टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • पुतळे, आधार कार्ड, कोल्हापुरातील तिरंगा, अमित शहा आणि रामविलास पासवान
  • Wed , 03 May 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या पुतळे Statue आधार कार्ड Aadhar Card कोल्हापुरातील तिरंगा Tiranga अमित शहा Amit Shaha रामविलास पासवान Ram Vilas Paswan

१. गावात, शहरात वा सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींचे पुतळे उभारण्याबाबत राज्य सरकारने कडक नियमावली जाहीर केली आहे. कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक वाहतुकीच्या आड येणाऱ्या पुतळ्यांच्या उभारणीला परवानगी दिली जाणार नाही. सरकारी अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय पुतळे बसवल्यास, संबंधित व्यक्ती वा संस्थांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. आता यापुढे पुतळा उभारण्यास परवानगी द्यायची की नाकारायची, याबद्दलचे अधिकार जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक व अन्य अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या समितीला राहणार आहेत.

आता किती सालापर्यंतचे वाहतूक अडवणारे बेकायदा पुतळे, मंदिरं, मशिदी, इतर प्रार्थनास्थळं नियमित करून घेतले जाणार आहेत, तेही सांगा. इथे कोणत्याही दगडाला शेंदूर फासला की तो देव बनतो आणि आसपासची जागा (सरकारी असेल तर बेस्टच) बळकावायला फुल सपोर्ट देतो. त्याच्या कोपाच्या भयाने कोणतंही सरकार त्यावर कधीही कारवाई करत नाही आणि भावुक भाविक लगेच सहिष्णुता वगैरे विसरून हिंस्त्र होतात. ही नियमावली कडक करण्याआधी पहिल्यापासून असलेले अडथळे उद्ध्वस्त करून दाखवले, तर त्याला काही अर्थ. अन्यथा, अशा नियमांना भाविक अनुयायी भीक घालत नाहीत.

..............................................................................

२. देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत उंच राष्ट्रध्वज उभारण्याचे ऐतिहासिक कार्य कोल्हापूरमध्ये घडले आहे. येथे येणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये हा ध्वज देशभक्तीची ऊर्जा निर्माण करेल. यानिमित्ताने आज कोल्हापूरने महाराष्ट्राला एक नवी ओळख दिली आहे. महाराष्ट्र दिनी राज्यातील सर्वांत उंच आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच राष्ट्रध्वज भेट दिल्याबद्दल कोल्हापूरकरांचे अभिनंदन केले पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  येथे केले. कोल्हापूर रस्ते सौंदर्यीकरण प्रकल्पांतर्गत कोल्हापूर पोलीस उद्यानामध्ये ३०३ फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. यावेळी, हेलिकॉप्टरमधून ध्वजावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

अध्यक्षमहोदय, महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांमधल्या सगळ्याच पोलिस उद्यानांमध्ये असे उंच उंच ध्वजस्तंभ उभारले, तर महाराष्ट्राचं नाव गिनीज बुकात जाईल. अंतराळातूनही ध्वजस्तंभ दिसून महाराष्ट्राचा गौरव वाढेल. देशविदेशांमधून पर्यटक ध्वजस्तंभ पाहायला येतील. शिवाय, सगळं राज्य देशभक्त होऊन जाईल तुमच्या कल्पनेतल्याप्रमाणे. मग तूरडाळ, आत्महत्या, शेतीचं कर्ज, सगळ्या क्षेत्रांमधली पीछेहाट वगैरेंवर काही बोलायला नको, करायलाही नको. जरा हेलिकॉप्टरं ध्वजस्तंभांना धडकणार नाहीत, एवढी गर्दी टाळली म्हणजे झालं.

..............................................................................

३. उत्तर प्रदेशाची सत्ता मिळवल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते अधिक नम्र झाले आहेत, अशा शब्दांत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले. भाजप फक्त माणसांची टोळी नाही, तर देशभक्तांची संघटना आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. देशातील ६० टक्के भागावर भाजपने वर्चस्व मिळवले आहे. त्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिवस-रात्र मेहनत घेतली, असेही शहा म्हणाले. उत्तर प्रदेशमधील यशामुळे देशात जातीयवाद, घराणेशाही तसेच तुष्टीकरणाचे राजकारण संपल्याचे शहा यांनी नमूद केले.

