नॉट सो सिंपल : ब्लड सिंपल
सदर - न-क्लासिक
चिंतामणी भिडे
  • ‘ब्लड सिंपल’चं पोस्टर
  • Sun , 23 April 2017
  • इंग्रजी सिनेमा न-क्लासिक ब्लड सिंपल Blood Simple एथन कोएन Ethan Coen जोएल कोएन Joel Coen एम. एमेट वॉल्श M. Emmet Walsh डॅन हेडाया Dan Hedaya फ्रान्सेस मॅकडरमांड Frances McDormand

ज्याने आपल्या बायकोला आणि तिच्या प्रियकराला मारण्याची सुपारी ज्याला दिली आहे, तो त्यांना न मारता ज्याने सुपारी दिली आहे, त्यालाच मारतो. का? कारण त्या दोघांना मारल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी सुपारी दिलेल्याला मारावं लागलंच असतं. मग तीन खून करण्यापेक्षा एक खून करून तेवढेच पैसे मिळणार असतील तर बिघडलं कुठे?

हे डबल क्रॉस आहे? हो आहे! पण जिथं कोणीच विधिनिषेध बाळगत नाही आणि जो तो फक्त आपल्यापुरतंच बघतोय, तिथं असल्या डबल क्रॉसविषयी कोणाला कसली टोचणी लागण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे प्रायव्हेट डिटेक्टिव्ह लोरेन विसेरलाही आपल्या या कृत्याचा ना खेद ना खंत. उलट आपण किती स्मार्ट आहोत असंच त्याला वाटत राहतं आणि तिथंच तो फसतो.

त्याचा सिगरेट लायटर खुनाच्या ठिकाणी राहतो. पुरावा मागे राहू नये, म्हणून खरं तर त्याने खून केलेला. आणि नेमका तिथंच त्याचा लायटर राहावा? आहे ना गंमत? खरं तर ही करुण गंमत आहे आणि अशा अनेक गमतीजमती ‘ब्लड सिंपल’ या १९८४ सालच्या चित्रपटात आहेत.

कोएन ब्रदर्स म्हणून नावारूपाला आलेल्या आणि गेल्या तीन दशकांत हॉलिवुडपटांवर आपला अमिट ठसा उमटवलेल्या दिग्दर्शक द्वयीतल्या जोएल कोएनचं हे दिग्दर्शकीय पदार्पण. जोएल आणि त्याचा भाऊ एथन यांनी मिळून तो लिहिला आणि एथन कोएनने त्याची निर्मिती केली.

४० आणि ५०च्या दशकातल्या न्वार चित्रप्रकारातला हा चित्रपट. पण आदरांजली वाहायची म्हणून वगैरे काही तो बनवलेला नाही. तसलं काही दिग्दर्शकाच्या डोक्यात नाही. त्याने अत्यंत नैसर्गिकरित्या हा चित्रपट बनवलाय आणि त्यामुळेच यात घडणाऱ्या घटनाही नैसर्गिक क्रमानं घडतात. कुठेही एखादी घटना ओढूनताणून, घडवून आणलेली अशी नाही. एकातून दुसरी, दुसऱ्यातून तिसरी अशी घटनांची साखळी बनत जाते, त्यात कथेतली पात्रं अडकतात आणि अटळ शेवटाकडे जातात.

ज्यूलियन मार्टी (डॅन हेडाया) हा श्रीमंत बारमालक. आपल्या बायकोचं, अॅबीचं (फ्रान्सेस मॅकडरमांड) कोणाशी तरी अफेअर सुरू आहे, असा त्याला दाट संशय आहे. त्यामुळे तो तिच्यामागे प्रायव्हेट डिटेक्टिव्ह लॉरेन विसेर याला लावतो. विसेर त्याला अॅबी-आणि मार्टीच्या बारमध्ये काम करणारा रे यांचं अफेअर असल्याचे पुरावे देतो. दुखावलेला मार्टी या दोघांना उडवण्याची सुपारी विसेरला देतो. अट एकच : दोघांचे मृतदेहही कोणाच्या हाती लागता कामा नयेत. माझ्या घराच्याच मागे इन्सिनरेटर आहे... मार्टी त्याला सांगतो.

