मरियम-वेब्स्टरच्या शब्द कारखान्यातील फेरफटका
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
जेनिफर श्युझलर, मराठी अनुवाद- सविता दामले
  • कोरी स्टॅम्पर आणि ‘वर्ड बाय वर्ड- द सिक्रेट लाईफ ऑफ डिक्शनरीज’चं मुखपृष्ठ
  • Tue , 25 April 2017
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो मरियम-वेब्स्टर Merriam-Webster कोरी स्टॅम्पर Kory Stamper वर्ड बाय वर्ड- द सिक्रेट लाईफ ऑफ डिक्शनरीज Word by Word: The Secret Life of Dictionaries

मरियम-वेब्स्टर या इंग्रजीतील शब्दकोशाविषयीचा हा मूळ इंग्रजी लेख ‘द न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये २२ मार्च २०१७ रोजी प्रकाशित झाला होता. मूळ इंग्रजी लेखासाठी Tony Luong या The New York Timesच्या छायाचित्रकाराने छायाचित्रे काढली आहेत. ती या लेखात (अपवाद पुस्तकाच्या मुखपृष्ठांचा) जशास तशी वापरली आहेत.

……………………………………………………………………………………………

अमेरिकेतील सर्वांत जुने शब्दकोशनिर्माते मरियम-वेब्स्टर हे मागील काही वर्षांत समाजमाध्यमांतील बिनीचे शिलेदारही बनले आहेत. ‘and’ किंवा ‘or अशा शब्दांआधीचे स्वल्पविराम, लिंगवाचक सामान्यनामे, regardless हा  शब्द योग्य आहे की, irregardless इत्यादी गरमागरम विषयांवरील ऑनलाईन व्हिडिओ चर्चांमध्ये त्यांचे संपादक ‘मुख्य’ आसनावर विराजमान झालेले असतात. त्यांनी ट्विटरवर टाकलेलं भाष्य सनसनाटी असतं. त्यात चुरचुरीत विनोद असतो आणि कधीकधी त्या दिवसाच्या एखाद्या बातमीवर तीक्ष्ण राजकीय तिरंदाजीही केलेली असते.

कोरी स्टॅम्पर या शब्दकोशकार नवनवीन शब्द विकसित करणाऱ्या आणि शाब्दिक करामती करणाऱ्या नामवंत गटाच्या सदस्या आहेत. ‘ऑक्टोपस’ या शब्दाचं बहुवचन काय अशासारखे त्यांचे व्हिडिओ हजरजबाबी आणि खुसखुशीत विनोदी असतात. ‘हार्मलेस ड्रजरी’ या नावाने त्यांचा स्वतःचा ब्लॉगही  आहे. त्या ब्लॉगमुळेच तर लोकांना फेसबुकवर ‘कोरी स्टेम्पर फॅन क्लब’ काढण्याची प्रेरणाच मिळाली. त्यांच्या एका ऑनलाईन चाहत्यानं तर त्यांच्या केसांमधील अगदी सूक्ष्म बदलही टिपून ठेवला आहे (त्यांचे केस जांभळे आहेत).

एवढं असलं तरी मरियम-वेब्स्टर कंपनीचे व्यवहार जुन्या पद्धतीच्या इमारतीतूनही चालत असतातच. अजूनही त्यांचं मुख्य कार्यालय लहानशा ‘न्यू इंग्लंड’ शहरातच वसलेलं आहे. याच ठिकाणी मरियम बंधूंनी १८४० साली नोव्हा वेब्स्टरच्या शब्दकोशाचे हक्क विकत घेऊन ‘अमेरिकन इंग्रजी वेगळी असावी’ ही त्याचीच संकल्पना विकसित केली होती.

याच महिन्यात कोरी स्टॅम्पर यांचं नवं पुस्तक आलं. त्याचं नाव ‘वर्ड बाय वर्ड- द सिक्रेट लाईफ ऑफ डिक्शनरीज’. त्या निमित्तानं आम्ही भेटलो तेव्हा मरियम-वेबस्टर कंपनीच्या बेसमेंटमध्ये फेरफटका मारता मारता वेगवेगळ्या शब्दांतील साम्य आणि फरक यांचा प्रवास त्यांनी मला घडवून आणला.

