गोविंदराव, आय मिस यू!
पडघम - माध्यमनामा
विनय हर्डीकर
  • गोविंद तळवलकर यांचं हे रेखाचित्र वसंत सरवटे यांनी काढलं आहे
  • Thu , 23 March 2017
  • पडघम माध्यमनामा गोविंद तळवलकर महाराष्ट्र टाइम्स यशवंतराव चव्हाण शरद पवार विनय हर्डीकर

एकतीस वर्षांपूर्वीची गोष्ट. (१९८५) मी नुकताच ‘इंडियन एक्सप्रेस’चा राजीनामा देऊन शेतकरी संघटनेचा पूर्ण वेळ कार्यकर्ता व्हायच्या विचारात होतो; कार्यकारिणी सदस्यही होतो. शर्टावर डावीकडे लावलेला लाल बिल्ला डोक्यात आणि मनातही खोलवर गेलेला होता आणि more loyal than the king अशी माझी अवस्था होती. त्या सुमारास ‘महाराष्ट्र टाईम्स’मध्ये (मटामध्ये) शेतकरी संघटनेवर घणाघाती टीका करणारे दोन/तीन एडिट पेजवरचे लेख आणि अग्रलेखही आले होते. सर्व मिळून ७/८ हजार शब्दांचा भडिमार आमच्यावर केलेला होता. त्या वेळेला सर्वच मोठी वृत्तपत्रं आमच्या विरोधातच होती. ज्या जिल्ह्यांमध्ये काम उभं राहून मूळ धरत होतं ते नाशिक, वर्धा, नागपूर-परभणी-नांदेड जिल्हे सोडले, तर पुण्या-मुंबईच्या वर्तमानपत्रांचा आणि संपादकांचा आमच्याशी उभा दावा होता; आणि आम्हीतर ‘हे सगळे आपल्या विरोधात बोलतात, कारण ते ‘इंडियाचे लाऊडस्पीकर’ आहेत. भारतविरोधी आहेत, म्हणजे त्यांच्या विरोधामध्येच आपलं बरोबर असल्याची ग्वाही आहे’, असं म्हणत होतो.

मात्र या वेळची टीका फारच आक्रमक होती - परवडत नसेल, तर उसं/कापूस लावू नका. (विशिष्ट भागात कोणतं पीक येतं, हे माहीत नसल्यामुळे) तुम्ही वाटेल तेवढं पिकवता आणि तुम्ही म्हणता त्याच भावाला ते सगळं सरकारनं विकत घेतलं पाहिजे, ही शुद्ध गुंडगिरी आहे (सरकारी भाव कसे ठरतात आणि दुष्काळात सक्तीची लेव्ही हेच सरकार वसूल करतं याची जाणच नसल्यामुळे); आणि रस्ते/रेल्वे अडवून सर्वसामान्य जनतेला वेठीला धरणं हा गुन्हा आहे (निमशहरी भागात घरची शेती असलेले ‘सर्वसामान्य नागरिक’ मोठ्या संख्येने राहतात, याचंही भान नसल्यामुळे); भाव मागण्यापेक्षा उत्पादन खर्च कमी करा, लग्नसमारंभातही उधळपट्टी बंद करा (गावठी समाजवादाच्या आहारी गेल्यामुळे) अशाच प्रकारचे आरोप आमच्यावर होत होते.

शिवाय महाराष्ट्रातल्या ऊस शेतकर्‍यांच्या दुर्दशेचं पाप आम्ही सहकार (साखर) सम्राटांच्या गळ्यात बांधलेलं होतंच. त्यामुळे यशवंतराव चव्हाण (नुकतेच नोव्हेंबर १९८४मध्ये निधन पावले होते) आणि त्यांचा वारसा पुढे नेणारे शरद पवार यांच्यावर टीका म्हणजे बहुतेकांना राजद्रोहच वाटत होता. आमच्यापुरतं तरी मटा म्हणजे ‘पत्र नव्हे शस्त्र’ होतं.

मटामधल्या टीकेला उत्तर म्हणून स्वत: शरद जोशींनी एक प्रदीर्घ लेख लिहिला. त्यांना वाटत होतं की, जेवढे शब्द विरोधात लिहिले होते, तेवढेच त्यांना उत्तरादाखल लिहायला मिळावेत. (तेव्हा संगणक वगैरे नव्हते) ‘फार लांबला आहे; याचा संक्षिप्त १/३ तर्जुमा करून पाठवा’ अशा शेर्‍यासह तो लेख ७-८ दिवसांनी परत आला. मी संघटनेच्या ऑफिसमधून थेट संपादकांना फोन लावला आणि पुढीलप्रमाणे बोलणं झालं.

‘‘मी शेतकरी संघटनेच्या ऑफिसमधून विनय हर्डीकर बोलतोय.’’ तिकडून अत्यंत कोरड्या, पण भारदस्त आवाजात - ‘‘मी तळवलकर - काय आहे?’’ ‘‘तुम्ही शरद जोशींचा लेख परत पाठवलाय’’ माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आत त्याच आवाजात, ‘‘एवढा लांबलचक लेख छापता येणार नाही. संक्षिप्त करून, थोडक्यात लिहून पाठवा.’’ मी जरा चिडून, ‘‘पण तुम्ही आमच्या विरोधात लिहिलेत तेवढे शब्द तरी...!’’ तोच कोरडा आवाज, पण जरा चढवून ‘‘आम्ही तुमच्या बातम्या छापतो ना, त्यातल्या शब्दांची बेरीज करा!’’ मी वैतागून, ‘‘बातम्या तुम्ही वाचकांसाठी छापता, आमच्यासाठी नाही.’’ आता कोरड्या आवाजात एक निकराची छटा आली. ‘‘ते काही नाही. १/३ लेख आम्ही छापू!’’ फोन बंद झाला. हे सगळं स्वत: शरद जोशी ऐकत होते. थोड्या वेळाने त्यांनी पुन्हा ‘मटा’मध्ये थेट संपादकांना फोन केला. लेखाचा संक्षेप करून पाठवतो असं कबूल केलं. स्वत: दोन दिवस बसून आटोपशीर लेख धाडला, तो छापून आला. हे संपादक अर्थातच गोविंद तळवलकर!

आज ज्या गोविंदरावांची आठवण काढल्याशिवाय माझा एकही दिवस उलटत नाही, त्यांच्याशी पहिली झटापट अशी झाली होती. मटा मला नवीन नव्हता, पण आमच्या घरी ‘मटा’ सुरू होण्यापूर्वी ‘फ्री प्रेस जर्नल’ येत असे. त्यामुळे वृत्तपत्राचा पहिला संस्कार इंग्रजीचा होता. आमच्या शेजारी शेका पक्षाचे सी.स. सावंत राहत. त्यांच्या घरी ‘मराठा’ वाचायला मिळत असे, पण तो संयुक्त महाराष्ट्र मिळाल्यानंतरचा, त्यात फारसा जीव उरलेला नव्हता. मराठी पत्रकारितेमध्ये अग्रलेखांचं फार मोठं प्रस्थ असलं, तरी माझ्यावर त्याचा फारसा ठसा तेव्हाही उमटला नव्हता. आताही नाही. पण ‘मटा’ आकर्षक होता. त्या वेळच्या इतर दोन वृत्तपत्रांपेक्षा - लोकसत्ता आणि नवशक्ती - मटा खूपच देखणा! मात्र तेव्हा संपादक म्हणून द्वा. भ. कर्णिक यांचं नाव असे. गोविंद तळवलकर, गंगाधर इंदूरकर (दिल्ली वार्तापत्र), मा.पं. शिखरे यांच्या स्तंभ/लेखांपेक्षाही मला जवळचे होते ते वि.वि. करमरकर (यांचं क्रिकेटलेखन मराठीतलं, टवटवीत तर के.एन.प्रभूंचं टाइम्स ऑफ इंडिया मधलं वजनदार आणि भारदस्त), माधव गडकरी, सोमनाथ समेळ वगैरे! नंतर रविवार आवृत्तीमध्ये शंकर सारडा यांनी नवी शैली आणून पुस्तक परीक्षणांमध्ये जान ओतली. ‘मटा’ आणि मराठी प्रकाशक यांच्या सहकार्याने वाचकांसाठी मराठीतली महत्त्वाची पुस्तकं ४० टक्के सवलतीने देण्याचा उपक्रमही यशस्वी ठरला होता. हायस्कूलमधल्या माझ्या आवडत्या शिक्षकांनी आवर्जून खरेदी केलेली सर्व पुस्तकं मी वाचली होती. तरीही गोविंद तळवळकर यांच्या राजकीय विश्‍लेषणाच्या लेखांपर्यंत माझी झेप गेली नव्हती. पुढे मी कॉलेजसाठी पुण्याला आल्यावर सकाळ/केसरीच उपलब्ध होते. केसरीची रविवार पुरवणी वाचनीय असायची. ‘मटा’ विस्मृतीत गेला आणि लोकसत्ता, नवशक्ती यांचं आकर्षण कधी वाटलंच नव्हतं. त्यातच ज्ञानप्रबोधिनी आणि बाबा आमटे यांच्यामध्ये माझ्या येरझार्‍या चालू होत्या. त्या दोन्ही ठिकाणी तळमळ असली तरी राजकारण पूर्ण वर्ज्य होतं. आमची नजर सतत भविष्याकडेच लागलेली. मग वर्तमान (पत्रा) ची काय पत्रास!

