टॅरँटिनो वजा टॅरँटिनो
सदर - न-क्लासिक
चिंतामणी भिडे
  • ‘जॅकी ब्राउन’चं पोस्टर,
  • Sun , 09 April 2017
  • न-क्लासिक जॅकी ब्राउन Jackie Brown क्वांटिन टॅरँटिनो Quentin Tarantino पाम ग्रेअर Pam Grier सॅम्युअल जॅक्सन Samuel L. Jackson रॉबर्ट फ्रेजर Robert Forster ब्रिजेट फोंडा Bridget Fonda मायकल कीटन Michael Keaton रॉबर्ट डी नीरो Robert De Niro

तुम्ही क्वांटिन टॅरँटिनोचे डायहार्ड फॅन आहात? त्याच्या सिनेमातली हिंसा, विक्षिप्त व्यक्तिरेखा, गमतीशीर संवाद, त्याचं अफलातून टेकिंग, स्वत:ची अशी खास व्हिज्युअल स्टाइल, एडिटिंग पॅटर्न यावर तुम्ही फिदा आहात? मग तुम्ही त्याचा ‘जॅकी ब्राउन’ अजिबात बघू नका! कारण यातलं काहीच ‘जॅकी ब्राउन’मध्ये नाही.

आणि टॅरँटिनोची वैशिष्ट्यंच जर त्याच्या सिनेमात नसतील तर तो सिनेमा कशाला बघायचा?

तुम्ही क्वांटिन टॅरँटिनोचे डायहार्ड फॅन आहात? त्याच्या सिनेमातली हिंसा, विक्षिप्त व्यक्तिरेखा, गमतीशीर संवाद, त्याचं अफलातून टेकिंग, स्वत:ची अशी खास व्हिज्युअल स्टाइल यावर तुम्ही फिदा आहात? मग तुम्ही ‘जॅकी ब्राउन’ बघाच! कारण या सगळ्याच्या आहारी न जाताही टॅरँटिनो किती अफलातून सिनेमा बनवू शकतो, याचं ‘जॅकी ब्राउन’ हे आदर्श (आणि एकमेव) उदाहरण आहे.

टॅरँटिनोच्या सिनेमाचा साचा ठरलेला आहे. त्याने सिनेमात नवी भाषा आणली, नवी स्टाइल आणली, हे सगळं खरं असलं तरी आता त्याच्या सिनेमात नेमकं काय बघायला मिळणार आहे, याचा अंदाज त्याच्या प्रेक्षकांना असतोच. ‘इन्ग्लोरियस बास्टर्ड्स’, ‘जँगो अनचेन्ड’ हे त्याचे सिनेमे महत्त्वाकांक्षी होते. एपिक, लार्जर दॅन लाइफ, भव्यदिव्य काहीतरी बनवण्याची त्याची महत्त्वाकांक्षा हे चित्रपट बघताना ठायीठायी दिसते. ‘रिझर्व्हायर डॉग्ज’ आणि ‘पल्प फिक्शन’ या त्याच्या पहिल्या दोन चित्रपटांनी तर क्राइम थ्रिलर्सची परिभाषाच बदलून टाकली होती. हे सगळे चित्रपट आणि ‘किल बिल’चे दोन्ही भाग यामध्ये स्टाइल आणि टेक्निकवर अतोनात भर आहे. त्याच्या या शैलीचे चाहते जगभर, विशेषत: तरुण वर्गात मोठ्या प्रमाणावर आहेत. जगभरातील चित्रकर्त्यांवर टॅरँटिनोच्या या शैलीचा गहिरा परिणाम झालाय. टॅरँटिनोच्या शैलीत चित्रपट बनवणं ही मधल्या काळात उदयोन्मुख दिग्दर्शकांची महत्त्वाकांक्षा बनून गेली होती. स्टार सिस्टिमभवती फिरणाऱ्या चित्रपटसृष्टीत इतकं कल्ट फॉलोइंग क्वचितच एखाद्या दिग्दर्शकाच्या वाट्याला येतं.

