बॉलिवुड के नये खुदा : कास्टिंग डायरेक्टर्स
सदर - इनसाइडर
अमोल उदगीरकर
  • तिगमांशू धुलिया, मुकेश छाब्रा, हनी त्रेहान, विकी सिदाना, शानू शर्मा, अतुल मोंगिया आणि जोगी मलंग
  • Sat , 01 April 2017
  • इनसायडर Insider अमोल उदगीरकर Amol Udgirkar Tigmanshu Dhulia तिगमांशू धुलिया Mukesh Chhabra मुकेश छाब्रा Shanoo Sharma शानू शर्मा Honey Trehan हनी त्रेहान Vicky Sidana विकी सिदाना अतुल मोंगिया Atul Mongia जोगी मलंग Jogi Malang

रणवीर सिंग, आयुष्यमान खुराणा, राजकुमार राव, स्वरा भास्कर यांच्यामध्ये काय साम्य आहे? एखादा बॉलिवुड बफ लगेच सांगेल की, हे सगळे 'आउटसाइडर्स' आहेत. म्हणजे कुठल्या फिल्मी परिवारातून आलेले नाहीत. 'परिवारवाद' ही ज्या बॉलिवुडची एक ओळख आहे, तिथं हे 'आगंतुक' मोठ्या टेचात यशस्वी झाले आहेत. हे झालं एक साम्य. दुसरं साम्य म्हणजे, या लोकांच्या यशात 'कास्टिंग डायरेक्टर'चा मोठा हात आहे. 'कास्टिंग डायरेक्टर' म्हणून  पडद्यामागे शांतपणे कार्यरत असणाऱ्या माणसाने यांची नोंद घेतली नसती, तर आज कदाचित हे लोक बॉलिवुडमध्ये नसते.

यापूर्वी बॉलिवुडमध्ये वेगवेगळ्या भूमिकांमधल्या नटांचं कास्टिंग करण्याच्या काही जुनाट पद्धती होत्या. म्हणजे निर्माता-दिग्दर्शक आपापल्या मित्रांना, ओळखीच्या लोकांना, नातेवाईकांना आणि अर्थातच मोठ्या, प्रस्थापित स्टार्सना कास्ट करायचे. आपली फिल्म इंडस्ट्री पडद्याबाहेर आणि पडद्यावरही नायकप्रधान आहे, हे एक उघड गुपित आहे. नायकाने शिफारस केलेल्या लोकांना, विशेषतः नायिकांना कास्ट करण्याचं अलिखित बंधन निर्मात्यांवर असायचं. गुफी पेंटलसारखे (महाभारतात ज्यांनी शकुनी मामाचा अजरामर रोल बजावला होता.) काही लोक कास्टिंगचं काम आपल्या बाकीच्या असाइनमेंट्स सांभाळून करायचे, पण ते तितकंच. एकूणच त्या वेळेच्या बॉलिवुडसारखंच कास्टिंगचं क्षेत्रही असंघटित आणि अनागोंदी असणारं होत.

कास्टिंग हे एकूणच खूप महत्त्वाचं डिपार्टमेंट असतं. दिग्दर्शकाच्या मनात (आणि लॅपटॉपमध्ये असलेल्या स्क्रिप्टमध्ये) असलेल्या पात्रांना चेहरा आणि शरीर देण्याचं काम कास्टिंग डायरेक्टर करत असतो. याचं सर्वांत आद्य उदाहरण म्हणजे, ‘बँडिट क्वीन’ हा शेखर कपूरचा चित्रपट! शेखरचा तेव्हा असिस्टंट असणारा आणि सध्याचा प्रस्थापित दिग्दर्शक तिगमांशू धुलियाने बँडिट क्वीनचा कास्टिंग हेड म्हणून काम केलं होतं. या चित्रपटातून नव्या दमाची आणि थिएटर बॅकग्राऊंड असणारी अभिनेत्यांची फळी बॉलिवुडमध्ये दाखल झाली. मानसिंगच्या भूमिकेतला मनोज वाजपेयी, विक्रम मल्लाहच्या भूमिकेतला निर्मल पांडे, खुद्द फुलन देवीच्या भूमिकेतली सीमा विश्वास, शिवाय इतर महत्त्वाच्या भूमिकांमध्ये असणारे गोविंद नामदेव, सौरभ शुक्ला आणि आदित्य श्रीवास्तव असे भूमिकेला वाहून घेणारे अनेक अभिनेते बॉलीवुडला मिळाले. यांच्यातले बहुतेक जण बॉलिवुडमध्ये आज प्रस्थापित झाले आहेत. बँडिट क्वीन हा चित्रपट आपण जेव्हा जेव्हा पाहतो, तेव्हा तो आपल्याच समाजाच्या अतिशय परिणामकारकपणे दाखवलेल्या 'हार्ड रिअॅलिटी'मुळे अंगावर येतो. याला जितकं शेखर कपूरचं दिग्दर्शन, जितकी रणजित कपूरची पटकथा कारणीभूत आहे, तितकंच तिगमांशू धुलियाने केलेलं योग्य कास्टिंगही कारणीभूत आहे. चित्रपटाच्या निर्मितीमध्ये 'कास्टिंग'ही महत्त्वाची असते, याची जाणीव असणारा शेखर कपूरसारखा दिग्दर्शक तेव्हाही विरळाच होता!

