पुस्तकं आयुष्यात येतात…
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
नीतीन वैद्य
  • जातेगावकर, प्राणकिशोर आणि तेंडुलकर-धौल यांच्या पुस्तकांची मुखपृष्ठं
  • Sat , 22 October 2016
  • नीतीन वैद्य Neeteen Vaidya आनंद विनायक जातेगावकर लक्ष्मी तेंडुलकर-धौल Anand Vinayak Jategaonkar Lakshmi Tendulkar-Dhaul

भारत सासणे मराठीतले गंभीर प्रवृत्तीचे प्रख्यात लेखक आहेत. उपेक्षित, जुनी, कसर लागलेली, पिवळी पडलेली फुटपाथवरील पुस्तकं हुडकण्या-चाळण्याचा अनुभव त्यांनी एके ठिकाणी लिहिला आहे. त्यात त्यांनी म्हटलंय “पुस्तकांचं विश्व अफाट आणि विशाल आहे. त्यात हरवून जाण्याचं भाग्य फार थोड्यांच्या वाट्याला येतं. असे भाग्यवान या वाटेने जात काळ अनंत अन् पृथ्वी विपुल असण्याचा संपन्न करणारा अनुभव घेतात. काही थोडे हरवून गेले नाहीत तरी या मार्गावर काही काळ घुटमळतात आणि तिथल्या अफाट ज्ञानप्रकाशाने दिपून जातात. बाकी बहुसंख्य अन्न-वस्त्र-निवारा निर्माण करण्याकामी अर्थार्जनाचा संघर्ष करत मिटून जातात.”

वाचणं आणि त्यातून भवताल समजून घेणं हीच आपली जीविका - ज्याच्यासाठी आपण जगतो ती गोष्ट  - ही जाणीव लख्खपणे झाली ती फार पुढे. त्याआधी समजायला लागलं तेव्हापासून वाचत होतोच. बाकी बहुसंख्यामधले आपण असणार नाही एवढं अगदी choicelessly कळलं होतं. पुस्तकातल्या - ज्याला कथात्म साहित्य (fictional literature) म्हणतात- वास्तव आणि कल्पिताच्या सीमारेषेवरच्या जगात रमणं आपल्याला आवडतं हे कळलं होतं. अर्थात खास आवडनिवड, नियोजन नव्हतं. आताही नाहीच तरी तेव्हा शब्दशः रानात गुरं चरतात तसं वाचायचो. पण पुढं केव्हातरी आयुष्यात उरलेला उपयुक्त वेळ आणि वाचलीच पाहिजेत अशा पुस्तकांच्या दिवसागणिक वाढत जाणाऱ्या नोंदी यांचं गणित व्यस्त व्हायला लागलं तसा भानावर आलो. वाचणं म्हणजे छान टाईमपास नव्हे, जेवल्यावर झोपेची गाठ पडेतो वा म्हणूनच करायचा उद्योग नव्हे, फक्त माहितीचा साठा वाढवणंही नव्हे. फार गांभीर्यानं करायच्या या उद्योगात लेखकाशी, पुस्तकाशी संवाद होतोच, पण पुढच्या टप्प्यावर आपला या संदर्भात स्वतःशीच संवाद सुरू होतो, व्हायला हवा. पुस्तकातल्या दोन ओळी- शब्दांतल्या मोकळ्या जागा आपण नकळत कल्पनेनं भरायला लागतो. आतले जाणीवांचे, सूक्ष्म क्षमतांचे प्रवाह वाहते होतात, तेव्हा वाचण्याला सृजनस्पर्श होतो.

ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता गंभीर नाटकासंदर्भात एके ठिकाणी म्हणतात, “एका रिकाम्या जागेत एका व्यक्तीनं केलेली काही कृती दुसरा कुणी पाहात असतो, ती फसवी आहे हे दोघांनाही माहीत असतं, तरी ज्या विश्वासानं ते या अनुभवात सामील होतात त्यातून सत्याप्रत जाण्याची शक्यता निर्माण होते, तिथे नाटकाचा जन्म होतो. नोबेलनं सन्मानित पामुकनं म्हटलंय ‘एखादी कादंबरी वाचणं, त्यातलं कल्पित वास्तव खरं मानणं, त्यात हरवून जाणं यासारखं सुख नाही. वाचक त्यामुळं आयुष्याशी बांधला जातो. एक लेखक म्हणून माझं ध्येयही तेच आहे - वाचकाला आयुष्याशी बांधून ठेवणं...”