जगात काहीही घडू शकतं, यावर विश्वास बसवणारी घटना आहे ही. अमित शहा हे कार्यकर्त्यांना नम्रतेचे धडे देणार असतील, तर काही दिवसांनी आदित्यनाथ धर्मनिरपेक्षतेचे पाठही पढवताना दिसतील आणि केजरीवाल संयमाचे धडे देतील. शहा यांची निवडक भाषणं सर्व भाषांमध्ये अनुवादित केली तर ते इंग्रजीत वुडहाऊस, बुकवाल्ड, मिकेश यांची, मराठीत पु. ल. देशपांड्यांची, हिंदीत शरद जोशी, हरिशंकर परसाई यांची सुट्टी करून टाकतील आणि अभिजात विनोदी वाङ्मयात स्थान मिळवतील, यात शंका नाही.

..............................................................................

४. विरोधी पक्षांनी सुरू केलेल्या ऐक्याच्या प्रयत्नांवर केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष रामविलास पासवान यांनी जोरदार टीका केली आहे. पंतप्रधानपदासाठी २०२४ पर्यंत जागा रिक्त नसल्याने या नेत्यांनी आपला वेळ वाया घालवू नये, असे पासवान यांनी म्हटले आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दादरा-नगर हवेली येथे पार पडल्यानंतर वार्ताहरांशी बोलताना पासवान यांनी, मोदी यांनी दलितांसाठी आखलेल्या योजनांचं कौतुक केलं. मोदी हेच २०२४ पर्यंत पंतप्रधानपदी राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आणि समजा पासवान यांचं भाकित चुकलं आणि दुसराच कोणी नेता पंतप्रधान झाला तर रामविलास पासवान त्याच्याही मंत्रिमंडळात कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात असंच शेपूट हलवत उभे असतील, यातही काही शंका नाही. जो पेजेला देतो, तो शेजेला घेतो, हे त्यांच्या राजकारणाचं कायमस्वरूपी तत्त्व राहिलेलं आहे आणि त्यांच्यासारखा तत्त्ववादी नेता शोधून सापडायचा नाही.

..............................................................................

५. बंगळुरुच्या सेंटर फॉर इंटरनेट अॅण्ड सोसायटीच्या (सीआयएस) एका रिपोर्टमुळे पुन्हा एकदा आधार कार्डाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. या अहवालानुसार जवळपास साडे तेरा कोटी आधार कार्डांची गोपनीय माहिती उघड झाल्याची शक्यता आहे. अनेक सरकारी विभागांनी करोडो लोकांची आधार कार्डमधील माहिती सार्वजनिक केली असून कोणीही ही माहिती मिळवू शकतो. चार डाटाबेसचा अभ्यास केल्यानंतर हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. मात्र या रिपोर्टमध्ये डाटा लीक होण्यामागे कोणतं कारण आहे याची माहिती देण्यात आलेली नाही. जाणुनबुजून हा लीक करण्यात आला की कोणत्या त्रुटीमुळे लीक झाला हे कळू शकलेलं नाही.

आपल्या देशासारख्या भोंगळ देशात इतक्या महत्त्वाचं आणि व्यक्तिगत गोपनीय माहितीशी संबंधित एक सरकारी काम गल्लीबोळातल्या चवन्नीछाप एजन्सी चालवत असताना मुळात आधार कार्डावरची माहिती सुरक्षित होती, ही अंधश्रद्धा कोणी बाळगली होती, कोणी पसरवली होती? या माहितीचा गैरवापर होऊन आधार कार्डावर श्रद्धा ठेवण्यात आघाडीवर असलेले ‘भाविक’च निराधार होणार आहेत, हे सांगायला कोणत्याच कार्डाची गरज नाही.

editor@aksharnama.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......