तिगमांशू धुलियाने बँडिट क्वीनचा कास्टिंग हेड म्हणून काम केलं

कास्टिंगचं महत्त्व फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांना लक्षात येण्यासाठी 'गँग्ज ऑफ वासेपूर' चित्रपट यावा लागला. धनबादमधल्या कोळसा माफियांच्या रक्तरंजित गँगवॉरला केंद्रस्थानी आणणारा हा चित्रपट अतिशय भव्य स्केलवर बनवला होता. अतिशय गुंतागुंतीचा पट असणाऱ्या या चित्रपटामध्ये  शेकडो पात्रं होती. प्रत्येक पात्राला एक युनिक टच होता. या चित्रपटाची कास्टिंग करणं हे शिवधनुष्य उचलण्यासारखंच होतं, पण मुकेश छाब्राने हे शिवधनुष्य पेलून दाखवलं. 'गँग्ज ऑफ वासेपूर' हा चित्रपट कास्टिंगच्या क्षेत्रातला मैलाचा दगड समजला जातो. त्यातून मुकेश छाब्रा नावाचा नवा तारा बॉलिवुडच्या आकाशात उदयाला आला. योगायोगानं त्याच वेळेस बॉलिवुडमध्ये कॉर्पोरेट स्टुडिओजनी बस्तान बसवलं होत. असंघटितपणातून संघटित होण्याकडे बॉलिवुडचा प्रवास सुरू झाला होता. त्याचा फायदा कास्टिंग क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना झाला.

गँग्ज ऑफ वासेपूरच्या निर्मितीच्या वेळेस व्हायाकॉम १८ बोर्डवर आलं होतं. मुकेश छाब्राने तब्बल दोनशेहून जास्त कलाकारांची ऑडिशन घेऊन त्याच्या चित्रपटाची कास्टिंग केली होती. त्यात पंकज त्रिपाठी, रिचा चढ्ढा, जयदीप अहलावतसारखी मंडळी होती. बँडिट क्वीनच्या कास्टिंगमध्ये सिंहाचा वाटा उचलणारा तिगमांशू धुलिया 'गँग्ज ऑफ वासेपूर'मध्येही रामाधीर सिंगच्या महत्त्वाच्या भूमिकेत होता, हा सुखद योगायोग! 'गँग्ज ऑफ वासेपूर'नंतर मुकेश छाब्राच्या करिअरने उड्डाण घेतलं. आज तो देशातला सगळ्यात आघाडीचा कास्टिंग डायरेक्टर आहे. त्याच्यासोबत तब्बल तीसच्या आसपास असिस्टंट आहेत. नुकतंच 'दंगल'साठी त्याने केलेलं कास्टिंग, विशेषतः आमीर खानच्या चित्रपटातल्या मुलींचं केलेलं कास्टिंग हे मुकेश छाब्रा आपलं काम किती चांगल्या पद्धतीनं करतो, याचं मूर्तीमंत उदाहरण आहे.

मुकेश छाब्राचा 'गँग्ज ऑफ वासेपूर' हा चित्रपट कास्टिंगच्या क्षेत्रातला मैलाचा दगड समजला जातो

सध्या बॉलिवुडमध्ये हनी त्रेहान, शानू शर्मा, श्रुती महाजन, अतुल मोंगिया, नंदिनी श्रीकांत असे अनेक कास्टिंग डायरेक्टर्स कार्यरत आहेत. यशराज फिल्म्स, धर्मा, एक्सेल, फँटम अशा मोठ्या प्रोडक्शन हाऊसेससाठी ते कास्टिंग करतात.

कास्टिंग डायरेक्टरचा जॉब हा वातानुकुलित ऑफिसमध्ये कमी आणि बाहेरच्या जगात जास्त असतो. नाईट क्लब, हॉटेल्स, डिस्को थेक, कॅफे, रस्ते, शॉप्स अशा ठिकाणी हे कास्टिंग डायरेक्टर्स डोळे उघडे ठेवून फिरत असतात. कधी आणि कुठे 'टॅलेंट' मिळेल, हे सांगता येत नाही. यशराजच्या शानू शर्माने रणवीर सिंगला डिस्कोथेकमध्ये पहिल्यांदा पाहिलं होतं. 'बँड बाजा बारात'मधल्या एनर्जेटिक नायकासाठी हा पोरगा एकदम योग्य असल्याचं तिने पहिल्या नजरेत ओळखलं होतं. अनेक लोकांचा विरोध असूनही आदित्य चोप्राने शानू शर्माच्या आग्रहामुळे रणवीर सिंगला कास्ट केलं. नंतरचा इतिहास सगळ्यांनाच माहीत आहे. आजही एखादा चित्रपट हिट झाला किंवा एखादा मानाचा पुरस्कार मिळाला की, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रणवीरचा पहिला फोन शानू शर्माला जातो.

