टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • रवींद्र गायकवाड, उमा भारती, देवेंद्र फडणवीस, पन्नीरसेल्वम, शशिकला, स्वच्छ भारत अभियान आणि नवज्योतसिंग सिद्धू
  • Fri , 24 March 2017
  • विनोदनामा टपल्या रवींद्र गायकवाड Ravindra Gaikwad उमा भारती Uma Bharti देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis पन्नीरसेल्वम Panneerselvam शशिकला Sasikala स्वच्छ भारत अभियान Swachh Bharat Abhiyan नवज्योतसिंग सिद्धू Navjot Singh Sidhu

१. शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादानंतर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारले. खासदार गायकवाड पुण्याहून एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीला जात होते. आपण बिझनेस क्लासचं तिकिट खरेदी केलं होतं. पण विमानात गेल्यावर आपल्याला इकॉनॉमी क्लासमध्ये बसवण्यात आलं. याचा जाब कर्मचाऱ्याला विचारला असता, त्याने दाद न देता दुरुत्तरं केल्यामुळे आपण त्याला चपलेने २५ फटके मारल्याचं गायकवाड यांनी मनगटातलं शिवबंधन दाखवत अभिमानाने सांगितलं.

चूक एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचीच आहे. ही कंपनी सरकारी अधिकारी, खासदार, मंत्री यांच्या प्रवासासाठीच चालवली जाते; ही काही सर्वसामान्य प्रवाशांसाठी चालवली जाणारी व्यावसायिक विमान कंपनी नाही. त्यामुळे खासदारसाहेबांची बडदास्त राखली गेली नाही, हे  कोणीच खपवून घेणार नाही. संबंधित कर्मचाऱ्याने प्रकरण अधिक न ताणता मांडवळ करून टाकली, तर ते उभयपक्षी सोयीचं आणि खासदारांच्या सरावाचंही आहे. प्रकरण न्यायालयात गेलं तर न्यायालय सांगणार, एअर इंडियात नोकरी करून साधे खासदारांच्या चपलेचे फटके सहन करता येत नसतील, तर राजीनामा द्या. 

................................................................................

२. राम मंदिराचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात असून आपल्यावरच्या खटल्यासंदर्भात न्यायालयाचा निकाल मान्य असेल. अयोध्येतील आंदोलनात मी सहभागी झाले होते. रामलल्लासाठी मुख्यमंत्रीपदाची खुर्चीही सोडली होती. गरज पडल्यास प्राणही द्यायची तयारी आहे, असे केंद्रीय मंत्री उमा भारती म्हणाल्या. आंदोलनात सहभागी झाल्याचे दुःख नसून मला अभिमान आहे, असेही त्या म्हणाल्या.

वयोमानाप्रमाणे उमा भारती यांना विसर पडणं स्वाभाविक आहे, पण, जी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची त्यागल्याचा त्या साभिमान उल्लेख करतायत, ती मुळात त्यांना रामलल्लाच्याच कृपेने मिळाली होती. रामाच्या नावाने तापवलेल्या तव्यावर भाजली गेलेलीच पोळी होती ती. शिवाय सगळं काही ‘त्याच्या’ चरणी अर्पण करण्याची आपली परंपरा आहेच की!

................................................................................

३. चार दिवसांपासून संपावर गेलेल्या डॉक्टरांनी कामावर रूजू होण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. राज्य सरकार डॉक्टरांच्या संघटनांशी चर्चा करण्यास तयार असून सर्वसामान्यांच्या हिताकरिता डॉक्टरांनी संप मागे घ्यावा, असे ते म्हणाले. तसेच डॉक्टरी पेशा हा पवित्र व्यवसाय असून हा पेशा स्वीकारताना घेतलेली शपथ त्यांनी विसरू नये याची आठवण त्यांनी करून दिली. सामान्य रूग्णांच्या जिवाशी खेळण्याचा कोणालाच अधिकार नाही, असंही ते म्हणाले.

