्म अस्तित्वाचा परिचय गायकाने करून घेतल्याखेरीज काही खरं नाही. आणि एकदा का तो परिचय झाला की शास्त्र जाणीवपूर्वक पाळावं लागत नाही. तो रागच अभिव्यक्त होण्यासाठी तुमच्यातून वाट काढतो. “संगीत ही सर्वांत अधिक अमूर्त कला आहे. ” सर्व कलांची परिणती शेवटी संगीतात व्हावी! ताई अलीकडे म्हणू लागल्या होत्या की, “प्रत्येक रागाचा एक सूर असतो. कोणता? सारेगम पैकी नाही, त्या पलीकडचा. अत्यंत अमूर्त. प्रत्येक कलाप्रकारातली कलाकृती ज्या सुराकडे जाऊ पाहते तो सूर.”

‘स्वरार्थरमणी’ या किशोरीताईंच्या पुस्तक प्रकाशनाच्या समारंभात किशोरीताई आणि विजयाबाई मेहता यांचा संवाद झाला. बोलण्याच्या ओघात किशोरीताई म्हणाल्या- “तुझं बरं आहे गं, नेपथ्य आहे, प्रकाश आहे, मेक-अप, नाटककाराने लिहिलेलं संवाद-सगळं मूर्त आहे. माझ्यापाशी काय आहे. नुसती हवा.” विजयाबाईंनी काही प्रत्युत्तर दिलं नाही, पण पुढे संभाषणात जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्या म्हणून गेल्या – “हे सगळं मूर्त असलं ना, तरी शेवटी मला पोचवायचं असतं ते अमूर्तच गं बाई!” खरंच, शब्द मूर्त असतात? मग कवी का तळमळत असतो अपारदर्शक, अर्ध पारदर्शक शब्दांतून भावानुभूतीची किरणं आरपार पोचवायला? का ग्रेस म्हणतात- “आकाश जसे दिसते तशी म्हणावी गाणी, देहावरती त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी…”

लेखक अभिनव पदवी महाविद्यालयाचे (भाईंदर, मुंबई) प्राचार्य आहेत.

kdparanjape@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......