त्याच सुमारास महाराष्ट्राचं राजकीय आणि बौद्धिक वातावरण ढवळून टाकणारी घटना घडली. महाराष्ट्रातल्या सहकार चळवळीच्या संदर्भात एका विशेष प्रसंगी यशवंतरावांच्या तोंडावर वि.म. दांडेकरांनी सहकारी साखर कारखान्यांचे वाभाडे काढले आणि सहकारी साखर कडू असल्याची टिपणी केली. दांडेकर म्हणजे उपरोध, कुत्सित शब्द योजना आणि धगधगीत अर्थशास्त्रीय विश्‍लेषणाचे बादशहा. त्या कार्यक्रमात आणि त्यानंतरही यशवंतराव भयंकर चिडले होते. दुसर्‍याच दिवशी सगळ्या महत्त्वाच्या मराठी पेपरांतून त्या कार्यक्रमाच्या बातम्या आल्यावर खळबळ उडाली. यशवंतरावांच्या बाजूने उभे राहणार्‍या संपादकांमध्ये गोविंद तळवळकर प्रमुख ‘या स्थैर्याचे महत्तव ओळखा’ वगैरे. तेव्हा मुंबई विद्यापीठाचे रेक्टर (हॉस्टेलचे नव्हेत) असलेले गोवर्धन पारीख वगैरे सर्व जुने रॉयिस्ट (हे मला नंतर कळायचं होतं) दांडेकरांवर तुटून पडले. मात्र तळवलकरांचा लेख वेगळा होता. त्यात दांडेकरांच्या बोलण्याच्या धाटणीचं फार मार्मिक वर्णन होतं. दांडेकर डोळे मिचकावीत, आवाजात छदर्मपणा आणत, मधूनच दाढीवरून हात फिरवत इ. निरीक्षणे लाजवाब होती. मला अग्रलेखामधली यशवंतरावांची भलावण पटली नव्हती. पण हा संपादक बारीक नजरेतून सगळं पाहतो, एवढं मात्र जाणवलं, आवडलं! मग दांडेकरांच्या बाजूने होतो तरी मी गोविंद तळवलकरांचे स्तंभ बारकाईने वाचायला लागलो. पुढे ‘नौरोजी ते नेहरू’च्या प्रेमातच पडलो. त्यातली टिळक, रानडे, गोखले यांच्यावरची प्रकरणे आणि सावरकरांवरचा अगदी छोटा पण अप्रतिम परामर्श वाचताना अजूनही मी तसाच भारावून जातो. जागतिक घडामोडींवर भाष्य करताना देशी/विदेशी वृत्तपत्रे, मासिके वाचून लिहिणारा एवढा एकच संपादक-पत्रकार त्या काळात होता आणि माझा विषय इंग्रजी असल्याने त्याबद्दल वेगळी ओढही वाटायची. मधल्या काळात तळवलकरांच्या मितभाषी आणि जवळजवळ एकलकोंड्या स्वभावाच्या कथाही ऐकायला मिळत होत्या. जवळचे मित्र त्यांना ‘सर गोविंद तळवलकर’ म्हणतात हेही कळलं होतं. पण ते राहत होते डोंबिवलीला! माझं बालपण टुमदार पश्‍चिम मुलुंडमध्ये गेलेलं. प्राण गेला तरी बकाल डोंबिवलीत पाऊल टाकणार नाही हे ब्रीद होतं; मात्र यांच्याशी कम्युनिकेशन वाढवलं पाहिजे असा तगादा आतून सुरू झाला होता.

२.

माझ्या मते ‘नौरोजी ते नेहरू’, ‘सत्तांतर’ भाग १ व २ आणि ‘नेक नामदार’ हीच गोविंद तळवलकरांची महत्त्वाची पुस्तकं आहेत; पुढे पुण्याला त्यांच्याशी जाहीर गप्पा मारताना मी त्यांना ‘तुम्ही हीच पुस्तकं पुन्हा पुन्हा लिहिता आहात का?’ असा प्रश्‍न विचारला तेव्हा त्यांनी होकार तर दिलाच, पण ‘आधुनिक भारताच्या इतिहासातली मोठ्या माणसांची, मोठ्या घडामोडींची ही शंभर वर्षे आहेत. नवे कागदपत्र/पुरावे उपलब्ध होतात आणि आपली मांडणी परत एकदा तपासून घ्यावी लागते असं स्पष्टीकरणही दिलं होतं.

माझा जन्म १९४९चा, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या पहिल्या पिढीचा मी प्रतिनिधी. आमच्या पिढीच्या डोक्यावर भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचं फार मोठं, जवळपास गुदमरून टाकणारं ओझं होतं. ‘नवा भारत तुम्हाला घडवायचा आहे’ ही भविष्यकाळाबद्दलची अपेक्षा निदान न्याय्य होती - जरी म्हणजे नेकं काय करायचं आहे ते कुणी सांगत नव्हतं तरी! मात्र भूतकाळाच्या चर्चा तापदायक होत्या. फाळणीच्या जखमा अजून बर्‍या होणं सोडा, बुजल्यादेखील नव्हत्या. गांधीहत्येची जखमही अधूनमधून पुन्हा वाहायला लागत असे. हिंदुत्ववाद्यांच्या दृष्टीने ‘मातृभूमीच्या डोक्याला खोक पडली होती आणि दोन्ही बाहू छाटले गेले होते’ म्हणून देश खर्‍या अर्थाने स्वतंत्र झालाच नव्हता आणि काँग्रेसचा तथाकथित डावीकडचा कल हा भांडवलदार- जमीनदार धार्जिणा ठरवून कम्युनिस्टदेखील खरं स्वातंत्र्य मिळालेलंच नाही म्हणत होते. स्वतंत्र पक्ष संपत आला होता, तर सगळे समाजवादी नेहरूंनी त्यांचा अजेंडा बेमालूपणे हाय-जॅक केला होता हे न स्वीकारता काँग्रेसच्या विरोधात राहूनही नेहरूंचे गोडवे गाण्यात धन्यता पावत होते. फाळणीची जखम मुस्लीम मनालाही झालेली होतीच. ‘हँसके लिया पाकिस्तान, लढके लेंगे हिंदुस्तान’ हा अजेंडाही अधूनमधून कानावर येत असे.

या सावळ्या गोंधळामध्ये तळवलकरांनी भर तर टाकलीच नव्हती. मात्र नवरोजी आणि नेहरू अशी १०० वर्षांची वाटचाल अधोरेखित करून आधुनिक भारताच्या संकल्पनेमधले प्रमुख विचार, हेतू आणि व्यक्ती यांचं एक सलग ‘डॉक्युमेंट’ आमच्यासाठी तयार केलं होतं आणि इतिहासाबद्दलच्या राष्ट्रवादी, अनाकलनीयतावादी सिद्धांतांना बाजूला ठेवत, मात्र त्यांचं महत्त्व न नाकारता एक नवं आकलन त्या पुस्तकामध्ये आलं होतं. १८५७ नंतर कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित झाली तरी देश गरिबीच्या खाईत खोलवर रूतत चालला होता हे सांगणारे दादाभाई नौरोजी आणि नवा देश/समाज घडवायचा असेल तर आर्थिक- राजकीय-सामाजिक व नैतिक प्रेरणांचं संतुलन साधावं लागेल असं बजावणारे रानडे हे आधुनिक भारताचे मूळ शिल्पकार होत. त्यांच्यामुळे स्वातंत्र्य प्राप्तीचा मार्ग आणि आशय निश्‍चित झाला होता असं सांगणारं म्हणजेच उदारमतवादी पण बर्‍यापैकी वस्तुनिष्ठ पद्धतीने इतिहासाचा अर्थ लावणारं दुसरं पुस्तक त्या काळात नव्हतं.

त्या पुस्तकाच्या लिखाणामधला जिव्हाळा चोख आणि उत्कटही होता. सावरकरांवरच्या प्रकरणाचं शीर्षक ‘कमलपुष्प ते अमर ठेले’ मी वाचलं तेव्हाच डोळे पाणावले होते. लोकमान्यांवरच्या लेखाच्या शेवटी ‘उत्कट भव्य तेचि घ्यावे। मिळमिळीत अवघे टाकोनी द्यावे। नि:स्पृहपणे विख्यात व्हावे। भूंडळी। या समर्थोक्तीचा परिचय लोकमान्यांच्या जीवनात ठायी ठायी येतो.’ या एकाच वाक्याने मला लोकमान्यांचं सगळं जीवन समजलं होतं. गोखल्यांबद्दल ‘नृपतिजनपदानां दुर्लभ: कार्यकर्ता या भर्तृहरीने सांगितलेल्या दुर्मिळ कोटीमधले गोखले’ हे वाक्य वाचल्यावर मी धावत जाऊन नीतिशतक उघडून, तो श्‍लोक शोधून ताबडतोब पाठ करून टाकला होता. तळवलकरांचं नेहरूंच्या विश्‍लेषणही मार्मिक होतं. त्याला थोडासा व्यक्तिपूजेचा वास येत असला तरीही आधुनिक, जीवनाची सगळी डायमेन्शन्स नेहरूंना आकृष्ट करत होती आणि संसदीय लोकशाहीची पायाभरणी करून तिची प्रतिष्ठा नेहरूंनी आटोकाट जपली हे विश्‍लेषण नेहरूंचे फ्रान्समध्ये धुतले जाणारे कपडे, त्यांच्या शर्टावरचा गुलाब, त्यांचं मुलांबद्दलचं प्रेम, किंवा राजकीय सुकाणू सांभाळताना त्यांचा हॅलेट कसा झाला या तेव्हाच्या अतिप्रचलित, कंटाळवाण्या साचेबंद चित्रणापेक्षा अगदी वेगळं होतं.