त्यांनी मला एका मार्गिकेतून नेलं तेव्हा तिथं जुन्या काळातील फायलिंग कॅबिनेट्सचं संग्रहालयच मला दिसलं.  त्यानंतर तळघरातील बंदिखाना असावा अशा एका खोलीत डोकावण्याची संधी मला मिळाली. पॉडकास्ट स्टुडिओ (जिथं संगणकावर टाकण्यासाठी डिजिटल ऑडिओ फाईल तयार केली जाते असा स्टुडिओ) म्हणून त्या खोलीचा वापर होत होता. त्यांनी मला कंपनीच्या जुन्या ठेव्यातील वस्तूही दाखवल्या. त्यात स्थानिक शाळकरी मुलांनी बनवलेल्या परंतु आता जीर्णशीर्ण झालेल्या वस्तू होत्या. त्याशिवाय एक हातपाय असलेली आणि हवा भरून फुगवता येणारी शब्दकोशाची प्रतिकृतीही होती. कोणे एके काळी जाहिरातीसाठी तिचा वापर होत असावा.

परंतु आश्चर्यानं तोंडात बोट घालायला लावणारी एक वस्तू तिथं होती, ती म्हणजे ‘बॅकवर्ड इंडेक्स’. त्यात जवळजवळ ३,१५,००० कार्डं होती आणि त्या कार्डांवर शब्दांची उलटी स्पेलिंगे लिहिली होती.

A first edition of Noah Webster’s A Compendious Dictionary of the English Language (1806)

त्या इंडेक्ससंबंधी बोलताना कोरी स्टॅम्पर म्हणाल्या, “माहिती उलटसुलट करण्याची एक वेगळी पद्धत म्हणून या प्रकाराकडे पाहिलं गेलं. १९३० ते १९७० या काळात अधूनमधून हा उद्योग करण्यात येत असे. कुणीतरी व्यक्ती इथं बसायची आणि एकेक कार्डावरील शब्द उलट्या क्रमाने टाईप करत जायची. काही काळानं मग डोकंच चालेनासं व्हायचं, तेव्हा ते काम थांबायचं.’’

‘पॅंथिअन’ने मागच्या आठवड्यात ‘वर्ड बाय वर्ड’ हे पुस्तक प्रकाशित केलं त्या पुस्तकामागची मुख्य धारणा ‘विक्षिप्तपणा’ हीच आहे. शब्दकोशकार या नात्यानं त्या पुस्तकात कोरी स्टॅम्पर यांनी आपल्या आठवणी आणि आत्मचिंतनपर भाष्य लिहिलं आहे. शब्दकोश लिहिताना मेंदू कसा घुसळून निघतो याचं विस्तृत विवेचनही त्यांनी त्यात दिलं आहे. ‘द अटलांटिक’ या मासिकानं त्या पुस्तकाबद्दल लिहिलंय की, “हा इंग्रजी भाषेचा अभ्यासपूर्ण, रोचक आणि क्वचित केव्हातरी पातळी सोडून लिहिलेला असा इतिहास आहे. शिवाय या पुस्तकात योग्य व्याकरणाचा आग्रह धरणाऱ्या पंथाची विनोदी आणि वैचारिक खिल्लीही उडवली आहे.’’

कोरी स्टॅम्पर त्या पुस्तकाला, “इंग्रजीतील शब्दकोशांना उद्देशून लिहिलेलं परंतु संमिश्र भावना असलेलं प्रेमपत्र” असं म्हणतात.

त्या म्हणतात, “आपण वापरलेल्या भाषेवरून इतर लोक आपली काय किंमत करतील याची लोकांना खूप भीती वाटत असते. तुम्ही जेव्हा शब्दकोशांबद्दल लोकांशी बोलू लागता, तेव्हा ते दुसऱ्याच कुठल्यातरी गोष्टींबद्दल बोलू लागतात. म्हणजे आपल्याला कुठले शब्द प्रिय आहेत, कुठले शब्द अजिबात आवडत नाहीत, भाषेचा एखादा भाग न आवडणं यात काय चुकीचं आहे? वगैरे वगैरे विषयांवरच बोलू लागतात.’’