पण विसेर मार्टीला डबल क्रॉस करतो. त्याच्या डोक्यात वेगळाच प्लॅन शिजतो. तो अॅबीच्या पिस्तुलाने मार्टीला संपवतो आणि अॅबीच्या सुपारीसाठी ठरलेले १० हजार डॉलर घेऊन तिथून निघून जातो. थोड्या वेळाने तिथे आलेल्या रेला अॅबीची पिस्तुल बघून वाटतं की, तिनेच मार्टीला संपवलं. अॅबीवरच्या प्रेमापोटी तो खुनाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. अद्याप पूर्ण न मेलेल्या मार्टीला जिवंत पुरायची वेळ त्याच्यावर येते. तो तेही करतो, पण त्याचं संतुलन ढासळतं. तो अॅबीशी पूर्वीप्रमाणे वागू शकत नाही. इथं अॅबीला त्याच्यात अचानक झालेल्या बदलाचं कारण समजत नाही. पण दोघांच्या संवादांमधून परस्परांविषयी गैरसमज निर्माण होतो. अॅबीने मार्टीचा काटा काढला, अशी रेची ठाम समजूत होते, तर रेने मार्टीचं काहीतरी बरं-वाईट केलं, असं अॅबीला वाटू लागतं. मार्टीच्या बारमधला दुसरा एक कर्मचारी मॉरिस तिला सांगतो की, रे पासून सावध रहा, हल्ली तो एकदम विचित्र वागायला लागलाय. त्यातच मार्टीच्या केबिनमध्ये तिला रेचा हातोडा सापडतो.

रे आणि अॅबी बोलत असताना फोन घणघणतो. अॅबी फोन उचलते, पण समोरून कोणीच बोलत नाही. अॅबीला वाटतं मार्टीनेच फोन केला, ती रेला तसं सांगते. त्यावर रे खिन्न हसतो आणि तुझी इच्छा असेल तर मी तुझ्या मार्गातून दूर होतो, असं म्हणून तिथून निघून जातो.

इकडे विसेरला आपलं लायटर सापडत नाही. तो लायटरचा शोध घेऊ लागतो. आधी रेच्या घरी जातो. तिथं सापडत नाही, म्हणून मार्टीच्या बारमध्ये येतो, तिथंही ते सापडत नाही. रे किंवा अॅबी या दोघांपैकी कोणाकडे तरी आहे, अशी त्याची पक्की समजूत होते, म्हणून तो त्या दोघांच्या मागे लागतो.

हा जो सगळा घटनाक्रम आहे, तो इतक्या सहजपणे उलगडतो की, प्रेक्षक म्हणून आपणही हताशपणे तो बघत राहतो. विसेरने मार्टीला डबल क्रॉस केलं नसतं तर? रे आणि अॅबी परस्परांशी मोकळंपणे बोलले असते तर? विसेरचं लायटर मार्टीच्या इथं राहिलं नसतं तर? कितीतरी गोष्टी आपसूक टळल्या असत्या. पण सगळ्याच व्यक्तिरेखा दैवगती असाव्यात अशा प्रकारे अपरिहार्य वाटचाल करत राहतात.

मार्टीला गोळी लागूनही तो पूर्ण मरत नाही. अॅबीला वाचवण्यासाठी म्हणून धडपडणाऱ्या रेला ज्यावेळी मार्टी अद्याप मेलेलाच नाही, हे समजतं, तेव्हा तो त्याला मारायचा प्रयत्न करतो. पण त्याचं धाडसच होत नाही. पण अखेरीस त्याच रेला मार्टीला जिवंत पुरावं लागतं.

हा संपूर्ण सीक्वेन्स अतिशय लक्षवेधक आहे आणि त्याचा मार्टीला पुरण्यात होणारा शेवट करुण आहे. रस्त्यावर कसाबसा रांगणाऱ्या मार्टीला रे आपल्याकडच्या फावड्याने मारू बघतो, पण त्याची हिंमत होत नाही. मारावं की न मारावं, या द्विधा मन:स्थितीत तो असतानाच समोरून गाडी आल्यामुळे नाईलाजाने त्याला मार्टीला उचलून पुन्हा गाडीत टाकावं लागतं. शेवटी तो त्याला तसंच पुरण्याचा निर्णय घेतो. खड्डा खणून तो मार्टीवर माती टाकत असतानाच मार्टी काहीसा भानावर येतो आणि खिशातलं पिस्तुल काढून रेवर रोखतो. चापही ओढतो, पण त्याच्या दुर्दैवाने पिस्तुल रिकामं असतं. रे अधिक त्वेषाने खड्ड्यात माती लोटू लागतो. मार्टीचा घशातून निघणारा घोगरा आवाज आपल्याला अस्वस्थ करून सोडतो.