आपल्याकडे अनुराग कश्यपने ते स्थान मिळवलं. पण अनुरागने टॅरँटिनोच्या शैलीची निव्वळ कॉपी न करता त्याच्या शैलीला व्यक्तिरेखांच्या सघनतेची जोड दिली. टॅरँटिनोच्या व्यक्तिरेखा लार्जर दॅन लाइफ असतात, रोजच्या आयुष्यात आपण आणि ते कधीच समोरासमोर येणार नसतो. अनुरागच्या व्यक्तिरेखा मात्र आपल्यातल्याच असतात किंवा कदाचित त्यांच्याजागी आपण देखील असू शकत असतो.

टॅरँटिनोचा ‘जॅकी ब्राउन’ असाच आहे. त्याचे चित्रपट ज्या सगळ्या गुणवैशिष्ट्यांसकट असावेत, असं त्याच्या कट्टर फॅन्सना वाटत असतं. त्यातलं काहीच ‘जॅकी ब्राऊन’मध्ये नाही. म्हणजे अपरिमित हिंसा नाही आणि हिंसाच नसल्यामुळे त्या हिंसेचं उदात्तीकरण (ग्लोरिफिकेशन) करणारी त्याची खास शैलीही नाही, विक्षिप्त व्यक्तिरेखा नाहीत, वैशिष्ट्यपूर्ण कॅमेरा अँगल्स नाहीत. टॅरँटिनो ज्या एपिसोडिक पद्धतीने आपले चित्रपट उलगडतो, ती पद्धतही त्याने इथे वापरलेली नाही. चित्रपटाची गोष्ट एकरेषीय पद्धतीने, म्हणजेच लिनियर फॉर्ममध्ये उलगडते.

पण इथल्या व्यक्तिरेखा अस्सल हाडामांसाच्या आहेत, त्यांचं भवताल खरंखुरं आहे. इथला गँगस्टर देखील समस्याग्रस्त आहे. आपल्या प्रत्येक समस्येवरचं उत्तर म्हणून शैलीदार पद्धतीने, दिवसाढवळ्या, बेछूट गोळीबार करत पुन्हा उजळ माथ्यानं वावरत नाही. तो पोलिसांपासून तोंड लपवत फिरतोय. आपले पैसे मिळवण्यासाठी त्याला दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतंय. दुसऱ्या देशात अडकलेले आपले पैसे कसेबसे मिळवून मग छानपैकी निवृत्त होण्याचा त्याचा बेत आहे आणि नेमका तोच बेत धोक्यात आल्यामुळे तो सैरभैर झालाय.

ऑर्डेल रॉबी (सॅम्युअल जॅक्सन) हा अवैध शस्त्र विक्रेता. त्याचे पाच लाख डॉलर मेक्सिकोतल्या खात्यात आहेत. जॅकी ब्राउन (पाम ग्रेअर) या फ्लाइट अटेंडंट मार्फत तो टप्प्याटप्प्यानं ते पैसे लॉस एंजेलिसला आणतोय. जॅकी ही चाळिशीतली एकाकी निग्रो स्त्री. आयुष्याच्या या टप्प्यावरही कुठल्याशा तीनपाट विमान कंपनीत वर्षाला अवघे १६ हजार डॉलरच कमावत असल्याचा तिला विषाद आहे. आणि भविष्य फारसं आशादायी नसल्यामुळे वरकमाई म्हणून ती ऑर्डेलकडून काही कमिशन घेऊन त्याच्यासाठी हे पैसे आणायचं काम करतेय. ऑर्डेलचा आणखी एक माणूस ब्यूमाँट (ख्रिस टकर) अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी पकडला जातो. ऑर्डेल त्याला मॅक्स चेरी (रॉबर्ट फ्रेजर) या बाँड्समनच्या माध्यमातून तुरुंगातून बाहेर काढतो आणि त्याच रात्री त्याचं पृथ्वीवरचं अवतार कार्यही संपवतो. दुसऱ्याच दिवशी ब्यूमाँटने दिलेल्या टिपच्या आधारे रे निकोलेट (मायकल कीटन) आणि मार्क डग्लस (मायकल बोवेन) ही ‘दारू, तंबाखू, शस्त्रास्त्र आणि स्फोटकविरोधी पथका’ची जोडगोळी जॅकीला विमानातून परवानगीपेक्षा जास्त रोख रक्कम आणताना रंगेहाथ पकडते. हे कळताच ऑर्डेलच्या पायाखालची वाळू सरकते. तो तिलाही मॅक्स चेरीच्या माध्यमातून बाँडवर बाहेर काढतो आणि तिचा काटा काढण्यासाठी त्याच रात्री तिच्या घरी जातो. पण जॅकी त्याच्या अपेक्षेपेक्षा हुशार निघते. त्याने तिचं काही बरं-वाईट करण्याआधाची ती त्याच्यावर बंदूक रोखते. ‘तू मला मारलंस तर तुझा एकमेव विश्वसनीय दुवाही हरवेल आणि तुझे पैसे कायमचे मेक्सिकोत अडकून पडतील. त्या पैशांचा तर तुला काही उपयोग होणार नाहीच, पण इथे मात्र पोलिसांपासून तोंड लपवतच पुढचं आयुष्य काढायची वेळ येईल. त्यापेक्षा मी सांगते ते कर, त्यात आपला दोघांचाही फायदा आहे,’ असं ती त्याला सांगते.