लिहिणारा आणि वाचणाऱ्यांच्या संदर्भात या दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत असं मला वाटतं. आपण वाचतोय ते संपूर्ण खरे नव्हे, हे वाचकाला माहीत असतं. लेखकाच्या अनुभवाला आलेलं वास्तव आणि त्याच्या प्रातिभ कल्पना यांची सरमिसळ जेवढी बेमालूम, तेवढा त्याचा परिणाम अधिक हेही कळतं. पण तरी ज्या विश्वासानं तो या कल्पित वास्तवाशी तादात्म्य पावतो, त्यातून जाणीवेची वाट उजळते, पुस्तक उमलतं, संवाद करायला लागतं. लेखकाचं बोट सोडून हळव्या, दुखऱ्या जागा उलगडून सांगायला लागतं. निव्वळ घटनात्मक तपशील ओलांडत वास्तव संवादी होतं.

वास्तव तसे अनेक पदरी, व्यामिश्र असतं. हत्ती न् सात आंधळेसारखी बोधकथा वा अकिरा कुरोसावाचा ‘राशोमान’मध्ये येतं, तसं प्रत्येकाला ते आपल्या जागेवरून, दृष्टिकोनातून, आकलनक्षमतेवरून वेगवेगळं दिसतं. त्याच्या समग्र आकलनातून समर्थ लेखक वाचकाला जगण्याचं व्यापक भान देतो....

अलिकडेच दिवंगत झालेले ज्येष्ठ मराठी लेखक आनंद विनायक जातेगावकर जाता जाता मराठी साहित्यविश्व समृद्ध करणारी कादंबरी देऊन गेले- ‘डॉ. मयंक अर्णव’ (शब्द पब्लिकेशन, ऑगस्ट २०१५). देशाच्या राजधानीत माध्यमांनी आपल्या आयुष्यावर अतिक्रमण केलं, त्या सुरुवातीच्या काळातलं घडलेलं, गाजलेलं वा गाजवलेलं एक हत्याकांड. अत्यंत यशस्वी व्यवसाय असलेले, उच्चभ्रू, पेज थ्री व्यक्तिमत्त्व असलेले डॉक्टर दाम्पत्य. पौगंडावस्थेतून तारुण्याच्या नव्हाळीत प्रवेशणारी एकुलती एक कन्या. दिल्लीसारख्या निरागसता करपून गेलेल्या महानगरात हेही वय निसरडे वगैरे असत नाही. घरातच उत्तररात्री डॉक्टर तिला घरच्या नोकराबरोबर नको त्या अवस्थेत पाहतात. त्यांच्यातल्या प्रतिष्ठा, पोकळ का असेना, जपू पाहणाऱ्या बापाचा राग अनावर होतो ...दोघांचाही खून. पुढे भानावर आल्यावर पत्नीसह थंड डोक्यानं देहांसह पुराव्यांची वासलात लावतात न् पुढे निर्ढावलेपणानं खटल्याला सामोरे जातात.

या घटनेला केंद्रस्थानी ठेवून जातेगावकर महानगरीय उत्तराधुनिक जगण्याचा, त्यातल्या पोकळ दांभिकतेचा, संवेदनाहीनतेचा भेदक वेध घेतात. अर्थात यातही जातेगावकर एकारले होत नाहीत, न्याय करण्याचा पवित्रा घेत नाहीत. वेगानं ढासळत जाणाऱ्या ज्या मूल्यहीन सामाजिकतेनं या वाटेवर चालणं 'अटळ' केलं, चालण्यासाठी निर्ढावलेपण दिलं, त्याचीही चिरफाड करतात. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी आग लागत नाही तरी ठिणग्या असतात, त्याच्या प्रकाशात स्वतःला उभे करून पाहावं अशी अनावर उर्मी जागी करण्यात यशस्वी होतात...