‘तीन चतुर्थांश का होईना, देश स्वतंत्र झाला आहे आणि आता मागे न पाहता पुढे पाहिलं पाहिजे’ अशी भूमिका सावरकरांनीही घेतली होतीच आणि ‘अभिनव भारत’ या स्वत:च्या संघटनेचं विसर्जन केल होतं. देश स्वतंत्र झाला की काँग्रेसचं विसर्जन करण्याचं गांधीही बोलले होते. पण नथूराम गोडसेंच्या आततायी कृत्याने गांधीच उरले नव्हते. इथून पुढे तळवलकर आणि त्यांचे नेहरूसमर्थक मित्र एका वेगळ्याच दुष्टचक्रासारख्या भूमिकेच्या सापळ्यात अडकले ते आजपर्यंत. देश एकत्र ठेवायचा तर काँग्रेस सत्तेवर पाहिजे, त्यासाठी नेतृत्व नेहरू (घराण्या) कडेच राहिलेलं बरं, संरक्षण व्यवस्था आणि झपाट्याने औद्योगीकीकरण हे नवा देश टिकवण्याचे आणि त्याचा विकास करण्याचे मुख्य मार्ग. संपूर्ण देशाचं नियोजन केंद्र सरकारकडेच असावं आणि निदान नेहरू आहेत तोपर्यंत संसदीय लोकशाहीला धोका नाही, ही ती भूमिका. त्यातच उजव्या कम्युनिस्टांनी तर त्यातल्या त्यात पुरोगामी पक्ष काँग्रेसच आहे आणि नेहरूंपेक्षा इंदिरा गांधी जास्त धडाडीच्या आहेत. त्यांनीच संस्थानिकांचे तनखे बंद केले (त्यामुळेच संस्थानिक राजकारणात उतरले?) बँकांचं राष्ट्रीकरण केले (त्यामुळेच बँका सरकारी खात्यांसारख्या भ्रष्ट आणि आळशी बनल्या?) बांगला देशचा प्रश्‍न आक्रमकतेने सोडवला (त्यामुळेच बांगला देशमधून येणार्‍या निर्वासितांची कायमची कटकट निर्माण झाली?) अशी जाहीर भूमिका घेतल्यावर नेहरू घराणं देशाच्या उरावर बसलं ते राजीव गांधींच्या हत्येपर्यंत व नंतर पुन्हा मनमोहनसिंगांच्या दुसर्‍या टप्प्यात. इकडे यशवंतराव महाराष्ट्राचे नेहरू बनलेलेच होते आणि यशवंतरावांच्या सगळ्या बर्‍या-वाईट राजकारणाचं समर्थन करण्याचं कंकण तळवळकरांनी बांधलं होतं (ते एकटे नव्हते, तर्कतीर्थ, अ.भि. शहा वगैरे मंडळीही त्यातच होती) आणि त्यांचे वारस म्हणून पुढे येणार्‍या शरद पवारांवर ही सर्वच Opinion Maker फळी मोठी भिस्त ठेवून होती. या भूमिकेशी मी सहमत कधीच नव्हतो, आजही नाही; मात्र तळवळकरांच्या व्युत्पन्न व्यासंगाचं, टिळकांची आठवण व्हावी अशा रोखठोक (क्वचिक मिष्कील) लेखनशैलीचं आकर्षणही कायम होतं. माझी त्यांची भेट झाली नव्हती पण त्यांना जवळून पाहणारे दि.वि.गोखले आणि तळवलकर ‘मटा’मध्ये गेल्यावर ‘लोकसत्ते’तच राहिलेले विद्याधर गोखले यांच्याशी माझा संपर्क होता. काही दिवस शहांच्या बरोबर काम केल्यामुळे तर्कतीर्थ-यशवंतराव-तळवलकर हा त्रिकोणही कळला होता. पहिल्या महायुद्धानंतर लंडनमध्ये केन्स, व्हर्जिनिया, वुल्फ वगैरे मंडळींचा एक Bloomsbury Group नावाचा गट होता. त्याच धर्तीवर तर्कतीर्थांच्या भोवती एक मराठी गट होता. त्याच वर्णन मी ‘एक Bloom (तर्कतीर्थ) आणि बाकीची नुसतीच बरी!’ असं केल्यावर शहा रागावले होते पण त्यांनी दादही दिली होती.

या दोन गोखल्यांनी मी आणि तळवळकर यांची भेट होऊ नये याची इतकी दक्षता का घ्यावी हे मला अजून कळलेलं नाही. ‘मटा’मध्ये दिवि नंबर दोनवर होते. तळवळकरांचे मित्र होते. स्वत: आणीबाणी विरोधात सत्याग्रह करण्यापूर्वी ‘तुम्हीही चला, तुरूंगात मस्त गप्पा मारू महिना/दोन महिने’ असा आग्रहही त्यांनी तळवळकरांना करून पाहिला होता. ‘मटा’मध्ये गेले की दिवि माझा कबजा घ्यायचे. ते तर लोकशाहीमार्गाने चालणारे फॅसिस्ट दहशतवादीच होते. ‘तळवलकर कुणाला भेटत नाहीत. तुला काय बोलायचं ते माझ्याशी बोल. फालतू गप्पामध्ये वेळ घालवणारा तो माणूस नाही. तुझं पुस्तक (जनांचा प्रवाही चालिला) त्यांनी वाचलं आहे, पण त्यांना आवडलेलं नाही (हे खरंच होतं, नंतरही स्वत: गोविंदरावांनी त्या पुस्तकाचा उल्लेख माझ्याशी बोलताना केला नाही) हे मी तुला सांगतो. मग तू आत जाऊन काय करणार, उगीच माझ्या डोक्याला ताप करून ठेवशील,’ असा सज्जड दम देऊन दिवि लगेच चहा सांगत, खायला मागवत. इंडियन एक्सप्रेसमध्ये बायोडेटा पाठवण्यापूर्वी मी सकाळ आणि मटामध्ये चाचपणी केली होती. तेव्हा सकाळने ट्रेनी म्हणून या असं सांगितलं आणि दिविंनी मुळीच नको असं थेट धुडकावून लावलं. सकाळ आणि दिविंचा मी चिरकाळ ऋणी आहे.

मी ‘इंडियन एक्प्रेस’मध्ये वेगळ्याच जाळ्यात सापडलो. तेव्हा विद्याधर गोखले टॉप फॉर्ममध्ये होते. लोकसत्ता आणि त्याची रविवार पुरवणी हे मराठीमधले ब्रॅडमन-पॉन्सफर्ड होते. खपाचा आलेख सतत चढता होता. गोखले-तळवलकर ही मैत्री जुनी होती, उमदीही होती पण गोखल्यांच्या बाजूने तिला love-hateची किनारही असावी. आपल्या पेपरचा खप सगळ्यात जास्त असूनही तळवलकरच ओपिनियन मेकर आहेत हे त्यांना सतत जाणवत असे. टाईम्स ऑफ इंडियाच्या नफ्यावर ‘मटा’ उभा होता हे सर्वांना माहीत होतं आणि ‘लोकसत्ते’ च्या जीवावर मुंबईची एक्सप्रेसची ऐट होती हे मात्र फार थोड्यांना. त्यातच मला गोखल्यांच्या शैलीविलासाचं मुळीच कौतुक नव्हतं हेही मी त्यांना सांगितल्यामुळे ते वैतागलेले असायचे. तरीही मी स्वबळावर इंग्रजी पत्रकारितेत आल्याचं त्यांना कौतुकही होतं. मतभेद व्हायचा अवकाश की, ‘तू त्या गोविंदरावचा माणूस आहेस, तुला ‘लोकसत्ता’च्या ऑफिसात येऊ दिलं हेच माझं चुकलं,’ असा आहेर (त्यातल्या अर्वाच्च शिव्या लिहिणं अशक्य आहे) न चुकता मिळायचा. शैलीबद्दल बोलताना ‘तुझा तो गोविंदराव संगमरवरी दगडांच्या मुतार्‍या बांधतो आणि आम्ही ताजमहाल बांधतो,’ असं गोखले बेधडक म्हणायचे. पुढे काही वर्षांनी मी गोविंदरावांना या दोन गोखल्यांचे हे उद्योग सांगितले तेव्हा त्यांची भरपूर करमणूक झाली होती.

लोकसत्ता जरी मराठी वृत्तपत्रात आघाडीवर होता तरी, ‘सकाळ’ पुण्यापुरता न राहता पश्‍चिम महाराष्ट्रात ‘सकाळ ग्रूप’ तयार झाला होता. ‘लोकमत’ने नागपुरातून सुरुवात करून खानदेश, मराठवाडा, मुंबईध्ये हातपाय पसरायला सुरुवात केली होती, तरी अभिजनांचं ‘मटा’ हे लाडकं व्यासपीठ बनलं होतं. ‘बहुतांची अंतरे’ (ठणठणपाळाच्या भाषेत ‘बहुतांची तंतरे’) मध्ये वाचकही आपली मतं मांडत होते, मराठीतल्या आघाडीच्या लेखकांनाही ‘मटा’मध्ये लिहिणं सन्मानाचं वाटत होतं, हे सारं श्रेय निर्विवाद तळवलकरांचं होतं.

३.

देश-काँग्रेस-नेहरू (घराणं) या समीकरणाला जबरदस्त हादरा बसला तो इंदिरा गांधींनी देशात अंतर्गत आणीबाणी जारी केली आणि एका रात्रीत वृत्तपत्रांच्या मुसक्या आवळल्या तेव्हा. सगळे नेहरूवादी त्या धक्क्याने गांगरून गेले इतकी ती घटना आकस्मिक आणि अकल्पित होती. खरं तर इंदिरा गांधी एकाधिकारशाहीच्या दिशेनं झपाट्यानं चालल्या होत्या व त्याची लक्षणं १९७२च्या विधानसभा निवडणुकांपासून मिळायला लागली होती. काँग्रेसमध्ये हायकमांड नावाचं नव प्रस्थ निर्माण झालं होतं. इंदिरा, संजय, त्यांचे चमचे आणि त्यांचे राज्यातले दुय्यम चमचे यांचा प्रभाव वाढून राज्याराज्यामधले यशवंतरावांसारखे अनुभवी, ज्येष्ठ अपमानित होऊन वा हताशपणे बाजूला पडत चालले आहेत, हे सगळ्याच नेहरूवाद्यांना दिसत नव्हतं, अशी परिस्थिती नव्हती. habits die hard?

ज्या वृत्तपत्रसमूहांनी आणीबाणीसमोर मान तुकवली त्यात टाइम्स ग्रूप होताच; मटा ही झुकला आणि तळवलकरांनाही तेच करावं लागलं. खरं तर यशवंतराव चव्हाणांनी थोडा ताठपणा दाखवला असता तर तळवलकरांनाहीं बळ मिळालं असतं, पण ते व्हायचं नव्हतं. पण एवढ्यापुरता हा विषय मर्यादित नव्हता. एकाधिकारशाही आणि सेन्सॉरशिप सर्वांनाच नको असली तरी इंदिरा गांधींच्या विरोधात देशभर जनक्षोभ निर्माण करणारे जयप्रकाश नारायण तर त्यांना मुळीच नको होते. पूर्वी जेपींनी घेतलेला राजकारण संन्यास (नेहरूवाद्यांच्या भाषेत ‘राजकारणातून काढलेला पळ’) आणि एकूणच थोडीशी अराजकतावादाकडे झुकणारी जेपींची ‘संपूर्ण क्रांती’ची मांडणी नेहरूवाद्यांना ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ पद्धतीची वाटणं अगदी क्रमप्राप्त होतं. त्यामुळे आणीबाणीला विरोध करून जेपींचे हात बळकट करण्यामध्ये Political Correctness नव्हताच.