The second edition of the Webster’s New International Dictionary, which a 1934 poster advertised as “one of the thickest books ever printed.”

४२ वर्षीय कोरी स्टॅम्पर या कोलोरॅडो प्रांतात लहानाच्या मोठ्या झाल्या. मध्ययुगीन इतिहास हा मुख्य विषय घेऊन त्यांनी स्मिथ कॉलेजातून पदवी शिक्षण पूर्ण केलं. १९९८ साली मरियम-वेब्स्टरमध्ये नोकरीसाठी त्यांची मुलाखत घेतली गेली, तेव्हा त्या कामात आपल्याला व्याख्याही लिहायच्या आहेत हे कळल्यावर त्यांना खूपच आश्चर्य वाटलं होतं.

“त्याची काय गरज असाच माझ्या मनात तेव्हा विचार आला होता. शब्दकोश तर पूर्वीच लिहून ठेवलेला असतो ना, मग असं का? तेच मला कळलं नव्हतं.’’ जुन्या आठवणी सांगताना कोरी स्टॅम्पर म्हणाल्या.

कोरी स्टॅम्पर यांचा शब्दकोशलेखन कलेत कसा प्रवेश झाला, हे ‘वर्ड बाय वर्ड’ या पुस्तकात त्यांनी उलगडून दाखवलं आहे. शब्दकोश लिहिणं म्हणजे सतत उत्क्रान्त होणाऱ्या, सतत बदल होणाऱ्या भाषेशी झटापट करणं. कुठल्याही शब्दाच्या व्याख्येचे व्याकरण, उच्चार, व्युत्पत्ती  असे वेगवेगळे पैलू असतात, त्यांची आणि अन्यही बऱ्याच गोष्टींची त्यांनी एकेका प्रकरणातून वाचकांना सफर घडवली आहे.

त्यांच्या आठवणीनुसार ‘ब्ल्यू प्लेट’ या शब्दाची व्याख्या त्यांनी सर्वप्रथम लिहिली होती. त्यानंतर आणखी हजारभर तरी व्याख्या लिहिण्यात त्यांचा हातभार लागला.    

Inside a file at Merriam-Webster, an editorial note from the 1950s on the word “cracker” declared that it “could not be defined as a ‘biscuit’ nor as a ‘wafer.’”

‘take’ या शब्दाशी त्या महिनाभर झगडल्या. त्या शब्दाचा कॉलम इंचांत पाहिला तर सगळ्यात दीर्घ होता. (हा कॉलम फारच कमी लोक वाचतात हेही त्यांनी विनोदानं कबूल केलं)

कंपनीच्या संपूर्ण शब्दकोशाची (unabridged dictionary) सुधारित आवृत्ती सध्या छापील निघत असली तरी तिची भविष्यातील आवृत्ती ऑनलाईनच निघणार आहे. या शब्दकोशासाठी ‘God’ या शब्दाचे सुधारित अर्थ शोधायला त्यांना सर्वाधिक काळ म्हणजे जवळजवळ चार महिने लागले. त्यासाठी केवळ अफाट वाचनच नव्हे तर धर्मोपदेशक, धर्मशास्त्रवेत्ते आणि विद्वानांशी सल्लामसलतही करावी लागली. त्यांनी ई-मेलने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं हे विद्वान बरेचदा दीर्घ अशा तात्त्विक निबंधाच्या स्वरूपात द्यायचे.

यातूनच एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण येतो. तो म्हणजे एखाद्या शब्दाच्या अर्थाविषयी वाद झाला तर खरा अर्थ काय आहे हे सांगण्याचं काम शब्दकोश करतात असं बऱ्याच लोकांना वाटतं. परंतु कोरी स्टॅम्पर म्हणतात की, अमुक गोष्ट म्हणजे काय हे सांगणं शब्दकोशांचं काम नाही. लोक प्रत्यक्ष भाषा वापरताना एखादा शब्द किती वेगवेगळ्या तऱ्हेने वापरतात, त्याची वस्तुनिष्ठ आणि सर्वसमावेशक यादी बनवणं हे त्यांचं काम आहे.

