डेव्हिड धवन : निजाम ऑफ नॉन्सेन्स
सदर - इनसाइडर
अमोल उदगीरकर
  • डेव्हिड धवन आणि त्यांचे काही चित्रपट
  • Sat , 15 April 2017
  • इनसायडर Insider अमोल उदगीरकर Amol Udgirkar गोविंदा Govinda डेव्हिड धवन David Dhawan शक्ती कपूर Shakti Kapoor कादर खान Kader Khan दादा कोंडके Dada Kondke

बहुसंख्याना आवडणाऱ्या कलाकारांची किंवा त्यांच्या कलाकृतीची आपल्याकडे ज्या प्रमाणात समीक्षा व्हायला हवी, त्या प्रमाणात होताना दिसत नाही. सिनेमा क्षेत्राला पण हे लागू पडतं. बहुतेक समीक्षक बहुसंख्य प्रेक्षकांना आवडणाऱ्या कलाकृतीला उथळ किंवा वाह्यात असं लेबल लावून त्या कलाकृतीची\कलाकाराची वासलात लावून टाकतात. सिनेमा हा वैयक्तिक आवडीनिवडीचा विषय असला तरी बहुसंख्यांना ही कलाकृती का आवडली याचं तटस्थ सखोल विश्लेषण व्हायला हवं. डेव्हिड धवन आणि त्याचा सिनेमा हा अशाच दुर्लक्षाचा बळी ठरला. फराह खानसारख्या व्यावसायिक सिनेमा देणाऱ्या दिग्दर्शिकेपासून ते कायम वेगळी वाट चोखाळणाऱ्या अनुराग कश्यपपर्यंत सगळ्यांचाच डेव्हिड हा आवडता दिग्दर्शक आहे. फराह खानने तर डेव्हिडला 'निजाम ऑफ नॉन्सेन्स' (ढोबळमानाने ‘वात्रटपणाचा सम्राट’) असा ‘किताब’ दिला आहे. तर अनुराग कायम त्याच्या मुलाखतीमध्ये सांगत असतो की, ‘मला छोट्या बजेटच्या फिल्म्सचा डेव्हिड धवन बनायचं आहे.’ काहीतरी आहे डेव्हिडमध्ये हे नक्की.

एका मध्यमवर्गीय घरात जन्माला आलेल्या डेव्हिडला भारतीय सिनेमे बघणाऱ्या अनेक प्रेक्षकांप्रमाणेच आपण हिंदी सिनेमाचा हिरो व्हावं असं वाटायचं. त्याला पुण्यात फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये अभिनयाच्या कोर्सला प्रवेशही मिळाला होता. पण नंतर त्याने तो निर्णय बदलला. अभिनयाच्या कोर्सला प्रवेश घेतलेल्या इतर मुलांचा अभिनय पाहून आपण किती खोल पाण्यात आहोत याचा अंदाज त्याला आला आणि त्याने एडिटिंगच्या कोर्सला प्रवेश घेतला. राज कपूरसारख्या दिग्दर्शकाचं असं मत होतं की, सिनेमा हा एडिटिंगच्या टेबलवर बनतो. एडिटिंगचं काम हे क्लिष्ट आणि वेळखाऊ असतं. तुम्ही चित्रित केलेलं फुटेज कितीही चांगलं असलं तरीही जर एडिटरने आपलं काम व्यवस्थित केलं नाही तर सिनेमाची वाट लागू शकते. त्यामुळे एका चांगल्या एडिटरला सिनेमाची चांगली जाणीव असणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे अनेक एडिटर पुढे जाऊन दिग्दर्शक बनतात.