आणीबाणी १९७७ मध्ये मार्च महिन्यात उठली. वृत्तपत्रे सेन्सॉरमुक्त झाली. तळवलकरांनी पहिल्याच संपादकीयात स्पष्ट शब्दांत वाचकांची क्षमा मागितली. पंचहौद मिशन चहा ग्रामण्य प्रकरणात टिळकांनी थेट काशीला जाऊन प्रायश्‍चित्त घेतल्याचं सर्टिफिकेट आणलं आणि पुण्याच्या विरोधकांची गोची केली, तशीच ही माफी होती. आता ते नव्या राजवटीवर ‘पत्र नव्हे शस्त्र’ चालवायला दुप्पट उत्साहानं सज्ज झाले. जनता पक्षाबद्दल त्यांना कधीही सहानुभूती वाटली नाही. ही राजकीय गोधडी तशीही नीट शिवली गेली नव्हतीच. त्यामुळे तिचे टाके उसवायला सत्ता हातात आलेल्या दिवसापासूनच सुरुवात झाली होतीच. पण तळवलकरांना जितके दिवस जनता पक्ष टिकेल तितकी नेहरूवादाची पीछेहाट होईल याची तीव्र चिंता वाटल्यामुळे त्यांनी जनता पक्षावर हल्ला चढवण्याची एकही संधी सोडली नाही. १९७७ च्या निवडणुकीत आणीबाणी विरोधात भाषणे करणार्‍या पु.ल. देशपांड्यांचे जनता पक्षाची टिंगल उडवणारे लेख आणि कविता ‘मटा’मध्ये याच काळात आल्या. काही काळ काँग्रेस बाहेर पडून स्वतंत्र धडपड करणारे यशवंतरावही काँग्रेसमध्ये परत गेल्यावर ‘नेहरू-चव्हाण हवेत, पण इंदिरा-संजय नकोत’ या भूमिकेलाही अर्थ राहिला नव्हता. पुण्याच्या एका कार्यक्रमात गोविंदरावांनी ‘नेहरू व इंदिरा गांधींनी काही चुका केल्या तरी ते प्रखर राष्ट्रवादी होते’ असं म्हटलं तेव्हा ते नेहरूंच्या बाबतीत पटणारं असलं तरी इंदिरा गांधींच्या बाबतीत रदबदली वजा वाटलं होतं. त्यामुळे तळवलकरांचं लिखाण तर आवडतं, पण त्यांचं राजकारण मुळीच पटत नाही, अशा कात्रीत मी सापडलो होतो.

१९८० मध्ये महाराष्ट्रात केवळ इंदिरा गांधीना मराठा मुख्यमंत्री नको होता. म्हणून अ.र. अंतुले मुख्यमंत्री झाले आणि आत गेलेले यशवंतराव व बाहेर राहिलेले शरद पवार यांची ‘सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही’ अशी अवस्था झाली. मराठा समाजाचं सगळं राजकीय जाळं सहकारी साखर कारखानदारीवर उभं होतं आणि बिल्डर्सची एक नवी अर्थव्यवस्था शहरी भागात धुमाकूळ घालायला लागली होती. अंतुल्यांनी इंदिरा प्रतिष्ठानच्या नावावर देणग्या गोळा करताना या दोघांच्याही नांग्या ठेचल्या. राज्याच्या अर्थव्यवस्थेधले दोन प्रमुख घटक अंतुल्यांनी हटवण्याचा एकमेव कार्यक्रम घेऊन उठले. मात्र टाइम्स ग्रूपला त्यात रस असण्याची शक्यता नव्हतीच. कदाचित त्यामुळेच इंडियन एक्सप्रेस ग्रूप त्यात उतरला होता. Indira Gandhi as Commerce असा जबरदस्त लेख अरुण शौरींनी एक्सप्रेससाठी लिहिला. त्याचं मराठी रूपांतर ‘प्रत्यक्ष इंदिरा गांधींच्या नावाचा व्यापार करणारे सुलतान अंतुले’ या आठ कलमी मथळ्यासह छापून आलं आणि अंतुल्यांचा काऊंट डाऊन सुरू झाला. तो मराठी लेख मुळात गोविंद तळवलकरांचा होता. टाइम्स ग्रूपने नकार दिला म्हणून तो लोकसत्तेकडे आला अशी चर्चाही सुरू झाली होती. पण ती अपूर्ण राहिली. पुढे मी गोविंदरावांना तो प्रश्‍न विचारला तेव्हाही त्यांनी काही उत्तर दिलं नाही. आता एवढंच वाटतं की भाषांतर तळवलकरांचं असलं तरी मथळ्यामधला ‘सुलतान’ हा शब्द मात्र गोखल्यांनी टाकलेला असावा.

१९८४ मध्ये यशवंतराव वारले आणि तळवलकरांची एका प्रकारे सुटका झाली? दु:ख तर त्यांना झालं असणारच, पण चव्हाणांच्या शेवटच्या काळातल्या (१९८० च्या लोकसभा निवडणुकीनंतर ते इंदिरा काँग्रेसमध्ये दाखल झाले होते) तडजोडींचं समर्थन करण्याचं नैतिक जोखड त्यांच्यावर राहिलं नाही. राजीव गांधी सत्तेवर आल्यावर राजकारणाचे रंग पालटले; एक्स्प्रेस वृत्तसमूह काँग्रेस विरोध टाळू लागला, रामनाथ गोयकांचे उजवे हात अरुण शौरी टाइम्स ग्रूपमध्ये दाखल झाले, पुढे भाजपला सामील झाले आणि प्रादेशिक वृत्तपत्रांच्या राजकीय विश्‍लेषणाला फारसं महत्त्व उरलं नाही; ते करू शकणारे संपादकही मागे पडू लागले तरी तळवलकरांच्या अग्रलेखांकडे वाचकांची नजर लागलेली होती, ही त्यांच्या लिखाणाला सतत मिळालेली पावती होतीच. १९८५-८६च्या सुमारास दोघेही गोखले आपापल्या नोकरीतून मुक्त झाले. दिवि हिंदुत्ववादी पत्रकारितेची अपुरी हौस भागवायच्या उद्योगाला लागले. विद्याधर गोखले अटीतटीची झुंज देऊन खासदार झाले. मात्र गोविंद तळवलकर ‘मटा’मध्येच होते. आता त्यांच्याकडे जायला मला कुणी अडवणार नव्हतं आणि गेलो तरी (प्रेळपणानेच) शिव्याही घालणार नव्हतं! मार्ग मोकळा झाला तरी तो खडतरच असणार होता हे मात्र तेव्हा कळलं नाही... मात्र तो तितकाच मनोरंजक, हास्यविनोदाने भरलेला आणि माझ्यासाठी आव्हानात्मक असूनही आनंदाने भरलेला, माझं आकलन उंचावणाराही ठरणार होता...

४.

विसाव्या शतकामध्ये १९८९ ते ९२ या अडीच-तीन वर्षांचं फार निर्णायक महत्त्व आहे. नेल्सन मंडेलांची सुटका आणि दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षपदी निवड, अपारथाइडचा अंत; बर्लिनची भिंत कोसळणं, कम्युनिस्ट रशियाचा शेवट, शीतयुद्धाचं रणक्षेत्र युरोपमधून सरकून ते तेल उत्पादक राष्ट्रांच्या मध्यपूर्वेत येणं, भारतामध्ये आघाड्यांच्या राजकारणाची केंद्र/ राज्य दोन्ही पातळ्यांवर सुरुवात, बाबरी मशीदीचा विध्वंस आणि नंतर उसळलेला जातीय आगडोंब असे कितीतरी अनपेक्षित/अकल्पित उत्पात त्या वर्षात घडले. पुलांखालून, पुलांवरून पाणी वाहिलं - काही पूलही वाहून गेले.

गोविंदरावांच्या आणि माझ्या व्यावसायिक/सामाजिक जीवनातही हेच घडत होतं. पत्रकारितेधली संपादकीय विभागाची सत्ता संपायला लागली होती; जाहिरात विभागाचं प्रस्थ वाढत होतं, वृत्तपत्र ही आकर्षक उपभोग्य वस्तू बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली. टाइम्समध्येदेखील संपादकीय विभागापेक्षा जाहिरात विभाग अत्यंत देखणा, अद्ययावत झाला होता; त्याला Response Section असं नवं नाव आलं होत. स्वत: गोविंदरावांचं स्थान आणि मान टिकून होता, तरीदेखील आता त्यांचे मध्यमवयीन सहकारी पुरवण्या तयार करण्याच्या सुळसुळाटात सामील होत होते. गोविंदरावांनी हीच वर्षे ‘रशियन साम्राज्याचा इतिहास’ पूर्ण करण्यासाठी वापरली हा काही योगायोग नाही.

शेतकरी संघटनेधून नवा भारतवादी राजकीय पर्याय उभा करून निवडणुकात उतरायची शरद जोशींची तयारी तर नाहीच पण या प्रक्रियेला सर्वांत मोठा अडथळा त्यांचाच आहे हे १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट झालं आणि मीही माझ्या राजकीय कामाचा पुन्हा विचार सुरू केला. यशवंतरावांच्या बाबतीत गोविंदरावांनी केलेली चूक नेत्याच्या सर्वच बर्‍या-वाईट भूमिकांचं समर्थन करण्याची - मी तेव्हाही आणि आताही केली नाही. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर काम करायचं, बोलायचं, लिहायचं ते शरद जोशींना पटलं तर आनंद, पण नाही पटलं तरी चालेल या माझ्या गेल्या २० वर्षातल्या भूमिकेची तेव्हा सुरुवात झाली. मग मी संघटनेचं पूर्ण वेळ काम थांबवलं आणि टाइम्स रिसर्च फौंडेशनच्या पुण्याच्या आस्थापनेत संशोधक सहयोगी म्हणून जबाबदारी स्वीकारली. टाइम्स ग्रूपचे तेव्हाच्या Responseचे प्रमुख श्री. एन.पी.सिंग माझे परात्पर बॉस झाले, महिन्या दोन महिन्यातून एकदा ‘ओल्ड लेडी ऑव्ह बोरीबंदर’ला भेटायला जावं लागतच असे. तिथलं काम संपवलं की मटामध्ये जायचं. गोविंदराव भेटले तर उत्तमच; नाही तर अशोक जैन, प्रकाश अकोलकर, कधीकधी विवि करमरकर ही मंडळी तर होतीच. मुख्य म्हणजे दि.वि. नव्हते - मज्जाव नव्हता!