शुद्ध व्याकरणयुक्त भाषा वापरण्याचा आग्रह धरणारे लोक ‘irregardless’ हा शब्द प्रत्यक्षात असूनही त्याच्या वापराबद्दल काव काव करतात. अशा लोकांबद्दल कोरी स्टॅम्परना फारशी आपुलकी नाही. (शब्दयोगी अव्यय वापरून वाक्य पूर्ण करायला किंवा to go, to like अशा infinite verb मध्ये एखादे क्रियाविशेषण किंवा तत्सम शब्द घालायलाही त्यांची ना नाही.) परंतु कधीकधी त्यांना असेही लढे लढावे लागले, जे खूप प्रतिष्ठेचे होते. त्यांचंही वर्णन त्यांनी या पुस्तकात केलं आहे.

Empty file cabinets in the basement at Merriam-Webster’s headquarters.

‘न्यूड’ हा शब्द ‘काळा’ या अर्थाने रंगविषयक बनला आहे. त्यामागे असलेली वांशिक गृहितके मरियम-वेब्स्टर शब्दकोशात दिसतात. त्याची चर्चा एका प्रकरणात केली आहे. तसंच २००९ साली या शब्दकोशाने ‘विवाह’ या शब्दाच्या अर्थाची आणखी एक उपव्याख्या केली होती. त्यात “समलिंगी लोकांचे एकत्र येणे, जे कायद्याने मान्य असेलच असे नाही’’ असं म्हटलं होतं. त्यामुळे खूप गदारोळ माजला होता. त्याबद्दलही लिहिलं आहे.

त्यामुळे टीका करणाऱ्या ई-मेल्सची रांगच लागली. परंतु तरीही वाचकांची सर्वसाधारणपणे पत्रे येतात ती मैत्रीपूर्णच असतात. जेव्हा मरियम-वेब्स्टरने आपले व्हिडिओ सुरू केले, तेव्हा चाहत्यांच्या एवढ्या ई-मेल्स आल्या की, त्यामुळे कोरी स्टॅम्परना ‘आस्क द एडिटर व्हिडिओ हॉटनेस चार्ट’ बनवण्याची प्रेरणा मिळाली.

“चष्मा लावलेला संपादक फारच ‘हॉट’ आहे बुवा, असं लोक लिहायचे. ते हसून हसून पोट दुखेलसं होतं, कारण आम्ही सर्वच संपादक चष्मे लावत होतो.’’

स्प्रिंगफिल्ड्स येथील कचेरीत आगंतुक म्हणून उपटणाऱ्या लोकांना तिथं प्रत्यक्ष माणसं फारशी दिसत नाहीत. स्वतः कोरी स्टॅम्पर घरातूनच काम करतात. त्यांचं घर फिलाडेल्फिया शहराच्या वेशीवर आहे. हे आगंतुक लोक जेव्हा शब्दकोशाच्या कचेरीला भेट देतात, तेव्हा तिथला बाहेरचा हॉल भीती वाटावी एवढा रिकामा असतो. टेबलाच्या पार्टिशनच्या आडून कुणाचीच डोकी वर पाहत नाहीत. फक्त कुठून तरी अस्पष्ट कुजबुज तेवढी ऐकू येते.

Webster’s Seventh New Collegiate Dictionary, from 1969, was asymmetrically bound so it could hold itself up — an innovation that failed to catch on because of design flaws.

वरच्या मजल्यावर कामाच्या मुख्य ठिकाणी ज्यांच्यात बदल संभवतच नाही अशा फायलींचा ढिगारा आहे. त्या फायली एकमेकींशी ऐतिहासिक काळापासून गप्पा मारताहेत, आरडाओरडा करत आहेत असंच वाटतं.

खोलीच्या मध्यभागी लाल केबिनेट्स आहे. त्यात ठेवलेल्या फायलींत वेगवेगळ्या लोकांचे मौलिक विचार लाखोंच्या संख्येनं संग्रहित करून ठेवले आहेत. कागदाच्या कपट्यांवर व्यक्तिगत वापराचे शब्द लिहिलेले आहेत. १९ व्या शतकापासून ते १९८० सालापर्यंतची वृत्तपत्रे, पुस्तके, रेडिओ, पॅकेजिंग आणि अन्य साहित्य यांच्यातून ते शब्द शोधून लिहून ठेवलेले आहेत.

