शेतकऱ्याला आधी भिकेला लावू, मग जमल्यास कर्जमाफी देऊ!
पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
प्रवीण मनोहर तोरडमल
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Mon , 20 March 2017
  • पडघम कोमविप कर्जमाफी शेती हमीभाव Hamibhav बाजारभाव Bajarbhav

राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, या मागणीवरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षांनी पहिल्या आठवड्यात कामकाज बंद पाडलं. सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेनेही या मागणीला पाठिंबा दिल्यानंतर हवालदिल झालेल्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी या मागणीच्या समर्थनार्थ सभागृहात  घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही पुन्हा एकदा ऐरणीवर आला. तसंच कर्जबाजारी झालेले शेतकरी आत्महत्या करत आहेत... त्यात नोटबंदीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे, असा प्रश्न लोकसभेत काँग्रेसनं उपस्थित केला. यात आणखीच भर म्हणजे मात्र स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य म्हणाल्या की, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यास देशातील कर्जवाटप व वसुलीच्या शिस्तीला मोठा धक्का बसेल आणि भविष्यात हा पायंडाच पडून जाईल. त्यावर वादंग माजून उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. परिणामी कर्जमाफीचा मुद्दा होळी व रंगपंचमीमध्ये चांगलाच रंगत चालला आहे.

यामध्ये शेतकऱ्याच्या हिताचं राजकारण करण्याचा आव आणण्याच्या नादात सर्व राजकीय पक्षांनी कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील, असा भाबडा आशावाद बळकट करण्याचा प्रयत्न चालवला आहे. वास्तविक कर्जमाफीने सर्व प्रश्न सुटतील आणि आत्महत्या थांबतील, असं काहीही होणार नाही. या वर्षी कर्जमाफी दिली तर पुढील वर्षी अशाच पद्धतीने कर्जमाफी द्यावी लागेल, याचा अर्थ शेतकरी नाकर्ता आहे किंवा त्याला भिकेचे डोहाळे लागले आहेत, असाही बिलकूल नाही.

शेतकऱ्यांचे आणि शेतीचे मूलभूत प्रश्न सोडवण्यापेक्षा आणि धोरणात्मक पातळीवर शेतकऱ्यांना मदत करणारे निर्णय घेण्यापेक्षा, शेतकरी कायम भिकारी आणि याचकाच्याच भूमिकेत राहावा यातच सरकारला अधिक रस आहे. एकीकडे शहरी मध्यमवर्गाला महागाईची झळ लागू नये, यासाठी शेतकरी विरोधी निर्णय घेण्याचा सपाटा आणि दुसरीकडे कर्जमाफीची भाषा, अशी दुतोंडी भूमिका घेण्यात केंद्र व राज्य सरकार पटाईत आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य

सरकारच्या अशा चुकीच्या भूमिकेमुळे शेतकरी पार रसातळाला गेला आहे. पाणी, वीज, रस्ते, साठवणुकीच्या सुविधा यांसारख्या पायाभूत सुविधांची अवस्था दयनीय झाली आहे. तसंच लहरी निर्सगाचं तांडव व चुकून पावसाने साथ दिली तर, शेतमालाचे गडगडणारे भाव, सध्या आपण पाहतोच आहोत. परिणामी अशा गाळात जाणाऱ्या धंद्याला कर्ज द्यायला बँका तयार नसतात. या सगळ्या व्यवस्थेत सरकारची भूमिका नाकर्तेपणाची दिसते. शेतकऱ्यांना आधी उघडं करायचं आणि नंतर त्याची लाज राखण्यासाठी कर्जमाफीचं लंगोट गुंडाळायचा, अशी सध्या सरकारची मानसिकता जाणवत आहे.

केंद्रात व राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपचा जनाधार मुख्यत: शहरी भागात आहे. तो बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने महागाई नियंत्रणात आणण्याची आणि व्याजदर कमी करण्याची मोहीम हाती घेतली. मात्र हे करताना शेतकऱ्यांच्या गळ्याला नख लावणारे निर्णय घेण्यात थोडीही कसूर केली नाही.

सरकारची चुकीची धोरणं हे शेती दिवाळखोरीत जाण्याचं प्रमुख कारण आहे. त्याचाच परिणाम म्हणजे ठराविक कालावधीनंतर कर्जमाफीची मागणी जोर धरते. खुल्या बाजारात व्यवहार करून कमावलेला नफा त्या घटकाला आत्मविश्वास देतो. शेतकऱ्यांना सिंचन, यांत्रिकीकरण  अथवा अन्य गोष्टींवर गुंतवणूक करण्याची प्रेरणा (उमेद) त्यातून मिळते. यातूनच अर्थव्यवस्था मजबूत होत जाते. आपल्याकडे या बाबींकडे खूपच दुर्लक्ष झाल्यामुळे शेती व्यवसायात तगून राहून बाजारपेठेतून नफा मिळवू, हा शेतकऱ्यांचा आत्मविश्वासच लोप पावला आहे.

सध्याची सरकारी मानसिकता ही हजार कोटीचं कर्जमाफ केलं हे सांगत त्याचं श्रेय घेण्याकडेच असल्याचं दिसते. चुकीच्या धोरणामुळे सर्व पिकांचं वर्षभरात होणारं नुकसान काढलं तर ते काही हजार कोटींच्या घरात जाईल. त्या तुलनेत कर्जमाफीची रक्कम नगण्य असते. शेवटी कर्जमाफीच्या फसव्या उपायांनी आजचं मरण उद्यावर ढकलण्यात काही प्रमाणात यश येईल, पण त्यामुळे मूळ दुखणं चिघळणं थांबणार नाही.

शेती हा फायदाचा धंदा कसा होईल यासाठी पायाभूत सुविधा आणि शेतीमालाला रास्त भाव या दोन आघाड्यांवर शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याची गरज आहे. शेतकऱ्याला हजारोंचा पोशिंदा म्हणायचं, मात्र प्रत्यक्षात तो नेहमी गरीब याचकाच्या भूमिकेत राहील याची तजवीज करायची, हे मतलबी धोरण ही सत्ताधाऱ्यांची मानसिकताच बनली आहे.

शेतकऱ्याच्या प्रश्नाचं केवळ भांडवल करून राजकीय सत्ता हस्तगत करायची आणि कर्जमाफीसारख्या प्रश्नाचं घोंगडसारख भिजत ठेवायचं, हे आता कुठेतरी थांबायला पाहिजे.

 

लेखक कृषी पदवीधर असून पूर्णवेळ शेती करतात.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......