‘बर्फ पर बने पदचिन्ह’ ही प्राणकिशोर यांची काश्मिरी कादंबरी ( ‘शीन तॉ वतॅ पद’ या मूळ काश्मिरी कादंबरीला २०१२ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. तिचा रफिक मसूदी यांनी केलेला आणि  साहित्य अकादमीनं २०१४ साली प्रकाशित केलेला हा हिंदी अनुवाद.) प्राणकिशोर सिनेसृष्टीशी संबंधित. आकाशवाणीसाठीही त्यांनी तीस वर्षं नभोनाट्यं, वृत्तचित्रं लिहिली, सादर केली. काश्मीरमधल्या दुर्गम, डोंगराळ भागातल्या भटक्या गुज्जर (पशुपालक) जमातीचं जगणं दीर्घ अवधीच्या रेडिओ डॉक्युमेंटरीसाठी रेकॉर्ड करताना आलेले अनुभव,  रोजच्या जीवनसंघर्षानं रापलेली पण ‘जगणं’ न हरवलेली माणसं काम संपल्यानंतरही मनातच मुक्कामाला आली. त्यांचीच ही कादंबरी. भटकं आयुष्य असलेले, आपल्याकडच्या धनगरांसारखे, पशुपालक ...प्रत्येक वर्षी चार महिन्यांच्या पण चार युगांसारख्या भासणाऱ्या दीर्घ हिवाळ्यानंतर बर्फाच्या चादरीखालून निसर्ग नव्यानं उमलून आलाय. त्यावर चरण्यासाठी जनावरांचे कळप घेऊन बाहेर पडतात. पुढच्या चार महिन्यात प्राणी पोसतात, फळतात, मग त्यांना घेऊन परत घरी.

या काळात त्यांच्या वाटेवर डोळे लावून घरी राहिलेली म्हातारी माणसं, स्त्रिया, लहान मुलं बर्फाची वादळं, भुस्स्खलनं अशा जीवघेण्या संकटातून सुखरूप परतलेल्यांचं विजयी वीरासारखं स्वागत करतात. मग पुन्हा उर्वरित चार महिन्यात ठरवून ठेवलेली लग्नकार्य आणि पुढच्या न संपणाऱ्या प्रदीर्घ हिवाळी काळरात्रीसाठी भाज्या, सरपणादी ऊर्जा गोळा करतात. निसर्गसंवादी तरी पदोपदी अस्तित्वसंघर्ष असणारी ही जीवनशैली एका हळूवार प्रेमकथेतून प्राणकिशोर मूर्त करतात. त्यात व्याकूळता आहे, निसर्गशरणताही आहे, पण बरोबरच कमालीच्या विपरीत परिस्थितीतही जगण्याच्या हाकेला ‘ओ’ देणं आहे.

लक्ष्मी तेंडुलकर-धौल यांनी लिहिलेलं ‘डॉ. आई तेंडुलकर’ हे त्यांचे वडील डॉ. गणपत तेंडुलकर यांचं (आणि आई इंदूमती गुणाजी यांचंही ) चरित्र नुकतंच वाचलं. गणपत तेंडुलकर जर्मनीत ‘आई’ या टोपणनावानं लिहीत. त्याचा लॅटीनमधील अर्थ ‘शहाणपणाचा पक्षी’ असा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातला विस्मरणात गेलेला, किंबहुना अज्ञातच राहिलेला हा उत्कट इतिहास आहे. कन्येनं ‘मीच हे सांगितलं पाहिजे’ अशा रास्त भावनेनं लिहिलेला ( मराठी अनु. सुनीता लोहोकरे, राजहंस प्रकाशन, फेब्रुवारी २०१५). 

कालखंड जुना, स्थळ जर्मनी. त्यामुळे माहितीचा मार्ग खडतर. उपलब्ध कागदपत्रं, पत्रं, तत्कालीन वृत्तपत्रं (भारतातली आणि जर्मनीतली) आहेत, तरी मोकळ्या जागा भरपूर. त्यामुळे सांगितलंय त्यापेक्षा बरंच काही अधिक असावं असं जाणवत राहतं याकडे अनुवादिका लक्ष वेधते, तसंच reading between the lines चा अनुभव घ्यावा असंही सुचवते, ते खरंच हे वाचल्यावर पटतं.

