सिंको द मेयो : मेक्सिकोचा स्वातंत्र्य दिन
पडघम - विदेशनामा
कॅ. मिलिंद परांजपे
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Thu , 04 May 2017
  • विदेशनामा International Politics सिंको द मेयो Cinco de Mayo मेक्सिको Mexico

हर्मन मेल्व्हील या १९व्या शतकातील अमेरिकन लेखकानं त्याच्या ‘मॉबी डिक’ या प्रसिद्ध कादंबरीमध्ये म्हटलं आहे की, मेक्सिकोचा कुठलाही भाग अमेरिका आपला म्हणून बळकावू शकतं आणि संबंध हिंदुस्थानवर इंग्लंड हक्क सांगू शकतं. त्यावेळची एकंदर राजकीय, सामाजिक परिस्थिती आणि जनतेची मानसिकताच तशी होती. मेक्सिकोचा टेक्सास प्रांत लढाई करून जबरदस्तीनं अमेरिकेनं बळकावला; तर कॅलिफोर्निया, न्यूमेक्सिको, अॅरिझोना, नेवाडा हे संपूर्ण प्रांत, जवळजवळ पूर्ण यूटा आणि कोलोराडोचा थोडा भाग घुसखोरीनं, मग वाटाघाटीनं (ज्याला ‘ट्रीटी ऑफ ग्वाडेलूप हिदाल्गो’ म्हणतात) १८४८मध्ये मिळवला. म्हणजे मेक्सिकोच्या एकूण क्षेत्रफळाचा ५५ टक्के हिस्सा अमेरिकेनं घेतला. अमेरिकेत एक मतप्रवाह असाही होता की, संपूर्ण मेक्सिकोच आपल्याला जोडून घ्यावा.      

१८५७ मध्ये मेक्सिकोत निधर्मी, उदारमतवादी लिबरल पक्ष विरुद्ध  सनातनी यांच्यामध्ये युद्ध सुरू झाले. झुलुआगाच्या नेतृत्वाखालील सनातन्यांनी राजधानी मेक्सिको शहर ताब्यात घेऊन राज्यकारभार चालू केला. बेनिटो हुवारेजच्या लिबरलनी व्हेराक्रुझ बंदरातून उलट प्रतिकार सुरू केला. १८५९ मध्ये अमेरिकेनं हुवारेजच्या लिबरल सरकारला मान्यता देऊन लष्करी मदत केली. लिबरलनी सरशी मिळवून मेक्सिको शहरात प्रवेश केला. १८६१ मध्ये ही भाऊबंदकी संपल्यावर बेनिटो हुवारेज मेक्सिकोचा राष्ट्रपती झाला. त्यावेळेस मेक्सिको इतका कर्जबाजारी झाला होता की, फ्रान्स, स्पेन आणि इंग्लंड या धनको देशांनी दिलेल्या कर्जाचे हप्ते फेडण्यासाठीही त्याचेकडे पैसे नव्हते. अमेरिकेनं खाण उद्योगाचे हक्क मागून त्या बदल्यात पैसे देऊ केले आणि पैसे न फेडल्यास मेक्सिकोचे उत्तरेकडील प्रांत अमेरिकेस तोडून द्यावेत असा करार सुचवला. पण त्याच वेळेस अमेरिकेतच यादवी युद्ध सुरू झालं. अमेरिका स्वतःच पैशाच्या विवंचनेत सापडली. म्हणून अमेरिकेन काँग्रेसनं हा करार होऊ दिला नाही.    

तिकडे फ्रान्स, इंग्लंड आणि स्पेन यांनी लंडनला बैठक घेऊन कर्ज आणि व्याज  वसूल करण्यासाठी त्यांच्या युद्धनौका मेक्सिकोला पाठवल्या. स्पेन आणि इंग्लंडनं मेक्सिकोशी तडजोड केली आणि युद्धनौका मागे घेतल्या, पण फ्रान्सचा सम्राट तिसरा नेपोलियन याच्या मनात वेगळाच विचार होता. त्याला अमेरिका खंडात आपलं एक राज्य स्थापन करायचं होतं. त्याने लष्करी चढाई सुरू केली. मेक्सिको जिंकता येईल असा त्याचा समज होता. व्हेराक्रूझला फ्रेंच सैन्य उतरवून त्याने हुवारेजला पिटाळून लावलं. मेक्सिकोच्या पूर्वेतील पेबला द लॉस एंजेलिस हे गाव काबीज करायला फ्रेंच सैन्य आलं. फक्त २००० मेक्सिकन सैन्य म्हणजे फ्रेंचांच्या सैन्यापेक्षा संख्येनं खूप कमी होतं. त्यांची हत्यारं, तोफा फ्रेंच लष्कराच्या तुलनेत अगदीच कमी प्रतीची होती. पण ५ मे १८६२ रोजी  (सिंको द मेयो) त्यांनी रोमहर्षक प्रतिकार करून फ्रेंच सैन्याचा पराभव केला. तो दिवस मेक्सिकोच्या इतिहासात अजरामर झाला. मेक्सिकन जनतेचं मनोधैर्य एकदम उंचावलं. एका बलाढ्य युरोपीय सत्तेवर  आपण विजय मिळवू शकतो, हा आत्मविश्वास जनतेत आला.  