माझ्या बाजूने मी गोविंदरावांशी अनाक्रमणाचा करार केला. काँग्रेस-नेहरू-यशवंतराव-शरद पवार हे विषय पूर्णपणे वर्ज्य केले आणि आमच्या दोघांधला ‘साकल्याचा प्रदेश’ किती मोठा होता हे जाणवायला लागलं. वर सांगितलेल्या सर्व जागतिक/भारतीय घटनाक्रमाबद्दल आमच्या प्रतिक्रिया एकसारख्या होत्या, कारण मुळात आम्ही दोघेही आधुनिक उदारमतवादी विचारसरणीचे होतो. त्यातच नेल्सन मंडेला, मिखाइल गोर्बाचोव्ह हे दोघांचेही हिरो होते. येऊ घातलेल्या नव्या जागतिक अर्थव्यवस्थेध्ये भारताला सामील व्हावंच लागेल, तेव्हा साप म्हणून भुई धोपटण्यापेक्षा हे संकट नसून संधी आहे, या भूमिकेवर दोघेही ठाम होतो. जागतिकीकरण/उदारीकरण/खाजगीकरण म्हणजे शोषित वर्गाविरुद्धचं भांडवलशाही कारस्थान आहे या मठ्ठ कम्युनिस्ट भूमिकेचा किंवा ‘स्वदेशी’ (म्हणजे नेमकं काय ते न सांगता) हाच या संकटावरचा रामबाण उपाय आहे म्हणणार्‍या संघ परिवाराचा दोघांनाही सारखाच तिटकारा होता; मग गप्पा मोकळेपणाने सुरू झाल्या आणि त्या २००७ पर्यंत चालू होत्या.

अलिकडे गोविंदरावांच्या केबिनला काच बसवण्यात आली होती. त्यामुळे आलेली व्यक्ती त्यांना दिसत असे आणि आलेल्या माणसाला ते व्यग्र आहेत/नाहीत हे कळत असे. पूर्वी गोविंदरावांच्या केबिनमध्ये शिरलेला माणूस किती सेकंदात बाहेर येईल यावर बाहेर बसलेल्या सहकार्‍यांच्या पैजा लागत, अशी आठवण (दुर्दैवाने कै.) अरुण टिकेकरने एका कार्यक्रमात सांगितली होती. काचेपाशी जाऊन उभं राहिलं की कॉम्प्युटरवर लेखन करणारे गोविंदराव वळून बघायचे, त्या दिवशीच्या मुद्रेध्येच आज काय मूड आहे व आपल्याला किती वेळ मिळणार आहे ते कळायचं. माझ्याच वयाचे त्यांचे सहकारी कौतुकाने बघायचे.

गोविंदराव सत्तरीकडे चालले होते आणि मी पंचेचाळीशीकडे. त्यांची धार कायम होती, पण कठोरपणा कमी झाला होता. माझा वांडपणाही बहुधा कमी व्हायला लागला होता. मध्यम उंची, रूंद खांदे, मजबूत भारदस्त शरीर, गौर वर्ण, भव्य कपाळ (केस मागे सरकायला लागल्यामुळे जरा जास्तच भव्य), डोळ्याला चष्मा सतत, त्यामुळे सरळ नाक अधिकच सरळ वाटायचं आणि कमालीची शांत, स्थिर, कोरडी पण धारदार नजर - तरुणपणी भरपूर काळे केस असतानाचे त्यांचे फोटो नंतर पाहिले. ऐर्‍यागैर्‍याला त्यांची नजर एका क्षणात गारद करून टाकत असे यात नवल नाही. पांढरा किंवा फिकट रंगाचा एका खिशाचा मॅनिला, तशीच सौम्य रंगीच पँट, पुढे निवृत्त झाल्यावर ते क्वचित पँट-टीशर्ट मध्ये वा नेहरू (!) शर्ट-पायजमा या पोषाखात दिसत.

आमच्या ‘साकल्याच्या प्रदेशा’ला मुख्य आधार इंग्रजी पुस्तकांच्या वाचनाचा होता. अरुण टिकेकरचा अपवाद वगळता त्यांच्या आसपास इंग्रजी वाचन अद्ययावत असणारे फार कमी होते. फरक इतकाच की ‘स्ट्रँड बुक स्टॉल’मध्ये नवं पुस्तक आलं की गोविंदरावांना फोन येत असे; मग ते स्वत: जाऊन खरेदी करत; मला मात्र पुण्याच्या ब्रिटिश लायब्ररीमध्ये ते पुस्तक यायची वाट बघावी लागत होती. त्यातच गोविंदरावांना टाइम्स ऑफ इंडियाकडे परीक्षणासाठी येणारी पुस्तके सहज उपलब्ध होत होती. टाइम्स लिटररी सप्लिमेंट हे ब्रिटिश साप्ताहिक आणि न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स हे अमेरिकन पाक्षिकही त्यांच्या नित्य वाचनात असे. मला पुण्याच्या ब्रिटिश लायब्ररीत जरा उशिरा मिळत असे. १९९२ मध्ये मी ‘न्यू क्वेस्ट’चा कार्यकारी संपादक झाल्यावर ही दोन्ही नियतकालिके मलाही नियमित मिळायला लागली, शिवाय इतर काही युरोपियन द्वै/त्रैमासिकांची त्यात भर पडली. ‘न्यू क्वेस्ट’कडे अभिद्यायार्थ येणार्‍या पुस्तकांनी आमच्या वाचनामधली दरी बर्‍यापैकी भरून काढली.

गोविंदरावांचा वाचनवेग त्या वयातही चांगला होता; बहुधा ते एका दृष्टीक्षेपात संपूर्ण पान वाचत असावेत. आम्ही चर्चा केलेल्या पुस्तकांची यादी ठेवायला हवी होती, ती संख्या तीन आकडी नक्कीच भरेल. इतिहास, राजकारण, राजकारण्यांची चरित्रे/ आत्मचरित्रे, आठवणी, पत्रव्यवहार, सैद्धांतिक विश्‍लेषण, निरनिराळ्या देशातल्या संपादक, पत्रकार, स्तंभलेखकांच्या लिखाणाचे संग्रह, बुद्धिजीवींचं लिखाण हे त्यांचे खास आवडीचे विषय. माझा कल त्या त्या काळातल्या साहित्यामधून तो काळ समजून घेण्याकडे असला तरी मीही इतिहास-राजकारण- आयडिऑलॉजी वाचत होतोच मात्र माझी स्तंभलेखनाच्या संग्रहांना कधीच पसंती नव्हती, आजही नसते. लेनिन, स्टालिन, चर्चिल, रूझवेल्ट आणि त्यांना १० वर्षं कामाला लावणारा हिटलर हेही दोघांच्या कुतूहलाचे विषय पण गोविंदरावांना चर्चिल-रूझवेल्ट जवळचे तर मला लेनिन-हिटलर (नाझीवादासाठी नव्हे) यांच्याबद्दल अधिक उत्सुकता. भारतीय इतिहासाच्या आधीच उल्लेख केलेल्या ‘धन्य पुरुष’ (गोविंदरावांचा शब्द!) मंडळींचा उल्लेखही होतच असे; मात्र आमच्यामध्ये गांधी हा विषय फारसा कधी डोकावला नाही - दोन्ही गांधी आम्हांला वर्ज्यच होते?

सैद्धांतिक विषयात परीक्षणांवरून पुस्तकासंबंधी मत बनवायचं नाही, मूळ पुस्तक मिळवून वाचायचं ही सवय दोघांनाही होती. गोविंदरावांनी सर्व आयडिऑलॉजीचे मूळ ग्रंथ त्यांच्या तरुण वयातच वाचले असावेत. तर्कतीर्थ आणि मानवेंद्रनाथ रॉय यांच्या सहवासाचाच हा प्रभाव नव्हता, त्यांची बौद्धिक भूकच तशी होती. भांडवलशाही, समाजवाद, साम्यवाद, लोकशाही समाजवाद, लोककल्याणकारी राज्य, आधुनिक अर्थव्यवस्था, औद्योगिकरणाची निकड, माध्यमांचं स्वातंत्र्य आणि कर्तव्ये, प्रशासन, व्यवस्थापन हे सगळं पचवलेला संपादक मराठीत तर नव्हताच, पण इंग्रजीतही दुर्मिळच होता. त्यांच्याही दोन पावलं पुढे जाऊन इंग्रजीत लिहिणार्‍या शामलाल यांच्याकडे गोविंदरावांनीच माझं लक्ष वेधलं; आज मीही शामलाल यांचा भक्त आहे - जरी त्यांचं लेखन मुख्यत: स्तंभवजा होतं तरी!

मराठी साहित्य वगैरे (त्यांचाच शब्द) आमच्या बोलण्यात कधीच डोकावत नसे! मात्र शेक्सपिअर, डॉ. जॉन्सन, डिकन्स, जॉर्ज ऑर्वेल, आर्थर कोत्स्लर, वुडहाऊस यांचा उल्लेख होत असे. लिंकनविषयक लेखन आणि स्वत: लिंकनही संभाषणात डोकावून जात होता. एकोणिसाव्या शतकातले ब्रिटिश विचारवंत लास्की, रस्कीन इ. त्यांनी बारकाईने वाचले होते. आणि उदारमतवादी, लोकशाहीवादी, नर्मविनोदी, संयमी पण स्पष्ट इंग्रजी लेखनशैलीचा प्रभाव गोविंदरावांच्या लिखाणाप्रमाणेच बोलण्यातही होता. उच्छृंखल विनोद, अतिशयोक्ती यांचा पूर्ण बहिष्कार हा त्यांचा दंडक. मात्र काही मार्मिक वाक्यं बोलण्याआधी त्यांचे डोळे किंचित खट्याळपणे चमकायचे आणि बोलण्यावर मग एक कोरडं, मार्मिक स्मित (wry smile) पाहायला मिळायचं. या सार्‍या गप्पा त्यांच्या ऑफिसात सुरू झाल्या आणि नंतर त्यांच्या २००५ व २००७ मधल्या पुण्यातल्या मुक्कामातही चालू होत्या. एखादं पुस्तक एकाच वेळी त्यांनी मुंबईत आणि मी पुण्यात वाचलेलं असलं की मला धन्य वाटायचं. ‘लाँग वॉक टू फ्रीडम’ हे नेल्सन मंडेलांचं आत्मचरित्र आणि आयर्न लेडी मार्गारेट थॅचर यांच्या मंतत्रिमंडळातले मंत्री अ‍ॅलन क्लार्क यांची डायरी या दोन पुस्तकांची आठवण होते.