शानू शर्माने रणवीर सिंगला डिस्कोथेकमध्ये पहिल्यांदा पाहिलं होतं

अंधेरी आणि वर्सोवा हे मुंबईचे भाग सगळ्या बॉलिवुड स्ट्रगलर्ससाठी मक्का-मदिना आहेत. सगळे प्रथितयश प्रस्थापित, बॉलिवुडमधली मंडळी याच भागात राहतात. बहुतेक मोठ्या प्रोडक्शन हाऊसेसची ऑफिसेसही याच भागात एकवटलेली आहेत. त्यामुळे परवडत नसूनही अनेक तडजोडी करून स्ट्रगलर लोक याच भागात राहतात आणि इथंच वावरतात. कास्टिंग डायरेक्टर्स नियमितपणे कुठल्या कॅफेमध्ये किंवा रेस्तरॉंमध्ये जात असतात, याची माहिती या स्ट्रगलर लोकांना असते. आपण या कास्टिंग डायरेक्टरच्या नजरेत भरू, या आशेनं ते तिथंच पडीक असतात. संयम हरवत चाललेले अनेक स्ट्रगलर्स तर या कास्टिंग डायरेक्टर्सचा पाठलागच करत असतात.

मुकेश छाब्राने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, त्याला अनेक स्ट्रगलर्स महागड्या भेटवस्तू देऊन खूश करण्याचा प्रयत्न करतात. अनेक मुली 'सजेस्टिव्ह' मेसेज पाठवतात, पण मुकेश यांच्यापासून नेहमी दूर राहतो; पण सगळेच मुकेश छाब्रा नसतात. सध्या मुंबईच्या गल्लीबोळात कास्टिंग डायरेक्टर म्हणवून घेणाऱ्यांचं पेव फुटलं आहे. वर्षानुवर्षं संघर्ष करूनही पहिल्या ब्रेकसाठी आसुसलेल्या तरुण मुलामुलींचा ही मंडळी आर्थिक आणि शारीरिक दृष्टीने गैरफायदा उचलतात. खोटी आश्वासनं देऊन त्यांना फसवतात. कुठलीही फिल्मी बॅकग्राउंड नसलेली किंवा गॉडफादर नसलेली पोरं-पोरी या सापळ्यात अडकतात. कित्येक लोक या फसवणुकीमुळे आयुष्यातून उठतात. बॉलिवुडच्या ग्लॅमरस जगाची हीदेखील काळी बाजू आहे. 

'मर्दानी'मधील टेकसॅव्ही आणि थंडगार डोक्याने प्लॅन करणारा खलनायक ताहीर राज भसीन

पण असलं, तरी अनेक छोट्या शहरांमधून आलेल्या अनेक होतकरू अभिनेत्यांना या कास्टिंग डायरेक्टर्सनी एक नवीन आशा दिली आहे, हे नक्की! आपल्या डोक्यावर कोणत्याही गॉडफादरचा हात  नसला, तरी आपण यशस्वी होऊ शकतो, असं त्यांना वाटतं आहे. भलेबुरे लोक प्रत्येक क्षेत्रात असतातच, पण सध्यातरी 'कास्टिंग डायरेक्टर' ही संस्था हजारो बॉलिवुड स्ट्रगलर्ससाठी आशेचा किरण बनली आहे, हे मात्र खरं. तुम्ही राणी मुखर्जीचा 'मर्दानी' बघितला असेल, तर तुम्हाला त्यातला टेकसॅव्ही आणि थंडगार डोक्याने कारस्थान प्लॅन करणारा खलनायक ताहीर राज भसीन आठवत असेल. बॉलिवुडमध्ये बरेच दिवस संघर्ष करूनही काही पदरात पडत नसल्याचं जाणवून आत्मविश्वास खच्ची झालेला ताहीर वापस घरी जायला निघाला आणि यशराजच्या शानू शर्माच्या नजरेला पडला. त्याला मर्दानीमध्ये मुख्य खलनायकाचा रोल मिळाला आणि त्याने घरी जाण्याचा बेत रद्द केला. स्वप्नवत वाटणाऱ्या अशा अनेक परीकथा बॉलिवुडमध्ये कास्टिंग डायरेक्टरमुळेच दिसून येत आहेत, हे नक्की! 

लेखक फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.

amoludgirkar@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......