बेळगाव जवळच्या छोट्याश्या गावातला गणपत जवळजवळ  शंभर वर्षांपूर्वी शिक्षणासाठी जर्मनीत जातो. १५-१६ वर्षं तिथं राहतो. या काळात शिक्षण, तीन विवाह (त्यातला एक त्या काळातली जगप्रसिद्ध सिनेकर्मी थेआ फॉन हॉर्बो हिच्याशी) आणि जर्मनीतील डाव्या प्रकाशनांमध्ये भारतात त्याकाळच्या वेगवान घडामोडींबद्दल विपुल लेखन... हे सारं भरात असताना महायुद्धाचे पडघम वाजायला लागतात. तेंडुलकरांना भारतात परतावं लागतं. उद्योजक व्हावं असं ठरवून   परतलेले तेंडुलकर इथली परिस्थिती पाहून ‘बेळगावी वार्ता’ नावाचं साप्ताहिक सुरू करतात. त्यात कामगार प्रश्नावरच्या एका लेखाच्या निमित्तानं इंदूमती गुणाजींची भेट होते. पुढे परिचयोत्तर प्रेम. स्वातंत्र्ययुद्ध ऐन भरात असताना ‘बेळगावी वार्ता’वर बंदी येते, तेंडुलकरांना अटक होते. त्यामुळे इंदूमती-गणपत विवाह हा देशपातळीवरचा चर्चाविषय होतो. प्रत्यक्ष गांधीजी थेट हस्तक्षेप करतात. तेंडुलकरांची सुटका झाल्यावर गांधीजी स्वतः आश्रमात हा विवाह लावून देतात. एखाद्या सिनेमात शोभावी अशी ही कहाणी. वाचावीच अशी.

ही गोष्ट वादळी खरीच, पण बरंच काही सांगता सांगता काही हातचं राखूनही ठेवते. एवढा गाजावाजा होऊन प्रत्यक्ष गांधीजींनी लावलेल्या लग्नाचा पुढे विच्छेद होतो, तो का याचं कुतूहल तसंच राहतं. थेआ ही तत्कालीन सिनेजगतातली जगप्रसिद्ध नटी. तिच्यावर झालेला नाझीवादाच्या पर्यायानं हिटलरच्या समर्थनाचा आरोप खोडून काढण्यासाठी लेखिकेनं खूप तपशील जमा केले आहेत. तिचं युद्धोत्तर काळातील डिनाझिफिकेशन सर्टिफिकेट, स्वतः थेआनं यासंदर्भात दिलेली स्पष्टीकरणं इत्यादी, पण तरी दिलीप पाडगावकरांनी प्रस्तावनेचा शेवट करताना म्हटलंय तसं तिच्या खोलीत गांधीजी, तेंडुलकर यांच्याबरोबर हिटलरचाही फोटो का असावा? काही प्रश्न अनुत्तरीत असतात हे खरं, तरी काही गोष्टी आपण नकळत गृहीत धरल्या की त्या खऱ्या असणं-ठरणं ही आपली प्रत्यक्ष वस्तुस्थितीपलीकडील गरज होते हेही खरंच.

आयुष्यात माणसं जेवढी वेगळी, विविध न् विपुल तेवढं आयुष्य समृद्ध आणि श्रीमंत. माणसांची, अनुभवांची विविधता आणणं हातात नाही, पण पुस्तकं आयुष्यात येतात आणि बरोबर माणसं आणि अनुभवही (भले, अन्य कोणाचे) घेऊन येतात. आपल्यातले क्षमतांचे प्रवाह स्वभावगत मर्यादांना ओलांडून जातात. संवेदनेला धार येते न् आयुष्याचा आकार अर्थपूर्ण होतो.

 

लेखक आकाशवाणीवर निवेदक आहेत.

vaidyaneeteen@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......