टाइम्समध्ये गप्पा मारता मारता गोविंदराव कधीकधी चहाचा ग्लास घेऊन बाहेर आले की, सन्नाटा पसरायचा. सगळ्यांच्या गप्पा- टप्पा बंद व्हायच्या. एकदा आम्ही बाहेर दिवाळीचा फराळ चाखत होतो आणि हे बाहेर आल्यावर सगळ्यांची धांदल उडाली - तोंडातले घास तोंडात आणि हातातले हातात! गोविंदरावांच्या ते लक्षात आलं; तेही दोन मिनिटे घुटमळले; मग थोडा चिवडा उचलून तोंडात टाकला आणि सिंह आपल्या गुहेत परत गेल्यावर पॉझ संपल्यासारखी हालचाल बाहेर सुरू झाली. सगळेजण त्यांना एवढे वचकून का होते?

गोविंदरावांनीच याचं कारण एकदा गप्पांच्या ओघात सांगितलं. आर्थर कोत्स्लरचं निधन झाल्याची बातमी मध्यरात्री आली होती. दुसर्‍या दिवशी सकाळी इंग्रजी टाइम्समध्ये ती बातमी

गोविंदरावांनी पाहिली; ‘मटा’मध्ये मात्र ती दिसली नाही म्हटल्यावर ते खवळले, ऑफिसात आल्यावर रात्रपाळीच्या संपादकाला बोलावून घेतलं; तो तर बिचारा कोत्स्लरच्या स्पेलिंगनेच बिचकला असणार! ‘तुम्हांला माहीत नव्हतं तर रात्री फोन का केला नाहीत?’ असा जाब विचारला. ‘आजपासून तुची मटामधली नोकरी संपली आहे. मी तुम्हाला काढून टाकणार नाही पण तीन महिन्यात दुसरीकडे जा!’ त्याप्रमाणे तो गेलाही!

एवढं महाभारतीय रणकंदन झाल्यावर मात्र गोविंद तळवलकर नावाचा संपादक कामाला लागला आणि मराठी वाचकांना आर्थर कोत्स्लर वरचा एक अप्रतिम लेख वाचायला मिळाला!

५.

तरीही पेचप्रसंग निर्माण व्हायचेच; बहुतेक वेळा माझ्यामुळेच! १९९१ मध्ये नरसिंहराव पंतप्रधान होण्याच्या मार्गात शरद पवार यांनी खोडा घालून स्वत:चं देशपातळीवर हसं करून घेतलं होतं आणि गोविंदरावांनी ‘ना शहाणपण, ना मुत्सद्देगिरी’ असा खरमरीत लेख लिहून पवारांच्या डोळ्यात अंजन घातलं होतं. देशाच्या पंतप्रधानपदाची निवडणूक आणि सहकारी साखर कारखान्याची निवडणूक यातला फरकच तुम्हाला कळला नाही, इतकं स्पष्ट लिहिलं होतं. मी त्यांना, लेख आवडल्याचं कळवताना ‘पण शरद पवार is not prime ministerial material’ हे तुमच्या लक्षात यायला हवं होतं’ असं म्हटलेलं गोविंदरावांना नक्कीच झोंबलं असणार. त्याचा प्रत्यय नंतर आला. देशमुख कंपनीने ‘निवडक पत्रे’ नावाचं कुरुंदकर आणि देशमुख पतिपत्नी यांच्या पत्रव्यवहाराचं पुस्तक प्रकाशित केलं होतं. (संपादक- जया दडकर) त्याचं अतिशय पॉझिटिव्ह परीक्षण ‘मटा’मध्ये स्वत: गोविंदरावांनी लिहिलं. मात्र त्यात त्या संग्रहाला मी लिहिलेल्या दीर्घ प्रस्तावनेचा उल्लेखही नव्हता. मी बुचकळ्यात पडलो!

एक दिवस माझं मलाच कारण कळलं. त्या प्रस्तावनेत ‘अनंतराव भालेराव यांच्यासारख्या खुमासदार शैलीत अग्रलेख लिहिणारा संपादक तेव्हा पश्‍चिम महाराष्ट्रात नव्हता’ असं वाक्य आहे. मग गोविंदराव मला अनुल्लेखाने मारतील नाही तर काय करतील? कारण स्वत:वरच्या टीकेला उत्तर देण्याच्या भानगडीत ते पडत नाहीत, हे मला तेव्हा माहीत नव्हतं. इथं एवढंच सांगतो की, माझं मत मुख्यत: शैलीबद्दल होतं; अनंतराव मिस्किल जास्त होते, गोविंदरावांसारखी बोचरी धार त्यांच्या लिखाणात नव्हती. कदाचित त्या काळात अनंतराव आणि मी यांची राजकीय भूमिकाही समान होती. माझ्याशी ते अतिशय आपुलकीने वागत, त्यामुळेही मी तसं लिहिलं असेल.

ही चूक दुरुस्त करण्याची संधी पुढच्या वर्षी मिळाली. तर्कतीर्थ निधन पावल्यानंतरचा ‘आचार्य देवो भव’ हा गोविंदरावांचा लेख अप्रतिम होता. त्याची तुलना टिळकांनी रानडे, आगरकर व गोखले यांच्यावर लिहिलेल्या स्मृतिलेखांशी (मला ‘मृत्यू लेख’ शब्द फार बटबटीत वाटतो.) करावी लागेल. तो लेख आवडल्याचं मी त्यांना फोनवरून कळवलं - मग पुन्हा गप्पा सुरळीत सुरू झाल्या. तो लेख विशेषत: त्याचं शीर्षक माझ्या मनात इतकं खोल गेलं की, पुढे मी माझे गुरुवर्य डॉ. नागराजन यांच्यावरच्या लेखाला तेच शीर्षक दिलं (अंतर्नाद, मे २०१४) पण परत एकदा घोटाळा झाला.

तर्कतीर्थांच्या पहिल्या स्मृतिदिनाला गोविंदराव पुण्याला येणार होते. मी त्यांना उतरून घ्यायला येतो असं सुचवल्यावर त्यांनी त्या खास निर्लेप नजरेनं माझ्याकडे पाहत, ‘कार्यक्रम कळवल्यावर सगळी व्यवस्था आमचं ऑफिस करतं’ असं सांगितलं. व्यवस्था म्हणजे पहिल्या वर्गाचा प्रवास, त्या गावातल्या सर्वोत्कृष्ट हॉटेलमध्ये रिझर्वेशन आणि एसी वाहन - हे कळल्यावर मी चूप बसलो! ‘पुण्याला आल्यावर मला फोन करा’ असं सुचवलं. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी ते पुण्याला आले. दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांचं उरकल्यावर आठच्या सुमाराला त्यांनी घरी फोन केला - ‘हर्डीकर इतक्या लवकर उठत नाहीत’ म्हणून कोणीतरी त्यांना सांगितलं आणि फोन कट केला. नऊ वाजता उठल्यावर मला हे कळलं आणि माझं धाबं दणाणलं. धावतपळत त्यांच्याकडे गेलो. ते ब्ल्यू डायमंडमध्ये होते! त्यांचा इतका कडू चेहराही मी नंतर कधीच बघितला नाही! मात्र मी निबरपणाने त्यांचा पिच्छा सोडला नाही. चिकटून राहिलो - ते मात्र स्वत:हून एक शब्दही बोलत नव्हते.

परिस्थिती माझ्या मदतीला धावून आली. तर्कतीर्थांचा पहिला ‘स्मृतीदिन’ होता; वाईच्या प्राज्ञ पाठशाळेधल्या दोन शास्त्र्यांचं वेदपठण झाल्यानंतर मुख्य कार्यक्रम सुरू होणार होता. त्या शास्त्र्यांनी त्यांच्या विलंबित ख्यालाच्या शैलीत पठण सुरू केलं. दहा, पंधरा, वीस, पंचवीस मिनिटं झाली; इकडे गोविंदराव चुळबूळ करायला लागले. ‘अहो, यांचं संपणार केव्हा?’ माझ्या कानात म्हणाले. मी म्हटलं ‘त्यांना नरकात पडायचं नाही!’ गोविंदराव म्हणाले, ‘म्हणजे काय! हे असंच कितीही वेळ म्हणतील हो!’ मी म्हणालो, ‘वेदपठण अर्ध्यावर सोडता येत नाही. त्रुटिता पठिता वाणी। भवेत् नरककारिणी हे त्यांचा ट्रेनिंग आहे; कदाचित अर्धवट म्हटलं म्हणून ते आणि अर्धवट ऐकलं म्हणून ‘आपणही नर्कात जाऊ’. गोविंदरावांच्या नजरेत ‘ती खास’ चमक डोकावली. म्हणाले, ‘एकवेळ ते परवडेल!’ आणि माझा जीव भांड्यात पडला! त्यानंतरही एकदा काही किरकोळ मतभेद झाले होते ते बहुधा पुन्हा शरद जोशींच्या विषयी बोलताना. मग काही दिवसांनी गोविंदरावांनी नुकत्याच झालेल्या आणि क्षुद्र विवादांनी गाजलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ‘घरगुती साहित्य संमेलन’ असा स्वत:च्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहावर सुंदर लेख लिहिला; मी त्यावर छोटंसं (सुंदर?) पत्र लिहिलं. ते ‘मटा’मध्ये छापूनही आलं. ते संपादक असताना माझा तेवढाच मजकूर ‘मटा’ मध्ये आला आहे.