मी तर गंमत करत होतो... तो हसून तिला सांगतो. पण तिचा अर्थातच विश्वास बसत नाही.

‘पोलिसांना पैसे हवे आहेत आणि ते पैसे मी कोणासाठी आणणार आहे, ते हवंय. ते पैसे मिळवून देण्याचा मी त्यांना शब्द देते. मेक्सिकोतून मी ते पैसे घेऊन येते, पण पोलिसांना मी सांगितलेल्या ठिकाणी तुला पैसे देण्याआधीच तू कोणाला तरी पाठवून दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी ते पैसे तुझ्या ताब्यात घे. पोलिसांना माझ्यावर संशय येणार नाही आणि तूही पकडला जाणार नाहीस. पोलिसांना मदत केली म्हणून माझीही सुटका होईल. किंबहुना त्या अटीवरच मी त्यांना मदत करायला तयार होईन. आणि ठरलेल्या जागेच्या आधीच तू मला गाठून माझ्याकडून पैसे घेऊन गेलास तर त्यात माझी काय चूक?..’ जॅकी त्याला सगळा प्लॅन समजावून सांगते. ऑर्डेल त्यावर विचार करतो. त्याला त्यात काही धोका दिसत नाही. एकदम फुलप्रुफ प्लॅन. तो जॅकीला साथ द्यायचं मान्य करतो.

दुसऱ्या दिवशी जॅकी थेट पोलिसांना गाठतो आणि त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवते. फक्त ती ऑर्डेलसोबतच्या प्लॅनमध्ये न ठरलेली आणखी एक गोष्ट पोलिसांना सांगते, ती म्हणजे ऑर्डेलचं नाव. ऑर्डेल वेडापिसा होतो. ‘पण जे पोलिसांना आधीच माहितीये, ते त्यांना सांगितलं तर बिघडलं कुठे? उलट त्यांचा माझ्यावर अधिकच घट्ट विश्वास बसला,’ असं म्हणून ती ऑर्डेलला शांत करते. ऑर्डेलला ते ही पटतं आणि मग दोघे ठरल्यानुसार प्लॅनची अमलबजावणी करण्याच्या मागे लागतात.

इथं ऑर्डेलच्या मदतीसाठी आणखी दोघं आहेत. एक म्हणजे लुईस गारा (रॉबर्ट डी नीरो), जो चार वर्षं तुरुंगात राहून बाहेर आलाय. त्याला आता ऑर्डेलच्या सोबत काम करायचंय आणि दुसरी व्यक्ती म्हणजे मेलनी (ब्रिजेट फोंडा), जिच्या घरी ऑर्डेल राहतोय. मेलनी ही तरुण, पण फार काही महत्त्वाकांक्षा नसलेली मुलगी. दिवसभर घरात राहून ड्रग्ज घेणं, टीव्ही बघणं एवढंच तिचं आयुष्य आहे. ऑर्डेल या दोघांचा वापर करण्याचं ठरवतो. जॅकी जेव्हा सगळे पैसे घेऊन येईल, त्यावेळी ऑर्डेल भेटण्याची जी जागा तिने पोलिसांना सांगितली असेल, त्याआधीच मेलनी आणि लुईस तिला भेटून पैसे ताब्यात घेतील, असं ठरतं.