न्वारचा सगळा जामानिमा यात आहे. नवऱ्याला फसवणारी बायको आहे, तिचा प्रियकर आहे, हाताशी पैसा असूनही फार काही करू न शकणारा नवरा आहे, प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे, रस्त्याच्या बाजूचे दुय्यम/तिय्यम दर्जाचे मॉटेल्स आहेत, पैशाच्या लोभी, स्वार्थी, प्रसंगी दुसऱ्याचा जीवही घेणाऱ्या व्यक्तिरेखा आहेत आणि इथलं कुणीच चांगलं अथवा वाईट नाही. सगळ्याच परिस्थितीच्या भवऱ्यासह गरगर फिरणाऱ्या. त्यांचा स्वत:वर ताबा नाही. त्यांच्या दोऱ्या भलत्याच कोणाच्या तरी हातात आहे. कप्तानाचं नियंत्रण सुटलेलं गलबत जसं समुद्रात लाटा आणि वाऱ्यांच्या दिशेनुसार भरकटत राहतं, तशा यातल्या व्यक्तिरेखा फिरत राहतात.

पण हा नुसताच न्वार नाही. त्याच्या पलिकडे अनेक गमतीजमती यात दिग्दर्शकाने केल्या आहेत. मुळात अॅबी मार्टीला सोडून जातेय ती रेच्या प्रेमाखातर नाही. तिचं दुसऱ्याच कोणावर तरी प्रेम आहे. रे तिला पळून जायला मदत करतोय. पण वाटेत ती त्याला आवडत असल्याचं रे सांगतो आणि दोघे जवळ येतात, एकत्र राहू लागतात. म्हणजे पुढचं सगळं जे महाभारत घडतं, त्याचा वास्तविक मुळात रेशी काही संबंधच नसतो. तो अनाहूतपणे त्यात ओढला जातो.

अॅबी आणि रेचं अफेअर असल्याचं समजल्यावर नेमकं काय करावं, हे मॅटीला समजत नाही. तो बराच वेळ विचार करत राहतो. हा प्रसंगही विलक्षण सुरेख आहे. रेचं घर आणि मार्टीचा बार आलटून-पालटून दिसतो. रेच्या घरात रे एका खोलीत सोफ्यावर झोपलाय. दुसऱ्या खोलीत अॅबी पलंगावर झोपलीये आणि तिसरीकडे मार्टी आपल्या बारमधल्या केबिनमध्ये डोक्यावर गरगर फिरणाऱ्या पंख्याकडे बघत एकटाच काहीतरी विचार करत बसलाय. पार्श्वभूमीवर पियानोचं अफलातून पार्श्वसंगीत आहे. शांतपणे झोपलेला रे, अस्वस्थ अॅबी आणि विचारमग्न, आतल्या आत धुमसणारा मार्टी यांना आलटून-पालटून दिग्दर्शक दाखवतो. या तिन्ही व्यक्तिरेखांना तो पुरेसा अवसर देतो. अॅबी उठून रेच्या खोलीत येते, तिथेच त्याच्या शेजारी झोपते. सकाळ झाल्यावर उठून मागच्या खोलीत येते आणि आपल्या पर्समध्ये काहीतरी शोधत असतानाच तिच्या कानावर कुत्र्याचा श्वासोच्छवास येतो. एका कोपऱ्यात तिला ओपेल दिसतो, मार्टीचा अल्सेशियन. त्याचक्षणी मागून मार्टी तिच्यावर झडप घालतो. तिच्या तोंडावर हात दाबून तिला बाहेर आणतो. पण तो तिचं काही बरं-वाईट करणार इतक्यात अॅबी त्याचं एक बोट वाकवते, तो वेदनेनं कळवळत असतानाच त्याच्या पोटात एक लाथ मारते. त्यासरशी मार्टी कोलमडतो आणि भडाभडा ओकतो.