मात्र एकदा गोविंदरावांना माझी मदत घ्यावी लागली. वि.म. दांडेकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी गोविंदरावांनी पुण्याला येणं क्रमप्राप्त होतं. तिथं ते एका बाजूला एकटेच बसले होते. दांडेकरांच्या मुलांनी जरा जास्तच उत्साहाने हिंदू पारंपरिक पद्धतीने विधी चालवल्यामुळे वैतागलेही होते. ‘हे अमेरिकेत स्थायिक आहेत ना मग ते जरा अतीच करणार’ असं म्हटल्यावर गोविंदराव पुढे जे म्हणाले ती माझी सामाजिक उपयुक्तता त्यांना पटल्याची पावती होती. ‘आता हे सगळं संपेपर्यंत तुम्ही माझ्या शेजारून हलू नका; तुम्ही असलात की मला त्रास द्यायला कुणी येणार नाही!’ मी धन्य झालो - तो डाव्या हाताचा सलाम मी आजही गौरवास्पद मानतो!

६.

यानंतर काही वर्षं गोविंदराव अमेरिकेत होते - मुख्य कारण पत्नीच्या प्रकृतीचं - दोन्ही कन्याही अमेरिकेत स्थायिक हे दुसरं! पण इकडे त्यांचे लेख वाचायला मिळत असत. लायब्ररी ऑव्ह अमेरिकन काँग्रेससारखा खजिना त्यांना आता उपलब्ध झाला होता. एकीकडे भोगवादी वाटणारे अमेरिकन ज्ञान आणि संशोधनाची प्रतिष्ठा कशी सांभाळतात हे त्यांनी आवर्जून लिहिलं

होतं- पुलं म्हणाले तसा तो ‘एक बेपत्ता देश’ नाही याची जाणीव करून दिली होती. ११ सप्टेंबर २००१ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकन समाजाची प्रतिक्रिया कशी धीरोदात्त आणि सुसंस्कृत संयमाची होती हेही त्यांच्यामुळेच कळलं होतं. त्या अर्थाने लिखाणातून गोविंदराव भेटतच होते, पण २००५ आणि २००७ मध्ये ते पुण्याला येऊन राहिले आणि एक गप्पांचा महोत्सव सुरू झाला!

बारामती हॉस्टेलच्या व्हीआयपी सूटमध्ये गोविंदरावांनी उतरणं साहजिकच होतं. ते आल्याचं कळताच मी त्यांना भेटायला गेलो. बरोबर माझा मित्र राम कोल्हटकर होता. इतका व्हीआयपी पाहुणा वागवायची हौस, ऐपत, साधनसामग्री रामकडेच आहे; त्यांचं फार लगेच जुळलं. दोघांची निवासस्थानंही जवळच होती. या दोन्ही वास्तव्यात रामने त्यांचं पालकत्व अतिशय मायेनं पार पाडलं. इकडे तळवलकर पुण्यात आले आहेत म्हटल्यावर त्यांचे जुने मित्र त्यांना भेटायला जात होते. ज्यांना ते शक्य नव्हतं त्यांच्या घरी राम त्यांना घेऊन जायचा. कधी ब्रेकफास्ट कधी दुपारचं/रात्रीचं जेवणही रामच्या घरी व्हायचं.

माझी खेप संध्याकाळची असे. कुणाकडे जायचं असेल तर सकाळी किंवा दुपारी, संध्याकाळी आठच्या सुमारास गोविंदराव जेवायला बसत. त्याच्याआधी तासभर ते ड्रिंक घेत. मी धावत पळत साडेसात-पावणेआठला पोचलो की त्यांना कंपनी देत असे ती दहा-साडेदहाला ते झोपायला जात तोपर्यंत - राम थांबला असेल तर नऊच्या बेताला घरी जाई. गोविंदराव येतानाचा उत्तम स्कॉच/वाइनचा स्टॉक घेऊन येत, त्यातच त्यांना भेटीदाखलही उत्तम मद्य आणून देणारे होतेच. त्यामुळे ती सरबराई आमच्यावर कधीच पडली नाही. उलट परत जाताना शिल्लक स्टॉक आवर्जून माझ्या ताब्यात देत.

मध्ये सात-आठ वर्षं गेली होती. तरी जग-भारत-महाराष्ट्र ही त्यांची फ्रिक्वन्सी तितकीच सजग होती; शिवाय नवीन विषय शोधणं चालूच होतं. त्यावेळेला मोहित सेन यांचं The Traveller and The Road हे आत्मचरित्र प्रकाशित झालं होतं. ते गोविंदराव घेऊन आले होते आणि त्यांनी बजावल्यामुळे मी चार/पाच दिवसात वाचून त्यांना परत दिलं होतं. कारण त्या पुस्तकावर त्यांना लिहायचं होतं. ते पाच-सात दिवस मग भारतीय कम्युनिस्ट चळवळ हा विषय असायचा. मध्येच त्यांना एखाद्या जुन्या ग्रंथाची आठवण व्हायची. उदा.- निबंधमाला. मग आम्ही त्यांना ती प्रा. सु.रा. चुनेकरांकडून आणून द्यायचो. उत्तरादाखल गोविंदराव त्यांना जेवायला बोलवायचे. पण संभाषण चालू ठेवण्याची जबाबदारी आमचीच!

गोविंदरावांना एकटं एकटं वाटू नये म्हणून रामने एकदा नसता उद्योग करून ठेवला. एका मराठी लेखकाला त्याने त्यांच्याशी गप्पा मारायला पाठवलं. त्यांना आधी न विचारता. प्रसंग घडला तो असा - लेखक मोठ्या उत्साहानं बारामती हॉस्टेलवर गेला. गोविंदराव काही पुस्तक चाळत होते. लेखक म्हणाला, ‘नमस्कार मी अमुक अमुक’. गोविंदरावांनी अर्धा सेकंद नजर वळवून म्हटलं, ‘हां!’ लेखक म्हणाला, ‘रामभाऊ म्हणाले आपण एकटेच असता म्हणून आलो.’ आता नजर न वळवता ‘हां!’ थोड्या वेळानं लेखक म्हणाला, ‘मी अमुक लिहितो’. आता नजरही नाही आणि उत्तरही नाही. अर्धापाऊण तास गेल्यावर लेखक म्हणाला, ‘मी निघतो आता!’ पुन्हा नजर न वळवता ‘हां!’ लेखक ठणाणा करत रामकडे गेला; राम सर्द झाला. दोनचार दिवसांनी गप्पात सहज आल्यासारखं गोविंदराव म्हणाले, ‘नाशिकच्या लोकांना मी निवृत्त असलो तरी रिकमटेकडा नाही, हे कळलंच नाही म्हणून मी तिथं बंगला बांधला तरी राहिलो नाही!’ सूज्ञांस अधिक सांगणे न लगे!

मात्र श्री. म. माटे, रावसाहेब कसबे यांच्या घरी जायचं आहे, असं गोविंदरावांनीच सुचवलं. अशा भेटीतलं वातावरण गमतीदार असायचं. गोविंद तळवलकर घरी येणारा म्हटल्यावर ‘धन्य आनंददिन’ अशी त्या मंडळींची अवस्था व्हायची. गोविंदराव यायचे. त्यांच्या स्थिर, अलिप्त नजरेनं सगळ्यांचं स्वागत स्वीकारायचे. थोडंफार खाणं, चहा/कॉफी व्हायची. सगळं नेमस्त. शेकहँड सुद्धा क्वचित मग कडकडून भेट वगैरे सोडूनच द्या. हातातल्या काठीशी चाळा करत थोडफार बोलणं व्हायचं - मात्र त्या घरी जाताना-येताना भरपूर जुन्या आठवणी निघायच्या. माट्यांच्या घराच्या आसपासच गोविंदराव त्यांच्या काकांकडे (गोपीनाथ तळवलकर) राहत. तेव्हा काही जुनी माणसं य. गो. जोशी वगैरे आठवली होती. त्याच भागात मीही सध्या राहतो; रामचं ऑफिसही जवळत होतं. तिथे पुष्कळ वेळा बसणं झालं, एकदा थोडा वेळ माझ्या घरीही येऊन गेले. परांजपे नावाचे एक चिनी भाषा येणारे आणि नेहरू-माओ यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करणारे, माओला भेटलेले गृहस्थ पुण्यातच राहत होते, त्यांना गोविंदरावांनी स्वत: बारामती हॉस्टेलवर बोलावून घेतलं होतं.

विद्याधर गोखले, त्यांचा बेबंद स्वभाव, त्यांच्यातला नकलाकार आणि उमदा मित्र, गोखल्यांच्या दुसर्‍या लग्नासाठी गोविंदराव आणि इतर मित्रांनी केलेली धावपळ हा एव्हरग्रीन विषय. मात्र त्यांनी कधीही दोन्ही गोखल्यांबद्दल ते हिंदुत्ववादी होते म्हणून कुचकट प्रतिक्रिया दिल्याचं आठवत नाही. पु.भा.भावे हे दुसरे डोंबिवलीकर हिंदुत्ववादी. त्यांच्या भडक भाषेचा निषेधवजा उल्लेख केला होता; ते वाक्य खरोखर छापण्यासारखं नाही. बोलता बोलता गंभीर आणि हलक्या/फुलक्या विषयांची सहजपणे अदलाबदल होत असे. ग. प्र. प्रधानांना भेटून आल्यानंतर सहजच विषय मधु लिमये, मधु दंडवते वगैरे मंडळींकडे वळला! या सर्वांनाच आपापल्या पत्नीचं फार मोठं पाठबळ मिळालं होतं, असं बोलणं चालू होतं. ‘या समाजवाद्यांना सगळ्यांना बायका मात्र चांगल्या मिळाल्या’ असं गोविंदराव म्हणाल्यावर ‘गोविंदराव या वाक्यात मला जेलसी दिसते आहे’ असं मी म्हटल्यावर गडबडून लगेच ‘नाही, नाही अजिबात नाही!’ पण रागवले नव्हते.