याचं अजून एक उदाहरण म्हणजे सध्याचा आघाडीचा दिग्दर्शक राजू हिराणी. डेव्हिडलाही दिग्दर्शनाचा किडा चावलाच. त्याने दिग्दर्शित केलेले पहिले तीन सिनेमे काही फारसा चमत्कार दाखवू शकले नाहीत. पण राजेश खन्ना आणि गोविंदाला घेऊन बनवलेला 'स्वर्ग' सुपरहिट झाला आणि नंतर डेव्हिडला मागे वळून बघण्याची गरज पडली नाही. सुरुवातीच्या काळातले डेव्हिडचे सिनेमे बटबटीत भावनांचे प्रदर्शन करणारे, नाहीतर मारधाड करणारे असत. 'आँखे'पासून डेव्हिडने आपल्या कारकिर्दीचा गियर बदलला. 'आँखे'मध्ये विनोदी प्रसंगात गोविंदा, चंकी पांडे, कादर खान या मंडळींनी धुमाकूळ घातला होता. प्रेक्षकांनी या विनोदी प्रसंगांना बंपर प्रतिसाद दिला. आपल्याला प्रेक्षकांची नाडी कळाली आहे हा विश्वास डेव्हिडला या चित्रपटापासूनच मिळाला. 'आँखे' नंतर सतत दशकभर डेव्हिडने सातत्याने हिट सिनेमे दिले. हा एकांड्या निर्मात्यांचा काळ होता. बॉलिवुडमध्ये आर्थिक आघाडीवर आणि इतरही अनेक आघाड्यांवर अनागोंदी होती. व्यावसायिकता पण फारशी रुजलेली नव्हती. मुख्य नट स्वतःला पाहिजे त्यावेळेला सेटवर यायचा आणि पाहिजे तेव्हा निघून जायचा. त्याच्याभोवती चमच्यांचं कोंडाळं असायचं. त्यांच्या खाण्यापिण्याचा आणि इतर शौकांचा खर्च झक मारून निर्मात्याला करावा लागायचा. शाहरुख, आमिर आणि सलमान ही खान मंडळी अजून बस्तान बसवण्यातच गुंग होती. आज त्यांच्या प्रत्येक सिनेमावर जशा प्रेक्षकांच्या उड्या पडतात आणि त्यांच्या चित्रपटांना बंपर ओपनिंग मिळते, तशी तेव्हा परिस्थिती नव्हती. त्या काळात वितरकांची पसंद डेव्हिड आणि गोविंदाच्या पिक्चरला असायची.

त्या काळातलं दुसरं चलनी नाणं म्हणजे नाना पाटेकर! तेव्हा नानाच्या बॉलिवुड कारकिर्दीचा सुवर्णकाळ चालू होता. अशा काळात सेटवर नेहमीच उशिरा येण्याबद्दल प्रसिद्ध असणाऱ्या गोविंदासारख्या नटाला घेऊन,बजेटच्या बाहेर न जाता चित्रपट बनवणं हे आव्हान डेव्हिडने यशस्वीरीत्या पेलून दाखवलं. चित्रपटाची आर्थिक बाजू त्याने खूप चांगल्या प्रकारे सांभाळली. त्याने कधीही भव्यदिव्य बजेटचे चित्रपट बनवले नाहीत. त्याच्या चित्रपटांनी नेहमीच नफा मिळवला याचं एक कारण म्हणजे चित्रपटाच्या निर्मितीचा खर्च त्याने नेहमीच नियंत्रणात ठेवला. त्याचं चित्रपटनिर्मितीचं हे मॉडेल आदर्शवत मानलं जातं. त्यामुळे जेव्हा अनुराग कश्यपसारखा दिग्दर्शक असं म्हणत असतो की, ‘मला छोट्या बजेटच्या फिल्म्सचा डेव्हिड धवन बनायचं आहे,’ तेव्हा त्याला हा संदर्भ असतो. 

डेव्हिड धवन आणि आपले दादा कोंडके यांच्यामध्ये दिग्दर्शक म्हणून बरीच साम्यं आहेत. दोघांनी कारकिर्दीच्या एका टप्प्यानंतर विनोदी चित्रपट मोठ्या प्रमाणावर केले. दोघांनीही आपल्या चित्रपटांमध्ये अश्लील संवादांचा आधार घेतला होता. पण दोघांमधलं सगळ्यात मोठं साम्य म्हणजे त्या दोघांचाही 'अनअपोलोजेटिक' दृष्टिकोन. आपल्या प्रेक्षकांना काय पाहिजे आणि त्यांना काय आवडत याची पुरेपूर जाण त्यांना होती. आणि प्रेक्षकांना जे हवं ते आपल्या चित्रपटातून बिनदिक्कत यांनी दिलं. प्रेक्षकांना पाहिजे ते देताना समीक्षक किंवा अभिजन वर्ग काय म्हणेल यांची या दोघांनीही मुळीच पत्रास बाळगली नाही. म्हणून या दोघांवरही हे समाजात 'बॅड इन्फ्लुएन्स' वाढवतात, अशी माध्यमांमधून भरपूर टीका केली. पण या दोघांनीही या टीकेविरुद्ध दुर्लक्षाचं हत्यार वापरलं.  