प्रत्यक्षात इकडे जॅकीच्या डोक्यात वेगळाच प्लॅन शिजतोय. किती वर्षं १६ हजार डॉलर वार्षिक पगारावर जगणार? आणि या प्रकरणात न जाणो तुरुंगात जावं लागलं तर पुढचं सगळंच भवितव्य अंधारात. त्यामुळे ती सरळसरळ ऑर्डेलला डबलक्रॉस करण्याची योजना आखते. या कामी तिला मदत करतो मॅक्स चेरी. मॅक्सला पाहता क्षणीच जॅकीविषयी आकर्षण वाटू लागलंय. पण तो तो व्यक्त करत नाही. या आकर्षणापोटी तो जॅकीला तिच्या योजनेत मदत करण्याचं कबूल करतो आणि दोघे मिळून आपल्या योजनेची अमलबजावणी करण्यास सिद्ध होतात.

एल्मोअर लिओनार्ड या क्राइम फिक्शनमधल्या प्रथितयश लेखकाच्या ‘रम पंच’ या गाजलेल्या कादंबरीवर टॅरँटिनोने हा चित्रपट बेतला होता. एखाद्या कादंबरीवर किंवा पुस्तकावर आधारित टॅरँटिनोचा हा एकमेव चित्रपट. कादंबरीवरून पटकथा लिहिताना त्याने काही बदल केले. कादंबरीतली नायिका गोऱ्या वंशाची होती. टॅरँटिनोने तिला काळी केली, हा मोठाच बदल. टॅरँटिनोची पटकथा ७०च्या दशकात लोकप्रिय झालेल्या ‘ब्लॅक्स्प्लॉयटेशन’ (म्हणजे प्रामुख्याने काळ्या व्यक्तिरेखांच्या कथा सांगणारे चित्रपट) या ज्यॉनरवरून प्रेरित झाल्याचं सांगितलं जातं. स्वत: टॅरँटिनोला हे विश्लेषण मान्य नसलं तरी मुख्य व्यक्तिरेखेचं रूपांतर गोऱ्या वंशावरून काळ्यात करण्याचं कारण काय, हे त्याने स्पष्ट केलं नाही. त्याचप्रमाणे, जॅकी ब्राउनच्या प्रमुख व्यक्तिरेखेत त्याने जिची निवड केली, ती पाम ग्रेअर ही अशा प्रकारच्या ‘ब्लॅक्स्प्लॉयटेशन’ चित्रपटांमधली एकेकाळची लोकप्रिय अभिनेत्री होती. टॅरँटिनोला अभिनेत्री म्हणून ती आवडायची. ‘पल्प फिक्शन’मधल्या एका भूमिकेसाठी तिची ऑडिशनही झाली होती. पण त्यावेळी एकत्र काम करण्याचा योग आला नाही. ‘जॅकी ब्राउन’च्या वेळी मात्र टॅरँटिनोने आठवणीने तिला बोलावून घेतलं.

‘जॅकी ब्राउन’चं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा लेखक-दिग्दर्शक इथल्या पात्रांना स्वत:चा विचार करायला पुरेसा अवसर देतो. तो पात्रांसाठी आधीच सगळा विचार करून, त्याबरहुकूम त्यांनी वागणं एवढंच त्यांच्यासाठी ठेवत नाही. बहुतांश चित्रपटांमध्ये हेच होतं. लेखकाने लिहिल्याबरहुकूम किंवा दिग्दर्शकाने सांगितल्याप्रमाणे ते केवळ कॅमेऱ्यासमोर अॅक्टिंग करतात. लेखक-दिग्दर्शकाने त्यांच्यासाठी आधीच सगळा विचार करून ठेवलेला असतो. ‘जॅकी ब्राउन’ची पात्रं त्यादृष्टीने वेगळी ठरतात. टॅरँटिनो त्यांना स्वत:ला विचार करायला लावतो. उदाहरणार्थ – जॅकीने ऑर्डेलला डबल क्रॉस केल्यानंतरच्या प्रसंगात लुईस गारा आणि ऑर्डेल आपल्या व्हॅनमध्ये बसलेत. ‘मेलनी कुठाय?..’ ऑर्डेल त्याला विचारतो.