अजूनही माझ्या छातीवर संघटनेचा बिल्ला होताच - कारण मी पुन्हा कार्यकारिणी सदस्य झालो होतो. सगळं बारामती हॉस्टेल खचाखच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भरून गेलेलं असताना त्यांच्या नाकावर टिच्चून व्हीआयपी सूटमध्ये जाताना मला आसुरी आनंद व्हायचा. गोविंदरावांची नाराजीही होतीच. मात्र तिच्यात पूर्वीसारखा धिक्कार नव्हता. एकदा वैतागून म्हणाले, ‘अहो, तुम्ही त्या शरद जोशीच्या नादी लागून वाया चालला आहात, भुसावळला जाता काय, नांदेडला काय जाता, जरा एका जागी बसून वाचन-अभ्यास करा, तुम्ही साठीच्या जवळ आला आहात!’ वार पचवून मी म्हणालो, ‘शेतकरी संघटनेुळे मला ग्रामीण भागात प्लॅटफॉर्म मिळाला आहे, तो माझ्या पार्श्वभूमीच्या माणसाला पुन्हा सहजासहजी मिळणार नाही. आपण बारामती हॉस्टेलमध्ये बोलतो आहोत. तुम्ही मला शरद पवारांकडून तसं व्यासपीठ मिळवून द्या; मी त्यांच्याबरोबर जातो. पण ग्रामीण भागात काम करायचं असेल तर महाराष्ट्रात एका शरद बरोबरच जावं लागेल!’ गोविंदराव म्हणाले, ‘अहो भलतंच काय बोलता! तुमचं बोलणं त्यांना कळणारसुद्धा नाही.’ ते बहुधा विषय वाढवायला नको म्हणूनच! कारण राजकीय फायदा असेल तर शरद पवारांना तुम्ही न बोलतासुद्धा सगळं कळतं असा सार्वत्रिक अनुभव आहे. मात्र त्यांच्या जाहीर मुलाखतीमध्ये ‘तुमचा शरद वेगळा आणि माझा शरद वेगळा’ या माझ्या वाक्याला गोविंदरावांनी टाळी दिली होती.

आम्ही गोविंदरावांच्या बाबतीत पझेसिव्ह झालो होतो हे खरंच, पण इतरांनाही त्यांचा लाभ करून दिला होता. त्यांची दोन तासांची स्वतंत्र, सर्वंकष जाहीर मुलाखत मी घेतली होती आणि १७५० ते २००७ या अडीचशे वर्षांच्या भारतीय इतिहासावर सांगोपांग चर्चा ‘अर्थबोध’मध्ये झाली होती. त्या कार्यक्रमांचं रेकॉर्डिंग रामकडे आहे. योग्यवेळी शब्दांकन करून पुस्तक करायचं असंच तेव्हा ठरलं होतं. आता गोविंदरावांना पुण्यातच ठेवून घ्यावं, आपण त्यांना सांभाळू असा विचार मनात रूजत असतानाच, फणस खाल्ल्याचं निमित्त होऊन त्यांचं पोट बिघडलं, आयसीयूध्ये दाखल करावं लागलं. त्यातून बाहेर येताच अशक्तपणामुळे डोळ्यांचाही त्रास सुरू झाला. मग मात्र त्यांना परत पाठवणं भागच होतं. आम्ही त्यांना सिंहगडावरचा टिळकांचा बंगला दाखवणार होतो, ते राहून गेलं!

मे २००७ मध्ये एका सकाळी आम्ही रामच्या गाडीतून गोविंदरावांना घेऊन मुंबईला निघालो होतो, परत केव्हा विचारल्यावर गोविंदराव म्हणाले, ‘तिकिट पाठवाल तेव्हा’. सर्वांचा मूड छान होता. मुंबईला त्यांचे ज्येष्ठ मित्र कै. भाऊसाहेब नेवाळकर यांच्या घरी ब्रेकफास्टला गेलो. नव्वद पार केलेले भाऊसाहेब तुरूतुरू बाहेर येऊन ‘अरे, गोविंद तुला चालताना काठी लागते?’ म्हणत त्यांना आत घेऊन गेले. आत उत्सवी वातावरण होतं. नेवाळकर मंडळीही खूश होती. गोविंदरावांना कुणी अरेतुरे म्हणताना, ज्युनिअरसारखं वागवताना आम्ही प्रथमच पाहात होतो. गप्पा मुख्यत: १९४५ ते १९६० या काळातल्या चालल्यामुळे त्या ऐकणं एवढंच काम आमच्याकडे होतं. तास-दीडतासात माझ्या एकच लक्षात आलं की, बहुधा सगळी रॉयिस्ट मंडळी काँग्रेसवादीच होती. मात्र त्यांनी अधिकृतपणे काँग्रेस सदस्यत्व घेतलं नव्हतं. मग मला काँग्रेस-नेहरू-यशवंतराव समीकरणाची उकल झाली. तिथून आम्ही दादरला ‘प्रीतम’मध्ये जेवायला गेलो. तिथं गोविंदरावांच्या नाशिकच्या एस्कॉर्टकडे त्यांना सोपवलं - तेही काँग्रेसचेच! जेवण्यापूर्वी गोविंदराव बिअर घेत होते, मी जीन घेत होतो. पुन्हा नेवाळकरांचा विषय निघाला आणि माझ्या तोंडून वाक्य गेलं, ‘गोविंदराव, आज तुमचा कन्फेशनचा दिवस दिसतोय!’

गोविंदरावच ते! उलटून काही बोलले नाहीत. मात्र डोळ्यात मी प्रथमच संताप बघितला, त्यांचा हसरा चेहरा लालबुंद झाला. रामने मला चिमटा काढला. जेमतेम जेवण उरकलं. निरोपाचा शेकहँडही झाला. अवघडलेल्या मूडमध्येच आम्ही त्यांना निरोप घेतला.

७.

नऊ वर्षं होऊन गेली. गोविंदराव नक्की नाराज झाले हे तर जाणवतं कारण नंतरच्या माझ्या इमेल्सना त्यांचं उत्तर आलेलं नाही. हल्ली रामलाही क्वचितच इमेल येतो. गोविंदराव अजूनही वाचतात-लिहितात याचे पुरावे मिळतातच. ‘साधना’मधून जागतिक घडामोडींचं विश्‍लेषण चालू असतंच. मधल्या काळात त्यांचं यशवंतराव चव्हाणांवरचं देखणं पुस्तक प्रकाशित झालं. पण माझे चव्हाणांविषयीचे सर्व प्रश्‍न, सर्व टीकेचे मुद्दे आणि नाराजी त्या पुस्तकानंतरही कायम राहिली आहे, असं मी त्यांना कळवल्यामुळे कदाचित जुन्या जखमेवरची खपली पुन्हा निघाली असावी; पण त्यांच्याशी खोटं बोलणं तर मला जमणारच नाही. गेल्या वर्षी ‘साधना’ दिवाळी अंकात रविंद्रनाथ टागोरांवरचा त्यांचा मार्मिक लेख अतिशय आवडल्याचं मी कळवलं. इमेल्सना उत्तर येत नाही. क्वचित् मुली पोच देतात.

दोन गोष्टी सांगितल्या पाहिजेतच. आम्ही त्यांना घेऊन श्री. म. माट्यांच्या घरी गेलो होतो. माट्यांना संपादकांचा अनुभव फार वाईट असावा कारण ‘अंगी कोणतीही पात्रता नसताना वर्तानपत्राचा संपादक कुणीही होऊ शकतो’ अशा आशयाचं माट्यांनी लिहिलं होतं. गोविंदरावांची गाठ पडली असती तर त्यांनी आपलं मत नक्की बदललं असतं!

दुसरी आठवण वैयक्तिक स्वरूपाची ‘सुमारांची सद्दी’ ही मी २००३ मध्ये प्रथम वापरलेली फ्रेझ एकदा गोविंदरावांच्या लिखाणात आलेली पाहिली, तेव्हा स्वत:चा हेवा वाटला होता.

सध्या मी एक कल्पनाचित्र रंगवत असतो. आता गोविंदरावांना ९२ वर्ष चालू आहे. त्यामुळे ते इकडे येणार नाहीत हे उघड आहे. ते मला तिकिट पाठवणार नाहीत हेही साहजिकच! पण मी जर माझं सगळं किडूकमिडूक गोळा करून अमेरिकेला गेलोच तर कसा प्रसंग घडेल?

मी त्यांचं घर शोधत जाईन. ते बहुधा आरामखुर्चीत बसून एखादा ग्रंथ चाळत असतील. मी म्हणेन, ‘गोविंदराव, मी विनय!’ ते किंचित पाहिल्यासारखं करून म्हणतील, ‘हां!’ मी चिवटपणे म्हणेन, ‘मुद्दाम तुम्हाला भेटायला आलोय!’ ते पुस्तक चाळतच म्हणतील ‘हां!’. अर्ध्यापाऊण तासाने मी म्हणेन, ‘गोविंदराव, मी आता भारतात परत जातो!’ गोविंदराव न पाहताच म्हणतील, ‘हां!’ आणि मी परत येईन! यातली रिस्क फारच मोठी आहे. त्यापेक्षा इथूनच त्यांना म्हणावं झालं, ‘गोविंदराव, आय मिस यू!’

(अंतर्नाद, दिवाळी २०१६च्या अंकातील लेख लेखक-प्रकाशकांच्या पूर्वपरवानगीने साभार.)

Post Comment

Nivedita Deo

Mon , 27 March 2017

अतिशय सुंदर


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सध्याच्या काळामध्ये तरुण पत्रकार लढायला तयार आहेत, ही माझ्या दृष्टीने अत्यंत आशादायक गोष्ट आहे. मला फक्त ह्यात नागरिकांचं ‘कॉन्ट्रीब्युशन’ फारसं दिसत नाही : निखिल वागळे

‘पर्यायी मीडिया’चं काम ‘मेनस्ट्रीम’च्या तुलनेमध्ये कमी पोहोचणारं असलं तरी खूप महत्त्वाचं आहे. आणीबाणीमध्ये ‘साधना’सारख्या छोट्या साप्ताहिकाने जे काम केलं, तेच इतिहासात नोंदलं गेलं. तेच नेमकं ह्यांच्या बाबतीत होणार आहे. जेव्हा सत्ताधाऱ्यांना ‘तू नागडा आहेस’ असं सांगायला समाजातलं कोणीही तयार नव्हतं, तेव्हा या किंवा कमी रिसोर्सेस असलेल्या लोकांनी हे काम केलं. माझ्या मते हे खूप ऐतिहासिक काम आहे.......

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......