हा प्रसंग एकाच वेळी थ्रिलिंग, विनोदी आणि करुण आहे. लेखक एथन कोएन आणि दिग्दर्शक जोएल कोएन यांची कमाल आहे. संपूर्ण सिनेमाभर त्यांनी हे मिश्रण कायम ठेवलंय. यात कॉमिक प्रसंग आहेत, पण त्यांना अंधारी किंवा करुण किनार आहे. विसेर मार्टीला रे आणि अॅबीच्या मृतदेहांचे फोटो दाखवतो, तेव्हाही मार्टी अस्वस्थ होतो आणि बाथरूममध्ये जाऊन भडाभडा ओकतो. तो दाखवतो तेवढा टफ नसतो. खरं तर त्याचं हृदय सशाचं आहे, पण बायकोनं आपल्याला फसवलं आणि आपण काहीच करू शकत नाही, याचा त्याला जास्त राग असतो.

पात्रांचा नैसर्गिक प्रवास दाखवताना लेखक आणि दिग्दर्शक कोणाचीच बाजू घेत नाहीत. सामान्यत: कथेच्या केंद्रस्थानी असलेल्या व्यक्तिरेखेच्या दृष्टिकोनातून चित्रपट घडत असतो. प्रेक्षक म्हणून आपणही त्या व्यक्तिरेखेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पडद्यावर चाललेल्या घडामोडी बघत असतो. पण ‘ब्लड सिंपल’मध्ये हा ‘पॉइंट ऑफ व्ह्यू’ सतत बदलत राहतो. त्यामुळे प्रेक्षक म्हणून आपण तटस्थपणे या व्यक्तिरेखांच्या बाबतीत घडणाऱ्या करुण गंमतीची मजा लुटू शकतो.

त्यातल्या त्यात रेचं आपल्याला वाईट वाटतं. त्याचा बिचाऱ्याचा काहीच दोष नसताना तो नाहक मारला जातो. जिच्यासाठी सगळी उस्तवार केली, तीच शेवटी त्याच्यावर संशय घेऊ लागते. हा आपल्याच जिवाचं काही बरं-वाईट नाही ना करणार, या विचारापर्यंत ती येऊन पोहोचते. मार्टीला याने मारलं, आता हा आपल्यालाही इजा करणार, असं तिला वाटत असतानाच कुठून तरी अचानक एक गोळी येते आणि रेच्या छातीचा वेध घेते. रे कोसळतो. कोणीतरी येत असल्याची चाहूल लागताच अॅबी बाथरूममध्ये लपते. पण बाथरूममध्ये आपण सुरक्षित नाही, हे कळताच ती खिडकीतून पलिकडच्या रूममध्ये जाते. इकडे विसेर तिचा शोध घेत येतो. बाथरूममध्ये बघतो, तिथं कोणीच नसतं. खिडकी उघडी दिसते म्हणून खिडकीतून बाहेर डोकावतो, तिथंही कोणी दिसत नाही. पण भिंतीला लागूनच असलेल्या शेजारच्या खोलीत कोणीतरी असावं, असा त्याला अंदाज येतो. तो खिडकीतून हात लांब करून बाजूची खिडकी उघडायचा प्रयत्न करतो, तेवढ्यात तिथं असलेली अॅबी त्याच्या हातावर खिडकीचं तावदान जोरात पाडते आणि काचकन त्याच्या हातात सुरा खुपसते. तो वेदनेनं कळवळतो. अॅबी तिथून निघून जाते आणि पुन्हा पहिल्या खोलीत येते, तिथं तिला टेबलवर ठेवलेलं आपलं पिस्तुल दिसतं. इथं अतीव वेदनेनं कळवळणारा विसेर कसाबसा हातातून सुरा काढतो आणि बाथरूमच्या दरवाजापाशी येऊ लागतो. त्याने दरवाजा उघडायच्या आधीच अॅबी गोळी झाडते. बाथरूमच्या दरवाजातून गोळी आरपार जाऊन विसेरच्या शरीराचा वेध घेते. तो कोलमडतो.

सुटकेचा नि:स्वास टाकत अॅबी म्हणते, ‘मी तुला घाबरत नाही, मार्टी!’

इकडे दरवाजाच्या पलिकडे कोसळलेला विसेर जोरात हसतो आणि म्हणतो, ‘मॅडम, माझी जर त्याच्याशी भेट झालीच तर मी तुमचा निरोप अवश्य देईन.’