ती फार कटकट करत होती. मी आधीच सैरभैर होतो. त्यात ती नीट वागत नव्हती. पैशांचं टेन्शन होतं. त्यात माझी गाडी नेमकी कुठे पार्क केलीये ते आठवत नव्हतं. ती मला चिडवू लागली. बँक रॉबरीच्या वेळी तू कसा पकडला गेलास, ते आता कळलं, वगैरे बरंच बडबडत होती. शेवटी मी तिला गोळी घातली.. लुईस त्याला सांगतो.

ऑर्डेलला आधी धक्का बसतो, पण ‘एखादी गोष्ट करायची म्हटली की मग ती करायची’ असं म्हणून तो सोडून देतो.

त्यानंतर लुईसने जॅकीकडून आणलेल्या पिशवीत बघतो तर तिथं त्याला पाच लाख डॉलरच्या ऐवजी अवघे ४० हजार डॉलर सापडतात. त्याला जबरदस्त धक्का बसतो. आपली आयुष्यभराची कमाई, आपला रिटायरमेंट फंड एका फटक्यात गायब झाला. तो वेडापिसा होतो. लुईसवर प्रश्नांचा भडीमार करतो. लुईस त्याला काहीच सांगू शकत नाही. ऑर्डेल दोन क्षण शांत होतो. काहीच बोलत नाही. खाली मान घालून विचार करतो, विचार करतो, विचार करतो आणि मग शांतपणे मान वर करून म्हणतो, ‘नक्कीच हे जॅकीचं काम आहे.’

हा २० सेकंदांचा पॉज आहे. ऑर्डेल विचार करतोय, करतोय. तो झटकन निष्कर्षावर येत नाही. पैसे कमी आहेत हे समजताच हे नक्कीच जॅकीचं काम आहे, असं म्हणून तो मोकळा होत नाही. कारण त्याने विचार करावा आणि त्याचा त्याने काय तो निष्कर्ष काढावा, अशी लेखक-दिग्दर्शकाची इच्छा आहे. हा गुण फार कमी चित्रपटांमध्ये आढळतो. आपल्या पात्रांना स्वत:चा विचार करू देणं, हे भान फार कमी लेखक-दिग्दर्शकांमध्ये आढळतं.

भन्नाट कलाकार जमवणं आणि त्यांच्याकडून अव्वल दर्जाचा अभिनय काढून घेणं, हा टॅरँटिनोचा छंद आहे. रॉबर्ट डी निरोची व्यक्तिरेखा बघितली तर इतक्या कसलेल्या कलावंताने इतकी दुय्यम भूमिका का स्वीकारली असावी, असा प्रश्न कोणालाही पडेल. कारण लुईस गाराची व्यक्तिरेखा एकूण गोष्टीच्या अवकाशात इतकी किरकोळ आहे की, तिथं रॉबर्ट डी निरोच्या तोलामोलाचा कलावंत कशासाठी, हा प्रश्न बिल्कुल वावगा ठरत नाही. पण त्यानंतर डी निरो त्या किरकोळ भूमिकेत जे काही रंग भरतो, ते विचारता सोय नाही. चार वर्षं तुरुंगात काढून आल्यामुळे तो काहीसा हरवल्यासारखा झालाय. जगाशी त्याचा सांधा तुटलाय. त्याला जुळवून घेणं त्याला कठिण जातंय. आपल्या भवतालाशी त्याचा संपर्कच तुटल्यासारखा झालाय. हे जे तुटलेपण आहे, ते डी निरोने अचूक दाखवलंय. तुटकपणे संवाद म्हणण्याची शैली, वावरण्यातला एक प्रकारचा चोरटेपणा आणि चेहऱ्यावर हरवलेपणाचे भाव या सर्वांसहीत लुईस गारा ही किरकोळ व्यक्तिरेखा रॉबर्ट डी निरो अजरामर करतो.