हल्लीचे शब्दकोशकार संगणकीय आधार घेऊन काम करतात. कोरी स्टॅम्परनी एक खण उघडला आणि त्यातून एक ‘गुलाबी’ कागद बाहेर काढला. त्या कागदावर पूर्वी ‘संपादकीय टिपणी’ लिहिली जात असे. १९५० साली लिहिलेल्या त्या कागदावर लिहिलं होतं की, ‘क्रॅकर’ या शब्दाची व्याख्या ‘बिस्किट’ अशी करता येणार नाही आणि ‘वेफर’ अशीही करता येणार नाही.

“बघा, यातून तुम्हाला कळतं की नाही आमचं काम काय आहे ते?’’ त्या हलक्या आवाजात सांगतात.

शब्दकोश हे ‘माहिती आणि तंत्रज्ञाना’चे एक रूप असतील तर ती इमारत म्हणजे एक जुनाट आणि शिळा कॅटलॉग असावा तशी वाटते. खालच्या मजल्यावरील गॅलरीत १९३४ सालचा एक जाहिरातफलक आहे. त्यावर मरियम-वेब्स्टरच्या नव्या आंतरराष्ट्रीय शब्दकोशाच्या दुसऱ्या आवृत्तीची जाहिरात आहे. ती आवृत्ती आत्तापर्यंत छापलेल्या सर्वांत जाडजुड ग्रंथांपैकी एक आहे असं त्या जाहिरातीत लिहिलं आहे. (एवढ्या जाडजुड ग्रंथांची बांधणी करण्याचं तंत्रज्ञान आज अस्तित्वातच नाही असं कोरी स्टॅम्परनी सांगितलं.)

In addition to the updated digitized databases at Merriam-Webster, there is an analog vestige known as the Consolidated Files, containing millions of citations of word uses.

तिथं काही विचित्र बांधणीची पुस्तकंही आहेत. ‘सेव्हन्थ न्यू कॉलेजिएट’ या १९६९ साली छापलेल्या पुस्तकाची बांधणी सममितीत नव्हती, परंतु ती पद्धत वाचकांना फारशी आकर्षक आणि सोयीची वाटली नाही. कारण ते पुस्तक केंद्रापासून दूरच्या भागात उघडलं की, खालीच पडायचं.

आज काल छापील शब्दकोशांची जागा विनामूल्य मिळणाऱ्या ऑनलाईन शब्दकोशांनी घेतली आहे. त्यामुळे शब्दकोश-व्यवसाय बंद पडू लागला आहे. मरियम-वेब्स्टर ही ‘एनसायक्लोपिडिया ब्रिटानिका’ची उपकंपनी आहे. कोरी स्टॅम्पर त्यांचं पुस्तक लिहित असतानाच कंपनीने बऱ्याच लोकांना नोकरीतून कमी केलं होतं. (सध्या त्यांच्याकडे सर्व मिळून ७० कर्मचारी कार्यरत आहेत.)

अमेरिकेतील शब्दकोशनिर्मात्या कंपन्यांत आजमितीला शब्दकोशकार पदावर काम करणारे लोक ५० आहेत असा कोरीचा अंदाज आहे. तसं असलं तरी नोव्हा वेब्स्टरच्या काळात त्यांचं काम जेवढं तगडं आणि जोमदार होतं, तेवढंच ते आजही आहे असं त्यांना वाटतं.

“काही पुस्तकी किडे ऑफिसात बसून निर्विकारपणे भला थोरला मजकूर वाचत आहेत आणि त्यातून एखाद्या शब्दाचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी कसा होतो ते चाळण्या लावून लावून शोधत आहेत हे पाहाणंच किती मजेशीर आहे.’’ कोरी सांगतात, “ही खरोखरच एक विचित्र असली तरी लोकशाही प्रक्रिया आहे.’’

लेखिका प्रसिद्ध अनुवादक आहेत.

savitadamle@rediffmail.com

……………………………………………………………………………………………

मूळ इंग्रजी लेख वाचण्यासाठी पहा -

……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......