डेव्हिडचा विषय निघतो तेव्हा गोविंदाचा विषय आपसूक निघतोच. दोघांनीही ‘हिरो नंबर वन’, ‘कुली नंबर वन’, ‘साजन चले ससुराल’ असे तब्बल एकवीस चित्रपट एकत्र केले. त्यातले बहुतेक चित्रपट सुपरहिट आहेत. गोविंदा हा नवाज, इरफान, मनोज वाजपेयी यांच्या तोडीचा अभिनेता आहे, असं मी जेव्हा जेव्हा बोलतो, तेव्हा लोक माझ्याकडे भूत बघितल्यासारखं बघतात. त्यांचंही काही चूक नाही. गोविंदाला आपण कुठल्या प्रतीचे अभिनेते आहोत हे कळलं असेल का याबद्दल शंका आहे. गोविंदा आयुष्यात कधी कलात्मक सिनेमाच्या वाट्याला गेला नाही. त्याचे जवळपास सगळेच चित्रपट मासेस श्रेणीत मोडणारे असल्यामुळे त्याच्याकडे समीक्षकांनी कधी गंभीरपणे बघितलं नाही. अभिजन वर्ग त्याच्या भडक कपड्यांमुळे, काही डबल मिनिंग गाण्यांमुळे त्याच्याकडे बघून नाक मुरडतो. यात अभिनेता गोविंदा नेहमीच दुर्लक्षिला गेला. त्याच्या 'हत्या' चित्रपटात एक प्रसंग आहे. एका मुक्या मुलासमोर तो आपलं फ्रस्टरेशन व्यक्त करत आहे, असा तो प्रसंग आहे  कसली जबरी अॅक्टिंग केली आहे त्यात गोविंदाने.

'हिरो नंबर वन'मध्ये हा एका घरात नौकर म्हणून काम करत असताना त्याचा लक्षाधीश बाप कादर खान गुराख्याच्या वेशात त्याला चोरून भेटायला येतो, तेव्हा गोविंदाने हळवेपणाचा काय जबरी अभिनय केलाय! ‘दुल्हेराजा’मध्ये रविना टंडनला तिचा बाप कादर खान (जो की चित्रपटात याचा कट्टर शत्रू असतो) कसा भारी आहे, हे तो ज्या खर्जात सांगतो तो प्रसंग असलाच भारी. त्याच्या प्रत्येक चित्रपटात हमखास एक इमोशनल प्रसंग असतो आणि तो ज्या ताकदीने करतो त्याला आपसूक दाद दिली जाते. तो जितका उत्तम डान्सर आहे, तितकाच उत्तम अभिनेताही आहे. दुर्दैव एवढंच की, हे सगळं तुकड्यातुकड्यात आहे. गोविंदाचे चित्रपट अनेकांच्या आयुष्यातला विरंगुळा आहे. आज लोक गोविंदाच्या चित्रपटाला 'डोकं बाजूला ठेवून पाहायचा पिक्चर' म्हणतात, तेव्हा ते श्रेय गोविंदाइतकंच दिग्दर्शक डेव्हिडचंही आहे, हे ते अनेकदा विसरतात. शक्ती कपूर आणि कादर खान यांची कारकीर्द घडवण्यात डेव्हिडचा मोठा हात आहे. 

२००१ साल हे अनेक अर्थाने बॉलिवुडने कात टाकण्याचं वर्ष होतं. मल्टिप्लेक्स हळूहळू चित्रपटांच्या अर्थकारणाच्या मध्यवर्ती येऊ लागले होते. बदलत्या काळाची गणितं न कळल्यामुळे आणि तरुण प्रेक्षकांच्या आवडीनिवडीचा अंदाज न आल्यामुळे डेव्हिड अडगळीला जाण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्याने या काळातही काही हिट्स दिले, पण एकूणच तो ज्या ‘मॅजिक टच’बद्दल प्रसिद्ध होता, तो हरवत चालला होता. सध्या तो त्याच्या वरुण धवन या मुलाला घेऊन 'जुडवा २' बनवत आहे. ‘जुडवा’ या त्याच्या हिट चित्रपटाचाच हा दुसरा भाग आहे. अजूनही तो मनाने नव्वदच्या दशकात वावरत असल्याचं हे लक्षण आहे असं वाटतं. असो. पण जेव्हा जेव्हा भारतीय चित्रपटांचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा तेव्हा त्यात हजारी मनसबदार म्हणून का होईना डेव्हिडचा उल्लेख नक्की असेल. आणि तो इतिहास डेव्हिडप्रमाणेच अनअपोलोजेटिक असेल हे नक्की. 

लेखक फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.

amoludgirkar@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright Aksharnama, 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Manoj Raskar

Mon , 17 April 2017

अक्षरशः पूर्णपणे उचललेले चित्रपट, चोरलेली गाणी, चोरलेले सीन्स, regressive स्टोरी, misogyny असून सुद्धा लेखक डेविड धवन ची तळी का उचलतोय हे काही कळत नाही. मनोरंजनाच्या नावाखाली अतिशय टुकार चित्रपट बनत होते ९० च्या दशकात.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......