विसेरच्या या अखेरच्या संवादातला हा विक्षिप्त विनोद चित्रपटात ठायीठायी आहे. त्याचबरोबर, आपल्या मागे नेमकं कोण आणि का लागलंय, हे अॅबीला अखेरच्या क्षणापर्यंत ठाऊक नसणं, रेने मार्टीला मारलं म्हणून तिचं रेवर संशय घेणं, त्याच्यापासून दुरावणं आणि शेवटी आपल्या बंदुकीच्या गोळीने जिचा वेध घेतला तो मार्टीच होता, असं तिला वाटणं, हे सगळंच मोठं करुण आहे. विसेरच्या बाबतीतसुद्धा जे घडतं ते आयरॉनिकच म्हटलं पाहिजे. तीन खून करण्यापेक्षा एकच केलेला बरा म्हणून तो रे आणि अॅबीऐवजी मार्टीला डबलक्रॉस करून त्यालाच मारतो. आणि नंतर आपलं लायटर या दोघांपैकीच कोणाकडे तरी आहे, या समजुतीतून दोघांचाही काटा काढायची पाळी त्याच्यावर येते आणि त्या प्रयत्नात तो स्वत:च मारला जातो. रे तर आधीच त्याचं काहीही देणंघेणं नसताना प्राण गमावून बसलाय. आणि अॅबीच्या बाबतीत बोलायचं तर मार्टी मेला, रेही मेला आणि मार्टीचे पैसेही तिच्याकडे नाहीत. परिस्थितीच्या निष्ठूर जाळ्यात अडकलेल्या या चारही व्यक्तिरेखा अखेरीस परिस्थितीपुढे पराभूतच होतात.

जोएल आणि एथन या कोएन ब्रदर्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या द्वयीचा हा पहिलाच चित्रपट. चित्रपट बनवायला पैसे नव्हते म्हणून दोघांनी आधी या चित्रपटाचं एक ट्रेलर बनवलं आणि जवळपास वर्ष-दीड वर्षं विविध लोकांना ते ट्रेलर दाखवून कसेबसे १५ लाख डॉलर उभे केले. पण दोघांची मेहनत फळाला आली. बॉक्स ऑफिसवर त्यावेळी हा चित्रपट फारसा चालला नाही, पण प्रतिष्ठेच्या नवोदित दिग्दर्शकांसाठी प्रतिष्ठेचं व्यासपीठ असलेल्या सनडान्स चित्रपट महोत्सवात चित्रपटाला ग्रँड ज्यूरी प्राइज मिळालं. त्यानंतर टोरँटो, कान, न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवल अशा विविध मानाच्या चित्रपट महोत्सवांमध्ये तो गाजला. कोएन ब्रदर्सने पुढच्या काही चित्रपटांमधून आपला दबदबा निर्माण केल्यानंतर चित्रपटप्रेमींचं त्यांच्या या पहिल्या चित्रपटाकडे लक्ष गेलं आणि त्यानंतर त्याला कल्ट फॉलोइंग मिळालं. प्रायव्हेट डिटेक्टिव्ह विसेरची भूमिका साकारणारा एम. एमेट वॉल्श आणि मार्टीच्या छोट्याशाच भूमिकेत आपली छाप पाडणारा डॅन हेडाया यांच्या अफलातून भूमिका हे ‘ब्लड सिंपल’चं खास वैशिष्ट्य. अफलातून पार्श्वसंगीत ही आणखी एक प्रभावी बाजू. वर उल्लेख केलेल्या, अॅबी मार्टीच्या पोटात लाथ मारते आणि तो ओकतो त्या संपूर्ण प्रसंगात ज्या क्षणी अॅबीला मार्टीचा कुत्रा दिसतो, तिथून तो प्रसंग संपेपर्यंत नुसता कुत्र्याच्या हापण्याचा पार्श्वसंगीतासारखा वापर केलाय. प्रसंग जसजसा उत्कर्षबिंदूकडे जातो, तसतसं त्या हापण्याची तीव्रताही चढत्या भाजणीने वाढत जाते.

आज ‘ब्लड सिंपल’ प्रदर्शित होऊन जवळपास ३३ वर्षं झाली. या वर्षांत काळ आमूलाग्र बदलला, चित्रपट निर्मितीचं तंत्रज्ञान बदललं, पण ‘ब्लड सिंपल’वर मात्र काळाची पुटं बिल्कुल चढली नाहीत. आजही या चित्रपटातले संदर्भ तितकेच कायम आहेत. ग्रेट चित्रपटाची निशाणी यापेक्षा वेगळी काय असते? आणि तरीही क्लासिक चित्रपटांमध्ये त्याची गणना होऊ नये, हे चित्रपटापेक्षाही प्रेक्षकांचं दुर्दैव.

लेखक मुक्त पत्रकार आहेत.

chintamani.bhide@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......