डॉक्टरांच्या जिवाशी खेळण्याचाही कोणाला अधिकार नाही; सर्वसामान्यांचा जीव वाचवण्यासाठी झटणाऱ्या डॉक्टरांना संरक्षण देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असं संपकरी डॉक्टरांना आश्वस्त करणारं एकही विधान मुख्यमंत्र्यांनी का बरं केलं नसेल? शपथा तर राजभवनापासून मरीन ड्राइव्हवरच्या खडकांमध्येही बऱ्याच घेतल्या जातात हो, त्यात काय एवढं? सरकारी रुग्णालयांमधली हलगर्जी, गैरसोय, अनास्था आणि अज्ञान यांच्यातून निष्पन्न होणाऱ्या प्रत्येक परिस्थितीचा राग रेसिडेंट डॉक्टरांनी का सहन करायचा? सरकार जनतेच्या पैशातून डॉक्टरीचा खर्च करतं म्हणून? या न्यायाने तर जनतेच्या पैशावर सगळ्यात जास्त सवलती आणि लाभ उकळणारे सरकारी सेवक आणि जनसेवकांना संरक्षणाबाहेर आणून जनक्षोभाच्या धगीसमोर उभं करायला काय हरकत आहे?

................................................................................

४. तामिळनाडूतील आरके नगर विधानसभा मतदारसंघात १२ एप्रिल रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने अण्णाद्रमुकचं पक्षचिन्ह गोठवलं असून शशिकला गटाला ‘टोपी’ (हॅट) तर पन्नीरसेल्वम गटाला ‘विजेचा खांब’ हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे.

थोडक्यात म्हणजे, तामीळनाडूत जे कोणी टिक्कोजीराव असतील आणि व्यंगचित्रकार असतील, त्यांची १२ एप्रिलपर्यंत तरी चंगळ झाली आहे. शशिकलाबाईंना टोपी मिळाली आहे आणि पन्नीरसेल्वम यांचा ‘विजेचा खांब’ बनला आहे, एवढ्याच गोष्टीवरून किती प्रकारची व्यंगचित्रं कोणीही न काढता डोळ्यांसमोरून तरळून जातात. निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्षांनाही अशी अन्वर्थक चिन्हं दिली, तर मतदानाची टक्केवारी आपसूक वाढेल.

................................................................................

५. ‘एक पाऊल स्वच्छतेकडे’ असा संदेश देत सुरू झालेल्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नागरिकांची मते घेताना हेतूत: दिशाभूल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महापालिका प्रशासनाने राबवलेल्या विविध उपक्रमांबाबत नागरिकांचा अभिप्राय (फीडबॅक) जाणून घेताना त्यांना प्रतिक्रिया देण्यासाठी सर्व सकारात्मक पर्यायच उपलब्ध करून देण्यात आले असून शहर स्वच्छ आहे का, कचरा उचलला जातो का, अशा प्रश्नांच्या उत्तरांसाठी ‘होय’ हाच पर्याय देण्यात आला आहे; नाही म्हणायची सोयच नाही. त्यामुळे बनावट अनुकूल सर्वेक्षणाच्या माध्यमातून राज्य सरकार आणि महापालिका स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत.

त्यात काही विशेष नाही? ही एक वरपासून खालपर्यंत चालणारी सकारात्मक मूल्यमापन पद्धती आहे. मित्रों, मैनें कहा था कि हम कर दिखायेंगे? हमने कर दिखाया कि नहीं? अच्छे दिन आये कि नहीं? भारत मजबूत हुआ है कि नहीं? अशी जाहीर प्रश्नावली जेव्हा विचारली जाते, तेव्हा त्याचं नकारात्मक उत्तर देण्याची सोय असते की काय?

................................................................................

६. कोणत्याही परिस्थितीत कपिल शर्माच्या ‘कॉमेडी नाईट शो’मध्ये विशेष पाहुणा म्हणून झळकणं सोडणार नाही, असे सांगणारे पंजाबचे नवनिर्वाचित मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांना पंजाबच्या महाधिवक्त्यांनी दणका दिला आहे. सिद्धू हे यापुढे टीव्ही शो करू शकत नाहीत. मंत्रीपदावर असताना टीव्ही शो करणे घटनाबाह्य आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

आता सिद्धूपाजींच्या पांचट विनोदांनी, आचरट शेरोशायरीने आणि मौके-बेमौके ठहाकेदार हसण्याने पंजाबची जनता बेजार झाली, तर त्याला महाधिवक्ताच जबाबदार राहतील, हे त्यांच्या लक्षात आलंय का? आधीच गांजलेल्या या जनतेला काहीएक मानसिक स्वास्थ्य देण्याची सोन्यासारखी संधी महाधिवक्त्यांनी वाया दवडली आहे.

................................................................................

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......