पण हा उत्साह फार काळ टिकला नाही. पुष्कळ मोठ्या संख्येनं फ्रेंच सैन्य पुन्हा चालून आलं. ते थेट मेक्सिको शहरात घुसलं. फ्रान्सनं ऑस्ट्रियाचा  आर्चड्यूक मॅक्समिलिअनला मेक्सिकोचा सम्राट म्हणून जाहीर केलं. सनातनी पक्षाचे अनेक मेक्सिकन लोक आणि सैन्यातील उच्च अधिकारी मॅक्समिलिअनच्या सरकारला सामील झाले. हे साम्राज्यही फार दिवस राहिलं नाही. हुवारेजच्या गनिमी सैनिकांनी फ्रेंचांना त्राही भगवान करून सोडलं. शेवटी फ्रेंचांनी माघार घेऊन १८६७ मध्ये देश सोडला. मॅक्समिलिअन मात्र पकडला गेला. अनेक देशांनी, व्हिक्टर ह्युगोसारख्या प्रसिद्ध लेखक आणि इतर व्यक्तींनी त्याला जीवदान देण्याची विनंती केली. पण इतर देशांनी मेक्सिकोत ढवळाढवळ करू नये असा धडा शिकवण्यासाठी हुवारेजने त्याला त्याच्या दोन मेक्सिकन सेनापतींसह फायरिंग स्क्वाडसमोर देहान्त प्रायश्चित्त दिलं.

‘सिंको द मेयो’ म्हणजे ५ मे हा मेक्सिकोचा स्वातंत्र्य दिन नसला तरी त्याला स्वातंत्र्य दिनासारखाच मान आहे. (फादर मिग्वेल हिदाल्गो या मेक्सिकन धर्मगुरूने  डोलोरीस गावातल्या चर्चमध्ये स्पेनपासून स्वातंत्र्य जाहीर केल्याचा दिवस १६ सप्टेंबर १८१० आहे. त्याला ‘एल ग्रिटो देल डोलोरीस’ म्हणतात. तेव्हापासून चाललेलं स्वातंत्र्ययुद्ध १८२१ मध्ये संपलं. मिग्वेल हिदाल्गो अविवाहित असला तरी ब्रह्मचारी होता की नाही याची शंका होती.) अमेरिकन लोकांनाही ५ मे हा दिवस विशेष वाटतो. १८६२ मध्ये अमेरिकेत यादवी युद्ध चालू होतं. फ्रेंच अंमल मेक्सिकोत सुरू झाला असता तर यादवी युद्धात फ्रान्स अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यांना मदत करून ती राज्यं उत्तरेपासून कायम तोडण्याची दाट शक्यता होती. अमेरिकन अध्यक्ष मन्रो उदघोषित ‘मन्रो डॉक्ट्रीन’ (१८२३) प्रमाणे अमेरिका युरोपीय देशांना अमेरिकेच्या पश्चिम अर्ध गोलार्धात कुठलीही ढवळाढवळ करू देणार नाही आणि अमेरिका आशिया-आफ्रिका-युरोप या गोलार्धात ढवळाढवळ करणार नाही असं ठरलं होतं. परंतु अमेरिकेतल्या यादवीमुळे बलाढ्य फ्रान्सला थांबवणं त्यावेळेस लष्करीदृष्ट्या शक्य नव्हतं. युरोपीय देशांना कमजोर अमेरिका खंडच हवं होतं. म्हणून पेब्लोचा मेक्सिकन विजय अमेरिकेतही, विशेषशः मेक्सिकन वंशाचे लाखो लोक साजरा करतात.  

अमेरिकेतले जे प्रांत पूर्वी मेक्सिकोचे होते, तिथं आजही स्पॅनिश ही दुसरी भाषा म्हणून शाळेत शिकवली जाते. स्पॅनिश भाषेतली वर्तमानपत्रं, रेडिओ स्टेशनं, टीव्ही वाहिन्या रोजच्या वापरात, व्यवहारात असतात. घरकामाला येणाऱ्या स्त्रिया, माळी, इलेक्ट्रिशियन, हॉटेलातील कर्मचारी इत्यादी बहुतेक स्पॅनिश भाषिक असतात. त्यांच्याशी व्यवहार करणारे डॉक्टर, दुकानदार वगैरे स्पॅनिश बोलू शकतात. मेक्सिकोतून येणारे वैध किंवा अवैध स्थलांतरित अमेरिकेतल्या त्या प्रांतांना परका देश मानतच नाहीत.

मेक्सिकोत ५ मे रोजी सार्वजनिक सुटी असते. पेबला द लॉस एंजेलिसमध्ये जल्लोष असतो. सकाळी ११ वाजता परेड सुरू होते. ती काही तास चालते. त्यात सैन्य, पोलिस, फायरब्रिगेड वगैरें आणि फ्लोट्सचा भाग असतो. ते पाहायला हजारोंच्या संख्येनं पर्यटक येतात.

लेखक निवृत्त नौदल अधिकारी आहेत.

captparanjpe@gmail.com            

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......

महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ‘खेळखंडोबा’ असाच चालू राहू द्यायचा की, त्यावर ‘अक्सिर इलाज’ करायचा, याचा निर्णय घेण्याची एकमेव ‘निर्णायक’ वेळ आलेली आहे…

जनतेला आश्वासनांच्या, ‘फेक न्यूज’च्या आणि प्रस्थापित मीडिया व सोशल मीडियाद्वारे भ्रमित करूनही सत्ता मिळवता येते, राखता येते, हे गेल्या दहा वर्षांत भाजपने दाखवून दिले आहे. पूर्वी सत्ता राजकीय नेत्यांना भ्रष्ट करते, असे म्हटले जायचे, हल्ली सत्ता भ्रष्ट राजकीय नेत्यांना ‘अभय’ वरदान देण्याचा आणि एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना ‘सर्वशक्तिमान’ होण्याचा ‘सोपान’ ठरू लागली आहे.......