सॅम्युअल जॅक्सन हा माणूस टॅरँटिनोच्या चित्रपटांमध्ये जे काही करतो त्याला तोड नसते. मग तो ‘पल्प फिक्शन’ असो, ‘जँगो अनचेन्ड’ असो की, मग ‘जॅकी ब्राउन’ असो. ऑर्डेलचं क्रौर्य आणि त्याची व्हल्नरेबिलिटी, त्याचा बनेलपणा आणि त्याची असहायता सॅम्युअल जॅक्सनने सारख्याच सहजतेनं दाखवलीय. प्रेक्षक म्हणून आपण त्याच्या व्यक्तिरेखेशी इतके एकरूप होतो की, अखेरीस ज्यावेळी तो जॅकीच्या ट्रॅपमध्ये अडकतो त्यावेळी आपल्याला हळहळायला होतं... तो वाचला तर जॅकी मरणार, हे ठाऊक असूनही.

खरं तर इथं कोणीच शुद्ध चारित्र्याचा नाही आणि कोणीच पूर्णत: वाईट नाही. प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी योग्य आहे. जॅकी चाळीशीतली एकाकी स्त्री आहे. आयुष्याचा संघर्ष एकटीने लढतेय. त्यामुळे ती कणखर आहे. म्हणूनच ऑर्डेलच्या रूपाने समोर साक्षात मृत्यू उभा ठाकला तरी ती डगमगत नाही, धैर्यानं त्याचा सामना करते आणि अक्कलहुशारीनं त्याच्यावर मात करते. मॅक्स चेरी या बाँड्समनसोबतचं तिचं नातं हा या क्राइम थ्रिलरमधला हळुवार भाग आहे. मॅक्सचं तिच्यावर अव्यक्त प्रेम आहे. जॅकीलाही ते समजतंय, पण दोघेही त्याविषयी बोलत नाहीत. टॅरँटिनोने हे नातं अव्यक्तच ठेवलंय. त्यामुळेच पटकथेत पुरेपूर वाव असूनही दोघांमध्ये शरीरसंबंधांचा संदर्भ त्याने दिलेला नाही. मॅक्स चेरीच्या भूमिकेत रॉबर्ट फॉर्स्टर या जुन्या अभिनेत्यानं पुन्हा आपली अभिनयक्षमता सिद्ध केली. त्याला ऑस्करचं सहायक अभिनेत्याचं नॉमिनेशनही मिळालं. खरं म्हणजे पाम ग्रेअरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं नॉमिनेशन मिळेल, अशी अनेकांना खात्री होती. स्वत: टॅरँटिनो ग्रेअरचं नॉमिनेशन हुकल्यामुळे खूपच निराश झाला होता. ग्रेअरला गोल्डन ग्लोबमध्ये मात्र नॉमिनेशन मिळालं होतं आणि तिच्यासोबत सॅम्युअल जॅक्सनलाही. मानाच्या बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सॅम्युअल जॅक्सनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

‘जॅकी ब्राउन’चं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे टॅरँटिनोच्या चित्रपटात आढळणारी बेसुमार हिंसा इथं नाही. किंबहुना एखादा अपवाद वगळता इथं हिंसेची थेट दृश्य नाहीच आहेत. त्यामुळेच इथली हिंसा, इथलं क्रौर्य अधिक गडद आहे. हिंसा प्रत्यक्ष दिसण्यापेक्षा जाणवण्याच्या पातळीवर जितकी अधिक असते, तितका तिचा परिणाम अधिक गहिरा असतो. ‘जॅकी ब्राउन’मधली हिंसा तशी आहे.

टॅरँटिनोचा चित्रपट म्हटल्यावर पटकन ‘जॅकी ब्राउन’चं नाव डोळ्यांसमोर येत नाही. हे या चित्रपटापेक्षाही प्रेक्षकांचं दुर्भाग्य आहे. टॅरँटिनोच्या अधिक लोकप्रिय, अधिक शैलीदार आणि कल्ट सिनेमांपेक्षाही हा अधिक सकस, कदाचित टॅरँटिनोचा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. प्रत्येक वेळी बघितल्यावर त्याची मिठ्ठास वाढत जाते. लोणचं मुरावं किंवा वाइन जशी उलटणाऱ्या प्रत्येक वर्षानुसार अधिक मौल्यवान होत जावी, तसा ‘जॅकी ब्राउन’ आहे. टॅरँटिनो तुम्हाला आवडत असेल तर बघाच आणि आवडत नसेल तर नक्कीच बघा. तुम्हाला तो आवडायला लागेल.

लेखक मुक्त पत्रकार आहेत.

chintamani.bhide@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......